सामान्य समज (कॉमनसेन्स)

सामान्य समज (कॉमन सेन्स)
आम्ही सात मित्र सायंकाळी बागेत भेटतो.तिथे गप्पाष्टक (सप्‍तक?) चालते. परवा एकाने सर्वांना प्रश्न केला:
"चमत्कार वाटावा असा तुम्ही अनुभवलेला सर्वांत आश्चर्यकारक प्रसंग कोणता?"
विचार करता मला"गणपती दूध पितो." या अफवेची घटना आठवली.भारतभर सर्व गणेश मंदिरांत हजारो लोकांनी दुधाने भरलेली भांडी हातात घेऊन गणपतीला दूध पाजण्यासाठी रांगा लावल्या आहेत अशी दृश्ये दू.चि.वा.वर पाहिली.विविध क्षेत्रांतील आणि विविध स्तरांतील लक्षावधी लोक स्वयंबुद्धीने जरासुद्धा विचार न करता अशा अशक्यप्राय गोष्टीवर चुटकीसरशी विश्वास ठेवतात याचे मला महदाश्चर्य वाटले.
नंतर "गणपती आपल्या सोंडेने दूध पिताना मी प्रत्यक्ष पाहिले.तेव्हा अंधविश्वासाचा प्रश्नच उद्भवत नाही"असे त्यावेळचे मा.मु.मं. मनोहर जोशी यांचे वक्तव्य ऐकले आणि ही घटना म्हणजे केवळ आश्चर्यच नव्हे तर हा चमत्कार आहे असे मला त्यावेळी वाटले.
या घटनेवर आमच्या मोलकरणीची प्रतिक्रिया होती,"या लोकांना एव्हढे समजत कसे नाही? निर्जीव मूर्ती कधी दूध पिईल का?"
म्हणजे जे काय दिसते त्याचे त्या बाईने सजीव प्राणी आणि निर्जीव वस्तू असे वर्गीकरण केले होते.(हे शब्द तिला ठाऊक नसतील). निर्जीव वस्तूंच्या बाबतीत हालचाल करणे,खाणे, पिणे या क्रिया संभवत नाहीत,हे तिला निरीक्षणांवरून कळले होते.निर्जीव गणेशमूर्ती दूध पिते हे तिच्या अनुभव विश्वात बसत नव्हते.
याला मी सामान्य समज(कॉमन सेन्स) म्हणतो.ही मानवी मेंदूची विशिष्ट क्षमता आहे. त्यासाठी सखोल ज्ञानाची,व्यासंगाची आवश्यकता नसते.
मग जी सहस्रावधी माणसे निर्जीव बाहुलीला दूध पाजायला धावली त्यांना सामान्य समज नव्हती काय? असल्यास ती तेव्हा कुठे गेली? याचे उत्तर डार्विनीय सिद्धान्तानुसार देता यावे. मला वाटते ते असे:
माणूस शेती करीत एका जागी स्थिरावला त्याला आता दहा बारा हजार वर्षे झाली. तत्पूर्वी वीस पंचवीस लाख वर्षे माणूस शिकारी, फळे कंदमुळे शोधणारा आणि भटक्या होता. त्याकाळीं टोळ्या होत्या.टोळीचा एक म्होरक्या असे.टोळीतील इतर चार माणसे जे करतात तेच आपण करावे अशी बहुतेकांची मनोवृत्ती असे. इतरांहून वेगळे काही केले तर टोळीपासून अलग पडण्याची भीती असे. स्वसंरक्षण आणि शिकार या गोष्टी एकट्या दुकट्याने करणे अशक्य होते. त्यामुळे टोळी प्रमुखाचे ऐकणे आणि इतर चार चौघे करतात तसेच करणे ही मनोवृत्ती निर्माण झाली,वाढली.आणि ती आनुवंशिकतेने पुढच्या पिढ्यांत संक्रमित झाली.या मानिसतेला गतानुगतिकता अथवा मेषधर्म(एक मेंढरू गेले की त्याच वाटेने इतर सर्व मेंढरे जाणे.) असे म्हणतात.
पण प्रत्येक काळात स्वत:च्या विचाराने वागणारी काही बंडखोर माणसे असतातच.ती टोळी पासून अलग पडली. पुढे त्यांच्याकडून अपत्यनिर्मिती झाली नाही. त्यामुळे त्यांची जनुके पुढच्या पुढच्या पिढ्यांत फ़ारशी संक्रमित झाली नाहीत.त्यामुळे टोळीत स्वयंप्रज्ञ माणसांचे प्रमाण अत्यल्प राहिले.आजही समाजात तसेच दिसते.
पुढे माणूस शेती करून स्थिरावत गेला. विवाहपद्धती आली. कुटुंबे बनली. शिकारीवरचे अवलंबन कमी झाले.संरक्षणाची साधने प्रगत झाली. एकट्या दुकट्य़ा माणसालासुद्धा आपला उदरनिर्वाह आणि संरक्षण करणे शक्य झाले. तरी लाखो वर्षांची गतानुगतिकवृत्ती अल्पकाळात बदलणे शक्य नसते. त्यामुळे अजूनही ती दिसून येते. गणपती दूध पितो या अफवेने ती त्यावेळी प्रकर्षाने दिसून आली एवढेच. एरव्ही ती नित्यश: दिसतच असते.
पण आज ना उद्या अशा सर्व अंधश्रद्धा जाऊन माणूस बुद्धिप्राण्यवादी होईलच. हे निसर्गत: व्हायला मोठा कालावधी लागेल. पण पद्धतशीर सांघिक प्रयत्‍न केल्यास प्रगतीचा वेग वाढविता येईल. आणि काही शतकांतच माणूस पूर्णत्वाने विवेकवादी होईल. त्याची प्रसादचिह्ने जागतिक स्तरावर आजच दिसत आहे.
आज बहुसंख्य माणसे आस्तिक आहेत हे खरे. पण त्यांच्या या भूमिकेमागे कोणताही विचार नसतो. असते ती पारंपरिक गतानुगतिकता आणि श्रद्धा. एकदा विचारांचे वारे योग्य दिशेने वाहू लागले की श्रद्धारूपी पत्त्यांचे बंगले चुटकीसरशी कोसळतील. काही शतकांतच देव,देश,धर्म आणि भाषा यांच्या दुरभिमानातून माणूस मुक्त होईल.युद्धाची शक्यता उरणार नाही.संरक्षणयंत्रणेवरील खर्च शून्यावर येईल.मानवोपयोगी संशोधनासाठी पैसा आणि बुद्धिमत्ता मोठ्याप्रमाणावर उपलब्ध होईल.जगात सुख शांती आणि समाधान नांदू लागेल.
.

