चमत्कार!

फोर्थ डायमेन्शन 50

चमत्कार!

इब्राहिमला रेसवर पैसे लावण्याचे व्यसन जडले होते. इतरांपेक्षा इब्राहिमची केस वेगळी होतीच. इतर अपवादानेच जिंकत होते, इब्राहिम अपवादानेच हरत होता. घोड्यांच्या रेसमध्ये लावलेली पैज जिंकणे हा जणू काही त्याच्या तळहातातील खेळण्यासारखे होते. हा घोडा जिंकणार असे वाटू लागले की तो पैसे लावायचा व आश्चर्य म्हणजे नेमका तोच घोडा जिंकलेला असायचा. रेसचे घोडे त्याला कधीच दगा देत नव्हते.
इब्राहिम हा काही अश्वतज्ञ नव्हता. त्याला Probability theory चे नावही माहित नसेल. रेसमधील बारकाव्यांचे ज्ञानही त्याच्याकडे नव्हते. रेसमधील प्रत्येक घोड्याच्या मागील सात पिढ्यांचा अभ्यास करून किंवा घोड्यावर बसणाऱ्या जॉकीच्या शारीरिक - मानसिक क्षमतेवरून तो निष्कर्ष काढत होता, असे म्हणणेही चुकीचे ठरेल. हा 'घोडा', त्या 'दिवशी' त्या 'वेळी' जिंकणार असे मनस्वी त्याला वाटू लागायचे व तो 'घोडा' रेस जिंकायचा. त्याच्या घराजवळच्या झाडाला बांधलेल्या झोपाळ्यावर झोका घेत असताना नेमके त्याच्या डोळ्यासमोर जिंकणारा घोडा दिसायचा व हमखास तोच घोडा 'विन'मध्ये असायचा. काही वेळा घोडा जिंकेल की नाही अशी शंका असल्यास त्या वेळी तो पैसे लावत नसे. इतर वेळी मात्र खिसा रिकामा करून घोड्यावर पैसे लावायचा व जिंकायचासुद्धा! घोडे त्याला कधीच निराश केले नाहीत. रिकाम्या हाताने परत पाठविले नाहीत.
मकबूल त्याचा जिगरी दोस्त. घराजवळ रहायचा. त्याला मात्र इब्राहिमजवळ दैवीशक्ती, 'अल्ला की देन' आहे अशी मनोमन खात्री होती व तसे तो बोलूनही दाखवायचा. तो नेहमी इब्राहिमने लावलेल्या घोड्यावरच पैसे लावायचा व त्यातून कमाई करायचा. काही वेळा इब्राहिमचा कयास चुकला तरी मकबूल हार मानायला तयार नसे. इब्राहिमच्या अफाट दैवीशक्तीवर व त्यानी दिलेल्या टिप्सवर मकबूलचा अढळ विश्वास होता व या निष्ठेच्या विरोधात कुणी 'ब्र' शब्द काढला तरी त्याला ते आवडत नसे.

Source: Rocking Horse Winner, D H Lawrence, (1926)

