आधूनिक लोकगीते?

महाराष्ट्रातील लोककलाप्रकारांत लोकगीते हा एक महत्त्वाचा भाग आहे. कुणीतरी अनामिक निर्माता असलेल्या या गीताचे सादरीकरण होता होता ते गीत जेव्हा साऱ्या समुहाचेच बनुन जाते तेव्हा त्याला लोकगीताचा दर्जा प्राप्त होतो. प्रसंगी लोकगीत ही समुहाची निर्मिती सुध्दा असते. आज महाराष्ट्रात लोकगीते म्हणून ज्या कॅसेट्स व सीडी प्रकाशित होत आहेत त्या गीतांकडे ही लोकगीतांची आधूनिक आवृत्ती म्हणून पहाता येते. प्रल्हाद शिंदे यांनी गायलेली अनेक लोकगीते एचएमव्हीच्या व आकाशवाणीच्या सहाय्याने घराघरात जाऊन पोहोचली व अजरामर झाली. त्यांची परंपरा नंतर पुढे आनंद व मिलिंद शिंदे यांनी काही प्रमाणात चालवली. काही प्रमाणात या साठी की आनंदमिलिंद यांनी नंतर लोकप्रियता व द्विअर्थी रचनांना जास्त महत्त्व दिले. खरे तर असे म्हणणे ही मलाच पून्हा एकांगी वाटते. आनंद मिलिंद शिंदे यांनी गायलेल्या व त्यांच्या सोबत इतर समकालीन लोकगीत गाणाऱ्या गायकांची एकूण गीते पाहता त्यातल्या द्विअर्थी गाण्यांची संख्या मर्यादीतच आहे. परंतु या अशा द्विअर्थी गाण्यांना प्रसिद्धी मिळण्याचे प्रमाण मात्र अर्थातच जास्त आहे. अभिरुचीचे काही संकेत निर्माण करणारी व सर्वांवर ते संकेत लादू पाहणारी एकूणच व्यवस्था या व इतर गीतांकडे डोळेझाक जरी करत आली असली तरी जनमानसांवर या गीतांनी केलेली जादू मात्र नाकारता येणे शक्य नाही. जवा नवीन पोपट हा या गीताने आनंद शिंद्यांना प्रसिद्ध केले. हे गीत द्वीअर्थी नव्हते. त्यानंतर दरसाल एक तरी हीट गाणे देऊन त्यांनी आपला चाहता वर्ग महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात निर्माण केला. ज्या गीतांशिवाय अभिजनांच्याही लग्नाच्या वरातीला पूर्णत्व येऊ शकले नाही अशी गीते दरसाल प्रसिद्ध होणारी गीते आनंद मिलिंद शिंदे यांनी गायलेली आहेत. उदा.

हॅलो मी बाबूराव बोलतोय.
माझ्या हरणीला कारभारणीला भूतानं झपाटलं.
हाताला धऱलया म्हणती लगीन ठरलंया

अशी अजूनही कित्येक गाणी लोकांच्या लक्षात असतील. आणि या गाण्यांना द्विअर्थी म्हणता येत नाही. अर्थात द्विअर्थी गाण्यांच्या बाबतीत आनंदमिलिंद शिंदे यांनी काही वेळा अगदी कहर केला आहे हे मात्र मान्य करावेच लागेल. प्रल्हाद शिंदे यांनी मात्र द्विअर्थी गाणी गायली नाहीत. त्यांच्या

कुठ जातील काळ्या पोरी
दिसते कोणाची गाडी
गोडीनं नांदाव लागंलं सखे
संसार माझा छान
कशाचं खरं खोटं पिकतय रं
सुय़ा घे गं दाभण घे
जीव लावा पोरीला माझ्या जावईबूवा

