घाशीराम - कलाकृती नव्हे तर विषवल्ली

२५/२/१९७६ च्या केसरी मध्ये वरील मथळ्याखाली वरील विषयावर् अभ्यासपुर्ण लेख प्रसिध्द झाला होता तो इतिहास संशोधक श्री य.न.केळकर यांच्या "मराठेशाहीतील वेचक वेधक" या पुस्तकात मला वाचावयास मिळाला तो साभार येथे माहिती व चर्चेसाठी देत आहे.

पीडीए चे अध्यक्ष प्रा.भालबा केळकर यांनी आपल्या मुलाखतीत 'घाशीराम कोतवाल' या कृतीचे मुल्यमापन प्रायोगिक दृष्टीने केले. त्यानंतर इतिहास संशोधक सर्वश्री य.न.केळकर आणि ग.ह.खरे यांच्या मुलाखती मी घेतल्या. त्यांनी ऐतिहासिक दृष्टितून जी 'घाशीराम संबधी मते मांडली ती पुढे देत आहे.

'तुम्ही 'घाशीराम कोतवाल' हे नाटक बहुधा पाहिले नसेलच!" असे मी य.न.केळकर यांना म्हणताच त्यांनी उत्तर दिले, "अहो, ते बोलून - चालून तमाशा आहे तो कोण पहाणार? भरत नाट्य मंदिरात प्रयोग झाला तरी त्याचे स्वरुप कसे बदलणार?"

"पण ऐतिहासिक विषयावरची ही कृती असल्याने तुम्ही ती वाचली असेल " मी म्हटले.

"मला ते पुस्तक एका गृहस्थाने दाखवलं म्हणून चाळलं इतकच. पण त्यात अधपासून इतिपर्यंत अनैतिहासिकता आणी लेखकाची गलिच्छ अभिरुचीच आढळली."

त्यावर मी म्हटले, "लेखकाने इतिहासाचा नाममात्र आधार घेतलेला आहे."

"हो! नाममात्र आधार आहे, पण तोदेखील एका दंतकथेचा. आणि ती दंतकथाही बिनबुडाची. म्हणजे घाशीराम कोतवालाला ललितागौरी नावाची मुलगी होती यालाच कोठेही आधार नाही. महादजी शिंदे यांची 'लालन बैरागीण" नावाची प्रेयसी जितकी काल्पनिक तितकीच घाशीरामाची मुलगी काल्पनीकच आहे. "

"दुसरं उदाहरण बावन्नखणीचं - मुळात नाना फडणिसाच्या काळात बावनखणीचा उल्लेख मिळत नाही. १८४७ साली (म्हणजे त्यांच्या मृत्युनंतर ५० वर्षानी) प्रथम त्यांचा उल्लेख पुण्यातील पेठा, पुरे, गंज, आळी आणि वळी यांच्या मोजणीत आलेला आहे. समजा, त्या काळी तशी वेश्यांची वस्ती असती तरी नाना फडणीस चवली-पावलीकडे कसा जाईल?

मी मध्येच विचारले, "नानांच्या कामुकतेबद्दल बराच गवगवा आहे, त्यामुळे.....

मला थांबवुन श्री केळकर म्हणाले "नानांनी आपल्या कामुकतेचा उल्लेख स्वतःच्या आत्मचरित्रात केला आहे. पण तो त्याने त्याला खंत वाटत असल्याने केला आहे. त्याला तो पापबुध्दी समजतो. या विकाराचे दमन व्हावे यासाठी प्रयत्न करतो. असा विकार कोणत्य पुर्वसंस्काराने आपल्यात बळावत असावा याचा मनःपुर्वक शोध घेउन तो कमी करावयाचा प्रयत्न करतो. अशा प्रकाराने विचार करणार्‍या, अंगावर असलेली राज्याची धुरा समर्थपणे वाहणार्‍या आणि अष्टौप्रहर कार्यमग्न असणार्‍या नानाला बावन्नखणीच कशाला हवी? गांधीजीनी आपल्या आत्मचरित्रात स्वतःच्या कामविकारांचे आत्मसंशोधन पुर्वक सत्यकथन केले. अगदी तसेच दीडशे वर्षापुर्वी नाना फडणीसांनी आपल्या आत्मचरित्रात आपले दौर्बल्य प्रामाणिकपणे मांडले व गांधींजींसारखे मनोनिग्रहाचे यमनियम कठोरपणे पाळले. पण काळाचा महिमा असा की गांधीजींना त्यामुळे महात्मा हे पद मिळाले तर नानांचे मात्र चारित्र्यहनन केले जाते. त्या काळच्या पुण्यातील खरी स्थिती अतिशय सुस्थित, नैतिक व व्यावहारिक कायदेकानुप्रमाणे चाललेली होती. इतर मराठे सरदारांच्या संस्थानातून जी स्थीती होती त्यापेक्षा नानांच्या पुण्यात दसपट निरोगी स्थिती होती यात शंका नाही. म्हणुनच इंग्रजांनी नाना फडणीसांबरोबर मराठी राज्यांतील संयम व शहाणपण लयास गेले असे जे म्हटले ते खरे आहे."

