लेगो जुळवा-रोबो पळवा!

लेगो जुळवा-रोबो पळवा!
(फर्स्ट लेगो लीग स्पर्धा, ३० जानेवारी २०१० बंगलोर )
गियर्स, मोटर्स, टायर्स, संवेदक असलेले रोबो(यंत्रमानव) आणि लॅपटॉप संगणकांचा पसारा आणि लेगोचे असंख्य छोटे-छोटे तुकडे घेऊन ते लावण्यात दंग असलेली शेकडो पोरे. हे चित्र जपान किंवा अमेरिकेतील नसून गेल्या शनिवारी बंगलोरमध्ये झालेल्या फर्स्ट लेगो लीग स्पर्धेचे आहे. येथील एस.ए.पी. लॅब ह्या कंपनीच्या प्रशस्त आवारात टेक्ट्रोनिक्स ह्या दिल्लीमधील कंपनीने ही स्पर्धा आयोजीत केली होती.
एफ.एल.एल. म्हणजेच ’फर्स्ट लेगो लीग’ हा उपक्रम विज्ञान शिक्षणातील अग्रेसर संस्था ’फर्स्ट’ आणि ’लेगो’ ह्यांच्या भागीदारीतून १९९८ मध्ये जन्माला आला. विज्ञान-तंत्रज्ञान हसत-खेळत शिकण्यासाठी लेगोचे संच अतिशय उपयुक्त आहेत. शिवाय चित्रलिपी असलेली संगणक आज्ञावली अगदी पाचवीतील मुलाला सुद्धा समजण्यासारखी आहे. गेल्या एका दशकात एफ.एल.एल. ४० देशांत पाच लाख इतक्या मुलांपर्यंत पोहोचले आहे.
लेगो माईंडस्टॉर्मचे संच वापरून रोबो बनवण्याचे छंदवर्ग हल्ली मोठ्या शहरांत सुरू झालेले आहेत. बरेच सुशिक्षित, सधन पालक आता मुलांना ह्या वर्गांना पाठवतात. पण ह्या स्पर्धेचे वैशिष्ट्य हे होते की इथे कानडी माध्यमाच्या, शासकीय शाळांमधील कित्येक मुले आली होती. तसेच एका मतिमंद मुलांच्या शाळेतील मुलेसुद्धा आपला रोबो स्वत: बनवून घेऊन आली होती. ह्या मुलांना एस.ए.पी.च्या तंत्रज्ञांचे मार्गदर्शन मिळाले होते. पण अशा स्पर्धेत भाग घेण्याची त्यांची ही पहिलीच वेळ होती. रात्रभर प्रवास करून कोईंबतूरहूनसुद्धा मुले-मुली आली होती. कित्येकांना धड इंग्रजीसुद्धा येत नव्हते पण ही दहा-बारा वर्षांची मुले जमेल तशी आपली संगणक प्रणाली समजावून सांगत होती.
रोबोला स्वत:ची बुद्धी नसतेच, त्यामुळे किती गिरक्या मारत सरळ जायचे, समोर भिंत आली तर कुठे वळायचे, सरळ रेघेवरून कसे जायचे ह्याच्या सूचना मुले संगणकावरून देत होती. एकदा तंत्र पक्के कळले की भाषेची अडचण भासत नाही. एखाद्या पाळीव कुत्र्याला शिकवावे तसेच ही मुले आपल्या रोबोला पढवत होती.
ही स्पर्धा केवळ बुद्धीमत्तेची परीक्षा नसून मुलांमध्ये संघभावना व सामंजस्य रुजवण्याची प्रक्रिया आहे. कित्येकदा एरव्ही ठीक चाललेला रोबो आयत्या वेळेला रुसूनही बसतो. तेव्हा मग त्या समस्येवर हातपाय न गाळता चटकन विचार करावा लागतो. त्या दिवशीच्या स्पर्धेतील छोट्यांचा उत्साह खरोखरच वाखाणण्याजोगा होता.
स्पर्धा म्हटली की त्यात जिंकणे-हारणे हे आलेच. यंदाची विजेती टीम ’एस.ए.पी.बॉट’ अमेरिकेच्या जागतिक स्पर्धेत उतरणार आहे. परंतु त्यादिवशी जमलेले सर्वच स्पर्धक आणि त्यांचे शिक्षक आपापल्या परीने विजेते होते. लेगोच्या निर्जीव तुकड्यांना ’सजीव’ करण्याची किमया त्यांनी केली होती!

