शुद्धलेखनाचे गांभिर्य

आजच्या म.टा.च्या मुखपृष्ठावर (नेट आवृत्ती) झळकलेली बातमी घेऊन त्याची शुद्धलेखन शहानिशा करून पाहिली.

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/5755929.cms

चचेर्ला (दोन वेळा), विद्याथीर्, टेडमार्क, कडकडात
"सध्या वेशात" यातील "सध्या" हा शब्द शुद्ध असला तरी संदर्भ चुकीचा आहे. तो "साध्या" असा हवा.
१४१ शब्दांमध्ये ६ शब्द चुकीचे म्हणजे सुमारे ४ ते ५ टक्के अशुद्ध लेखन आपण मराठीतील एका अग्रगण्य वृत्तपत्र समुहाकडून खपवून घेतो. नेट आवृत्तीत इतक्या चुका करणारा उप-संपादक छापील आवृत्तीत मात्र अशा चुका करत नाही. असे का? नेटवर पेपर वाचणारा वर्ग त्यांना तितकासा महत्त्वाचा वाटत नाही का? सर्वसाधारण ब्लॉगवरील चुकांची टक्केवारी काढण्याची धार्ष्ट्य मी दाखवणार नाही. कारण...
मी स्वान्तसुखाय लिहीतो. वाचणारे वाचतील. तुम्हाला कोणी आवताण दिलेले नाही माझ्या ब्लॉगवर येण्याचे.

असे समर्थन करणार्‍यांनी पोस्ट पब्लिश न करता त्यात असलेला "ड्राफ्ट" असा पर्याय वापरावा. इंटरनेट हे फार प्रभावी माध्यम आहे. धारदार शस्त्र धारण करणार्‍यांकडून जबाबदार वर्तनाची अपेक्षा असते, तशीच ब्लॉगर्सकडून आहे. मराठी भाषा आपण फार गंभीरपणे घेत नाही हेच यातून सिद्ध होत नाही का?

Comments

शुद्धलेखनाचे गांभिर्य

मराठी स्पेल चेकर आहे का?

शैलु.

हो आहे, पण...

हो आहे, पण अजून चाचणी अवस्थेत आहे.
फक्त फायरफॉक्ससाठीओपन ऑफिससाठी.

मायक्रोसॉफ्ट ऑफिससाठी वा इंटरनेट एक्स्प्लोअरसाठी काय पर्याय आहे ते मला माहीत नाही.

मनोगताचा शु. चि.

मराठी स्पेलचेकरसाठी मनोगताचा शुद्धीचिकित्सक वापरावा. मनोगताच्या प्रशासकांनी तो सर्वांच्या वापरासाठी खुला ठेवला आहे. त्यासाठी मनोगताचे सदस्यत्व लागते परंतु आपले लिखाण तेथे प्रसिद्ध करावे लागत नाही. तशी प्रशासकांची अटही नाही. शुद्धलेखन तपासायचे असेल तर कोणताही मराठी लेखनाचा तुकडा तिथे चिकटवून लेखन तपासता येते.

डिस्क्लेमरः मनोगताचा शु.चि. नेहमीच लेखन शुद्ध (किंवा प्रमाणित) करून देतो असे नाही. त्यात अद्यापही अनेक त्रुटी आहेत.

प्रॉब्लेम.

अहो. तो मटा वर टंकन करणार्‍याचा प्रॉब्लेम नाहीये. तो सॉफ्टवेअरचा प्रॉब्लेम आहे. आणि तो गेली कैक वर्षे आहे.

नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)

+१

तो सॉफ्टवेअरचा प्रॉब्लेम आहे.
सहमत

धन्यवाद

शंतनु

एका अत्यंत महत्वाच्या विषयावर चर्चा सुरू केल्याबद्दल धन्यवाद. अलीकडे मराठी ब्लॉग्सचा जो महासमुद्र आंतरजालावर प्रकटला आहे त्यातल्या कित्येक ब्लॉग मधले शुद्धलेखन वाचून अक्षरश: डोळ्यात पाणी येते. मिसळपाव सारख्या संकेतस्थळावर लिहिणारे काही लेखक अतिशय अशुद्ध लिहितात. उपक्रमवरची परिस्थिती त्या मानाने बरी आहे. परंतु काही नवीन लेखक येथेही अतिशय अशुद्ध आणि व्याकरण दृष्ट्या सदोष मराठी लिहित असतात. त्यांचे दोष इतरांनी दाखवणे औचित्यपूर्ण दिसत नाही व परिणामी ते सदोष लेखन तसेच आंतरजालावर रहाते. मराठीमधे स्पेल चेकर बनवणे कठिण काम आहे. सध्याचा ओपन ऑफिसमधला स्पेल चेकर बर्‍यापैकी काम करतो. परंतु त्यात अजून खूपच सुधारणा होणे आवश्यक आहे.
चंद्रशेखर

काय सुधारणा करता येतील?

>> सध्याचा ओपन ऑफिसमधला स्पेल चेकर बर्‍यापैकी काम करतो.
>> परंतु त्यात अजून खूपच सुधारणा होणे आवश्यक आहे.

काय सुधारणा करता येण्यासारख्या आहेत हे जर सविस्तर सांगितलेत तर काहीतरी करता येईल. शुद्धलेखनासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या मुक्तस्त्रोत व मोफत सुविधा उपलब्ध करून देणे हा एकच उपाय मला दिसत आहे. मी गेली अनेक वर्षे या विषयाशी संबंधित आहे आणि लोक बोलण्याव्यतिरिक्त फार काही करत नाहीत असा माझा अनुभव आहे. उदाहरण द्यायचे तर ओपन ऑफिसमध्ये ऍटोकरेक्ट सारखी सुविधा देणे शक्य आहे. म्हणजे मी जर चुकून "अनूभव" असे लिहीले तर त्याचे आपोआपच "अनुभव" होईल. त्यासाठी मी "ओपन ऑफिसमधील टंकन साहाय्य - भाग २ (स्वयंसुधारणा) " असा लेख लिहीला व नेहमी चुकणार्‍या शब्दांची यादी बनवण्याचे आवाहन केले.

http://mr.upakram.org/node/1887

त्यात १-२ लोकांशिवाय कोणीच रस घेतला नाही. मराठी भाषेचे थोडेसे न्यान (?), इंटरनेट जोडणी व दर महिन्याला २-३ तास इतकेही कोणी देत नसेल तर असे प्रयोग वर्षानुवर्षे चाचणी अवस्थेत राहीले तर नवल वाटायला नको.
आपली कळकळ समजण्यासारखी आहे पण तिचा उपयोग मराठी भाषेला तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात दोन पावले पुढे नेण्यासाठी होणार असेल तरच उपयोग.

