आई खाऊ घालेना , बाप भिक मागू देईना आणि माय-बाप सरकार बालकामगार विरोधी कायदे करून काम करू देईना.

माय-बाप सरकार बालकामगार विरोधी कायदे करून काम करू देईना.
आई खाऊ घालेना , बाप भिक मागू देईना आणि माय-बाप सरकार बालकामगार विरोधी कायदे करून काम करू देईना. कोटयावधी बालकांना गुन्हेगारीच्या मार्गावर वाटचाल करावयाला लावणारा असा हा भारत सरकारचा बाल कामगार विरोधी कायदा आहे. बाल कामगाराच्या हीता करता काहींचं नाही करता फक्त बालकाना कामावर न ठेवण्याचा कायदा करून आणि कामावर ठेवल्यास मालकांना जेल मध्ये टाकण्याचा,त्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक दंड लावण्याचा अजब कायदा करून सरकार, राजकारणी नेते आणि नोकरशाही आपण बाल कामगाराच्या सर्व समस्या दूर केल्याचे आणि आपण बालकाचे मुलांचे हित पाहत असल्याचे ढोल पिटत आहे. पण वास्तवात हा कायदा नोकरशाहीच्या भ्रष्ट्राचाराला आधिक वाव देत आहे. पण शासन बुद्धीजीवी वर्ग वेड पांघरून पेडगावला जात आहेत. आणि बालक काम करून घराची चूल पेटण्यासाठी राबत आहे. हेच दाहक सत्य आहे. आणि शासन यंत्रणा वार्षिक श्राद्धा प्रमाणे बालकामगार दिवस "आमच्या विभागात बालकामगार नाहीत" अश्या पाट्या लाऊन साजरा करतात.

रेल्वे ने प्रवास करत असताना स्टेशन वर अनेक पदार्थ मिळतात . एका सेलू स्टेशन वर चणे गरमागरम मिळतात. गरीब चणे खात असेल तर ,देखो घरमे खाणे को मिलता नही स्टेशन पर चणे खा राहा आणि श्रीमंत माणूस तेच चणे खात असेल तर देखो शौक से चणे खा राहा है. चणे तेच पण खाणाऱ्या च्या सामाजिक दर्जावर खाण्याचा दर्जा ठरत असतो. या वरून बालकामगार ही सामाजिक दर्जावरून वर्ग ठरवले जातात . घरी चूल पेटावी घरच्यानन च्या पोटात दोन घास जावे , भावंडाना शिक्षण घेता यावे , आजारी मात्या-पित्याच्या आजारपणासाठी औषधा करत मदत व्हावी म्हणून हि कोवळी बालक काम करत असतात. तेंव्हा समाज यांचे कोतूक करावयाचे सोडून आपला बुद्धिवाद पाजळत बसतात. आणि बालकामगार समाजाला कलंक आहे असे सांगत हे बंद करण्या करता कायदे , अधिक कडक कायदे करत बसतात.

