झुंडशाही म्हणजे देशद्रोहच

प्रास्ताविक- राजीव साने हे मुक्त विचारवंत आहेत. ते कामगार चळवळीचे विश्लेषक असुन तत्वज्ञान व समाजशास्त्राचे
अभ्यासक आहेत. पुण्यात ज्ञानप्रबोधिनीत चालणार्‍या जनतंत्र - उद्बोधन मंच ( राषट्रवाद अभ्यास मंडळ) हे विचारव्यासपीठाचे संयोजक आहेत. दै.सकाळ २० फेब्रुवारी ला प्रसिद्ध झालेला हा मूळ लेख राजीव साने यांच्या अनुमतीनेच इथे चर्चेसाठी घेत आहे. सर्व प्रकारच्या प्रतिक्रियांच स्वागत आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------

जनआंदोलनाच्या नावाखाली उघड झुंडशाही चालविण्याचे प्रकार अलीकडे वाढले आहेत. शिक्षेचा अधिकार स्वतःच्या हातात घेणे, हा देशाच्या सार्वभौमत्वावरील आघात असतो.भारत हे एक लोकशाही-प्रजासत्ताक आहे. या राष्ट्राशी निष्ठा राखणे म्हणजेच राज्यघटनेनुसार चालणाऱ्या एकमेव शासनसंस्थेला सार्वभौव मानणे होय. सार्वभौमता म्हणजे कोणत्याही कथित गुन्हेगाराला शिक्षा करण्याचा अधिकार फक्त आणि फक्त शासनसंस्थेलाच राहणे. अगदी "रेडहॅण्ड' सापडलेल्या पाकीटमाराला जमावाने मारहाण करणे, हेदेखील शासनाच्या सार्वभौमतेचा भंग करणेच ठरते. पाकीटमाराचे उदाहरण अशासाठी, की त्याची दण्डार्हता सिद्धच मानलेली असते. झुंडशाही ज्या कोणाच्या विरोधात किंवा निषेधार्थ चालविली जाते, त्याची तीच लायकी होती किंवा कसे, या प्रश्‍नात न अडकता आपल्याला झुंडशाही या कृतिप्रकाराबाबत स्पष्टपणे भूमिका घेता आली पाहिजे.
हे सर्व मुद्दाम सांगण्याचे कारण असे, की विविध रंगांच्या राजकारण्यांनी "जनआंदोलन' या नावाखाली उघड उघड झुंडशाही जोपासणे व निरनिराळ्या झेंड्यांच्या "झुंडहृदय'- सम्राटांच्या रूपात घटनाबाह्य सत्ताकेंद्रे उभी करण्याचा सपाटा लावलेला आहे. हे लोकशाहीसाठी- किंबहुना सभ्य समाजधारणेसाठी अत्यंत धोक्‍याचे आहे. परंतु, अशा घटनांच्या वेळी "लक्ष्य' बनवलेल्या व्यक्ती किंवा कलाकृतीचे मूल्यमापन करण्याचा मोह पडत राहतो. उदाहरणार्थ, वारकरी समूहाने डाऊ कंपनी दंडेली करून हुसकली तेव्हा कित्येकांना ते गोड वाटले. चर्चा प्रस्तुत कंपनीच्या गुणावगुणांच्या (चुकीच्या) गल्लीत फिरत राहिली. पण याच समूहाने जेव्हा निर्वाचित संमेलनाध्यक्षांना हुसकले; तेव्हा मात्र, कित्येकांना अभिव्यक्तिस्वातंत्र्याची आठवण झाली. पुन्हा चर्चा आक्षेपार्ह कादंबरीची ऐतिहासिक सत्यासत्यता, लेखकाची आपल्या कलाकृतीवरील निष्ठा वा निष्ठेचा अभाव वगैरे प्रांतात शिरली व झुंडशाही हा विषय बाजूलाच राहिला. जेम्स लेनचा वाह्यातपणा हे भांडारकर इन्स्टिट्यूटवरील हल्ल्याचे समर्थन असू शकत नाही. "शिक्षणाच्या आयचा घो,' असे म्हणावे की नाही या प्रश्‍नावर मतमतांतरे असू शकतात; पण यावरील अंतिम निवाडा अधिकृत सेन्सॉरबोर्डानेच द्यायचा असतो. अंतिम अधिकार निश्‍चित नसेल तर अराजकता मान्य केल्यासारखे ठरेल.

शाहरूख दोषी असता तरीही...
शाहरुखखानच्या म्हणण्याचा मथितार्थ "एका देशाकडून त्यांच्या खेळाडूंना परवानगी नाकारली जाणार असल्याची कुणकुण होती. त्यांच्यावर बोली लावणे शक्‍य नव्हते, तर त्यांना बोलवून अपमानित कशाला करायचे?' एवढाच होता. शाळेत नापास झालेल्या मुलांचा सर्वांदेखत हिरमोड नको म्हणून त्यांना आदल्या दिवशीच घरी पत्र पाठवतात, यात जी सहृदयता असते, तेवढीच तो दाखवत होता. हा देश पाकिस्तानपेक्षा भिन्न असता तरीही हा मुद्दा आलाच असता.पण तो मुद्दा महत्त्वाचा नव्हेच. समजा शाहरूख हा अगदी पाकिस्तानचा हस्तक असल्याचे आढळले असते, तर त्यावर यथोचित कारवाई जरूर केली जायला हवी होती. पण स्वेच्छेने सिनेमाला जाणाऱ्या रसिक प्रेक्षकांच्या अंगाला हात लावण्याचा वा थिएटर मालकांच्या मालमत्तेचे, तसेच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करण्याचा कोणालाही अधिकार पोचत नाही. निरपराधांना लक्ष्य करणे, म्हणजेच दहशतवाद होय. घटनाबाह्य सत्ताकेंद्रांनी राज्यसंस्थेच्या सार्वभौमत्वाला आव्हान देणेच होय. या प्रसंगी महाराष्ट्र सरकारने जी ठाम भूमिका घेतली, ती नक्कीच स्वागतार्ह होती.