विषयाचे ज्ञान विरुद्ध विषयाबद्दलचा दृढ विश्वास यात नेमका फरक काय असू शकेल? फरक आहे हे मात्र नक्की. उदाहरणार्थ, एका 'क्ष' व्यक्तीला फक्त अक्षर ओळख आहे व भूगोलाचे प्राथमिक ज्ञानसुद्धा नाही. अशा माणसाच्या हाती आपल्या देशातील काही राज्यांची व त्यापुढे काही शहरांची नावे असलेली यादी दिली. त्यात महाराष्ट्र - पुणे, मध्यप्रदेश - इंदौर, उत्तरप्रदेश - कानपुर, पश्चिम बंगाल - कोलकता व कर्नाटक - मैसूर असे लिहिलेले असेल. ही शहरे त्या त्या राज्याच्या राजधान्यां आहेत असे संगितल्यास त्यातील सर्व माहिती बरोबरच आहे असे त्याला प्रथम दर्शनी वाटेल. कुणीतरी त्याला पश्चिम बंगालची राजधानी कोणती असे प्रश्न विचारल्यास यादी बघून कोलकता असे सांगेल. त्याचे हे उत्तर बरोबर असल्यामुळे इतर राज्यांच्या राजधान्यांची नावे अचूक असणार यावर त्याचा साहजिकच विश्वास बसेल. व इतरानाही त्याला भौगोलिक ज्ञान आहे अले वाटेल.
खरे पाहता हा विश्वास अनाठायी असणार. कारण महाराष्ट्राची राजधानी पुणे नाही. व पश्चिम बंगाल सोडून इतर माहिती चुकीची आहे. अशा प्रकारे संदिग्ध माहितीच्या आधारावरील विश्वासाला ज्ञान असे म्हणता येणार नाही. काही वेळा आपला अंदाज खरा ठरू शकतो. याचा अर्थ आपल्याला ज्ञानप्राप्ती झाली असे म्हणता येणार नाही.
म्हणूनच तत्वज्ञ नेहमीच आपापल्या श्रद्धा - विश्वास तपासून घेण्याचा आग्रह धरत असतात. तपासाअंती ते अचूक असल्यास, ते योग्य वाटल्यास त्याला ज्ञान म्हणण्यास कुणाचीच हरकत नसावी. परंतु यात योग्य म्हणजे नेमके काय असा प्रश्नही विचारता येईल. इब्राहिमच्या संदर्भात दर वेळी त्यानी पैसै लावलेला घोडा रेसमध्ये जिंकतो हे ज्ञान म्हणून घेण्यास पुरेसे ठरणार नाही का? त्याला जेव्हा हा घोडा जिंकणार असे 'वाटत' असते तेव्हा ते अचूक असते. मग त्याला ज्ञान का म्हणू नये?
विशिष्ट घोडाच आज जिंकणार हे त्याला कसे काय सुचते हे इब्राहिमला सांगता येत नाही. ज्ञानप्राप्तीचे पुरावे अचूक असले तरी पुरावे गोळा करण्याचे मार्ग संदिग्ध आहेत, त्यात विश्वासार्हता नाही, त्यात तर्क नाही. कदाचित रेसचे 'फिक्सिंग' करणारा इब्राहिमला - त्याच्या अपरोक्ष - माहिती पुरवत असेल. फिक्सिंग करणाऱ्याचा कुठला तरी अंतस्थ हेतू असेल, तो डाव साधत असेल. चार पाच वेळा खरी माहिती देऊन एके दिवशी चुकीची माहिती पेरून इब्राहिमला त्याचे सर्व पैसे उधळण्यास भाग पाडण्याचा कुटिल हेतू त्यामागे असू शकेल. जर इब्राहिमच्या 'वाटण्या'मागे हा कारस्थान असल्यास इब्राहिमला रेसचे ज्ञान आहे असे म्हणता येणार नाही. राजधान्यांच्या यादीप्रमाणेच इब्राहिमच्या अनुभवसिद्ध ज्ञानामध्ये काही त्रुटी आहेत, व ते त्याला माहित नाहीत. काकतालीय न्यायाप्रमाणे प्रश्न विचारणाऱ्यानी नेमके पश्चिम बंगालचे नाव घेतले व त्याचे उत्तरही बरोबर ठरले. परंतु ते ज्ञान नव्हते. तशाच प्रकारे रेस फिक्सिंग करणाऱ्यानी दिलेले टिप्स हे ज्ञान म्हणून घेण्याच्या लायकीचे नसतात - अगदी दहापैकी नऊ वेळा अचूक ठरले तरीसुद्धा!
परंतु इब्राहिमला टिप्स मिळत नसून काही चमत्कारातून त्याचे अंदाज खरे ठरत असल्यास आपण चमत्कारावर विश्वास ठेवणार आहोत का? फिक्सिंग -बिक्सिंग असे काही नाही व त्याला रेसचे ज्ञान नाही हेच खरे असल्यास आपल्याला माहित नसलेले काही तरी तेथे घडत असावे व त्यामुळे इब्राहिम सातत्याने रेस जिंकतो ही शक्यता नाकारता येत नाही. म्हणूनच आपण अशा अतर्क्य गोष्टींना चमत्कार या सदरात घालत असतो. परंतु या जगात चमत्कार घडत नाहीत याची शंभर टक्के खात्री असल्यामुळे आपल्याला आता आणखी कुठल्या कुठल्या तर्कसुसंगत शक्यता आहेत यांचा अभ्यास करावा लागेल. काही प्रमाणात पूर्वानुभवावरून त्यांची विश्वासार्हता तपासता येईल. फक्त यानंतरच्या अंदाजाबाबत चूक घडण्याची शक्यता आहे हे मात्र लक्षात ठेवावे लागेल.
या सर्व चर्चेतून आपल्याला अजून एक महत्वाचा फ्रश्न विचारता येण्याजोगा आहे: भूत व वर्तमान काळाप्रमाणे भविष्य काळातसुद्धा अचूक ठरू शकेल असा ज्ञानप्राप्तीचा मार्ग असेल का? व असल्यास तो कोणता?