लेखनविषय: दुवे:

Comments

उद्देश

लेखाचा उद्देश स्पष्ट झाला नाही.

---
"भाई बनना है तेरेको?" -- भिकू म्हात्रे

लेखाचा उद्देश आणि एक जुनी चर्चा

लेखाचा उद्देश थोडा थोडा लक्षात येतो आहे. :-) पण पुस्तकी उतारे देण्याबरोबरच लेखकाने तो स्पष्ट मांडायला हवा होता असे वाटते.

असो..

याच विषयावरील एक जुनी चर्चा येथे वाचा.

पुण्याचे पेशवे, बावनखणी व घाशीराम कोतवाल

य.न. केळकर

इतिहासातील सहली वाचून य.न.केळकरांबद्दल उत्सुकता होती. इतिहासातील सहली पुस्तकात ज्यांनी अनेकांची चरित्रे टांगली त्यांचे घाशीराम कोतवाल नाटकाबद्दलचे मत वाचून आश्चर्य वाटले. कदाचित त्यांचे ते तात्कालिक मत असेल. वा नाना फडणवीसाबद्दलचे मत खरे असेल. नाटकात जशी नाना फडणवीसांची लंपटता दाखवली आहे तशीच ती पुणेरी ब्राह्मणांची पण आहे. इतर मराठी राज्यात याहून भीषण परिस्थिती होती असे त्यांचे मत दिसते.

काही दिवसापूर्वी घाशीरामाच्या गोष्टी असणारे १५० वर्षापूर्वीचे पुस्तक वाचले. हे पुस्तक घाशीरामानंतर कित्येक वर्षांनी लिहिले असल्याने ऐतिहासिक दस्तावेज नाही. अनेक चुटक्यांनी
भरलेल्या या पुस्तकात ललितागौरीचा उल्लेख आहे पण तो नाटकापेक्षा फार वेगळा. यात तिला मूल होत नसते आणि मग त्यावरील काय उपाय केले याचा एक थोडासा अश्लील चुटका आहे.

प्रमोद

घाशीराम हे मुंबईबद्दल

घाशीराम कोतवाल हे नाटक ऐतिहासिक काळातल्या पुण्यात घडलेले दाखवले असले, तरी त्याचा विषय हल्लीच्या काळची मुंबई होती. असे नाटककाराचे स्पष्टीकरण कित्येकांना माहीत असेल. नाटक बघणार्‍यांपैकी कित्येक लोकांना नाटककाराच्या स्पष्टीकरणाची गरज नाही, नाटकाच्या कथाप्रसंगांमधून आपोआप समजतेच.

"ययाती आणि देवयानी"च्या प्रस्तावनेत वि. वा. शिरवाडकरांनी स्पष्ट केलेले आहे, की काही पौराणिक पात्रे घेऊन त्यांनी पूर्णपणे स्व-काल्पनिक कथावस्तू रचलेली आहे. अर्थातच हे मराठी नाट्यरसिकांना समजतेसुद्धा. मराठी नाट्यरसिकांना हेसुद्धा समजते, की विसाव्या शतकात रचलेली कथावस्तू विसाव्या शतकामधील घडामोडींबद्दल, मनोवैज्ञानिक कल्पनांबद्दल भाष्य आहे.