स्पेल चेकर

मी माझ्या सर्व लेखनासाठी ओपन ऑफिसच वापरतो. त्यातल्या स्पेल चेकरमधे मला वाटणारी प्रमुख अडचण, प्रत्यय लावलेल्या शब्दांच्या संदर्भात येते. ज्या शब्दात ईकार किंवा ऊकार असतात ते सर्वसाधारणपणे प्रत्यय लावल्यावर इकार किंवा उकार होतात. यातील चूक स्पेल चेकर व्यवस्थित दाखवतो. परंतु स्पेल चेकरच्या स्मृती मधे त्या शब्दाला लागू शकणार्‍या सर्व प्रत्ययांचा समावेश नसल्याने अनेक वेळा प्रत्यय लावलेले शब्द अशुद्ध आहेत असे दिसते. त्याच प्रमाणे ' च ' हा प्रत्यय आपण जेंव्हा शब्दांना लावतो तेंव्हा बहुतेक वेळा स्पेल चेकर ते अशुद्ध असल्याचे दाखवतो.
या कामात माझ्याकडून काही मदत होण्यासारखी असली तर मी जरूर करीन. काय करावयाचे आहे हे मला व्यनि पाठवलेत तर तेवढे काम मी नक्की करू शकतो.
गुगल क्रोमसाठी स्पेल चेकर कोणी तयार केला आहे का?

धन्यवाद

चन्द्रशेखर

यादी बनवण्याचे आवाहन .

यादी बनवण्याचे आवाहन.

श्री शरद हर्डीकर यांनी शुध्दलेखन ठेवा खिशात हा अरुण फडके यांचा ११००० शब्दांचा कोश वापरण्यास सांगीतले होते.त्यातील शक्य तेवढया शब्दांची यादी मी आपण सांगाल तेथे संकलीत करतो.

महाराष्ट हे असे राज्य आहे
जेथे खेड्यात दर १२ तासांत
तर गावांत ३ तासांत
उत्सव साजरा करतात
लाईट आली लाईट आली.

शैलु

शुद्धलेखनाचे गांभिर्य

चंद्रशेखरजी,

दोष इतरांनी दाखवणे औचित्यपूर्ण दिसत नाही व परिणामी ते सदोष लेखन तसेच आंतरजालावर रहाते.

माझ्यालेखा नंतर आपण तसेच श्री.शरद यांनी शुद्धलेखनासाठी सुचना केल्या होत्या,जर आताचा लेख वाचला तर त्यात मी शुद्धलेखनबाबत काळजी घेतली आहे.(सुधारणा असावी.) त्या बद्दल मी दोघांचा आभारी आहे.

उकार,वेलांटी यांचा सर्व साधारण नियम काय आहे?

महाराष्ट हे असे राज्य आहे
जेथे खेड्यात दर १२ तासांत
तर गावांत ३ तासांत
उत्सव साजरा करतात
लाईट आली लाईट आली.

शैलु.

माझ्या चुका...

गांभिर्य हा शब्द मला वाटते गांभीर्य असा हवा. वर दिलेला फायरफॉक्ससाठीचा स्पेल चेकर मी वापरतो आणि त्यात हे दोन्ही शब्द बरोबर म्हणून दाखवले आहेत!! (म्हणूनच तो अद्याप चाचणी अवस्थेत आहे)

जन्मभर मराठी वाचून / बोलून देखील मी खाली दिलेल्या चुका करतो याचे मला काही वेळा आश्चर्य वाटते.
वेशात - वेषात
समुहाकडून - समूहाकडून
लिहितो - लिहीतो
आवताण - आवतान
गांभिर्य - गांभीर्य

बरं या चुका देखील मनोगतच्या स्पेल चेकरचा आधार घेऊन शोधलेल्या. आणि काही जाणकारांच्या मते तो स्पेल चेकरही काही परीपूर्ण नाही. आता?...

शुद्ध् शब्द

माझ्या मते, संस्कृतमध्ये वेश आणि वेष हे दोन्ही शब्द आहेत आणि त्यांच्या अनेक अर्थांपैकी पोशा(षा)ख हाही एक अर्थ आहे. त्यामुळे मराठीत वेशात आणि वेषात हे दोन्हीही बरोबर. वेशांतर कधी वाचला नाही, पण तोही बरोबर असला पाहिजे. वेषांतर नक्की बरोबर.(अरुण फडके वेशभूषा आणि वेशांतर चुकीचे म्हणतात, त्यांना लिहिले पाहिजे!) मला वाटते की एकाच अर्थाच्या वेश आणि वेष या दोन शब्दांच्या मराठीतल्या वापराचे काही अलिखित संकेत असावेत. वेषांतराऐवजी वेशांतर, वेषभूषाऐवजी वेशभूषा, गणवेशाऐवजी गणवेष सहसा वापरत नाहीत. समर्थांनी ’वेश असावा बावळा’ लिहिले आहे ’वेष असावा..’ नाही.
’लिहितो” बरोबर; ’लिहीतो’ चुकीचा. परंतु लिहीन-लिहीत यांतल्या ’ही’ दीर्घ.
आवताण - आवतान. हे दोन्ही ग्रामीण उच्चाराचे शब्द, त्यामुळे त्यांना शुद्ध लेखन नाही. बोलताना वापरल्यास दोन्ही शुद्ध समजावे, लिहिताना एकही चालणार नाही. प्रमाण शब्द : आवतण किंवा आमंत्रण. क्रियापदे : आवतणे किंवा आवंतणे.
’परिपूर्ण’ असा लिहितात. परि हा उपसर्ग आहे, त्याची कधीही परी होत नाही.--वाचक्‍नवी

"समूह" शब्द रोचक आहे

तो लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद.

अशा प्रकारचे शब्द अभ्यास करण्यालायक आहेत. या शब्दाच्या शेवटचा 'अ' लुप्त/निभृत आहे, की अतिह्रस्व-ऐकू येणारा आहे? मराठी अभ्यासकांनी सर्वेक्षणाने हे शोधून काढले तर बरे.

-ऊह, -ईह, -ईय, आणि -ऊव अंती शब्दांबद्दल हे खास असावे.
उदाहरणे : समूह, मसीह, स्वकीय, (?? "ऊव"-कारांती शब्द मराठीत आहेत काय?)
येथे उच्चार कसा होतो?
समूह्, मसीह्, स्वकीय् असे उच्चार कानाला खटकतात.

- - -
याचा काय संबंध?
मराठीत नेक शब्दांमध्ये अंत्य 'अ' निभृत होतो :
लेखी "एकजूट, काळवीट" यांचे उच्चार "एकजूट्, काळवीट्" - असेच ठीक वाटतात.
सामान्यरूपात :
एकजुटीने, काळविटाला
येथे ह्रस्व उच्चार आपोआप होतो - कुठला व्याकरणातला किंवा शुद्धभाषणाचा नियम घोकून पाठ करावा लागत नाही.

ज्या ठिकाणी अंत्य 'अ' निभृत होत नाही, तिथे परिस्थिती वेगळी असते.
"वीर्य, सूत्र" यांचा उच्चार लेखीसारखाच होतो. शब्दाच्या शेवटचा 'अ' स्पष्ट ऐकू येतो.
"वीर्याला, सूत्राला"
येथे दीर्घ उच्चार आपोआप होतो - कुठला व्याकरणातला किंवा शुद्धभाषणाचा नियम घोकून पाठ करावा लागत नाही.