लेखनविषय: दुवे:

Comments

संदर्भ दिले आहेत

घोड्याला पाण्यापर्यंत नेता येते.
येथे संदर्भ दिले आहेत (वरील प्रतिसादाच्या तीन तास आधी!).
पराभव दिसू लागला की 'मी नाही खेळत" म्हणून पळून जाण्याच्या तुमच्या सवयीचा अनुभव कझिन्स् विषयीच्या चर्चेतही मला आला होता.

सहमत

लेख काही भाबड्या समजुतींवर आधारलेला आहे असे वाटते. त्याआधी एक गोष्ट स्पष्ट करावीशी वाटते. विज्ञानाचे महत्व, त्यामुळे माणसांचे आयुष्ञ सोपे झाले याबद्दल कुणाचेच दुमत नाही/नसावे. पण माणसाच्या सर्व समस्यांना विज्ञान हे एकमेव उत्तर आहे असे मानणे बरोबर नाही. समृद्ध आयुष्याचा विज्ञान एक अपरिहार्य भाग आहे पण विज्ञान म्हणजे समृद्ध आयुष्य नव्हे.
...
या प्रश्नांची उत्तरे विज्ञानाकडे नाहीत. ती कुठे शोधणार?

सहमत

--------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

चमत्कार आणि सूख

आज दै. सकाळच्या सप्तरंग पुरवणीत 'चंदनाचे खोड लाजे' नावाची फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी वसईच्या एका तरूणीची सुंदर सत्य कथा लिहिली आहे. त्यातली तरुणी उच्चविद्याविभूषित प्राध्यापिका आहे. एक दिवस ती आपल्या खोलीत अभ्यास करत असतांना भिंतीवरील येशूच्या तसबिरीकडे पाहत असतांना त्या चित्रातून एक तेजस्वी नन बाहेर आली आणि म्हणाली ''मुली, उठ माझ्या मागे ये'' झाले तेव्हापासून सदर प्राध्यापिका हादरून गेली. तिने तो भास म्हणून सोडून दिला. पण ते वाक्य काही तिच्या मनातून जाईना. पुढे धर्मगुरुंशी तिने चर्चा केली. आणि आपल्या नोकरीचा राजीनामा दिला. पुढे ती मदर तेरेसांच्या कॉन्व्हेंट मधे गेली आणि पुढे ती कुष्ठरुग्णांची सेवा करु लागली. आजही तिचे काम चालूच आहे.

मोठ्या पगाराची नोकरी, सौंदर्य आणि तारुण्य असलेली स्त्री, थोरामोठ्यांचे आलेले स्थळ, या आणि अशा सर्व गोष्टींचा त्याग करुन तिने एक वेगळाच मार्ग स्वीकारला आणि ती सुखी झाली.

सारांश : प्रत्येकाचे सूख, शांती, समाधानाचे मार्ग वेगवेगळे आहेत. त्यासाठी देव,देश,धर्म, याचा त्याग केलाच पाहिजे असे काही नाही.