Comments

तंत्र - सर्जनशीलता

मला आजकालच्या मुलांचा खूप हेवा वाटतो. इतकी अत्याधुनिक यंत्रणा हाताळायला मिळते हे भाग्य आहे. मला एक लहानपणीची गोष्ट आठवते. आमच्या कुटुंबाच्या एका गॅदरिंगला व्हिडीयो आणला होता. त्यावेळी रंगीत टीव्ही नव्हते, का नुकतेच येत होते. कोणा ओळखीच्यांकडून त्यांनी दुबईहून आणलेला टीव्ही घेऊन आलो. व्हिडीओ लावले तेव्हा चित्र भयंकर भगभगीत दिसत होतं. रंग जास्त होता. मी तेव्हा अकरावीत वगैरे असेन. मी सूचना केली की ते कलरचं बटन फिरवलं तर.... सर्वांनी इतक्या जोरदारपणे ती मोडून काढली की विचारता सोय नाही. 'टीव्ही मोडला तर?' आम्ही दोन पिक्चर अमिताभचा चेहेरा लालभडक, रंग सीमांबाहेर ओघळणारा पाहिला. बहुतेक सगळे झोपल्यावर मी ते बटन फिरवलं -आणि काय आश्चर्य, चित्र सुंदर दिसायला लागलं.

त्यात संपन्नतेचा भाग आहेच, पण आजकाल यंत्रंही अधिक मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत. अशा प्रकारच्या उपक्रमांतून मुलांना तंत्रज्ञानाची छोटी एककं वापरून त्यापासून रोबोसारख्या रचना तयार करता येतात. याने त्यांच्या सर्जनशीलतेला चालना मिळते. आणि जगात घडणाऱ्या काही गोष्टींवर आपण ताबा ठेवू शकतो ही जाण येते.

भारतात चालणाऱ्या या अभिनव व आधुनिक उपक्रमाच्या माहितीबाबत धन्यवाद. मात्र तुम्ही या विषयाला न्याय दिला नाही असं वाटलं. काही फोटो, किंवा चित्रफिती बघायला मिळाल्या तर आवडेल.

लेगोच्या निर्जीव तुकड्यांना ’सजीव’ करण्याची किमया त्यांनी केली होती!

मला यामध्ये रस आहे ते आणखी एका कारणासाठी. क्लिष्टतेवरच्या लेखमालेत अचेतन व सचेतन यात फरक काय? किंवा अचेतनात काही साधे यांत्रिक निर्णय घेण्याची क्षमता आली तर त्यांची 'वागणूक' सचेतनासारखी कशी दिसू शकते, यावर रोबो व त्यांची जुजबी माहिती प्रकाश पाडेल असं वाटतं. साधे सेन्सर्स वापरून एका वर्तुळावर चालणं, भिंत आली की वळणं वगैरे कृती ते रोबो करू शकतात. ते प्रत्यक्ष बघायला मिळालं तर अधिक परिणामकारक ठरेल.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

