होमिओपथी : वैयक्तिक अनुभव २

     साधारणतः आठवीत असल्यापासूनच मला सांधेदुखीचा त्रास होत असे. यावर उपचार म्हणून मी अनेक वेगवेगळ्या औषधयोजना वापरुन पाहिल्या, कारण कोणत्याच पद्धतीचा मला उपयोग होत नव्हता. आयुर्वेदवाले यावर आमवात म्हणून उपचार करत होते. अलोपथीवाले याला ह्रुमॅटिझम समजून चालले होते. काहीजण स्टेरॉईडसच्या गोळ्या औषध म्हणून देत होते.
    शेवटी २००३ च्या डिसेंबर महिन्यात मी होमिओपॅथीचे उपचार घेण्यास सुरुवात केली. (आजाराच्या अगदी सुरुवातीच्या दिवसात ते घेऊन झालेलेच होते आणि तेव्हा त्यांचा काहीच उपयोग झालेला नव्हता.) त्यामुळे होमिओपथी उपचारांची ही दुसरी वेळ होती. आमच्या एका परिचितांना पिंपरी चिंचवडमधील एका प्रसिद्ध होमिओपॅथी डॉक्टरचा अतिशय उत्तम गुण आलेला होता. या डॉक्टरांचे नाव निकम असून काहीजणांना ते माहित असण्याची शक्यता आहे. त्यांनी एक हॉस्पिटलच थाटलेले असून इथे रुग्णाला ऍडमिट करुन होमिओपॅथीचे उपचार दिले जातात. अगदी लांबून लांबून रुग्ण याठिकाणी उपचार घेण्यासाठी येतात. मी स्वत: तिथे असताना असे अनेक रुग्ण बघितले.
    नेहमीप्रमाणे शिकाऊ डॉक्टरांनी माझी केस हिस्टरी जाणून घेतली. आणि नंतर मुख्य डॉक्टरांनी माझी जवळजवळ झोपेत तपासणी केली. म्हणजे मी झोपेत नव्हतो तर खुद्द डॉक्टरच झोपेत होते. कारण त्यावेळेस पहाटेचे दोन वाजलेले होते आणि या रुग्णालयात येणार्‍या रुग्णांची संख्याच इतकी आहे की अक्षरश: पूर्ण रात्रभर, पहाटेही ते रुग्णांना तपासत असतात. माझ्यावेळेस ते पूर्णपणे पेंगत होते. मध्येच जाग आली की ते मला प्रश्न विचारत असत आणि परत पेंगायला लागत असत.
    त्यानंतर या अभूतपूर्व तपासणीनंतर त्यांनी दिलेली औषधे मी पूर्णपणे ८० दिवस घेतली. मला या औषधांनी काडीचाही गुण आला नाही. तेथील बरेचजण असे म्हणत की गुण येण्यापूर्वी दुखणे जरा वाढते, ताप वगैरे येतो. माझ्या बाबतीत मला असे काही आढळले नाही. उलट तिथे एवढे दिवस ऍडमिट होऊन राहिल्याने चालणे वगैरे कमी होऊन माझे दुखणे अजूनच वाढले.
    शेवटी कंटाळून आम्ही ते उपचार बंद करण्याचा निर्णय घेतला. विनाकारण पैसे वाया गेल्याचे दु:ख होतेच शिवाय आजारही अजूनच वाढला होता.