सुख

डाउन्स सिंड्रोम असलेली मुलेही सतत हसतमुख असतात.
सुख मिळविण्यासाठीच तर अमली पदार्थ खपतात.
सत्याच्या ज्ञानामुळे दु:ख होते. (कोकणातला गरीब माणूस बिहारच्या दरिद्री माणसापेक्षा दु:खी असतो.) या दु:खामुळेच आपण प्रगतीच्या पुढील टप्प्यावर जाण्याचा प्रयत्न करतो.

पुढे ती मदर तेरेसांच्या कॉन्व्हेंट मधे गेली आणि पुढे ती कुष्ठरुग्णांची सेवा करु लागली. आजही तिचे काम चालूच आहे.

सेवा? त्यांचा खरा हेतु बाटविणे आहे. त्याला माझी हरकत नसली तरी ते लोक अत्यंत सनातनी आणि विज्ञानविरोधी आहेत. वेदनाशमनापासून ते गर्भपातापर्यंत अनेक आधुनिक सुखे घेण्याचा हक्क ते नाकारतात.

आशावाद उपयोगी वाटतो

सार्वत्रिक शिक्षणाचे किंवा प्रबोधनाचे ध्येय असले, तर असा आशावाद स्वयंस्फूर्तीसाठी योग्य वाटतो.

"गणपती दूध पितो" यविषयी अविश्वास दखवणारी अशिक्षित स्त्री - हा किस्सा खरा असावा, कपोलकल्पित नसावा. तो सांगितल्याबद्दल धन्यवाद. (अल्पशिक्षित आणि अतिशय सुज्ञ लोक मलाही भेटलेले आहेत. सांगितलेल्या अनुभवाबद्दल येथे मला काहीच साशंकता नाही. माझ्या प्रतिसादामधून कोणाला तसे वाटल्यास क्षमस्व.)

पण प्रत्येक काळात स्वत:च्या विचाराने वागणारी काही बंडखोर माणसे असतातच.ती टोळी पासून अलग पडली. पुढे त्यांच्याकडून अपत्यनिर्मिती झाली नाही. त्यामुळे त्यांची जनुके पुढच्या पुढच्या पिढ्यांत फ़ारशी संक्रमित झाली नाहीत.त्यामुळे टोळीत स्वयंप्रज्ञ माणसांचे प्रमाण अत्यल्प राहिले.आजही समाजात तसेच दिसते.

या कल्पनारम्य प्रागितिहासाचे या लेखातले स्थान डळमळीत आहे. "बंडखोर" तरुण (पुरुष तरी) लैंगिक दृष्ट्या बर्‍यापैकी आकर्षक असावेत. हे माझ्या कॉलेजकंपूमधल्या अनुभवातून सांगतो आहे. स्वयंप्रज्ञ बंडामुळे प्रागैतिहासिक काळात जर कोणाला अन्न-निवार्‍याची सोय उत्तम होत असेल, तर अशा व्यक्तीला अपत्यप्रजनन करण्यास जोडीदार सुखेनैव मिळावेत.

एकूणच ध्येयवादी लेखामध्ये उत्क्रांतीचे तत्त्व वापरण्याने गोंधळ निर्माण होऊ शकतो. (उत्क्रांती ही भविष्यातील ध्येयाबाबत उदासीन असून फक्त अद्यपरिस्थितीमुळे घडत असते.)

पुढील लेखांबाबत शुभेच्छा अणि प्रबोधनाच्या बाबतीत अनुमोदन.

स्वयंप्रज्ञ बंडखोर

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.धनंजय लिहितातः"स्वयंप्रज्ञ बंडामुळे प्रागैतिहासिक काळात जर कोणाला अन्न-निवार्‍याची सोय उत्तम होत असेल, तर अशा व्यक्तीला अपत्यप्रजनन करण्यास जोडीदार सुखेनैव मिळावेत."

मूळ लेखात शेतीपूर्वकाळाचा संदर्भ आहे. त्याकाळी इतर चारचौघांसारखे न वागणारे पुरुष टोळीपासून अलग पडत. अशा एकट्या दुकट्याची अन्ननिवार्‍याची सोय होणे शक्यच नव्हते. शिकार करणे हे सांघिक काम होते. तसेच हींस्र पशूंपासून संरक्षण हेही एकट्या दुकट्याला शक्य नव्हते. त्यामुळे टोळीपासून अलग पडणारे असे बंडखोर अल्पजीवी ठरले. म्हणून ते प्रजनन करू शकले नाहीत. परिणामी त्यांची जनुके पुढच्या पिढीत संक्रमित होण्याचे प्रमाण घटले.अशी एकूण कारण साखळी आहे.ती तर्कसुसंगत आहे.
...मोलकरणीचा किस्सा १००% सत्य आहे. मात्र तो आमच्या घरातील नसून आम्हां सातांपैकी एक श्री. ह.अ. भावे(प्रकाशक) यांच्याकडचा आहे. त्यांनी तो आम्हांला अनेकदा सांगितला आहे. कदाचित श्री.प्रकाश घाटपांडे यांनीही ऐकला असावा.

