सरलतेपासून क्लिष्टतेकडे भाग ८ : घसरगुंडीवरचं श्रीखंड

लेखमालेचा आत्तापर्यंतचा रोख -
सजीव म्हणजे आत्यंतिक क्लिष्ट रचना होत. त्या कशा निर्माण झाल्या यासाठी 'देवाने अगर जादूगाराने केल्या' हे उत्तर त्यांच्या क्लिष्टतेपायी दिलं जातं. 'पुनरुत्पादन + बदल + निवड' या उत्क्रांतीच्या प्रक्रियेतून क्लिष्टतेची निर्मिती कशी झाली हे जाणून घेता येतं.
स्वजनक (रेणू) -> प्रतिकृती निर्मिती -> वेगवेगळ्या आवृत्त्या -> स्पर्धा -> टिकले ते जिंकले -> टिकण्यासाठी उपयुक्त बदल टिकणे -> 'प्रगती' (कवच -> पेशी -> पेशीसमूह -> पेशी विशिष्टता -> शरीर -> ज्ञानेंद्रिय -> मेंदू -> चेतना)

मागील लेखाचा मतितार्थ - गुणसूत्रं ही शरीर बनवण्याची पाककृती असते, व तीत विविध नैसर्गिक प्रक्रियांनी (अदिश) बदल (म्यूटेशन्स) होतात. हे बदल बहुधा मारकच असतात. जेव्हा हजारो बदल होतात, तेव्हा त्यातले एखाद दोन गुणकारी (अधिक पिले आपल्यामागे सोडण्याची क्षमता त्या विशिष्ट परिस्थितीत वाढवणारे) असतात. हजारो पिढ्यांनंतर हे बदल असलेलेच प्राणी शिल्लक राहातात. दुसरे बदल झालेले, किंवा बदल न झालेले प्राणी - म्हणजे त्यांची संतती - टिकून राहात नाहीत. कालांतराने अशा बदलांची बेरीज होऊन नवीन प्रजाती तयार होते.

घसरगुंडीवरचं श्रीखंड

आकाशात्पतितं तोयं यथा गच्छति सागरम्....
(ज्याप्रमाणे पाणी आकाशातून खाली पडतं, व वेगवेगळ्या नद्यांनी वाहून शेवटी समुद्राला मिळतं...)

रेणूंच्या पातळीवर होणाऱ्या गुणसूत्रांतल्या बदलांचा परिणाम शरीरातल्या बदलांत दिसून येतो. गेल्या लेखात ही प्रक्रिया कशा प्रकारे होते याची तोंडओळख करून घेतली. एका विशिष्ट जिवात होणाऱ्या अशा बदलांतून संपूर्ण लोकसंख्या बदलायची प्रक्रिया कशी होते हे बघण्याचाही काही आकडे मांडून प्रयत्न केला. पण आकड्यांपेक्षा चित्रं केव्हाही परिणामकारक असतात, त्यामुळे यावेळी जवळपास त्याच संकल्पना चित्र व रूपक स्वरूपात बघू.

सर्वप्रथम आपण अगदी सोपं, चावून चोथा झालेलं उदाहरण घेऊ - जिराफाची मान. आपण जेव्हा जिराफाची मान लांब झाली म्हणतो, तेव्हा कोणा एका विशिष्ट जिराफाची मान होती त्यापेक्षा मोठी झाली हे चित्र डोळ्यासमोर नसतं. ती मान व तिची लांबी हे 'जिराफ' या प्रजातीचं वैशिष्ट्य आहे. आपल्याला असं म्हणायचं असतं की जर आज सर्व जिराफांच्या माना मोजल्या व त्यांची सरासरी काही येईल - तिला आपण 'आत्ताची लांबी' म्हणू. जर कालप्रवास करून काही लाख पिढ्यांपूर्वी गेलो व हीच सरासरी मोजली तर तिला 'पूर्वीची लांबी' म्हणता येईल. मानेची लांबी वाढणं म्हणजे 'आत्ताची लांबी' > 'पूर्वीची लांबी' असं सर्वसाधारणपणे कुठच्याही कालखंडाविषयी म्हणता येईल. पण याचा अर्थ असा नाही की आजच्या प्रत्येक जिराफाच्या मानेची लांबी ही पूर्वीच्या प्रत्येक जिराफापेक्षा अधिक आहे. लांबी ही माणसाच्या उंचीसारखीच कमीअधिक असते. आपण 'अमेरिकन पुरुष हे भारतीय पुरुषापेक्षा उंच असतात' हे विधान ज्या अर्थाने करतो तसंच. म्हणजे प्रत्येक लोकसंख्येचं एक वितरण (डिस्ट्रिब्यूशन) असतं. जिराफाच्या मानेची लांबी वाढली याचा अर्थ हे वितरण साडेसात फूट च्या आसपास होतं ते बदलून साडेआठ फुटाच्या आसपास आलं. आलेखरूपात ते खालील पद्धतीने दाखवता येईल. (जिराफांची संख्या सुमारे एक लाख कायम राहिली असं गृहित धरलेलं आहे. हे काहीसं कृत्रिम आहे. तत्वत: अधिक अन्न उपलब्ध असल्यामुळे जिराफांची संख्या वाढू शकेल. किंवा तेवढेच जिराफ अधिक सशक्त व अधिक काळ जगू शकतील....या काळात 'परिस्थिती'देखील फारशी बदलली नाही असंही गृहित धरलेलं आहे.)

