नवीन वर्षाच्या निमित्ताने

आज गुढी पाडवा आहे. 'नवीन' वर्षानिमित्त सर्व उपक्रमींना हार्दिक शुभेच्छा!

नव्या वर्षाच्या शुभेच्छा देण्याबरोबरच खालील दोन विषयांवर उपक्रमींची मते जाणून घेण्याच्या उद्देशाने हा प्रस्ताव.

१. माझ्या लहानपणी घरी सांगायचे की गुढी पाडव्याच्या दिवशी जे काही कराल ते वर्षभर करता. त्यामुळे सकाळी लवकर उठणे, लवकर अंघोळ करणे, अभ्यास करणे, देवाला जाणे, इ. इ. केले जायचे. विरंगुळा म्हणून असे मानले की आज जे काही कराल ते वर्षभर कराल तर तुम्ही आज काय काय कराल?

२. आजच्या जागतिकीकरणाच्या काळात १ जानेवारी हीच नव्या वर्षाची सुरुवात मानली जाते. पण जागतिक पातळीवर इतर संस्कृतींनी आपापले नववर्षदिन पाळण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो. याचे सर्वात चांगले उदाहरण म्हणजे चायनीज न्यू इयर जे चायनीज लोक आज जगात अनेक ठिकाणी साजरा करतात. 'आपल्या' गुढिपाडव्याचे पुढे काय होईल असे तुम्हाला वाटते? आपल्या संस्कृतीबद्दल नव्याने अभिमान 'जागवण्याचे' प्रयत्न आजकाल होताना दिसतात. त्या पार्श्वभूमीवर आपल्या सणांना येत्या काळात उर्जितावस्था, ग्लॅमर येईल असे तुम्हाला वाटते का?

लेखनविषय: दुवे:

Comments

संपादकांना विनंती

संपादकांना विनंती, कृपया शीर्षक बदलून "नवीन वर्षाच्या निमित्ताने" असे करावे.

पाडवा - नवीन वर्ष

गुढी पाडवा हा नववर्षदिन असे आपण मराठी लोक म्हणत असलो तरी सबंध भारतात हा नववर्षदिन मानला जात नाही.
महाराष्ट्र कर्नाटक भागात गुढीपाडवा हा नववर्षदिन मानला जातो.
गुजरात वगैरेमध्ये दिवाळी पाडवा हा नववर्षदिन मानला जातो.
केरळ व तामिळनाडूत वेगवेगळे नववर्षदिन (विषु) आहेत.
बंगालमध्ये वैशाख पौर्णिमा हा नववर्षदिन मानला जातो.
(उत्तरभारतात कृष्ण पक्षातली प्रतिपदा हा महिन्याचा सुरुवातीचा दिवस मानला जातो. आपण शुक्ल प्रतिपदेला महिना सुरू होतो असे मानतो).
गुढीपाडव्याच्या नावाखाली 'हिंदू' अभिमान जागवण्याचे प्रयत्न होतात ते अनाठायी असतात. कारण सगळ्या हिंदूंना गुढीपाडव्याचे महत्त्व नसते.

गुढीपाडव्याचे काय होईल हे मराठी आणि कानडी लोकांवर अवलंबून आहे.

नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)

पाडवा - नवीन वर्ष

गुढी पाडवा हा नववर्षदिन असे आपण मराठी लोक म्हणत असलो तरी सबंध भारतात हा नववर्षदिन मानला जात नाही हे पटते.

ऎतिहासिक आधारभुत घटना प्रमाण मानुन नावात बदल करण्याची किंवा नविन नाव देण्याची परंपरा पुर्वी पासुनची दिसते. उदा.ख्रिस्तजन्म, विक्रम संवत.व इतर..

याच प्रमाणे वेगवेगळे संवत हे त्या राजाच्या प्रित्यर्थ आहेत.आज आपण मानत असलेला प्रदेश पूर्वि कोणत्या राज्यात होता हे पाहवे लागेल..त्यांची सुरवात वेगवेगळी असणे तर्कशुद्ध वाटते.