    तर मग होमिओपॅथीचा खरंच उपयोग होतो की नाही? मला तरी तो झालेला नसला तरी त्या दवाखान्यात दाखल असताना अनेक रुग्णांना अगदी चमत्कार वाटावा इतपत गुण आल्याच्या अनेक कथा मी ऐकल्या होता. अर्थात मी तिथे दाखल असताना स्वत:हून एवढा फरक पडल्याचे सांगणारा एकही रुग्ण मला दिसला नाही. बहुतेकांना गुण येऊन ते तिथून निघून गेलेलेच होते. :-) विशेष म्हणजे हे रुग्णालय इतके प्रसिद्ध आहे की मी तिथे असतानाच एका कोणत्यातरी कार्यक्रमात या दवाखान्याची माहिती देण्यासाठी शूटिंग चालू होते आणि विविध रुग्णांना त्यांचे अनुभव विचारुन त्याचे छायाचित्रण चालू होते. मला काडीइतका फरक पडलेला नसल्याने मी अर्थातच या प्रकाराला नकार दिल्याचे मला आठवते.
पुढे माझा आजार अजूनच वाढला. त्यावेळेस माझे खुब्याचे सांधे अगदी जखडल्यातच जमा झालेले होते. सरतेशेवटी पुण्यातल्या संचेती रुग्णालयात तपासणी करुन घेतल्यावर दिसणार्‍या लक्षणांवरुन त्यांनी विविध रक्ताच्या तपासण्या करायला लावल्या. त्यातील एक चाचणी HLA-B27 चा निकाल पॉझिटिव्ह आला आणि डॉक्टरांनी Ankylosing Spondylitis चे निदान केले. त्यानंतर योग्य ते अलोपथीचे उपचार सुरु झाले आणि त्यांनी मला बराच फरक पडला.
कालांतराने २००७ मध्ये मला Bilateral THR चे देखील ऑपरेशन करावे लागले आणि सध्या रोजचा बंधनकारक व्यायाम आणि अलोपथी औषधोपचाराने माझे दुखणे बहुतांश नियंत्रणात आहे. इथे प्राणायामाला देखील त्याचे श्रेय मी देऊ इच्छितो. अनुलोम विलोम प्राणायामाच्या नियमित अभ्यासाने मला लक्षणीय सुधारणा जाणवली आहे.
    त्यामुळे माझा तरी होमिओपॅथीवर बिलकुल विश्वास नाही. आजही माझ्या आजाराच्या उपचारातले ते अतिशय महत्त्वपूर्ण ८० दिवस मी का घालवले असे मला राहून राहून वाटते. माझ्यावर उपचार करणार्‍या डॉक्टरांच्या होमिओपॅथीच्या पात्रतेविषयी शंका घेण्यास वाव असला तरी या पद्धतीची अनिश्चितताच इतकी आहे की काही जणांना त्याचा उत्तम गुण येतो आणि काहींना बिलकुलच येत नाही. मग अशा पद्धतीला शास्त्र कसे म्हणावे? अर्थात हे माझे वैयक्तिक मत आहे. शिवाय माझ्या आजारावर आजपर्यंत तरी नियमित व्यायामाशिवाय कोणताही खात्रीलायक उपाय सापडलेला नाही. निदान ऍलोपथीला तरी. म्हणून होमिओपॅथीलाही तो सापडू नये असे असायचे कारण नाही.
    ज्याने त्याने आपापल्याला योग्य वाटेल ते करावे हे प्रियाली यांचे आवडते विधान इथे लक्षात घेण्यासारखे आहे. :-)
    म्हणून प्रत्येकाने उपचार घेऊन बघावेत आणि त्यानंतर आपापले मत बनवावे. (असे म्हटले तरी "अनुभवाचा कंगवा हाती आल्यावर माणसाला टक्कल पडलेले असते" असेही मी कालपरवाच कोणत्यातरी पुस्तकात वाचले. :-)
असो. मला काय म्हणायचे आहे बहुतेकांच्या लक्षात आले असेल अशी आशा करतो.

-सौरभदा

    अनुभवाचा कंगवा - कृपा करुन तुम्ही असे विधानच कसे केले, तुम्ही याला दुजोरा देता काय, फलाण्याच्या वापराला प्रोत्साहन देता काय आणि ही जाहिरात आहे काय अशा अंगांनी चर्चेला वळण देऊ नये. माझे मत मी वर स्पष्ट शब्दात दिलेलेच आहे. इतर काही माहिती हवी असल्यास ती देण्यास माझी हरकत नाही.

Comments

या

अनुभवानंतर पारडे ब्यालन्स झाले बहुतेक. :)

तुमची भूमिका तुमच्या अनुभवाशी सुसंगतच आहे. अनुभवकथन आणि भूमिकेतील प्रामाणिकपणा आवडला.

---
"भाई बनना है तेरेको?" -- भिकू म्हात्रे

मुद्देसुद अनुभव कथन..

नीट मुद्देसुद अनुभव कथन..
अर्थात जसे पहिल्या अनुभवामागे होमियोपथी शास्त्र आहे हे सिद्ध करणे नसून त्याचा लेखकाचा गुण आला हा अनुभव सांगणे होते.. तसेच ह्याही अनुभवावरून होमियोपथी शास्त्र नाहि हे सिद्ध करणे नसून त्याचा गुण आला नाहि हा अनुभव सांगणे आहे हे स्पष्ट आहे.