य अक्षावर जिराफांची संख्या आहे.

याचा अर्थ काय? आपण सध्या केवळ एकाच गुणधर्माचा विचार करत आहोत म्हणून फक्त दोन प्रकारच्या बदलांचा विचार करू. मानेची लांबी वाढवणारे व कमी करणारे. पूर्वीच्या परिस्थितीत ज्या जिराफांची मान साडेसात फुटांपेक्षा जास्त होती त्यांना अधिक पाला खायला मिळाला (हे गृहितक आहे). अर्थातच उपाशी मरण्याचं प्रमाण त्यांच्यात कमी होतं. पुरेसं खायला मिळण्यासाठी त्यांना अधिक झाडं शोधावी लागली नाही. यामुळे अधिक माद्या मिळवणे, मुलांचं संगोपन करणे यासाठी त्यांच्याकडे जास्त शक्ती व वेळ होता. त्यामुळे त्यांची जननक्षमता (हा शब्द मी अधिक पिलं पुढच्या पिढीत सोडण्याची व जगवण्याची क्षमता या अर्थाने वापरतो आहे) वाढली. आपण पिवळ्या ठिणग्या व निळ्या ठिणग्यांचं रूपक बघितलं त्याप्रमाणेच साडेसात फुटाच्या वरचे व खालचे यांच्या जननक्षमतेमध्ये, चक्रवाढीच्या दरामध्ये फरक पडला. जिराफांची संख्या कायम ठेवायची असली तर कमी वाढ ही पर्यायाने घटच होते. हे लाखो पिढ्या चाललं तरी अगदी बारीक फरकदेखील साडेसात फुटाच्या खालच्या जिराफांना नामशेष करायला पुरेसा ठरतो. मग सगळेच जिराफ बरोब्बर ८.५ फूट मानवाले का नाही झाले? काही ९.० फूट मानवालेही दिसतात. हे कसं? पूर्वीच्या लोकसंख्येमध्ये तर कोणीच ९.० फूटवाले नव्हते. याचं उत्तर बदलांमुळे मिळतं. दरम्यानच्या काळात म्यूटेशन्समुळे काही अपत्यं थोडीशी अधिक लांबीच्या मानेची तर काही थोडी कमी लांबीच्या मानेवाली जन्मली. हे बदल आनुवंशिक आहेत. कारण जनुकांबरोबर ते पुढच्या पिढीत जातात. ज्या बदलांमुळे माना छोट्या झाल्या ते टिकणं शक्यच नाही, कारण लहान मान म्हणजे जननक्षमता कमी. आलेखाच्या भाषेत बोलायचं झालं तर हे लोकसंख्येचं वितरण म्हणजे एक मातीचा ढिगारा आहे अशी कल्पना करा. दर पिढीत (किंवा काहीशे पिढ्यांमध्ये) आपल्या आलेखातल्या ढिगाऱ्याची डावी बाजू वाऱ्याने थोडीशी झिजते, त्यामुळे नवीन माती पडली तरी ती लवकरच नष्ट होते. तर उजव्या बाजूचं मात्र तसं नाही. जी माती तिकडे येऊन पडते ती आणखीनच वृद्धिंगत होते. त्यामुळे जर त्याकडे फास्ट फॉरवर्ड करून बघितलं तर तो हळुहळू उजवीकडे सरकताना दिसेल. ही सरकण्याची प्रक्रिया कोणी हाताने ढकलून करत नाही. एका अर्थाने उजवीकडे 'ढकलणारं बल' कार्यरत असतं. हे बल असण्याचं कारण म्हणजे उजवीकडे आपोआप (अपघाताने) जाणाऱ्या अपत्यांचा अभावितपणे फायदा होतो. हा फायदा तत्कालीन परिस्थिती रूपात (उंच झाडं) असतो.

