ये भी क्या जीना है!

ये भी क्या जीना है!

अशोक अपघातात जवळजवळ मेलाच असता. त्या जीवघेण्या भयंकर अपघातात हात-पाय, पाठ-पोट, डोळे - कान, इत्यादी एकूण एक सर्व अवयवावर काहींना काही दुखापत झाल्यामुळे त्याचे बहुतेक अवयव निकामी झाले होते. एवढेच नव्हे तर त्या शरीराचा अजिबात उपयोग नव्हता. परंतु वैद्यकशास्त्रातील निष्णात तज्ञ आपापले कतृत्व पणाला लावून त्याचा मेंदू अपघाती शरीराच्या बाहेर काढून जिवंत ठेवण्यात यशस्वी झाले. अशोकचा मेंदू आता काचपात्रेत विसावला होता. काचपात्रेतील अशोकचा मेंदू वैद्यकीय दृष्ट्या पूर्णपणे जिवंत व सक्षम असून एखाद्या सुदृढ शरीराची साथ मिळाल्यास अशोक पुन्हा एकदा चारचौघासारखा जीवन जगू शकेल, याची खात्री डॉक्टरांना होती. म्हणूनच ते आता एका सुदृढ शरीराच्या शोधात आहेत.
अशा प्रकारच्या भयंकर अपघातात अनेक वेळा शरीर निकामी होते व मेंदू शाबूत राहतो.शरीर-रोपणासाठी जिवंत मेंदूंचा साठा सुदृढ शरीरांच्या तुलनेने जास्त असल्यामुळे मेंदूंना शरीरांची प्रतिक्षा करावी लागते. मेंदू जिवंत असल्यास शरीर नाही म्हणून त्याला उघड उघड मारून टाकणे वैद्यकशास्त्राच्या नीती-नियमात बसत नसल्यामुळे डॉक्टर्ससुद्धा धोका पत्करायला सहसा तयार होत नाहीत. अशा मेंदूंचे मग करायचे काय?
याच अनुषंगाने चीनमधील संगणकावरील केलेल्या प्रगत संशोधनामुळे आता अशा 'जिवंत' मेंदूना संगणकांशी जोडता व 'मरे'पर्यंत मेंदूला जिवंत ठेवता येवू लागले. त्यामुळे प्रत्यक्ष शरीरामध्ये जसा मेंदू काम करत असे तसाच काचपात्रेतील मेंदू संगणकाला जोडल्यानंतर हुबेहूब कार्य करू लागतो.
संगणकावर सिम्युलेशन केलेल्या हाता-पायाच्या हालचालींच्या सूचना काचपात्रेतील मेंदूला मिळाल्यावर मेंदूच्या काही भागावर प्रतिक्रिया उमटते, हे डॉक्टरांच्या लक्षात आले. संगणकाशी प्रोबद्वारे जोडलेल्या डोळे, नाक, कान, इत्यादी ज्ञानेंद्रियाकडून मिळत असलेल्या सूचनांचे पृथक्करण करून योग्य अशा सूचना मेंदू अवयवांना देऊ लागला. संगणक शरीरातील अवयवांसारखे कार्य केल्याचे सोंग वठवू लागले. त्यामुळे काचपात्रेतील मेंदू शरीरातच असून मेंदूच्या सर्व सूचना शरीर तंतोतंत पाळत आहे, अशा प्रकारचे सिम्युलेशन या प्रक्रियेमागे होते. संगणकावरील काही प्रणालीतून श्वासोच्छ्वास, तहान, जेवण, झोप, शौचक्रिया, कामोद्दीपन यासारख्या जीवनाच्या दैनंदिन व्यवहारांचे सदृशीकरण केलेले असल्यामुळे काचपात्रेतील अशोकच्या मेंदूला काहीतरी वेगळे घडत आहे याचा किंचितही संशय आला नाही.
अशोकच्या मेंदूच्या दृष्टिकोनातून अशोक एके दिवशी पूर्ण बरा झाला. त्याला कुणीतरी घडलेल्या अपघाताविषयी (संगणकाच्या माध्यमातून) सांगितले. अशोकला आपण पूर्ण बरे झालेले असून आता आपण इतर कुठल्याही सामान्य माणसासारखे जीवन जगत आहोत, हालचाली करत आहोत याची त्याला खात्री पटली. त्याचा आत्मविश्वास वाढू लागला. त्याच्या भावनाविश्वातही कुठेही कमतरता नव्हती. आपला मेंदू एका काचपात्रेत आहे, व त्याला संगणकाशी जोडला आहे हे कधीच त्याला कळणार नाही. कारण त्याचा मेंदू पूर्वीप्रमाणेच काम करत आहे. संगणक प्रणालीमध्ये सामान्य माणसाच्या दैनंदिन जीवनातील अगदी बारीक-सारीक तपशीलांचेही सदृष्यीकरण केलेले असल्यामुळे काचपात्रेतील मेंदू व त्याला जोडलेली संगणकीय व्यवस्था कुठल्याही व्यत्ययाविना सुदीर्घकाळ चालेल, असे वैज्ञानिकांना वाटते. त्यामुळे स्वत: अशोकला आपली आताची नेमकी स्थिती काय आहे हे कधीच कळणार नाही.
अशोकलाच नव्हे तर ........ कदाचित आपल्यालासुद्धा .......!
येथे काही तरी वेगळे घडत आहे याची कधीतरी जाणीव होईल का?