"घाशीराम कोतवाल" बघताना बहुतेक प्रेक्षकांना समजत असेल की नाचणारी-गाणारी पात्रे म्हणजे नाट्यकथा कथनातले एक तंत्र आहे. ऐतिहासिक पात्रांकडून हल्लीच्या राजकारणाबद्दल भाष्य करवणे, हेदेखील एक नाट्यतंत्र आहे. काही लोकांना हे कळत नाही हे खरेच खरे आहे का? की कळूनसवरूनसुद्धा काही सुज्ञ लोक न कळल्याचे सोंग करतात?

तमाशा बघण्यात काय वाईट आहे, हे मला माहीत नाही. त्यामुळे श्री. य. न. केळकरांचा "तमाशा आहे तो कोण पहाणार?" हा युक्तिवाद माझ्यापुरतातरी पूर्णपणे हुकलेला आहे. कोणी समजावून सांगेल काय?

सद्यस्थितीबद्दल टीका करण्यासाठी नाटककाराने कथाबीज लोकप्रवादातून घेतलेले आहे, हे स्पष्टच आहे. हे स्पष्ट असताना "कथाबीज दंतकथेमधून घेतले" ही टीका हास्यास्पद होते. नाटकाचा कथासंकेत (म्हणजे : हल्लीची मुंबई) न कळल्यामुळे श्री. केळकरांना (त्यांनी नाटकही बघितलेले नाही, आणि पुस्तकही वरवरच चाळलेले आहे) फक्त गलिच्छ अभिरुची दिसली असेल का? असा प्रश्न पडतो.

श्री. केळकरांच्या "इतिहासातील सहली" पुस्तकाबद्दल आता कुतूहल वाटते आहे.

हा लेख आणि प्रतिसादही माहितीपूर्ण आहे, वाचत आहे.

लेखकाची गलिच्छ अभिरुची

काही लोकांना हे कळत नाही हे खरेच खरे आहे का? की कळूनसवरूनसुद्धा काही सुज्ञ लोक न कळल्याचे सोंग करतात?

तमाशा बघण्यात काय वाईट आहे, हे मला माहीत नाही. त्यामुळे श्री. य. न. केळकरांचा "तमाशा आहे तो कोण पहाणार?" हा युक्तिवाद माझ्यापुरतातरी पूर्णपणे हुकलेला आहे. कोणी समजावून सांगेल काय?

वर लेखातच याचे उत्तर दिले आहे :-) आणखी स्पष्टीकरण हवे असल्यास गेल्या चर्चेतील प्रतिसाद वाचावेत.

इतिहासकार झाला म्हणून तो निष्पक्ष आहे असे सहसा होत नाही. त्याची एक बाजू, आवड ही कुठेना कुठे झुकलेली असतेच. तिचे दर्शन हे असे होते आणि हे फक्त इतिहासकारांनाच लागू आहे असे नाही. :-)

:-)

:-)
वरील प्रतिसादातून तेंडुलकरांची भीती पुन्हा सिद्ध होते :
मुंबई महाराष्ट्रात राहिली (आणि ती महाराष्ट्राबाहेर जाण्याची भीती कोणी दाखवत राहिले) तर मुख्यमंत्री-महापौरांनी वाटेल त्या प्रमाणात कोतवाली राज्य चालवायला मुभा आहे.

त्या काळात जरठ-कन्या विवाह, बहुपत्नीत्व आणि वेश्यागमन सामान्य-राजमान्य होते. अगदी हल्लीहल्लीच्या माझ्या चार पणजोबांचे उदाहरण घेतले, तर दोन बालविवाह सापडतील आणि एक जरठ-कन्या विवाह सापडेल. (असले तपशील उघड असतात. वेश्यागमनाबद्दल माहिती कुटुंबात सांगत नाहीत.) असे चित्र रंगवून कुठले ऐतिहासिक चारित्र्यहनन होत नाही.

नाना फडनविसांच्या पात्राने "मुत्सद्दीपणाने" घाशीराम कोतवालाच्या पात्राला बळ दिले, आणि गरज सरताच त्याचा बळी दिला. ही "पाताळयंत्री" वर्तणूक कदाचित "ऐतिहासिक चारित्र्यहनन" असू शकेल. पण साडेतीन शहाणे मुरलेले मुत्सद्दी नव्हते, एकमेकांत फसवाफसवी करून राजकारण खेळत नव्हते, असा विचार आश्चर्यकारक वाटतो, अविश्वसनीय वाटतो.

