परजीवांचे आक्रमण

काल टीव्हीवर कोणत्यातरी 'इंडिया टीव्हीछाप' चॅनलवर स्टीफन हॉकिंग यांच्या 'परजीवांचे आक्रमण' या विषयावरील नव्या मतप्रदर्शनाबद्दल एक कार्यक्रम सुरू होता.
अर्थात् त्यावेळी हे असलेच काही सनसनाटी दाखवत बसतात म्हणून दुर्लक्ष केले होते.
पण हॉकिंग हा दुर्लक्षण्यासारखा शास्त्रज्ञ नव्हे म्हणून आज जालावर शोधले असता खरोखरीच स्टीफन हॉकिंग यांनी डिस्कव्हरीसाठी एक चित्रफीत बनवली असून तिच्यात त्यांनी भयावह चित्र निर्माण केलेले दिसले.
या चित्रफीतीचा कांही अंश येथे पहा.

आजवर अनेक इंग्रजी चित्रपटातून परजीव अर्थात् एलीअन्स चे वेगवेगळे नमुने पाहण्यात आले. काही मोजके चित्रपट सोडले तर (ईटी किंवा आपला कोई मिल गया..) त्यातील बहुतांशी चित्रपटात हे परजीवी पृथ्वीवर आक्रमण करण्यास / मानव जातीवर संकट म्हणून आलेले आहेत - असेच दाखवले आहे.

असेच चित्रीकरण स्टीफन हॉकिंग यांनी केले आहे. त्याबद्दल त्यांच्यावर टीकाही होत आहे.

या चर्चेत दोन मुद्दे आहेत -
१. परजीव हे मानवाशी वैर पत्करतील असे तुम्हाला वाटते का? तसे असेल तर सेटी (सर्च फॉर एक्स्ट्रा टेरेस्ट्रियल इंटेलिजन्स) सारखे प्रयोग बंद करून मानवाने स्वतःला परजीवांपासून लपवून ठेवावे काय?
२. मागे येथे झालेल्या पर्यावरणविषयक चर्चांच्या अनुषंगाने - काही काळानंतर (शतकांनंतर म्हणू) खुद्द मानवच असा अंतरिक्ष - भटक्या (युनिव्हर्सल नोमॅड) बनून इतर सजीव ग्रहांवर धाडी घालत फिरू लागेल काय? स्टीफन हॉकिंग यांनी जीभ गालात धरून (टंग इन् चीक) या चित्रफीतीच्या निमित्ताने मानवरूपी भस्म्यारोग्यावर असे भाष्य केले आहे असे आपणास वाटते काय?

Comments

स्टिफन हॉकिंग

गेल्या महीन्यात याच संदर्भात प्रसिद्ध शास्त्रज्ञ स्टिफन हॉकींग हेच म्हणाला होता की एलीयन्सना शोधण्याच्या भानगडीत पडू नका. मधेच त्याने असे का सांगावे हे मात्र कळले नाही...

--------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

कार्यक्रम पाहिला आहे

हा कार्यक्रम मी आजपर्यंत संपुर्ण पाहिला आहे. (आज मात्र दाखवला गेला नाही!). तुम्ही मांडलेल्या विषयावर लॅरी किंग ने सीएनएन वर कार्यक्रमही केला, काही प्रसिद्ध शास्त्रज्ञ आणि निर्माते यांना बोलावुन,सापडल्यास् तोही पहावा. हॉकिंन्स चे वाक्य असे आहे(अगदी तंतोतंत नसेल, पण बरेचसे असेच) "जर आपल्या पे़शा प्रगत् असे परग्रहवासी असतील तर त्यांना आपण शोधण्याचे परिणाम् वाईट् होउ शकतात्, जसे अमेरीकन् इंडियन लोकांना भोगावे लागले तसे". ह्या भागात परग्रहावर कुठल्या प्रकारचे/टप्प्यातील जीव असु शकतात् याचा उहापोह सुद्धा केलेला आहे.

हे वाक्य मलातरी भयावह/भिती घालण्यास् केले गेले आहे असे वाटले नाही.