Source: Meditations by Rene Descartes (1641)
Film: The Matrix ,Dir: Andy Watchowaski (1997)
website: www.simulation-argument.com

दि मॅट्रिक्स या इंग्रजी चित्रपटातील हीरोची अवस्था जवळजवळ अशोकसारखीच आहे. त्या चित्रपटातील हीरोला आपण खऱ्या खुऱ्या जगातच वावरत आहोत असे वाटत असते. परंतु त्याचे नियंत्रण संगणक करत असतो. त्याच्या मेंदूला बाह्यसूचना दिले जात असतात व यासूचनानुसार त्याच्या शरीराच्या (व मेंदूच्याही) हालचाली होत असतात.
आपल्या मेंदूचेही असेच कुणीतरी नियंत्रण करत असावे ही शंका अती पुरातन काळापासूनची आहे व अजूनही ती अनेकांच्या मनात घोळत आहे. प्रचंड शक्ती व बुद्धीमत्ता असलेला एक महाभूत आपल्याला फसवत असून आपण सर्व त्याच्या इच्छेनुसार वागत असतो. आपल्याला स्वतंत्र विचार करण्याची मुभा नाही, सोय नाही. जे आपल्याला स्वातंत्र्य वाटत असते तेसुद्धा कुणाच्या तरी नियंत्रणाचाच भाग असतो, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. महाभूत हा शब्द आवडत नसल्यास आपण त्याला जगन्नियंता परमेश्वर किंवा कुशाग्र बुद्धीचा रचनाकार असे म्हटले तरी फार फरक पडणार नाही. हाच विचार जास्त ताणल्यास डार्विनचा उत्क्रांतीवाद खोटा, न्यूटनचे नियम खोटे, कर्माची फळ खोटी, नशीब खोटे .... असे म्हणावे लागेल. काचपात्रेतील मेंदूची कल्पना अगदीच अवास्तव नसून ती कल्पना शक्यतेत उतरण्याचा संभव आहे, हे नाकारता येत नाही. वैज्ञानिकरित्या हे शक्य असून त्यामुळे या जगाला खेळता खेळविता धनी कुठेतरी आहे हे सहजासहजी नाकारता येत नाही.
याच्याही पुढे एक पाऊल जाऊन आपण सर्व एखाद्या भासमय अवस्थेत तर जगत नाही ना? असाही प्रश्न विचारू शकतो. आपल्या सर्वांचेच मेंदू काचपात्रेत असून आपली बुद्धीमत्ता कृत्रिम असण्याची शक्यता जास्त आहे. हा मेंदू आपल्याला वास्तवतेची जाणीव होवू देत नाही, हेच कदाचित खरे असावे. आपण आता जगत असलेल्या सिव्हिलाइझ्ड समाजात वा यानंतरच्या भविष्यकाळातील सिव्हिलाइझ्ड समाजात कृत्रीम बुद्धिमत्ता व संपूर्ण भासमय (virtual) असलेल्या जगाची निर्मिती करणे सहज शक्य होईल. (आताच लाखो-करोडो नेटिझन्संना सेकंड लाइफ, सिमसिटीचे वेध लागलेले आहेत. ते इंटरनेटचे जग व औटरनेटचे जग यात फरक करत नाहीत!) त्यामुळे या कृत्रिम बुद्धीमत्तेला तगून राहण्यासाठी लागणाऱ्या सर्व सोई-सुविधा व त्यासाठीचे (व त्याच बरोबरच्या शरीरासाठी!)योग्य सुसंगत वातावरण तयार करणे यानंतर सहज शक्य आहे.
आताच्या जैविक बुद्धीमत्तेला टिकवून ठेवणाऱ्या मेंदूसाठी फार मोठ्या प्रमाणात नैसर्गिक ऊर्जास्रोतांची गरज भासते. परंतु कृत्रिम बुद्धीमत्तेच्या भासमय जगासाठी फारच कमी ऊर्जा पुरेशी ठरेल. शरीरापासून जैविक मेंदूला वेगळे करून त्याच कोपऱ्यात कुठे तरी कृत्रिम बुद्धीमत्तेचे चिप ठेवून अश्या सर्व चिप्सना एका संगणकाशी जोडल्यास जगाचे एकूण एक सर्व व्यवहारांचे नियंत्रण करणे शक्य होईल. या पृथ्वीवरील 800-900 कोटी माणसांच्या बुद्धीमत्तेच्या व्यवस्थापनासाठी कदाचित टेबलावर ठेवता येईल असा संगणक पुरेसा ठरू शकेल.
या सर्व शक्याशक्यता स्वीकारार्ह असल्यास आताच आपण सर्व एका सदृशीकरणाचे (simulation) भाग नाहीत हे कशावरून ? आपणसुद्धा आताच भासमय जगातच जीवन जगत आहोत. आतापर्यंतच्या मानवी इतिहासाचा वेध घेतल्यास प्रत्येक माणसाच्या वैविध्यपूर्ण अशा जीवनभरातील व्यवहारांच्या सदृशीकरणासाठी संगणकावरील काही मोजक्या प्रणालींची गरज आहे, असा अंदाज काही तज्ञ वर्तवित आहेत. जगाच्या सारीपटावर आपण फक्त प्यादे आहोत. परंतु या प्याद्यांना मात्र आपण सर्व जैविक उत्पत्तीच आहोत व आयुष्यभरातल्या घटना सदृशीकरण नसून निखळ वास्तव आहे या भ्रमात ते वावरत आहेत. कारण हा भ्रमाचा भोपळा फोडण्याची कुणापाशीही हिम्मत नाही.
वर उल्लेख केलेल्या कल्पनेत 90 टक्के चूक असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तज्ञांचे अंदाजही चुकीचे असतील. आपण सर्व सदृशीकरणाचे की वास्तव जगाचे? हा प्रश्नसुद्धा चुकीचा असेल. मॅट्रिक्स चित्रपटातील निओप्रमाणे आपला 'बोलवित्या, कर्ता-करवित्या धन्या'च्या शोधात आपल्याला जाता येत नाही. कारण हा शोधसुद्धा कदाचित भास असण्याची दाट शक्यता आहे.
बहुतेक वाचकांना या प्रतिवादात काही काळेबेरे असेल, असेही वाटत असेल. कारण मुळातच प्रतिवादातील निष्कर्ष मन सुन्न करणारे आहेत. पराधीन आहे हा पुत्र मानवाचा ही कल्पना अत्यंत भयंकर आहे हे नाकारता येत नाही. परंतु येथे निष्कर्ष भयंकर आहेत की नाही हा प्रश्न नसून भासमय जगातील सदृशीकरणाचे आपण भाग आहोत की नाही हे ठसवण्यासाठी मांडलेल्या तर्क पद्धतीत काही चूक आहे का हा प्रश्न आपल्यासमोर आहे.
या तर्कपद्धतीतील दोषांचा शोध घेणे अशक्यातली नसली तरी अवघड आहे हे मात्र नक्कीच जाणवेल.