लाडावून ठेवलेल्या "भावना'
व्यक्तीच्या भावना सर्व प्रकारच्या असतात; पण समूहाच्या भावना या खास करून जणू "दुखावल्या' जाण्यासाठीच असतात.एकदा भावना दुखावल्या, की सर्व काही क्षम्यच! या बाबतीत पाश्‍चात्त्य जगात खूपच सुधारणा झालेली दिसते. ९-११ च्या घटनेनंतरही अमेरिकेत दंगली उसळल्या नाहीत. एकच प्रतिक्रियात्मक हत्या झाली व त्या गुन्हेगाराला शासनही मिळाले. "दा विंची कोड' हा चित्रपट ख्रिस्त चरित्राची एक वेगळीच शक्‍यता व्यक्त करणारा होता. निष्ठावान कॅथॉलिकांच्या भावना दुखावण्याच्या शक्‍यतेचा प्रश्‍न निर्माण झाला होता; परंतु, ख्रिश्‍चनबहुल देशांमध्ये हा चित्रपट कोणताही अनुचित प्रकार न घडता दाखवला गेला. ख्रिश्‍चनांचे परमगुरू पोप यांनी इतकेच प्रकटन काढले, की निष्ठावान कॅथॉलिक स्वेच्छेनेच हा चित्रपट पाहण्याचे टाळेल. पोप महोदयांनी कोणताही आदेश किंवा फतवा काढलाच नाही. ऐच्छिक बहिष्कार हा निषेध नोंदविण्याचा अनाक्रमक मार्ग असतो. त्यात सहभागी न होणारे लोक हे हिंसेचा बळी ठरत नाहीत. एके काळी तलवारीच्या जोरावर धर्मप्रसार हा दुर्गुण ख्रिश्‍चनांच्यातही होता; पण आधुनिकतेच्या अंगीकाराबरोबर तो सौम्य होत गेला. खरेतर अंतरंगीच्या गाभ्यातील (आध्यात्मिक) धर्मभावना ही दुखावली जाऊच शकत नाही. दुखावतात ते पोकळ अहंकार. फुसकी असते, ती "आमचे पूर्वज तुमच्या पूर्वजांपेक्षा कसे थोर' ही सध्याच्या "बेताच्या' वंशजांमधील वल्गना. आपल्या असल्या विकृत भावनांच्या नावाखाली निरपराधांचे बळी घेण्याचा अधिकार हा कोणालाही कधीही मिळता कामा नये.

जमाव निनावी व विध्वंस सोपा
कोणत्याही गोष्टीची निर्मिती करणे हे फारच कठीण असते; याउलट तिची नासधूस करणे फारच सोपे असते. यामुळे विध्वंसकांचे बळ फारच वाढते व त्यांच्या बळींचे नुकसान मोठे असते. जमावात व्यक्तीची ओळख पुसली जाऊन ती निनावी बनते. तिचा सदसद्विवेक बाजूला पडतो. जमावात माणसाचा राक्षस बनतो. व्यक्ती ही जमावापुढे अगतिक असते. व्यक्तीच्या व निर्मितीशीलतेच्या या विशेष दौर्बल्यामुळेच नागरिकांच्या जीवितवित्ताचे रक्षण करणे, हे शासनसंस्थेचे आद्य कर्तव्य ठरते; परंतु, आपले काही बढाईखोर नेते उदाहरणार्थ ऑलिंपिक पदके जिंकून महासत्ता बनण्याची स्वप्ने पाहतात; पण राज्यसंस्थेचे मूलभूत कर्तव्य मात्र विसरतात. हे म्हणजे कमरेचे सोडून डोक्‍याला गुंडाळण्यासारखे आहे. भूतकाळातले "हिशेब' चुकते करण्याच्या भरात चांगले भविष्य घडविण्याकडे दुर्लक्ष करणे, हे झुंडशहा व त्यांचे चमचे यांचे एक खास वैशिष्ट्य आहे. झुंडशाहीच्या बळींकडे गमावण्यासारखे खूप काही असते. खंडणीबाजीतल्या खरकट्यावर जगणाऱ्या "कार्यकर्त्यांना' राडे करण्याचाच मोबदला व संरक्षणही मिळत असते. हे चालू देणे म्हणजे सभ्य समाजाकडून रानटी टोळी अवस्थेकडे (बार्बारिझम) मागे जाणे होय.
खरे तर "आदेश' किंवा "फतवा' हे शब्दच हुकूमशाहीवादी आहेत. हे शब्द टाळूनदेखील जमावाला भडकवणे म्हणजे स्वतः अनधिकृत राज्यपद बळकावू पाहणेच आहे. हिंसक कृत्ये, नासधूस, सार्वजनिक सेवा बंद पाडणे, खासगी आवारात घुसणे या गोष्टी करणारे तर गुन्हेगार ठरलेच पाहिजेत; पण त्यांना तसे करण्यास उद्युक्त करणारी विधाने करणे, वा अगोदर केलेल्या कृत्यांचे समर्थन करणे, हेही दखलपात्र गुन्हे ठरविले पाहिजेत. जिहादी किंवा नक्षलवादी हे ज्या अर्थाने राष्ट्रद्रोही ठरतात, त्याच अर्थाने झुंडशहादेखील राष्ट्रद्रोही (खरेतर मानवद्रोहीच; पण सध्या राष्ट्र हे एकक व्यवहारात असल्याने राष्ट्रद्रोही) ठरले पाहिजेत. असे न करणे म्हणजे राष्ट्राच्या सार्वभौमतेबाबत तडजोड पत्करणे व फुटीरतावादाला शरण जाणे ठरेल.

लेखनविषय: दुवे:

Comments

घटनात्मक/सनदशीर

लेखाच्या एकूण भावनेशी सहमत आहे त्याचमुळे मुतालिक प्रकरणात अयोग्य गोष्ट असे मत व्यक्त केले होते. परंतु सामाजिक प्रश्न असे काळे पांढरे बघू शकत नाही. एक विचारप्रयोग (थॉट एक्सपरिमेंट) करून पाहू.

मुंबई शहराच्या जवळ एका गावात आम्ही गावकरी मुख्यत्वे भाजीपाला आणि दूध (तसेच काही प्रमाणात अंडी वगैरे) यांचे उत्पादन आपापल्या शेतांतून करतो. आमचे उत्पादन आम्ही मुंबई शहरात नेऊन विकतो. त्यातून आम्हाला बर्‍यापैकी फायदा मिळतो. अलिकडे आमच्यातील काहींनी शहरातल्या ग्राहकांच्या मागणीनुसार निवडलेली भाजी पॅकिंग करून मुंबईत विकायला सुरुवात केली आहे. त्यांना तर अधिकच नफा मिळू लागला आहे. शिवाय त्यामुळे आणखी काही लोकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. एकूणात आम्ही सारे गावकरी सुखी आहोत.

काही काळापूर्वी आमच्या गावात एक मोठी कंपनी काही उद्योग सुरू करणार असल्याचे समजले आहे. काही सॉफ्टवेअर पार्क वगैरे बनवणार आहेत असे समजते. त्यासाठी आमच्या जमिनी संपादन करून सरकार त्या कंपनीला देणार आहे. (आमच्या गावाशेजारी एक पडीक टेकाड आहे पण ती जागा कंपनीला नको आहे. कारण बहुधा ते टेकाड फोडून जमीन समपातळीत आणणे वगैरे गोष्टींत बराच खर्च होईल असे असावे. आमच्या शेतजमिनी आगोदरच समपातळीत आहेत).