ज्यांनी फिजिक्सचा अभ्यास केला असेल त्यांना हा फायदा व त्याची दिशा ही इलेक्ट्रिक फील्डप्रमाणे बघता येईल. मातीच्या ढिगाऱ्यातले कण हे धनभारित कणांप्रमाणे उजवीकडे खेचले जातात. किंवा अधिक पोटेन्शियलकडून कमी पोटेन्शिअलकडे जातात अशी कल्पना करता येईल. इतरांसाठी तितकीच प्रभावी गुरुत्वाकर्षणाची उपमा वापरता येईल. अशी कल्पना करा की आपल्या आलेखाचा क्ष अक्ष हा सपाट नसून उजवीकडे घसरणारी घसरगुंडी आहे. व त्यावरचा ढिगारा म्हणजे घट्ट श्रीखंडाचा गोळा आहे. तो जमिनीला न चिकटता संथपणे उजवीकडे सरकतो. या घसरगुंडीचा उतार किती आहे हे परिस्थितीवर ठरतं. जर अनेक उंच झाडं असतील तर तो उतार अधिक तिरका असेल, व त्या गोळ्याचा प्रवास अधिक वेगाने होईल. तसंच ते श्रीखंड किती 'द्रव' आहे यावरही उजवीकडे सरकण्याचा वेग ठरेल. ही द्रवता म्हणजे त्या विशिष्ट गुणधर्माच्या जनुकांत किती सहज बदल होतो ती.

हे रूपक आणखी थोडं ताणू. जिराफाच्या मानेचाच नेहेमी विचार केला जातो. उंची वाढण्याचा मान लांब करणं हा एकच मार्ग नाही. मानेऐवजी पाय लांब झाले तरीही चालू शकतं. दुर्दैवाने फक्त पाय लांब झाले तर मात्र जिराफाला पाणी पिता येत नाही. त्यामुळे मानेची व पायांची लांबी सर्वसाधारणपणे सारखी असावी लागते. कदाचित जिराफाची उंची वाढणं यात पाय लांब होणं ही प्रक्रिया असेल, आणि पाय लांब झाले तर त्याचबरोबर मान लांब होणं हेही बंधन येतं. आता आपल्याला दोन भिन्न प्रकारच्या जनुकीय बदलांचा विचार करणं भाग पडतं - मानेची लांबी (वाढणे वा कमी होणे) व पायांची लांबी (वाढणे वा कमी होणे). आता हा प्रश्न द्विमितीय झाला.

य अक्षावर मानेची लांबी आहे.

वरच्या आलेखात आपण आपल्या वितरणाच्या श्रीखंडाच्या गोळ्यांकडे 'वरून' बघतो आहोत. डोंगरातून वाहाणाऱ्या नदीकडे वरून बघावं तसं. त्याचा 'प्रवास' विशिष्ट दिशेनेच होतो. याचं कारण अर्थातच 'पायाची लांबी = मानेची लांबी' हे बाह्य परिस्थितीतून आलेलं बंधन. पुन्हा जनुकीय म्यूटेशन्सने होणारे बदल पायापेक्षा मान लांब वा मानेपेक्षा पाय लांब करतच नाहीत असं नाही. पण फक्त पाय किंवा फक्त मान मोठी करणारे बदल मोठ्या प्रमाणात झाले तर ते टिकून राहाणार नाही. या बाह्य परिस्थितीच्या बंधनाची कल्पना नुसत्या सपाट घसरगुंडीऐवजी एखाद्या उतरत्या खोलगट घळीप्रमाणे करता येईल. अशा घळीत जर एखादी गोटी टाकली तर तिचा प्रवास नेहेमीच घळीच्या मध्यभागावरून होईलच असं नाही. खाली घरंगळताना ती कधी डावीकडच्या भिंतीवर जाईल, पण जशी ती वर जाईल तशी ती केंद्राकडे खेचली जाईल, व मग कदाचित उजवीकडच्या भिंतीवर जाईल.

प्रजातींमध्ये 'प्रगती' होणे म्हणजे काय? हा प्रश्न नेहेमी उभा राहातो. उत्क्रांती म्हणजे काही सदिश बदलांची प्रक्रिया आहे का? कुठच्या ध्येयाकडे हा प्रवास चालू आहे का? या प्रश्नाविषयी विचार करताना वरील उपमा उपयोगी पडते. परिस्थिती ही भौगोलिक रचनेप्रमाणे मानता येते. नैसर्गिक निवडीचं कार्य हे अव्याहतपणे गुरुत्वाकर्षणासारखं चालू राहातं. त्यानुसार प्रजातींचा गुण-अवकाशातला प्रवास चालू राहातो. खाली सावकाश घसरणारं श्रीखंड अमुक एक विशिष्ट दिशेनेच का येतं याचं उत्तर देता येतं - त्या विशिष्ट घळीचा आकारच तसा आहे. ती विशिष्ट दिशा म्हणजे 'प्रगती' का? एका अर्थाने हो. जिराफांकडे बघितलं, तर तत्कालीन परिस्थितीत जगण्यासाठी अधिक सक्षम जिराफ तयार झालेले दिसतात. पण हेही थोडं फसवंच आहे. कारण जिराफांसाठी तत्कालीन परिस्थिती म्हणजे केवळ उंच झाडंच नव्हे. तर त्या झाडांसाठी स्पर्धा करणारे इतर जिराफही येतात. त्यामुळे सरासरी उंचीचा आजचा जिराफ व सरासरी उंचीचा पूर्वीचा जिराफ यांमध्ये जवळपास काहीच फरक नाही. जर लोकसंख्या स्थिर असेल तर त्याचा अर्थ स्पर्धा तितकीच तीव्र आहे. म्हणजे आयुष्य तितकंच कठीण आहे. हे अॅलिसच्या लाल राणीच्या शर्यतीसारखं आहे. जमीनच हलत असल्यामुळे एका जागी स्थिर राहाण्यासाठी सुद्धा पळावं लागतं.