Comments

चूक

पलायनमपि मिथ्थ्या हे उत्तर शंकराचार्यांनी दिले होते.
ऑकॅमचा वस्तरा वापरून विज्ञान अशा शक्यतांना हाकलून देते.

ऑकम

या ऑकमच्या वस्तर्‍याबद्दल सविस्तर लिहा. नुसता संदर्भ नको. तर नानावटींनी लिहिलेल्या मुद्याला धरून लिहा.

प्रमोद

स्मॉल इज ब्यूटिफुल

"अनुभवांचे वर्णन आणि भाकित करण्यास सारख्याच सक्षम असलेल्या सिद्धांतांपैकी सोप्या सिद्धांतावर विश्वास ठेवणे" म्हणजे ऑकॅमचा वस्तरा वापरणे होय. सिद्धांताची गृहीतके जेव्हढी कमी असतील तितका तो सोपा असतो. "तू खुनी नाहीस" आणि "तू खून करून प्रेताची यशस्वी विल्हेवाट लावलीस" यांपैकी दुसरा सिद्धांत एक 'कॉन्स्पिरसी थिअरी' आहे.

मूळ लेखामध्ये सॉलिप्सिझम नावाची विचारसरणी आहे. स्वतःच्या मनापलिकडे कोणत्याही वस्तूचे अस्तित्व त्यात नाकारले जाते.

अडचण अशी आहे की सॉलिप्सिझमच्या पुरस्कर्त्यांच्या मते हे जग भासमान असले तरी त्यांची वागणूक या जगाला वास्तव मानणारी असते. त्रिमिती चित्रपट पहाताना आपल्याला अंगावर दगड पडताना दिसला तरी आपण घाबरून बाजूला व्हावे अशी आपली अपेक्षा नसते. परंतु सॉलिप्सिझमच्या पुरस्कर्ते या आक्षेपावर "पलायनमपि मिथ्थ्या" असे उत्तर देतात.

वास्तववादात (रिऍलिझम) जगाचे वर्णन पुढील प्रकारे करता येते.
जग अस्तित्वात आहे; म्हणजे 'मूलभूत' कण आहेत, गुरुत्वाकर्षण आहे, शक्तिमान बल आहे, आणि क्षीण्विद्युत्चुंबकीय (हा टायपो नाही) बल आहे.
वरील गृहीतकांच्या मदतीने आपली सारी निरीक्षणे (उदा. "तव नयनाचें दल हललें ग") "त्याचे काय कवतुक?" म्हणून गणिताने 'अपेक्षिता' येतात. (मी एवढा मोठा प्रतिसाद खुसपटे न काढता देईन असे समजू नका ;) )

सॉलिप्सिस्ट दृष्टिकोनातून जगाचे वर्णन पुढील प्रकारे करावे लागते.
जग अस्तित्वात असल्याचा भास करून देणारी एक व्यवस्था आहे.
पण ही व्यवस्था 'आहे' एवढेच गृहितून पुरणार नाही.
ही व्यवस्था 'मूलभूत' कण आहेत असे भासविते, गुरुत्वाकर्षण आहे असे भासविते, शक्तिमान बल आहे असे भासविते, आणि क्षीण्विद्युत्चुंबकीय बल आहे असेही भासविते, ही सारी गृहीतकेसुद्धा त्यांना मानावी लागतात. केवळ त्या गृहीतकांच्या मदतीनेच इतर सारी भासमान निरीक्षणे त्यांना गणिताने सिद्ध करता येतात.

म्हणजे वास्तववादापेक्षा कमी गृहीतकांमध्ये त्यांना जगाचे वर्णन करता येत नाही. किंबहुना 'ती व्यवस्था' असल्याचे एक अतिरिक्त गृहीतकसुद्धा विकत घ्यावे लागते.

अशा प्रकारे सॉलिप्सिझम परवडत नाही.

आधी ?

म्हंजे 'मूलभूत' कण , गुरुत्वाकर्षण , शक्तिमान बल आणि क्षीण्विद्युत्चुंबकीय बल यांचा शोध लागण्या पुर्वी काय वास्तव जग नव्हतं असं म्हणायच आहे की काय ?
किंवा त्याआधी अवास्तव जग असन्याची शक्यता जास्त होती वगैरे का ?

---------------------
वाद विवादात "जो शेवटचं वाक्य बोलतो / लिहीतो तो जिंकला" असा समज is = गैरसमज
-धनंजय कुलकर्णी

सृष्टीसे पहले...