आमच्या घेतल्या जाणार्‍या जमिनींच्या बदल्यात आम्हाला पक्की बांधलेली घरे + जमिनीची किंमत देण्याचे सरकारने आश्वासन दिले आहे. शिवाय कंपनीनेही आम्हाला नोकर्‍या देण्याचे आश्वासन दिले आहे.

असे असूनही आमचा जमिनी देण्यास विरोध आहे. याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत.
१ आमचा आमच्या सध्याच्या व्यवसायात चांगला जम बसलेला आहे
२ आम्ही बहुतेक सारे शेतकरी अल्पशिक्षित आहोत त्यामुळे कंपनीने आम्हाला नोकर्‍या देणार असे म्हटले असले तरी त्या सॉफ्टवेअर कंपनीत आम्हाला नोकर्‍या बहुधा अकुशल कामगारांच्या उदा झाडूवाला, हेल्पर, शिपाई यासारख्याच मिळतील. एकदोन जणांना माळी वगैरे नोकर्‍या मिळूही शकतील.
३ आमची मुले ही आमच्याच धंद्यात पडतील असे समजून आमच्यातल्या काहींनी आपल्या मुलांना शेतकी कॉलेजात घातले होते. त्यांना आता पुन्हा दुसरे शिक्षण सुरू करावे लागणार.

परंतु सरकार जमिनी घेण्यावर ठाम आहे. सरकारने आमच्यावर तशा नोटिसा बजावल्या आहेत.

आम्ही मागच्या निवडणुकीत या जमिनी देण्यास विरोध करणार्‍या उमेदवाराला आमदार म्हणून निवडून दिले आहे. तो आमची बाजू विधीमंडळात चांगली मांडतो पण तो एकटा असल्यामुळे त्याचा काही प्रभाव पडत नाही. तसेच त्या नव्या कंपनीतून खूप परकीय चलन मिळणार असल्याने इतर सगळ्या आमदारांचा त्या कंपनीला पाठिंबा आहे .

आम्ही कोर्टातही धाव घेतली होती पण कोर्टाने
१ प्रकल्प प्रदूषणकारी नाही
२ मोबदला + नोकर्‍या मिळणार आहेत
३ सरकार योग्य घटनात्मक प्रक्रिया पाळत आहे
४ प्रकल्पातून व्यापक जनहित (खूप परकीय चलन) साधले जाणार आहे
या कारणांनी आमचा दावा फेटाळला आहे.

या परिस्थितीत आमच्या आमदाराने सरकारच्या आणि कंपनीच्या अधिकार्‍यांना गावात येण्यास मनाई करण्याचे आणि आल्यास चोप देऊन पळवून लावण्याचे ठरवले आहे.

आम्ही तसेच करण्याचे ठरवले आहे. आमच्या जमिनी वाचवण्याचा सनदशीर आणि घटनात्मक मार्ग उरलेला नाही असे आम्हाला वाटू लागले आहे.

की आमचे चुकत आहे. व्यापक जनहितासाठी आम्ही आमचा बळी द्यायचा आहे काय?

उपक्रमींची मते जाणून घ्यायला आवडेल.

नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)

आम्हालाही असेच वाटू लागले आहे

आम्ही तसेच करण्याचे ठरवले आहे. आमच्या जमिनी वाचवण्याचा सनदशीर आणि घटनात्मक मार्ग उरलेला नाही असे आम्हाला वाटू लागले आहे.

आम्हालाही असेच वाटू लागले आहे. कुठलाही कायदा, निर्णय जनकल्याणापेक्षा उच्च असू शकत नाही. ("Salus Populi Suprema Lex Esto" अशी कायदेशीर लॅटिन म्हणच आहे.) नक्की कुठल्या अभिजनांचे जनहित न्यायालये बघतात हे कळत नाही. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांनी स्वतःच आपले भविष्य ठरवलेले उत्तम.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

वास्तववादी आहे का?

श्री थत्ते यांनी दिलेले उदाहरण वाचून बर्‍याच गावांबाबत विचार केला. पण वास्तवात असे गाव मला सापडले नाही. भाजीपाला मुंबईपर्यंत घेऊन जाणारी अनेक गावे नाशिक जिल्ह्यात आहेत. एकतर गावातील सर्व लोकांची उपजीविका या उद्योगावर भागत नाही आणि शेतीच्या बेभरोशाच्या उद्योगापेक्षा अनेकांना महिन्याला निश्चित वेतन देणारी नोकरी महत्त्वाची वाटते. तरीही शेतकर्‍यांना आपल्या जमिनी विकण्याची सक्ती नसावी, हे मान्य.

________________________________
माझा प्रतिसाद या मार्गदर्शक सूचनांशी सुसंगत आहे का? नसल्यास कृपया खरड अथवा व्यनिने कळवा.

सनदशीर मार्ग

गंमत वाटली.

हा विचारप्रयोग आहे हे आधीच स्पष्ट केले आहे. प्रयोगातील पार्श्वभूमी काहीशी सिंगूर, काहीशी नर्मदा धरण, काहीशी रायगड जिल्ह्यातील सेझ अशी संमिश्र आहे.

ऋषिकेश यांचे म्हणणे काहीसे पटते. पण समाज इतका संवेदनशील राहिला आहे का/राहील का याबद्दल शंका आहे. (गांधींच्या शेवटच्या उपोषणात - मरता है तो मरने दो म्हणणारे लोक निर्माण झाले होते असे वाचल्याचे स्मरते). अण्णा हजारे यांच्या उपोषणाचेही काहीसे असेच झाले आहे का?

नर्मदा आंदोलनात (सत्याग्रहाप्रमाणे) गावकर्‍यांनी जलसमाधी घेण्याची धमकी दिली होती. त्याला अनेक वर्षे झाली असावीत. हा विचारप्रयोग मांडणार्‍या मी सुद्धा या वर्षांत त्या संदर्भात काय झाले याचा मागोवा/फॉलोअप ठेवलेला नाही. मला शेवटचे आठवते त्याप्रमाणे धरणाची उंची वाढवण्यास स्थगिती द्यायला (पुनर्वसन योग्य प्रकारे होत नसल्याचे नोंदवूनही) न्यायालयाने नकार दिला होता. त्यानिमित्तने पुनर्वसनाचे मॉनिटरिंग करण्यासाठी यंत्रणा निर्माण केली गेली होती. परंतु त्याचे काय झाले हे मीही पाहिलेले नाही आणि आता मीडियालाही त्यात रस राहिलेला नाही. या संकेतस्थळावर नर्मदा आंदोलकांचे प्रेस रिलीज बघायला मिळतात त्यावरून विविध प्रकारे प्रशासन आंदोलन खच्ची करण्याचा प्रयत्न करीत असते असे दिसते. (आंदोलकांची भाषा विजय मिळत असल्याची असली तरी तसे नसल्याचे स्पष्ट दिसून येते). मधून मधून एखादी अरुंधती राय किंवा आमिर खान आवाज करतात पण ते तात्पुरतेच असते.

