सरलतेपासून क्लिष्टतेकडे भाग ७ : गुणसूत्रांतील बदल

गेल्या लेखात आपण डीएनेचं कार्य बघितलं. थोडक्यात आढावा घ्यायचा झाला तर
- डीएने हा सध्याचा स्वजनक आहे. तो प्रत्येक पेशीच्या केंद्रकात असतो. तो एक प्रकारचा रासायनिक भाषेतला संदेश असतो.
- पेशी विभाजनाच्या वेळी तो स्वत:ची प्रतीकृती करतो
- एरवी तो पेशीसाठी आवश्यक प्रथिनं तयार करतो. यासाठी आवश्यक माहीती डीएने मध्ये साठवली असते. या संदेशाचं 'भाषांतर' करण्याची रचना पेशीमध्ये असते.
- यामुळे प्रत्येक पेशीचे गुणधर्म ठरतात. त्यावरून शरीर बनतं. व शरीर पुनरुत्पादन करून नव्या शरीराला जन्म देतं. अशा रीतीने नवे डीएने तयार करण्याचं चक्र पूर्ण होतं.

स्वजनक -> प्रतिकृती निर्मिती -> वेगवेगळ्या आवृत्त्या -> स्पर्धा -> टिकले ते जिंकले -> टिकण्यासाठी उपयुक्त बदल टिकणे -> (कवच -> पेशी -> अनेकपेशी -> पेशी विशिष्टता -> शरीर -> ज्ञानेंद्रिय -> मेंदू -> चेतना)
डीएने बदलतो कसा, व बदलांचा परिणाम काय होतो हे आपण या लेखात पाहू. अतिशय किचकट भाषेत लिहीलेला हा संदेश असल्यामुळे बहुतेक वेळा त्यातलं एखादं अक्षर जरी बिघडलं तरी संदेशात महत्त्वाचा बदल होऊ शकतो. व एकंदरीत क्लिष्टता लक्षात घेतली तर हे बहुधा वाईटच असतात. एका जातीच्या माश्यांवर किरणोत्सार करून त्यातून होणाऱ्या म्युटेशनांचा अभ्यास केल्यावर असं दिसून आलं की सुमारे ७०% बदल मारक होते, उरलेले ३०% गुणकारी किंवा मारक काहीच नव्हते किंवा थोडेसे गुणकारी होते.

आपण आपल्या उत्क्रांतीच्या प्रयोगातल्या उदाहरणातून पाहु. त्या प्रयोगात मी उपक्रमवरील चांगल्या लेखनाविषयी काही विधानं घेतली होती, ती उपक्रमवरच्या सदस्यांनी बदलून सुधारली. त्या विधानांना काल्पनिक उपक्रमी जिवाची (आपण त्या जिवाला लेखक् पायमोडका क - सामान्य लेखक शब्दापासून वेगळा दाखवण्यासाठी म्हणू.) गुणसूत्रं म्हटली. प्रत्येक विधान हे एक गुणक म्हणू. याचा अर्थ त्यांपासून तयार होणाऱ्या लेखक् जिवाचे लेखन करण्याच गुणधर्म यात वर्णन केले आहेत. या कल्पना-प्रयोगात आपण एक गृहीत धरू की लेखक् चं लेखन जितकं चांगलं, सकस व अधिक लोकांपर्यंत पोचणारं असेल, तितकी त्याची प्रजननक्षमता जास्त. जितकी प्रजननक्षमता जास्त तितके अधिक लेखक् जीव तीच गुणसूत्रं घेऊन जन्माला आलेले - त्या पद्धतीने लेखन करणारे. या लेखक् जिवाची प्रगती कशी होते हे पाहायचं असेल तर त्यात बदल काय होतात व त्या जिवाच्या तगण्यासाठी ते उपयुक्त कसे ठरतात हे पाहावं लागेल. मूळ प्रतीतलं पहिलं विधान खालीलप्रमाणे बदलत गेलं.