तरीही या दिशेने मुद्दाम कोणीतरी ढकलून ही प्रगती झाली का? तर अर्थातच नाही, तो केवळ प्रवास आहे, परिस्थितीच्या उंचसखल भागातून, बंधनांच्या भिंतींच्या कडेकडेने, खोलगट घळींतून पुढे जाणारा. गुरुत्वाकर्षणाने खाली येणाऱ्या पाण्यासारखा अव्याहत. नद्या शेवटी समुद्राला मिळतात ही त्या पाण्याची 'प्रगती' म्हणता येईल का? (इथे पाण्याच्या खाली येण्याला 'अधोगती' म्हणता येईल, पण हा वाच्यार्थ व व्यंज्यार्थ यांची गल्लत होऊ नये). पाणी विशिष्ट मार्गाने पुढे, एका विशिष्ट ध्येयाकडे गेल्याप्रमाणे जातं. पण तो विचार योग्य नाही. पाणी विशिष्ट प्रमाणात असणं, ते गुरुत्वाकर्षणाने खाली पडणं, आणि जमिनीत उंचसखलपणा असणं यामुळे समुद्र व नद्या तयार झालेल्या आहेत. उद्या जर डोंगर बदलले तर नद्यांची दिशा बदलेल. भौगोलिक पर्वतराजीप्रमाणेच उत्क्रांतीच्या परिस्थितीची पर्वतराजीही निश्चल नसते. त्यामुळे प्रवासाची दिशा कालानुरुप बदलते. किंबहुना उत्क्रांतीतील प्रवासातले डोंगर हे पातळ रबराने बनवल्याप्रमाणे तन्य असतात. त्यांचे आकार त्या प्रजातीच्या व इतर प्रजातीच्या प्रवासांमुळे बनतात व सतत बदलत राहातात. पुढच्या लेखात आपण हीच प्रतिमा आणखीन थोडी ताणून बघू.

(सारांश - गुण अवकाशात प्रजातींच्या लोकसंख्यांचा प्रवास होतो. त्याकडे आपल्याला उंचसखल भागातून अव्याहतपणे पुढे जाणाऱ्या द्रव पदार्थाची उपमा देऊन बघता येतं. प्रवासाचे 'प्रयत्न' आंधळेपणे सर्व दिशांना होतात, पण 'चढाच्या' दिशेला प्रवास करणारे जीव नष्ट झाल्याने, शेवटी उताराकडे आलेले जीवच दिसतात. हा उतार म्हणजे जनुकीय फायद्याची (जननक्षमता वाढण्याची संधी आहे ती) दिशा. या प्रवासाची सदिशता ही उद्देशातून आलेली नसून, ती विविक्षित परिस्थितीच्या चढउतारांतून निर्माण झालेली असते. काही लाख पिढ्यांनंतर हे बदल सर्व लोकसंख्येतच समाविष्ट झालेले दिसतात.)

लेखनविषय: दुवे:

Comments

उत्तम

लेखमाला वाचायची राहून गेली होती, पण आज सलग आठही भाग वाचले. मालिकेसाठी निवडलेली 'हत्तीवाट' आणि सारांशाच्या समेकडे येणारी रचना आवडली. त्यातही 'प्रवासाचे 'प्रयत्न' आंधळेपणे सर्व दिशांना होतात' हे वेगवेगळी उदाहरणं देऊन ठसवणं हे फारच छान; कारण ह्या बदलांवर हेतूंचा कळत नकळत आरोपण करण्याची 'आपणासारिखे करिती तात्काळ' ही - सवय म्हणा वा खोड म्हणा - बरीच फसवी आहे. (कदाचित तिचाही उगम 'टिकले ते जिंकले' मध्ये असू शकेल?)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

छान

लेख व लेखमाला आवडली. श्रीखंडाचे उदाहरण चपखल बसते.

गुणसूत्रांमधील नैसर्गिक बदलांचे परीणाम बघण्यासाठी लाखो पिढ्या जाव्या लागतात हे खरे पण ती "नेसेसरी अँड सफिशंट" कंडिशन नसावी. कृत्रिमरीत्र्या माश्यांमध्ये केलेले गुणसूत्राचे बदल किंवा कोल्हा ते कुत्रा असा २० किंवा ३० पिढ्यांमधील बदल ही याची काही उदाहरणे म्हणता येतील.