धरण पूर्ण झाले आहे असे दिसते. पण पुनर्वसन व्यवस्थित झाले की नाही हे कोणी विचारवंतांनी पाहिले आहे असे दिसत नाही.

नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)

का विचारले?

तुमच्या विचारप्रयोगाविषयी मला काय वाटते त्याविषयी मी आधीच मत नोंदवले आहे. एमिनन्ट डॉमेनच्या कायद्यात बदल करण्याची आवश्यकता आहे, असेच माझेही मत आहे.

उदाहरणात काळे-पांढरे आधीच ठरवल्याप्रमाणे आहे.
शेतकरी: कष्टाळू, प्रगतीशील (पिशव्यातील भाजी, मुलांना शेतकी महाविद्यालयात पाठवतात), तडजोडीस तयार (पडीक जमिन देण्यास विरोध नाही.), सनदशीर मार्ग वापरतात (न्यायालयात दाद मागणे, योग्य लोकप्रतिनिधी निवडून देणे.), एकजुटीने लढणारे
कंपनी: फायद्याचे पाहणारी, तडजोड करण्यास तयार नसलेली
सरकार: परकिय चलन मिळणे व्यापक जनहिताचे समजणारे, एमिनन्ट डॉमेनच्या नावाखाली मालमत्ता हक्कांना पायदळी तुडवणारे
या उदाहरणात काळे-पांढरे हे आधीच ठरवले असल्याने लगेच पाहता येते. शेतकर्‍यांची बाजू योग्य वाटते.

प्रत्यक्ष जीवनात जेव्हा असे घडते तेव्हा तपशीलांमुळे बराच फरक पडतो. शहराला लागून गावे असलेल्या अनेकांना (वडिलोपार्जित भरपूर एकर शेती असलेल्यांना) प्रचंड फायदा झाला आहे. कंपन्यांना नेहमीच स्थानिकांशी वाकडे धोरण ठेवणे फायद्याचे वाटत नाही. जमिनीचे हस्तांतर बर्‍याच ठिकाणी वादग्रस्त न ठरता सहजपणेही झालेले आहे. शेतकर्‍यांनी यशस्वीपणे कंपन्यांना पळवून लावल्याची उदाहरणेही आहेत.

लोकशाहीतल्या त्रुटींवर चर्चा होणे योग्यच आहे. चर्चा केवळ तेथेच थांबू नये असे वाटते. लोकशाहीमुळेच समाजातील अनेक घटकांविरुद्ध होणार्‍या अन्यायाला वाचा फुटली आहे. काही वेळा सकारात्मक आंदोलने (नर्मदा आंदोलनासारख्या) घटनांमध्ये अयशस्वी जरी ठरली असली तरी त्यातून निर्माण झालेल्या अनेक कार्यकर्त्यांनी तत्सम आंदोलने करून नर्मदा प्रकल्पाप्रमाणे होऊ शकणार्‍या अन्यायाला कमी-अधिक प्रमाणात रोखलेही आहे. श्री साने यांनी जमिन हस्तांतरणाबाबत होत असलेल्या रास्त जनआंदोलनांना व अभिव्यक्तिस्वातंत्र्याविरोधात होणार्‍या झुंडशाहीला एकाच रांगेत बसवल्याने चर्चा दुसर्‍याच बाजूला केंद्रीत होत आहे. सनदशीर मार्ग उरलेला नसतांना कायदा हातात घ्यावा लागतो. लेखात उल्लेखलेल्या (डाउ सोडून) किती प्रकरणात मार्ग खुंटले होते? एखाद्या समुदायाच्या भावनांना कितपत महत्त्व दिले जावे? यावरही चर्चा व्हावी.

समाज संवेदनशील आहे का वगैरे चिंता करण्याची गरज नाही. समाजाच्या संवेदनशीलतेत गेल्या पन्नास वर्षात फारसा फरक पडलेला नाही, असे मला वाटते.
________________________________
माझा प्रतिसाद या मार्गदर्शक सूचनांशी सुसंगत आहे का? नसल्यास कृपया खरड अथवा व्यनिने कळवा.

संवेदनशील

माझ्या उदाहरणात मी कोणीच काळा दाखवलेला नाही. कंपनी पडीक जमीन का नको म्हणते आहे याचे गावकर्‍यांना वाटणारे कारण मी लिहिलेले आहे. सरकारही त्याला जे योग्य वाटते तेच करत आहे. कायदेशीरदृष्ट्या ते योग्य असल्याचे प्रमाणपत्र न्यायालयाने दिलेच आहे.
सगळेच वेल मीनिंग आहेत पण गावकर्‍यांचे अस्तित्व धोक्यात येत आहे हे मात्र कोणी लक्षात घेत नाहीये. किंवा ते इनएव्हिटेबल आहे असे झळ न पोचणारे लोक म्हणत आहेत. म्हणून संवेदनशीलतेचा प्रश्न उभा राहतो.

समाज संवेदनशील नसतोच यात काही शंका नाही. आपला स्वार्थ साधला गेला की दुसर्‍याचे काय होते असा विचार कोणी समाज म्हणून करीतच नाही. आणि त्याच स्वार्थाला काही तत्त्वज्ञानाचा/व्यापक हिताचा मुलामाही देतो.
अवांतरः समाजवादाच्या काळात सुशिक्षित लोक सरकारी ऑफीसे, कारखाने,शाळा-कॉलेजे, बँकांमधून नोकर्‍या करीत. त्या वेळी ते स्वतः संप करीत, संप करणे योग्य समजत असत. कारण बहुधा त्या संपातून या वर्गाला काही फायदा होत होता. हे सुशिक्षित लोक पुढे -त्याच संप लढे घेराव बंद या मार्गाने- वेल ऑफ झाले. त्यांची मुले कदाचित बार्गेनिंग टेबलाच्या दुसर्‍या बाजूला पोचली. त्याबरोबर संप करणे कसे वाईट आणि त्याने किती उत्पादनाचे नुकसान होते आणि वगैरे वगैरे तत्त्वज्ञान याच सुशिक्षितांच्याकडून ऐकू येऊ लागले.

नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)

सगळेच बरोबर नाहीत

उदाहरणात सर्वच आपापल्या जागी बरोबर असते तर शेतकर्‍यांनी ठरवलेला मार्गच फक्त योग्य वाटला नसता. 'व्यापक जनहीत' याचा न्यायालयांनी आणि सरकारने 'परकिय चलन मिळविणे' असा चुकीचा अर्थ लावला आहे. ते आपल्या जागी बरोबर नाहीत. सरकारात अनेक गावातील अशा शेतकर्‍यांच्या परवडीबाबत (जे व्यापक जनहीतविरोधी आहे) उदासीनता (कायद्यात बदल करणे गरजेचे वाटत नाही) दिसते तर न्यायालये घटनेत सांगितलेल्या मार्गदर्शक तत्त्वविरोधी निर्णयास मान्यता देत आहेत. (आजकाल न्यायालयांचा अवमानही लगेच होतो.) कंपनी 'फायदावाढीच्या' तत्त्वाशी प्रामाणिक असेल तर तडजोड न स्विकारण्याने होणार्‍या तोट्याबाबत उदासीन दिसते. फक्त शेतकरीच आपल्या जागेवर योग्य आहेत.