Comments

विचारप्रवर्तक - पण अनेक तपशिलांबाबत असहमत

विचारप्रवर्तक - पण अनेक तपशिलांबाबत असहमत आहे.

१. भूगोलाचे उदाहरण : भूगोलाचे प्राथमिक ज्ञान नाही म्हणजे काय? पैकी "राजधान्या माहीत असणे" हा प्रकार "भूगोलाचे ज्ञान असणे" याच्या अर्थवलयात येत असावा. असे लेखातूनच वाटते.
एका तक्त्यातून, किंवा यादीतून पाठ केल्याशिवाय राजधान्या "माहीत" असण्याची पद्धत काय आहे? यावेगळी सामान्य पद्धत मला ठाऊक नाही. एक कष्टसाध्य पद्धत सुचते आहे: प्रत्येक राज्यात, प्रत्येक शहरात प्रवास करून तेथील सभ्य लोकांना मला विचारता येईल "या शहराचे नाव काय + या राज्याचे नाव काय + हे शहर या राज्याची राजधानी आहे काय?" साधारणपणे असे कोणी करत नाही. पण ते सभ्य लोक तरी उत्तर कसे देतील - आपल्या राज्याची राज्यघटना बघूनच ना? म्हणजे शेवटी अनेक याद्यांमधूनच.

ही शहरे त्या त्या राज्याच्या राजधान्यां आहेत असे संगितल्यास त्यातील सर्व माहिती बरोबरच आहे असे त्याला प्रथम दर्शनी वाटेल.

द्वितीय दर्शनी काय वाटेल? काही वेगळे वाटल्यास कसे काय? त्या व्यक्तीला दुसरी यादी दिली, आणि त्यात जोड्या भिन्न असल्या, आणि त्या तक्त्यालाही "राजधान्या" म्हटले, तर त्या व्यक्तीला शंका वाटेल खरी - "दोन्ही याद्या एकाच वेळी तथ्यात्मक नाहीत" अशी. पण हा तपशील लेखातील विचारप्रयोगात नाही.

कुणीतरी त्याला पश्चिम बंगालची राजधानी कोणती असे प्रश्न विचारल्यास यादी बघून कोलकता असे सांगेल. त्याचे हे उत्तर बरोबर असल्यामुळे इतर राज्यांच्या राजधान्यांची नावे अचूक असणार यावर त्याचा साहजिकच विश्वास बसेल.

ठीक. पण संदिग्ध वाक्ये. "त्या यादीतील एक जोडी बरोबर आहे" हे त्याला कळेल. राज्याचे नाव यादृच्छिक-निवडीने आहे, असे मानण्यास जागा असली, तर "यादृच्छिक निवडीने तपासलेली जोडी बरोबर निघाली" असा निष्कर्ष निघेल. "जोड्या बरोबर असण्याची शक्यता आहे" असे त्याला कळेल. इतपतच विश्वास. किती जोड्या बरोबर असू शकतील? याचे गणित तो कदाचित करू शकेल, कदाचित नाही.

इतरानाही त्याला भौगोलिक ज्ञान आहे असे वाटेल.

जर प्रश्न यादृच्छिक-निवडीने विचारला असेल तर "जितपत चाचणी घेतली तितपत राजधान्यांबद्दल भौगोलिक ज्ञान आहे" असे इतरांना वाटेल. या वाक्यात गर्भित विरोध आहे, असे मी वाचतो आहे. पुढचे वाक्य असे :

खरे पाहता हा विश्वास अनाठायी असणार.