तंत्र - सर्जनशीलता

लेगो या खेळाबद्दलचा हा लेख वाचनीय आहे यात शंकाच नाही. लेगो हा खेळ काही नवीन नाही. युरोपमधल्या मुलांना तो किमान 50 वर्षापूर्वीपासून तरी उपलब्ध असावा. (चू.भू. दे.घे.) हा खेळ जगातील एक सर्वोत्कृष्ट खेळ मानला जातो तीस बर्षापूर्वी माझी मुले लहान होती तेंव्हा माझ्या परदेशवार्‍या आणि इतर मित्र आप्तेष्टांच्या परदेशवार्‍या यातून थोडे थोडे करून एक बर्‍यापैकी कलेक्शन आम्ही जमवले होते. आज आमची नातवंडे त्यांच्याकडे आमच्या कलेक्शन पेक्षा अनेक पटींनी मोठे कलेक्शन असून आमचे कलेक्शन काढून खेळत बसतात तेंव्हा मोठी गंमत वाटते. चार पाच वर्षापूर्वी सॅन डिऍगो जवळचे लेगोलॅ न्ड बघण्याचा योग आला होता. त्यावेळेस लेगोचे हे तुकडे कसे बनवतात यापासून या तुकड्यांपासून बनवलेली खेळातली संपूर्ण शहरे मोठे प्राणी, गाड्या बघून मन आश्चर्याने चकित झाले होते. लेगोचा ग्रेटनेस हा आहे की त्याच्या उत्पादकांनी तंत्रज्ञान जसजसे प्रगत होत गेले तसतश्या सुधारणा या खेळाच्या ऍप्लिकेशन्स मधे घडवून आणल्या. लेगो वापरून रोबॅटिक्स हा त्यातलाच एक प्रकार आहे.
मला येथे असा मुद्दा मांडायचा आहे की लेगो आहे म्हणून सृजनशीलता वाढली आहे असे काही नाही. माझ्या लहानपणी लेगो हा खेळ नव्हता तेंव्हा मेकॅनो नावाचा खेळ मिळत असे.हा मेकॅनो वापरून अनेक गोष्टी मी बनवलेल्या आठवतात. हा मेकॅनो आता परत मिळू लागला आहे व माझ्या नातवासाठी नुकताच याचा एक संच मी आणला आहे. असो. सृजनशीलता ही लेगो मेकॅनोवर अवलंबून नसते. साधे दोर्‍याचे रीळ, रबर बॅंड, एक काडी व साबणाचा तुकडा वापरून एक अतिशय सुंदर 'ऑल टेरेन व्हेइकल' बनवता येते. किंवा बुटाच्या खोक्यातून कॅमेरे बनवता येतात. ज्या मुलांच्या जी न्समधून त्यांना ही सृजनशीलता येते त्यांना कशातूनही निर्मिती करता येते. ही अशी निर्मिती करण्याला प्रोत्साहन देणे हे जास्त महत्वाचे ठरते. त्यासाठी लेगो, मेकॅनो किंवा साधे पदार्थ यातले कोणते माध्यम तुम्ही वापरता ते गौण आहे.
चन्द्रशेखर

अगदी अगदी

सृजनशीलता ही लेगो मेकॅनोवर अवलंबून नसते. साधे दोर्‍याचे रीळ, रबर बॅंड, एक काडी व साबणाचा तुकडा वापरून एक अतिशय सुंदर 'ऑल टेरेन व्हेइकल' बनवता येते. किंवा बुटाच्या खोक्यातून कॅमेरे बनवता येतात. ज्या मुलांच्या जी न्समधून त्यांना ही सृजनशीलता येते त्यांना कशातूनही निर्मिती करता येते. ही अशी निर्मिती करण्याला प्रोत्साहन देणे हे जास्त महत्वाचे ठरते. त्यासाठी लेगो, मेकॅनो किंवा साधे पदार्थ यातले कोणते माध्यम तुम्ही वापरता ते गौण आहे.

९९% मान्य. (!)
थोडी सुधारणा. मला वाटते सृजनशीलता सगळ्याच मुलांमध्ये असतेच, तिला कधीकधी वाव मिळत नाही.

ऋषिकेश - म्हणतात -
तिचा अनुभव तिच्या शब्दात वेगळा लेख म्हणून (तिला शक्य नसल्यास तुम्ही) इथे टंकावा ही विनंती -
प्रयत्न करीन. ते मिळणार्‍या सहकार्यावर (!) अवलंबून आहे!

सृजनशीलता

माझे मत चित्राताईंपेक्षा थोडे निराळे आहे. सृजनशीलता फक्त काही व्यक्तींच्यातच असते व ती त्यांच्या जी न्समधूनच येते. योग्य मार्गदर्शन व संधी मिळाल्यास ही सृजनशीलता आयुष्यात कधीही जागृत हो ऊ शकते. ज्या व्यक्तींच्यात ही सृजनशीलता नसते त्यांनी केलेले नवनिर्मितीचे प्रयत्न विशेष यशस्वी होत नाहीत.

