इच्छापूर्तीचं "सीक्रेट"
आपल्या मनात अनेक लहानमोठ्या इच्छा निर्माण होत असतात. त्यांची पूर्ती व्हावी व आपल्याला सुखप्राप्ति व्हावी असं आपल्याला वाटत असतं. पुराणकाळात इच्छापूर्तीसाठी कल्पवृक्ष, कामधेनू , या गोष्टी आस्तित्वात होत्या म्हणे. त्यानंतर आल्या जादूची अंगठी, जादूचा दिवा. या सर्व गोष्टी अर्थातच अद्भुत या सदरात मोडतात. अलीकडच्या काळात कोणी त्यांचा शोध घेत फिरेल असं वाटत नाही. तरीपण इच्छापूर्तीचं काहीतरी तंत्र आपल्याला अवगत असावं असं प्रत्येकाला वाटत असतं. पुष्कळशा इच्छांच्या पूर्तीसाठी आपल्याला भौतिक पातळीवर काहीच प्रयत्न करणं शक्य नसतं. किंवा प्रयत्न करूनही यश मिळण्यासारखं नाही असं आपल्याला पूर्वानुभवावरून किंवा आपल्या अंदाजावरून वाटत असतं. अशा वेळी आपली फार चिडचीड होते. गमतीची गोष्ट म्हणजे ही चिडचीड लहानसहान इच्छांच्या बाबतीतच ज्यास्त होते. कदाचित इतकी क्षुल्लक गोष्टही आपल्याला जमू/मिळू नये अशी न्यूनगंडाची व नैराश्याची भावना त्यामागे असावी.
त्याचबरोबर आपल्यापैकी प्रत्येकाला इच्छापूर्तीचे काही 'चमत्कार' म्हणता येतील असे अनुभव आलेले असतात. एखादी हरवलेली वस्तू, जी सापडण्याची सर्व आशा आपण सोडून दिलेली असते, ती अनपेक्षितपणे, अनपेक्षित ठिकाणी पण अगदी आयत्या वेळेवर सापडणं, बरेच दिवस संपर्क नसलेल्या एखाद्या व्यक्तीची आठवण होणं नी थोड्याच वेळात ती व्यक्ति भेटणं किंवा तिच्याविषयी बातमी मिळणं, एखाद्या समस्येनी मति कुंठित झाल्यावर अचानक भोवतालच्या परिस्थितीतच बदल होऊन समस्या आपोआप सुटणं, इ.इ. साधारणपणे या गोष्टी आपण योगायोग किंवा नशीब म्हणून सोडून देतो. त्यांचा कार्यकारणभाव शोधायला जात नाही. श्रद्धाळू माणसं "(आकाशाकडे बोट दाखवून) 'त्याला'च किंवा महाराजांनाच / बाबांनाच आमची काळजी हो" म्हणून भक्तिभावानी हात जोडतात.
पण मग असल्या अनपेक्षित इच्छापूर्तीच्या अनुभवांचं स्पष्टीकरण काय? असे अनुभव आपल्याला पाहिजे तेव्हा येऊ शकतील काय?
या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला र्होडा बायरन् च्या "सीक्रेट" या पुस्तकात सापडतील. त्यात लेखिकेनी मांडलेला मुख्य विचार म्हणजे आकर्षणाचा नियम. तिच्या थिअरीप्रमाणे तुम्ही जेव्हा एखाद्या गोष्टीचा विचार करता तेव्हा तुम्ही विश्वातल्या तशाच प्रकारच्या विचारांना आकर्षित करता. इथे तुम्ही स्वतःबरोबर संपूर्ण विश्वाला कामाला लावता. त्यातून तुमचे विचार मूर्त स्वरूप घेतात. तीच इच्छापूर्ती.
अर्थात या प्रक्रियेतला सर्वात मोठा अडथळा म्हणजे आपली नकारात्मक वैचारिकता. 'सीक्रेट' मधे याची दखल घेतलेली आहे व त्यावर उपायही सुचवले आहेत. थोड्याशा अभ्यासानी ही नकारात्मकता नियंत्रणाखाली आणता येईल असं वाटतं.