का बरे?

कारण महाराष्ट्राची राजधानी पुणे नाही.

यादीत "महाराष्ट्र-पुणे" जोडी आहे, असे जर इतरांना माहिती असेल, तर वरील ज्ञाना-अज्ञानाबद्दल शंका-कुशंका येणारच नाही. यादी चुकलेली आहे, आणि यादीतून बघणारा राजधान्या सांगत नाही, दुसरेच काही सांगत आहे. मग चाचणी घ्यायचे प्रयोजनच नाही

विचारलेल्या राजधान्यांची नावे ठीक सांगितल्यास "विचारलेल्या राजधान्यांच्या नावांचे तरी ज्ञान आहे" याबाबतीत शंका काय आहे, ते मला कळलेले नाही. "दुसर्‍या कोणाला कसलेतरी ज्ञान आहे" याबाबत "ठायी" विश्वास असण्याचा मार्ग काय आहे? जर "ठायी-पूर्ण" विश्वास हा कधी असणेच नाही, तर त्याबद्दल फुकट चर्चा कशाकरिता करावी?

तशाच प्रकारे रेस फिक्सिंग करणाऱ्यानी दिलेले टिप्स हे ज्ञान म्हणून घेण्याच्या लायकीचे नसतात - अगदी दहापैकी नऊ वेळा अचूक ठरले तरीसुद्धा!

"ज्ञान म्हणून घ्यायची लायकी" या लायकीसाठी निकष काय आहेत? "दारू पिऊन गाडी चालवली तर पुष्कळदा अपघात होत नाही, पण त्यातल्या त्यात अपघात व्हायची शक्यता थोडी अधिक होते" - हे वाक्य "ज्ञान म्हणून घ्यायच्या लायकी"चे आहे काय? हे अपघात तर १० नशेत चालवणार्‍यांपैकी १ला होत असतील!

... अतर्क्य गोष्टींना चमत्कार या सदरात घालत असतो. परंतु या जगात चमत्कार घडत नाहीत याची शंभर टक्के खात्री असल्यामुळे आपल्याला आता आणखी कुठल्या कुठल्या तर्कसुसंगत शक्यता आहेत यांचा अभ्यास करावा लागेल.

ही वाक्ये परस्पर-दुष्ट आहेत. "ज्या गोष्टींबद्दल आपल्याला तर्क माहीत नाही = चमत्कार" ही जर व्याख्या असेल, तर जोवर सर्व गोष्टींबद्दल सर्व तर्क मला माहीत नाहीत, तोवर विश्वात "अतर्क्य गोष्टी" शिल्लक राहातील. म्हणजे "चमत्कार"च्या या व्याख्येखाली येणार्‍या गोष्टी आहेत याबद्दल मला उलट खात्री आहे. दुसर्‍या वाक्यातल्या "चमत्कार" शब्दाची व्याख्या खरे तर वेगळी आहे, ती न सांगितल्यामुळे हा गोंधळ होतो आहे. दुसर्‍या वाक्यातल्या चमत्कार शब्दाची न-सांगितलेली व्याख्या बहुधा अशी असावी : "ज्या गोष्टीबद्दल तर्क भूतकाळ-वर्तमानात नव्हे, तर भविष्यातही कधी सांगता येणार नाही तो चमत्कार". मात्र भविष्यकाळ कोणी अजून बघितला नाही, त्यामुळे कुठली गोष्ट भविष्यातही अतर्क्य असेल, हे कोणालाच ठामपणे सांगता येणार नाही.

- - -
खरे म्हणजे लेखातील मूलभूत भावना, आणि काही विचारांशी मी सहमत आहे.

भूत व वर्तमान काळाप्रमाणे भविष्य काळातसुद्धा अचूक ठरू शकेल असा ज्ञानप्राप्तीचा मार्ग असेल का? व असल्यास तो कोणता?

हे मनुष्याच्या मनातले महत्त्वाचा मंथन होय, सहमत.