तेच उच्चभ्रू , मध्यम समाजातील मुल, मुली अभ्यास सोडून रियालिटी शो च्या नावाखाली टी.व्ही वर वेडे वाकडे तोडक्या कपड्यात सरक्यालो खटीया १२ बजे असे विचित्र गाणे घाणरडे हावभाव करत असतात; कमरे खालचे विनोद सांगत असतात , तेंव्हा हेच उच्च वर्ग , या बाल कलाकार उर्फ बाल कामगार याचे कोतूक करत असतात. या कलाकारांना बाल मजदूर ,कामगार म्हणतो म्हणून दचकलात? हां हे बाल कलाकार १००% बाल कामगार आहेत हे विदारक कटू सत्य आहे. नैसर्गिक जीवन जगण्याचे, खेळाचे,अभ्यास करण्याचे सोडून हे बाल कामगार 8 - 10 तास चेहऱ्यावर मेकअप चे थर चढवून, अक्शन, कट, च्या वातावरणात, फ्लूड लाईट च्या प्रखर प्रकाशात ,घामने ओलेचिंब होत काम करत असतात. याच वेळी परीक्षेकांची कुजकट, अवमान करणारी शेरेबाजी ऐकत अपमान गिळून चहेर्या वर खोटे हसू आणत काम करत असतात. राग, त्रागा केला तर स्पर्धेतून बाहेर फेकल्या जाण्याची भीती असते.जशी भीती कामावरून काढून टाकण्याची बाल कामगाराला असते. त्याच बरोबर आई वडिलांच्या अंतहीन अपेक्षांचा फुगा फुटला तर काय होईल याची पण भीती मनात असतेच. पण आजच्या उपोभोगवादी, बाजारू संस्कृतीत या कडे कोणाचेच लक्ष जात नाही, कारण बाजारू संस्कृतीत बाबूजी तुम क्या क्या खरीदोगे यांहा तो हर चीज बिकती है हेच सत्य आहे . यामुळे या कडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले जाते.हीच या मुलांची म्हणण्या पेक्षा आपल्या समाजाची शोकांतीका आहे.मुख्य गोष्ट आज जगात 22 - 23 कोटी बाल कामगार काम करत आहेत. विषम सामाजिक, आर्थिक परिस्थिती मुळे, बाजारू अर्थ व्यवस्थे मुळे ; जगातील कोणत्याही कायद्याने ही बाल कामगार व्यवस्था बंद पडणार नही . मग अतिरेकी कायदे करण्या पेक्षा या बाल कामगारांना कायद्याने कामगार हक्क देऊन त्यांची ताकद वाढविण्याची गरज आहे. या करता मालकांना बाल कामगारांच्या शिक्षणाची जबाबदारी देण्यात यावी.या मुलांचा सरकारी शिक्षणाचा आर्थिक भार या मालकांवर टाकावा. शाळे मध्ये आई-वडिलांच्या नावा बरोबर या मालकांचे जबाबदार पालक म्हणून नाव टाकावे. मुलांचे कामाचे तास शाळेच्या तासा बरोबर नियमित करावे. 5 - 6 तासा पेक्षा मुलांचे कामाचे तास जास्त होणार नाही, या मुलांना ओवर टाइम मध्ये काम करणे, ओवर टाइम काम करण्या करता सक्ती करणे कायद्याने बंद करणे. संघटीत कामगारा चे हक्क या बहाल करणे. अश्या व्यवस्थित नियमावली करून या बालकांच्या श्रम शक्तीला सामाजिक प्रतिष्ठा मिळवून देऊन देशाच्या या भावी नागरिकांना सशक्त बनविणे हीच काळाची गरज आहे. नाही तर समाज कंटक , गुन्हेगारांच्या, शुद्र राजकारण करणाऱ्या नेत्यान च्या सापळ्यात अलगद सापडून ही पिढी बरबाद होईल , आणि याचे गुन्हेगार तुम्ही आम्ही सगळेच असुत. हे ध्यानात घ्या.

Thanthanpal,
http://www.thanthanpal.blogspot.com

Comments

एका अर्थी खरे आहे

विषयाची मांडणी बटबटीत वाटली परंतु रिऍलिटी शोमधल्या बालकलाकारांबद्दल म्हटलेले बरेचसे पटण्यासारखे आहे.

नैसर्गिक जीवन जगण्याचे, खेळाचे,अभ्यास करण्याचे सोडून हे बाल कामगार 8 - 10 तास चेहऱ्यावर मेकअप चे थर चढवून, अक्शन, कट, च्या वातावरणात, फ्लूड लाईट च्या प्रखर प्रकाशात ,घामने ओलेचिंब होत काम करत असतात. याच वेळी परीक्षेकांची कुजकट, अवमान करणारी शेरेबाजी ऐकत अपमान गिळून चहेर्या वर खोटे हसू आणत काम करत असतात. राग, त्रागा केला तर स्पर्धेतून बाहेर फेकल्या जाण्याची भीती असते.जशी भीती कामावरून काढून टाकण्याची बाल कामगाराला असते. त्याच बरोबर आई वडिलांच्या अंतहीन अपेक्षांचा फुगा फुटला तर काय होईल याची पण भीती मनात असतेच.