या आणि अशा कित्येक भावपूर्ण व सुरेल लोकगीतांच्या तुलनेत चल ग सखे पंढऱीला ही कॅसेट तुफान गाजली. कदाचित समाजमनावर असलेला भक्तीरसाचा पगडा व एचएमव्हीचे व्यवस्थित मार्केटींग या गोष्टी सुद्धा त्याला कारणीभूत असाव्यात. असो एकूण या टिपणात लोकगीतांच्या नावाखाली द्विअर्थी गाण्याची जी अभिरुचीहीन रेलचेल सध्या सुरु आहे तिचे समर्थन करण्याचा अजिबात उद्देश नाही. पण द्विअर्थी नसलेली आणि चाल आणि विशिष्ट ठेक्यावर ताल धऱायला लावणाऱ्या गाण्याच्या आस्वादापासून अभिरुची संभाळण्याच्या नादात कुणी दूर राहू नये असे वाटते. या निमित्ताने वाचकांनी आपल्या आठवणीतील काही या प्रकारची गाजलेली लोकगीते सांगावीत. या गाण्यांचे प्रकाशन जरी लोकगीते म्हणून होत असले तरी ती खरेच लोकगीते आहेत का यावरही अभ्यासूंनी अवश्य मत व्यक्त करावे. बाकी या गीतांच्या प्रसिद्धी मागच्या कारणांचीही चर्चा करता येईल.

Comments

आणखी एक-

"काय राव तुम्ही... हो,हो,हो काय राव तुम्ही
काय राव तुम्ही, धोतराच्या धंद्यात भरपूर कमावलं .... पर बाईच्या नादानं सारं लुगड्यात गमावलं..." :)

लोकगीत म्हणजे काय?

प्रह्लाद, आनंद व मिलिंद शिंदे ह्या तिघांचा कव्वालासारखा आवाज मला आवडतो. पण विठ्ठल उमपांना तोड नाही.
लोकगीते ही लोकपरंपरेतून आलेली असतात, असे वाटते. तशी ही गीते आहेत का? काही असावीत. काही नसावीत. असो. सध्या खालील गाणी आठवत आहेत:
माझ्या नवर्‍यानं सोडलिया दारू बाई देव पावलाय गो
अगं पोरी संभाल दर्याला तूफान आयलया भारी

तुमच्या निकषांनुसार ह्या गीतांना लोकगीत म्हणता येईल काय?

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

व्याख्या

प्रस्थापित, हायब्रोंना हीन अभिरूचि वाटणारी कला अशी व्याख्या योग्य ठरेल का?

+१

सहमत. असेच आहे.

नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)

वैयक्तिक मत

मूलभूत मानवी हक्कांबाबत समता असावी हे आता सर्वमान्य आहे. कलेच्या प्रांतात काहींना more equal पणा मिळाला तर त्यालाही आक्षेप का घेतला जातो?

आक्षेप

>>कलेच्या प्रांतात काहींना more equal पणा मिळाला तर त्यालाही आक्षेप का घेतला जातो?

कारण त्यातूनच आम्ही निर्मितो तीच अभिजात/चांगली कला आणि आम्ही बोलतो तीच प्रमाण भाषा हे येते.

मालवून टाक दीप, चेतवून अंग अंग, राजसा किती दिसांत, लाभला निवांत संग| याला अभिजात म्हणायचे आणि
चल गवतात शिरू गंमत करू, उगाच येळ आता लावू नको| याला हीन का समजायचे?
(ही दोन उदाहरणे घ्यायचे कारण दुसर्‍या प्रकारचे पद्य नेहमीच हीन लेखले गेले आहे).

नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)

बरं मग?

प्रमाण भाषा 'बळी तो कान पिळी' तत्त्वानेच ठरते ना?