हे फोर्थ डायमेन्शनचे लेख विचारप्रवर्तक असतात, शंकाच नाही. पण मला निवडलेली उदाहरणे कित्येकदा भ्रामक वाटतात, आणि तर्क सांगण्याची पद्धतही संदिग्ध वाटते. या दोन्ही गोष्टी सहज सुधारण्यासारख्या आहेत, म्हणून लेखमालिकेला माझ्या प्रामाणिक शुभेच्छा आहेत.

चमत्कार

चमत्कार नावाची गोष्ट आहे किंवा नाही याबद्दल दुमत अ सू शकते परंतू जगात अतर्क्य अशा गोष्टी घडत असतात हे सत्य आहे.
अशा घटनांची एखाद्याने केलेली कारणमीमांसा दुसर् या कुणाला तर्कसंगत वाटेलच असे नाही. संख्याशास्त्रानुसार बर् याच
बाबतीत Probabality शक्यता वर्तवता येते . अमुक घटना १०० पैकी ७ वेळा घडू शकेल अशी Probability गणित मांडून
वर्तवली तरी दर १०० वेळा पैकी ७ वेळा तसे घडेलच असे नाही.
अशा अतर्क्य घटनांविषयी एखाद्याने केलेले अंदाज सातत्याने खरे ठरले असल्याबाबत खूपदा वाचायला मिळते. व अशा घटनांना
सर्वसामान्य लोक चमत्कार असेच मानतात.
अशी भविष्यवाणी अचूकपणे करता येईल असे ज्ञान खरोखरच कुणाला असू शकते काय हा प्रष्न अजूनही अनुत्तरित आहे व तो तसाच
राहील असे मला मला वाटते.
(कांही जण श्रद्धा असली तर अशा शंका मनात येणार नाही असे समाधान करीत असतात.)

चमत्कार

एखाद्या अनाकलनीय गोष्टीचा कार्यकारण भाव जोपर्यंत समजत नाही तो पर्यंत त्याचे आकलन होत नाही. आकलन होत नाही तोपर्यंत त्याला चमत्कार म्हणुन लोकमान्यता मिळते. एखाद्या चमत्कारामागचे विज्ञान जेव्हा समजते त्यावेळी तो चमत्कार रहात नाही हे जरी खरे असले तरी ते विज्ञान जोपर्यंत लोकांपर्यंत पोहोचत नाही व पचनी पडत नाही तो पर्यंत त्याचा कार्यकारण भाव फक्त वैज्ञानिक चौकटीतच उलगडलेला असतो. विज्ञान हे समाजापर्यंत उपयोजित तंत्रज्ञानाने पोहोचत असते.

तशाच प्रकारे रेस फिक्सिंग करणाऱ्यानी दिलेले टिप्स हे ज्ञान म्हणून घेण्याच्या लायकीचे नसतात - अगदी दहापैकी नऊ वेळा अचूक ठरले तरीसुद्धा!

अशा टिप्स या दहापैकी नउ वेळा अचुक ठरत असतील तर ज्ञानाला स्वतःला तपासावे लागेल. म्हणजे ज्ञान व उपयुक्तता याची फारकत करावी लागेल. याठिकाणि एखादा ज्ञानी सुद्धा ज्ञान म्हणुन नाही पण रिस्क म्हणुन अशा टिप्स स्वीकारेल. मोजावी लागणारी किंमत व मिळणारा फायदा याची तुलना तो करेल व आपला रिस्क फॅक्टर ठरवेल.

या सर्व चर्चेतून आपल्याला अजून एक महत्वाचा फ्रश्न विचारता येण्याजोगा आहे: भूत व वर्तमान काळाप्रमाणे भविष्य काळातसुद्धा अचूक ठरू शकेल असा ज्ञानप्राप्तीचा मार्ग असेल का? व असल्यास तो कोणता?

म्हणजे हरिदासाची गाडी मुळ पदावर. अध्यात्मिक क्षेत्रातील लोक पण हेच विचारतात व आपल्या परिने मार्ग सांगत असतात.
प्रकाश घाटपांडे

सर्व्हायवलशिप बायस व चायनीज रूम

कदाचित रेसचे 'फिक्सिंग' करणारा इब्राहिमला - त्याच्या अपरोक्ष - माहिती पुरवत असेल. फिक्सिंग करणाऱ्याचा कुठला तरी अंतस्थ हेतू असेल, तो डाव साधत असेल. चार पाच वेळा खरी माहिती देऊन एके दिवशी चुकीची माहिती पेरून इब्राहिमला त्याचे सर्व पैसे उधळण्यास भाग पाडण्याचा कुटिल हेतू त्यामागे असू शकेल. जर इब्राहिमच्या 'वाटण्या'मागे हा कारस्थान असल्यास इब्राहिमला रेसचे ज्ञान आहे असे म्हणता येणार नाही.