सारांश, झाले तर निभृत/लुप्त 'अ'च्या आदल्या अक्षरातले दीर्घ अक्षरच सामान्यरूपात ह्रस्व होतात.

समूह, स्वकीय यांच्या अंतीचे 'अ' अस्पष्ट आहेत. धड लुप्त नाहीत, की सुस्पष्ट उच्चार नाहीत. म्हणून घोटाळा होतो आहे. 'अ'-उच्चार निभृत असता, तर "समूह्, समुहाला" असे उच्चार क्रमप्राप्त होते. 'अ'-उच्चार सुस्पष्ट असता, तर "समूह, समूहाला" असे उच्चार क्रमप्राप्त होते.

- - -

एक विचित्र "शुद्धलेखन" :
भावगीत <-> भावगीताला ?? "भावगिताला" असे "शुद्धलेखन" का नसावे?
सामान्यरूप <-> समान्यरूपाला ?? "सामान्यरुपाला" असे "शुद्धलेखन" का नसावे?
हे असले विचित्र अपवाद तरी भाषेच्या प्रमाणलेखनातून काढून टाकले पाहिजे.

तत्सम शब्द

तत्सम शब्दांना प्रत्यय लागण्यापूर्वी त्यांतला दीर्घ असलेला उपान्त्य इ-उकार र्‍हस्व होत नाही. त्यामुळे भावगीताला, रूपावर, समूहाचे, व्यासपीठावर असे लिखाण आणि उच्चारण होते.
मराठी शब्दांतला अन्त्य अकार निभृतच असतो. तत्सम शब्दांतला अनेकदा नसतो. त्यामुळे काम(इच्छा), स्वकीय, योग, समूह, सारखे शब्द आणि अंती किंवा उपान्ती जोडाक्षर असलेले शब्द, उदा. वीर्य, चित्र, श्रोत्रिय, क्षत्रिय, यांतले अन्त्य अकार जवळजवळ पूर्ण उच्चारले जातात. अतिपरिचय झालेले गीत-प्रीत-प्रेमसारखे शब्द हा नियम झुगारून देतात.
हित आणि गुण यांच्यातले अकार पूर्ण उच्चारायला पाहिजेत(तसे कधीकधी जातातही!), त्याऐवजी हीत, गूण असे उच्चार ऐकायला मिळतात. तनमनधनमध्ये तिन्ही न पूर्ण तर नुसत्या ’मन’चा उच्चार मऽन् असा. हे सर्व कोणत्या नियमाने होते ते शोधायला पाहिजे. नियम नसतील तर करायला हवेत..--वाचक्नवी

तत्सम-तद्भव : गोंधळात टाकणारे वर्गीकरण

काही शब्द लेखी दिसायला तत्सम असतात, पण ते तत्सम नसावेत.

- - -
"एक" हा शब्द तत्सम की तद्भव?
मराठीमध्ये याचा उच्चार निभृत-'अ' असाच मी ऐकलेला आहे.
"एक, एकाला" येथे सामान्यरूपातील उच्चार ह्रस्व 'ए'कार आहे. संस्कृतात ह्रस्व-'ए' अस्तित्वात नाही (केवळ राणायणीय शाखेत याचा वापर ऐकायला मिळतो असे पतंलली म्हणतो) आणि लेखी मराठीमध्ये याच्यासाठी चिह्न नाही. पण मराठीच्या प्रमाणबोलीमध्ये "एऽकाला" असा दीर्घ उच्चार निश्चितच अयोग्य आहे. ही अतिपरिचयादवज्ञा नसून, हे मराठमोळे "तद्भव" रूप मानले पाहिजे.

वरचे गीत-प्रेम-तऽन-मऽन-धऽन हे शब्द "एक"सारखेच असावेत. या सर्वांची बिगर-निभृत रूपे मराठीत "वैचित्र्यपूर्ण तत्सम वापर" मानावा, आणि निभृत रूपे मराठमोळी तद्भव रूपे मानावी.

- - -
वाचक्नवी यांनी अत्यंत चाणाक्षपणे माझी थोडी हातचलाखी पकडलेली आहे :-)

मी "भावगीत-भावगीताला-?भावगिताला" हे उदाहरण दिले.

"गीत-गीताला-[चूक]गिताला" असे उदाहरण दिले नाही. "गिताला" असा उच्चार कोणीही प्रमाणभाषक करणार नाही. प्रादेशिक बोलींमध्येतरी असा उच्चार उपलब्ध आहे का? नसावा.

"गीत" (निभृत-'अ') शब्द तद्भव म्हटला, तर माझे आदल्या प्रतिसादातले विवेचन कमी पडते. याचे स्पष्टीकरण शब्दाच्या आघातस्वरामध्ये आहे.

'गीत -> 'गीताला
मात्र :
'मीठ -> मि'ठाला
'भावगीत -> 'भावगि'ताला

{ 'प्राथमिक आघात, 'दुय्यम आघात }

ज्या शब्दांमध्ये आघातस्वर उपांत्यावरून विचलित होतो, त्याच शब्दांमध्ये सामान्यरूपात उच्चार ह्रस्व होतो.

आणखी अभ्यास आवश्यक आहे - हे सांगणे नलगे.

मदत

शंतनू, तुमच्या प्रकल्पाला तोड नाही. (माझे लिखाण मुख्यतः स्पेलचेकरबद्दल आहे) (माझे हे लिखाण स्पॉन्टेनियस आहे. शुध्दलेखनाच्या चुकांसाठी. माफ करा.)

तुम्ही दिलेल्या दुव्यावरचा लेख पहिल्यांदाच पाहिला. तुम्हाला अल्प प्रतिसाद मिळाला हे वाचून फार वाईट वाटले.

सध्या मराठी संगणकीय संक्रमणावस्थेत आहे. ज्यावेळेला मराठीत पहिल्यांदा छपाई व्हायला लागली (सुमारे दीड दोनशे वर्षापूर्वी) त्यावेळेला अशीच परिस्थिती असावी. भाषा आणि लिहायची पद्धत (शुध्दलेखन आणि अक्षरे कशी काढावी हे सुद्धा) या बाबतीत प्रमाणीकरण नव्हते. त्यास कोणी दोलामुद्रित अवस्था असे म्हटल्याचे आठवते. (मोल्सवर्थचा शब्दकोश पाहिला तर त्यातील कित्येक अक्षरे लागत नाहीत असे मला दिसले.) मराठी भाषा त्यावेळी छपाईतंत्रानुसार बदलवली गेली असणार. मध्यंतरी च्या काळात टंकयंत्र (टाईपरायटर) मराठीत आल्यावर असेच बदल घडले. याशिवाय जोडाक्षरे कशी लिहावीत (ती एका खाली एक अशी लिहावीत जसे सद्गुरु. ती एकामागोमाग लिहावीत जसे जास्त, किंवा पाय तोडून लिहावीत जसे सद् गुरु) या बद्दलचे वाद अजून चालु आहेत. याशिवाय प्रमाणीत प्रत्यय नसणे जसे रामाचे (यात आकार आहे) प्रमोदचे (यात आकार नाही), प्रमाणित लिंग नसणे (पेन याशब्दाला मी तीनही लिंगात ऐकले आहे) असे भरपूर प्रमाणीकरण बाकी आहे. (टिळकांचे तीन 'संत' युनिकोड मराठीत आता दुर्लभ झाले आहेत.)