अवांतर : लेखमालिका एका जागी सापडल्यास वाचायला बरे पडेल.
---
सम पीपल आर भलाचंगा, सम आर भिकमंगा
कॅनॉट जज एनीबडी, सरीफ ऑर लफंगा

अनेक चांगल्या उपमा

गुरुत्वाकर्षणाच्या "पोटेन्शियल मिनिमा"चे चांगले वर्णन आहे, आणि ती उपमा वापरून उत्क्रांतीचे वर्णन केलेले आहे. फारच छान.

उत्तम लेखात फरक करायची गरज नाही, पण तरी अल्प छिद्रान्वेशण :
१. जिराफाचे उदाहरण घेण्याऐवजी जीवाश्म-साखळी उपलब्ध असलेले उदाहरण घेतले असते तर तत्त्व अधिक "प्रयोगसिद्ध" म्हणून समोर आले असते. आता थोडेसे सैद्धांतिक वाटते.
उदाहरणार्थ : काही डायनोसॉर->->...->हल्लीचे पक्षी
या साखळीतले अनेक दुवे जीवाश्म म्हणून उपलब्ध आहेत.
मात्र माझ्याच छिद्रान्वेशाच्या विरोधात - लांब मान-लांब पाय हे "स्कीमॅटिक" वर्णन छोट्या लेखाच्या मर्यादेत समजावण्यात अधिक लालित्य आहे.

२. "पुरेसं खायला मिळण्यासाठी त्यांना अधिक झाडं शोधावी लागली नाही. यामुळे अधिक माद्या मिळवणे, मुलांचं संगोपन करणे यासाठी त्यांच्याकडे जास्त शक्ती व वेळ होता."
येथे "सुदृढ नर-माद्यांना अधिक आणि पुष्ट जोडीदार मिळवणे" असा फरक केलेला बरा. कित्येक बाबतीत कालांतराने पडणारे फरक नरांत आणि माद्यांमध्ये एकाच दिशेने जाणारे असतात - उदाहरणार्थ, जिराफची लांब मान.

काही फरक नरांमध्ये वेगळे, माद्यांमध्ये वेगळे असे उत्क्रांत होतात. उदाहरणार्थ : मोर-लांडोरींच्या शेपट्यांचा आकार वेगवेगळ्या दिशेने उत्क्रांत झाला. अशा परिस्थितीत लांब शेपटामुळे "नरांना माद्या मिळाल्या" पण आखूड शेपटामुळे "माद्यांना नर मिळाले" अशी लिंगविवक्षित वाक्ये ठीक आहेत.

...

इथे सिद्ध करण्यापेक्षा गुण अवकाशाची कल्पना मांडयची आहे.

येथे "सुदृढ नर-माद्यांना अधिक आणि पुष्ट जोडीदार मिळवणे" असा फरक केलेला बरा.

पटलं. मी बदल करण्याचा प्रयत्न केला. पण संपादन करता येत नाही.
राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

काही डायनोसॉर->->...->हल्लीचे पक्षी???

काही डायनोसॉर->->...->हल्लीचे पक्षी

हे पहावे.???

उडता न येणार्‍या पक्ष्यांवरील आधुनिक संशोधनही आश्चर्यकारक आहे.

चतुष्पादांपासून पिसे-असलेले-द्विपाद असे म्हणूया

डायनोसॉर म्हटले की आपल्याला "टिरॅनोसॉरस" आठवतो. त्यामुळे माझे वरील वाक्य
"टिरॅनोसूरसच्या वंशातून गरुड उद्भवला" असे कोणी वाचू शकेल. वाक्य निष्काळजीपणे लिहिलेले आहे, क्षमस्व.

"प्राचीन चतुष्पादांच्या वंशातून हल्लीचे पिसे असलेले द्विपाद उद्भवले, त्याचे जीवाश्मशास्त्र..." असे म्हणायला हवे होते.

मानवी हस्तक्षेप : पातळ श्रीखंड

लेखमाला वाचत आहे.
पुढे जाताना-
घसरगुंडीवरच्या श्रीखंडात थोडे दूध मिसळून त्याला पातळ बनवण्याचे जे काम मानव करत आहे त्याने समस्त जीवसृष्टीच्या जनुकांच्या
नैसर्गिक बदलाच्या दरात फरक पडेल काय? (पडेलच! पण किती वेगाने?) तो जीवसृष्टीला फायद्याचा ठरेल काय? जनुक तंत्रज्ञान हे निसर्गाचा समतोल ढळण्यास मदत करेल काय?
-यावर विचार व्हावा अशी अपेक्षा आहे.
यात विविध जीवांच्या माणसाळलेल्या प्रजाती, संकरित प्रजाती आणि जनुकीय बदल केलेल्या प्रजाती या सर्वांचा समावेश व्हावा.