एक प्रश्न

त्याकाळी इतर चारचौघांसारखे न वागणारे पुरुष टोळीपासून अलग पडत...परिणामी त्यांची जनुके पुढच्या पिढीत संक्रमित होण्याचे प्रमाण घटले.

एक प्रश्न पडला आहे: फक्त पुरूषांकडूनच स्वयंप्रज्ञता आली असे म्हणायचे आहे का?

अशा वाक्यांमुळे जसे कोणी जातीव्यवस्था सांभाळून ठेवण्याच्या बाजूने समर्थन करत असेल तर गैर ठरवता येईल का? तसेच "स्त्रीयांना काही अक्कल नसते" अथवा तत्सम पुरूषी बाणा दाखवत कोणी स्त्रीयांशी वागू लागले तर ते चूक ठरवण्याचा हक्क राहील का?

--------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

इज् आणि ऑट्

विचार करण्यात लिंगनुरूप फरक पडतात हे निश्चितच.
पण 'नैसर्गिक ते चांगले, जस्टिफाईड' ही फॅलसी आहे.
माणुसकीची वागणूक जनुकांच्या, उत्क्रांतीच्या विरुद्ध असल्याचे डार्विनचे मत होते. आपले 'नेचर' जुलुमी आहे म्हणूनच तर 'नर्चर' आवश्यक आहे.

सारांश

यनावालांच्या लेखाचा रोख खालीलप्रमाणे वाटतो.

१. सामान्यज्ञान हे कमी दिसतं, सुशिक्षित, सुसंस्कृतांमध्येही. (उदा. गणपती दूध पितो यावर घाऊक विश्वास ठेवणं)
२. पण काहींना शिक्षणा, संस्कारापलिकडे असल्या भाकडकथांवर विश्वास न ठेवता प्रश्न विचारण्याची प्रवृत्ती दिसते (मोलकरीण)
३. संस्कारापलिकडे दिसणाऱ्या गुणांसाठी जनुकीय कारण असलं पाहिजे. (लेखात एक कारणपरंपरा दिलेली आहे)
४. जनुकीय कारणांची मर्यादा असली तरी ती शिक्षण व संस्कारांनी ओलांडता येईल.
५. व त्यानंतर आदर्श जग निर्माण होईल.

या पाच पायऱ्यांपैकी मला पायरी क्रमांक ३ हीच केवळ खिळखिळी दिसते. याचं कारण म्हणजे ती कारणपरंपरा बऱ्याच प्रमाणात कल्पनाविलासावर आधारित आहे. त्यात अनेक भोकं पाडता येतात.

तसं असलं तरी 'जनुकीय कारणं - अमुकतमुक कारणपरंपरा' या ठिकाणी 'क्ष वा अज्ञात कारणं' हे लिहिलं तरी संपूर्ण आशावादाकडे जाणाऱ्या तर्कशृंखलेत काही फरक पडत नाही. मुळात चर्चा पायरी ३ व तीमधल्या कारणपरंपरेभोवतीच फिरली हे दुर्दैव वाटतं.

आशावादी दृष्टीकोन लोकांना इतका त्याज्य किंवा अकल्पनीय का वाटतो हे मला कधी समजलेलं नाही.

काही शतकांतच देव,देश,धर्म आणि भाषा यांच्या दुरभिमानातून माणूस मुक्त होईल.युद्धाची शक्यता उरणार नाही.संरक्षणयंत्रणेवरील खर्च शून्यावर येईल.मानवोपयोगी संशोधनासाठी पैसा आणि बुद्धिमत्ता मोठ्याप्रमाणावर उपलब्ध होईल.जगात सुख शांती आणि समाधान नांदू लागेल.

गेल्या तीस ते चाळीस वर्षात मानवजातीने केलेली दैदिप्यमान प्रगती बघता 'काही शतकं' हा लेखकाचा दावा फारच 'कॉन्झर्वेटिव एस्टिमेट' वाटतो.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

कंपूची गरज

गेल्या तीस ते चाळीस वर्षात मानवजातीने केलेली दैदिप्यमान प्रगती बघता 'काही शतकं' हा लेखकाचा दावा फारच 'कॉन्झर्वेटिव एस्टिमेट' वाटतो.