लेखिकेच्या म्हणण्याप्रमाणे आपल्या इच्छापूर्तीच्या प्रक्रियेत संपूर्ण विश्वाला सहभागी करून घेतल्यामुळे नी विश्वाला साधनांचा तुटवडा नसल्यामुळे वैयक्तिक पातळीवर अवास्तव मोठी किंवा अशक्य कोटीतली वाटणारी इच्छाही सहज पुरी होऊ शकते.
पुस्तकात अनेक लोकांचे इच्छापूर्तीचे वैयक्तिक अनुभव संकलित केले आहेत. डेव्हिड् स्किर्मर आपला अनुभव सांगताना म्हणतो, "जेव्हा जेव्हा मला पार्किंगसाठी जागा हवी असते तेव्हा 'सीक्रेट'मधे सांगितल्याप्रमाणे मी मला पाहिजे तिथली पार्किंग स्पेस डोळ्यासमोर आणतो आणि वीसपैकी एकोणीस वेळा मला पाहिजे तशी जागा पार्किंगसाठी मिळते. जेव्हा मिळत नाही तेव्हा मला त्यासाठी फारतर दोन मिनिटं थांबावं लागतं. मला प्रत्येक वेळी पाहिजे तसं पार्किंग कसं मिळतं याचं लोकाना आश्चर्य वाटतं". दुसरं उदाहरण जेनी या महिलेचं आहे. पुस्तकरूपात येण्यापूर्वी 'सीक्रेट' डीव्हीडी स्वरुपात होतं. जेनी रोज ती डीव्हीडी पाहायची. त्यातल्या बॉब प्रॉक्टर या तत्वज्ञ व लेखकाच्या विचारानी ती भारावून गेली नी त्याला प्रत्यक्ष भेटण्याची तिला इच्छा झाली. एक दिवस सकाळी तिला आपल्या पत्रपेटीत बॉब प्रॉक्टरच्या नावावर आलेलं पत्र आढळलं. पोस्टमननी ते चुकून तिच्या पत्त्यावर टाकलं होतं. जेनीला आश्चर्याचा धक्काच बसला. पत्रावर बॉब प्रॉक्टरचा खरा पत्ता होता. त्यावरून बॉब प्रॉक्टर आपल्यापासून चार ब्लॉक अंतरावर राहतो हे तिच्या लक्षात आलं. फक्त त्याचा नी जेनीचा घरक्रमांक सारखा होता. ती ताबडतोब ते पत्र घेऊन बॉब प्रॉक्टरच्या पत्त्यावर स्वतः त्याला द्यायला गेली. सतत जगभर प्रवास करणार्या नी क्वचितच घरी सापडणार्या बॉब प्रॉक्टरनी स्वतः जेव्हा तिच्यासाठी दरवाजा उघडला त्यावेळी तिला किती आनंद झाला असेल त्याची कल्पनाच केलेली बरी.
"सीक्रेट" वाचनीय व औदासीन्य दूर करणारं आहे. त्यातल्या सूचना सहज अमलात आणता येतील अशा आहेत. काही उपक्रमीनी हे पुस्तक अगोदरच वाचलं असेल. इतरानीही जरूर वाचावं. आपले इच्छापूर्तीचे अनुभवही सांगावेत.
Comments
तुमचे काही कमिशन?
ज्यांच्या इच्छा पूर्ण होणार नाहीत त्यांच्या अनुभवांवरून आपणास काही बोध मिळण्याची आशा वगैरे?
काहीतरी गैरसमज होतोय्!
तुमचे काही कमिशन?
नाही.
ज्यांच्या इच्छा पूर्ण होणार नाहीत त्यांच्या अनुभवांवरून आपणास काही बोध मिळण्याची आशा वगैरे?