हिंदू' हा शब्द येण्याचे कारण श्रीराम असावे,(चू भू दे घे.) ते सर्व मान्य व आदर्श राजे आहेत.त्यांच्या विजयी पुनरागमनाचा हा दिन आहे.

शैलु.

दसरा ते गुढी पाडवा

दसर्‍याच्या दिवशी रावणवध झाला आणि राम रावणयुध्द संपले. त्यानंतर गुढी पाडव्यापर्यंत म्हणजे पुढील साडे चार महिन्याच्या काळात काय घडले? श्रीरामाचा परतीचा प्रवास विमानाने झाला असेही श्रध्दाळू मंडळींचे सांगणे आहे. त्याला वेळ लागला नसणार. त्यामुळे दसर्‍याला रावणवध आणि गुढी पाडव्याला अयोध्येत विजयी पुनरागमन या दोन घटनांचा मेळ जुळत नाही.

प्रकाशाचा वेग

पुढील साडे चार महिन्याच्या काळात काय घडले? श्रीरामाचा परतीचा प्रवास विमानाने झाला असेही श्रध्दाळू मंडळींचे सांगणे आहे. त्याला वेळ लागला नसणार.

यावरून हेच सिद्ध होतं की त्या काळची विमानं प्रकाशाच्या वेगाच्या जवळ प्रवास करायची. त्यामुळे प्रभू रामाचे केवळ काहीच सेकंद गेले असले तरी पृथ्वीवर साडेचार महिने गेले होते. आपले पूर्वज थोर होते याचा हा आणखीन एक पुरावा नाही काय?

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

थोडी अधिक माहीती

गुढीपाडव्याच्या नावाखाली 'हिंदू' अभिमान जागवण्याचे प्रयत्न होतात ते अनाठायी असतात.

नक्की कुठे पाहीले? कारण गुढीपाडवा हा शब्दप्रयोग (हिंदू) धर्माशी संबंधीत नसून (महाराष्ट्र आणि गोवा?) प्रदेशाशी आहे.

मात्र तुम्ही चैत्रप्रतिपदेच्या संदर्भात म्हणत असाल तर वेगळे आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदेस आठवणीप्रमाणे, महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, आंध्र, आसाम, काश्मीर, सिंधी समाज इतक्या ठिकाणी तर नक्कीच अजून कुठे असेल तर माहीत नाही, पण येथे मात्र नववर्ष चांद्रमासाप्रमाणे साजरे केले जाते. तामिळनाडू, केरळ येथे (अजून कुठे असले तर माहीत नाही),

चैत्र महीन्याच्या सुरवातीस भारतीय कालगणनेचे अधिकृत वर्ष पण मानले जाते. त्यासाठी स्वातंत्र्यानंतर एक विशेष समिती नेमून त्यासमितीकरवी भारतीय कालमनिर्णयपद्धती आणि ग्रेगरीयनकॅलेंडरची पद्धती यात मेळ घातला गेला. आजही भारतीय गॅझेट, आकाशवाणी, संसदीय कामकाज या सर्वांमधे दोन्ही कालनिर्णयाच्या पद्धती वापरल्या जातात. त्या अर्थीदेखील चैत्रप्रतिपदा म्हणजे वर्षप्रतिपदा अथवा नवीन वर्षाची सुरवात ठरते.

--------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

हिंदू

>>नक्की कुठे पाहीले? कारण गुढीपाडवा हा शब्दप्रयोग (हिंदू) धर्माशी संबंधीत नसून (महाराष्ट्र आणि गोवा?) प्रदेशाशी आहे.