या व्यतीरीक्त,
१.प्रथम् प्रश्नः सांगता येत् नाही, आपल्यापे़शा प्रगत(तंत्रज्ञानाने) असतील् तर् शक्यता जास्त्(स्टीफन म्हणतो तेच). दुसरा: नाही, सुरु ठेवावे. आपण् शोध् बंद केला याचा अर्थ ते आपल्याला शोधुच् शकणार् नाही आणि प्रश्न् एक मधला धोका नाहिसा होईलच् असे नाही.

२. शक्य आहे. स्टीफनही याच् कार्यक्रमात् "कदाचीत् ५०० वर्षांनंतर आपली वस्ती मगळावर् असु शकेल्" असे म्हणतो.

स्टीफन हॉकिंग यांनी जीभ गालात धरून (टंग इन् चीक) या चित्रफीतीच्या निमित्ताने मानवरूपी भस्म्यारोग्यावर असे भाष्य केले आहे असे आपणास वाटते काय?

हा प्रश्न् नीटसा कळला नाही.

टंग इन् चीक

चर्चाप्रस्तावात चित्रफितीचा जो भाग दुव्याने दिलेला आहे त्यात - हे परजीवी जर मानवाप्रमाणे स्रोतपिसाट (रोसोर्स हॉगिंग) असतील तर... - असे गृहितक आहे.
वारंवार अशा परजीवींची मानवाशी तुलना केलेली आहे. (२:४५ ते ३:०२ - निवेदकाचे शेवटचे वाक्य !)शिवाय चित्रफीतीखालील वर्णनात्मक टीप पहा : "If advanced spacefaring aliens exploit resources like humans we'd better hope they don't find us anytime soon."
त्यामुळे ही चित्रफीत परक्या जीवांबद्दल मतप्रदर्शन करतानाच मानवी वर्तनावर सपाटून टीका करत आहे, असे वाटते.
मानवच विश्वातला सर्वाधिक भीतीदायक सजीव आहे असे त्यांना सूचित करायचे आहे काय?

आक्रमण वगैरे

परजीवांचे आक्रमण हे परजीवांनी आपल्याविषयी फैसला/ निर्णय करून टाकला असेल तरच होईल. अन्यथा, पृथ्वीवरील जिवांच्या शोधात जर परग्रहवासी आले आणि त्यांनी काही जिवांना मारून पाहिले तर तो त्यांचा प्रयोग (पृथ्वीवरील जिवांची सहनशक्ती, ससेप्टिबिलिटी, रेझिस्टन्स, जीवनसाखळी,वगैरेंचा अभ्यास) किंवा जर त्यांना स्वतःच्या अस्तित्वाची काळजी वाटली आणि त्यांनी हल्ले केले तर "बॅटल ऑफ सर्वायवल" असे म्हणावे लागेल. आक्रमण करण्यासाठी निश्चित युद्धनिती आणि भविष्याची सोय वगैरे लक्षात घ्यावे लागते. आक्रमण करण्याचे त्यांनी निश्चित केले असेल तर त्यामागे त्यांचा काही अजेंडा असायला हवा आणि तयारी असायला हवी.

१. परजीव हे मानवाशी वैर पत्करतील असे तुम्हाला वाटते का?

जर परग्रहवासियांना कडवा विरोध झाला किंवा पृथ्वीवरील जमात ही निकृष्ट आहे (डास-चिलटांप्रमाणे) तर अमेरिकन इंडियन्सप्रमाणे त्यांना चिरडून टाकण्याचा प्रयत्न होणे शक्य आहे किंवा इंडियन्सप्रमाणे आपण परग्रहवासियांचे "बाबू" बनणेही शक्य आहे. ;-) शेवटी "बळी तो कान पिळी" ही म्हण मराठी, हिंदी, इंग्रजी, फ्रेंच आणि परग्रहवासियांच्या भाषेतही असावी असे वाटते. जर त्यांच्या ग्रहावर स्थिती पूरक नसेल किंवा त्यांना दुसर्‍या जीवसृष्टीत सामावून जायचे असेल तर सुपरमॅन किंवा पारशांप्रमाणे परग्रहवासी पृथ्वीवासियांत मिसळून जाणेही शक्य आहे.

तसे असेल तर सेटी (सर्च फॉर एक्स्ट्रा टेरेस्ट्रियल इंटेलिजन्स) सारखे प्रयोग बंद करून मानवाने स्वतःला परजीवांपासून लपवून ठेवावे काय?