१. नवीन वाचक उपक्रमाकडे आणण्यासाठी फेसबुकचा वापर करावा. आपला वा आपल्याला आवडलेला लेख आपल्या फेसबुकवरील मित्रांना सादर करावा.
२. नवीन वाचक उपक्रमाकडे आणण्यासाठी फेसबुकसारख्या सोशल नेटवर्किंग सायटांचा वापर करावा. आपला वा आपल्याला आवडलेला लेख आपल्या अशा संकेतस्थळांवरील मित्रांना सादर करावा.
३. नवीन वाचक उपक्रमाकडे आणण्यासाठी फेसबुकसारख्या सोशल नेटवर्किंग सायटांचा वापर करावा. आपला वा आपल्याला आवडलेला लेख आपल्या अशा संकेतस्थळांवरील मित्रांना उपक्रमाच्या दुव्यासकट सादर करावा.
४. उपक्रमाकडे अधिक वाचक येण्यासाठी फेसबुकसदृश सुविधा वापराव्या. आवडलेले लेख अशा संस्थळांवर उपक्रमाच्या दुव्यासह सादर करावे.
५. उपक्रमाकडे अधिक वाचक येण्यासाठी फेसबुकसदृश सुविधा वापराव्या. आवडलेले लेख अशा व इतर संस्थळांवर (उदा. मराठी विकिपीडिया) उपक्रमाच्या दुव्यासह सादर करावे.
६. उपक्रमाकडे अधिक वाचक येण्यासाठी 'फेसबुकसदृश' सुविधा वापराव्या. आवडलेले लेख अशा 'इतर संस्थळांवर' उपक्रमाच्या दुव्यासह सादर करावे. [अवतरणांतले शब्द हे दुवे आहेत]

या गुणकांच्या बदलातून लेखक् च्या लोकांपर्यंत पोचण्याच्या क्षमतेवर काय फरक पडलेला आहे? (फक्त पायरी क्र. १,३,६ दाखवलेल्या आहेत)

फेसबूक ऑरकूट तत्सम१ तत्सम२ मराठी विकीपिडीया तत्सम१ तत्सम२ दुव्याची सोय
१ हो
३ हो ----हो -----हो----हो-------------------------------------हो
६ हो ----हो -----हो----हो------------हो-------हो-----हो--------हो

नवीन गुणकाची - खरं तर तो गुणक ज्या उपक्रमीत आहे त्याची आंतर्जालावर पोचण्याची क्षमता वाढत चाललेली आहे हे उघड आहे. पायरी क्र ६ चा गुणक अधिक कार्यक्षम आहे व त्यामुळे तो असलेले लेखक् जीव संख्येने वाढतील. पण हे बदल आपोआप, अपघाताने घडले नाहीत. वेगवेगळ्या सज्ञान व्यक्तींनी ते केले. पण जर सज्ञान कर्ता नाकारायचा असेल तर आपोआप, योग्य दिशेने बदल कसे होतात? हे आपण दुसऱ्या उदाहरणातून पाहू. नियम क्र ८, मूळ विधान -

"प्रतिसाद मर्यादित ठेवावा - लेखाच्या सुमारे १/३ वा कमी. फार मोठा प्रतिसाद हा लेखनाच्या रसग्रहणासाठी मारक ठरू शकतो. नवीनच लेख लिहावा."
यात बदल करताना प्रतिसाद देणाऱ्यांनी बुद्धी, उद्दीष्टं वापरली, त्यामुळे बहुतेक बदल हे गुणकारीच झाले. पण समजा सूज्ञ उपक्रमींनी जाणीवपूर्वक बदल करण्याऐवजी हे बदल चुकीच्या छपाईमुळे झाले असते. आणि शब्द, वाक्य हेतूपूर्वक बदलण्याऐवजी आपल्या प्रयोगातल्या नवीन जन्माला येणाऱ्या उपक्रमीला मिळालेल्या मूळ डीएनेमध्ये कुठच्या तरी एका अक्षराऐवजी दुसरं अक्षर छापलं गेलं असतं. हा बदल आंधळा, रॅंडम (नक्की काही आकारबंध - पॅटर्न नसलेला) आहे. आपल्याला हजारो, लाखो बदल असे करता येतील की त्यामुळे त्या वाक्याचा अर्थ नष्ट होतो. म्हणजे समजा प्रतिसाद ऐवजी प्रतिसाट झालं, तर त्या शब्दाला काही अर्थ नाही राहिला. रासायनिक पातळीवर बोलायचं झालं तर त्यातून जे प्रथिन तयार होईल त्यात आधीच्या प्रथिनाचं कार्य करण्याची शक्ती नाही. त्यामुळे कदाचित तो जीव कुचकामी ठरेल, कदाचित नाही. इतर काही सार्थ पण, निरुपयोगी बदल होऊ शकतील. उदा. प्रतिसाद ऐवजी पतिसाद किंवा रतिसाद (हे बदल कदाचित चांगलेही ठरतील :-). पण काही बारीकसे बदल महत्त्वाचे ठरू शकतील. समजा या वाक्यातला १/३ बदलून १/२ किंवा १/१ झाला. बदल एकाच आकड्यात, पण त्याने प्रतिसादावरची मर्यादा वाढली. हा बदल नुसताच सार्थ नाही तर गुणकारी बदल होऊ शकेल. कदाचित प्रतिसादाचा दर्जा ती मर्यादा वाढवल्याने सुधारत असेल (उपक्रमींच्या मते नक्कीच कारण मूळ प्रयोगात तो आकडा बदलून 'अवांतर टाळावे' असं झालं) - निदान आपण तसं आत्तापुरतं तरी गृहीत धरू. असं असेल तर अगदी अक्षराच्या पातळीवर झालेल्या बदलाचे परिणाम गुणांवर व नवीन लेखक् च्या वागणुकीवर दिसतील. लेखक् च्या उत्तम प्रतिसाद देण्यावर उत्पन्न/पुनरुत्पादनक्षमता अवलंबून आहे असं गृहीत धरलेलं आहे. तर अशा बदलांचा परिणाम काय होतो? बदल अगदी कमी म्हणजे दर पिढीला लाखात एक होतात असं धरून चालू. अशा लाख बदलांपैकी एकदा तो ३ हा आकडा बदलला जातो असंही धरू. आता असं धरू की ३ ऐवजी २ झाला तर त्यांची जननक्षमता दुप्पट होते.

