मेंदूच्या वाढीतील वेगवेगळे टप्पे (2)

मेंदूच्या वाढीतील वेगवेगळे टप्पे (2)
बाल्यावस्थेतील मेंदू

From loksatta

आईच्या पोटातून बाहेर पडलेल्या क्षणापासूनच बाळाचा मेंदू तल्लख व लवचिक राहतो. या थोड्याशा अवधीतसुद्धा चेतापेशींच्या लाखो जोडण्या होत असतात व लाखो जोडण्या तुटत असतात. अवती-भोवतीच्या निरीक्षणामधूनच बाळाच्या मेंदूची वाढ होऊ लागते. कदाचित शिकणे, आठवणीत ठेवणे व भाषाज्ञान या गोष्टी बाळ जन्म घेण्याअगोदरसुद्धा घडत असावेत. प्रसवपूर्व काळात मेंदूमध्ये दर मिनिटाला अडीच लाख या प्रमाणात पेशी नव्याने तयार होत राहतात. व दर सेकंदाला 18 लाख जोडण्या जोडल्या जात असतात. यातील सुमारे पन्नास टक्के पेशी नाहिशा होत असल्या तरी उरलेल्या पेशींचा वापर मेंदूच्या रचनेसाठी होत असतो. बाळ जन्मल्यानंतरचा पुढील दहा वर्षाचा काळ मेंदूच्या वाढीसाठी व त्याच्या विकासासाठी महत्वाचा ठरतो. याच कालखंडात प्रत्येक छोटे मोठे अनुभव गाठीशी बांधले जात असतात. ही अनुभवाची शिदोरीच माणसाला घडवत असते. म्हणूनच या बाल्यावस्थेतच मेंदूचा जास्तीत जास्त विकास करण्याची व तिला प्रभावशाली बनवण्याची जवाबदारी पूर्णतया पालकावरच असते.

From loksatta

प्रसवपूर्व काळातील अनुभव मेंदूच्या विकासासाठी अत्यंत महत्वाचे आहेत. गर्भधारणेनंतरच्या 22-24 आठवड्यावंतर भ्रूणाचा मेंदू बाहेरच्या आवाजाला किंवा स्पर्शाला प्रतिसाद देऊ शकतो. परंतु तीच गोष्ट पुन्हा पुन्हा घडत असल्यास त्यात नाविन्य नसल्यामुळे मेदू दुर्लक्ष करू लागतो. 32 व्या आठवड्यानंतर अर्भकाचा मेंदू गुंतागुंतीच्या, क्लिष्ट व/वा पुन्हा पुन्हा घडत असलेल्या आठवणी साठवू लागतो. काही गाण्यांच्या लयी, आईचा आवाज अशा गोष्टी गर्भधारणेच्या तिसाव्या आठवड्यापासून बाळ जन्माला येईपर्यंत मेंदूत साठवल्या जाऊ शकतात.
प्रसवपूर्व काळापासूनच भाषेच्या आकलनाची सुरुवात होऊ शकते. नुकतेच जन्माला आलेले बाळ अनोळखी शब्दांपेक्षा ओळखीचे शब्द ऐकताना जास्त जोराने आंगठा चोखू लागते. मात्र वयाच्या तिसऱ्या वर्षापर्यंत कुठल्याही भाषेला प्रतिसाद देण्याची क्षमता तिच्या अंगी असते. याचा अर्थ गर्भावस्थेतील अर्भकाच्या मेंदूला अनेक भाषांचा मारा केल्यास वा करत राहिल्यास नंतरच्या काळात जन्मलेल्या बाळामध्ये बहुविध भाषा शिकण्याची क्षमता विकसित होते, हे मात्र निखालस खोटे आहे. पालकांच्या तोंडातील भाषा, ते वापरत असलेल्या शब्दांचा संग्रह, व पालकांकडून मिळत असलेले उत्तेजन या सर्वांचा संकलित परिणाम बाल्यावस्थेतील मेदूवर होऊ शकतो.