वेगळे

यासाठी जिराफाच्या मानेपेक्षा वेगळे उदाहरण घेण्याचा प्रयत्न केला. बरेच प्राणी/कीटक यांचा रंग आजूबाजूच्या झाडांशी किंवा वातावरणाशी मिळताजुळता असतो. यामुळे अर्थातच त्यांना संरक्षण मिळते. पण याची सुरूवात कशी होत असेल? समजा एखाद्या किड्याचा मूळ रंग तपकिरी आहे आणि काही कारणांमुळे त्यांचे स्थलांतर हिरवट वातावरणात झाले. रँडम म्युटेशनमुळे रंग कधीकधी बदलणार. त्यामुळे ज्या किड्यांचा रंग अशा म्युटेशनमुले हिरवटपणाकडे झुकला ते जगण्याची शक्यता अधिक. ज्यांचे रंग अधिक खुलून दिसतील ते तगण्याची शक्यता कमी. असे होत होत ज्यांचा रंग पूर्णपणे वातावरणाशी मिळून गेला ते "जिंकले".

याला काही ठाम विदा नाही पण असे झाले असावे असे म्हणू शकतो. याबद्दल शंकाही आल्या.
एका पिढीत साधारण किती म्युटेशन होतात? त्यामुळे काय-काय बदल होऊ शकतात? याउलट प्रश्न म्हणजे कुठल्याही प्राण्यामधील जेनेटीक सिक्वेन्सची स्टेबिलिटी किती आहे?

--
What other people think about you is none of your business because it really isn't about you, it is about them. -- Sean Stephenson

किड्यांचा रंग

तुम्ही दिलेलं उदाहरण काल्पनिक नाही. औद्योगिक क्रांतीनंतर (पिट्सबर्ग की मँचेस्टर आठवत नाही) भिंती, झाडं सर्वत्र धुरामुळे काळा थर असे. त्या काळात तिथले पतंगांसारखे काही किडे करड्याचे काळे झाले होते. मानेची लांबी हा गुण आलेखात मांडायला सोपा म्हणून निवडला आहे.

बदलाचा दर काय असतो हे सांगणं कठीण आहे, त्यातल्या क्लिष्टता सांगता येण्याइतका देखील माझा अभ्यास नाही. पण उदाहरण द्यायचं तर विशिष्ट गुणधर्मात अगदी नगण्य ०.१% इतका फरक गृहित धरून साध्या फोटो-सेन्सिटिव्ह पटलापासून आधुनिक डोळा ३०००० ते १००००० पिढ्यांमध्ये तयार होऊ शकतो असं काँप्युटर मॉडेलिंगने दिसून आलेलं आहे.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

मीही

उत्तराबद्दल आभार.
मीही डिस्कव्हरी किंवा अशाच च्यानेलवर याबद्दल पाहिले होते. स्वतःचे रक्षण करण्यासाठी रंगाचा कॅमोफ्लाज बर्‍याच जातींमध्ये दिसून येतो.

पिढ्यांबद्दल : जर् जातीचा जीवनकाल कमी असेल (जसे की माश्या (फ्लाय)) तर या पिढ्या तुलनेने लवकर जन्माला येतील आणि दृश्य परिणाम लवकर दिसेल. म्हणूनच म्युटेशनचे प्रयोग माश्यांवर करत असावेत.

--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com

It's one of those irregular verbs, isn't it: I have an independent mind; you are an eccentric; he is round the twist. ~ Bernard, Yes, Minister
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

वनस्पती-प्राणी

लेखमाला अतिशय उत्तम वठली आहे.

काही बाबतीत काही अधिक प्रकाश टाकता आला तर बरे.
१. वनस्पती आणि प्राणी यांच्यात उत्क्रांतीच्या ओघात पडलेला तुकडा
२. प्राण्यांना असलेले विशिष्ट स्वरूप आणि त्याच्या उलट वनस्पतींना नसलेले विशिष्ट स्वरूप आणि त्यामुळे टिकून राहण्यात होणारा फायदा.
३. प्रगत प्राण्यांमध्ये असलेली इन्डिव्हिजुअल आयडेंटिटीची जाणीव आणि वनस्पतीतील अभाव? आणि त्याचे परिणाम. उदाहरणार्थ एक कुत्रा "आपली' संतती वाढावी असा प्रयत्न करतो तशी जाणीव वनस्पतीत नसावी असे वाटते.

नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)

संदिग्ध मुद्दे

(१) वनस्पती आणि प्राणी यांच्यात उत्क्रांतीमध्ये फार पूर्वी कधीतरी वेगवेगळ्या शाखा झाल्यात हे खरे.