असे वाटू शकते

असे वाटू शकते. कारण उच्चभ्रू मंडळींना प्रह्लाद शिंदे, आनंद शिंदे, मिलिंद शिंदे किंवा विठ्ठल उमप ह्यांसारखे अतिशय गुणी गायक फारसे भावत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. त्यांना अरुण दाते, सुधीर फडके, सलील कुलकर्णी हवे असतात.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

खरे तर

उच्चभ्रू मंडळींना प्रह्लाद शिंदे, आनंद शिंदे, मिलिंद शिंदे किंवा विठ्ठल उमप ह्यांसारखे अतिशय गुणी गायक फारसे भावत नाहीत

खरे तर भावत नाही असे सरसकट म्हणता येणार नाही. पण या मंडळींनी आपल्याच काही रितभाताचा एवढा फास आवळून घेतलेला असतो की चारचौघात हे गायक व त्यांची गाणी (अगदी अपवाद दाखवून सुद्धा) आम्हाला भावतात असे त्यांच्या कडून कबूल केल्या जात नाही. अभिजनांच्या प्रसंगी पोकळ ठरणाऱ्या संकल्पनांना गोंजारण्याच्या नादात आपण एखाद्या कलाप्रकाराचा निखळ आस्वाद घेण्यापासून वंचित राहतो आहोत हे त्यांच्या ध्यानीमनीही नसावे कदाचित.

आस्वाद

नानाला तर बावनखणीतही निखळ आनंद मिळे असा आरोप होता. 'कलाकृतीची खोली कमी' हे सिद्ध करण्यासाठी 'पिटातल्या पब्लिकला समजते' हे एकच निरीक्षण पुरेसे नाही काय? सामान्य शिक्षण, सामान्य प्रगल्भता, ही उच्चभ्रूंपेक्षा कमीच असणार ना? अन्यथा तिला असामान्य म्हटले असते की!

मान्य, पण...

सामान्य शिक्षण, सामान्य प्रगल्भता, ही उच्चभ्रूंपेक्षा कमीच असणार ना?
हे मान्य आहे.
माझे म्हणणे फक्त इतकेच की सामान्य गणल्या गेल्या कलाप्रकारांतही असामान्य गुण असु शकतात. एरवी अभिजात म्हणवल्या जाणाऱ्या संगीतकारांनी लोकगीतांच्या चालींचा आधार घेऊन (स्वतंत्रपणे (?)) चाली बांधून आपले कौतूक (अभिजनवर्गात) करवून घेतले नसते.
सामान्यातल्या असामान्याला मोकळेपणाने दाद देण्याचे सोडून त्याला आपली तथाकथित अभिजात रंगरगोटी देऊन मग त्याचे कौतुक करण्यात काय हशील ?

पुरेसे नाही

'कलाकृतीची खोली कमी' हे सिद्ध करण्यासाठी 'पिटातल्या पब्लिकला समजते' हे एकच निरीक्षण पुरेसे नाही काय?
पुरेसे नाही. तुकारामाचे अभंग जनसामान्यांना समजततात म्हणून गाथेची खोली कमी होते का?

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

सफरचंद आणि संत्रे

कलेची तुलना कलेशी, तत्त्वज्ञानाची तत्त्वज्ञानाशी.
तुकारामांच्या तत्त्वज्ञानापेक्षा कितीतरी गहन लेखन त्यांच्याआधीही झाले आहे.

फाटे फोडू नका

कलेची तुलना कलेशी, तत्त्वज्ञानाची तत्त्वज्ञानाशी.
तुकारामांच्या तत्त्वज्ञानापेक्षा कितीतरी गहन लेखन त्यांच्याआधीही झाले आहे.

अहो रिकामटेकडे, फाटे फोडू नका बरे! ह्यात तुम्ही तत्त्वज्ञान कुठून आणले कळत नाही. मी तुकाराम ह्या कवीच्या केवळ काव्याबाबतच बोलतो आहे. उदा. "तुका म्हणे उगा राहावे| जे जे होईल ते ते पाहावे" किंवा "बरे झालो देवा कुणबी केलो! नाहीतरी दंभेचि असतो मेलो" ह्या तुक्याच्या ओळी सगळ्यांना समजतात.
इथे मी तत्त्वज्ञानाबाबत अजिबात बोलत नाही आहे.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

कलेसाठी कला की संदेशासाठी कला?