तेव्हा जगसिद्धांत अधिक गृहीतकांच्या मदतीने उभा रहात असे.
उदा. ९२ मूलद्रव्ये, गुरुत्वाकर्षण, वीज, चुंबक, इ.

चार कसे ?

'मूलभूत' कण , गुरुत्वाकर्षण , शक्तिमान बल आणि क्षीण्विद्युत्चुंबकीय बल ह्याना तुम्ही चार गृहीतके कसे म्हणु शकाल ?

गुरुत्वाकर्षण हे एक गृहीतक नाही आहे. गुरुत्वाकर्षण हे मांडण्यासाठी अनेक ग्रहीतकांना गोळा करावे लागते उदा. इथे गुरुत्वाकर्षण साठी दोन वस्तुमान असलेल्या गोष्टी हव्या , त्यांमधलं अंतर आलं , ग्राव्हीटेशनल कॉन्स्टंट आला. आता ह्या तीन (दोन वस्तु , अंतर ,कॉन्स्टंट ) गृहीतकांना सुद्धा एक गृहीतक म्हणता येत नाही. प्रत्येक गृहीतकांना सब - गृहीतकं आहेत.

मी 'मूलभूत' कण , गुरुत्वाकर्षण , शक्तिमान बल आणि क्षीण्विद्युत्चुंबकीय ह्याना एक नाव देइन - "परममुगुशक्षी " आणि दावा करेन की माझ्याकडे एकच गृहीतकं आहे. पण म्हणुन माझा
वास्तववाद सिद्ध होत नाही.

मला म्हणायचे आहे की तुम्ही कुठल्याही गृहीतकाला एक गृहीतकं असं म्हणुच शकत नाहीत. कुठल्याही १००० गोष्टींना एक नाव दिले म्हणुन ती एक गोष्ट होत नाही.

वरील ओळ जर मान्य होत असेल तर वास्तववादामधे लागणारी गृहीतके ही ४ नसून अनंत आहेत. आणि भासमय जगात किंवा अजुन कुठल्या जगाच्या थिअरी मधे जर "अनंत - १"
एवढी गृहीतके लागत आसतील तर पुन्हा <अनंत - १ = अनंत > ह्या समीकरना प्रमाणे दोन्हीही जगात सारखीच गृहीतके लागत असुन आपण "नंबर ओफ गृहीतके wins " ही थिअरी वापरू शकत नाहीत. म्हनून वास्तववाद असण्यची शक्यता ही पुन्हा अवास्तववाद असण्याच्या शक्यतेएवढीच आहे.

---------------------
वाद विवादात "जो शेवटचं वाक्य बोलतो / लिहीतो तो जिंकला" असा समज is = गैरसमज
-धनंजय कुलकर्णी

गृहीतक

"बल = गुरुत्वस्थिरांक गुणिले वस्तुमान गुणिले वस्तुमान भागिले अंतराचा वर्ग" हे एक समीकरण गृहीत धरले की गुरुत्वाकर्षणाने घडणार्‍या सार्‍याच घटनांचे गूढ नाहिसे होते. या अर्थाने हे एक समीकरण पाठ केले की गुरुत्वाकर्षणाने घडणार्‍या सार्‍या घटना सिद्ध होतात. (३, ४, आणि ५ या बाजू असणार्‍या त्रिकोणात सर्वात मोठ्या बाजूसमोर काटकोन असतो, ५, १२, आणि १३ या बाजू असणार्‍या त्रिकोणात सर्वात मोठ्या बाजूसमोर काटकोन असतो, ७, २४, आणि २५ या बाजू असणार्‍या त्रिकोणात सर्वात मोठ्या बाजूसमोर काटकोन असतो, इ. अनंत विधानांची यादी पायथॅगॉरसचा सिद्धांत वापरून सिद्ध करता येते. परंतु पायथॅगॉरसचा सिद्धांत, तसेच इतरही अनंत सिद्धांत युक्लिडची पाच गृहीतके वापरून सिद्ध करता येतात. तसेच हेही आहे.)
'मूलभूत कण' हे एकच गृहीतक असल्याचा दावा मी केला नाही परंतु तरीही त्यांची संख्या सांत असल्यामुळे हिल्बर्टच्या हॉटेलची युक्तीही येथे चालणार नाही. पदार्थ बनविणारे 'मूलभूत कण' आणि बले लावणारे तीन कण यांचे अस्तित्व गृहीत धरल्यास जगातील सर्वच वस्तू आणि घटना विशद करता येतात.
मुद्दा पटविण्यासाठी विद्युतचुंबकीय बलाचे उदाहरण वापरेन. पूर्वी वीज आणि चुंबकीय परिणाम ही दोन वेगवेगळी बले असल्याचे वाटत असे. मात्र फोटॉनमुळे सारी विद्युतचुंबकीय निरीक्षणे विशद होतात. पुढे ड्ब्ल्यू आणि झेड या दोन बोसॉनमुळे घडणारे क्षीण बल आणि फोटॉनमुळे घडणारे विद्युतचुंबकीय बल हे दोन्ही एकच असल्याचे सिद्ध झाले. 'कसे' ते मलाही माहिती नाही.

परममुगुशक्षी हे एकच गृहीतक मानण्यासाठी थिअरी ऑफ एव्हरीथिंग सिद्ध व्हावी लागेल. अजून तो सिद्धांत सिद्ध झालेला नाही.

परममूगुशक्षी...