या मुलांचे घाबरलेले चेहरे, आई-वडिलांकडे मान वळवून ते निराश झालेले/ रागावलेले नाहीत हे पाहणे, नंतरची रडारड, परीक्षकांचा कुजकटपणा, निकाल सांगताना डोळे गच्च मिटून, बोटे एकमेकांवर वाकडी करून जप करणे वगैरे गोष्टींचा त्रास होतो. या मुलांचा शाळा, सवंगडी, खेळ वगैरेंशी संबंध तरी उरला असावा का अशी शंका वाटते.

असेच म्हणतो

असेच म्हणतो. कदाचित ठणठणपाळ शी साजेशी मांडणी ही अपरिहार्यता असावी.
प्रकाश घाटपांडे

असेच म्हणतो

बालकामगारांबद्दल आणि गरीब-श्रीमंतांसाठी वेगवेगळे मापदंड असण्याबद्दलचे मुद्दे विचारार्ह आहेत.

सवयीने श्री. ठणठणपाळ लेखन कमी बटबटीत करतील. त्यांचे विचार वाचायला आणि समजायला सोयीचे होईल. ही आशा आहे.

भावनेशी सहमत

ठणठणपाळ यांच्या भावनेशी सहमत आहे.
उच्चभ्रू आणि गरीब यांना वेगळे मापदंड लावण्याच्या प्रवृत्तीवर ओढलेले ताशेरे योग्यच.

आता थोडे कायद्यांच्या अंमलबजावणीबाबत. बहुतेक अशा प्रकारचे कायदे जे वास्तवाकडे पाठ फिरवणारे (वास्तविक कारण लक्षात न घेता युटोपियन तत्त्वांवर बनवलेले) असतात त्यांची प्रत्यक्षातील अंमलबजावणी अगदीच वाईट असते. किमान वेतन कायदा हाही असाच एक कायदा आहे. ज्याची अंमल बजावणी होऊ शकत नाही कारण त्याने स्टिप्युलेट केलेले दर वास्तवापासून खूप दूर असतात. असे कायदे हे अंमलबजावणी करवणार्‍या अधिकार्‍यांसाठी कमाईचे साधन असते. आणि त्या कायद्यातून काढायच्या पळवाटा हे अधिकारीच सांगतात.

तशाच प्रकारे या बालकामगारविरोधी कायद्यांची अंमल बजावणी होणार नाही. (ठणठणपाळ यांना "काळजी नसावी" असा सल्ला द्यावा लागतोय ही दुर्दैवाची पण खरी परिस्थिती आहे).

नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)

छोटा टप्पा मोठा टप्पा

समाज किंवा सरकार असे अनेक कायदे करतं ज्यांचा छोट्या टप्प्यात तोटा होतो पण मोठ्या टप्प्यावर, अंती फायदा असतो. कच्च्या कैऱ्या विकून ताबडतोब पैसे मिळतात, पण तेच आंबे होईपर्यंत राखण केली, थांबलो तर खूपच अधिक फायदा असतो.

तुम्ही मांडलेला गरीबीचा प्रश्न व तसंच कामाचे तास मर्यादित ठेवून शिक्षण घेता येण्याचा मार्ग विचार करण्याजोगा आहे. इंग्लंडमध्ये कापडाच्या गिरण्या जेव्हा वाढल्या तेव्हा तिथे मोठ्या प्रमाणावर बाल कामगार काम करत असत. त्यांचं आयुष्य अत्यंत हलाखीचं असे. बारा तास काम, प्रदूषण, अपघात याने अनेक बळी पडत, जायबंदी होत. जे जगत त्यांचंसुद्धा आयुर्मान कमी असे. ही परिस्थिती बदलण्यासाठी तिथेदेखील प्रथम तास मर्यादित केले व नंतर हळुहळू बाल कामगारांवर बंदी आणली गेली (वयाची मर्यादा वाढवत नेत). याच संदर्भात अनिल अवचटांनी केलेल्या हळदीच्या कारखान्यांमधल्या बाल कामगारांची हलाखीची परिस्थितीही आठवते.

शिवाय मॅक्रोइकॉनॉमिक पातळीवर मुलांवर जर बंदी आणली तर तेच काम अधिक आईबापांना मिळेल - शेवटी एखादी वस्तु उत्पादन करण्यासाठी लागणारं लेबर तितकंच असल्यामुळे आवक पैशावर फरक पडणार नाही. कदाचित 'कृत्रिम कमतरतेमुळे' अधिक भाव येईल.