From loksatta

याचप्रमाणे गर्भावस्थेतच मेंदूला 'शहाणे' करू पाहणाऱ्या गर्भसंस्काराच्या जाहिरातदारांचा दावा पूर्ण खोटा आहे. जाहिरात करणारे त्यांच्या दाव्याच्या पुष्ट्यर्थ कुठलेही ठोस पुरावे देवू शकत नाहीत. या उलट गर्भातील मेंदू बाहेरच्या संवेदनांना जास्त प्रतिसाद देवू शकत नाही, याचे विश्वसनीय वैद्यकीय पुरावे गोळा केलेले आहेत. मेंदूला अती सक्षम वा 'हुशार' बनवण्याच्या वेडापायी गर्भकाळात दिली जाणारी अनावश्यक औषधं वा इतर काही उत्तेजकांच्या सेवनामुळे मेंदूच्या पेशी मरतात व त्यामुळे मेंदूवर उलट परिणाम होण्याची शक्यता जास्त आहे.
गर्भावस्थेतील भ्रूणाचा मेंदू व बाळाच्या जन्मानंतरचा मेंदू यात तसा फार मोठा फरक जाणवत नाही. मूल जन्माला यायच्या आधीपासूनच मेंदूच्या बाह्यक (cortex) मध्ये स्पर्श संवेदना जाणवते. जन्मानंतरच्या पुढील 2-3 महिन्यात मेंदूचा बाह्यक स्वयंचलन, कार्य-कारण व दृष्टिकोन इत्यादींचे नियंत्रण करू लागतो. पुढील 6 महिन्यात अग्रमस्तिष्क (frontal lobe) भावनांचा विकास, त्यांचे उत्तेजन, व्यावहारिक स्मृती व एकाग्रता यासंबंधीची कामं करू लागते. आपण कुणीतरी आहोत ही जाणीव विकसित होण्यासाठी मेंदूतील पार्श्व व अग्र मस्तिष्क (perinatal & frontal) यामधील मंडल (circuitry) पूर्ण व्हावी लागते. त्यासाठी सुमारे 18 महिन्याचा काळ लागतो. आपल्याप्रमाणे इतरांनासुद्धा जाणीव असू शकते याचे भान येण्यासाठी वयाची 3-4 वर्षे जावे लागतात.
या सुरुवातीच्या काळातील जीवनानुभवावरच पुढील काळातील आपले भावनिक सौख्य अवलंबून असते. याच काळातील पालकांच्या उद्धट वर्तनाचे गंभीर परिणाम पाल्याच्या मेंदूला आयुष्यभर भोगावे लागतात. या काळातील अपत्यावरील ताण तणाव किंवा आईकडून झालेले दुर्लक्ष यामुळे त्याला आयुष्यभर भावनिक धक्का सहन करावा लागतो. अशा प्रकारच्या ताण तणावामुळे ती व्यक्ती पुढील आयुष्यात विषण्णतेचा (depression) किंवा चिंतोन्मादाचा (anxiety disorder) बळी होऊ शकतो.