गेले काही वर्षे ठाणे, डोंबिवली, मुंबई परिसरात नववर्षदिनानिमित्त (सनातन प्रभात /संस्कार भारती इत्यादिंच्या पुढाकाराने) शोभायात्रा इत्यादि काढल्या जातात. त्या शोभायात्रांवर "हिंदू नववर्षदिन" असेच फलक असतात. आणि त्या निमित्ताने येणार्‍या जाहिराती लेख यांतही मराठी नववर्षदिन लिहिलेले नसून हिम्दू नववर्षदिन असेच असते.

या चित्रात नववर्षदिन गुढीपाडव्याला (१ जानेवारीऐवजी) साजरा करण्याचे 'हिंदूंना' आवाहन केले जात आहे.

अवांतरः भारतीय सौर वर्ष चैत्र प्रतिपदा यादिवशी सुरू होत नाही. ते २१/२२ मार्चला सुरू होते. (तसेही ते आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी सांगण्यापुरतेच वापरात आहे).

नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)

भारतीय शासकीय कालगणना

भारतीय सौर वर्ष चैत्र प्रतिपदा यादिवशी सुरू होत नाही. ते २१/२२ मार्चला सुरू होते

भारतीय शासनाचे अधिकृत वर्ष २२ मार्च ह्या दिवशी सुरू होते (लीप वर्षात २१ मार्चला). महिन्यांची नावे चैत्र, वैशाख, ज्येष्ठ इ. च आहेत. परंतु महिन्यांचे दिवस मात्र ३०-३१ असे आहेत. वैशाख ते भाद्रपद ३१ दिवस तर उर्वरीत महिने ३० दिवस. चैत्र एरवी ३० दिवसांचा तर लीप वर्षात ३१ दिवसांचा.

अधिक माहिती - http://en.wikipedia.org/wiki/Indian_national_calendar

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

संदर्भ...

अहो, हाच संदर्भ देयचा होता तर काखेत कळसा होताच की ;) (त्या आयडीचे इतर लेख ही रोचक आहेत. वाचून पहा, कदाचीत विचार परीवर्तन होईल. :-) )

बाकी आधी म्हणल्याप्रमाणे केवळ गुढी पाडवाच नसून अनेक प्रांतात हा दिवस नववर्ष म्हणून समजला जातो. (म्हणून वरच्या संदर्भासंदर्र्भात पुढले वाक्य नाही) त्यामुळे कुणी असे म्हणले की बहुसंख्य हिंदूंचे (असेल? मला माहीत नाही पण अनेक प्रांतातील हिंदूंचे नक्कीच) हे नववर्ष आहे, म्हणून "हिंदू नववर्ष" तर त्यात काही फार मोठे नाही. त्यांना तसे वाटते वाटूंदेत. एक वेगळे उदाहरण देतो. तेलेंगणामधे त्यांचे नववर्ष पण असते आणि तुम्हाला तमिळ नववर्ष असते असे म्हणतात हे माहीत आहेच. त्यामुळे आपले का नाही? असा विचार करत आता "आंध्र" मधील तेलगूंनी युगादीलाच "तेलगू नववर्ष" म्हणणे सुरू केले....

भारतीय सौर वर्ष चैत्र प्रतिपदा यादिवशी सुरू होत नाही.

अगदी बरोबर आहे. म्हणूनच, मी "त्यासाठी स्वातंत्र्यानंतर एक विशेष समिती नेमून त्यासमितीकरवी भारतीय कालमनिर्णयपद्धती आणि ग्रेगरीयनकॅलेंडरची पद्धती यात मेळ घातला गेला. आजही भारतीय गॅझेट, आकाशवाणी, संसदीय कामकाज या सर्वांमधे दोन्ही कालनिर्णयाच्या पद्धती वापरल्या जातात." असे म्हणले होते. बाकी सौर/शुक्ल/कृष्ण हा तिहेरी प्रकार असल्याने चैत्र प्रतिपदा ही प्रत्येकाची वेगळी असली तरी त्या दिवशी म्हणजे चैत्रातील पहील्या दिवशी वर्ष सुरू होते इतकेच म्हणायचे होते. ते स्पष्ट झाले नाही असे आता वाटते. तसेच गॅझेट आणि आकाशवाणी/दूरदर्शन इतकेच वापरले जाते का अजून हा मुद्दा नव्हता, तर सरकारने भारतीय महीने (नुसतेच महीने म्हणतो, म्हणजे परत गोंधळ नको!) हे अधुनिक कालनिर्णयाशी समन्वय करून अधिकृतपणे देशाचे कालनिर्णय म्हणून स्विकारलेले आहेत असे म्हणायचे आहे, जे हिंदू कालनिर्णयपद्धतीचा हजारो वर्षे (किमान २ हजार तरी नक्कीच) भाग आहेत.