>> "बल = गुरुत्वस्थिरांक गुणिले वस्तुमान गुणिले वस्तुमान भागिले अंतराचा वर्ग" हे एक समीकरण गृहीत धरले की गुरुत्वाकर्षणाने घडणार्‍या सार्‍याच घटनांचे गूढ नाहिसे होते

हे गणितीय आहे. गणित हे पण एक गृहीतक आलं. आपल्या म्हणन्याप्रमाने गुरुत्वाकर्षण हे एकच गृहीतकं आहे.

परममूगुशक्षी नुसारसुद्धा परममुगुशक्षीने घडण्यार्‍या सर्व घटनांचे गूढ नाहिसे होते , त्यात काहीच नवलं नाही. हे एकच गृहीतक आहे.

---------------------
वाद विवादात "जो शेवटचं वाक्य बोलतो / लिहीतो तो जिंकला" असा समज is = गैरसमज
-धनंजय कुलकर्णी

गणित

गणिताची गृहीतके स्वीकारण्यास सॉलिप्सिझमचा विरोध नसतो कारण गणित हे बाह्य जगाविषयी नसून स्वतःच्या मनातच असते. वास्तववाद आणि सॉलिप्सिझम यांच्यात ती गृहीतके सामायिक असल्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष करता येते.
परममूगुशक्षी हे एक विधान नसून अनेक विधानांचा संग्रह आहे. प्रत्येक विधानावर स्वतंत्रपणे विश्वास/अविश्वास दर्शविणे शक्य आहे. कंपाउंड स्टेटमेंट वापरून कोलोमोग्रोव्ह व्यामिश्रता कमी होत नाही.

गुरुत्वाकर्षण हे सुद्धा ६ विधानांचा संग्रह आहे > अंतर, 'G' , 'M1' , 'M2' , 'गुणिले' आणि '= ' .

आणि ह्यातील प्रत्येक ग्रहीतक पुन्हा अनेक विधानांचा संग्रह आहे.

---------------------
वाद विवादात "जो शेवटचं वाक्य बोलतो / लिहीतो तो जिंकला" असा समज is = गैरसमज
-धनंजय कुलकर्णी

विधान

आता कसं समजावून सांगू?

ज्या सहा 'विधानांचा' उल्लेख तुम्ही करीत आहात त्यांपैकी चारांना पॅरामीटर म्हणतात - वाक्यात जशी नामे असतात तसे. 'गुणिले' या खुणेला ऑपरेटर म्हणतात; त्याला क्रियापद समजा. आणि ती जी 'बरोबर'ची खूण आहे ना, ते एकच 'विधान' आहे. पॅरामीटर्सवर विश्वास ठेवण्याची गरज नाही. किंबहुना ते पुरविण्याची जवाबदारीही गुरुत्वाकर्षणाच्या 'भक्तांवर' नाही. "जर हे पॅरामीटर असतील तर बल किती असेल?" या प्रश्नाचे उत्तर देण्याची एक पद्धत म्हणून त्या समीकरणावर मदार ठेवली जाते. इफ-देन विधानांमध्ये इफ भाग खोटा असला तरी चालते. त्या सहा विधानांचे सत्यत्व (ट्रुथ व्हॅल्यू) सिद्ध करणे हे या समीकरणाचे उद्दिष्टच नाही.

सांगायचा मुद्दा असा की हे पॅरामीटर गृहीत धरण्याची अपेक्षा नसून त्यांचे आणि बलाचे जे संबंध (रिलेशन) किंवा फलन (फंक्शन) आहे, त्या एका जोडणीनियमावर विश्वास ठेवावा लागतो. म्हणून गुरुत्वाकर्षण हे एक गृहीतक आहे.

अतंर हे काय आहे ?

अतंर हे गृहीतक आहे की नाही ? अंतर हा कॉनसेप्ट माण्डन्यासाठी काही गृहीत धराव लागतं की नाही?

---------------------
वाद विवादात "जो शेवटचं वाक्य बोलतो / लिहीतो तो जिंकला" असा समज is = गैरसमज
-धनंजय कुलकर्णी

सहावरून थेट एक?

कोऑर्डिनेट भूमिती हा गणिताचा भाग आहे. त्यामुळे अंतर ही संकल्पना मांडण्यासाठी वास्तव जगाची गरज नाही.
लॉजिक, गणित, या ज्ञानशाखा भासमान जगातील लोकांनाही मान्य असतात कारण त्या वास्तव जगावर अवलंबून नाहीत.

म्हणजे ?

म्हणजे मी असं समजू का की वास्तव जगात जर अंतर हे गृहीतक नाही मानला (त्याला गृहीतच नाही धरलं) तरी सुद्धा गुरूत्वाकर्षण सिद्ध होइल.
(तुम्ही असं म्हणत नाहीत हे मला माहित आहे पण तुमच्या वाक्यावरुन असा अर्थबोध होतो)

इथे वास्तव/ अवास्तव जग मधे आणू नका थोडा वेळ आणि म्हणा की अंतर हे गृहीतक नाही.
वास्तव जगात अंतर हे गृहीतक नाही मानले तर गुरूत्वाकर्षण सिद्ध करता येयील का ?

मला शेवटी हेच म्हणायचे आहे की तुम्ही कुठल्याही एका गृहीतकाला एक असे म्हणु शकत नाहीत (ते दुसर्‍या गृ. बरोबर येतचं)

>>>> लॉजिक, गणित, या ज्ञानशाखा भासमान जगातील लोकांनाही मान्य असतात.
हे विधान खरे असेल याची आवश्यकता नाही. आणि जरी कुठल्या एका अवास्तव जगात असले तरी एकुण गृहीतके = अनंत. आणि वास्तव जगात जरी ते <अनंत - १ > एवढे असले
तरी सुद्धा नंबर (काउंट) ऑफ गृहीतकं हे इथे कुठलं जग अस्तीत्वात आहे सांगु शकत नाही.