"तवा नवीन पोपट..." हे कला म्हणून लोकप्रिय आहे पण तुकारामांचे अभंग त्यांतील विचारांसाठी लोकप्रिय आहेत. नुसते काव्य म्हणून अभंगांचे कौतुक होते का? त्या अर्थाने त्याची खोली कशी मोजतात?

नुसते काव्य म्हणून

नुसते काव्य म्हणून अभंगांचे कौतुक होते का?

मला तरी नुसते काव्य म्हणून तुक्याचे अभंग भयंकर आवडतात. मी काही त्यात आध्यात्मबिध्यात्म, तत्त्वज्ञानबित्त्वज्ञान बघत नाही. काही जणांच्या मते तुकाराम हा पहिला आधुनिक मराठी कवी आहे. ते बरोबरच आहे.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

छान

छान विषय आहे. लोकगीतांना त्या-त्या बोलीभाषेचा लहजा असतो त्यामुळे ती अधिक रंगतदार वाटतात. लेख महाराष्ट्रापुरता आहे पण मला पंजाबी, भोजपुरी, राजस्थानी, बंगाली अशा भाषांमधील गाणीही ऐकायला आवडतात. आपल्याकडच्या मालवणी-कोकणी गीतांची लज्जतही औरच. (डोल डोलतय वार्‍यावर..)

या निमित्ताने खूप वर्षांपूर्वी "विच्छा माझी पुरी करा" चे प्रयोग पाहिले होते त्याची आठवण झाली. मी पाहिले त्यात विजय कदम, किशोर नांदलसकर, दीपक शिर्के प्रमुख भूमिका करत असत. त्यातील महाराष्ट्राबद्दलचे गाणे फारच मस्त होते. आता सर्व आठवत नाही, इतरांना बाकीचे आठवेल अशी आशा आहे. (चूभूद्याघ्या)

वरून रांगडा कणखर काळा
ओबड धोबड मातीचा
अंतरात परी संत नांदती
बोल सांगती मोलाचा

असा असावा वरून रांगडा
मराठमोळ्या बोलीचा
आत गुलाबी कळी कलेची
वास नसावा होळीचा

सर्व गाणे महाराष्ट्राबद्दल नव्हते :)

नीट सनेसन कानी बुगडी
नथनीमध्ये शुभ्र हिरा
सैल जराशा अंबाड्यावर
निशिगंधाचा मस्त तुरा*

*इथे खालीलप्रमाणे संवाद होत असे.
"तुरा म्हणजे?"
"तुरा म्हणजे गजरा"
"व. पु. काळेंचा नाय ना?" :)

---
"भाई बनना है तेरेको?" -- भिकू म्हात्रे

अजून काही उदाहरणे

आजच माझा झालाय पगार
हे गीत नुकताच पगार झाल्यावर तो सगळा दारुत उडवणाऱ्याच्या फजितीचे कथन आहे.
बिलनची नागीण निघाली
हे गीत सुद्धा एकेकाळी अवघ्या महाराष्ट्राने डोक्यावर घेतलेले आहे.
वाट बघतोय रिक्शावाला
हे गीत सध्या लग्नांच्या वरातीत धुमाकूळ घालते आहे.
(तशी लग्नाच्या वरातीत गाजणारी अजूनही काही हिट लोकगीते आहेत, पण त्यांच्यातून लोक द्विअर्थ काढू शकतात म्हणून त्यांची उदाहरणे देत नाही.)
प्रल्हाद शिंदे यांची अजून काही गाजलेली लोकगीते,
सांग कितीदा कर्ज काढू
देवा मला का दिली बायको अशी
गेली पतंग उरलाय मांजा

बिलनची नागीण निघाली

"बिलनची नागीण निघाली" हे गाणे "बिलनशी नागीण निघाली" हा नुकताच मला लागलेला शोध आहे. बरेच दिवस ही बिलन कोण आणि तिच्याकडे नागीण कशासाठी आहे हा प्रश्न त्रस्त करत होता. ते कोडे काही दिवसांपूर्वीच सुटले.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

याला आधुनिक लोकगीत म्हणावे का?