मात्र बाकीचे दोन प्रश्न समजले नाही.
(२) वनस्पती आणि प्राणी यांच्या आकारात आणि वाढीत ढोबळ फरक दिसतात खरे. पण फरकांच्या तुलनात्मक फायद्याची उत्क्रांतीतत्त्वाच्या संदर्भात काय चर्चा होऊ शकते?
(३) याचे आणखी एक उदाहरण म्हणजे हल्लीच डुक्कर-वंशीय आणि हत्ती-वंशीय यांच्यामध्ये फुटलेल्या उत्क्रांती-शाखा. हत्ती-परिवाराची (म्हणजे मॅमॉथ वगैरे आले) इंडिव्हिजुअल सोंड आणि डुकरामध्ये सोंडेचा अभाव आणि त्याचे परिणाम तुलनात्मक कसे अभ्यासावे? उदाहरणार्थ, हत्ती सोंडेच्या आत पाणी ओढून मग पिण्याचा प्रयत्न करतो, सोंडेच्या हालचालीने नरमादीचे प्रणयाराधन होते... डुक्कर नाकाने तसे करत नसावे... मात्र या प्रकाराची उत्क्रांतीतत्त्वाच्या दृष्टीने कशी चर्चा होऊ शकते, हे कळलेले नाही. (उत्क्रांतीच्या तत्त्वाप्रमाणे* हत्ती-डुक्कर ही जशी एक उपशाखा, तशी वनस्पती-प्राणी ही अन्य काळातली उपशाखा. माझे उदाहरण गैरलागू आहे, असे वाटत नाही.)

मुद्दे वेगळ्या प्रकारे मांडता येतील काय? कदाचित मला नीट समजलेले नाहीत.
- - -
*तत्त्वे: (१) प्रजननक्षम एककांच्या अपत्यांमध्ये वैविध्य असते. (२) अपत्यांची वीण उपलब्ध साधनसामग्रीपेक्षा अधिक असते. (३) साधनांच्या मर्यादेमुळे काही जीव प्रजनन करेपर्यंत तगतात, उरलेले नि:शेष होतात, म्हणून पुढच्या पिढीमध्ये एककांच्या सरासरी गुणधर्मात काही फरक झालेला दिसून येतो = "उत्क्रांती" झालेली दिसून येते.
कदाचित हे ४थे तत्त्व : पृथ्वीवरची काही एकके प्रजनन करताना एकमेकांची जनुके मिसळून घेतात. (अशा सर्व एककांना "स्पीशिस" संज्ञा आहे.) एकमेकांपासून अत्यधिक अंतरावर उत्क्रांत झालेली एकके एकमेकांशी जनुकांची आदलाबदल करण्याची क्षमता हरवून बसतात. असे घडता आदल्या "स्पीशिज"च्या शाखा या नव्या "स्पीशीज" होत. जनुकांच्या मिश्रणांची गणिते करताना ही जनुके मिसळू शकत नाहीत, याचे भान ठेवावे.

वनस्पती

वनस्पतींना प्राण्यांसारखा विशिष्ट आकार नसतो. म्हणजे माणूस हा प्राणी घेतला तर त्याला एकच डोके, दोनच हात, दोनच पाय, दोनच डोळे असतात. परंतु आंब्याचे झाड घेतले तर त्याला इतक्याच फांद्या, इतकीच पाने, इतकीच मुळे असे असत नाही. त्यामुळे टिकून राहण्यात आंब्याच्या झाडाला बराच फायदा होतो असे वाटते. जिराफाची मान गरज पडली म्हणून लांब होत नाही पण झाडाची फांदी मात्र सूर्य प्रकाशाच्या गरजेसाठी कितीही लांब होऊ शकते.

अशा फरकांमुळे वनस्पतींच्या टिकून राहण्यात आणि (विविध वनस्पतींतर्गत) परस्पर संघर्षात (प्राणीसृष्टीच्या तुलनेत) कसा फरक असतो त्यावर प्रकाश टाकता आला तर हवा आहे.

नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)

उत्क्रांतीच्या सिद्धांताच्या आवाक्याबाहेरचे कुतूहल

हे उत्क्रांतीच्या सिद्धांताच्या आवाक्याबाहेरचे कुतूहल आहे असे माझे मत आहे.

"जिराफची मान गरजेप्रमाणे लांब होऊ शकत नाही" या वाक्याने लघुरूपाने सांगायचे असते की "गरजेप्रमाणे लांब झालेली विवक्षित जिराफची मान त्याच्या पुढच्या पिढीला आनुवंशिक मिळत नाही.