________________________________
माझा प्रतिसाद या मार्गदर्शक सूचनांशी सुसंगत आहे का? नसल्यास कृपया खरड अथवा व्यनिने कळवा.

विचारप्रयोग

आपला हा विचारप्रयोग खिळवुन (अडकवुन) ठेवतो. खर तर मूलभूत प्रश्न निर्माण करतो. निळु दामल्यांना बोलावल पाहिजे.
कुठलीच व्यवस्था ही आदर्श असू शकत नाही. सर्वेपि सुखिनः संतु| सर्वे संतु निरामयः||
प्राप्त परिस्थितीत कोर्टाचा निर्णय पाळणे हे व्यवहार्य आहे
प्रकाश घाटपांडे

झुंडशाहीला पर्याय काय ?

झुंडशाही :
श्री. थत्ते यांनी एक बाजू मांडली आहे. मी त्याच बाजूने आणखी दोन उदाहरणे देऊ इच्छितो. एक भावनीक व दुसरे व्यवहारिक.
(१) हुसेन यांनी हिंदु देवतांची नग्न चित्रे काढून प्रदर्शित केली. कलाकाराला अभिव्यतीचे स्वातंत्र्य आहे म्हणून त्याची भलावणही केली गेली.
आता प्रश्न आहे माझ्यासारख्या बेताच्या वंशजांचा. यात माझ्या भावना दुखावल्या गेल्या तर मी काय करावे ? हुसेन यांना हक्क आहेत तसे मलाही हवेत की नाही ? साने यांना जर त्यात काही अनुचित वाटत नसेल तर व त्यांना तशी चित्रे विकत घ्यावयाची असतील तर त्यांनी घ्यावीत पण माझे काय ? कायद्याचे राज्य आहे, कायद्याप्रमाणे वागा हे उत्तर तोंडावर फेकले जाते. पण हिंदुस्थानात कायद्याचे राज्य आहे असे एकाला तरी मनापासून वाटते का ? हुसेन मजेत युरोपमध्ये रहातो व त्याच्यावरील खटले पडून रहातात. त्याला काहीही शिक्षा होणार नाही याबद्दल मी कोणाशीही १००० रुपयांची पैज लावावयास तयार आहे. कलाकार व सामान्य (श्री.सान्यांच्या भाषेत "बेताचा") माणूस यांना एकाच पायरीवर उभे करून मगच कायद्याची भाषा बोलावी. माणसे गाडीखाली चिरडून वर्षानुवर्षे मजेत हिंडणारी माणसे दिसतात ना ? भुकेची गरज म्हणून एखादी शिकार केली तर पारधी तुरुंगात जातो व काळवीट मारून खान सिनेनट म्हणून मोकळा हिंडतो. सॉक्रेटिस हा महान सामाजिक कलाकरच, त्याने प्रचलित कायद्याविरुद्ध मत मांडले पण मरणाची शिक्षा झाली तेव्हा पळून जायला नकार दिला. वर्सेस लिहणारा कवी वा चित्रे काढून पळून जाणारा चित्रकार यांना कायदा शिक्षा करू शकत नाही म्हणून झूंडशाहीचा आश्रय लोकांना घ्यावा लागतो. जा चपळाईने वर्सेसवर बंदी घातली त्या चपळाईने हुसेनवर कारवाई झाली असती तर स्टुडिओची मोडतोड झालीच नसती. आणि सेंसॉर बोर्ड आहे, त्याचा निर्णय माना हे सांगणे केवळ हास्यास्पद आहे. सभासदांच्या नेमणुकांपासून तेथे घेतल्या जाणार्‍या निर्णयांबद्दल सुरस कथा सगळ्यांना माहित असतात. वर्षानुवर्षे मान्यता न मिळण्यापासून हा सीन काटा, ते वाक्य बदला हे कोणाच्या सांगण्यावरून होते हेही छापून येते. मला साने साहेबांना विचारवयाचे आहे की १०००० लोकांना पाहिजे असलेला बदल झूंडशाही म्हणून नाकारावयाचा व कलेतील ठार अडाणी पुढार्‍याच्या सांगण्यावरून वर्दी लागलेल्या चार जणांचा निर्णय मान्य करावयाचा यात कोठला न्याय आला ? ४० टक्क्यांपेक्षा जास्त गुन्हेगार असलेल्या आमदार-खासदारांनी चालवलेले सरकार हे काय न्याय देण्याच्या लायकीचे असते ? ७० टक्के आरक्षण ही झुंडगिरीच नव्हे का ? शिक्षणसम्राट व सहकारसम्राट यांनी चालवलेल्या लूटमारीवर झुंडशाही शिवाय दुसरा उपाय सुचवता काय ?
वरील उदाहरण हे भावनिक आणि म्हणून विवादास्पद. दुसरे उदाहरण आहे सामाजिक व समाजजीवनाशी निगडित.
कोयना धरण तयार होऊन आज ३० पेक्षा जास्त वर्षे झाली. पाण्याखाली ज्यांच्या जमिनी गेल्या त्यांची प्रकरणे अजून मिटलेली नाहीत. पुढील ३० वर्षात मिटतील याची आशा नाही. मामलेदार कचेरी, जिल्हाधिकारी कचेरी, मंत्रालय येथे खेटे मारून दोन पिढ्या संपल्या. आता या लोकांनी काय करावे ? रस्ता बंद, बसेस जाळणे वगैरे केले तर .वर्तमानपत्रात, दूरदर्शनवर प्रसिद्धी मिळते. निदान तात्पुरते आश्वासन मिळते. आजपर्यंत महाराष्ट्रातील एकाही धरणातील विस्थापितांची गार्‍हाणी दिलेल्या वेळेत मिटलेली नाहीत. या लोकांनी हिंसक निदर्शने केली तर त्यांना देशद्रोही म्हणणे हे जखमेवर मीठ चोळणे आहे. पुण्यात बसून न्यायालयात जा सांगणे, तो एकच मार्ग आहे म्हणणे ही क्रूर चेष्टा आहे !
जो पर्यंत झुंडशाहीला ठोस पर्याय काय हे तुम्हाला सांगता येत नाही तो पर्यंत फार तर हात चोळत गप्प बसा, त्यांच्यावर देशद्रोहाचा गंभीर आरोप लावू नका.
शरद

अंशतः

शरद यांच्याशी काहीसा सहमत. म्हणजे दुसर्‍या उदाहरणाबाबत सहमत. माझे उदाहरण काहीसे असेच आहे.