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

बहुजनांचे लोकगीत

लोकगीतांमधील साधेपणा किंवा त्यातला श्रृंगार व्यक्त करण्याची 'तर्‍हा' काही और आहे, हे नक्की. लोकगीतांच्या अनेक रचना अतिशय अप्रतिम आहेत.परंतु तरीदेखील लोकगीतांना अभिजनांमध्ये प्रतिष्ठा नाही, हे सत्य आपण मान्य करायला हवे. या शिवाय लोकगीतांचे कलाकार बहुतांशी वेळेस बहुजनांमधून आलेले असतात. त्यांचे गाणे गाण्याची पद्धत, त्यातील शब्दकळा अभिजनांच्या अभिरुची आड येणारी आहे. या प्रश्नाला जातीयतेचीही किनार आहे. त्यामुळे अभिजनांची गाणी व बहुजनांची गाणी अशी स्पष्ट दुफळी आपल्याला दिसते.

रखुमाई रुसली, कोपर्‍यात बसली

लोकगीतांबद्दलच्या लेखाला चांगलाच प्रतिसाद मिळाला.आज एक मजेशीर गीत देत आहे.

सावळ्या हरी, ऐकुया तरी, काय झाले हसायला,
रखुमाई रुसली, कोपर्‍यात बसली, चला जाऊ पुसायला !!

ती कोण मेली, जनी का बनी,
तिची तर केली वेणीफणी,
दळणकांडण करून गेला, लुगडी धुवायला !!

आणखी एक तो तुकोबा वाणी,
त्यान तर लिहली दोन चार गाणी,
तेव्हढ्यासाठी का विमान धाडायच, फुकटात बसायला !!

नाम्याचं किर्तन गेला ऐकायला,
अंगात आल्यावाणी लागला घुमायला,
बर बाई तेथे कबीर होता सावध करायला !!

आणखी एक तो सेना न्हावी,
त्याची ती धोपटी याने का न्यावी ?
राजाची केली फुकट हजामत, बसला तासायला !!

गोरबासंग माती कालवली,
रोहिदासासंग कातडी कमावली,
आणखी कुठं काय राहिलय सांगा,
काय झाल हसायला ?

शरद

:)

लोकगीत आवडले. याबद्दल अधिक माहिती मिळाल्यास आवडेल. (कुठल्या काळातील, भागातील इ.)

बिनधास्त

लोकगीताचा निर्माता हा अनामिक असतो. लोकगीताच्या अभ्यासकांनी ती समुहाची निर्मिती मानली आहे. लोकगीतात कालांतराने काही पदांची भर पडते, काही पदे बदलतात तर काही लोप होतात. म्हणजे हे बऱ्यापैकी परिवर्तनीय असते. असो. लोकगीताचा एक महत्त्वाचा विशेष मला इथे नोंदवावासा वाटतो तो म्हणजे बिनधास्तपणा. वरील लोकगीतात रखुमाईचे रुसणे एकदम रास्त ठरते. देवत्वाला सहजच मनुष्यत्वात गुंफण्याची ही तऱ्हा आवडली. ज्या देवाची भीडभाड फारशी बाळगावी लागत नाही, भक्तीत सच्चेपणा असला की त्या देवाला प्रसंगी दोन शिव्या देखील घालता येतात तो देव खरा लोकदेव ठरतो.

उपक्रमावर डायरेक्ट कविता/ गीत?

रसग्रहण कुठे आहे?