एखादा जिराफ मान ओढून तिचा व्यायाम करू लागला, तर त्या एका प्राण्यापुरती मान लांब होऊ शकते. याचे मानवी उदाहरण बघण्यासाठी - व्यायामाची गरज आणि पौष्टिक आहारामुळे व्यक्तीचे स्नायू वाढू शकतात. (सर्वांगसुंदर स्पर्धेतल्या पहिलवानांचे स्नायू अन्य व्यक्तींपेक्षा पुष्कळ मोठे असतात.) झाडांचे बोनसाय करतात, तसे चिनी उमराविणींचे पाय बांधून ते चिमुकले करत. पण त्यामुळे पहिलवानाच्या मुलाचे स्नायू (व्यायामाशिवाय) फुगत नाहीत. आणि चिनी उमराविणींच्या मुलींचे पाय बांधल्याशिवाय चिमुकले होत नव्हते. त्याच प्रमाणे एका पिढीत सूर्य मिळवण्यासाठी वाकड्या वाढलेल्या झाडाच्या बीमधून "आनुवंशिक वाकडी" झाडे उपजत नाहीत.

- - -

कित्येक वृक्षांना एक म्हणजे एकच (मुळाशी जोडलेले) खोड असते. कित्येक जनावरांना वेगवेगळ्या संख्येत केस असतात, धमन्यांच्या शाखा आणि केशवाहिन्या (झाडांच्या फांद्या आणि पाने यांच्याशी जवळातजवळची उपमा) कमीअधिक कितीही असतात, आणि जरुरीप्रमाणे फुटू शकतात.

पण ते सर्व वेगळे.
- - -
मुख्य म्हणजे उत्क्रांतीमधील थेट पुढच्या पिढीमध्ये बदल+मिश्रण करणारी स्पर्धा फक्त मिसळू शकणार्‍या जनुकांमध्ये होते.
चिंचेच्या झाडाच्या पानांचे टिकल्या-टिकल्यांनी बनलेले वैशिष्ट्य आंब्याच्या झाडात नसते. पण चिंचेची झाडे अमुक ठिकाणी आंब्याच्या स्पर्धेत कितीका वाढेनात. पुढच्या पिढीतल्या आंब्यांना चिंचेच्या स्पर्धेमुळे अधिक टिकल्यां-टिकल्यांची पाने येणार नाहीत. चिंचेशी स्पर्धेत आंब्याची झाडे नि:शेष होतील, किंवा आपाततः होणार्‍या कुठल्या फरकाने पुढच्या पिढीतली किंवा तगतील. पण पाने टिकल्या-टिकल्यांचीच होतील अशी अपेक्षा योग्य नाही. कारण चिंचेची आणि आंब्याची जनुके मिसळू शकत नाहीत.
- - -

वनस्पतींच्या प्रत्येक "व्यक्ती"चा जगण्याचा काळ वेगळा. बहुतेक मोठ्या वनस्पती जागच्या हलत नाहीत. त्यांचा ऊर्जेचा स्रोत सूर्यप्रकाश, कार्बन डायॉक्साइड, आणि भूमीतली खनिजे. जनावरांचा जगण्या-विणीचा काळ वेगळा. बहुतेक मोठी जनावरे एका स्थळावरून दुसर्‍या स्थळावर हलतात. त्यांच्या ऊर्जेचा स्त्रोत म्हणजे अन्य जीवजंतू (वनस्पती किंवा अन्य जनावरे).

इतके सगळे फरक असताना वनस्पती-अंतर्गत स्पर्धेची तुलना जनावरांअतर्गतच्या स्पर्धेशी कुठल्याही बाबतीत करणे दुरापरस्त वाटते. "प्रत्येक स्पर्धापटांगणातली स्पर्धा वेगळी असते" असे म्हणता येते, आणि तिथेच सोडावे लागते.

हुतुतूच्या खेळात दीर्घ श्वास लागतो, शिवणे-विरुद्ध-पकडण्याचे डावपेच असतात, म्हणून स्पर्धा त्यावर अवलंबून असते. क्रिकेटच्या खेळात फलंदाजी/गोलंदाजी/क्षेत्ररक्षणाचा समन्वय साधावा लागतो, म्हणून त्यातली स्पर्धा त्यावर अवलंबून असते. मात्र "हुतुतू-क्रिकेट यातील स्पर्धा वेगवेगळ्या आहेत" असे सांगितल्यानंतर त्या दोन खेळांतअर्थपूर्ण तुलना अशी काही केली जाऊ शकत नाही. (म्हणजे क्रिकेटमध्ये "हुतुतुतु" किंवा "कबड्डी-कबड्डी" या घोषांनी काय फरक पडतो? किंवा हुतुतूमध्ये फलंदाजाला पायचीत करण्याच्या कौशल्याचा काय फायदा होतो? या प्रश्नांची उत्तरे कधीच समाधानकारक होऊ शकत नाहीत.)
- - -
तरी वरील कुतूहल वाङ्मयीन किंवा काव्यात्मक दृष्टीने अतिशय कल्पक आहे, हे मानलेच पाहिजे.

मान्य

ती स्पर्धा वेगळ्या प्रकारची आहे हे मान्य.

नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)

 
^ वर