मी स्वतः याबाबतीत अल्पमती समजतो. हा विषय वर्षानुवर्षे मुद्रितशोधन करणार्‍यांनी सोडवायचा आहे. ते या प्रकल्पात आले पाहिजे असे काही केले पाहिजे.

ते येत नाहीत कारण सध्याची संक्रमणस्थिती आहे. तुम्हाला वाचून कदाचित वाईट वाटेल की मराठीतील छपाईतंत्रात अजून युनिकोडचे स्थान शून्यवत आहे. याचा दोष माझ्यामते युनिकोडकर्त्यांकडे जातो. युनिकोडकर्त्यांनी असलेले व्यावसायिक प्रमाणीकरण नाकारले आणि स्वतःची अशी प्रमाणित लिपी आणली. या लिपीची लोकांना सवय नसल्याने छपाई करणार्‍यांनी ती नाकारली. यामुळे असे झाले की जुने ते सोने राहिले. याबरोबर मुद्रितशोधकसुद्धा युनिकोडच्या भानगडीत पडले नाही.

याउलट, तरुण, संगणकमाहितगार आणि मुक्तताप्रीय (ओपन सोर्स) लोकांनी युनिकोडला कवटाळले. जोस्तोवर या गटाची आणि छपाईतज्ञांची /मुद्रितशोधकांची हात मिळवणी होत नाही तोस्तोवर आपण याच तिढ्यात अडकणार असे मला वाटते.
याला काळ हा उपाय होऊ शकतो. मला वाटते घाईची गरज आहे.

माझ्या मते या प्रकल्पात मुद्रितशोधकांना सहभागी करणे गरजेचे आहे. प्रसंगी द्र्व्य खर्चून ते केले पाहिजे. युनिकोड मराठी छपाईतंत्रात येणे हे तितकेच गरजेचे आहे. या साठी युनिकोड करणार्‍यांनी काहिसे शिथिल होणे गरजेचे आहे. (हे मराठी युनिकोड कुणी तयार केले? त्यात बदल करायचा असेल तर कुणाला बोलायचे? हे मला पडलेले कोडे आहे.)

शंतनू तुमचा प्रकल्प पाथब्रेकर म्हणावा असा आहे. तुमच्या प्रकल्पात मी शब्दांची भर घालू शकत नाही कारण ते करण्याची माझी प्राज्ञा नाही. (उगाच चुका केल्यातर येणारी मराठी भाषा बदलून जाईल ! :) ) इतर हवी ती मदत करायला मी तयार आहे.

प्रमोद

:)

व्वा !! काय भारी चर्चा विषय आहे ... आणि प्रतिसादही केवळ सुरेख. मी एक शिकाऊ ब्लॉगर असल्याणे सुदलेकणाच्या चुका होतात, आता मला वाटतं की मी मराठी फार कॅज्युअली घेत होतो म्हणुण चुका होत आहेत. असो .. चर्चा वाचुन मनोरंजण झाले :)

एक किस्सा आठवला ... आम्ही गल्लीत क्रिकेट खेळायचो.. बॅट शाळेतुन चोरुन आणलेल्या बेंचच्या फळीची असायची. कोणतेही शुद्ध क्रिकेटचे नियम नसायचे , बॅट्समन आंधळी शॉट मारायचे , बॉलर जमेल तशी बॉलींग करायचे .. आणि कॅच घेण्याची एकेकाची खास इस्टाईल होती. बरा त्यावेळी कोणी "पंचनु" किंवा "चेंडुफेकर" आले नाहीत शुद्ध क्रिकेट खेळण्याचे नियम शिकवायला .. नाही तर जो आणंद भेटत होता त्याचंही भजं झालं असतं !!

- टारझन

प्रमाण लेखन

शुद्ध लेखन हा शब्दच भाषेला मर्यादा घालतो. प्रमाण लेखन हा उचित शब्द आहे. त्याची गरज निर्माण झाली ती विचार भावना यांच्या आदान प्रदानासाठी. मला अभिप्रेत असलेला अर्थ व त्याला समजणारा अर्थ यात तफावत असेल तर भाषिक अपघात होतात. ते होउ नयेत म्हणुन एक नियमावली. ती फारच किचकट झाली कि मग लोक व्याकरण शुद्धलेखन वगैरेला फाट्यावर मारायला चालू करतात.
प्रकाश घाटपांडे

थोडक्यात असे...!

>>भाषिक अपघात होतात. ते होउ नयेत म्हणुन एक नियमावली.

लेखनाच्या पद्धतीला स्थिरता यावी या करिता शुद्धलेखनाचे नियम बनविण्यात आले होते.
पण त्याचे स्वरुप इतके बदलत गेले की तो कायदा झाल्यासारखा झाला. म्हणजे नियम मोडला की त्याच्यावर कार्यवाही करावी असे त्याचे स्वरुप झाले. असो, मराठी भाषेत असे अनेक शब्द सापडतील की त्या अशुद्ध शब्दाचे शुद्ध कोणी आणि कोणत्या नियमाने केले काही कळायला मार्ग नाही.

जसे, परिक्षा चे परीक्षा झाले.
बक्षिस चे बक्षीस,
बिजगणित चे बीजगणीत
शब्दकोष चे शब्दकोश
राजिनामा चे राजीनामा
कवयत्रि चे कवयित्री

किंवा

राहणे, पाहणे, या ऐवजी रहाणे,पहाणे, हे चूक.
पण आज्ञार्थी प्रयोग करतांना रहा,पहा चालते.

वरील बदलांचे नियम आणि त्याची काही स्पष्टीकरणे कोणी समजून सांगितली तर समजून घ्यायला आवडेल.

बाकी शंतनूचा उपक्रम मला वयक्तीक आवडतो. ते खूप मेहनत घेतात.
त्यांच्या प्रोजेक्टला शुभेच्छा आहेत.

-दिलीप बिरुटे

आश्चर्य आहे

यादी रोचक आहे.

१. "परिक्षा" समजू शकतो. असे लेखन पूर्वी कधी नसावे, परंतु उच्चारानुसारी आहे.

२. मात्र "बक्षिस" असा उच्चार कोणी करते का? शक्य आहे, पण आश्चर्यकारक.

३. "बिजगणित" असे कधी वापरात होते का? त्या शब्दाचा उच्चार "बीज्गणीत्" असा आहे ना? "बिज्गणित्" असा उच्चारही लोक करतात का? कुतूहल आहे.

४. शब्दकोश/शब्दकोष दोन्ही विकल्प अजून प्रमाणलेखनात मान्य असावेत असे वाटते. पैकी एकच निवडला असेल तर आश्चर्य वाटते.