From loksatta

अशा अत्यंत नाजूक व संवेदनशील स्थितीतल्या मेंदूच्या योग्य वाढीसाठी पालकांनी नेमके काय करायला हवे? सामान्यपणे पालकांनी याविषयी जास्त मनस्ताप करून घेऊन पाल्याच्या खेळण्या-बागडण्याच्या वेळा कमी करून वेगळे काही तरी करण्याची गरज नाही. पालन पोषणास मदत करू शकणाऱ्या वातावरणाची निर्मिती, एकमेकाशी समरस होऊन खेळले जात असलेले ठोकळ्यांचे, रिंग्सचे खेळ, समूहाने म्हटली जाणारी बडबड/समूह गीते, विविध आकार प्रकार- रंगसंगती यांना ओळखण्यासाठीचे प्राथमिक धडे इत्यादीमुळे पाल्यांच्या बुद्ध्यांकात लक्षणीय प्रमाणात वाढ होऊ शकते. नवीन नवीन गोष्टी, कलाकौशल्य, खेळ, इत्यादी गोष्टी शिकण्याचा, आत्मसात करण्याचा, त्यातून आनंद लुटण्याचा हाच काळ असतो. व ही शिकत राहण्याची सवयच त्याला आयुष्यभर साथ देते. आणखी नवीन गोष्टी शिकण्यासाठी उत्तेजन देते, प्रवृत्त करत राहते.
काही तज्ञांच्या मते या बालवयात अभिजात संगीताचा मारा करत राहिल्यास शिकण्याचे कौशल्य व त्रिमिती ज्ञान यांच्यात भर पडू शकते. यालाच शास्त्रीय परिभाषेत 'मोझार्ट इफेक्ट' असे म्हटले जाते. परंतु यासंबंधी तज्ञामध्येच मतभिन्नता आहे. दावे -प्रतिदावे केल्या जात आहेत. बाजारव्यवस्थेत तर यासंबंधी जाहिरातबाजी करत सामान्यांची दिशाभूल केली जात आहे. मात्र उपजतच पाल्याला संगीताची आवड असल्यास त्याच्या आवडीला उत्तेजन देणे नेहमीच परिणामकारक ठरू शकेल. काहींच्या मते संगीतातील अभिरुचीमुळे गणीतीय व तार्किक कुशलतेत नक्कीच भर पडू शकते. परंतु मेंदूवाढीसाठीच म्हणून पाल्याला मारून मुटकून संगीतांच्या धड्यांचा मारा करत राहिल्यास त्यातून हाती काहीही लागणार नाही.

From loksatta

प्रौढपणातील पूर्ण वाढलेल्या मेंदूच्या वजनाच्या 95 टक्के एवढा मेंदू वयाच्या सहाव्या वर्षीच तयार झालेला असतो. याच काळात मेंदूची ऊर्जेची भूक ( व वापरसुद्धा!) कमाल पातळीला पोचलेली असते. या वयात मुलं तर्कशक्ती लढवू लागतात. स्वत:च्या विचारप्रक्रियेचा ज्ञान त्यांना होऊ लागते. मेंदूच्या विकासाच्या या टप्प्यात बाहेरून मिळत असलेल्या अनुभवाला अनुसरून लाखो जोडण्या जोडल्या जातात व लाखो जोडण्या तोडल्या जातात. वयाच्या 14 व्या वर्षापर्यंत मुलामध्ये व वयाच्या 11 व्या वर्षापर्यंत मुलीमध्ये ही चेताकोशांच्या जोडणी - तोडणीची प्रक्रिया अव्याहतपणे चालू राहते. यानंतरचा पौगंडावस्थेतील मेंदू पुन्हा एकदा बदलण्याच्या स्थितीत पोचतो.

क्रमशः

Comments

छान! मालिका चालू राहू दे

चेतापेशींच्या तोडणीबद्दल प्रथमच कळते आहे. त्याची कारणे व परिणाम यांबद्दल अधिक वाचायला आवडेल.
शास्त्रज्ञांची निरीक्षणे आपल्या हितासाठी वापरायची कशी याचे अधिक मार्गदर्शन मिळेल काय?
नैधृव कश्यप

गर्भ संस्कार

याचप्रमाणे गर्भावस्थेतच मेंदूला 'शहाणे' करू पाहणाऱ्या गर्भसंस्काराच्या जाहिरातदारांचा दावा पूर्ण खोटा आहे. जाहिरात करणारे त्यांच्या दाव्याच्या पुष्ट्यर्थ कुठलेही ठोस पुरावे देवू शकत नाहीत. या उलट गर्भातील मेंदू बाहेरच्या संवेदनांना जास्त प्रतिसाद देवू शकत नाही, याचे विश्वसनीय वैद्यकीय पुरावे गोळा केलेले आहेत. मेंदूला अती सक्षम वा 'हुशार' बनवण्याच्या वेडापायी गर्भकाळात दिली जाणारी अनावश्यक औषधं वा इतर काही उत्तेजकांच्या सेवनामुळे मेंदूच्या पेशी मरतात व त्यामुळे मेंदूवर उलट परिणाम होण्याची शक्यता जास्त आहे.