--------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

गुढी पाडवा

य विषयासंबंधी काही निरिक्षणे

1. तेलगु लोकांमधेही हा सण पाळला जातो. त्याला उगाडी असे नाव आहे.

2. आकाशातील सूर्याच्या मार्गाजवळ चित्रा (Spika) हा तारा दिसतो. या तार्‍याच्या स्थानापासून बरोबर 180 अंश असलेल्या बिंदूजवळ सूर्य आला की त्यानंतर येणार्‍या पहिल्या शुक्ल प्रतिपदेला हिंदू नववर्ष सुरू होते. (उत्तर भारतात ते यानंतर 15 दिवसानी सुरू होते.)
चित्रेच्या तार्‍याच्या 180 अंश नंतर सूर्य मार्गाच्या जवळ झीटा पिशियम हा रेवती नक्षत्रातला तारा येतो. या तार्‍यापासून 4 अंशावर सूर्य असताना नववर्ष लागले असे समजण्यात येते. (टिळक पंचांगात सूर्य या तार्‍याच्या स्थानाच्या बरोबर समोर असताना नववर्ष सुरू झाले असे मानतात.)
3. नववर्षदिन ठरवण्याची ही पद्धत सूर्य सिद्धांत या ग्रंथात दिलेली आहे. हा ग्रंथ इ.स.1000 च्या आसपासचा आहे.
4. ही नववर्षदिन ठरवण्याची पद्धत का रूढ झाली असावी या बद्दलचे माझे मत असे आहे. वसंतसंपात दिनाला (21 मार्च) नववर्ष चालू करावे अशी आपल्या देशातील आर्यसंस्कृतीची परंपरा होती. ज्या वेळी वर दिलेली पद्धत रूढ केली गेली त्या वेळी वसंत संपात दिन रेवती नक्षत्रात येत होता. त्यामुळेया 180 अंशावर असलेला चित्रेचा तारा संध्याकाळी क्षितिजावर दिसत असल्याने नववर्ष दिन ठरवणे सोपे होते.
5. पृथ्वीच्या विरंचन गतीमुळे सध्या वसंतसंपात दिनाला सूर्य, उत्तर भाद्रपदा नक्षत्रातसमोर असतो. त्यामुळेच गुढी पाडवा व वसंतसंपात दिन यात बरेच अंतर पडले आहे. (अर्थात सध्याचे वर्ष आधिक महिना आल्यामुळे या नियमाला अपवाद समजावे. कारण गुढी पाडवा आणि वसंतसंपात दिन यात फक्त 5 दिवसाचेच अंतर पडले आहे.)
6. जर आपल्या पंचांगकर्त्यांनी ही सध्याची व 1000 वर्ष जुनी नववर्षदिन ठरवण्याची पद्धत सोडून तो दिन वसंतपंचाग दिनाजवळ(अर्थात त्याच्या जवळच्या शुक्ल प्रतिपदेला) ठरवला तर आपले पंचांग ऋतुंना फॉलो करणारे होईल असे मला वाटते.