पहिल्या उदाहरणात कुणाचा शारिरिक/ आर्थिक तोटा होत नाही. म्हणून पूर्ण सहमत नाही.

येथे लिहिलेला भाषेचा प्रश्न असाच आहे. कोणी महाराष्ट्रात यावे किंवा न यावे यावर बंधने घालू नयेत पण राज्यातील व्यक्तीला दुसरी भाषा शिकल्याशिवाय व्यवहार करता येणार नाहीत अशी परिस्थिती नसावी. ती येण्याची वेळ घटनात्मक वागण्यामुळे येत असेल तर घटनाबाह्य उपाय करावेत का?
नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)

शारिरिक/आर्थिक तोटा

जर क्ष व्यक्तीने मला आई-बहिणीवरून अर्वाच्य शिव्या दिल्या व तुझा शारिरिक/आर्थिक तोटा झाला का असे विचारले तर मी
काय करावे असे श्री. थत्ते यांचे मत आहे ?
शरद

झुंडशाही

वैयक्तिक बाबतीत काय करावे हा तुमचा प्रश्न आहे. तिथे झुंडशाहीचा प्रश्नच येत नाही.
त्यावेळी तुम्ही ५० जणांना घेऊन जाऊन त्या व्यक्तीला चोपले तर .....

नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)

हम्म!

दबलेला जनक्षोभ उफाळून कधीतरी झुंडशाहीचे प्रदर्शन करतो हे मागे काहीजणांना पटले नव्हते. तो केवळ राजकारणाचा एक हिस्सा असतो असे त्यांचे मत होते ते आठवले.

झुंडशाही आणि अतिरेकी एकच?

नितीन थत्ते यांनी एकंदर प्रश्नाला वेगळे वळण दिले. याच प्रकारे अतिरेकी कारवायांचे समर्थन करता येते. म्हणजे गावकर्‍यांवर अन्याय झाला त्यांनी एकत्र गाबबंदी आणली. पण गावातल्या एख्याद्या छोट्या गटावर अन्याय झाला तर त्याने काय करावे? गावबंदी तर शक्य नाहीना?

न्यायव्यवस्थेबद्दल न बोलता (यात कायदा करणे, पाळवून घेणे व निवाडा करणे तीनही सहभागी आहेत.) या सर्वात उजवे डावे करता येणार नाही.

प्रमोद

सीमारेषा

बिन्गो.
अतिरेकी आणि क्रांतिकारी स्वातंत्र्यसैनिक यातली सीमारेषा धूसरच असते. आपण त्या सीमेच्या कोणत्या बाजूस आहोत त्यावर ते ठरते.
(नक्षलवाद हाही अशाच स्वरूपाच्या प्रश्नांतून उदयास आलेला आहे)

नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)

सहमत आहे

अतिरेकी आणि क्रांतिकारी स्वातंत्र्यसैनिक आणि नक्षलवादी वगैरे यातली सीमारेषा धूसरच असते. आपण त्या सीमेच्या कोणत्या बाजूस आहोत त्यावर ते ठरते.

१००% सहमत.

झुंडशाही अन्यायी पण असु शकते

मुस्कुटदाबी करणारी झुंडशाही (घ्हाशीराम, गांधी गोडसे बंद करणारी) असतात. तुम्ही कुठल्याका बाजुचे असेनात ती अन्यायकारक आहे हे कळतेच.

प्रमोद

कोणत्या बाजूस

असे नसते. एकाच माणसाला घाशीराम वरील बंदी समर्थनीय आणि गोडसेवरील बंदी झुंडशाहीची वाटत असते. याच्या उलटही खरे असते

नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)

सहमत

मूळात अतिरेकी (टेररीस्ट) म्हणजे कोण ह्याची व्याख्याच संदिग्ध आहे.

९/११ पश्चात झालेल्या ५०एक मुस्लिम देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या परिषदेत एकमताने अतिरेकाचा (टेररिजम) निषेध नोंदवण्यात आला, पण अतिरेकी कुणाला म्हणावे ह्यावर मात्र अजिबात एकमत होऊ शकले नाही. सीमेच्या कोणत्या बाजूस आहोत त्यावरुन ठरत असल्यानेच असे झाले असावे.

छान चर्चा

सुंदर चर्चा. झुंडशाही आणि त्यांचे समर्थन म्हणजे अनार्किजम् असावे. नावावरुन जरी कितीही अर्थहीन वाटली तरी ही सुद्धा एक राजनैतिक विचारधारा आहे.

थत्तेंनी दिलेल्या उदाहरणातून त्यांना मार्क्सचे 'क्लास स्ट्रगल' चे तत्व दाखवायचे असावे. जो पर्यंत समाजात आर्थिक परिस्थितीवर आधारीत स्तरांची विभागणी राहणार (मिडल क्लास/लोअर क्लास) तो पर्यंत सर्वसमावेशक सामाजिक न्याय मिळणे अवघड आहे हे अधोरेखित करणारे उदाहरण आहे. साम्यवादाचा माझा फारसा अभ्यास नाही पण त्यावर उपक्रमींचे मत जाणून घ्यायला आवडेल.

माझ्या मते कोणत्याही समाजात ध्रूवीकरण असू नये (निव्वळ साम्यवाद/भांडवलवाद). या दोन्हीचे योग्य ते संतुलन असणे मह्त्वाचे आहे. भांडवलवादी आणि साम्यवादी/समाजवादी ह्या दोन्हीतील तत्वे अंगीकारून समाज व्यवस्था बनली पाहिजे.
साम्यवाद कितीही आदर्श वाटला तरी त्याची अंमलबजावणी जवळपास अशक्य आहे असे मला वाटते. साम्यवादाचे समर्थन करणारे परंतू साम्यवादी देशांचा तिरस्कार करणारे कितीतरी विचारवंत दिसतात ते त्यामूळेच. (मागे एकदा 'ऍनीमल फार्म' विषयीच्या चर्चेत धनंजय ह्यांनी हाच मुद्दा मांडला होता, ऑरवेल ह्यांनी साम्यवादावर टीका केलेली नसून साम्यवादी राष्ट्रांची खिल्ली उडवली आहे.)

तीच गोष्ट भांडवलवादाची. अमेरिका कितीही भांडवलवादी म्हणून प्रसिद्ध असली तरी त्यांच्या एकूण कर उत्पन्नाच्या जवळपास ३०% रक्कम ही गरीब आणि वृद्धांना आरोग्यसेवा पुरवण्यासाठी खर्च केली जाते.(हा समाजवाद नव्हे काय?) 'हेल्थकेअर' (आरोग्यसेवा) सारख्या बाजारांमधे (मार्केट्स) भांडवलवादी सूत्रे अवलंबणे शक्य नाही हे भांडवलवादी अर्थशास्त्रज्ञांनीच दाखवून दिलेले आहे. अशा वेळेस सरकारी हस्तक्षेप न झाल्यास त्याची परिणीती 'मार्केट फेल्युअर' मधे होते.

