गहन प्रश्न अर्थात किरकिर

आपण कुणी समाजसुधारक नाही आणि आपली कीरकीर ऐकायला कुणाला वेळही नाही याची पूरेपूर जाणीव असतांना आजूबाजूला घडणाऱ्या घटनांमूळे आपली स्वतःचीच कीव करावीशी वाटून जाते. की आपला स्वभावच नकारात्मक झाला आहे. आपला चष्माच काळा मग जगात उजेड कुठला दिसायला असे तर काही होऊन बसले नसेल. पण चला. काही दिवसांपूर्वीच शरदरावांनी संकेतस्थळावरचे लेखकमंडळी म्हणजे रिकामटेकडे वगैरे असल्याचा अंदाज बांधला होता. मग आपणही आपली घालमेल लिहून टाकू येथे. जगाचं जे व्हायचं ते होईल निदान आपलं मन तरी थोडंफार हलकं होईल. कालपरवा स्वामी नित्यानंद महाराजांच्या लिलांचे बऱ्यापैकी मार्केटींग करण्यात इलेक्ट्रॉनिक मिडीयाने यश मिळवले. या महाराजांच्या निषेधापायी पून्हा सामान्य जनताच वेठीस धरली गेली. या जनतेतलीच बरीच डोकी आधी त्यांच्यावरच्या भक्तीपायी वेठीस धरल्या गेली होती. स्वामी नित्यानंद यांचा किंवा अशा मंडळींचा आधी श्रद्धेने ओतप्रोत अशा शब्दप्रयोगांनी उल्लेख करणाऱ्या लोकांनी नंतर जाहीरपणे त्यांच्या सात पिढ्यांचा उद्धार केला. यात कोण मुर्ख बनते आहे. आणि कोण बनवते आहे. आपण आपल्यावरच हसतो, चिडतो आहोत की आणखी कुणावर हा प्रश्न नेहमीप्रमाणे बाजूलाच राहीला. नित्यानंदासाठी नरेंद्र मोदींनीही हेलिकॉप्टरने हजेरी लावली होती हे नंतर चर्चिल्या गेले. जनतेच्या प्रतिनिधींनी सार्वजनिकरित्या आपल्या तथाकथित श्रद्धेचे प्रदर्शन करणे खरे तर लाजिरवाणे आहे. पण हे सगळे एखाद्या महाराजांचा भंडाफोड झाल्यावरच. तोपर्यंत ती लोकभावनेची एका सुज्ञ व्यक्तीने केलेली कदर असते. बरं हा भंडाफोड ही जनमाणसावर फार काळ परिणाम करु शकत नाही. ज्या सत्यसाईबाबांची पद्मपाद्यपूजा की काय मुख्यमंत्र्यांनी आपल्या सरकारी निवासस्थानी केली त्या सत्यसाईबाबांच्या लैंगिक शोषणाच्या प्रकरणांवर काही वर्षापूर्वी महाराष्ट्रातल्या मासिकांचे स्पेशल एडीशन निघाल्याचे मला आठवते. कालपरवा ज्या कृपाळू महाराजांच्या कृपेने सत्तरावर लोकांना जी सद्गती मिळाली त्या कृपाळूमहाराजांना बलात्काराच्या आरोपांनंतर नागपूरहून हाकलण्यात आले होते हे ही बऱ्याच जणांना आठवत असेल. बरं कृपाळू महाराजांची भक्तमंडळी तर महाराजांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाल्यावर या मृत लोकांना काळाने मारले त्यात महाराजांचा दोष काहीच नाही असे सांगत आहेत. नित्यानंदांच्या युट्यूब मिटक्या मारत पहाणारेही अर्धीमुर्धी क्लीप पाहील्यावर थोडे मनाशी चडफडून महाराजांना शिव्या घालीत आहेत. या शिव्या संस्कृतीच्या अधःपतनाबद्दल कीती आणि संधी का न मम जिवाला या न्यायाने घातल्या जात आहेत हे ही या मंडळींना एकदा विचारायला हवे. आणि मूळात एखाद्याच्या खाजगी आयुष्याची अशी लक्तरे टांगणारेही संस्कृतीनिष्ट किती आणि व्यवसायनिष्ठ किती हा प्रश्न उरतोच. शेवटी माणूस काय नि महाराज काय हा सामान्य विकारांना बांधील असतोच. बाकी तपस्वीपणाच्या आणि आत्मज्ञानाच्या गप्पा माराव्या त्या नित्यानंदक्षमता निकामी झाल्यावरच. अन्यथा सर्व वृथा खेळ. माणसाने माणूसपणाच्या संस्कृतीचा मुलामा कितीही मिरवला तरी तो मुलामाच. माणूस हा शेवटी एक पशूच. तो दिवसरात्रीतल्या काही क्षणापूरता का होईना पशूसारखा जगू इच्छितो. जगो बापडा. पण असं जगतांना त्याने सामान्य माणसाच्या श्रद्धेला का वेठीस धरावे. आणि जी वेठीस धरली जाऊ शकते ती श्रद्धा असते का. मांढरदेवीला जा की हज यात्रेला, कृपाळू महाराजांकडे जा की अजून एखाद्या दैवताकडे. जेव्हा जीवावर बेतते तेव्हा आपणच आपल्याला धावपळ करुन लोकांना, लोकांच्या लहानग्यांना पायाखाली तुडवून वाचवायला हवे. ही दगडी दैवते आपल्या कामाची नाहीत हे जनतेला कळते. शेकडो किलोमीटरचा प्रवास करीत, प्रसंगी उन्हातान्हात वृद्धांना लेकरांना पायी चालवत या दगडांपर्यंत पोचतांनाच माणसाची ही समज कुठे जाते हा मोठा गहन प्रश्न आहे......