चन्द्रशेखर

जीन्स

सृजनशीलता फक्त काही व्यक्तींच्यातच असते व ती त्यांच्या जी न्समधूनच येते.

या विधानाला काही आधार आहे का - वैयक्तिक अनुभवांच्या पलिकडे? मला जाणून घ्यायला आवडेल. सृजनशीलता ही मेंदूच्या अतिशय वरच्या पातळीची प्रतीती आहे. जीन्समध्ये त्याबद्दल किती फरक असतो हे सांगणं कठीण वाटतं. माझा अंदाज असा होता की ते बारीक कंबर, अॅथलेटिक शरीर यासारखं आहे - काही जणांना ते मिळवण्यासाठी व राखण्यासाठी कष्ट घ्यावे लागत नाहीत. पण बहुतेकांनी पुरेसे कष्ट घेतले तर मिळवता येण्यासारखं आहे. यापेक्षा तुमच्या डोळ्यासमोर वेगळं चित्र असेल तर त्याला आधारभूत कारणपरंपरेची माहिती करून द्या.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

वैयक्तिक अनुभव

मी माझ्या व्यावसायिक आयुष्यापैकी तीस् तरी वर्षे रिसर्च ऍन्ड डेव्हलपमेंट मधे सक्रिय होतो. या कालातील अनुभवावरून हे विधान मी करतो आहे. सृजनशीलता ही बारीक कंबर किंवा ऍथलेटिक शरीर या सारखी कष्टाने पैदा करता येत नाही. ती तुमच्यात असावीच लागते
चंद्रशेखर

सृजनशीलता

चंद्रशेखर यांच्यासारखाच माझाही अनुभव आहे.
पण थोडा फरक मी करू इच्छितो. अनेकदा सृजनशीलता सिद्ध करून पहावी लागते. म्हणजे आपली ही कल्पना प्रॅक्टिकल आहे हे दाखवून द्यावे लागते. त्यासाठी लागणारे कष्ट घेण्याची तयारी नसलेले स्वतःच सृजनशीलतेला मारून टाकतात.

याचे एक उदाहरण म्हणून न्यूटनच्या गुरुत्वाकर्षणाचे घेता येईल. गुरुत्वाकर्षणाचा नियम स्वतःशी मांडल्यावर तीन वर्षे तो त्या गणितात धरण्याचे दोन पदार्थांमधील अंतर पृष्ठभागापासून घ्यायचे की केंद्रापासून घ्यायचे यावर काम करीत होता. आणि मग त्याने तो सिद्धांत प्रकाशित केल्याचे वाचले होते.

जीनिअस इज १% इन्स्पिरेशन ऍण्ड ९९% परस्पिरेशन असे कुणीतरी म्हटलेच आहे.

वाक्य सुधारून सृजनशीलता ही कष्टाने घालवता येते असे म्हणता येईल. ती घालवण्याचे कष्ट समाज आणि ती व्यक्ती दोन्ही घेत असतात.

दुसरे म्हणजे सृजनशीलता प्रकट करण्याच्या तंत्रावरच्या हुकूमतीचा सुद्धा यात सहभाग असतो. म्हणजे मला एक सुंदर कल्पना सुचली तरी ती मला चित्रात, काव्यात, कथेत मांडता येते की नाही हेही महत्त्वाचे.

नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)

योग्य पण निरुपयोगी संकल्पना

काही थोडे लोक जन्मतः मतिमंद असतात, काही लोक जन्मांध असतात - अशा प्रकारे विचारशक्ती आणि दृष्टीची क्षमता मूलतः जीवशास्त्रीय/जनुकीय आहेत, हे सिद्धच आहे.

परंतु बहुतेक लोक जन्मांध नसतात - त्यांची दृष्टिक्षमता कमी-अधिक असते, पण अनेक कार्यांसाठी पुरेशी असते. त्याच प्रमाणे बहुतेक लोक अशक्य कोटीतले मतिमंद नसतात. त्यांची कल्पनाशक्ती आणि सृजनशीलता कमी-अधिक असली, तरी बहुतेक कार्यांसाठी पुरेशी असते.