पहिली पिढी - १०० अब्ज उपक्रमी - १० लाख बदल - १० जणात ३ हा आकडा बदललेला (दोघे १ व २ वाले. उरलेले आठ ३ च्या वरचे किंवा निरर्थक) (१०लाख बदलांपैकी बहुतेक सर्व मारक - पुढच्या पिढीत जाणार नाहीत)
दुसरी पिढी - ~१०० अब्ज उपक्रमी ~ १० लाख बदल - १० जणात ३ हा आकडा बदललेला (दोघे १ व २ वाले. उरलेले आठ ३ च्या वरचे किंवा निरर्थक) अधिक चार '१ व २ वाले' - आधीच्यांची पोरं.
.
.
दहावी पिढी - ~१०० अब्ज उपक्रमी ~ १० लाख बदल - १० जणात ३ हा आकडा बदललेला (दोघे १ व २ वाले. उरलेले आठ ३ च्या वरचे किंवा निरर्थक) अधिक ~हजार '१ व २ वाले' - आधीच्यांची पोरं.

आता हे लक्षात येईल की नव्या पिढीमध्ये ३, २, व १ आकडा असलेले तीन किमान गट आहेत. त्यांच्या संख्या वेगवेगळ्या आहेत, पण त्यांची वाढण्याची प्रमाणंही वेगवेगळी आहेत. पुनरुत्पादन शक्ती दुप्पट झाली तर केवळ चाळीस पिढ्यांतच २ व १ आकडा असलेल्यांची संख्या ३ वाल्यांइतकी होईल (व प्रतिसादांचे आकार वाढत जातील... :-). मी नेहेमी पुनरुत्पादनाची क्षमता दुप्पट झाली असं गणितासाठी वापरतो. प्रत्यक्षात कुठचाच बदल इतका परिणामकारक नसतो. अशा बदलाने पुनरुत्पादनात सुमारे १ टक्का किंवा कमी इतका बदल करत असावेत असा अंदाज धरूया. म्हणजे ३ वाल्यांची संख्या दर पिढीला तितकीच राहात असेल तर २ वाले आपली संख्या दर हजारामागे सुमारे दोन ते तीनने वाढवतात. त्यामुळे चाळीस पिढ्यात जवळपास काहीच फरक पडत नाही. त्यांची लोकसंख्या सारखी व्हायला १०,००० ते १५,००० पिढ्या जाव्या लागतील. उत्क्रांती ही अशीच मंद गतीने होते. उपक्रमींची संख्या १०० अब्ज वाचल्यावर आश्चर्य वाटले असेल. मूळ आकडा मोठा घेण्याचं कारण इतकंच की प्रमाणात, दशांशात मांडण्याऐवजी प्रत्यक्ष आकड्यात मांडता याव्यात. पिढ्यांच्या गणितावर याने फारसा फरक पडत नाही, विशेषत: १०००० ते १५००० पिढ्या हे उत्तर फारसं बदलणार नाही.