ऋषिकेश
------------------
भ्रष्टाचार संपविण्याचा सर्वोत्तम आणि सर्वात सोपा(?) उपाय म्हणजे त्यात स्वतः सहभागी न होणे

हेच म्हणतो

अगदी हेच म्हण्तो
प्रकाश घाटपांडे

वा! वा!

या प्रतिसादाला दोन्ही चर्चांचे तात्पर्य म्हणता येईल. आख्खा लेख न वाचता हे विधान वाचले तरी चालेल.

अनुभव आवडला

अनुभव आवडला. एखाद्या उपचारपद्धतीने गुण आला नाही हे व्यवस्थित आणि योग्य शब्दांत सांगितले आहे.

ज्याने त्याने आपापल्याला योग्य वाटेल ते करावे हे प्रियाली यांचे आवडते विधान इथे लक्षात घेण्यासारखे आहे.

संकेतस्थळावरील एकाला तरी ते पटले आहे याबाबत धन्यवाद. :-)

अवांतरः

नेहमीप्रमाणे शिकाऊ डॉक्टरांनी माझी केस हिस्टरी जाणून घेतली. आणि नंतर मुख्य डॉक्टरांनी माझी जवळजवळ झोपेत तपासणी केली. म्हणजे मी झोपेत नव्हतो तर खुद्द डॉक्टरच झोपेत होते. कारण त्यावेळेस पहाटेचे दोन वाजलेले होते आणि या रुग्णालयात येणार्‍या रुग्णांची संख्याच इतकी आहे की अक्षरश: पूर्ण रात्रभर, पहाटेही ते रुग्णांना तपासत असतात. माझ्यावेळेस ते पूर्णपणे पेंगत होते. मध्येच जाग आली की ते मला प्रश्न विचारत असत आणि परत पेंगायला लागत असत.

हे तर भारीच आवडले. :-) एकदा आमच्या आजीला वयोमानानुसार बरे नसल्याने बाबांनी डॉक्टरांना फोन केला. तो डॉक्टर काकूंनी उचलला (काकू डॉक्टर नव्हत्या पण डॉक्टरांच्या अर्धांगिनी तर होत्या) आणि म्हणाल्या "अहो हेच मलेरियाने आजारी आहेत मीच दुसर्‍या डॉक्टरांना फोन करून यांना बघायला विजिटला बोलावले आहे."

चांगला अनुभव

श्री. सौरभदा

अनुभव आवडला.

- आजानुकर्ण


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

+१

श्री आजानुकर्ण यांच्याप्रमाणेच म्हणतो.

________________________________
माझा प्रतिसाद या मार्गदर्शक सूचनांशी सुसंगत आहे का? नसल्यास कृपया खरड अथवा व्यनिने कळवा.

धन्यवाद...

अनुभव आवडला हे प्रतिसाद मी 'अनुभवकथन आवडले' अशा पद्धतीने वाचले. कारण अनुभव खूपच खर्चिक पडला. :-(

डोळे उघडीले भौ

जे खरं हाय ते चांगलं लिव्हलं भो.

ह्याला काय वाटतं आणि त्याला काय वाटेल याचा इचार करायमधी आपून टैम नै घालीत फटकन लिहून मोकळं !

बाबूराव :)

अनुभवकथन आवडले

अनुभवकथन आवडले.

असेच म्हणतो

>>अनुभवकथन आवडले.

-दिलीप बिरुटे

+१

अनुभवकथन आवडले. पण वैयक्तिक अनुभव निष्कर्ष काढण्यास उपयोगाचा नाही.

नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)

गोंधळ

होमिओपॅथीबद्दल मनात गोंधळ होताच; सलग दोन लेख वाचून तो वाढला. तूर्त तरी ऍलोपॅथीची वाट सोडू नये या निष्कर्षाप्रत आलो आहे.
अवांतरः या निकम डॉक्टरांबद्दल खूप ऐकले आहे. ते एच आय व्ही, कॅन्सर वगैरेंचे रोगी बरे करतात वगैरे. हा लेख वाचून ऐकलेले सगळे त्याच्या 'फेस व्हॅल्यू' वर घेऊ नये असे वाटते.
सन्जोप राव
इलाही ये तूफान है किस बला का
के हाथोंसे छूटा है दामन हया का

अनुभव खतरा आहे

तुमचा अनुभव खतरा आहे!
झोपेत रोग निदान वगैरे तर तूफान आहे...
आणि तुम्ही ते करून घेतले?