रिआलिटी शोजबाबतीतलं पटलं नाही, किमान महत्त्वाचं तरी वाटलं नाही. एकतर ती संख्या इतकी कमी आहे की विचारायला सोय नाही. दुसरं म्हणजे त्यात नशीब निघालं तर खूप पैसा मिळू शकतो म्हणून पालक त्यांच्या मागे लागतात. हेच क्रिकेट, शालेय अभ्यास याविषयी म्हणता येईल.

शेवटी कायदा पालनाचा व अंमलबजावणीचा प्रश्न आहेच. जोपर्यंत ते सुधारत नाही तोपर्यंत काय उपयोग? तरीही मोठ्या मान्यवर कंपन्या बहुतेक कायदे पाळतात हा अनुभव आहे. सर्वच नागरिक सुशिक्षित, व समृद्ध झाले, सर्वच कंपन्या मान्यवर झाल्या की अंमलबजावणी आपोआप सुधारेल. पण बालकामगार असू दिले तर शिक्षण आणि समृद्धी कशी येणार? म्हणून लॉंग टर्मसाठी हा कायदा असणं महत्त्वाचं वाटतं.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

-१

>>समाज किंवा सरकार असे अनेक कायदे करतं ज्यांचा छोट्या टप्प्यात तोटा होतो पण मोठ्या टप्प्यावर, अंती फायदा असतो....
हे बरोबर आहे पण छोट्या टप्प्यात होणारा तोटा कुणाच्या जगण्यावरच प्रश्नचिह्न निर्माण करणारा असू नये.

आई वडिलांना त्यांच्या कामाचा पुरेसा (स्वतःचे आणि मुलांचे जगणे + आरोग्य + मुलांचे शिक्षण) मोबदला मिळत असेल तरच बालकामगारप्रतिबंधक कायद्याला अर्थ आहे. अन्यथा हा कायदा म्हणजे मुंबईच्या लोकल प्रवाशांना दरवाजात उभे राहून प्रवास केल्याबद्दल दंड करण्यासारखे आहे.

नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)

वेगळ्या दृष्टीकोनातून-

खरा पेच इतरत्र आहे.
भारतीय परिप्रेक्ष्यात बारकाईने पाहिल्यास बर्‍याच दारिद्र्य रेषेखालील कुटुंबात पुरुष कुटुंबप्रमुख ही भूमिका न साकारता बांडगुळाप्रमाणे जीवन जगतो.
घरातील स्त्री हीच कर्ती असते. पुरुष कधीतरी काम करून मिळवलेला पैसा कुटुंबासाठी न वापरता वैयक्तिक सुखासाठी वापरतो.
हे 'कधीतरी काम' नसले तर स्त्रीने कष्ट करून मिळवलेला पैसाही स्वतःसाठी वापरतो. स्त्रीही 'काही झाले तरी हक्काचा नवरा आहे' या भोळ्या समजुतीने अशा बांडगुळांना पोसत राहते.
अशा घरात स्त्रीला आपल्या मुलांनी शिकावे असे वाटत असले तरी खाण्यापिण्याची आबाळ सहन न झाल्याने मुले कामगार बनतात.
बर्‍याच वेळेला स्वतः आईच आपल्या मुलांना काम मिळावे म्हणून याचना करताना दिसते. तिच्या नवर्‍यासाठी नाही. कारण नवर्‍याचा बेभरवसेपणा तिला माहित असतो.
माझ्या पाहण्यात अशी अनेक उदाहरणे आहेत.
याउलट ज्या गरीब घरातील पुरुष घराला हातभार लावतात तिथे मुले शिकतात आणि ते कुटुंब पुढे उर्जितावस्थेत येते.अशीही उदाहरणे आहेत.
पुरुषप्रधान संस्कृती, व्यसनाधीनता, उडाणटप्पू मनोवस्था यामुळे पुरुष जबाबदारीने वागत नाहीत त्याचे हे फलित आहे असे वाटते.
केवळ बालकामगारविरोधी कायदा करून ही समस्या सुटणार नाही.