---------------------
वाद विवादात "जो शेवटचं वाक्य बोलतो / लिहीतो तो जिंकला" असा समज is = गैरसमज
-धनंजय कुलकर्णी

इफ देन

"जर क असेल तर ख घडेल" हे वाक्य तपासू. जर "क अस्तित्वात नाही" हा दावा स्वीकारला तर ते वाक्य आपोआपच खरे ठरते.
त्यामुळे अंतर ही संकल्पना नसेल तर गुरुत्वाकर्षण आपोआपच खरे ठरेल.

मला शेवटी हेच म्हणायचे आहे की तुम्ही कुठल्याही एका गृहीतकाला एक असे म्हणु शकत नाहीत (ते दुसर्‍या गृ. बरोबर येतचं)

"दोन बिंदूमध्ये एक रेषा काढता येते." हे युक्लिडचे पहिले गृहीतक आहे. बिंदूंचे अस्तित्व गृहीत धरण्याची गरज त्याला वाटली नाही; बिंदू आव्हानकर्त्याने आखायचे आहेत. त्याचप्रमाणे, तुम्ही अंतराची(आणि वस्तुमानांची) किंमत (व्हॅल्यू) सांगितलीत की बल सांगण्याची मर्यादित जवाबदारी गुरुत्वाकर्षणाच्या समीकरणावर आहे.

हे विधान खरे असेल याची आवश्यकता नाही. आणि जरी कुठल्या एका अवास्तव जगात असले तरी एकुण गृहीतके = अनंत. आणि वास्तव जगात जरी ते <अनंत - १ > एवढे असले
तरी सुद्धा नंबर (काउंट) ऑफ गृहीतकं हे इथे कुठलं जग अस्तीत्वात आहे सांगु शकत नाही.

म्हणूनच गृहीतके सांत असल्याचे सिद्ध करण्याचा माझा उद्देश आहे.

लॉजीक

गुरुत्वाकर्षणाचा नियम इफ देन मधे मांडता येत नाही. हा नियम A = (B and C ) or (neg D) या रुपातील नाही.
कृपया दुसरे उदाहरण देउन सांगा की अंतर हे गृहीतक नाही मानले तर गुरुत्वाकर्षणाचा नियम सिद्ध करता येतो.

आणि अस्तित्व नसणे म्हणजे शुन्य किंमत असणे नव्हे ( असे आपण कधीच म्हणाले नाहित हे मला माहित आहे पण पुढे चुकुन..)

---------------------
वाद विवादात "जो शेवटचं वाक्य बोलतो / लिहीतो तो जिंकला" असा समज is = गैरसमज
-धनंजय कुलकर्णी

डेफ्थ फर्स्ट चर्चा

अरे बापरे! अजून बरीच मजल गाठायची आहे.

गुरुत्वाकर्षणाचा नियम इफ देन मधे मांडता येत नाही. हा नियम A = (B and C ) or (neg D) या रुपातील नाही.

"जर एवढे एवढे अंतर, वस्तुमाने, इ. असतील तर एवढे बल असेल."
सारीच समीकरणे तशी असतात.

हेच म्हणतो ..

अजून बरीच मजल गाठायची आहे. ..हेच म्हणतो मी.

..त्याला इफ देन असं म्हणत नाहीत .

इफ देन मधे सत्य किंवा असत्य विधाने वापरली जातात.
इफ (क्ष क्ष )
देन > ल ल

कृपया पडताळुन पहा . गुरुत्वाकर्षणाचा नियम हा लोजीकल नसुन तो समीकरणाच्या सत्य / असत्य (शुन्य किंवा एक) किंमतीवर अवलम्बुन नाही.

---------------------
वाद विवादात "जो शेवटचं वाक्य बोलतो / लिहीतो तो जिंकला" असा समज is = गैरसमज
-धनंजय कुलकर्णी

गृहीतक म्हणजे काय?

अंतर हे गृहीतक स्वीकारल्याशिवाय गुरुत्वाकर्षण हे गृहीतक टिकत नाही असा तुमचा दावा आहे.
गृहीतक या शब्दाची व्याख्याच अशी आहे की त्याच्या सत्यासत्यतेविषयी चर्चा करण्यास सिद्धांतामध्ये परवानगी नसते. ते विधान निमूटपणे स्वीकारण्याची त्या सिद्धांताची मागणी असते. जगसिद्धांत स्वीकारायचा असेल तर गुरुत्वाकर्षणाच्या मूलभूत सत्यावर विश्वास ठेवावा लागतो. हे गृहीतक नाकारले तर जगसिद्धांतच नाकारावा लागतो.
मूळ विषयाशी संबंधित असा वरील युक्तिवाद केल्यानंतर आता सध्याच्या उपचर्चेकडे वळतो.