या उदाहरणातून मुख्य मुद्दा असा मांडायचा होता की होणारे बदल हे सर्व प्रकारचे असतात. कुठचेही बदल ठरवून होत नाहीत. बहुतेक बदल हे मारक असतात. (आपण जे दहा लाख बदल बघितले ते बहुतेक सर्व मारक आहेत असं गृहीत धरलं.) सुधारक बदल हे फार थोडे असतात. मग मारक बदलांनी प्रजाती नष्ट का होत नाही? याचं कारण म्हणजे बदल खूप कमी वेळा होतात. आणि सुधारक बदल हे तर त्यातही खूप कमी. हे थोडं गोंधळाचं आहे. उत्क्रांतीची प्रक्रिया चालू रहायला बदल आवश्यक असतात. पण वैयक्तिक जिवासाठी ते बदल बहुतांशी मारक ठरतात. मग बदल होणं हे चांगलं की वाईट? हा प्रश्न थोडासा वस्तू वरून खाली पडणं हे चांगलं की वाईट अशासारखा आहे. बदल होतात ते अमुक तमुक या विशिष्ट प्रजातीसाठी चांगलं आहे अशा विचाराने होत नाहीत. जिराफाची मान उंच झाली तर बरं होईल - बिचाऱ्याला वरची पानं खाता येतील, असा विचार कुठेही नसतो. जिराफ असतात व त्यांची परिस्थिती असते. पण ती परिस्थिती 'उंचावर पानं असणं' ही बदल घडवून आणण्यावर परिणाम करत नाही. माना बुटक्या करणारे, पाय बुटके करणारे, माना उंच करणारे असे सर्व प्रकारचे बदल होतच असतात. मान उंच करणारे बदल टिकतात. म्हणजे जे गुणकांतले रॅंडम बदल जिराफांची मान (किंवा लेखक् चा प्रतिसाद) लांब करतात ते गुणक अंगात बाळगणाऱ्या जिराफांना अधिक खायला मिळतं, त्यांना अधिक वेळ पुनरुत्पादनासाठी व आपली पिल्लं जपण्यासाठी देता येतो. त्यामुळे ते अधिक प्रमाणात संतती मागे सोडतात. त्याच बदलांबरोबर मान लहान करण्याचे, मान जाड करण्याचे, अंगावर हिरवे ठिपके आणण्याचे, शेपटी मोठी अगर लहान करण्याचे बदल होत असतात. पण काही निरर्थक, काही मारक व फार थोडे सुधारक. त्यातले मारक बदल पटकन प्रजातीच्या गुणक संचातून नाहीसे होतात. ते पुन्हा येणार नाहीत असं नाही. ते जेव्हा जेव्हा उद्भवतील, तेव्हा तेव्हा ते पटकन नाहीसे होतील. गुणकांच्या स्पर्धेमध्ये हरतील. (गुणक संच म्हणजे पृथ्वीवरच्या सर्व प्राण्यांच्या सर्व पेशींमधल्या सर्व गुणकांचा संच - gene pool)

जिराफाच्या मानेची लांबी ठरवणारं एकच एक प्रथिन नसतं. त्याच्या डीएनेमध्ये बोट दाखवून म्हणता येईल की "हाच त्याच्या मानेच्या लांबीचा जीन. इथेच मानेची लांबी किती हे स्पष्ट लिहीलेलं आहे." अनेक प्रथिनं, प्रक्रियांनी ती लांबी ठरते. उदाहरणार्थ, आपल्या प्रयोगात उत्क्रांत झालेल्या नियमांत, काही नियम प्रतिसादांविषयी होते. १/३ हा एक आकडा किंवा मर्यादित हा शब्द (नियम क्र. ८ मधील) जरी प्रतिसाद लांबी ठरवण्याबाबत महत्त्वाचा असला तरी नियम क्र. ७ व १० हेदेखील प्रतिसादाची लांबी आपल्या परीने ठरवतात. ७, व १० हे नियम तेच असताना नियम क्र. ८ च्या जागी अनेक वेगवेगळे नियम असू शकतात. त्यापैकी जो लेखक् ची परिणामकारकता व पर्यायाने त्याची पुनरुत्पादनशक्ती वाढवतो तो गुणकसंचामध्ये टिकतो, वृद्धिंगत होतो.