गर्भवती स्त्रीचे शारीरीक व मानसिक आरोग्य हे गर्भावर परिणाम करते का? असा साधा प्रश्न लोकांच्या मनात असतो. त्यांना याचे उत्तर हो किंवा नाही अशा स्वरुपात हवे असते.
याचे उत्तर हो असेल तर सुपरिणाम वा दुष्परिणाम हा नंतरचा भाग आहे. गर्भवती स्त्रीच्या शरीर व मनावर परिणाम करणारे घटक कुठले वगैरे मुद्दे देखील मग महत्वाचे ठरतात.
प्रकाश घाटपांडे

वेगळे

गर्भवती स्त्रीचे शारीरीक व मानसिक आरोग्य हे गर्भावर परिणाम करते का? असा साधा प्रश्न लोकांच्या मनात असतो. त्यांना याचे उत्तर हो किंवा नाही अशा स्वरुपात हवे असते.
याचे उत्तर हो असेल तर सुपरिणाम वा दुष्परिणाम हा नंतरचा भाग आहे.

लेखातला मुद्दा हा नाही. स्त्रीचे आरोग्य गर्भावर परिणाम करणे वेगळे आणि गर्भावस्थेत वाळाला 'शिकवण्याचा' प्रयत्न करणे वेगळे.
(लेखक गर्भसंस्कार या फॅडाबद्दल बोलत आहेत. तसा परिणाम होत असल्याचा एकमेव पुरावा बहुधा अभिमन्यू-चक्रव्यूह गोष्ट असावी).

नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)

मुद्दा

लेखातला मुद्दा हा नाही. स्त्रीचे आरोग्य गर्भावर परिणाम करणे वेगळे आणि गर्भावस्थेत वाळाला 'शिकवण्याचा' प्रयत्न करणे वेगळे.

मला स्वतःला स्त्रीच्या मानसिक शारिरिक आरोग्याचा परिणाम हा गर्भावर होतो या संकल्पनेतुनच पुढील बाळाला गर्भावस्थेत संस्कार करण्याचा मुद्दा विकसित होतो असे वाटते. हा काहीसा चंद्र सुर्याच्या गुरुत्वाकर्षणाचा परिणाम भरती ओहोटीवर होतो मग शरीरातल्या लिक्विडवर का होउ नये या कल्पनेतुन रक्तस्त्राव व अमावस्या पौर्णिमेच्या संबधासारखा वाटतो.
एखादे माहितीपुर्ण लिखाण सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नाचे उत्तर त्याला समाधानकारक वाटेल अशा पद्धतीने देउ शकतो का? हाही उपमुद्दा त्यात आहे.
प्रकाश घाटपांडे

नाही

असहमत. बाळावर गर्भावस्थेत संस्कार करण्याचा विचार केवळ अभिमन्यूच्या गोष्टीतूनच आणि सुपरकिडस् तयार करण्याच्या हव्यासातून येतो. त्याचा आईच्या आरोग्याशी काही संबंध नाही.

नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)

माहितीपू्र्ण

माहितीपूर्ण व काही समज गैरसमज दूर करणारी लेखमालिका आहे.
एकूण आमच्या मेंदूचा विकास दिवसेंदिवस चढत्या क्रमाने होतो आहे :)

स्त्रीचे आरोग्य गर्भावर परिणाम करणे वेगळे आणि गर्भावस्थेत वाळाला 'शिकवण्याचा' प्रयत्न करणे वेगळे.

+१ सहमत.

 
^ वर