ऊर्जेची गणितं १ : प्रास्ताविक
नुकत्याच झालेल्या अर्थ अवर साठी मीमराठी संकेतस्थळ बंद ठेवून वीज वाचवण्याचा जो प्रयत्न झाला त्यावर अनेक 'स्तुत्य प्रयत्न' अश्या चांगल्या प्रतिक्रिया आल्या. त्यावर मी 'याचा उपयोग काय?' असा प्रश्न उपस्थित करून खूप लोकांच्या प्रामाणिक सद्भावना दुखावल्या असं वाटलं. उद्देश अर्थातच भावनांची टिंगल करण्याचा नव्हता, तर त्यातून निर्माण होणाऱ्या परिणामांचा फोलपणा दाखवण्याचा होता. त्यावरील प्रतिक्रियांत 'तुम्हीच एक लेखमाला लिहा' असा सल्ला आला. म्हणून माझे विचार थोड्या विस्ताराने मांडून सर्वांना विचार करण्यास उद्युक्त करणं हा या लेखमालेचा उद्देश आहे.
सर्वसाधारणपणे काय लिहायचं आहे हे ठरलेलं असलं तरी या लेखमालेचा आकार नक्की काय असेल यावर फारसा विचार केलेला नाही. सौरऊर्जा कशी वापरता येईल (बेसुमार खर्च न करता) याविषयीच्या काही कल्पना मांडायच्या, व त्यामागचं गणित लोकांपुढे ठेवायचं या अनुषंगाने एक (किंवा दोन) लेख निश्चितच लिहीन. गणित व भावना हा मी फरक करतो , त्यामागची भूमिका व माझी निरीक्षणं मांडेन. थोडक्यात सांगायचं झालं तर एखादा प्रश्न सोडवण्यासाठी काही तांत्रिक मार्ग असतात. ते मार्ग डोळसपणे अवलंबण्याऐवजी 'म्या मूर्खाने हे प्रश्न निर्माण केले' असं म्हणून स्वत:ला शिव्या देण्याचं काम आपण (किंवा बरेच लोक) वैयक्तिक जीवनातही करतो. तेच आपण मनुष्यजातीच्या पातळीवर करतो आहोत का, हे त्यातून बघायचं आहे. प्रत्येकच पिढीत विचारवंत 'हा अमुकतमुक महाभयानक, अशक्य प्रश्न आहे, व त्यातून विनाश अटळ आहे' असं वेगवेगळ्या प्रश्नांविषयी म्हणत आलेले आहेत (माल्थस वगैरे). मनुष्यजात अविरत कष्ट करून, नवीन तांत्रिक क्लुप्त्या वापरून ते प्रश्न सोडवते. ते प्रश्न जिवंत असताना त्यांच्याविषयी जितका हलकल्लोळ होताना दिसते, तितक्या प्रमाणात ते सुटल्याचा आनंद कोणी साजरा करत नाही. ते सोडवणाऱ्यांचा उदोउदो फार कमी वेळा होताना दिसतो. लोक नव्या भेडसावणाऱ्या 'महाभयानक, अशक्य' प्रश्नाकडे वळताना दिसतात. याची काही उदाहरणं मांडता आली तर पाहीन. सर्वसाधारण कॅटेस्ट्रोफ प्रेडीक्शन या नावाखाली जी भंपक गणितं केली जातात (चुकीची नव्हे, भंपक गृहितकांसहित) त्याविषयी एक चविष्ट लेख लिहिण्याची खूप दिवसांची इच्छा आहेच. मनुष्याच्या आत्मकेंद्री स्वभावाची विचारप्रवाहामध्ये उत्क्रांती कशी झालेली दिसून येते यावरही थोडं लेखन करावंसं वाटतंय. या सर्व फापटपसाऱ्यामुळे ऊर्जेची गणितं हे नाव कितपत सार्थ आहे हे माहीत नाही. पण आपण सुरूवात ऊर्जेच्या संदर्भात करतोय म्हणून व मला दुसरं नाव सुचलं नाही म्हणून हेच ठेवतो आहे. कोणाला जर अधिक चांगलं नाव सुचलं तर सुचवावं. त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे जर याच विचारधारांच्या कक्षेमध्ये सामावू शकणारे विषय सुचले तर तेही सुचवावेत.
