पौगंडावस्थेतील मेंदू

मेंदूच्या वाढीतील वेगवेगळे टप्पे (3)
पौगंडावस्थेतील मेंदू
माणसाच्या आयुष्यातील पौगंडावस्थेचा कालखंड अत्यंत संवेदनाशील असा मानला जातो. तारुण्याच्या उंबरठ्यावरील हा काळ म्हणजे बेजवाबदार, अविवेकी, त्रासदायक, अत्युत्साही, असा समजला जातो. परंतु माणसांच्या मेंदूत 'जे काही घडते' ते याच काळात घडत असते व तेच माणसातील गुण-दोषांचे मूळ कारण असावे. या अवस्थेत मेंदूची पूर्ण वाढ झालेली असली तरी 'वायरिंग'च्या जोडणीचे काम अजूनही चाललेले असते.

मानसतज्ञांच्या मते पौगंडावस्थेतील क्लेशदायक गुणविशेषांसाठी त्या काळात उत्पन्न होणाऱ्या लैंगिक संप्रेरकांना (sex harmones) जवाबदार धरायला हवे. या काळात मेंदूच्या आकारमानात होणारे बदल आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत टिकून राहतात. मेंदूच्या संबंधातील एका संशोधक अभ्यासात या पौगंडावस्थेत आपल्या मेंदूच्या क्षमतेला सूचित करणारा मेंदूवरील करड्या रंगाचा भाग दर वर्षी 1 टक्का या प्रमाणात वयाची तिशी गाठीपर्यंत कमी कमी होत जातो. मेंदूतील करडा भाग कमी होत असला तरी श्वेत भागाच्या वाढीमुळे चेताकोशांची जोडणी जास्त दणकट होते. त्यामुळे चेताकोशामधील संदेशांचे आदान-प्रदान जास्त क्षमतेने होऊ लागते. मेंदूतील काही अनावश्यक गोष्टीना बाहेर फेकून देण्याची क्रिया या काळात घडत असते. बाल्यावस्थेत प्रमाणाबाहेर चेताकोशींच्या संख्येत वाढ झालेली असते. त्यातील नको असलेला भाग या अवस्थेच्या काळात बाहेर फेकला जातो. त्यामुळे माणूस जास्तीत जास्त संवेदनशील होत जातो. ज्ञानेंद्रियांची सर्व कामे जास्तीत जास्त क्षमतेने चालतात. प्रमस्तिष्काच्या छाटणीमुळे (cerebral pruning) चेताकोशांच्या अनावश्यक जोडण्या तोडल्या जातात. सर्व ज्ञानेंद्रिय प्रगल्भावस्थेत पोचतात. मेंदूच्या पृष्ठभागावरील अवकाशज्ञान व भाषाज्ञान यांचे नियंत्रण करणारा भाग याच काळात प्रगल्भ होतो.
मेंदूच्या सर्वात शेवटी विकसित होणारा भाग म्हणजे अग्रमस्तिष्का(frontal lobe) समोर असणारा उत्तरपार्श्व मस्तिष्क बाह्यक (dorsolateral prefrontal cortex). हा भाग आपल्यातील उत्स्फूर्ततेचे, निर्णयप्रक्रियेचे नियंत्रण करतो. पौगंडावस्थेत निर्णयक्षमता अत्यंत प्राथमिक अवस्थेत असते. हा भाग पूर्णपणे विकसित झाल्यानंतर जबाबदारी व धोका ओळखण्याच्या क्षमतेत वाढ होते. अमिग्डाला(amygdala) पासून आलेल्या भावनाविषयक संदेशांचे वर्गीकरण करणे व त्यांना क्रमवारी देणे व त्यानुसार प्रत्यक्ष कृतीसंबंधीचा निर्णय घेणे इत्यादी सर्व प्रक्रिया याच भागातून होत असतात. आणिबाणीच्या प्रसंगी 'लढा किंवा पळा' या संदेशाची तत्परतेनी कार्यवाही करणे पौगंडावस्थेतील महत्वाचे लक्षण ठरते.
हे सर्व बदल काही वेळा उपकारक व काही वेळा तापदायक ठरतात. संक्रमणावस्थेतील हा मेंदू अजूनही बाल्यावस्थेतील लवचिकतेला चिकटून असल्यामुळे नवीन गोष्टी शिकण्याची आस