उच्चभ्रू , मध्यमवर्गीय यांच्यातली बालपिळवणूकीची समस्या वरवर पाहता वेगळी आहे.
तिथे पोट जाळणे महत्त्वाचे नाही तर आहे त्या आर्थिक, सामाजिक स्तरापेक्षा वरच्या स्तरावर जाणे हे उद्दिष्ट आहे.केवळ दूरचित्रवाणीवरील सत्यदर्शक कार्यक्रमांपुरते ते मर्यादित नाही.
एकच वाक्य सांगतो - 'माझा मुलगा/मुलगी आयाय्टीत गेला/ली पाहिजे'. हीसुद्धा बालपिळवणूकच आहे. हेसुद्धा बालकामगारच की! आईबापांनी राबवलेले...
(मीही त्या पिळवणूक करणार्‍यांतून वेगळा नाही.)
आता इथे सरकार कोणता कायदा करणार? मुलांना कोचिंग क्लासेस् ना घालू नये? क्रिकेट ऍकॅडमीत पाठवू नये? डान्स क्लासला घालू नये?

भारतात 'तगणे' या शब्दाची व्याख्या आर्थिक, सामाजिक दर्जाप्रमाणे वेगवेगळी असली तरी प्रत्येक क्षेत्रात स्पर्धाच इतकी आहे की केवळ तगण्यासाठी वेगवेगळ्या स्वरूपातील बालपिळवणूक पदोपदी पहायला मिळते. तिथे केवळ कायदे करून कोणता मार्ग सापडेल असे वाटत नाही.

जगणे

भारतात 'तगणे' या शब्दाची व्याख्या आर्थिक, सामाजिक दर्जाप्रमाणे वेगवेगळी असली तरी प्रत्येक क्षेत्रात स्पर्धाच इतकी आहे की केवळ तगण्यासाठी वेगवेगळ्या स्वरूपातील बालपिळवणूक पदोपदी पहायला मिळते. तिथे केवळ कायदे करून कोणता मार्ग सापडेल असे वाटत नाही.

तरी देखील तग धरुन असणे यासाठी काही जगण्यातील प्राधान्यक्रम ठरवताना कुठल्याना कुठल्या शोषण/पिळवणुकीला बळी पडावेच लागते. प्रश्न असा आहे की या तीव्रता ठरवताना अन्न वस्त्र निवारा या प्राथमिक गरजांसाठी मुलांना काम करावे लागणे व कमवा व शिका या योजनांतर्गत मुलांनी काम करणे यात फरक् आहेच. पुर्वी माधुकरी या संकल्पनेतुन काही विद्यार्थ्यांचे प्रश्न सुटत होते. आता स्वरुप बदललय .सामाजिक जाणीवा जागृत ठेवणे हाच एक मार्ग आहे. कायदा करुन प्रश्न सुटेल असे वाटत नाही याशी सहमत आहे.
प्रकाश घाटपांडे

माधुकरी

माधुकरी/वार लावून जेवणे हे प्रकार बहुधा विशिष्ट वर्गातल्या मुलांनाच उपलब्ध होते.
तसेही माधुकरी वगैरे लाचार प्रकारापेक्षा नोकरी करणे बरे असेच माधुकरी प्रकारातून गेलेल्या लोकांना वाटत असावे. विचारून पहायला पाहिजे.

नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)

पिळवणूक

माझा मुलगा आयायटीत जावा किंवा मोठा गायक व्हावा ही नेमकी पिळवणूक आहे का याबाबत साशंक आहे.

माझ्या मुलाने आयायटीत जावे म्हणून मी त्याच्याकडून मारून मुटकून शाळेव्यतिरिक्त ६ तास अभ्यास करवून घेतो. वेगवेगळ्या कोचिंग क्लासेसना पाठवतो. त्याला खेळायला देत नाही. त्याचे मित्र घरी आलेले आम्हाला आवडत नाहीत कारण अशाने त्याच्या अभ्यासाचा खोळंबा होतो, त्याने अभ्यास केला नाही तर त्याला जेवण मिळत नाही वगैरे विधाने नक्कीच पिळवणूक म्हणता येईल. (अशी एकत्रित विधाने करणारे पालक मी पाहिलेले नाहीत परंतु सुटी-सुटी विधाने अनेकजण करतात.)

