प्रौढावस्थेतील मेंदू

मेंदूच्या वाढीतील वेगवेगळे टप्पे (4)
प्रौढावस्थेतील मेंदू
आपण आता गद्धे-पंचविशीचा उंबरठा ओलांडून बाहेर पडत आहोत. आपला मेंदू पूर्ण आकारानिशी तयार होऊन या अवस्थेत प्रवेश करत आहे. जे काही मौजमजा करायचे ते दिवस संपत आले आहेत. मेंदूची कमाल शक्ती व कमाल क्षमता वयाच्या बावीसाव्या वर्षापासून सत्ताविसाव्या वर्षापर्यंत - जेमतेम पाच वर्षे - टिकून असते. त्यानंतरचा काळ मात्र मेंदूच्या क्षमतेच्या उतरंडीचा काळ असतो. सत्ताविसाव्या वर्षापासून प्रौढावस्था संपेपर्यंत आपल्यातील एकेक क्षमता हळूहळू वेगवेगळ्या दराने (rate) कमी कमी होऊ लागतात. काही क्षमता अस्तंगत होण्यासाठी 8-10 वर्षे लागत असल्यास इतर काहींना 20-25 वर्षे लागतील. कुठल्या क्षमतेचा पहिला क्रमांक व कुठल्याचा शेवटचा हे निर्दिष्ट नसले तरी निर्णय प्रक्रिया, निर्णय नियोजन, समन्वय या प्रकारच्या क्षमता - जे मुळातच शेवटी शेवटी प्रगल्भ झालेले आहेत - त्याच इतर क्षमतांच्या आधी उतरंडीच्या मार्गाला लागतात. या क्षमता अग्रमस्तिष्क (frontal lobe) व temporal cortex मध्ये 20 व्या वर्षी प्रगल्भ होत असल्या तरी त्याच आधी क्षीण होऊ लागतात. मेंदूतील स्मृतीपटलाचा episodic memory हा भाग आपल्या आठवणींना उजाळा देत असतो. मात्र प्रौढावस्थेतच आठवणींची उजळणी करण्याची क्षमता जास्त तीव्रतेने क्षीण होऊ लागते. कारण मेंदूचा प्रक्रियावेगच कमी कमी होऊ लागतो. त्यामुळे स्मृतीपटलात जास्त माहितीचा संग्रह होऊ शकत नाही.

परंतु क्षीण होण्याचा हा दर मोजता येईल का? स्मृतीदोष (dimentia) असलेल्या रुग्णांच्या तपासणीसाठी संशोधकांनी काही चाचण्यांची रचना केली आहे. त्यात प्रामुख्याने गणीतीय, भाषिक व इतर काही मूलभूत कौशल्यांची क्षीणता मोजली जाते. ही एक 30 गुणांची चाचणी असून जर रुग्णाला 30 गुण मिळाल्यास त्याच्यात स्मृतीदोष नक्कीच आहे असे समजले जाते. याच चाचणीचा आधार घेत क्षीणतेचे मापन केल्यास प्रत्येक दहा वर्षाला 1 गुण याप्रमाणे क्षीणता वाढत जाते, असे तज्ञांचा कयास आहे. पाचापेक्षा जास्त गुण मिळाल्यास स्मृतीदोषाची सुरुवात झाली असे वैद्यकीय तज्ञांचे मत आहे.