लेखनविषय: दुवे:

Comments

तो मी नव्हे

बाबासाहेब,
लेखकमंडळींना मी रिकाटेकडे म्हटले नाही हो. मी केवळ एका प्रतिसादातल्या विचारांना उद्धृत केले. मी रिकामटेकडा हे मान्य
पण इतरांना मी तसे का म्हणावे ? खरे बोललेच पाहिजे असे काही इथे बंधन नाही. तेव्हा कृपया तेवढे दुरुस्त होते का बघा ना. आपला नम्र,
शरद

शरदरावांचे म्हणणे मान्य

तुम्ही इतरांना रिकामटेकडे म्हटले नव्हते हे मान्य. तुम्ही रिकामटेकडे हे ही फक्त तुम्हालाच मान्य बरं का.

अगतिकता

माणूस अगतिक असतो आणि अगतिकता त्याला बाबा-बुवांच्या मागे घेऊन जाते. बर्‍याचदा कळत असूनही वळत नाही अशी गत होते. आपल्या देशात नैराश्य, मरगळ यांवर वैद्यकीय उपचार आहेत हे लोकांना कळत देखील नाही (हल्ली उपचार आहेत हे माहित असावे परंतु आपल्याला नैराश्याने गाठले आहे हे कळत नसावे) मग बाबा-बुवा वगैरेंची गरज पडते. तसेच, व्यक्तिपूजेचे स्तोम आपल्याकडे जोपर्यंत कायम आहे तो पर्यंत सर्व बाबा-बुवांची चलती आहे.

अवताराच्या संकल्पनेने तर हजारो वर्षे अशी लोकांची फसवणूक झालेली आहे. असो.

अवांतरः

लेखकमंडळींना मी रिकाटेकडे म्हटले नाही हो. मी केवळ एका प्रतिसादातल्या विचारांना उद्धृत केले. मी रिकामटेकडा हे मान्य. पण इतरांना मी तसे का म्हणावे ?

इतरांना तसे म्हणायला कोणीही अडवलेले नाही. माणूस इतरांना काहीना काही म्हणतच असतो तेव्हा असा शहाजोगपणा दाखवायची गरज नाही. मूळ प्रतिसादातही संकेतस्थळांवरील रोजच्या रोज खरडणार्‍या लोकांना रिकामटेकडे म्हटले आहे. ते वाक्य सर्वसमावेशक आहे. शरदरावांनी मात्र आपल्या लेखात व्यक्तिंची यादी देऊन त्या व्यक्तिंवर रोख दर्शवला असे वाटते.

कृपाळू महाराज

श्री जगताप, बाबागिरी हा एक आकर्षक व्यवसाय आहे. श्री कृपाळू महाराज यांच्यावर बलात्काराचे खटले भारतात आणि परदेशात न्याप्रविष्ट आहेत. त्यांच्या भक्तगणांनी त्यांचे केलेले लाड पहा. (चित्रफितीखाली असलेल्या प्रतिक्रिया रोचक आहेत.)

________________________________
माझा प्रतिसाद या मार्गदर्शक सूचनांशी सुसंगत आहे का? नसल्यास कृपया खरड अथवा व्यनिने कळवा.

धन्य...!

>>बाबागिरी हा एक आकर्षक व्यवसाय आहे.
सहमत आहे. काल तर एका वाहिनीवर कृपालू महाराज आणि इतर काही बापूमहारांजांच्या अद्भूत लिला ऐकायला आणि पाहावयास मिळाल्या. चित्रफीत चांगली आहे :)

-दिलीप बिरुटे

वा!!!

=)) =)) =))

हाहाहाहा!!!

बिपिन कार्यकर्ते

अम्मा

चित्रफितीत दिसणार्‍या बाई या श्री कृपाळू महाराजांच्या दिवंगत पत्नी आहेत. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ कृपाळू महाराजांनी उदारपणे गोरगरीबांसाठी भोजन आयोजित केले होते. त्यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत पासष्ठहून अधिक लोकांचा मृत्यु झाला. श्री कृपाळू तेव्हापासून परागंदा असल्याचे समजते.
________________________________
माझा प्रतिसाद या मार्गदर्शक सूचनांशी सुसंगत आहे का? नसल्यास कृपया खरड अथवा व्यनिने कळवा.

परागंदा नव्हे अंतर्धान

श्री कृपाळू तेव्हापासून परागंदा असल्याचे समजते.

परागंदा नव्हे अंतर्धान पावले आहेत असे म्हणा हो.

बाकी ह्या विषयावर काय बोलायचे. सगळे बोलून झालेच आहे. माहितीयुगात, ह्या नव्या जमान्यात बुवाबाजी अधिकच जोमाने फोफावते आहे. असो. आम्हीही गूगलबाबा आणि विकिबुवांचे भक्त आहोत.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

आणखी एक इच्छाधारी बाबा आणि ५०० विष(!)कन्या

या इच्छाधारी बाबांचा कारनामा पहा. हळहळू नका. :)

दूवा http://www.youtube.com/watch?v=ZScri9j68PQ

एचटीटीपी ://डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट यु ट्यूब डॉट कॉम/वॉच?व्ही=झेड एससीआरआय नऊ जे सहा आठ पी क्य़ू
हूश्श ........ झाली एकदाची दहा टक्क्याहून अधिक मराठी अक्षरे.. :)

 
^ वर