संपलेली नसते. त्याच वेळी उत्स्फूर्ततेचे नियंत्रण व्यवस्थित होत नसल्यामुळे धूम्रपान, मादकद्रव्य सेवन किंवा अनिर्बंध व बेजवाबदार लैंगिकता यांच्या आहारी पडण्याचा धोका या वयात असतो. मादक पदार्थाच्या अती सेवनामुळे पौगंडावस्थेतील मेंदू अशा व्यसनांच्या आहारी पटकन जातो. व्यसनाधीनतेचा प्रेरणा-स्रोत व त्यापासून मिळणाऱ्या बहुमानांच्या मागे धावत असल्यामुळे मेंदूमध्ये एका प्रकारचे हार्ड वायरिंग तयार होऊ लागते. त्यातच उत्स्फूर्ततेची अनियंत्रित अवस्था, निर्णयशक्तीची कुंठितावस्था व दूरदृष्टीचा अभाव या मिश्रणातून व्यसनाधीनतेला युवक - युवती बळी न पडल्यास ती एक आश्चर्यकारक गोष्ट ठरू शकेल. व्सनाधीनता, त्यातून निर्माण होणारे ताण-तणाव व त्यातून हमखास होणारी प्रेमातील (लैंगिकतेतील) असफलता यामुळे नंतरच्या आयुष्यात मनोदशा विकाराची (mood disorder) लक्षणं दिसू लागतात. व त्या व्यक्तीच्या आयुष्याला बरबाद करण्यास कारणीभूत ठरतात. यासाठी व्यसनांपासून दूर राहणे, ताण-तणाव मुक्त असणे अत्यंत गरजेचे आहे. व हेच मेंदूच्या विकासाला उपकारक ठरू शकेल.

सकारात्मक दृष्ट्या या अवस्थेकडे बघितल्यास पौगंडावस्थेतून प्रौढावस्थेकडे झेप घेणाऱ्या या काळात तरुण-तरुणी अनिर्बंध स्वातंत्र्याचा उपभोग घेत असतात. याच काळी मेंदूला वैशिष्ट्यपूर्ण आकार देण्याची क्षमता वाढते व मेंदू पूर्णपणे कार्यक्षम होतो. त्यामुळे जा्तीत जास्त शिकण्यासाठी व नवीन अनुभवांना सामोरे जाण्यासाठी या अवस्थेतील अतिरिक्त ऊर्जेचा वापर करणे योग्य ठरू शकेल. शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नसून प्रवासातून वा इतरांच्या संपर्कातून मिळणारे वैविध्यपूर्ण अनुभव, गायन - नाट्य यासारख्या कलाप्रकारातून होत असलेली अभिव्यक्ती, गिर्यारोहण वा क्रीडाप्रकार वा इतर शारीरिक-बौद्धिक छंदापायी मिळणारे धडे इत्यादी आपल्या मेंदूच्या क्षमतेत वाढ करण्यासाठी सहयोग देऊ शकतात. आपल्याला आवडो न आवडो निर्णय प्रक्रियेस जवाबदार असलेल्या चेताकोशांचे मंडल (circuit) पूर्णत्वाकडे जात असलेल्या या अवस्थेतील मेंदूचे इतरापासून (व स्वत:पासूनही!) संरक्षण करण्याची जवाबदारी निसर्गाने आपल्यावरच सोपवली आहे व ही जवाबदारी आपल्याला टाळता येत नाही.

क्रमश:

Comments

छान

छान लेख. पुढील भागांची प्रतिक्षा आहे.
भाषा थोडी सोपी करता येईल का?
सन्जोप राव
हुई मुद्दत कि 'गालिब' मर गया, पर याद आता है
वो हर इक बात पर कहना, कि यूं होता तो क्या होता

 
^ वर