७. प्रतिसाद देताना तो लेखातील आशयाला कितपत लागू पडतो हे पाहावे. फक्त एखाद्या प्रतिसादालाच लागू असलेला उपप्रतिसाद कमी परिणामकारक ठरतो.
९. उपक्रम हे निव्वळ लेखनाचे नव्हे तर संवादाचे माध्यम आहे. हे ध्यानात ठेवून वाचकांशी सुसंवाद साधण्याचा प्रयत्न करावा. प्रतिसाद व त्यांना दिलल्या उत्तरातून अनुभव अधिक समद्ध होतो.
१०. प्रतिसाद देताना लेखनाचा सर्वांगीण (शैली, मुद्दे मांडण्याची पद्धत, अनुमोदन-खंडन-ऊहापोह) विचार करावा. त्रुटी सौम्य शब्दांत दाखवाव्या. बदल सकारात्मक सुचवावे जेणेकरून लेखकांना प्रोत्साहन मिळेल.(मतभेद वैचारिक आहेत, व्यक्तिगत नाहीत हे लक्षात ठेवावे.)

पुढच्या लेखात आपण बदल अविरतपणे का होतात, त्यांचे परिणाम काय होतात - प्राण्यांच्या शरीरावर, व त्यातून नवीन प्रजाती कशा निर्माण होतात हे काही रूपकांच्या आधारे पाहू.

(लेखाचा मतितार्थ - गुणसूत्रं हा संदेश असतो, व त्यात विविध नैसर्गिक प्रक्रियांनी होणारे बदल हे बहुधा मारकच असतात. जेव्हा हजारो लाखो बदल होतात, तेव्हा त्यातले एखाद दोन गुणकारी असतात. इथे गुणकारी बदल याचा अर्थ तो बदल असलेल्यांची प्रजननक्षमता त्या विशिष्ट परिस्थितीत वाढवणारे बदल. हजारो पिढ्यांनंतर हे बदल असलेलेच प्राणी शिल्लक राहातात. दुसरे बदल झालेले, किंवा बदल न झालेले प्राणी - म्हणजे त्यांची संतती - टिकून राहात नाहीत. कालांतराने अशा बदलांची बेरीज होऊन नवीन प्रजाती तयार होते.)

लेखनविषय: दुवे:

Comments

आधीच्या

लेखांप्रमाणेच उत्तम.
(हा भाग यायला बराच वेळ गेला. तेव्हा लेखकमहाशयांचा 'तिकडचा' वावर पाहून आम्हाला शर्यतीतल्या सशाची आठवण होऊ लागली होती. ह घेणे.)

नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)

चांगला लेख

लेख आवडला. लेखमालाही वाचावीशी वाटत आहे. (याआधी वेळ झाला नव्हता त्यामुळे वाचता आले नाही)


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

प्रयोग तर छानच होता

मार्गदर्शित उत्क्रांतीचा प्रयोग छानच होता.

म्यूटेशन बिगर-मार्गदर्शित, पण निवड मार्गदर्शित; असा प्रयोग आपल्याला संकेतस्थळावर चालवता येईल का?

माझ्या मते, होय. पण निवड करण्यासाठी "कौल" यंत्रणा हवी.

या प्रयोगासाठी आपण रामोन ल्युलचे "बृहत्-सर्वसाधारण यंत्र" वापरू शकतो...

थोडक्यात या यंत्रात एकाबाजूला-एक अशी फिरती चक्रे बसवलेली असतात. एका चक्रावर नामे, एका चक्रावर विशेषणे, एकावर क्रियापदे... चक्रे यदृच्छेने फिरवल्यास त्यातून कुठलेतरी वाक्य तयार होते.

मात्र आपण असा जैव 'म्यूटेशन"सारखा असा नियम करू शकतो, की एका वेळी एकच चक्र हलू शकते - म्हणजे वाक्य जवळजवळ तसेच्यातसे उतरनार, पण एक शब्द बदलणार. बदल जरी यादृच्छिक (रँडम) असला, तरी त्या वाक्यांच्या पिलावळीतून कुठले टिकवायचे? ही निवड मात्र डोळस असते. अशा प्रकारे फक्त डोळस निवडीतून अगदी माकडाने यंत्राची चक्रे फिरवली, तरी अर्थपूर्ण वाक्ये उत्पन्न होऊ शकतील.

