लघुपट महोत्सव


लघुपट महोत्सव


पुण्यात फिल्म व टेलिव्हिजन इन्स्टीट्युट ऒफ इंडिया तथा एफ टी आय आय ही एक नावाजलेली संस्था आहे. तिथे १० व ११ एप्रिल २०१० ला मानवी विकास या विषयावरील विविध प्रादेशिक लघुपट दाखवण्यात आले.निमित्त होते ते संस्थेच्या गोल्डन ज्युबिली वर्षाचे. दोन दिवसात त्यांनी २६ लघुपट दाखवले. हे लघुपट संस्थेच्या आजी व माजी विद्यार्थ्यांनी तयार केलेले होते. या महोत्सवाच्या उपक्रमाचे समन्वयक होते मिलिंद दामले. अशा ठिकाणी मराठी नाव असल कि जरा बरच वाटत.लघुपटातुन मानवी विकासाच्या टप्प्यातील वेगवे्ळ्या सामाजिक समस्या व त्याची हाताळणी दाखवलेली गेली. महोत्सवाला वेगवेगळ्या सामाजिक संस्था तसेच संवेदनशील नागरिकांना बोलावले होतेच. आता आम्ही पण त्यात मोडत असल्यामुळे आम्ही गेलोच होतो. अशा कार्यक्रमांना करमणुक मुल्य नसुन प्रबोधन मूल्य असते त्यामुळे येण्याचा लोकांचा कल नसतो. वेगवेगळ्या प्रादेशिक भाषा असल्या तरी सबटायटल इंग्रजीत असल्याने ते सोयीच होत. अर्थात आमच्या सारख्या माणसाला सबटायटल वाचे पर्यंत दृष्य निघुन जाते व दृष्य बघायला गेलो कि सबटायटल वाचायचे राहुन जाते. ही अडचण आमची नेहमीचीच आहे. पण त्यातल्या त्यात तोल सांभाळत आम्ही बरेचसे लघुपट पाहिले. अनंत कलाकार हा राजस्थानी लघुपट पारंपारिक लोककला क कलाकारांचे जीवनाविषयी भाष्य करणारा होता. बींदनी हा राजस्थानातील बालविवाहाच्या प्रथेवर होता. भांग गरा हा
बंगाली गंगेतील बेटावरील आदिवासी जीवन, त्यांच्या समस्या व बेटाची धुप यावर होता. आईज वाईड ओपन हा कन्नड लघुपट यल्लमा देवीला सोडणार्‍या कुमारिका, देवदासी प्रथा व तेथील जाती व्यवस्था यावर होता. मक्काला पंचायत हा ही कन्नड लघुपट मुलांनी निर्माण केलेल्या स्थानिक स्वराज्ज संस्थेच्या प्रयोगावर होता. स्टोरीज फ्रॉम सॉल्ट पॅन हा तमिळ लघुपट तेथील स्थानिक मीठागार कामगारांच्या समस्यांवर होता. ट्विलाईट हा मल्याळम लघुटाने संध्या छाया भिवविती हृदया ची प्रचीती देउन अंगावर काटा उभा केला. महोत्सवात तीन मराठी लघुपट होते. ते जरा आपले वाटले कारण सबटायटल वर लक्ष केंद्रित करावे लागत नव्हते. गाज ह आपले विहिर वाले उमेश कुलकर्णी यांचा स्थानिक मच्छिमारांचा जागतिकि करणाच्या रेट्यात झालेली फरपट दाखवणारा होता. माझी साखर शाळा हा मिलिंद दामल्यांचा उसतोडणी कामगारांच्या मुलांच्या शैक्षणिक समस्या दाखवणारा उत्तम लघुपट.अशासकीय संस्थांच्या माध्यमातुन केलेले प्रयत्न व त्याची परिणामकारकता ही उत्तम मांडली आहे. मुलांच्या यशात आपले समाधान मानणारी उसतोडणी कामगार आई डोळ्यात पाणी आणते. मिलिंद दामलेंनी दिग्दर्शित केलेले हम पढे हम बढे व जीवनगान हे हिंदी लघुपट ही दाखवले होते पण आमच्या लक्षात राहिला तो साखरशाळा. अनिल झणकरांचा
पुनर्जन्म हा लघुपट सातारा पुणे व सोलापुर जिल्ह्यातील धरण व प्रकल्पग्रस्तांच्या समस्या त्यातील सामाजिक व राजकीय संघर्ष व तड्जोड दाखवणारा आहे.कुठलीही काळीपांढरी बाजु न दाखवता पुनर्वसनातील वेगवेगळे पैलू लोकप्रतिनिधींचा सकारात्मक भाग ही दाखवला आहे. रोड ब्लॉक हा वाहतुकीच्या प्रश्नावर आपला वाटणारा विजय लेले यांचा लघुपट. विकास आराखड्यांकडे लक्ष न दिल्याने नागरी नियोजनातुन आलेल्या त्रुटी यावर प्रकाश झोत आहे. सार्वजनिक वाह्तुक व्यवस्था सक्षम करणे यावर भर दिला पाहिजे हा लघुपटाचा रोख.

मिलिंद दामले यांनी एक चांगली समयोचित गोष्ट केली ती म्हणजे दोन्ही लघुपटानंतर दिग्दर्शक अनिल झणकर व विजय लेले यांचा प्रेक्षकांशी संवाद घडवुन आणला.
या लघुपट महोत्सवानंत आमच्या मनात आलेला एक प्रश्न मिलिंद दामलेंना विचारायचा राहिलाच तो म्हणजे या लघुपटांच पुढ काय होत?

Comments

माहितीबद्दल आभार

फार छान माहिती मिळाली. या लघुपटांच्या फिती कुठे मिळतील?

माहित नाही

माझ्या पहाण्यात अशा फिती महोत्सवातच पहायला मिळतात. खरतर त्या इतरवेळीही उपलब्ध असायला हव्यात. मी एफटी आय आय शी संपर्क करुन पाहतो.
प्रकाश घाटपांडे

धन्यवाद

तुम्हाला सहज कळले तर मलाही सांगा.

छान

छान. तुमची मुशाफरी पाहिली की लवकर रिटायर्ड व्हावेसे वाटु लागले आहे ;)

बाकी, यल्लमा देवीला सोडलेल्यांना जोगतीण / जोगते म्हणतात. यात बायका केसांना वडाचा चिक लावतात व पुरुष स्त्रीवेष धारण करतात व रोज यल्लमादेवीच्या नावे घरोघरी जोगवा मागून पोट भरतात. याविषवर नुकताच आलेला "जोगवा" हा वास्तवदर्शी (राष्ट्रीय पुरस्कार व अनेक फ्लिल्म फेस्टीवल विजेता) चित्रपट पहाण्यासारखा आहे.

ऋषिकेश
------------------
भ्रष्टाचार संपविण्याचा सर्वोत्तम आणि सर्वात सोपा(?) उपाय म्हणजे त्यात स्वतः सहभागी न होणे

 
^ वर