:)

उपक्रमचे धोरण लवचिक झाले असेल त्यामुळे 'रसग्रहणासाठी' भाग दुसर्‍याची प्रतिक्षा करावी लागेल असे वाटते. आणि दुसरे असे की, लेखकाने इथे 'एक मजेशीर गीत' दिलेले दिसत आहे त्यामुळे माहितीची देवाण-घेवाण झालेली दिसते त्याला उपक्रमाचे धोरण आडवे येणार नाही असे वाटते. बाकी, अजून लोकगीतांच्या प्रतिक्षेत.

उपक्रमाचे धोरण फक्त 'शरदरावांनी' आयड्याने वाकवले आहे. लगे रहो शरदराव....!

-दिलीप बिरुटे
[शरदरावांचा फॅन]

अवांतर :पद्मावतीही अशीच रुसली :

लोकगीतावरुन आठवण झाली. रुसलेल्या रुक्मिणीचा शोध घेण्यासाठी विठ्ठल पंढरपूरला आला. रक्मिणी दिंडीरवनात जावून विसावली. अशीच कथा व्यंकटेशाचीही आहे म्हणतात. त्याचीही पद्मावती नावाची बायको किरकोळ कारणावरुन रुसली होती, त्यावर आहे काहो काही लोकगीते ?

-दिलीप बिरुटे

मस्त

लोकगीत मस्तच आहे.

अशीच कथा व्यंकटेशाचीही आहे म्हणतात. त्याचीही पद्मावती नावाची बायको किरकोळ कारणावरुन रुसली होती,

भृगू ऋषी भगवान विष्णूला भेटायला वैकुंठात गेले. लक्ष्मी नारायणाच्या पायाशी बसली होती आणि नारायण शेषावर विश्रांती घेत होता. नारायणाचे आपल्याकडे झालेले दुर्लक्ष पाहून भृगूऋषींनी त्याच्या छातीवर डावीकडे लाथ मारली. विष्णूने तात्काळ उठून त्यांना नमस्कार केला आणि क्षमा मागितली. मात्र डाव्याबाजूला (हृदयात) जीचे स्थान होते ती लक्ष्मी रागावली आणि सोडून गेली. पुढे तीला परत प्राप्त करायला गेलेल्या नारायणाचे पद्मावतीशीपण लग्न झाले. त्यांची देवळे वेगळी असली तरी ती माझ्या माहीतीप्रमाणे रुसली नव्हती.

दुर्गाबाईंच्या पुस्तकात वाचल्याचे आठवते: अशीच कथा पुरीच्या जगन्नाथाच्या संदर्भात पण आहे.

--------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

विसुभाऊ बापट

हे गाणे वाचून विसुभाऊ बापटांच्या "कुटुंब रंगलय काव्यात" या कार्यक्रमाची आठवण झाली.
८० च्या दशकात हा कार्यक्रम दूरदर्शनवर येत असे. विसुभाऊ पेटी वाजवून हे गाणे
म्हणत.

त्यांचे आणखी एक मस्त गाणे म्हणजे "नाच रे मोरा"च्या उलट "चना रे रामो"! अधिक माहितीसाठी पहा.

गाण्याबद्दल धन्यवाद्!

गौरी

मराठी रुसली

कालच विसूभाउ बापटांबरोबर चर्चा झाली. ही कविता आहे. लोकगीत नाही.

आधुनिक लोकगीते म्हणून जी गीते इथे मांडलेली आहेत, ती आनंद शिंदे यांनी लोकगीतांच्या नावाने खपवलेली द्व्यायार्थी गाणी आहेत.

बाकी लोकगीतांची दिलेली व्याख्या बरोबर आहे.

लवकरच खूद्द बापट या चर्चेत सामील होउन खुलासा करतील.

अरे वा...!

>>>लवकरच खूद्द बापट या चर्चेत सामील होउन खुलासा करतील.

प्रा. विसुभाऊ बापटांचे स्वागत आहे....!

-दिलीप बिरुटे

 
^ वर