नेमकी कोणती प्रगती? :-)

१. रशियाची, ऑस्ट्रियाची शकले झाली.
२. न्यूयॉर्कातील ट्विन टॉवर पाडले.
३. अफगाणिस्तानातील युद्ध
४. रामजन्मभूमी वाद
५. कश्मिरातील हिंदुंचे विस्थापन
६. गोध्रामधील, मुंबईमधील आणि इतर दंगली
७. अधार्मिक लिखाण केले असे गळे काढून लेखकांसाठी काढलेले फतवे
८. हिंदु देव-देवतांची नग्न चित्रे काढल्यामुळे झालेले वाद

वगैरे, वगैरे आणि वगैरे का? याचाच अर्थ गेल्या तीस-चाळीस वर्षांत झालेल्या देदिप्यमान प्रगतीमुळे देव-धर्म-देश यांची कारणे पुढे करणार्‍या जगातील हिंसक शक्तींमध्ये फारसा फरक पडलेला नाही त्यामुळे पुढील "काही" शतकांत परिस्थिती सुधारेल असे वाटत नाही असेही म्हणता येईल का? किंवा जेव्हा जेव्हा प्रगती साधली जाते तेव्हा तेव्हा तिला विरोध करणार्‍या किंवा तिचा गैरवापर करणार्‍या शक्तीही वाढत जातात असे म्हणता येईल का? (हे कुतूहलवजा प्रश्न आहेत. वाद नाही.)

आशावादी दृष्टीकोन लोकांना इतका त्याज्य किंवा अकल्पनीय का वाटतो हे मला कधी समजलेलं नाही.

आशावादी दृष्टीकोन नाही तर भाबडा किंवा लुच्चा आशावादी दृष्टीकोन म्हणावे. प्रत्येक माणसाने आशावादी राहावे. त्यात काहीही गैर नाही परंतु "देव,देश,धर्म आणि भाषा यांच्या दुरभिमानातून माणूस मुक्त झाल्यावर युद्धाची शक्यता उरणार नाही.संरक्षणयंत्रणेवरील खर्च शून्यावर येईल." वगैरे विधाने आणि "दुष्टांचा संहार करण्यास परमेश्वराचा अवतार होईल" ही दोन्ही विधाने सारखीच खोटी आहेत कारण देव, देश, धर्म आणि भाषा यांची गरज गेली तर दुसरी कोणतीतरी गरज निर्माण केली जाऊन माणसे आपला कंपू अबाधित राखतील हे सत्य आहे.

कंपूबद्दल बोलले की घासकडवी यांना लवकर समजते असा माझा समज आहे म्हणून त्यांना लवकर समजेल अशा भाषेत सांगते. (ह. घ्या. :-))

हा लेख यनावाला यांनी उपक्रमावर टाकला. का बरे? त्यांच्याकडे मिसळपाव आणि मनोगताचे सदस्यत्व नाही? नक्कीच आहे. परंतु उपक्रम हा त्यांचा कंपू आहे. इथे त्यांना वाखाणणारे, त्यांच्याशी सहमती असणारे अनेक लोक आहेत. येथे त्यांना समविचारी लोक भेटल्याने प्रबोधनाची संधी अधिक आहे असे वाटत असावे. त्यात काहीही गैर नाही. मी देखील असेच केले असते. याचप्रमाणे देश, धर्म, भाषा हे कंपू आहेत. एका विचारांशी, एका आचारांशी मिळते-जुळते घेणार्‍या लोकांचा कंपू. या कंपूंचे स्वरूप बदलू शकते. कंपूंचे आचार-विचार बदलू शकतात. कंपूंची संख्या बदलू शकते पण कंपू संपणार नाहीत आणि जोपर्यंत कंपू आहेत तोपर्यंत इतरांवर कुरघोडी करणे, इतरांपेक्षा आपण श्रेष्ठ आहोत हे दर्शवणे वगैरे वगैरे संपणार नाही. येथे एक आशा आहे - मानवाचा वंशच संपला तर या सर्वांतून मुक्ती मिळेल. ;-)

देव, धर्म, देश आणि भाषा यांचा गैरवापर करून ज्यांना आपल्या तुंबड्या भरायच्या आहेत त्यांच्यासाठी या गोष्टी ही केवळ साधने आहेत. साधने बदलत राहतील, माणसाची स्वार्थी प्रवृत्ती काही शतकांतच कशी बदलेल? माणुसकीचा धर्म वगैरे पुस्तकांत किंवा उपक्रमासारख्या संकेतस्थळावर ठीक आहे. एखादी व्यक्ती रिवॉल्वर किंवा तलवार घेऊन समोर उभी राहीली तर माणुसकी दरवेळेस चालू शकेल का? माणसामाणसांतील दरीमध्ये देव, धर्म, देश, भाषा याबरोबर गरीबी-श्रीमंती वगैरे आर्थिक स्तरांचाही समावेश आहे. मग पैशांचाही त्याग वगैरे करावा का? कम्युनिस्ट देशांची परिस्थिती विशद करून सांगण्याची गरज नसावी. :-)