पण लेखनाचा सूर जरी टीकेचा झाला तरी ती टीका सकारात्मक ठेवण्याचा प्रयत्न करेन. पर्यावरणाचा प्रश्न नाहीच अशी भूमिका माझी नाही. ग्लोबल वॉर्मिंग नाकारण्याचा हेतू नाही. त्यात काही अंशी मनुष्य जबाबदार हेही मान्य आहे. फक्त तो प्रश्न, त्याची व्याप्ती, त्याचे परिणाम व तो सोडवण्यासाठी येणाऱ्या खर्चातून मिळणारा फायदा हा इतर प्रश्नांच्या शेजारी ठेवून किती महत्त्वाचा आहे याचा विचार करायला लावण्याचा प्रयत्न असेल. म्हणजे तोच खर्च इतर प्रश्नांवर करून जर जास्त फायदा मिळत असेल तर पर्यावरण विषयावर (आत्ता) तो खर्च करून आपण मानवजातीचं (व अंती पर्यावरणाचं) नुकसान करतो आहोत का, हा विचार मांडण्याचा प्रयत्न राहील. यात 'लोकहो, परिस्थिती तितकी वाईट नाही. पूर्वीपेक्षा खूपच चांगली आहे. आपण बरेच प्रश्न सोडवले आहेत, त्याचप्रमाणे हाही सोडवता येईल. चला आपण काही करूया.' असं सांगण्याचा प्रयत्न राहील. त्यात कदाचित काही वेळा, 'हा प्रश्न सोडवण्याआधी जर हे इतर प्रश्न सोडवले तर ते अधिक फायद्याचं ठरेल' असाही संदेश येईल.
सद्यपरिस्थितीत पर्यावरणाचा मुद्दा हा अमेरिकेत ज्याला 'थर्ड रेल' म्हणतात असा आहे. (इथल्या ट्रेन्सना वीज पुरवण्यासाठी हा तिसरा रूळ असतो. त्याला स्पर्श करणं धोक्याचं असतं. त्यावर मुतू तर नयेच...) शांतपणे सगळे करतात त्याप्रमाणे पर्यावरण देवाला नमस्कार करायचा, त्याच्या पुजाऱ्यांना मुकाट्याने दक्षिणा द्यायची आणि पुढे जायचं ही 'महाजनो येन गतेन' प्रथा आहे. मला या देवळाची पवित्रता नाकारायची नाही, पण त्याचं स्तोम प्रमाणाबाहेर माजणं हे कदाचित ग्लोबल वॉर्मिंगपेक्षा अधिक हानिकारक असू शकेल असा मुद्दा मांडायचा आहे. या देवळामुळे अनेक प्रश्न अस्पृश्यासारखे बाहेर राहिलेले आहेत. ही पुजाऱ्यांना मान व पैसा, व अस्पृश्यांना हीन वागणूक अशी तफावत कमी करावी असा विचार आहे. शेवटी सर्व माणसंच आहेत...
वाचक माझं म्हणणं विचारपूर्वक लक्षात घेऊन भावनिक प्रतिक्रिया देणार नाहीत अशी आशा करतो...
Comments
उत्सुकता
लेखमालेविषयी उत्सुकता वाटते आहे. पुढील भागांसाठी शुभेच्छा!
अवांतरः
याविषयीही उत्सुकता वाटते. अशा विधानांना दुव्यांसकट संदर्भ देता आला तर अधिक आवडेल. नाही म्हणजे, आम्ही झाडावर बसून किंवा आखाड्याबाहेर बसून फेटे उडवू. ;-) ह. घ्या!
काही संस्थळे कायमची बंद झाल्यास कसे?
काही संस्थळे कायमची बंद झाल्यास कसे? वाया जाणाऱ्या ऊर्जा वाचवता येईल, ऊर्जेची खूप मोठी बचत होईल.
बाकी प्रियालीताईंप्रमाणेच लेखमालेविषयी उत्सुकता वाटते आहे. पुढील भागांसाठी शुभेच्छा!