रेस फिक्स करणारा व इब्राहिमला (कदाचित) संकेत देणारा - संकेत का मिळतात हे न कळणारा इब्राहिम - व त्यावर आंधळी श्रद्धा ठेवणारा मकबूल ही साखळी मला खूपच
परमेश्वर (जगन्नियंता) - प्रेषित, साधक, अंतर्ज्ञानी कोणीतरी , साधू गुरू इत्यादी - व त्यांचे अंधविश्वास ठेवणारे भक्त या साखळीसारखी वाटते.
ज्ञान व विश्वास यांमधला फरक स्पष्ट करण्यासाठी जगाविषयी अशा गृहितकांची गरज काय ते कळलं नाही. त्यामुळे इब्राहिमच्या चमत्कार शक्तीविषयीदेखील अंदाज करता येत नाही...

त्यामुळे इब्राहिम सातत्याने रेस जिंकतो ही शक्यता नाकारता येत नाही.

किती सातत्याने म्हणजे ते चमत्कार सदृश आहे याविषयी आपल्याला आकडेवारीने ठरवता येतं. मात्र सामान्यज्ञानाच्या मर्यादा या बाबतीत फारच लहान आहेत, व चमत्कार असावा हा निष्कर्ष काढण्याकडे खूपच अधिक कल मला दिसून आलेला आहे. संख्याशास्त्रात एक सर्व्हायवलशिप बायस नावाचा परिणाम असतो. जर हजार लोकांना लागोपाठ अनेक वेळा छाप येईल की काटा हे ओळखायला सांगितलं, तर त्यातला एकाला लागोपाठ नऊ ते दहा वेळा योग्य ओळखता येईल. याचं कारण ज्या नऊशे नव्याण्णव लोकांचं मध्येच कधीतरी चुकतं, ते आपल्यासमोर येत नाहीत. पण या माणसात इतर ९९९ पेक्षा काही वेगळी शक्ती नसली तरी ती असल्याचा भास होतो.

भूगोलाच्या ज्ञानाचं उदाहरण वाचून 'चायनीज रूम' या आर्टिफिशियल इंटेलिजेन्स विरोधी कल्पना-प्रयोगाची आठवण झाली. थोडक्यात एका खोलीत एक चायनीज भाषा न समजणारा माणूस बसलेला आहे. तो खोलीच्या खिडकीतून येणाऱ्या अगम्य चिह्नं बघतो, एका यादी व नियमावलीच्या आधारे काही इतर चिह्न बाहेर टाकतो. ही बाहेर पडणारी चिह्नं म्हणजे आत आलेल्या चायनीजमधल्या प्रश्नाचं चायनीज भाषेतलं सफाईदार उत्तर असेल, तर अशा व्यवस्थेत चायनीज भाषेचं ज्ञान (संभाषणक्षमतेइतकं) नक्की आहे का? (सर्वसाधारण तज्ञांचं मत - हो - त्या माणसाला नसलं तरी त्या खोलीला व नियमावलीला आहे)
राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

मार्ग

भूत व वर्तमान काळाप्रमाणे भविष्य काळातसुद्धा अचूक ठरू शकेल असा ज्ञानप्राप्तीचा मार्ग असेल का? व असल्यास तो कोणता?

पोहता न येणारा माणूस खोल पाण्याच्या दिशेने चालत जातांना दिसतो आहे मग तो बूडणार हे भविष्य आपण वर्तवू शकतो त्याला वेगळ्या अशा ज्ञानप्राप्तीची गरज नाही. दिर्घकालिन उदाहरण म्हणाल तर जुगारी, दारुड्या व्यक्तीच्या संसाराच्या वाताहतीचे भविष्य वर्तवता येते. अपूऱ्या पावसाने काय होईल हे ही सांगता येते. पण तरीही भविष्याचे ज्ञान हे अचूक नाही याची तो एक अंदाज मात्र आहे याची जाणीव कायम ठेवूनच या मार्गाचा अवलंब करणे योग्य ठरते.