गुरुत्वाकर्षणाचे गृहीतक केवळ असा दावा करतो की "तुम्ही दोन वस्तुमाने शोधा, त्यांतील अंतर मोजा. मग त्या वस्तूंतील बल किती ते मी सांगतो." हे पॅरामीटर गृहीत धरण्याची अपेक्षा नसून त्यांचे आणि बलाचे जे फलन (फंक्शन) आहे, त्या एका जोडणीनियमावर विश्वास ठेवावा लागतो. या जोडणीनियमावर विश्वास ठेवणे या अर्थाने या गृहीतकाला शून्य किंवा एक ही किंमत देता येते. अंतर या संकल्पनेला शून्य किंमत दिली (कशी देता येईल ते मला माहिती नाही) तर या जोडणीनियमाला आपोआप 'एक' किंमत मिळते कारण अंतर ही संकल्पनाच न मानणारी व्यक्ती पॅरामीटरच पुरविणार नाही. त्यामुळे बलाची किंमत सांगण्याच्या जवाबदारीतून हा जोडणीनियम मुक्त होतो. जर जवाबदारी पार पाडण्याची अपेक्षाच चूक असेल तर तिच्या पालनाचे मूल्यमापन कसे करता येईल? अर्थात या परिच्छेदात गुरुत्वाकर्षणाच्या नियमाकडे सिद्धांत म्हणून बघून त्याच्या सत्यासत्यतेविषयी चर्चा केली आहे. वरील परिच्छेदात दिल्याप्रमाणे, या नियमाला गृहीतक मानल्यास त्याचा निमूटपणे स्वीकार करावा लागतो.

तत्वज्ञान

छान लेख. हा तत्वज्ञांचा आवडता विषय आहे.

अवांतर : शीर्षकावरून अमिताभचे मि. नटवरलालचे गाणे आणि त्यातील संवाद आठवला, "ये जीना भी कोई जीना है, लल्लू?"

---
"भाई बनना है तेरेको?" -- भिकू म्हात्रे

चर्वितचर्वण पण

चर्वितचर्वण आहे पण लोक करताना दिसतात, खरे.
माझा हा प्रतिसाद केवळ भास आहे तर सोडून द्या.

हे विधान :
(१) मी एकच संवेदना-विचार-ज्ञान होऊ शकणारे एकक आहे, बाकी सर्व काही निश्चेतन यंत्रे आहेत.
आणि या विधानाचे महा-रूप :
(२) मी एकच संवेदना-विचार-ज्ञान होऊ शकणारे एकक आहे, बाकी सर्व काही भास आहे.
ही विधाने तर्कापलीकडची आहेत. एखाद्या बालकाची काही थोड्या काळासाठी अशी श्रद्धा असू शकेल.

जर वरीलपैकी कोणाची श्रद्धा असेल तर त्यांना माझी (भासमान) विनंती अशी :
जोवर आम्हा निश्चेतन यंत्रांशी किंवा आभासांशी संवाद साधायचे खेळ तुम्ही खेळत आहात, तोवर खेळापुरते आम्हीसुद्धा संवेदनाशील स्वतंत्र एकके आहोत असे माना की! तुम्हालाही खेळताना अधिक मजा वाटेल.

तत्त्वज्ञानाच्या विचारात या वांझोट्या ठिकाणी येऊन रमणे म्हणजे बुद्धिबळांचा सराव करताना फूल्स मेट/स्कॉलर्स मेट या दोन खेळांमध्येच रमण्यासारखे आहे.

असिद्धीचं आव्हान, आवाहन...

ते इंटरनेटचे जग व औटरनेटचे जग यात फरक करत नाहीत!

हे विधान टोकाचं वाटतं. इंटरनेटच्या जगातही रस शोधणं, गुंगून जाणं हे एक झालं, आणि ते जग व बाह्य जग यात फरकच न कळणं ही प्रचंड मोठी सैद्धांतिक उडी झाली. ही कुठच्या पायावर मारली हे जाणून घ्यायची इच्छा आहे.

तुम्ही मांडलेलं चित्र असिद्ध करण्यास अशक्य आहे. कारण एका विशिष्ट व्यवस्थेत (सिस्टिममध्ये) त्या व्यवस्थेच्या अंतर्गत असलेली सत्यच सिद्ध करता येतात. तिच्या बाहेरची विधानं सत्य अगर असत्य सिद्ध करणं तीत राहून शक्य नाही. त्यामुळे नक्की काय सिद्ध करण्याचा प्रयत्न आहे हे कळत नाही. पण नीट विचार करून लेख वाचल्यावर हे लक्षात येतं की यात वाचकासमोर (या व्यवस्थेतल्या) एक चित्र मांडून त्यावर 'ते असिद्ध करून दाखव पाहू' असं खेळकर आव्हान नकळतपणे टाकलेलं आहे. वाचक कधी तो गळ पकडतो हे त्याला कळत नाही. आणि एकदा तो चावला की सुटका नाही.

पण कुठल्याही व्यवस्थेत सिद्धांत मांडला तर सिद्धतेची जबाबदारी मुख्यत्वेकरून लेखकावर अगर मांडण्यावर असते. तेव्हा 'हे चित्र सत्य आहे यासाठी काय पुरावा आहे?' हा प्रश्न लेखकाला विचारणं हाच उपाय आहे. सुदैवाने व्यवस्थेच्या बाहेरची अशी विधानं जी व्यवस्थेच्या आत असिद्ध करता येत नाही, ती व्यवस्थेच्या आत सिद्धही करता येत नाही. पण असिद्धतेचं आव्हान देऊन (किंवा तुम्हीच अमुक तमुक [ज्योतिष, नाडी, होमिओपाथी, व इतर काही...] 'शास्त्रा'चा गुण तपासून बघा असं आवाहन करून) जबाबदारी वाचकावर टाकून देणं ही जुनी युक्ती आहे.

कल्पनाविलास म्हणून हे वाचण्याऐवजी मेट्रिक्स सिनेमाच बघावा असं माझं मत आहे.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

सत्यसंकाश ..

परंतु येथे निष्कर्ष भयंकर आहेत की नाही हा प्रश्न नसून भासमय जगातील सदृशीकरणाचे आपण भाग आहोत की नाही हे ठसवण्यासाठी मांडलेल्या तर्क पद्धतीत काही चूक आहे का हा प्रश्न आपल्यासमोर आहे.