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
असहमत
अहो असे काय करता? तसे झाले तर रोजच्या करमणुकीचे काय?
त्यापेक्षा ते पाच पाच पानी, गोल गोल, वांझोटे प्रतिसाद लिहिणीर्यांवर बंदी घालावी. त्यातून वेळेचा, उर्जेचा, सगळ्याच गोष्टींचा अपव्यय होतो आणि कुणी वाचतही नाही त्यामुळे करमणूकही नाही!
वसुलि
वसंत सुधाकर लिमये
उत्तम लेखमाला
नक्की लिहा. त्या अल गोरची डॉक्यूमेंट्री बघून मलाही असेच वाटू लागले आहे.
वसुलि
वसंत सुधाकर लिमये
वाचते आहे
इतरत्र दिलेला प्रतिसाद इथेही :)
वाचते आहे, मग एकत्रच प्रश्न विचारीन. लेखमालेबद्दल उत्सुकता आहे.
कुतूहल वाटते
लेखमालेबद्दल कुतूहल आहे.
- - -
एका तासासाठी दिवे बंद ठेवणे म्हणजे ऊर्जेचा वापर फारसा कमी होत नाही, केवळ एक स्मृतीसंकेत आहे - सहमत. स्मृतीसंकेतांचे गणित कसे करावे - उदाहरणार्थ : प्रियव्यक्तीच्या वाढदिवसाला आठवणीने कुठलीतरी प्रिय-वागणूक करतो. वर्षभर त्रासदायक वागल्यास या सांकेतिक चांगल्या वागण्याचा काही उपयोग नाही. मान्य. तर काय म्हणता, वागणुकीच्या गणितात सांकेतिक कृतींचा हिशोब नगण्य होतो म्हणून वाढदिवसाला अभिनंदन करायचे सोडावे? माझ्या मते असे नव्हे. स्मृतिसंकेतांचे काम काय आहे? - मोठे हिशोब चोख करण्याची आठवण करून देणे. आठवण करून देण्यात स्मृतिसंकेत कार्यक्षम आहेत का? इतक्याच मर्यादित निकषावर स्मृतिसंकेताचा उपयोग पडताळावा.
पृथ्वी-तासामुळे ही चांगली लेखमाला घडून आली, तर मी-मराठी संकेतस्थळ बंद ठेवण्याचा पर्याप्त फायदा झाला, तो यशस्वी झाला, असे मी म्हणेन.
- - -
फायद्या तोट्यांचा हिशोब आणि कॅटॅस्ट्रोफीच्या हिशोबातली अनिश्चितता लक्षात घेणे महत्त्वाचे हे खरेच. काही वर्षांपूर्वी मी आयपीसीसीचा एक अहवाल वाचला होता. त्यात या प्रकारचा हिशोब केला होता असे माझे मत आहे.
- - -
पर्यावरणाचा मुद्दा अमेरिकेत "थर्ड-रेल" आहे असे म्हणणे आश्चर्यकारक वाटते. "थर्ड-रेल" हा शब्दप्रयोग "सोशल सेक्यूरिटी"बाबत ऐकलेला आहे. "सोशल सेक्यूरिटी" बंद करू असे म्हटल्यास खासदारकीला निवडून येणे जवलजवळ अशक्य आहे. पर्यावरणाच्या बाबतीत - विशेषतः कार्बन-अधिष्ठित ऊर्जेचा वापर कमी करण्याच्या बाबतीत - विरोधी भूमिका घेणारे बरेच खासदार अमेरिकेत निवडून येतात. हल्लीच्या संसदेतल्या बातम्या बघाव्या.
अमेरिकेत ६०:४० इतकेसुद्धा खासदार ग्रीनहाऊस गॅस निर्बंधांच्या बाजूने नाहीत. ४०%पेक्षा अधिक खासदारकी असलेल्या "अल्पसंख्याक" राजकीय विचाराला "थर्ड रेल" म्हणणे - हा अतिशयोक्ती अलंकाराचा सुयोग्य वापर नव्हे, असे वाटते. येथे अतिशयोक्तीचा अलंकार आहे, हे जर लक्षात आले नाही, तर लेखक वर्तमानपत्रे वाचत नाही अशी शंका वाचकात उत्पन्न होईल. आणि अलंकार आहे, असे लक्षात आले, तर लेखक अनेक उत्तम अनलंकृत हिशोब सांगणार आहेत, ते हिशोबही अतिशयोक्त असण्याबद्दल शंका उत्पन्न होईल.