५. "राजिनामा" - विचार करण्यालायक.
"राजी+नामा" ही फोड जर बोलणार्‍याला माहीत असेल, तर उच्चार "राजीनामा" असाच आपोआप होईल. ("बाई+माणूस=बाईमाणूस" याचा उच्चार "बाइमाणूस" असा करताना फारसा ऐकलेला नाही.) मात्र "राजी" शब्दाचा अर्थ किंवा "नामा" शब्दाचा अर्थ जर मराठीमध्ये नाहिसा झाला असेल, तर "राजिनामा" असा उच्चार केला जाईल, हे पटते. ("कोल्हा काकडीला राजी" -> त्यामुळे राजी शब्द अजून मराठीमध्ये आहे. "जाहीरनामा" हा शब्द मराठीत वापरात आहे, पण तरी "नामा" असा फोडलेला शब्द बहुधा कालबाह्य आहे.)

६. "कवयत्रि" असे कधी लिहिले जात होते का? (हा शब्द सामान्य बोलण्यात आहे असे वाटत नाही - म्हणजे प्रादेशिक-बोलींमध्ये वापरला जात असेल असे वाटत नाही. मी मात्र "कवयत्री" असे लहानपणी म्हणत असे. परंतु तो शब्द फारसा ऐकला नव्हता म्हणून अनुमानधपक्याने ठोकून देत होतो, असे वाटते. की हा सामान्य अपभ्रंश म्हणून आता मान्य केला पाहिजे?)

उच्चारानुसारी लेखन

उच्चारानुसारी लेखन ही एक प्रतिगामी कल्पना आहे असे माझे ठाम मत आहे, कुणाला पटो ना पटो.
मराठी भाषेचा जन्म नवव्या शतकात झाला असे मानले जाते. त्या आणि त्याच्या पुढच्या काही शतकांत मराठीचा शब्दसंग्रह वाढू लागला असला पाहिजे. सुरुवातीच्या काळात ज्या बोलीभाषा होत्या, त्या हळूहळू एकमेकांत विलीन होऊन बहुसंख्यांच्या तोंडी असलेली एक बोलीभाषा रूढ होऊ लागली . अशा मौखिक भाषेचे रूपांतर लेखनात झाल्यानंतर त्या बोलीभाषेलाच प्रमाण समजले जाऊ लागले असले पाहिजे. त्यामुळे जसे लिहायचे तसेच बोलायचे ह्यालाच शुद्ध समजले जाऊ लागले.
लेखी भाषा प्रमाण समजली जाऊ लागल्याने तिच्यात, मुद्दाम जाणीवपूर्वक केले नाहीत तर, फार मोठे बदल संभवत नाहीत. मौखिक भाषेत मात्र दिवसागणिक शब्दांची आवक-जावक व निर्मिती होणे, उच्चारांचे वैविध्य असणे, अपभ्रंश रूढ होणे वगैरे प्रकार चालूच असतात. योग्य वेळी यांतल्या काही गोष्टी प्रमाण भाषेत अवतरतातही, पण त्यासाठी काही काळ जावा लागतो, आणि मगच हे बदल लेखनात येतात.
असे काही न होता एखादा माणूस जेव्हा वैचारिक लिखाणातदेखील, वैयक्तिक बोलीभाषेचा आग्रह धरतो तेव्हा तो मला 'सातव्या शतकातला शरीयत लागू करा' असे म्हणणार्‍या अर्वाचीन मौलवीसारखा प्रतिगामी वाटतो. जी स्थिती भाषेच्या सुरुवातीच्या काळात होती ती परत आणायचा आग्रह धरणे याला आणखी काय म्हणता येईल!--वाचक्नवी

असा आग्रह नाही, पण शिक्षकांसाठी मदत

उच्चारानुसारी लेखनाचा माझा आग्रह नाही. (ते अंततोगत्वा शक्य नाही म्हणून - ह्रस्व-दीर्घांपेक्षा अधिक स्वर लागतील, वगैरे.)

मात्र एखादा शब्द प्रमाणलेखनात प्रमाणौच्चारापेक्षा वेगळा लिहिला जातो, हे शाळाशिक्ष़आला ठाऊक असलेले बरे असते. बहुतेक शब्दांबाबत शालेय विद्यार्थ्यांना "उच्चारानुसार ढोबळमानाने लिहा" असे शिकवता येईल.

ज्या शब्दांच्याबाबत प्रमाणभाषा बोलणार्‍यांनादेखील लिखाणात गोंधळ होईल, ते शब्द लक्षात ठेवले, तर ते थोडकेच शब्द वेगळे शिकवावे लागतील. हा लघु-उपाय आहे.

"भाषेचे लेखन उच्चारानुसारी मुळीच नाही" असे म्हणून प्रत्येक शब्दाचे लेखन वेगवेगळे घोकून शिकावे लागले, तर तो उपाय शिक्षणासाठी बोजड आहे.

म्हणूनच डॉ. बिरुटे यांनी त्यांच्या शैक्षणिक अनुभवामधून दिलेली कठिण शब्दांची यादी लक्ष देण्यालायक आहेत.

बोलण्यातील उच्चारानुसार लिहावे....!

>>एखादा शब्द प्रमाणलेखनात प्रमाणौच्चारापेक्षा वेगळा लिहिला जातो, हे शाळाशिक्ष़आला ठाऊक असलेले बरे असते.

शाळेत काय महाविद्यालयाच्या मराठी भाषेच्या सहअधिव्याख्यात्यांना सुद्धा अशा काही बदलांची खूप माहिती असते याबद्दल शंकाच आहे. [काही जाणकार असतीलही] मला तर असे बारकावे फारसे माहितच नाहीत. पण, प्रमाणभाषा, बोलीभाषा, शुद्ध शब्द, अशुद्ध शब्द, शब्दांचे शोध, शब्दांच्या व्युत्तपत्त्या, भाषाशास्त्र, भाषेची सरळमिसळ अशा काही विषयांवरील चर्चासत्रातून भाषेचे जाणकार शुद्ध लेखनाबद्दल, शुद्ध शब्दांबद्दल असेच पोटतिडकीने मत मांडत असतात. तेव्हा थोडेफार असे बदल आहेत असे इतकेच समजते. तिथेच शुद्ध शब्द, अशुद्ध शब्द याची माहिती होते.

>>शालेय विद्यार्थ्यांना "उच्चारानुसार ढोबळमानाने लिहा" असे शिकवता येईल.
करेक्ट....!!!

-दिलीप बिरुटे

खरं आहे हो तुमचे....!

>>>एखादा माणूस जेव्हा वैचारिक लिखाणातदेखील, वैयक्तिक बोलीभाषेचा आग्रह धरतो तेव्हा तो मला 'सातव्या शतकातला शरीयत लागू करा' असे म्हणणार्‍या अर्वाचीन मौलवीसारखा प्रतिगामी वाटतो.