ल्युलच्या यंत्राचा कौल येथे बनवला आहे.

ल्युलचा प्रयोग

तुम्ही करत असलेला ल्युलचा प्रयोग हा सत्य परिस्थितीच्या जास्त जवळ जातो.
- संपूर्ण जीवाला जनुकांच्या 'एकमेकां सहाय्य करू' अशा एकत्रीकरणाने अर्थ प्राप्त होतो. ते विशिष्ट शब्द एकत्र येण्याने साध्य होतं. (पंख-चोची, कल्ले-गिल,...)
- जनुक पातळीवर एक 'डिजीटल' स्वरूप आहे, ते या प्रयोगाच्या बांधणीतच आहे. एक जनुक व त्याचे त्या ठिकाणचे इतर प्रतिस्पर्धी (अलेल) हे अंतर्भूत आहे.
- दर वेळी दोन 'हवीशी' शिल्लक राहातात, व त्यांना चार पोरं होतात. याचा अर्थ चार 'नकोशी' वाक्यं मरतात. यात मर्यादित 'अन्नपुरवठा' सिम्युलेट होतो.
- 'नकोशी' ठरवणारी परिस्थिती काही विशिष्ट नियम पाळत असली तरी ती पूर्णपणे जनुकांच्या ताब्याबाहेरची आहे.
- रॅंडम बदलांनी नवीन वाक्य तयार होतात त्यांची 'हवेसे'पणा बाबतीत स्पर्धा आत्तापर्यंत टिकून राहिलेल्या सर्वोत्तम वाक्यांशी होते (स्वत:सारख्याच इतरांशी).

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

वाचतोय

लेखमाला वाचत आहे. पुढील भाग व ल्युलचा प्रयोग दोन्हींबाबत उत्सुकता वाढली आहे.

________________________________
माझा प्रतिसाद या मार्गदर्शक सूचनांशी सुसंगत आहे का? नसल्यास कृपया खरड अथवा व्यनिने कळवा.

कालावधी किती?

दर वेळी दोन 'हवीशी' शिल्लक राहातात, व त्यांना चार पोरं होतात. याचा अर्थ चार 'नकोशी' वाक्यं मरतात. यात मर्यादित 'अन्नपुरवठा' सिम्युलेट होतो.
- सर्वच्या सर्व 'नकोशी' नाहीशी होऊन 'हवीशी' शिल्लक रहाण्यास लागणारा अंदाजे कालावधी/ पिढ्यांची संख्या किती असावी? याबाबत काही संशोधन झालेले आहे काय?
-मानवनिर्मितीनंतर जनुकीय उत्क्रांतीचा वेग कमी झाला आहे काय?

उपप्रश्न :
- अन्नसाखळीचा उत्क्रांतीवर परिणाम होतो का?
उपौपप्रश्नः
- जर तो होत असेल तर गवतासारख्या अन्नसाखळीतील सर्वसाधारण/ सर्वकालीन दुव्यावर तगण्याच्या दृष्टीने काही जनुकीय फेरबदल झालेले आहेत का?

कालावधी वगैरे

मर्यादित अन्नपुरवठा सिम्युलेट होतो हे म्हटलंय ते 'सर्वसाधारणपणे एका विशिष्ट प्रजातीची सरासरी जीवसंख्या कायम राहाते' या अर्थाने. पृथ्वीवर मर्यादित रिसोर्स असल्यामुळे चक्रवाढीने लोकसंख्या वाढली तरी एका मर्यादेपलिकडे जात नाही. बहुतेक प्रजातींमध्ये ती त्या मर्यादेला पोचलेली असते (हजारो पिढ्यांनंतर). त्यामुळे काही टिकण्यासाठी इतर काही कमी टिकणं हे परिस्थितीचं रास्त चित्रण आहे.

सर्वच्या सर्व 'नकोशी' नाहीशी होऊन 'हवीशी' शिल्लक रहाण्यास लागणारा अंदाजे कालावधी/ पिढ्यांची संख्या किती असावी?