श्री घासकडवी यांनी हिशोब देताना "अस्पृश्यासारखे पुजार्यांनी बाहेर बसवलेले" अशी भावनिक मनःस्थिती करून घेऊ नये.
- - -
हे सर्व मंथन योग्यच आहे. लेखमाला वाचण्याबद्दल कुतूहल आहे.
स्मृतिसंकेत
आठवण करून द्यावी लागावी अशी परिस्थिती नसतांना स्मृतीसंकेतांची आवश्यकता नसावी. ग्रामीण महाराष्ट्रात सामान्य नागरीक वीजेच्या समस्येशी रोज झगडतो. बर्याच खेड्यांमध्ये वीस तासांच्यावर वीजेची कपात केली जाते. या लोकांसाठी पर्यावरणाची आठवण करून देण्यासाठी दिवे बंद ठेवण्याऐवजी वेगळा मार्ग सूचवला जावा. आक्षेप स्मृतिसंकेताला नसून तो संकेत कुठल्या मार्गाने देता येईल याविषयी आहे.
________________________________
माझा प्रतिसाद या मार्गदर्शक सूचनांशी सुसंगत आहे का? नसल्यास कृपया खरड अथवा व्यनिने कळवा.
आमच्या रत्नांग्रीत
सगळेच पंचावले, आणि सगळेच अर्धपोटी. त्या गांधीबाबाच्या पंचाचे आम्हाला काही नाही, आणि उपासाचे तर नाहीच नाही.
:-) (उद्धरण शब्दशः नाही...)
आठवण ठेवण्यालायक बाब किती महत्त्वाची आहे, त्यावरून स्मृतिसंकेताची गरज ठरत नाही. विस्मरण झाले आहे का? यावरून स्मृतिसंकेताची गरज ठरते.
एखादी गोष्ट विसरणे लाजिरवाणे आहे, पण ती जर विसरली असेल, तर स्मृतिसंकेत वापरावा. विसरणे लाजिरवाणे आहे, म्हणून संकेत वापरून झालेली आठवण लाजिरवाणी होणार नाही.
ज्या गावांमध्ये वीज नाही, त्या ठिकाणी हा "दिवे बंद करा" स्मृतिसंकेत अर्थातच योग्य नाही. ज्या शहरात २४ तास वीज आहे, त्यांनी हा संकेत वापरण्यास काही हरकत नाही.
जे अर्धपोटी आहेत, त्यांना उपास करायला सांगणे योग्य नाही. मात्र ज्यांना रोजचे जेवण मिळते, त्यांना उपासाच्या संकेतामुळे अन्न वाया न घालवण्याबद्दल (किंवा दुसर्या कुठल्या बाबतीत) आठवण होत असेल तर त्या लोकांनी उपास करण्यात फार मोठा दोष नाही.
विस्मरण झाले आहे का?
पर्यावरणाबाबत विस्मरण झालेले नाही. रोज पर्यावरणासंदर्भात काहीतरी ऐकायला मिळतच असते. बाजारामध्ये 'पर्यावरणाची जाणीव' विकणे व नफा कमविणे शक्य आहे हे सिद्ध झाल्यानंतर ठिकठिकाणी 'ग्रीन' गोष्टी मिळू लागल्या आहेत. त्यामुळे विकसीत देशांमध्ये - जेथे बहूतांश लोकांना मुबलक वीज उपलब्ध आहे तेथे - या समस्येचे विस्मरण झालेले दिसत नाही. उदा. मी इतक्यात कॉफी घ्यायला गेलो तेव्हा 'स्टायरोफोमचा कप वापरण्याऐवजी स्वत:चा मग बाळगा' असा संदेश दिसला.
स्मृतीसंकेत, प्रतीकात्मक वगैरे...