लै भारी...! :)

वैचारिक लेखनात बोलीभाषा किंवा बोलीभाषेतील शब्दांची रुपे चालत नाहीत. पण, ललित वाड्.मयातील संवादात्मक लेखनात अनुस्वारयुक्त अकारान्त रुपे लिहिण्यास हरकत नाही असे म्हणायचे. त्याचबरोबर लेखनात बोलीभाषा वापरण्याची गरज पडेल तेव्हा बोलीभाषेची रुपे वापरावी असे म्हणायचे, असे धोरण कशासाठी ? सरसकट एकच कोणते तरी धोरण ठेवायचे होते ?

>>>मौखिक भाषेत मात्र दिवसागणिक शब्दांची आवक-जावक व निर्मिती होणे, उच्चारांचे वैविध्य असणे, अपभ्रंश रूढ होणे वगैरे प्रकार चालूच असतात.

ही खरी जीवंत भाषा....! तीच भाषा लेखनात आली पाहिजे.

>>>योग्य वेळी यांतल्या काही गोष्टी प्रमाण भाषेत अवतरतातही, पण त्यासाठी काही काळ जावा लागतो, आणि मगच हे बदल लेखनात येतात.

हा हा हा. शुद्धलेखनाच्या नियमात जे शब्द बसत नाहीत त्यांची पाळेमुळे संस्कृत भाषेत शोधायची. त्यांना तत्सम, तद्भव, असे काही तरी म्हणायचे आणि ते प्रमाण मानायचे. च्यायला, गम्मतच आहे.

असो, 'विणा' शब्द बरोबर की 'वीणा' बरोबर आहे. वीणा बरोबर असेल तर शुद्धलेखनाच्या कोणत्या नियमाने ते बरोबर ठरते ?

-दिलीप बिरुटे
[अर्वाचीन मौलवी]

मान्य

>>शालेय विद्यार्थ्यांना "उच्चारानुसार ढोबळमानाने लिहा" असे शिकवता येईल.<<
हे अगदी मान्य. पण ते सुरुवातीच्या काळात. एकदा का उच्चार आणि लेखन यांच्यातले तारतम्य पाळायला जमले की आपोआप, ऐकलेल्या बोलीभाषेतले शब्द प्रमाणभाषेत लिहायची सवय होते. इंग्रजी स्पेलिंग वाचून आपण शब्दाचा अंदाजाने जवळजवळ योग्य उच्चार करू शकतो आणि उच्चार ऐकून त्या शब्दाचे बर्‍यापैकी ठीकठाक लिखाण करणे अनेकदा जमते, तसाच प्रकार मराठीसाठी.
संवादात्मक लेखनात बोलीभाषा वापरतात, पण ती कुणाची? फक्त साडेतीन टक्केवाल्यांची; इतरांनी काय पाप केले आहे? प्रत्येकाने आपल्या बोलीभाषेत लिहायचे ठरवले तर माणसागणिक एक बोली तयार होईल आणि वाचणारा त्या गण गण गणात बोतेचा आपल्याला सोईस्कर असा अर्थ काढेल. आपले लिखाण जगभरातल्या सर्व मराठी वाचणार्‍यांना समजावे असे वाटत असेल तर ते प्रमाणभाषेतच हवे.
असे इंग्रजी-हिंदीत दिसते? फक्त मराठीचाच हा सवतासुभा का? त्यापेक्षा प्रमाणभाषेत लिहावे, जो तो आपापल्या बोलीभाषेत वाचेल. एकच इंग्रजी मजकूर अमेरिकन वेगळा वाचतो, मराठीभाषक वेगळा आणि पंजाबी-मद्रासी आणखीनच वेगळा. चिनी लिपीत लिहिलेला एकच मजकूर चीनमधले विविध भाषा बोलणारे लोक शब्दशः वेगवेगळा वाचतात. प्रमाण भाषेत लिहिलेला मराठी मजकूर हा चित्रलिपीत लिहिलेला समजावा, आणि ज्याला जसा वाचायचा आहे तसा त्याने वाचावा. अभिनय करताना नाटकातील नट संहितेबरहुकूम उच्चार करत नाहीत, हे ध्यानात घ्यावे. नाहीतरी आपणही कुठल्याही मजकुरातली अक्षरे वाचतच नाही, केवळ आपल्या मेंदूत साठवलेल्या त्या शब्दाची प्रतिमा वाचत असतो.

जर प्रसूतीशी संबंध असेल तर वीणातली वि र्‍हस्व काढायला हरकत नाही. शुद्धलेखनाचा कुठलाही नियम त्याला आडकाठी करणार नाही. आणि उच्चारानुसारी लिहायचे असले तरी वाद्यार्थे वी आणि प्रसूत्यर्थे वि आपोआप लिहिले जाईल.--वाचक्नवी

किंचित अमान्य

इंग्रजी स्पेलिंग वाचून आपण शब्दाचा अंदाजाने जवळजवळ योग्य उच्चार करू शकतो आणि उच्चार ऐकून त्या शब्दाचे बर्‍यापैकी ठीकठाक लिखाण करणे अनेकदा जमते, तसाच प्रकार मराठीसाठी.

अगदी अमान्य.

laugh - लाफ
Direction - डायरेक्शन/ डिरेक्शन
compassion कंपॅशन
scenario - सिनारिओ
because - बीकॉज
wrong - राँग
should - शूड

यांचे आणि अशा अनेक शब्दांचे उच्चार मी अजिबात अंदाजाने शिकलेले नाही. ते उच्चार मला शिकवलेले आहेत. अंदाजाने मी वरील आणि अशा अनेक इंग्रजी शब्दांचे उच्चार वेगळे केले असते.

बाकी, प्रतिसादाशी सहमत.

लाफ वगैरे

एकदा लाफ वाचता यायला लागला की कफ्, लाफ्टर, ड्राफ्ट, इनफ वाचता येतात. सॉट् वाचता आला की, थॉट, बॉट, ब्रॉट, ड्रॉट, फॉट, नॉट येतात. शुड आला की वुड, कुड. tion, shion, ssion यांचा उच्चार 'शन' होतो असे एकदा समजले की पॅशन, कंपॅशन, फॅशन, डिरेक्शन, इलेक्शन, लोशन सगळे यायला लागतात. इंग्रजी शब्दाचे स्पेलिंग पाठ करणे हे फक्त अगदी सुरुवातीला, फार तर एकदोन वर्षे लागते. पुढे शब्द ओळखायला यायला लागले की स्पेलिंगवरून उच्चार केवळ तर्काने समजतो. अगदी मुद्दाम स्पेलिंग पाठ करावे लागावे असे शब्द पुढील आयुष्यात अभावानेच समोर येतात. आणि मग इंग्रजी वाचनासाठी उच्चारकोश क्वचितच लागतो.
त्या अर्थाने..

इंग्रजी स्पेलिंग वाचून आपण शब्दाचा अंदाजाने जवळजवळ योग्य उच्चार करू शकतो आणि उच्चार ऐकून त्या शब्दाचे बर्‍यापैकी ठीकठाक लिखाण करणे अनेकदा जमते, तसाच प्रकार मराठीसाठी.