ज्या भाषेचा त्याग करा असे यनावाला आपल्या लेखातून सांगतात तेच यनावाला दुसर्‍या लेखात वसुलींनी व्याकरणशुद्ध "मराठी" शब्दांच्या संधी "संस्कृतामुळे" केल्या असे सांगतात. खरेतर, जो केवळ मराठी भाषा शिकला आहे तोही अशा शब्दसंधी करू शकतो. मराठी देखील केवळ संस्कृत नव्हे तर संस्कृत आणि प्राकृत भाषांचे मिश्रण आहे परंतु भर संस्कृतावरच का दिला जातो? तेथे श्रेष्ठत्व सिद्ध होते, आजही संस्कृत जाणकाराला ज्ञानी समजले जाते हे त्याचे खरे कारण नाही काय? जिथे लेखन शुद्ध हवे, व्याकरणाचे नियम पाळले जावेत वगैरे वगैरे यनावाला इतरांना पटवून देतात (पुन्हा यात काहीही गैर नाही परंतु काही लोकांना, समाजांना आणि अगदी संकेतस्थळांनाही तो लेखनाचा, व्याकरणाचा दुराभिमान वाटण्याची शक्यता आहे.) ते दुसर्‍या लेखात भाषेचा दुराभिमान सोडावा अशी आशा व्यक्त करतात. :-)

यनावालांनी सुरुवात स्वतःपासून करावी अन्यथा त्यांची विधाने हास्यास्पदच ठरतात असे मला वाटते.

हो

"देव,देश,धर्म आणि भाषा यांच्या दुरभिमानातून माणूस मुक्त झाल्यावर युद्धाची शक्यता उरणार नाही.संरक्षणयंत्रणेवरील खर्च शून्यावर येईल." वगैरे विधाने आणि "दुष्टांचा संहार करण्यास परमेश्वराचा अवतार होईल" ही दोन्ही विधाने सारखीच खोटी आहेत कारण देव, देश, धर्म आणि भाषा यांची गरज गेली तर दुसरी कोणतीतरी गरज निर्माण केली जाऊन माणसे आपला कंपू अबाधित राखतील हे सत्य आहे.

+१

साधने बदलत राहतील, माणसाची स्वार्थी प्रवृत्ती काही शतकांतच कशी बदलेल?

IMO कधीच बदलणार नाही.

सहमत

सहमत आहे. किंबहुना (विदा नसताना) या आशावादाला श्रद्धा का म्हणून नये असा प्रश्न पडला आहे.

---
"भाई बनना है तेरेको?" -- भिकू म्हात्रे

नक्की कसले वैषम्य?

राजेश यांना नक्की कसले वैषम्य वाटते आहे आणि कसले वाटायला हवे ह्याचा त्यांनी विचार करावा.

तसं असलं तरी 'जनुकीय कारणं - अमुकतमुक कारणपरंपरा' या ठिकाणी 'क्ष वा अज्ञात कारणं' हे लिहिलं तरी संपूर्ण आशावादाकडे जाणाऱ्या तर्कशृंखलेत काही फरक पडत नाही. मुळात चर्चा पायरी ३ व तीमधल्या कारणपरंपरेभोवतीच फिरली हे दुर्दैव वाटतं.

आशावादाला नावे ठेवण्याचा प्रश्न नाही, माणसाला कसलीतरी आशा असणे गरजेचे आहे, नाहीतर जगायलाच नको. पण त्याबद्दलचे भाष्य करीत असताना श्री. यनावाला जे सुचवत आहेत, (आणि जी मते नंतर त्यांच्या इतर लेखांमध्ये दिसून येणार आहेत) त्याकडे कानाडोळा करून त्यांच्या आशेला नावाजत "वा, वा, उत्तम लेख" असे लिहून त्यांच्या कंपूत सामील होण्याची मला गरज वाटत नाही. मुळात जर एखाद्या गोष्टीचा (इथे जनुके) कोणी टेकू घेत असला, तर ती गोष्ट टेकू घेण्यालायक आहे का नाही असा विचार प्रतिसादकर्त्यांनी आधी केला पाहिजे. कोणीही लेखकाने म्हटले म्हणून त्यांचे म्हणणे १००% मान्य करण्याइतके आपण कोणीच मेंढरे नाही आहोत. (आणि त्या टेकूमधून इतर काय सुचवले जाणार आहे हे अधिक काळजीचे आहे असे मला वाटते). म्हणून हा प्रपंच केला.

इथे तर्क आशावादाकडे जाणारा जरूर आहे - पण त्या तर्कातून काय दिसते?

सत्तर टक्के व्यक्तिमत्व जनुकदत्त असते तर तीस टक्के संस्काराधारित असते.
"लहान मूल म्हणजे मातीचा गोळा, आकार द्यावा तशी मूर्ती घडते." असे म्हणतात ते सत्य नव्हे. संस्कारांचा उपयोग मर्यादित आहे.

श्री. यनावाला यांच्या प्रतिसादातील हा निष्कर्ष आपण वाचलेला दिसत नाही. व्यक्ती घडवण्यात संस्कारांचा उपयोग मर्यादित आहे.