लोकशिक्षणासाठी प्रतीकात्मक गोष्टी करणं चांगलं जेव्हा आपण देतो तो संदेश योग्य असतो. 'पर्यावरणाची काळजी करावी' हा योग्य संदेश. पण 'हरामखोर मनुष्याने आपल्या गरजा अमर्याद वाढवून ठेवून पर्यावरणाचा राडा केलेला आहे' हा चुकीचा. या दोन टोकांमधले अनेक बरेवाईट संदेश येऊ शकतात. अशी संदिग्धता नको. शिवाय प्रतीकाची निवड सकारात्मक असावी नकारात्मक नसावी असं वाटतं. गांधींनी असहकार ही नकारात्मक चळवळ देखील मीठ बनवणे या सकारात्मक कृतीने सुरू केली. आठवण करणे, प्रत्यक्ष कार्यभाग साधणे, योग्य रीतीने आठवण करून देणे, योग्य शिकवण देणे या सर्वच बाबतीत हा स्मृतीसंकेत कमी पडतो असं माझं मत आहे.
कॅटेस्ट्रोफीच्या अनिश्चितता 'शोधून काढण्याच्या', 'ठरवण्याच्या','अंदाज बांधण्याच्या' पद्धतीतच सगळी जादू आहे...
थर्ड रेल हे पर्यावरणवादी लोकप्रतिनिधींना उद्देशून नसून, जनसामान्यात असलेल्या त्याच्या देवस्वरूपाला आहे. (जनमत व ते न परावर्तित करणारे लोकप्रतिनिधी यांचं उदाहरण द्यायचं झालं तर भ्रष्टाचार बोकाळलाय हे भारतातली जनता मानते, पण त्याविषयी काही कायदे किंवा कडक कारवाई होताना दिसत नाही. इथले प्रतिनिधीही पर्यावरणवाद वाईट असं जाहीर म्हणत नाहीत...पण तितपतच औष्ठ्यसेवा) जाहिरातींमधून या हिरव्या मनोवृत्तीला भुरळ घालण्याचे प्रयत्न ठायीठायी दिसतात. मी रिसायकल करत नाही असं सांगितलं तर लोक माझ्याकडे ज्या दृष्टीने बघतात त्यात आहे...कदाचित हा माझा वैयक्तिक अनुभव असेल.
"अस्पृश्यासारखे पुजार्यांनी बाहेर बसवलेले" अशी भावनिक मनःस्थिती - माझी नाही. माझी पुजारी (प्रश्न) व अस्पृश्य (प्रश्न) यांच्याकडे बघण्याची त्रयस्थाची भूमिका आहे. त्रयस्थ शब्द योग्य नाही, कारण सर्वांना सारखी, न्याय्य वागणूक मिळावी असं वाटतं.
राजेश
द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी
ऊर्जेची गणितं १
त्या दिवशी आम्ही १/२ तास सर्व बंद करुन बसलो होतो.एक तास जमले नाही. लहानपणी लाईट जास्त जायची नाही,तेव्हा घरात पंखे पण नव्हते ;एकच होता आजोबांसाठी.तेव्हा कधी तापलेले वातावरण वै. जाणवले नाही. आता inverter आहे.पण तरीही तासभर बसणे अशक्य बनले आहे.तेव्हा चांगल्या उद्दात्त/भावनेने काम होत असेल तर 'याचा उपयोग काय?' असा विचार मी केला नाही, पण करायला हवा.असो .
लेखमालेबद्दल कुतूहल आहेच.
गणित म्हटले की, छाती धडधडते, मला अजूनही (engg.) गणिताचा पेपर आहे मला काहीच येत नाही असली भयानक स्वन्प पडतात ऊर्जेची गणितं १ यातील गणित पुसून टाका.प्लीज
शैलु.
भीक नको, पण कुत्रा आवर
(वरवरच्या*) पर्यावरणवाद्यांनी अधिक सखोल अभ्यास करून खरोखर उपयुक्त मार्ग सुचवावेत.