अर्थात हे काहीसे दोन दगडांवर पाय ठेवून उभे राहण्या सारखे असले तरी सद्य परिस्थीत सामाजिक न्यायाच्या जवळ जाण्यासाठी दुसरा अवलंबण्याजोगा पर्याय समोर येईपर्यंत हे (मला) योग्य वाटते.

ह्या सगळ्याचा सारांश म्हणजे पुलंच्या नामू परीटाचे 'शेवटी माणव हा अपूर्न' हे वाक्य आठवते. :)

काही आक्षेप

झुंडशाही आणि त्यांचे समर्थन म्हणजे अनार्किजम् असावे.

मला वाटतं आपण समर्थन आणि कार्यकारणभाव यातली रेष धूसर करतो आहोत. जनतेचा क्षोभ उफाळून का येतो? याची कारणं शोधणं, आणि तसा तो उफाळूनच त्यातून प्रगती व्हावी हे समाजासाठी कायम स्वरूपाचं मॉडेल ठेवणं यात जमीन अस्मानाचा फरक आहे. पहिल्यामध्ये दोष जनतेवर टाकण्याऐवजी व्यवस्थेचा त्यातला हातभार शोधून, ती व्यवस्था सुधारावी असा विचार करता येतो. दुसऱ्यात व्यवस्था चालत नाही तेव्हा ती तोडूनच टाकावी असा आततायीपणा आहे.

जो पर्यंत समाजात आर्थिक परिस्थितीवर आधारीत स्तरांची विभागणी राहणार (मिडल क्लास/लोअर क्लास) तो पर्यंत सर्वसमावेशक सामाजिक न्याय मिळणे अवघड आहे

अमेरिकेत खूप प्रमाणात असमानता आहे. तरी सामाजिक न्यायाची परिस्थिती खूपच वाखाणण्याजोगी आहे. मुळात वर्गांमध्ये आर्थिक भेद किती आहेत यापेक्षा सर्वात खालच्या वर्गाच्या मूलभूत गरजा (अन्न, वस्त्र, निवारा - आर्थिक; सुरक्षा, शिक्षण, आरोग्य, न्याय - सामाजिक; विचारस्वातंत्र्य, अभिव्यक्तीस्वातंत्र्य - वैचारिक) किती भागल्या जातात हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. या भागलेल्या असल्या तर अंबानीचं घर एकोणतीस मजली का असेना, माझं आयुष्य तितकं वाईट नाही, तेव्हा मला शस्त्र हातात घ्यायची गरज नाही असा विचार होणं साहजिक आहे. क्लास-स्ट्रगल ची केवळ आर्थिक स्वरूपात मांडणी न करता, या सर्व पातळ्यांवर केली पाहिजे. तशी केल्यास आपलं विधान साधारण बरोबर म्हणता येतं. बहुतेक वेळा हे सर्व घटक हातात हात घालून जातात - त्यामुळे सहज मोजण्यासारखं आर्थिक अंग इतरांचं प्रतिनिधित्व करतं.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

खुलासा

जो पर्यंत समाजात आर्थिक परिस्थितीवर आधारीत स्तरांची विभागणी राहणार (मिडल क्लास/लोअर क्लास) तो पर्यंत सर्वसमावेशक सामाजिक न्याय मिळणे अवघड आहे

हे माझे मत नसून मार्क्सच्या तत्वांचे मला समजलेले सार आहे. [सामाजिक न्याय हा शब्दप्रयोग मी तसा ढोबळपणे वापरला आहे, योग्य अर्थ असंतोष खदखदणे. जोपर्यंत आर्थिक परिस्थितीवर आधारीत स्तरांची विभागणी राहणार (अधिक स्पष्ट शब्दात म्हणजे म्हणजे कामगार आणि मालक हे मॉडल अस्तित्वात असणार) तो पर्यंत एका स्तरात असंतोष खदखदत राहणार]

सर्वांच्या मूलभूत गरजा भागल्यावर अंबानीने ५० मजल्याची इमारत जरूर बांधावी त्यावर काहीच आक्षेप नाही, पण सर्वांच्या मूलभूत गरजा भागल्यावर हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. मूलभूत गरजा भागलेल्या नसताना, एकट्या अंबानीने स्वतःसाठी ५० मजले बांधणे हे उपेक्षीतांना त्यांच्या मूलभूत गरजा न भागण्याचे कारण वाटू शकते. भाकरी एकच आहे. एकट्या अंबानीने ती अर्धी खाल्यास मला उपाशी राहावे लागेल. की भाकरी इतकी मोठी आहे, अंबानीने अर्धी खाल्ली तरी बाकीच्यांना पोटभर पुरेल इतकी शिल्लक राहू शकेल हा अनंत काळ चालणारा वाद आहे.

अमेरिकेत खूप प्रमाणात असमानता आहे. तरी सामाजिक न्यायाची परिस्थिती खूपच वाखाणण्याजोगी आहे.

हा नक्कीच विचारकरण्याजोगा मुद्दा आहे. पण खूपच वखाणण्याजोगी आहे हे भारतासारख्या विकसनशील राष्ट्राच्या तुलनेत. (जे अमेरिकेतच नव्हे तर कोणत्याही प्रगत राष्ट्रात दिसून येईल.)

सामाजिक न्याय

पुन्हा एकदा प्रतिसाद वाचल्यावर माझे काही आक्षेप गळून गेले. कारण तुम्ही व मी एकच विचार दोन अंगांनी मांडत आहोत.

की भाकरी इतकी मोठी आहे, अंबानीने अर्धी खाल्ली तरी बाकीच्यांना पोटभर पुरेल इतकी शिल्लक राहू शकेल हा अनंत काळ चालणारा वाद आहे.

यात खरं तर वाद नाही - सध्या ती भाकरी तितकी मोठी नाही. पण जेव्हा ती पुरेशी मोठी होते तेव्हा असमानता कमी जाचक होते हे निश्चित. तिची पोटात उसळणाऱ्या आगीची धग जाते. जगायला शंभर रुपये लागत असताना पन्नास मिळणाऱ्याने चारशे वाल्याचा दुस्वास करणं, त्याच्या हातून हिसकावून घेण्यासाठी शस्त्र उपसणं हे सहज होतं. याउलट सव्वाशे मिळवणाऱ्याला हजार मिळवणाऱ्याची असूया वाटते, पण त्याचा मुख्य रोख त्या वरच्या पंचवीसचा सर्वोत्तम वापर कसा करायचा याकडे असतो. आणि मिळणारे सव्वाशे त्याला भलतासलता धोका पत्करून घालवायचे नसतात.