उघडे मन

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
एका अश्वशर्यतीत एकावेळी किती घोडे धावतात हे मला ठाऊक नाही. काही असले तरी ओळीने सलग पंधरा शर्यती जिंकणारा असा(लेखात वर्णिलेला) इब्राहिम वास्तवात नसावा. असलाच तर आपल्याला-सर्वच वैज्ञानिकांना-दैवी शक्ती,अतीन्द्रिय ज्ञान यांचे अस्तित्व मान्य करणे क्रमप्राप्त आहे. विवेकवादी व्यक्तीचे मन तेव्हढे उघडे(ओपन मायंडेडनेस) हवेच.
समजा एका लखोट्यात ५००रु.ची नोट मोहोरबंद केली." मंगळग्रहावर काय आहे ते मला दिव्यदृष्टीने दिसते" असा दावा करणार्‍या डॉ. वर्तकांच्या हाती तो लखोटा दिला. त्यांनी तो न उघडता नोटेवरील नऊ अंकाक्षरे त्याच क्रमाने अचूक सांगितली तर त्यांना दिव्यदृष्टी आहे हे मान्य करावेच लागेल.

उघड्या मनाबरोबर चिकित्सकवृत्तीसुद्धा!

उघड्या मनाबरोबर चिकित्सकवृत्तीसुद्धा!
बंद लिफाफ्यातील नोटेवरील क्रमांक अचूकपणे ओळखणाऱ्याकडे दिव्यशक्ती आहे असा निष्कर्ष इतक्या घाईने काढू नये असे मला वाटते. कारण यात योगायोगाचाही (बराचसा!) भाग असण्याची शक्यता नाकारता येत नाही. थोडीशी चिकित्सा केल्यास यामागील गौडबंगाल नक्कीच लक्षात येईल. कावळा बसण्याचा व फांदी मोडून जाण्याचा तो क्षण एक असू शकतो.
एखादी व्यक्ती उडवलेल्या नाण्याचा सातत्याने 8-10 वेळा छाप की काटा हे अचूकपणे सांगत असल्यास तिच्यात दिव्यशक्ती आहे असे म्हणता येईल का? यासंबंधात आपण एक काल्पनिक प्रयोग करू शकतो. एका वर्गातील 100 मुलांपैकी 50-55 मुलांनी उडवलेल्या नाण्याचे छाप की काटा बरोबर ओळखल्यास इतरांना बाद करून या 50-55 मुलांसमोर पुन्हा एकदा नाणे उडवल्यास छाप की काटा हे अचूकपणे ओळखणाऱ्यांची संख्या संख्याशास्त्रीय नियमानुसार 25-30 असू शकेल. न ओळखणाऱ्यांना बाद करून पुन्हा एकदा नाणे उडवल्यास अचूकपणे सांगणाऱ्यांची संख्या 12-15 असेल. असे करत करत गेल्यास शेवटी एक जण - जो सातत्याने अचूक ओळखत असतो तो - उरतो. तो 6-7 वेळा अचूकपणे छाप की काटा ओळखू शकला याचा अर्थ त्याच्याकडे दिव्यशक्ती आहे असे म्हणता येत नाही.

छाप काटा व नोटेवरचे आकडे

१० वेळा छापकाटा ओळखता येण्याची शक्यता सुमारे हजारात १ आहे, तर ९ आकडे क्रमाने ओळखण्याची शक्यता अब्जात एक आहे. ते जर कोणी (लबाडी नाही याची खात्री असताना) ओळखले, तर ही दिव्यशक्ती असू शकेल म्हणायला व पुन्हा काही वेळा प्रयोग करण्यासाठी वेळ व पैसा खर्च करायला काहीच हरकत नाही. जर अनेक वेळा हा प्रयोग यशस्वी झाला, व इतर शास्त्रज्ञांना पडताळून पाहाता आला तर विज्ञानाचे काही मूलभूत विचार बदलावे लागतील.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

 
^ वर