एकदा गवऽत् आला की सवऽत्, चळऽत्, बचऽत्, सखऽल्, चपऽळ् सगळे उच्चार यायला लागतात. भा।वना समजला की सा।धना, अर्‌।चना, आ।हना आणि मे।घना येतात. तसेच बाग्‌वान्‌ आला की, साग्‌वान्‌, काम्‌गार्‌, जाम्‌दार्‌ आणि दार्‌वान्‌.--वाचक्नवी

बट पट नट

इंग्रजी शब्दाचे स्पेलिंग पाठ करणे हे फक्त अगदी सुरुवातीला, फार तर एकदोन वर्षे लागते. पुढे शब्द ओळखायला यायला लागले की स्पेलिंगवरून उच्चार केवळ तर्काने समजतो.

हे ठीक. मात्र लाफ आपसूक वाचता येत नाही. ते "लाफ" आहे हे शिकवावे लागते. हे सर्व होण्यास :-) (एक)दोन-तीन वर्षे मात्र लागतात हे निश्चित. बरीचशी लहान मुले but बट, cut कट, nut नट, hut हट आणि put पट असेच वाचतात, put पुट होते हे अंदाजाने येत नाही. ते शिकवावेच लागते.

हकारान्त आणि यकारान्त

हकारान्त (१)संस्कृत शब्द, ह चा पूर्ण उच्चार : दाह, व्यूह, समूह, कलह, विरह, ऊहापोह, दुराग्रह, प्रपितामह्.
(२)हिंदी शब्द : चाह, राह, वाह, -- ह चा पूर्ण उच्चार किंवा (इंग्रजीत अन्त्य आर्‌चा जसा तटस्थ स्वर-शेवासारखा असतो तसा) अर्धवट उच्चार-चाऽ(ह), राऽ(ह), वाऽ(ह). पुढे अक्षरे आली की पूर्ण उच्चार. उदा. चाहत, राहगीर, वाहवा(ह).
(३)हिंदी/मराठी शब्द : ’ह’ला एक स्वर जोडून उच्चार दीर्घ करणे : मसीह->मसीहा, चाह->चाहा, पाह->पाहा, पहा. पोह->पोहो.

यकारान्त संस्कृत शब्द : य चा पूर्ण उच्चार- पेय, गेय, परिमेय, कुटुंबीय, काकतालीय, इ. अंती एय-ईय असलेले.
अतिपरिचित संस्कृत शब्द : समय्‌, उपाय्, समुदाय्‌, सुवर्णमय्‌, महोदय्‌, अंती अय -आय असलेले.
मराठी शब्द : काय्‌, पाय्‌, माय्‌, साय्‌‌‌, शिवाय्‌, हय्‌‌गय्‌ -- य निभृत.
मराठीत ऊवने शेवट होणारे शब्द नसावेत, पण बभूव सारखा शब्द असता असता तर त्यातल्या व चा निभृत उच्चार झाला नसता. --वाचक्नवी

मराठी स्पेलिंग

मराठी शब्दाला स्पेलिंग (देवनागरी) असावे मग उच्चार भले काय ते करा असे माझे एक मित्र म्हणतात. त्यांचे मुद्रणक्षेत्रात चांगले नाव आहे. मराठीत शब्दांचे (प्रत्ययांसकट) प्रमाणीकरण स्पेलचेकरने होणार आहे.
त्यात चुकीचे वाटले/असले तरी ते कदाचित सर्वग्राह्य होईल असे दिसते.

प्रमोद

चुकीचे असून घेण्यासारखे?

त्यात चुकीचे वाटले/असले तरी ते कदाचित सर्वग्राह्य होईल असे दिसते.

हे नाही समजले. एखादी गोष्ट चुकीची आहे किंवा चुकीची वाटते आहे, तरी ती गोष्ट सर्वजण निमूटपणे पत्करतील, असे कुणाला दिसते आहे?
आणि 'उच्चाराला महत्त्व नाही, फक्त लेखनाला आहे' असे मुद्रक, लेखक, काव्यगायन सादर न करणारे कवी, कारकून, आणि मूकबधिर माणसे म्हणणारच. साहित्याचे सामान्य वाचक, व्यासपीठावरून कथावाचन करणारे, वक्ते, अभिनेते, गायक, काव्यगायन करणारे, शिक्षक, रंजक गप्पा मारणारे गप्पिष्ट, आणि या सर्वांचे श्रोते यांनाच उच्चाराचे माहात्म्य समजणार!--वाचक्नवी

इंग्रजीप्रमाणे

इंग्रजीत जसे स्पेलिंगला महत्व आहे आणि ते चुकीचे वाटले (उच्चारानुसार) तरी ग्राह्य धरायची पद्धत आहे. असेच मराठीतही होऊ शकते. हा त्याचा अर्थ आहे.

ललित साहित्यासाठी उच्चारानुसार तर ज्ञानदायी साहित्यासाठी स्पेलिंगनुसार असा हा आग्रह आहे.

प्रमोद

कुणाच्या उच्चारानुसार?

इंग्रजीतल्या चुकीच्या स्पेलिंगकडे वाचणारा कधीकधी कानाडोळा करतो, ते ग्राह्य धरत नाही.
आणि जे ललित लेखन बोलीभाषेत लिहायचे त्यासाठी कुणाची बोली ग्राह्य धरायची? प्रमाणभाषा ही सर्वांना समाईक असते, बोलीभाषा ही काळागणिक, कुटुंबागणिक, जातिगणिक, वयागणिक आणि प्रदेशागणिक भिन्न असते. पुरुषांची वेगळी, स्त्रियांची वेगळी, आजीची वेगळी, नातवंडांची वेगळी, आजूबाजूच्या लोकांची आणि दूरच्या नातेवाइकांची आणखीनच वेगळी. कोणती भाषा लिहिणार? केवळ संवादाकरता नाही तर सबंध लिखाणच तसल्या भाषेत लिहिणे ही मान्य होण्यासासारखी गोष्टी नाही. आपले लिखाण चिरंतन वाचले जावे असे वाटत असेल तर ते त्या काळातल्या प्रमाण भाषेत असले तर उत्तम. --वाचक्नवी

ललित लेखकाला वाटेल त्याच्या उच्चारानुसार

बहुतेक ललित लेखकांना स्वतःचा उच्चार, आणि शाळेत शिकलेल्या प्रमाणबोलीमधील उच्चार नीट माहीत असेल. पण काही कुशल लेखकांना अनेक वेगवेगळ्या लोकांचे उच्चार माहीत असतील. अशा लेखकाच्या ललित कथानकात अनेक पात्रे असतील, तर त्या-त्या पात्राच्या उच्चारानुसार लेखन करण्याचे कौशल्य एखाद्या लेखकापाशी असू शकेल.

ललित लेखनावर नियंत्रण करण्याचे काय प्रयोजन असू शकते ते कळत नाही. लेखन किती चिरंतन वाचले जावे, त्याचा वाचकगण कोण असावा... असले निर्णय लेखकाने केले तर पुरे.