जी काही नैसर्गिक शक्ती आपणा बहुतेकांपाशी आहे, ती सरावाने अधिक कार्यक्षम करता येते.

- - -

हे सांगणे आलेच, की बारीक कंबर आणि पिळदार/वेगवान स्नायूंची देहयष्टी ही सुद्धा जनुकीय-अनुवांशिक असते. मात्र तुमची जी काय जनुकीय ठेवण असेल, त्याच्या विकासासाठी सराव आवश्यक असतो. त्या अर्थाने तुमचे वरील वाक्य योग्यच आहे.

बारीक कंबर किंवा ऍथलेटिक शरीर ... कष्टाने पैदा ...

ज्या प्रमाणे जनुकांच्या प्राप्तीनंतर बारीक कंबर किंवा ऍथलेटिक शरीर कष्टाने पैदा करता येतात, त्याच प्रकारे कल्पनाशक्ती आणि सृजनशक्तीसुद्धा.

जेव्हा सर्व मनुष्यांना पूर्ण सराव मिळू लागेल, तेव्हा आपण म्हणूच "सराव मिळाल्यानंतरही लोकांत खूप फरक दिसतो, तो सर्व जनुकीय आहे."

परंतु सर्व लोकांना तसा अवसर मिळेपर्यंत असे म्हणणे घातक आहे. असे म्हणून सर्वांना अवसर देण्याचे टाळले जाईल.

वा!

उत्तम माहिती.

मी लेगोलँड अद्याप पाहिलेले नाही परंतु डिस्नीवर्ल्डच्या डाऊनटाऊन डिस्नी मार्केटप्लेसमध्ये ठेवलेले लेगोने बनवलेल्या प्रचंड प्रतिकृती पाहिल्या आहेत. कोडे (पझल) सोडवण्यासारखाच परंतु सृजनशीलतेचा मोठा अनुभव देणारा हा खेळ आहे.

तरीही, लेगो असो किंवा मेकॅनो आणि भारत असो की अमेरिका या खेळांत प्रामुख्याने मुलगे भाग घेतात असे दिसते. या बंगलोरातील लेगो लीग स्पर्धेतील तुमचा अनुभव काय होता?

लेगो आणि मुलींचा सहभाग

दुर्दैवाने माझ्या शाळेतील रोबोटीक्स् क्लबमध्ये फक्त मुलगेच आहेत. पण स्पर्धेत मात्र वीसपैकी ३-४ टीम्स् मुलींच्या होत्या. आणि त्यांचा कल रोबोच्या कार्यशमतेपेक्षा तो सुबक करण्याकडे होता. त्या संवेदक (सेन्सर्स्) वापरण्यापेक्षा रोटेशन्स् किती झाली व ट्रायल्-एरर करण्यात वेळ घालवत होत्या.
गौरी

मुलामुलींच्या प्रतिक्रियेत थोडा फरक असावा, पण

आवड व्यक्तीसापेक्षही असावी.
तुमचा लेख आवडला.

माझ्या मुलीच्या आफ्टरस्कूलमध्ये (म्हणजे शाळा संपल्यानंतर ती आम्ही तिला संध्याकाळी घरी आणेपर्यंत जिथे थांबते तेथे) लेगोकँप दर शुक्रवारी मागच्याच वर्षी डिंसेंबरपर्यंत चालला होता. आणि तिला आणि तिच्या दोन मैत्रिणींना तो खूपच आवडला.

अर्थात माझ्या मुलीला डिझाईनमध्ये रस अतिशय आहे असे मला दिसून आले आहे. या कँपमध्ये त्यांनी खूप प्रयोग केले असे ती सांगते (दुर्दैवाने माझ्याकडे त्याचे फोटो नाहीत). त्यात त्यांना सुरूवातीस "ओपन एंडेड" प्रॉजेक्ट नव्हते. काही ठराविक लक्ष्य असायचे. अमूक वस्तू ही अशी करायची की अमूक एका उंचीवरून पडून तुटली नाही पाहिजे इ. लक्ष्ये होती. तसेच गाडी तयार करायची, आणि मग तिच्यासाठी लहान प्रॉग्रॅम तयार करायचे. आणि तिला ते खूपच आवडले. पण याबद्दल तिचा अनुभव नंतर तिला नीट विचारून सांगेन.