खूपच वखाणण्याजोगी आहे हे भारतासारख्या विकसनशील राष्ट्राच्या तुलनेत.

हा सापेक्षतेचा मुद्दा मान्य केला, तरी अॅब्सोल्यूट न्यायदेखील आहे. उदाहरणार्थ - २००१ च्या हल्ल्यानंतर संपूर्ण देशभर राष्ट्रवादाचं वारं पसरलं होतं. घराघरातच नाही, तर रस्त्यांमध्ये झेंडे दिसायला लागले होते. बहुतेक फ्रीवेंच्या वरून जाणाऱ्या फ्लायओव्हरवर मोठ्ठे झेंडे टांगले होते. कोणी माहीत नाही. एके ठिकाणी दोन बायकांनी मिळून अफगाणिस्तान युद्ध विरोधी कापडी फलक तसेच टांगले. अनधिकृत म्हणून कॅलिफोर्निया ट्रांझिट ऑथॉरिटीने ते काढून टाकले. झेंडे तसेच ठेवले. त्या दोघी ताबडतोब कोर्टात गेल्या - समान न्याय म्हणून झेंडेदेखील काढून टाकावेत यासाठी. तो खटला निकालात लागून ते झेंडे काही आठवड्यातच काढले गेले. मला कौतुक वाटतं ते म्हणजे या बायका हे 'समाजविरोधी' कृत्य करतात म्हणून कोणी त्यांच्या घरावर दगडफेक केली नाही, की त्यांना धमकीचे फोन आले नाहीत. निर्णय वेगाने आला, व अंमलबजावणीही झाली. हेही ते झेंडे झिजायच्या आत, तो मुद्दा ताजा असताना. संपूर्ण समाजाविरुद्ध केवळ तत्त्वासाठी व्यक्ती लढून तिच्या बाजूने निर्णय लागतो व तो पाळला जातो यापेक्षा जास्त काय मागावं? कदाचित भारतातही ते पुढच्या चाळीस पन्नास वर्षात समृद्धीबरोबर येईल.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

चांगला लेख

झुंडशाहीची नक्की व्याख्या कशी करावी?
मझ्यामते अल्पमतात असणार्‍यांना बहुमताने तर्कदुष्टपणे, शक्तीच्या/संख्येच्या जोरावर चेपणे म्हणजे झुंडशाही

नितीन यांनी वर दिलेले उदाहरणात गावकरी जे करत आहेत ती झुंडशाही आहे का हा प्रश्न पडला. कारण इथे गावकरी अल्पमतात आहेत आणि त्यांच्या प्रश्नांना तर्कदुष्टपणे, शक्तीच्या/संख्येच्या जोरावर चेपले जात आहे. तेव्हा सरकार झंडशाही करत आहे गावकरी नव्हेत.

अश्यावेळी प्रतिकार करणे गावकर्‍यांनी ठरविल्यास ते योग्यच आहे. अश्यावेळी "चिपको" आंदोलना प्रमाणे जमिनी न सोडणे, सहकारी तत्त्वावर शेतकर्‍यांनी एकत्र येऊन संस्था उभारणे जेणे करून एकतेची शक्ती येईल, सामाजिक संस्थांच्या भेटी घेणे, पेपरात लेख वगैरे लिहून काहि मोक्याच्या लोकांना भूमिका प्रटवून देणे व त्या 'वजनदार' लोकांनी जनमत वळविणे वगैरे करता येईल.

प्रतिकार करावाच. त्यासाठी हिंसक मार्ग अवलंबायचा की नाहि ते गावकर्‍यांच्या स्वभावावर आणि मुख्यतः त्यांना लाभलेल्या नेतृत्त्वावर अवलंबून आहे असे वाटते.

ऋषिकेश
------------------
भ्रष्टाचार संपविण्याचा सर्वोत्तम आणि सर्वात सोपा(?) उपाय म्हणजे त्यात स्वतः सहभागी न होणे

बरोबर

बरोबर वाटले,
पटले.

आपला
गुंडोपंत

बहुमत

केवळ बहुमताच्या जोरावर लोकशाहीत एखादे विधेयक पास होते त्याला झुंडशाही म्हणता येईल का? संख्याबळ हाच निकष अखेरीस लावला जातो. आपल्याला अनुकुल असलेले संख्याबळ लाभले कि जनादेश म्हणुन मिरवता येते. समजा तसे लाभले नाही तर ऍण्टीइन्कम्बन्सी ( मराठीत प्रतिशब्द माहित नाही) म्हणायचे.
लोकशाही धोक्यात आणणारे प्रतिकूल समुहवर्तन म्हणजे झुंडशाही असा अर्थ मी घेतला आहे. मग लोकशाही न्याय्य आहे काय? असे प्रश्न सुरु होतात.
प्रकाश घाटपांडे

सुवर्णमध्य

हा तुम्ही चांगला प्रश्न मांडला आहे. जनमानसातला उफाळून येणारा क्षोभ व त्याच मानसाचं त्यांच्या प्रातिनिधिक मतांद्वारे व्यक्तीकरण हे एकाच स्पेक्ट्रमचे भाग आहेत. सभ्य आणि असभ्य अशी विशेषणं लावून त्यांच्यात थोडा सुसह्य भेद करता येतो. फक्त आदर्श लोकशाहीत तिला एक पद्धतशीर वाट दिलेली असते. सतत अराजकाऐवजी हे बरं म्हणून हा कॉम्प्रोमाइज आहे.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

उत्तर अगदी सरळ व सोपे आहे.

झुंडशाही, देशद्रोह कशाला म्हणावं याचं उत्तर सोपं आहे. आपल्या आवडत्या नेत्यानी माणसं जमवून केलेलं ते न्याय्य हक्कांसाठी जनआंदोलन असतं. आपल्याला न आवडणार्‍या नेत्यानी माणसं जमवून केलेली ती झुंडशाही व देशद्रोह असतो. तसंच माणसं एकत्रितपणी भांडताना आपल्या नावडत्या नेत्याचा जयजयकार होत असेल तरीही त्याला झुंडशाही, देशद्रोह असं म्हणता येईल.

झकास!

+१
झकास!

आपला
गुंडोपंत

+२

झकास.

-दिलीप बिरुटे

राजीव साने

राजीव साने यांच्या पर्यंत सर्व प्रतिक्रिया पोचवल्या आहेत. त्यावर त्यांचे असलेले विवेचन हे एखाद्या लेखातुन प्रितिबिंबित होईल. स्वतंत्रपणे लिहिणे व्यावहारिक दृष्ट्या त्यांना शक्य होणार नाही. असा काही लेख आला कि आम्ही तो आपल्यापर्यंत पोहोचवू.
प्रकाश घाटपांडे

 
^ वर