कोतवालाची घटना लोकप्रवादातली आहे, पण ऐतिहासिक चारित्र्यहनन असे कुठले वाटत नाही. आणि नाहीतरी लोकप्रवादातल्या घटनेतून हल्लीच्या राजकारणाबद्दल टिप्पणी करायची होती.

लोकप्रवाद अर्थात गॉसिपिंग

सार्वजनिक प्रकाशझोतात असणार्‍या कोणत्याही व्यक्तीच्या खासगी आयुष्यात काय चालते ते जाणून घेण्याची सर्वसामान्यांची इच्छा असते. विशेषतः अशा व्यक्तीच्या स्खलनशीलतेकडे लोकांचे बारीक लक्ष असते. प्रत्येकाचे पाय मातीचे असतात, व्यक्ती कितीही मोठी झाली तरी ती खासगी वर्तनात सर्वसामान्यच असते हे सिद्ध करण्याची अहमहिका सामान्य जनात लागलेली असते.
त्यातूनच पूर्वीचे बाजीराव-मस्तानी, नाना फडणवीस - बावन्नखणी किंवा आजचे थरूर - सुनंदा अशा गोष्टी लोकप्रवादात येतात.
ज्यावेळी (१९७२ मध्ये) तेंडुलकरांनी घाशीराम.. लिहीले त्यावेळी अशा गोष्टी निव्वळ दबक्या आवाजात, प्रौढ व्यक्तींमध्ये बोलल्या जात. आजच्या इतके उघड स्वरूप त्यावेळी आले नव्हते. इतकेच काय पण खासगी भानगडी चव्हाट्यावर आणणार्‍या पत्रकारितेला पिवळी पत्रकारिता असे म्हटले जाई. विवाहबाह्य लैगिक आकर्षण आणि लैगिक संबंध यांच्याबद्दल उघड चर्चा शिष्टसंमत नव्हती.
आज अशा चर्चा त्यामानाने खूप उघडपणे चालतात. आज घाशीराम.. स्फोटक, भडक वाटत नाही. पण ज्यावेळी ते लिहिले गेले उच्चभ्रू शिष्टांना त्यावेळी ते तसे वाटले असण्याची शक्यता आहे.

अनादि कालापासून लोकांच्या आचरणात फरक पडलेला नाही. फक्त उच्चारणात फरक पडलेला आहे. इतकेच!

प्रश्न

केळकरांनी नानाच्या काळच्या कायदा नि सुव्यवस्थेबद्दल जी मते नोंदवली आहेत आणि इतर सरदारांच्या तुलनेत दसपट बरी स्थिती असल्याचे म्हण्टले आहे त्याला काय आधार आहे ?

इतर् सरदारांच्या तुलना

याच पुस्तकात नागपुरकर भोसल्यांचा एक दाखला दिला आहे. हे अस्सल समकालीन पत्र इतिहासकार शेजवलकरांनी 'नागपूर अफेअर्स् भाग १ - पत्र ३०१', छापले आहे. त्यांत रघुजी भोसले ब्राम्हणांच्या मुली, पाळत ठेवून , जबरदस्तीने वाड्यात आणुन त्यावर बलात्कार करुन दुसरे दिवशी परत पाठवी. त्यांत एक अकरा वर्षांची मुलगी प्राणास मुकली. हा बोभाटा झाल्यावर चिमाबाईने त्याचा अत्यंत निषेध कसा केला आणि ती वैतागून काशीयात्रेला कशी गेली ते कळते. आणखी यासारखे वैषयीक अनाचार त्याने केल्याचे त्यात नमुद आहे.

विश्वास कल्याणकर

प्र.का.टा.आ.

लालन बैरागिणीबाबत प्रश्न विचारला होता पण नेटावर शोधल्यावर माहिती मिळाली.

राम राम मंडळी.

मोतीबिंदु च्या ऑपरेशन साठी मी ११ मे पासुन दुर् असेन १४ मे ला ऑपरेशन आहे त्यानंतर सुमारे १ महिना डोळ्यावर ताण न येण्याची खबरदारी घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. २२ जुन ला माझे गुवागाटी चे फ्लाईटचे बुकींग आहे. सुमारे १ महिनापेक्षा अधिक मी इशान्य राज्यांत रहाणार आहे. जमेल तेंव्हा व जमेल तसे मी संपर्कात रहाण्याचा प्रयत्न करेन.

सादर धन्यवाद

विश्वास कल्याणकर

 
^ वर