मला वाटतं, मी इच्छापूर्तीचे अनुभव (म्हणजे ज्यांना इच्छा पूर्ण झाल्याचा अनुभव आहे त्यांना त्यांचे अनुभव) सांगण्याची विनंति केली आहे. त्यामुळे ज्यांच्या इच्छा पूर्ण होणार नाहीत अशांच्या अनुभवाचा प्रश्नच उद्भवत नाही.
बायस
'साहित्य व साहित्यिक' किंवा 'आस्वाद' या सदरांतच आपला लेख असता तर ठीक होते.
तो तत्त्वज्ञान आणि विचार या सदरांतही आहे, आपण counting the hits and ignoring the misses करीत होतात, म्हणून स्वयंघेषित 'तर्करक्षक' या नात्याने आलो होतो.
लेख असा लिहिला गेला........
'साहित्य व साहित्यिक' किंवा 'आस्वाद' या सदरांतच आपला लेख असता तर ठीक होते.
माझा लेख म्हणजे मुख्यतः एक पुस्तक-परिचय आहे. पण तसे वर्गीकरण उपलब्ध नाही.
तो तत्त्वज्ञान आणि विचार या सदरांतही आहे,
पुस्तकात जे सांगितलं आहे त्यातल्या काही गोष्टी (माझ्या मते) तत्त्वज्ञान व विचार या सदरात मोडतात.
आपण counting the hits and ignoring the misses करीत होतात, म्हणून स्वयंघेषित 'तर्करक्षक' या नात्याने आलो होतो.
'हिट्स्'पेक्षा 'मिसेस्' खूप ज्यास्त प्रमाणावर असणार हे मी गृहीत धरून चाललो आहे. म्हणून मला 'हिट्स्'मधे व 'हिट्स्' कोणत्या परिस्थितीत घडून येतात त्यात अधिक रस आहे. उद्देश 'मिसेस्'चं 'हिट्स्'मधे जाणीवपूर्वक रुपांतर करता येईल का ते पाहणं हा आहे. त्यासाठी पुस्तकाबाहेरील 'हिट्स्'च्या अनुभवांचं संकलन.
इच्छापूर्तीचं "सीक्रेट"
कहते है किसि चिज् को अगर् दिल् से चाहो तो सारि कायनात् तुम्हे उसे मिलाने कि कोशिश् मे लग् जाति है. इति: शाहरुख् खान्, ओम् शान्ति ओम्.....
शाहरुख् ला बाजुला ठेवा, पण् मला हे वाक्य १००% भाव्व्ते. काय् म्हनताय्?
सकारात्मक विचारसरणी व तिचे फायदे
अनेक मानसोपचारतज्ञ सकारात्मक विचारसरणी व तिचे फायदे सांगतात. मात्र हे फायदे स्पिरिचुअल व मानसिक पातळीवरचे असतात. मनाविरुद्ध घडलेल्या एखाद्या गोष्टीचा केवळ नकारात्मक अर्थ न लावता त्यामागचा कार्यकारणभाव समजावून घेऊन त्या गोष्टीतून सकारात्मक बोध घेण्यासारखे काय आहे यावर अनेक मनोविश्लेषकांचा व मानसोपचारतज्ञांचा भर असतो.
"सीक्रेट" वाचनीय व औदासीन्य दूर करणारं आहे. त्यातल्या सूचना सहज अमलात आणता येतील अशा आहेत. हे मान्य आहे मात्र हे पुस्तक इच्छापूर्तीचं सीक्रेट आहे असं त्याबाबत म्हणणं चुकीचं आहे.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
अरे काय हे !
कमाल झाली !! परवा एका मैत्रिणीला फोन केला, तिने सांगितले सिक्रेटची डिव्हीडी आण!..
आज एक मैत्रिण भेटली चॅटवर, ती म्हटली सिक्रेट वाच, पाहा.
उपक्रमवर् आले ते इथेही परत सिक्रेटच !!
'सिक्रेट'चीच इच्छाशक्ती दिसतीय, हे पुस्तक् मी वाचावे, सतत माझ्या डोळ्यासमोर येतंय ते ! :|
पाहीनच आता डीव्हीडी.