चन्द्रशेखर

उगाडी नाही

तेलगु लोकांमधेही हा सण पाळला जातो. त्याला उगाडी असे नाव आहे

होय. तेलगु लोकांत हा सण पाळला जातो. त्याला युगादी असे म्हणतात. उगाडी हे इंग्रजी स्वरुप असावे. कर्नाटकात नववर्षाचा दिवस एप्रिल महिन्यांत आपला गुढी पाडवा सरला की नंतर येतो. आम्ही एका वर्षात तीन -तीन वेळा नववर्ष साजरे करतो.

गुढी पाडव्याच्या दिवशी जे काही कराल ते वर्षभर करता. त्यामुळे सकाळी लवकर उठणे, लवकर अंघोळ करणे, अभ्यास करणे, देवाला जाणे, इ. इ. केले जायचे. विरंगुळा म्हणून असे मानले की आज जे काही कराल ते वर्षभर कराल तर तुम्ही आज काय काय कराल?

सकाळी लवकर उठायचे, अंघोळ करायची, हापिसात जायचे, काम करायचे(?), घरी यायचे....

आता अमेरिकेची परिस्थिती गेल्या एक-दोन वर्षांपेक्षा बरी असली तरीही सर्वांना अधोरेखीत वर्षभर करता आले तर उत्तमच आहे असे वाटते. ;-)

नववर्षाच्या शुभेच्छा!

उगाडी

मला तेलगू येत नाही. इंजिनीयरिंग कॉलेजात असताना चार पाच तेलगू मुलांशी माझी मैत्री झाली होती. त्यांच्या तोंडून मी उगाडी असाच उच्चार ऐकलेला आठवतो. परंतु खात्रीलायकपणे मी सांगू शकत नाही. कदाचित प्रियालीताई म्हणतात तसे उगादि असेल.

चन्द्रशेखर

कानडी उगाडी

कानडी लोकसुद्धा युगादी म्हणजे नववर्ष आजच साजरे करतात. उगाडी हे युगादीचे अपभ्रष्ट
रुप असावे. बेंगलूरुमध्ये आज सर्वांना सुटटी होती.

गौरी

युगादी = युगादि (आणि गौतमीपुत्र सातकर्णी)

युग = तेलुगूत वर्ष (मराठीत मोठा कालखंड - जसे सत्य,त्रेता,द्वापार,कली 'युग'. 'युगे अट्ठावीस...')
युगादि (तेलुगु तद्भव उगादि) = वर्षारंभ

मागे झालेल्या चर्चेत 'संस्कृतोद्भव शब्द (तत्सम/तद्भव) मराठी भाषेत ज्या अर्थाने वापरले जातात त्या अर्थाने इतर भाषाभगिनींमध्ये वापरले जातच असतात असे नाही' असे स्पष्ट झाले होते.

महाराष्ट्र आणि आंध्रात तरी गुढीपाडवा/युगादिचे महत्त्व कमी होईलसे वाटत नाही.कारण मुळात गुढीपाडवा/युगादि सणाची सुरुवात सातवाहन/शतवाहन/शालीवाहन/सातकर्णी/गौतमीपुत्र या प्रतिष्ठान(पैठण) ही राजधानी असलेल्या राजाच्या शकराजा विक्रमादित्यावरील विजयाबद्दल अभिनंदन/अभिवादन करण्यासाठी झाली होती. हा राजा मुळात आंध्रदेशीय होता. त्याचे साम्राज्य गोदावरी ज्या प्रदेशातून वाहते त्या प्रदेशाभोवती पसरलेले होते.(ही माझ्या बालपणातील माहिती आहे. संदर्भ हवा आहे का? :))(सांप्रत शालिवाहन शके १९३२ विकृतीनाम संवत्सरे सुरू झाले आहे.)

अवांतर :
आम्हाला सुट्टी होती. गुढी उभी केली. पाच चवींचे अमृत (तेलुगूत 'उगादि पचडी') प्यालो. कडूलिंबाची पाने घातलेल्या पाण्याने अभ्यंगस्नान केले. दाते पंचांग संवत्सरफल वाचले.(घाटपांडे साहेब - अर्घेश, निरशेश, राजा, मंत्री, आढक हे शब्द जरा समजावून सांगावेत), श्रीखंड चापले इ. इ. .. एकंदर मजा आली.