आपली प्रायवसी पॉलिसी काय सांगते त्यावर अवलंबून आहे. ;-)

मागे येथे झालेल्या पर्यावरणविषयक चर्चांच्या अनुषंगाने - काही काळानंतर (शतकांनंतर म्हणू) खुद्द मानवच असा अंतरिक्ष - भटक्या (युनिव्हर्सल नोमॅड) बनून इतर सजीव ग्रहांवर धाडी घालत फिरू लागेल काय?

हाहा! परग्रहवासी संवर्धन आणि हक्क समिती स्थापन होईपर्यंत धाडी घालण्याची शक्यता आहे असे वाटते. :-)

स्टीफन हॉकिंग यांनी जीभ गालात धरून (टंग इन् चीक) या चित्रफीतीच्या निमित्ताने मानवरूपी भस्म्यारोग्यावर असे भाष्य केले आहे असे आपणास वाटते काय?

तेच वरीलप्रमाणे "बळी तो कान पिळी.

वरील प्रतिसाद लिहिताना परग्रहवासियांच्या भावना, प्रेरणा आणि गरजा मानवी आहेत असे गृहित धरले आहे. :-) माझ्या कक्षेच्या बाहेर एखादी अमानवी भावना, प्रेरणा
किंवा गरज असल्यास मी त्याबाबत अनभिज्ञ आहे.

वरील परग्रहवासियांच्या चित्रपट यादीत प्लॅनेट ऑफ द एप्स दिसला नाही. चू.भू.दे.घे.

फक्त बळी तो कान पिळी?

अजेंडा तर आहेच! 'त्यांची' जनुके विश्वाच्या (युनिव्हर्सच्या) अधिकाधिक भागापर्यंत पोचवणे आणि ती दीर्घ कालासाठी नष्ट न होऊ देणे. - हाच अजेंडा कोणत्याही सजीवाचा असणार.
जर मानवजात त्यांच्यापर्यंत पोचण्याआधी 'ते 'आपल्यापर्यंत पोचले तर अर्थातच ते भौतिकदृष्ट्या आपल्यापेक्षा जास्त प्रगत असतील.

भौतिक प्रगती करणार्‍या फिरस्त्या टोळ्यांचा इतिहास पाहता त्या युद्धमान असतात आणि स्थानिक रहिवाशांना नामोहरम करतात असे दिसते.
आर्य, शक, हूण इथेपासून ते अरब टोळ्यांपर्यंत (ते युएस् च्या मध्यपूर्व आणि अफगाणीस्तान आक्रमणापर्यंत)... स्थानिक रहिवासी - केवळ शंभरपटीने जास्त लोकसंख्येच्या आधारावर, नैसर्गिक परिस्थितीच्या जोरावर आणि सर्वसाधारणपणे तेवढीच भौतिक प्रगती झालेली असेल तर - त्यांचे आक्रमण रोखू शकतात / परतवू शकतात. (हेही आजवरच्या उदाहरणांवरून स्पष्ट होते.)

पृथ्वीवरील इतर सर्व सजीवांपेक्षा मानवजात सर्वात प्रगत आहे आणि आज पर्यावरणाच्या नुकसानाबद्दल जी ओरड सुरू आहे ती मुळात कॅस्केडिंग इफेक्टने मानवजात नष्ट होऊ नये म्हणून प्रामुख्याने होते आहे. त्यात इतर सजीवांच्या प्रजाती वाचवण्यापेक्षा मानवाचा वंश चालवणे महत्त्वाचे आहे. अन्यथा पृथ्वीवरील अन्य प्रजातींची जनुके मानवाला दुय्यमच आहेत.

तद्वत् परजीवींना मानवाची जनुके दुय्यमच असतील. त्यामुळे त्यांनी मानवाला वाचवायचे की नाही ते मानवाच्या (त्यांच्यासाठी असणार्‍या) उपयुक्ततेवर अवलंबून राहील.
जर मानव त्यांना पाळीव प्राणी वाटला तरच 'बळी तो कान पिळी' इतपत परिस्थिती असेल. पण त्यांना तसे वाटले नाही तर ते मानवाला नष्ट करून टाकतील.

(पर्यावरणावरील टिप्पणीसाठी - आपण मूळ चित्रफीत पहिली असेलच!)