तेव्हाच जागे करायचे त्या वैद्याला...

शिवाय रात्रीची झोप त्यांना नव्ह्ती, म्हणजे
दुसर्‍या दिवशी दिवसा झोप आलीच असणार,
मग त्या रोग्यांचे काय होत असेल त्यांचे तेच जाणोत!

एखाद्या डॉक्टरने अशा प्रकारे किती रोगी पाहावेत
याला काही वैद्यकीय संहीता नसते काय?

जसे आमच्या यष्टी डायवरला एका वेळी ८ तासच बस चालवता येते तसे काही तरी.

'गूण न आल्यास पैसे परत' अशी वैद्यकीय योजना सुरु करायला पाहिजे असे वाटून गेले... ;))
पण वाया गेलेल्या वेळाचे काय करायचे हा प्रश्न उरतोच!

आपला
गुंडोपंत

ह्म्...

मी हे उपचार का करुन घेतले असा प्रश्न कुणीतरी आधीच विचारेल असे मला वाटले होते. शेवटी तुम्ही तो विचारला.

माझा हे उपचार घेण्याला पूर्ण विरोध होता. पण माझे कुणीच ऐकले नाही. शिवाय तोपर्यंत मला कोणत्याच औषधयोजनेने फरक पडत नसल्याने 'मी कोणतेच औषधोपचार पूर्ण करत नाही मग आजार कसा बरा होणार?' असे बर्‍याच जणांचे (माझा काही दोष नसतानाही) मत बनले होते. शिवाय हे रुग्णालय घरापासून इतके लांब असल्याने एकदा तिथे दाखल झाल्यावर खरी परिस्थिती कळूनही लगेच परत येणे शक्य नव्हते.

ही शक्यता ध्यानात आली नाही

या माहितीमुळे मला वाईट वाटले.

हे इंटरेष्टींग आहे, बरं का!

माझा हे उपचार घेण्याला पूर्ण विरोध होता.

हे वाक्य फार फार इंटरेष्टींग किंवा महत्त्वाचे आहे बरं का!

आपले शरीर आपल्या मनापासून आलेल्या इच्छेला नक्की प्रतिसाद देते,
असा माझा समज आहे.

(मनापासून आलेली इच्छा कोणती, आणि ती कशी मोजायची,
याची कोणतीही साधन सामुग्री 'माझ्याकडे' नाही.
मी फक्त माझीच इच्छा मनापासून होती की नाही हे कधी कधी सांगू शकतो.
पण या संदर्भात सेल्फ डिक्लरेशन ग्राह्य धरता यावे.)

मला वाटते की जर आरागॉर्न यांची उपचार घेण्याची इच्छा असेल तर तुमच्या आणि त्यांच्या उपचाराच्या परिस्थितीला, शरीराने उत्तर कसे द्यायला हवे, याच्या वैयक्तीक अपेक्षेमध्ये फरक पडतो आहे.

आपले शरीर आपल्या मनापासून आलेल्या इच्छेला नक्की प्रतिसाद देते,
(या माझ्या वैयक्तीक समजानुसार,) उपचारांचा प्रतिसाद आपल्याला मिळाला आहे,
असे मानायला जागा असू शकते.

असो,
मला वाटते की,
आपापल्या दैवताशी संवाद साधणे ही जशी अत्यंत वैयक्तीक बाब असते,
तसेच डॉक्टर आणि औषधोपचारां विषयी पण असते/असावे.

एखाद्या वैद्याने झोपेत रोग निदान / उपचार करण्या विषयी मात्र माझे अतिशय स्पष्ट आक्षेप आहेत!

आपला
गुंडोपंत

दैवताशी संवाद साधणे यात देव, धर्म, पूजेचा प्रकार आदीचांचा काहीही संबंध नसू शकतो!