पण आज ना उद्या अशा सर्व अंधश्रद्धा जाऊन माणूस बुद्धिप्राण्यवादी होईलच. हे निसर्गत: व्हायला मोठा कालावधी लागेल. पण पद्धतशीर सांघिक प्रयत्‍न केल्यास प्रगतीचा वेग वाढविता येईल. आणि काही शतकांतच माणूस पूर्णत्वाने विवेकवादी होईल. त्याची प्रसादचिह्ने जागतिक स्तरावर आजच दिसत आहे.

मग हे सांघिक प्रयत्न कसले आहेत? संस्कारांचे? पण त्यांचा तर उपयोग मर्यादित आहे.

आणि हे पद्धतशीर सांघिक प्रयत्न कोणी करायचे? विचारवंतांनी - म्हणजे ज्यांची जनुके स्वयंप्रज्ञतेने पूर्ण आहेत - अशांनी. "जगातील कामगारांनो एक व्हा" सारखा हा नारा आहे. मला त्याच्याही विरोधात बोलायचे नाही. पण एखादी व्यक्ती जर यनावालांसारखा विचार करत नसली तर तिची जनुके स्वयंप्रज्ञतेत कमी आहेत, आणि तिला मार्गदर्शनाची गरज आहे - अशी ही "उदात्त" आणि "वरच्या पातळीवरून" कनिष्ठ दर्जाच्या स्वयंप्रज्ञेत कमी पडणार्‍या मानवसमूहासाठी घेतलेली भूमिका आहे.

उद्या असे "विचारवंत" एकत्र आल्यास जनुकीय तंत्रज्ञान अशा पातळीवर नेऊ शकतील, की त्या मूठभर विचारवंतांना योग्य वाटतील अशा विचारांचे प्रतिनिधित्व करायला ज्यांना ही जनुके नाहीत, किंवा त्यांच्या दृष्टीने कमी प्रतीची आहेत, अशांच्या जनुकांमध्ये बदल घडवून आणणे कायदेशीर होण्याकडे कूच होईल.

हे जे सगळे मी आतापर्यंत लिहीलेले आहे, ते श्री. यनावाला यांना म्हणायचे नसले तर माझे सगळे बोलणे मागे घ्यायला मी तयार आहे, पण त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केलेली नाही आहे असे मला वाटते, ती त्यांनी करावी.

माझा

मुळात चर्चा पायरी ३ व तीमधल्या कारणपरंपरेभोवतीच फिरली हे दुर्दैव वाटतं.

माझा आधीचा प्रतिसाद पायरी क्र. ३ विषयी नव्हता, उलट जनुकीय परीणामांबद्दल इतक्या सहजतेने बोलणे बरोबर नाही असे माझे मत आहे. त्यातील सर्व मुद्यांकडे चर्चाप्रस्तावकांनी पूर्णपणे दुर्लक्ष केले. अर्थात मराठी संकेतस्थळांवर "चर्चा" याच प्रकारे चालतात यामुळे त्याचे आश्चर्य वाटले नाही.

---
"भाई बनना है तेरेको?" -- भिकू म्हात्रे

लेखातील उणीव

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.राजेश घासकडवी यांनी या लेखातील उणिवेवर नेमके बोट ठेवले आहे.
"गणपती दूध पितो" ही अफवा वेगाने पसरत गेली आणि एरव्ही विचारपूर्वक मतप्रदर्शन करणार्‍या अनेक जणांना ती त्यावेळी खरी वाटली.आज जर त्यांना," गणपती दूध पितो हे तुम्हाला त्यावेळी खरे कसे वाटले?" असा प्रश्न विचारला तर त्यांतील बहुसंख्यजण लज्जित होतील.आपण त्यावेळी असे का वागलो याचे त्यांचे त्यानांच आता आश्चर्य वाटत असावे.
साघा कॉमनसेन्स सोडून गतानुगतिकता स्वीकारणार्‍या लोकांची संख्या त्यावेळी एव्हढी प्रचंड होती की हे असे का व्हावे असा प्रश्न पडला.त्याचे उत्तर जैविक उत्क्रांतीत सापडावे असे वाटले.पण अभ्यास नसल्याने जमेल तसे काही लिहिले.ते समाधानकारक नाही हे जाणवत होते.श्री.राजेश यांनी ही त्रुटी नेमकी दाखवली.
काही शतकांत माणूस पूर्णतया विवेकवादी होईल; देव धर्म या कल्पनांनी मानवतेचे अतोनात नुकसान झाले आहे याची सर्वांना जाणीव होऊन या कल्पना त्याज्य ठरतील; देशांच्या सीमा पुसट होतील,विविध समूहांच्या विविध भाषा राहिल्या तरी जागतिक संपर्कासाठी एक भाषा, एक लिपी यांचा स्वीकार सर्व जग करील ; माणसाची बुद्धी,ऊर्जा, समय धन, आणि नैसर्गिक संसाधने यांचा वापर मानवोपयोगी कामांसाठी होईल; जगात सुख शांती नांदेल माणसाच्या ठिकाणी असा समंजसपणा काही शतकांत येईल असा एक आशावादी विचार मांडला.अनेक सदस्यांनी त्याची संभावना"स्वप्नरंजन,भाबडा आशावाद्,भयंकर विनोद अशी केली.त्यांचा रोख कालावधीवर दिसत नाही. असे शहाणपण माणसाला कधीच येणार नाही असे या सदस्यांना वाटते.