हॉट व्हील आणि ’मॅड’ कार

अगदी बरोबर...लेगो तसे बर्यापैकी जुने आहे. भारतात मात्र सर्वांना ते परवडण्यासारखे नाही. अजूनही सगळे लेगो सेटस इथे मिळत नाहीत. मी सुरवातीला माझ्या मुलासाठी इथले लेगोसारखे दिसणारे खेळ घेऊन पाहिले पण त्यांना धारदार कडा होत्या. आणि ते नीट घट्ट बसतही नव्हते.

अलिकडे टी.व्ही. वर कला आणि विज्ञान असलेले बरेच कार्यक्रम येतात. ’मॅड’ (म्युझिक, आर्ट, ड्रामा) ह्या कार्यक्रमात शिवणयंत्राची बॉबिन वापरून छान गाडी केली होती. नवीन घराचे काम चालू असतांना एलेक्ट्रीक वायर्सची आठ फूट लांब केसिंग्ज आणि बॉबिनची गाडी घेऊन माझा मुलगा तासन तास खेळायचा. हजार रुपयांच्या हॉट व्हील कार्स आणि ट्रॅकपेक्षा त्याला हीच गाडी आवडायची! शिवाय माझ्या विद्यार्थ्यांना गतिज उर्जा आणि स्थितीज उर्जा शिकवण्यासाठी हे उत्तम साधन झाले ते वेगळेच.

मागच्या लेखात एफ़.एल.एल.ची लिंक द्यायचे राहून गेले. इथे ती देत आहे.
http://www.firstlegoleague.org/

मुले, मुली आणि लेगो

माझा असा अनुभव आहे की मुले आणि मुली दोन्ही लेगो तितक्याच रुचीने खेळतात. परंतु लेगो वापरून ते काय वस्तू बनवतात यात निश्चित फरक असतो. माझा नातू लेगो मधून गाड्या, विमाने हेच बनवतो तर नात घरे, मूळाक्षरे, निरनिराळ्या प्राण्यांच्या आऊटलाइन्स हे बनवते त्यामुळे रोबॅटिक्स मधे फक्त मुले भाग घेत असतील तर नवल नाही.

चन्द्रशेखर

लेगो म्हणजे काय?

आणि लेगोचे असंख्य छोटे-छोटे तुकडे घेऊन ते लावण्यात दंग असलेली शेकडो पोरे.

लेगो म्हणजे काय?

बाकी हल्लीची मुलं अधिक हुशार आहेत यात काही वाद नाही.. जमाना बदलला खूप. आमच्यावेळेला असले काही प्रकार नव्हते..

असो,

आपला,
(काड्यापेट्यांची आगगाडी, नवा व्यापारी, इत्यादी खेळ खेळलेला) तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

लेगो म्हणजे काय

ही लिन्क् बघा
चन्द्रशेखर

काही लेगो कृती

माझ्या मुलाच्या (कबीर- इ.६ वी) काही सोप्या लेगो कृती...

तिजोरी

रेषेवरून चालणारा रोबो
गौरी

छानच आहे

छान आहेत मुलाच्या लेगो कृती.
अभिनंदन!

छान

कल्पक जुळवणी आणि रोबो.

मस्त

वा चांगली माहिती. कॉलेजातील रोबोटीक्सच्या स्पर्धांमधे २र्‍या वर्षी गाडी हलकी होण्यासाठी लेगोब्रिक्स्ची बनवली होती ते आठवले.

@चित्रा:

पण याबद्दल तिचा अनुभव नंतर तिला नीट विचारून सांगेन.

तिचा अनुभव तिच्या शब्दात वेगळा लेख म्हणून (तिला शक्य नसल्यास तुम्ही) इथे टंकावा ही विनंती

ऋषिकेश
------------------
भ्रष्टाचार संपविण्याचा सर्वोत्तम आणि सर्वात सोपा(?) उपाय म्हणजे त्यात स्वतः सहभागी न होणे

छान

लेख आवडला. लेगोच्या कृतींचे व्हिडिओजही मस्तच.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

 
^ वर