अवांतर :

फैसला/ निर्णय

मराठी, हिंदी, इंग्रजी, फ्रेंच आणि परग्रहवासियांच्या भाषेतही

- भा. पो., पुनरुक्तीची गरज नव्हती. ;):)

वरील प्रतिसाद लिहिताना परग्रहवासियांच्या भावना, प्रेरणा आणि गरजा मानवी आहेत असे गृहित धरले आहे.

- मीसुद्धा !

अजेंडा

अजेंडा तर आहेच! 'त्यांची' जनुके विश्वाच्या (युनिव्हर्सच्या) अधिकाधिक भागापर्यंत पोचवणे आणि ती दीर्घ कालासाठी नष्ट न होऊ देणे. - हाच अजेंडा कोणत्याही सजीवाचा असणार.

हा अजेंडा मान्यच आहे परंतु त्यासाठी त्यातील नेमकपणा आणि त्यांची वर्तमान स्थिती महत्त्वाची आहे. उदा. आपला जीव वाचवण्याची त्यांची धडपड असेल तर ते पारशांप्रमाणे स्थानिक लोकांत मिसळून जाण्याचीही शक्यता आहे. (मेन इन ब्लॅक, रेस टू विच माउंटन आणिही एक प्रसिद्ध चित्रपट आहे, जरा सांगा कोणीतरी ज्यात आपल्यातीलच काही माणसे परग्रहवासी असतात असे दाखवले आहे. मी पाहिला आहे पण काही केल्या नाव आठवत नाही.) भटकून वसाहत निर्माण करणे असा अजेंडा असेल तर आर्यांप्रमाणे प्रथम वसाहत निर्माण करून नंतर वर्चस्वही प्रस्थापित करतील. जर ते मंगोल टोळ्यांप्रमाणे चिवट आणि क्रूर असतील तर लुटालूट करून स्थानिकांना ठार मारणे परंतु आपला ग्रहच हा आपला मुख्य तळ ठेवणे असा त्यांचा अजेंडा असू शकेल.

अवांतरः

(पर्यावरणावरील टिप्पणीसाठी - आपण मूळ चित्रफीत पहिली असेलच!)

घरून वेळ नाही झाला. हापिसातून शक्य नाही.

फैसला/ निर्णय

मराठीने आपलासा करण्याचा "फैसला" घेतल्याने दोन्ही मराठी. :-)

विदा

हॉकिंग्ज यांनी ही विधाने कुठल्या आधारावर केली? मी फक्त बातम्या ऐकल्या जास्त खोलात गेलो नाहि त्यामुळे कल्पना नाही.

याउलट कार्ल सेगन सेटी प्रकल्पाचे जनक. त्यांना परग्रहवासीय मित्र असतील असे का वाटले?
--

यक्षांची देणगी

अगदी याच प्रकारची शक्यता science fiction लेखक डॉ. जयंत नारळीकर यांनी त्यांच्या यक्षांची देणगी या पुस्तकात गोष्टीच्या रुपात लिहिली आहे...

विज्ञान

मस्त लेख आहे विसूनाना.
मलाही कुणी तरी आहे बाहेर ही कल्पना फार आकर्षक वाटते.
वॉव सिग्नल आल्यावर जी काही हवा जगभर पसरली होती ती भन्नाट होती. पण तसा सिग्नल परत आलाच नाही.

इंग्रजी चित्रपटांना सेन्सेशन हवे असते ते मिळाले नाही तर कोण येईल पाहायला?
त्यामुळे असले प्रकार चालायचेच. त्या हॉकींगला कुणा चित्रपट निर्मात्याने त्याच्या नवीन चित्रपटसाठी हाताशी तर धरले नाहीये ना?

असो,
उपक्रमी विज्ञानवाद्यांचा या लेखाला काहीच प्रतिसाद नाही हे पाहून प्रचंड आश्चर्य वाटले.
बहुदा ते जीव ही विज्ञानवादीच असले तर, आपले काय?; अशी भीती तर नाही ना? ;))

आपला
कुजकट
गुंडोपंत

हॉकिंग - सायफाय ब्रँड अँबॅसिडर?

त्या हॉकींगला कुणा चित्रपट निर्मात्याने त्याच्या नवीन चित्रपटसाठी हाताशी तर धरले नाहीये ना?