सहमत

सहमत आहे. माझ्या बाबतीत उपचार सुरू केल्यापासून माझी भूमिका सकारात्मक होती. याशिवाय माझे उपचार ज्यांनी केले त्यांना मी मावशी म्हणत असे. त्या हे उपचार केवळ दुसर्‍यांना मदत या भावनेतून करत असत, याबद्दल त्यांनी माझ्याकडून एक कपर्दिकही घेतला नाही.

याखेरीज मी एकदा गेलो, त्यांनी औषध दिले आणि झाले असे नव्हते. मी प्रत्येक आठवड्याला त्यांच्याकडे जात होतो आणि त्या माझ्या प्रगतीनुसार औषधांमध्ये बदल करत असत. होमिओपथीखेरीज मी बाराक्षारही घेत होतो. तसेच उपचाराआधी त्यांनी रक्त वगैरे तपासण्याही करून घेतल्या होत्या. एकूणात सौरभ आणि माझ्या अनुभवांमध्ये डॉक्टरांचा अनुभव बघता माझ्या बाबतीत डॉक्टरांची इन्वॉल्वमेंट त्यांच्या बाजूने १००% होती असे म्हणायला हरकत नाही.

---
"भाई बनना है तेरेको?" -- भिकू म्हात्रे

असे नाही बहुधा...

माझे होमिओपॅथी बद्दलचे मत इतके प्रतिकूल नंतर झाले आहे. त्यावेळेस ते तसे नव्हते. त्यावेळेस मला होमिओपॅथी उपचार नको होते असे नाही तर इतक्या लांबच्या दवाखान्यात केवळ कुणाला तरी गुण आला म्हणून जायचे मला पटत नव्हते. शिवाय होमिओपॅथीचे रुग्णांना दाखल करुन घेणारे रुग्णालय ही कल्पनाच मला विचित्र वाटत होती.

सुरुवातीला जरी मी साशंक असलो तरी नंतर मला काही फरक पडतोय का हे मी बारकाईने बघत होतो. मात्र डॉक्टरांनी त्यांच्या बाजूने १००% योगदान दिलेले नव्हते असे नक्कीच म्हणता येईल. एक प्रकारचे उपचार चालत नाहीत असे दिसल्यावर त्यांनी औषधांमध्ये बदल केल्याचे मला आठवत नाही.

पॉपिन्ज़च्या गोळ्या अधिक बऱ्या!

असा अनुभव कुणाच्याही वाट्याला न येवो ! आम्हाला सांगितल्याबद्दल धन्यवाद. होमीपदीवाल्यांच्या गोड गोळ्या खाण्यापेक्षा लिमलेट, पेप्परमिंट, पॉपिन्ज़च्या गोळ्या अधिक बऱ्या. आणि तुम्हाला दीर्घायुरारोग्यासाठी शुभेच्छा.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

अवांतर:
तुमचा ब्लॉग छान आहे.

पण....

प्रतिसादाबद्दल धन्यवाद.... ब्लॉग आवडल्याचे कळवल्याबद्दलही!

आणि तुम्हाला दीर्घायुरारोग्यासाठी शुभेच्छा.

वय वर्षे २३ चालू आहे. तरीही हरकत नाही. :-)

त्याला इलाज नाही

मंडळी हे सगळे वाचून माझ्या डोक्याचा भुगा झाला
आणि मला ही कविता आठवली.
--------------------------------
तत्त्वज्ञ आणि द्रष्टे खंडून एकमेकां
कथिती विरुद्ध गोष्टी ; त्याला इलाज नाही.

तें भूत संशयाचे ग्रासून निश्चितीला
छळते भल्याभल्यांना; त्याला इलाज नाही

विज्ञान ज्ञान देई; निर्मी नवीन किमया;
निर्मी न प्रेम शांती; त्याला इलाज नाही

...

ज्यांना अनेक छिद्रे असल्याच सर्व नावा;
निर्दोष ना सुकाणू; त्याला इलाज नाही

वॄद्धपकाल येता जाणार तोल थोडा;
श्रद्धा बनेल काठी! त्याला इलाज नाही.

कवि - विंदा करंदीकर (मौज १९९९)

आपला
गुंडोपंत

प्लासिबो

प्लासिबोवर एक चांगला लेख आत्ताच वाचनात आला.

दुवा

---
"भाई बनना है तेरेको?" -- भिकू म्हात्रे

होमिओपथी इन ऍक्शन!

वसुलि
वसंत सुधाकर लिमये

 
^ वर