विकृतीनाम(?)/ संदर्भ/ अधिक पुरावे

सांप्रत शालिवाहन शके १९३२ विकृतीनाम संवत्सरे सुरू झाले आहे.

याला विकृतीनाम असे का म्हटले आहे?

अधिक संदर्भ आणि पुरावे येथे सापडतील.

विकृतीनाम संवत्सर

प्रत्येक संवत्सराला त्याच्या कालखंडात होऊ घातलेल्या (भविष्यातील) घटनांच्या आधारे नाव मिळालेले आहे.
अशी साठ नावे आहेत. (ती कोणती? थोड्या अभ्यासाने सांगता येईल अथवा जालावर जंत्री उपलब्ध असावी.)
याचा अर्थ असा की साठ वर्षांनी सर्वसाधारणपणे तशाच घटना घडतात असे चक्र पूर्वसुरींना अपेक्षित असावे.

यंदाच्या विकृतीनामक संवत्सराच्या नावात वर्षफलाप्रमाणे विकृती उत्पन्न होण्याचे द्योतक आहे.
दाते पंचांगातील वर्षफल वाचता त्यातील पहिलेच वाक्य - "लोक आपले नित्य कार्य सोडून अन्यत्र जाऊन संपत्ती मिळवतील" - असे होते. वर्षफलाचे वाचन मनोरंजक असते. तसेच त्यातून आपल्या पूर्वजांची गृहितके आणि कालगणना विषयक कल्पना कळतात. उदा. ब्रह्मदेवाचा दिवस इ. या वर्षी राजा मंगळ आहे. ( घाटपांडे साहेबांना यावेळी पांढर्‍यावर काळी विनंती की त्यांनी राजा, मंत्री, निरसेश वगैरे संकल्पना समजावून द्याव्यात.)

चर्चाविषयाबद्दल अधिक माहिती देणारा जयंत साळगावकरांचा लेख येथे पहावा.

मानलं बुवा!

"लोक आपले नित्य कार्य सोडून अन्यत्र जाऊन संपत्ती मिळवतील"
खरोखरच नित्याचे काम सोडून मी एका वेगळ्याच कामासाठी बाहेरगावी गेलो आणि त्याचे चार पैसेही मिळाले! दाते पंचांगकी जय!
नव्या वर्षाची सुरुवात तर चांगली झाली. पण यात काही विकृती नव्हती बरं. सगळा सरळमार्गी व्यवहार होता.

इगाडी

'कानडी प्रांतात वर्षारंभाच्या दिवसास 'इगाडी' असे म्हणतात.... अगदुस, इगाडी व युगाडी ह्या शब्दांचा एकमेकांशी काही संबंध आहे किंवा कसे याचा इतिहाससंशोधकांनी विचार करावा'*

प्रत्येक राज्यात अशा वर्षारंभाच्या सणाला काय नावं आहेत. कुठे माहिती मिळेल ?

*आर्यांच्या सणांचा प्राचीन व अर्वाचीन इतिहास' या ऋग्वेदींच्या पुस्तकात वरील वाक्य आहे.

नववर्षाच्या शुभेच्छा !!!

-दिलीप बिरुटे

वेगवेगळे उप-प्रादेशिक उच्चार असावेत

प्रमाण-कन्नड लेखनात या सणाचा उल्लेख "युगादि" असा होतो (ಯುಗಾದಿ)

प्रमाण-तेलुगु लेखनामध्ये मात्र या सणाचा उल्लेख "उगादि" असा होतो (ఉగాది).

दोन्ही ठिकाणी व्युत्पत्ती एकच - संस्कृतोद्भव "युग+आदि"

गाडि, उगाडि, युगाडी, वगैरे उपप्रादेशिक बोलींमध्ये किंवा इंग्रजी-संस्कारित बोलीमधले प्रयोग असू शकतील.