हा आकडा निश्चित सांगता येत नाही, कारण ते त्या गुणधर्माने प्रजननक्षमतेवर (अधिक पिलं मागे सोडण्यावर) किती चांगला परिणाम होतो यावर अवलंबून असतं. पण काही हजार ते लाख पिढ्यांच्या कालावधीत अगदी ०.१% चा प्रजननक्षमतेतला 'हवासा' फरक (साधारण मानेची १००० जिराफ पिलं तर उंच मानेची १००१ पिलं) देखील शिल्लक राहतो, व 'नकोसे' किंवा न बदललेले नष्ट होतात. जर त्या दरम्यान काही नैसर्गिक संकट आलं तर हा वेग वाढूही शकतो. दुष्काळात मान लांब असण्याचा फायदा खूपच जास्त होतो.

मानवनिर्मितीनंतर जनुकीय उत्क्रांतीचा वेग कमी झाला आहे काय?

नाही - निदान सर्वसाधारण प्राण्यांच्या बाबतीत तरी नाही. मानवाच्या बाबतीत सामाजिक प्रगती जनुकीय उत्क्रांतीच्या लाखो पट वेगाने आहे. त्यामुळे जनुकीय उत्क्रांतीची धार बोथट झाली आहे असं म्हणता येईल. उदाहरणार्थ, अंध म्हणून जन्माला आलेले, कित्येक वर्षं जगतात, व प्रजोत्पादनही करतात. काही दशसहस्र वर्षांपूर्वी हे शक्य नव्हतं. बाकी जनुकीय बदल मात्र त्याच दराने होत आहेत, कारण ते बहुतांशी रासायनिक, रेण्वीय पातळीवर होतात.

अन्नसाखळीचा उत्क्रांतीवर परिणाम होतो का?

अ हा ब ला खातो, ब हा क ला खातो..... या मालिकेतला शेवटचा फक्त कार्बन डाय ऑक्साइड व सूर्यप्रकाश खातो... ही साखळी उत्क्रांती प्रक्रियेत प्रत्येक जिवासाठी 'परिस्थिती' म्हणून येते. तेव्हा अर्थातच कुठचे बदल टिकून राहातात हे या परिस्थितीने ठरतं. या परिस्थितीतल्या एका कड्यात फरक झाला तर त्याचा परिणाम आजूबाजूच्या कड्यांना जाणवतो. उदाहरणार्थ - एका जंगलातले लांडगे मारून टाकले तर हरणांची संख्या प्रमाणाबाहेर वाढते. ती इतकी वाढू शकते की त्यांना गवत अपुरं पडतं, व गवत खाणाऱ्या इतर प्राण्यांच्या लोकसंख्येवर त्यांचा परिणाम होतो. (आपण साखळी म्हटली की ती एका धाग्याची गृहित धरतो. सुदैवाने बहुतेक वेळा ती दोरीसारखी असते - म्हणजे अ हा ब, ब', ब''... ना खातो, त्यातले प्रत्येकी क, क', क''... ना खातात वगैरे.)

गवताविषयीच्या प्रश्नाचं सखोल उत्तर देण्याइतकं माझं ज्ञान नाही. पण झपाट्याने वाढ, बिया खूप काळ टिकवून ठेवणं, कडू चव असणं, कडू चव असलेल्या गवतासारखं दिसणं, काटेरी बनणं इत्यादी गुणधर्म गवतांत दिसून येतात.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

याबद्दल

अन्नसाखळीचा उत्क्रांतीवर परिणाम होतो का?

याबद्दल डिस्कव्हरीसारख्या चॅनेलमध्ये बरेचदा उल्लेख येतात. काही जातीच्या किड्यांमध्ये विषारी रासायनिक द्रव्ये असतात. या किड्यांना खाल्यानंतर पूर्वी बेडूक मरण पावत असत पण हळूहळू बेडूक यांना पचवू लागले. याचा उलटा फायदा असा की ती विषारी रासायनिक द्रव्ये आता बेडकांच्या शरीरात आली आणि त्यांना यामुळे संरक्षण मिळू लागले.

---
सम पीपल आर भलाचंगा, सम आर भिकमंगा
कॅनॉट जज एनीबडी, सरीफ ऑर लफंगा

गुणदसूत्रातील बदल

राजेश, खूप छान लेख आहे.
एच् आय् व्ही चा व्हायरस आपला आर् एन् ए
सारखा बदलतो. त्यामुले त्यासाठी लस अजून
शोधता आलेली नाही.

 
^ वर