-असे नसावे. त्याने नथीतून तीर मारला आहे असे मला वाटते. (टंग इन् चीक = नथीतून तीर? )
अवांतर -

उपक्रमी विज्ञानवाद्यांचा या लेखाला काहीच प्रतिसाद नाही हे पाहून प्रचंड आश्चर्य वाटले.
बहुदा ते जीव ही विज्ञानवादीच असले तर, आपले काय?; अशी भीती तर नाही ना? ;))

-नथीतून तीर!!

रोचक चर्चा

वाचतो आहे.

रोचक आहे पण-

'आहे मनोहर तरी...' च्या चालीवर अजून चर्चेला 'उधाण' येत नाही. :)
धनंजय, आपली मते काय आहेत? ते कळल्यास बरे होईल.

दुरूस्ती

चित्रपटांच्या यादीत वॉल-ई चे नाव पाहून आश्चर्य वाटले. त्यात एलियन वगैरे नाहीत आपलेच लोक आणि यंत्रमानव आहेत. :)
क्र्र्र्र्र्र्र्रिशला सायन्स फिक्शन म्हणणे जिवावर येते.

काही विचार

या बाबतीत माझे विचार काळजीपूर्वक केलेले नाहीत. तरी ती मते देतो:

१. परजीव हे मानवाशी वैर पत्करतील असे तुम्हाला वाटते का?

काहीच मत नाही. "वैर" म्हणजे काय? "येथे येऊन नुकसान करू शकतील का?" असा अर्थ आहे काय? कदाचित उदासीन असतील.

तसे असेल तर सेटी (सर्च फॉर एक्स्ट्रा टेरेस्ट्रियल इंटेलिजन्स) सारखे प्रयोग बंद करून मानवाने स्वतःला परजीवांपासून लपवून ठेवावे काय?

"सेटी"मध्ये त्यांनी पाठवलेल्या संदेशांचा शोध, हा भाग येत असावा. तो चालू ठेवण्यास काहीच हरकत नाही. (सरकारी खर्च असेल तर तो मर्यादित असावा.) "त्यांना पाठवलेले संदेश" या बाबतीत धोक्याची चर्चा होऊ शकेल.

२. मागे येथे झालेल्या पर्यावरणविषयक चर्चांच्या अनुषंगाने - काही काळानंतर (शतकांनंतर म्हणू) खुद्द मानवच असा अंतरिक्ष - भटक्या (युनिव्हर्सल नोमॅड) बनून इतर सजीव ग्रहांवर धाडी घालत फिरू लागेल काय? स्टीफन हॉकिंग यांनी जीभ गालात धरून (टंग इन् चीक) या चित्रफीतीच्या निमित्ताने मानवरूपी भस्म्यारोग्यावर असे भाष्य केले आहे असे आपणास वाटते काय?

चित्रफीत अजून बघता आली नाही :-( पण भस्म्यारोगावरचे भाष्य असू शकेल, सहमत.

परग्रहवासी

या अफाट विश्वात माणुस एकटा आहे,ही जाणिव च भयानक आहे

एकटा असण्यापेक्षा

या अफाट विश्वात माणूस एकटा आहे याची भीती वाटण्यापेक्षा, त्याला गरज पडल्यास इतरत्र वस्ती करायला ठिकाण नाही ही जाणीव मला जास्त भीतीदायक वाटते. :-)

अवांतरः आपण या विश्वात एकटेच आहोत का?

निरभ्र आकाशाकडे रात्रीच्या वेळी पाहत असताना आपल्याकडेही कुणीतरी पाहत असतील असा भास होण्याची शक्यता आहे. लुकलुकणारे तारे कुणाचे तरी डोळे नसतील ना असे वाटण्याची शक्यता आहे. कदाचित त्या देदिप्यमान, विस्मयकारक ठिणग्यामधूनच - ज्याला आपण चेतना म्हणतो त्यातूनच - आपल्या अस्तित्वाला आकार मिळाला असावा.