तसे वाटत असल्यास....

विविध समूहांच्या विविध भाषा राहिल्या तरी जागतिक संपर्कासाठी एक भाषा, एक लिपी यांचा स्वीकार सर्व जग करील

असे होण्यासाठी, पहीले पाऊल म्हणून, "मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |" लिहीणे थांबवावे लागेल असे वाटते. :-) कारण आत्ता जर ती वैभवावर नसेल तर याचा अर्थ ती जागा इतर भाषांनी घेतली आहे. अर्थात त्या भाषांना आधी खाली खेचावे लागेल...

--------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

ठीक

अभ्यास नसल्याने जमेल तसे काही लिहिले.ते समाधानकारक नाही हे जाणवत होते.श्री.राजेश यांनी ही त्रुटी नेमकी दाखवली.

ठीक. माझेही हेच म्हणणे आहे, पण आपल्या प्रतिसादांमधून जनुके हेच कारण असल्याबद्दल आपली बरेच काही (शास्त्रीय संशोधने) वाचून खात्री पटली आहे असे जाणवत होते. शिवाय व्यक्ती घडण्यात संस्कारांचे महत्त्व विशेष नाही असेही आपण जनुकीय अभ्यासाचाच हवाला देऊन म्हटले होते. आणि प्रगती लवकरच होईल, काही शतकांत असेही म्हटले होते.

जनुके हे जर गतानुगतिकतेचे कारण आहे तर ते बदलल्याखेरीज तुम्हाला अपेक्षित परिस्थिती लवकर, काही शतकांमध्ये कशी येणार आहे? व्यक्तीघडणीत संस्कारांचे महत्त्व कमी असल्यामुळे कितीही विचार मांडले तरी विरोध होणारच, तेव्हा जनुकीय बदल घडवण्याखेरीज आपण दुसरे काही सूचित करीत होता असे वाटले नाही. माझी समजण्यात काही चूक झाली का?

पण आपल्याला अपेक्षित आहेत हे बदल काही शतकांमध्ये यशस्वी होतील यावरून आणि ते तसे चटकन यशस्वी व्हावे म्हणून ते कसे घडवून आणावे यावरून आपण अधिक स्पष्ट लिहायला हवे होते असे वाटले, अजूनही वाटत आहे.

आपला आशावाद आपण निश्चित बाळगावा, त्याचा हक्क आपल्याकडून कोणी हिरावून घेण्याचा प्रश्नच येत नाही.

जनुके

जनुके ही काही एकचालकानुवर्तित संस्था नाही. आदिम जनुके चुकीच्या दिशेने (जी पूर्वी योग्य होती) नेतात तर नवीन जनुके योग्य दिशेने नेतात असे सुलभीकरण करता येईल.
आणि जनुके बदलण्याचे प्रयत्नही होतीलच की!

गेल्या

गेल्या तीन चार हजार वर्षातील माणसाचा इतिहास पाहिला तर माणसाच्या मूलभूत भावनांमध्ये फारसा फरक पडलेला दिसत नाही. हिंसा, लोभ, क्रूरपणा यासारख्या आदिम भावना आजही तितक्याच प्रखरतेने समाजात दिसतात. एक जॉर्ज बुश विज्ञानाच्या सहाय्याने इराकची वाट लावतो आणि त्यात लाखो निरपराध मारले जातात. (यात देव किंवा धर्म यांचा कुठेही संबंध नव्हता. होती ती फक्त सत्ता, लालसा आणि क्रूरता. ) भविष्यकाळात हे जनुकीय पद्धतीने बदलेल आणि सर्व माणसे मदर तेरेसा किंवा गांधी यांच्याइतकी अहिंसावादी होतील यासाठी काहीही पुरावा नाही. म्हणून याला भाबडा आशावाद किंवा श्रद्धा म्हणण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.

त्यातही अतिरेक्यांच्या हातात अणुबाँब सापडले तर सगळे त्याआधीच संपुष्टात येईल.

अवांतर : या मुद्यांचेही यनावालांकडून उत्तर मिळेल अशी अपेक्षा नाही. ही श्रद्धा नाही कारण त्याला भूतकाळातील पुरावे आहेत.

---
"भाई बनना है तेरेको?" -- भिकू म्हात्रे

 
^ वर