उगादी पच्चडी

तेलगु लोकांमधेही हा सण पाळला जातो. त्याला उगाडी असे नाव आहे

उगादी पच्चडी
उगादी पच्चडी:
उगादी पच्चडीशिवाय नव्या वर्षाचे आगमन साजरे होऊ शकत नाही. गूळ, कडुनिंबाची फुले, चिंच, तिखट, मीठ व कैरी अशा सहा चवींने ही अद्भूत/अद्भुत अशी उगादी पच्चडी बनते. थोडक्यात ह्या उगादी पच्चडीत षड्रसांचे संमेलन भरलेले असते.

१. ह्या तेलुगू पच्चडीचा मराठी पचडीशी काय संबंध असावा बरे? आणि हो, तमिळनाडात, कर्नाटकात व केरळातही पचडी असते.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

चेटी चांद

सिंधी मंडळींचा चेटी चांद हा नववर्ष दिनदेखिल आपल्या गुढी पाडव्याच्या दिवशीच येतो.

मी हे करीन -

चुकुनही स्वयंपाक घरात जाणार नाही(फकस्त जेवण तयार झाले आहे की नाही ते डोकाउन पाहिन)
घर चकचकीत करेन (हे मला जास्त आवडते)
ऑफीस मधे मीटींग्स करनार नाही
उपक्रमावर प्रतीसाद देयील.
गूगल ला नम्स्कार करेन आणी अशीच करणी राहो ही प्रार्थना करेन.
विन्डोज ७ ला इन्स्टाल करुन घेयील(वर्षभरात (७ + ३६५ = ३७२) विन्डोज ३७२ पर्यन्त जायीन.. (वाह हे रेकॉर्डच म्हणायचं! )
तू-नळी वर राज ठाकरेंची एक फीत बघेन( म्हणजे वर्षभर ते बोलतच राहतील, समजा काही केलेच (हल्ली करतात म्हणे !) तर चांगलेच-- ते करत राहतील)

शिव शक

सध्या महाराष्ट्रात रूढ असलेले शालिवाहन शक १९३१ वर्षांपूर्वी शालिवाहन या राजाने सुरु केले ..या व्यतिरिक्त विक्रम राजाने २०६६ वर्षांपूर्वी त्याच्या नावाने शक सुरु केला असून सध्या या शकाचे प्लव नावाचे वर्ष सुरु आहे .हे वर्ष दिवाळीत कार्तिक शु १ ला सुरु होते.

उत्तर भारतात महिना अमावास्येला नाही तर पौर्णिमेला बदलतो .त्यामुळे त्यांचे वर्ष फाल्गुन अमावस्येला नाही तर फाल्गुन पौर्णिमेला म्हणजे होळीला संपते आणि नवीन वर्ष धुळवडीला सुरु होते .

सर्व राजे स्वताच्या नावाने नवीन शक सुरु करत. मुघल राजेही स्वताच्या मंचकारोहणापासून स्वताच्या नावाने नवीन साल सुरु करत .
याच रीतीने शिवाजी महाराजांनीही राज्याभिषेकाच्या दिवशी स्वताच्या नावाने शिव शक सुरु केला .हा शिव शक जेष्ठ शु १३ ला सुरु होतो .सध्या या शिव शकाचे ३३६ साल चालू आहे.

गुढी पाडव्याला जर सर्वच हिंदू नवीन वर्ष साजरे करत असते तर त्या दिवशी आपणही नवीन वर्ष साजरे करायला हरकत नव्हती .पण सर्व हिंदूंचे नवीन वर्ष एकाच दिवशी सुरु होत नाही. मग आपण शालिवाहन शकला का चिकटून रहायचे? त्या ऐवजी शिव श्काप्र्माने नवीन वर्ष का साजरे करू नये?

 
^ वर