हे सर्व वाचत असताना या सर्व गोष्टींना नाकारण्याकडे आपला कल असला तरी काही सकारात्मक व उत्साहवर्धक गोष्टी पण याच काळात मेंदूच्या संबंधात घडत असतात. प्रौढावस्थेत क्षीण होत जाणाऱ्या क्षमता सामान्यपणे आपल्या प्रवाही बुद्धीमत्तेवर (fluid intelligence) निर्भर असतात. प्रवाही बुद्धीमत्तेबरोबरच आपल्या मेंदूत स्फटिक बुद्धीमत्ता (crystallised intelligence) पण असते. प्रवाही बुद्धीमत्ता मेंदूतील प्रक्रियेच्या वेगानुसार बदलत जाते. प्रक्रिया वेग कमी झाल्यास प्रवाही बुद्धीमत्तेचा वेग पण कमी होतो. परंतु त्याच काळी आपल्यातील 'शहाणपणा'ला स्फटिक बुद्धीमत्ता टिकवून ठेवते. जसजशी प्रवाही बुद्धीमत्ता क्षीण होत जाते तसतशी स्फटिक बुद्धीमत्ता - काही ठराविक मितीपर्यंत - वाढत जाते. वयोमानाप्रमाणे एका बाजूने प्रवाही बुद्धीमत्तेची उतरंड व दुसऱ्या बाजूने स्फटिक बुद्धीमत्तेतील वाढ असे होत होत वयाच्या सत्तरीत या बुद्धीमत्ता एकमेकांना छेद देतात.
म्हणूनच या वयात मानसिक व शारीरिकरित्या कार्यक्षम असणे, उत्साह टिकविणे, समतोल व योग्य आहारसेवन करणे, व्यसनमुक्त असणे, मन बदलणाऱ्या औषधांच्या माऱ्यापासून (mind altering drugs) स्वत:चा बचाव करणे, अत्यंत गरजेचे ठरतील. याच निकषावरून आपण आपली जीवनशैली विकसित केल्यास प्रौढावस्थेतील मेंदूच्या या अनियंत्रित क्षीणतेविषयी जास्त मनस्ताप करून घेण्याची गरज भासणार नाही. परंतु काही कारणामुळे या गोष्टी न जमल्यास वृद्धावस्थेतील मेंदू आपल्यात बदल घडवून आणण्यासाठी अजून एक (शेवटची!) संधी तुम्हाला देते.
(कार्ल सॅगन यांची मेंदूच्या रचनेसंबंधीची ही चित्रफीत वाचकांना नक्कीच आवडेल.)

Comments

छान लेखमाला

मोजक्या शब्दात, सहज भाषेत व कालानुक्रमे लिहिलेली माहिती आवडली. काही प्रश्न...
१. प्रवाही व स्फटिक बुद्धिमत्तेत नक्की फरक काय?
२. "मेंदूचा ९०% भाग आपण वापरत नाही" असा गैरसमज असतो. याविषयी काही स्पष्टीकरण द्यावं असं वाटतं.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

असेच म्हणतो

असेच म्हणतो
प्रकाश घाटपांडे

प्रवाही व स्फटिक बुद्धिमत्ता

मानसतज्ञांच्या मते प्रवाही व स्फटिक बुद्धिमत्ता सर्वसामान्य बुद्धिमत्तेचेच प्रकार आहेत. प्रवाही बुद्धिमत्ता गोंधळलेल्या स्थितीतून मार्ग शोधण्याच्या, समस्यांना उत्तरं शोधण्याच्या प्रयत्नात कामी येते. आपल्याला मिळालेल्या ज्ञानाव्यतिरिक्त काही संकल्पनामधून अर्थ शोधण्याची ही क्षमता असते. प्रवाही बुद्धिमत्तेचे प्रमाण ऑटिजम् वा आत्मरत असणाऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात आढळते.
कुशलता, ज्ञान व अनुभव यांच्या मिश्रणातून तयार झालेल्या बुद्धिमत्तेला स्फटिक बुद्धिमत्ता असे म्हटले जाते. परंतु हा शहाणपणा म्हणजेच स्मरण वा ज्ञान नव्हे. आपल्या स्मृतीला जास्तीत जास्त ताण देवून मिळालेल्या माहितीचा पुरेपूर वापर या बुद्धिमत्तेत केला जातो.
बुद्ध्यांकाच्या चाचणीत या दोन्ही प्रकारच्या बुद्धिमत्तेचे मापन केले जाते. प्रवाही बुद्धिमत्ता प्राप्त परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी कारणीभूत ठरते. स्फटिक बुद्धिमत्ता मात्र मिळत असलेली माहिती व ज्ञान यावर निर्भर असते. लहान मुलाचे बेरीज शिकणे हे स्फटिक बुद्धिमत्तेचे लक्षण ठरते. त्यावेळी नवीन शिकण्याच्या, समजून घेण्याच्या क्षमतेत - त्याच्या प्रवाही बुद्धिमत्तेत - फरक पडत नाही.
याविषयीची सविस्तर माहिती विकिपिडियाच्या या लिंकवर मिळू शकेल.
टेन पर्सेंट मिथ वर एक वेगळाच लेख लिहिण्याचा विचार आहे. (बघूया कधी जमेल ते!)

 
^ वर