ललित लेखकापाशी प्रतिभा नसली, तर कोणी लेखन वाचणार नाही, आणि प्रतिभा असली, तर ज्यांना-ज्यांना वाचायला जमेल, ते वाचक वाचतील. बहिणाबाईची गाणी तळटिपा बघत-बघत मी वाचली. तसेच काही दलित गद्य-साहित्य अर्थ विचारून-समजून वाचले आहे. लेखकांकडे प्रतिभा होती म्हणून.

कार्यालयीन, वृत्तपत्रीय, आणि तांत्रिक लेखनात माहिती-संदेशन प्राथमिक असते. शैली दुय्यम. "भाषासमाजातला कुठलाही सुशिक्षित-साक्षर वाचक" अभिप्रेत असतो. म्हणून अशा संदर्भात प्रमाणीकरण हवे. आणि अशा जीवनोपयोगी संदर्भात भाषण-श्रवण/लेखन-वाचन करता यावे, हे बरे. म्हणून शालेय विद्यार्थ्यांना प्रमाणबोली आणि प्रमाणलेखन शिकवण्याचे शिक्षकाचे कर्तव्य आहे.

चिरंतन?

तत्कालीन विषयावर केलेले हलकेफुलके वृत्तपत्रीय लिखाण वगळता आपले सर्वच उर्वरित लिखाण चिरंतन असावे, असे मला वाटते, प्रत्येक लेखकाला वाटत असावे. जे ललित लिखाण आपल्याला जुन्या काळात घेऊन जाऊन तो काळ जिवंत करते ते नेहमीच वाचनीय असते. त्यासाठी बोलीभाषा अपरिहार्य असते. मुळात, संवादांसाठी आणि आत्मचरित्रांत बोलीभाषा चालतेच चालते, पण सध्या ती वृत्तपत्रांतील बातम्यांत आणि वैज्ञानिक लेखांत सररास दिसते आहे त्याचे काय?
अवांतर : स्त्रियांना संसदेत तेहेतीस टक्के आरक्षण देण्याच्या विरोधात लालूप्रसाद यादव म्हणून गेले की, "या वर्षी निवडून आलेल्या ३३ टक्के बायका पुढल्या वर्षी सर्वसामान्य जागांवर निवडून येतील, म्हणजे संसदेत ६६ टक्के स्त्रिया झाल्या. अशा रीतीने पंधरा वर्षांनंतर लोकसभेत मात्र एक टक्का पुरुष असेल. उरलेले माजी सदस्य घरी चूल्हाचौका करत बसले असतील."
याच धर्तीवर प्रत्येकजण आपापल्या बोलीभाषेत लिहायला लागला की शंभर वर्षांनंतर ९९ टक्के लिखाण लिहिणार्‍याव्यतिरिक्त इतर कुणालाच समजणार नाही. बोलीभाषेला फाजील महत्त्व दिले की काय दुष्परिणाम होतील याची जाणीव असलेली बरी. --वाचक्नवी

हे जरा ज्यास्तच होतंय...!

>>>बोलीभाषेला फाजील महत्त्व दिले की काय दुष्परिणाम होतील याची जाणीव असलेली बरी

हे जरा ज्यास्तच होत आहे, असे वाटले.
['जा' च्या ऐवजी 'ज्या' मुद्दामहून टंकला आहे]

[खूप टंकायचे आहे पण लिहिण्याचा टंकाळा. तेव्हा ही केवळ पोच ]

-दिलीप बिरुटे

गांभीर्य

वर चंद्रशेखर यांनी ब्लॉग्ज आणि मिसळपाववरील अशुद्धलेखनाबाबत म्हटले आहे. महाराष्ट्र टाईम्समध्ये अनेकदा अशुद्धलेखन आढळते. आजच डाग या शब्दाऐवजी गाड हा शब्द वाचला. ही काही सॉफ्टवेअरची चूक नाही आणि म्हटले तर शुद्धलेखनाचीही नाही. हा केवळ निष्काळजीपणा आहे किंवा घाई. ज्या झपाट्याने बातमीचा प्रसार करायचा असतो त्या झपाट्यात चुका सोबत येणारच.

इमेल, चॅट, ट्विट करणे, एसएमएस करणे - दिवसेंदिवस संदेश झटपट पाठवणे इतके "गरजेचे" झाले आहे की त्या झटपट पाठवण्यात शुद्धलेखन समाविष्ट नसावे. उदा. खालील वाक्ये बघा -

१. Doin gr8..xams strtn..hpng wil go thru dm nycly..

२. cn u pls teme wn v lst b4 dis bayrn ka game?v hv beatn milan twice n also livpul..so u btr keep mum

लावा अर्थ! एंजॉय!!

एसएमएस

१. ठीक - nycly शब्दाचा (स्पेलिंगचा नव्हे) वापर विशेष आवडलेला नाही. पण हा शब्द मी लहानपणी भलत्या ठिकाणी वापरत असे, म्हणून या लेखकाला सूट :-)
२. bayrn ka समजले नाही :-(

गंभीरपणे : या एसेमेस स्पेलिंगांचे "नैसर्गिक प्रमाणीकरण" खूपच आहे. आश्चर्य वाटते. निराघात स्वर गाळले, तर इंग्रजीत फारसे काही बिघडत नाही.

अंदाज

bayrn ka समजले नाही :-(

बहुधा हे असावे. बायर्न का गेम - हिंग्लीश

बायर्न का गेम?

नुसते बायर्न का गेम लिहून कसे चालेल? त्याच्याआधी 'सॉ' सारखे क्रियापद नको? -वाचक्नवी

फक्त पहिले..

शब्दातले फक्त पहिले आणि शेवटचे अक्षर जागेवर असले की इंग्रजी शब्द वाचता येतो. मधली अक्षरे कुठल्याही क्रमाने स्वर गाळून आली तरी! वरच्या एस् एम् एस् मध्ये हे स्पष्ट जाणवते आहे.--वाचक्नवी

हम्म!

सर्वप्रथम वरील वाक्य हे एसएमएस आहे असे मी कुठेच म्हटलेले नाही. :) वाक्याच्या संक्षिप्तपणावरून तो एसएमएस आहे असा अर्थ लावलेला दिसतो आहे. मला हे वाक्य एका स्क्रॅपमध्ये मिळाले. स्क्रॅप लिहीताना किती शब्द लिहिले याचे बंधन नसते; घाई असू शकते. एसएमएस असाच लिहिला जातो असा युक्तिवाद येथे नको आहे.

बर्‍याचदा अनेकजण असे इंग्रजी एसएमएस, चॅट, स्क्रॅप आणि इमेल्स सर्वत्र वापरताना दिसतात. U hv, I m वगैरे शब्दांचा सर्रास वापर करणारी तरुण मंडळी हापिसातले इमेल्सही अशा शब्दांत लिहिताना पाहिलेले आहेत. (असे लिहिणारे अमेरिकन पाहिलेले नाहीत.)

मूळ मुद्दा घाईने लिखाण पूर्ण करण्याचा आहे, स्वरांशिवाय इंग्रजी वाचता येते का नाही हा नाही.

 
^ वर