वरवरचे = 'सेव्ह अर्थ' टीशर्ट घालून कँडललाईट व्हिजिल करणारे = कॉटन टीशर्ट बनवण्यात जी ऊर्जा खर्च झाली ती 'अर्थ अवर' ने वाचवलेल्या उर्जेपेक्षाही जास्त होती असे 'ऊर्जेचे गणित' करणार्या कोणी सिद्ध केल्यास आश्चर्य वाटायला नको.
असे असले तरी, तो एक तास:
आम्ही घरची मंडळी रेफ्रिजरेटरसकट सर्व विद्युत उपकरणे बंद करून घराला कुलूप लावून बाहेर पडलो.
अपत्यांनी स्वयंचलित वाहनाने फिरण्याचा हट्ट धरला. तो हाणून पाडत पायी फिरलो.
शेजारीपाजारी कोणालाही 'अर्थ अवर' या प्रकाराची माहिती नव्हती. दुकानांत आणि रस्त्यावर झगमगाट होता.
रस्त्यावर फोर व्हील ड्राईव्ह एस्युव्ही सकट सर्वप्रकारच्या गाड्या गर्दी करत होत्या.
अजाण वयातल्या माझ्या मुलीने विचारले, "बाबा, फक्त आपल्याच घरातले दिवे का गेलेत?"
असो.
बर्याच दिवसांनी पायी फिरणे झाले, हेही नसे थोडके...;)
-एक 'वरवरचा' पर्यावरणवादी!
पेला
पेला अर्धा भरलेला आहे हे उदाहरण सकारात्मक दृष्टांत आता गुळगुळीत झाला आहे. पेला अर्धा रिकामा आहे ही नकारात्मक भावना मानली जाती. खर तर पेला एकाच वेळी अर्धा रिकामा आहे व अर्धा भरलेला आहे ही वस्तुस्थिती आहे. पण ती सुद्धा नकारात्मक मानली आहे. अर्धा रिकामा आहे याकडे दुर्लक्षच करायच व अर्धा भरलेला आहे याकडे लक्ष केंद्रित करणे म्हणजे सकारात्मक.
मला यात ठेविले अनंते तैसेची रहावे चित्त्ती असु द्यावे समाधान असा दृष्टिकोण वाटतो. ही भुमिका कधी आत्मबळ देते हे देखील मान्य आहे. हे अगदी श्रद्धेसारखे आहे. सश्र॑द्ध म्हणजे प्रतिगामी असे समीकरण उगीचच रुढ होतय कि कमालीच्या अश्रद्ध लोकांचा हा कावा आहे कुणास ठाउक?
अर्थ अवर मधे अर्ध्या तासाने काय फरक पडणार आहे? असा प्रश्न मनात येतोच. मला ती गोष्ट प्रतिकात्मक वाटते. काही वॅट तरी वीज वाजते. अर्थात वाया जाणार्या उर्जेच्या तुलनेने हा हिस्सा नगण्य आहे हे मान्य. एक नेहमीचा दृष्टांत आठवतो. एका समुद्रकिनार्यावर एक माणुस लाटेबरोबर आलेले काही जलचर जीव परत समुद्रात सोडत असतो. दुसरा माणुस ते पहात असतो. तो त्याला म्हणतो ," हजारो मैल हा समुद्र किनारा आहे लाखो जलचर असे लाटेने येउन किनारी पडतात व मरतात तुझ्या एवढ्याशा प्रयत्नाने काय फरक पडणार आहे." त्यावर तो माणुस म्हणतो," बाकीच्यांच माहित नाही पण त्याला फरक पडतो."
छोट्या गोष्टीने फरक पडत नाही असे जरी असले तरी छोट्या छोट्या गोष्टींच्या एकत्रित परिणामाने फरक पडतो.
एक जाहीरात आठवते. रेल्वे क्रॉसिंग वर ट्रक ड्रायव्हर बेदर कारपणे ड्रायव्हिंग करत असतो जेव्हा दुसरा छेडतो तेव्हा तो बेफिकिर पणे उत्तर देतो क्या फर्क पडता है! दुसर्या क्षणी जाहिरातीत हार घातलेला फोटो दाखवुन त्याच्या तोंडी वाक्य म्हटलय फर्क पडता है!
प्रकाश घाटपांडे