आपले अंतर्मन मात्र या विश्वात आपण एकटे नाही असे सांगत असते. कुठल्याही इतर साधनांच्या मदतीशिवाय आपण सुमारे 2000 तारे बघू शकतो. आपल्या दीर्घिकेत सुमारे 5 कोटी (50 million) तारे असण्याचा अंदाज आहे. खगोलशास्त्रज्ञांच्या मते या ब्रह्मांडात सुमारे 10000 कोटी (100 billion) दीर्घिका असावेत. त्यामुळे अंतरिक्षात भ्रमण करत असलेल्या असंख्य तारांपैकी आपलाही एक तारा असे म्हणता येईल. त्यामुळे आपल्यासारख्या सजीवांची वस्ती असलेला (व कदाचित आपल्यापेक्षा जास्त बुद्धीमान असलेल्या सजीवांचे अस्तित्व असलेला) एखादा तारा कुठेतरी अंतराळात भ्रमण करत असावा. परंतु आपण आजतरी याबद्दल निश्चितपणे काहीही सांगू शकत नाही.

फ्रँक ड्रेक या शास्त्रज्ञाने याविषयी गणितीय सूत्रस्वरूपात काही मांडणी केली होती. त्याच्या समीकरणावरून ताऱ्यांची रचना, तारकापुंजाचे भाग असलेले ग्रह - उपग्रह, ग्रहावरील सजीव प्राणी, सजीव प्राण्यातील बुद्धीमत्ता व या बुद्धीमान प्राण्याची इतरांशी संवाद करण्याची क्षमता इत्यादींचा अंदाज करता येतो. या समीकरणांची आकडेमोड करण्यासाठी काही घटकांचा आपण नक्कीच अंदाज करू शकतो. उदाहरणार्थ, आकाशगंगेत दरवर्षी 20 ताऱ्यांचा 'जन्म' होतो. आपण सूर्याप्रमाणे त्याच्याभोवती ग्रह - उपग्रहांच कुटुंब घेऊन फिरणार्‍या अजून 560 ताऱ्यांचा वेध घेतला आहे. त्यातील 25 टक्के ताऱ्यांच्या भोवती पृथ्वीएवढेच वजन असलेले ग्रह आहेत. जरी हे समीकरण जीवोत्पत्तीनंतर त्यांची तग धरून राहण्याच्या क्षमतेचा अंदाज घेण्यास उपयुक्त ठरू शकले तरी एवढ्यावरून जैविक घटकांचा अंदाज करणे शक्य होणार नाही. परंतु मुळातच तेथे जीवोत्पत्ती कशी झाली याबद्दल मौन बाळगावे लागेल.

काही तज्ञांच्या मते कुठल्याही ग्रहावर जीवोत्पत्ती होऊ शकते. परंतु इतर काहींच्या मते ग्रहावर साधे जीव असले तरी त्यांच्यात बुद्धीमत्तेचा अंश असणे फारच अपवादात्मक परिस्थितीत शक्य होईल. पॉल डेव्हिस या तज्ञाच्या मते जीवोत्पत्ती इतक्या सुलभरीतीने होणे मुळातच अत्यंत कठिण गोष्ट असून आपण अजूनही अंधारात चाचपडत आहोत.

समीकरणाचा विचार बाजूला ठेऊन याविषयी काही पुरावे आहेत का याचाही शोध घेता येईल. आपल्याच सौरमालेतील मंगळ ग्रहावरील सजीवांचे अस्तित्व याकामी आपली मदत करू शकणार नाही. कारण त्या ग्रहावरील जीवांचे आपल्या earthlingशी भरपूर साम्य आणि पृथ्वी व मंगळ ग्रहावरील वातावरणात सारखेपणा यावरून मंगळ व पृथ्वीवरील सजीवांची केव्हातरी आदानप्रदान झालेली असावी, असे म्हणता येईल. परंतु तो काही पुरावा होऊ शकत नाही. शनी ग्रहाच्या टायटन (Titan) उपग्रहावर रासायनिक प्रक्रियेतून उद्भवलेल्या जीवोत्पत्तीचे पुरावे सापडल्याचा दावा काही तज्ञानी केला आहे. सौरमालेतील ग्रह - उपग्रहांपैकी याच उपग्रहाच्या पृष्ठभागावर कार्बनसदृश संयुक्त व गोठविलेल्या पाण्यासारख्या द्रवपदार्थाचे अंश सापडले आहेत. या उपग्रहावर खरोखरच जीव असल्यास त्या आपल्यापेक्षा भिन्न असावेत. गुरू ग्रहाच्या युरोपा या उपग्रहाच्या पृष्ठभागाच्या खाली हिममय समुद्र असून तेथेही जीव असण्याची शक्यता वर्तवली जाते.