मुलांच्या आत्महत्येची प्रकरणे काही दिवसांपूर्वी गाजत होती त्यामागे अशीच कळत-नकळत पिळवणूक असते का असा प्रश्न पडला.

रिऍलिटी शोंचे थोड्या अधिक प्रमाणात असेच. तोकड्या कपड्यांत नाचणारी, खर्जातले आवाज काढणारी, आपल्या वयाला न शोभणारे कामुक हावभाव करणारी पोरे पाहिली की तगण्यापेक्षा आई वडिलांच्या अपूर्ण स्वप्नांच्या अपेक्षांचे ओझे वाहणारी गाढवे आठवतात.

बर्‍याच वेळेला स्वतः आईच आपल्या मुलांना काम मिळावे म्हणून याचना करताना दिसते. तिच्या नवर्‍यासाठी नाही. कारण नवर्‍याचा बेभरवसेपणा तिला माहित असतो.
माझ्या पाहण्यात अशी अनेक उदाहरणे आहेत.

सहमत आहे.

सामाजिक आणि आर्थिक असुरक्षितता

तगण्यापेक्षा आई वडिलांच्या अपूर्ण स्वप्नांच्या अपेक्षांचे ओझे वाहणारी गाढवे आठवतात.

यापेक्षा मध्यमवर्गीय आईबापांना आपल्या मुलाच्या भवितव्याबद्दल वाटत असलेली असुरक्षितता हे मूळ कारण आहे.
कुटुंबसंस्थेचे विकेंद्रीकरण(विभक्त कुटुंबपद्धती), जवळच्या नातेवाईकांच्या मदतीची कमतरता(प्रत्येक कुटुंबाच्या स्वतंत्र विवंचना), स्वत्व (अहंकार) जपण्याची इच्छा( थत्तेंच्या वरील प्रतिसादाप्रमाणे वार लावून जेवणे अपमानास्पद वाटणे इ.), शिक्षणाचे वाढते खर्च अशा अनेक (नव्या)भानगडींमुळे ही असुरक्षितता जन्म घेते.त्यामुळे पालकांना आपली मुले 'इसपार या उसपार' होणार अशी भीती वाटत असते. त्याचा मोठा बाऊ ते करतात. त्यात केवळ त्यांच्या अपूर्ण स्वप्नांचाच विचार असतो असे नाही. थोडाफार सहभाग असतो.
'आम्हाला इतक्या सोयीसुविधा मिळाल्या असत्या तर आम्ही असे असे केले असते' या स्वरूपाची वाक्ये ऐकू येतात. नाही असे नाही. पण त्या सोयीसुविधा मुलांना देण्यामागे पालकांच्या महत्त्वाकांक्षेपेक्षा असुरक्षितता हे मुख्य कारण असावे असे वाटते.

वयानुरूप

>> आपल्या वयाला न शोभणारे कामुक हावभाव करणारी पोरे पाहिली

हा हा हा. आपल्या वयाला न शोभणारी गाणी आणि श्लोक म्हणणारी पोरे पाहिली.....
कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर....बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले, वृद्धपणी देवा आता... हे सात आठ वर्षांच्या मुलाच्या तोंडून ऐकायला कसं वाटतं?

किंवा अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रित: हे कसं वाटतं?

नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)

हाहाहा

कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर....बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले, वृद्धपणी देवा आता... हे सात आठ वर्षांच्या मुलाच्या तोंडून ऐकायला कसं वाटतं?

विनोदी वाटतं. ;-) बिचारी पोरे बहुधा या गोष्टींचा त्याचा अर्थ न समजताच कामे करत असतात.

अवांतरः मागे कुठल्याशा एका स्थानिक कार्यक्रमात एका मुलाला "जिंदगी देने वाले सुन, तेरी दुनियासे दिल भर गया" हे गाणे गायचे होते आणि त्याला काहींनी वरील कारणावरून (वयाला न शोभणारी गाणी ) नापसंती दाखवली होती असे आठवले.

 
^ वर