सोप्पं आहे : कॉइन टॉस केल्यावर छापा पडण्याची शक्यता किती आहे ? म्हणजेच छापा पडण्याची - छापा पडेल याची सात्यता किती आहे ?
= १ / (सगळ्या वेगवेगळ्या शक्यता) = १/२ = ५०%

त्याप्रमाणे तुमच्या भासमय जगाची शक्यता काढू. भासमय जग सोडुन दुस-या किती प्रकारचे (काहीही शेंडाबुड नसलेले) जगं असण्याची शक्यता आहेत ?
माझ्या मते अनंत शक्यता आहेत. कसे ? खालील पाच शक्यता पाहा आणि कोणिही त्यात अजुन १० शक्यता ऍड करेल.
१. सेंसरी ऑरगन्स (डोळा , कान ,नाक ,त्वचा वगैरे..) हे आधीच कॅलकुलेट केली आहेत(w.r.t. time) आणि त्यामुळे तुम्हाला जे फील होतय हे ना-रिअल आहे.
२. वेळ ही रिलेटीव असुन तुम्हाला जानवणारा ०.०१ मिनीट हा कुणा दुसर्‍या प्राण्यासाठी १०० करोड पटीने मोठा असून कित्येक प्राणि पैदा होउन मरुन पण जात असतील आणि तुम्हाला
त्याचा थांगपत्ता पण लागत नसेल. तुम्ही आपले बसलाय कसबाला फाशी देत.
३. वेळ ही रिलेटीव असुन तुम्हाला जानवणारा १०००० वर्षे वेळ हा कुणा दुसर्‍या प्राण्यासाठी १ सेकंद असून मानवाच्या कितितरी पिढ्या संपल्या असतील आणि कुणालाच ठाव न्हाय.
४. तूमच्या डोळ्याच्या व्हीजीबल रेंज च्या बाहेर (उघड डोळ्याने दिसु न शकनारे) बरेच प्राणि अस्तीत्वात असून त्यांचा ऊर्जा स्त्रोत वेगळा आहे. ते प्राणि पृथ्वीवरच आहेत तुमच्याच घरात, पण तुम्हला दिसत नाहीत.
५. तूम्ही एकदा झोपल्यानंतर दूसर्‍या दिवशी उठता तेंव्हा कालचे झोपलेले तेच आजचे तूम्ही नसून दुसरे सेम असता..(असा काहितरी)
६.. जगामधे जेवढे प्राणी आहेत ते एकाच जीवातून ओपरेट होत आहेत (मल्टीप्रोसेस्सींग). संगणकात नाही का ५ प्रोग्रामस ला एक प्रोसेसर वेडा बनवतो. एवढा फास्ट ५ ची प्रोग्रामस मधून गरागरा फिरत असतो कि त्यांना वाटतं ते वेगवेगळे रन होतायेत. तसेच एकच जीव प्रत्येक प्राण्याच्या शरीरातून फिरत असावा (लै फास्ट).
७. तुमचा भासमय जगाचा ...

... असले अजुन अनंत..

तर आता ह्यतला कुठलाही एक खरा आहे हयाची शक्यता काढू.
= १ / (अनंत - १) = शुन्य.

तर असल्या शेन्डाबुड नसलेल्या कल्पना खरे असण्यची शक्यता = ०.

---------------------
वाद विवादात "जो शेवटचं वाक्य बोलतो / लिहीतो तो जिंकला" असा समज = गैरसमज
-धनंजय कुलकर्णी

आम्ही एकशेपाच

यांपैकी कोणताही एक सिद्धांत खरा असल्याची शक्यता नगण्य असल्याचा आपला निष्कर्ष खरा मानला तरी यांपैकी कोणतातरी एक सिद्धांत खरा असल्याची शक्यता मोठी नसल्याचे सिद्ध न केल्यास वास्तववाद तर संपेलच की! हे सारे बिनबुडाचे सिद्धांत तसेच वास्तववाद या सार्‍यांनाच खरे असल्याची समसमान शक्यता वाटून दिल्यास वास्तववादाला तरी किती हिस्सा मिळेल?

कसं ?

वास्तववादाला कसं सिद्ध करायचं ? म्हणजे तो तरी सिद्ध झाला आहे का ? मला वाटते की तो पण नो शेंडाबूड असावा.
(चू.भू.दे.घे. मला आपले वास्तववादाचे प्रूफ जाणून घ्यायचे आहेत, आणि सध्यस्थितीत माझा फक्त वास्तववादावर विश्वास आहे पण प्रूफ नाही आहे :()

---------------------
वाद विवादात "जो शेवटचं वाक्य बोलतो / लिहीतो तो जिंकला" असा समज is = गैरसमज
-धनंजय कुलक

असं

कृपया या फाट्यावर चर्चा करूया.

संदर्भ

लेखात ज्या संकेतस्थळाचा दुवा आहे त्यातील निबंध तत्वज्ञानावर आधारलेला नाही असे दिसते. माझी आधी तशी समजूत झाली होती. लेखकही त्यांचे आर्गुमेंट पारंपारिक तत्वज्ञांपेक्षा वेगळे आहे असे स्पष्ट करतात.

नानावटींचा लेख संकेतस्थळावरील मूळ निबंधावर आधारलेला नाही असे वाटते. मूळ निबंध चाळल्यानंतर ड्रेक इक्वेशन आठवले.

---
"भाई बनना है तेरेको?" -- भिकू म्हात्रे

 
^ वर