सौरमालेत मायक्रोसदृश जीव असणे, हे या विश्वात आपण एकटेच नाही याचा पुरावा ठरू शकेल. परंतु आपल्याला बुद्धीमान सजीवाची अपेक्षा आहे. गेली 50 वर्षे रेडियो टेलिस्कोपद्वारे आपण या बुद्धीमान प्राण्याच्या शोधात आहोत. परंतु आजपर्यंत आपल्या पदरी निराशाच आली आहे. याचा अर्थ असा नव्हे की परग्रहावर जीवच नाहीत. फक्त आपण येथे आहोत हे त्यांना माहित नसावे. फार तर आपले रेडिओ लहरी किंवा आपल्या शहरातील प्रखर दिव्यांची प्रकाश किरणं त्यांच्या पर्यंत पोचत नसावीत, असे म्हणता येईल. कदाचित त्यातून त्यांना काही अर्थबोध होत नसावा. 1945च्या सुमारास सुरुवात झालेल्या SETI (Search for Extra Terrestrial Intelligence ) प्रकल्पाच्या प्रयत्नातून पाठविलेले प्रखर रेडिओ ध्वनी लहरी जास्तीत जास्त 70 प्रकाशवर्षाएवढे लांब गेले असतील. आपल्या या विश्वाच्या अफाट लांबी - रुंदीच्या तुलनेने हे अंतर नगण्य ठरू शकेल. या विश्वाचा विस्तार मुंबई महानगराएवढे असल्यास या रेडिओ लहरी फार फार तर आता व्हीटी स्टेशन ते बाहेरच्या फुटपाथपर्यंत पोचले असावेत, असे म्हणता येईल. त्यामुळे आपल्या विश्वातील परग्रहवासीयांना संदेश पोचण्यासाठीच्या वा त्यांचा प्रतिसाद आपल्यापर्यंत पोचण्यासाठीच्या प्रयत्नांना अजून फार मोठा पल्ला गाठावयाचा आहे.

त्याचप्रमाणे आपल्याच दीर्घिकेत बुद्धीमान सजीव कुठल्या तरी ग्रह - उपग्रहावर असले तरी या पृथ्वीवर होमोसेपियन्स असतील याचा त्यांना पत्ता लागला नसावा, असेही निष्कर्ष काढता येईल. प्रकाश किरणांचा वेग व विश्वाचा भव्य विस्तार यामुळे बहुतेक तारे व ग्रह 'out of range' असू शकतील. किंवा एके काळी त्या ग्रहावर बुद्धीमान सजीव असावेत व त्या आता नाहीत असेही म्हणता येईल. आपल्याच पृथ्वीच्या उदाहरणावरून पृथ्वीच्या 450 कोटी वर्षाच्या अस्तित्वानंतर आपला हा बुद्धीमान प्राणी केवळ 50 - 60 हजार वर्षापूर्वीचा आहे. त्यामुळे परग्रहावरील जीवसृष्टी असण्याची शक्यता व त्यांचा आपल्याशी संपर्क याबद्दल फार आशावादी असून चालणार नाही, असे तज्ञांचे मत आहे.

समजा, भविष्यात केव्हा तरी आपण त्यांच्याशी (किंवा ते आपल्याशी) संपर्क साधल्यास आपली त्यावर काय प्रतिक्रिया असू शकेल? फार फार तर NASA सारख्या संशोधन संस्था किंवा पृथ्वीवरील काही संघटित धर्मसंस्था त्यांचा स्वीकारही करतील. परंतु या गोष्टी प्रत्यक्ष घडल्याशिवाय आपण त्यावर काही टीका टिप्पणी करू शकणार नाही. कदाचित आपल्याला परजीवसृष्टीचा शोधही लागणार नाही. त्यामुळे फक्त आपल्याच पृथ्वीवर बुद्धीमान सजीव आहेत यावर समाधान होत (परंतु मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी ती परजीवसृष्टी आहे असा संशय घेत) आपले अस्तित्व संपुष्टात येईल.

ही अनिश्चितता आपला सोबती म्हणून आपल्या आयुष्यभर कायमचा राहणार आहे हे मात्र निश्चित!

पूर्व प्रसिद्धी: 'आजचा सुधारक'

 
^ वर