उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
अप्रकाशित इतिहास
अ...अभय
February 20, 2010 - 6:36 pm
या लेखाचा उद्देश इतिहासातला जो भाग बहुधा अप्रकाशित आहे ,सर्वांना माहित नाही त्याची माहिती करून देण्याचा आहे. या इतिहासाने काही विनोदी ,काही आश्चर्य कारक वाटणारी तर काही रूढ समजुतींना धक्का देणारी माहिती देणार आहे.
आपापल्याकडे असलेली माहिती देवून सदस्यांनी ह्या धाग्यात भर घालावी .अर्थात हि भर घालताना तो इतिहासाचा भाग जास्त प्रमाणात कोणाला माहित नसेल याची काळजी घ्यावी ..अशी माहिती नवीन असल्याने त्यावर प्रश्नचिन्ह उठणे स्वाभाविक आहे. तरी माहिती देताना योग्य ते पुरावे द्यावेत हि विनंती .सहकार्याची अपेक्षा .
दुवे:
Comments
माझा प्रवास किंवा १८५७ च्या बंडाच्या हकीकती
सुरवात झाशीच्या राणीपासून करण्याचे कारण म्हणजे सध्या या विषयावर एका हिंदी वाहिनीवर एक मालिका चालू आहे त्यातली बरीचशी माहिती चुकीची आणि अतिरंजित आहे .
झाशीच्या राणीचा उल्लेख महात्मा फुले यांनी एका ठिकाणी विटाळसा होऊन चार दिवस वेगळा बसणाऱ्या राजाची स्त्री असा केला आहे. समग्र महात्मा फुले वाचणार्यांना हि गोष्ट माहित असेल पण याचा अर्थ कळला नसेल.
झाशीच राजा गंगाधर राव हा स्त्रैण होता .हा राजा स्त्री वेश करत असे. पैठणी नेसे. जरीची चोळी घाली .नथ ,तोडे वगैरे स्त्रियांचे सर्व अलंकार घालत असे.(याने नाक टोचले होते का?का त्या काळीही चापाची नथ होती?) केसाची वेणी घालून त्यात फुले माळत असे.
एवढेच नव्हे तर महिन्याला तीन दिवस अस्पर्श म्हणून बाजूला बसत असे.(पूर्वी मासिक पाळीत पहिले तीन दिवस स्त्रियांनी बाजूला बसण्याची चाल होती .सध्या हि चाल इतकी राहिली नसली तरी देवाचा आणि काही प्रकारात स्वयंपाकात अस्पर्श पल्ला जातो )
चौथ्या दिवशी न्हाण समारंभपूर्वक करत असे. नहाण झाले कि पलंगावर झोपून पलंगाखाली कळशीत शेक करून केस वाळवत असे (अजूनही दर न्हाण्याला नसला तरी लग्न आधी मळी काढताना आणि बाळंतपणनंतर काही काळ कोट खाली असा शेक केला जातो ).
(अर्थात हा राजा षंढ नव्हता असे प्रजेला वाटे. कारण त्याला पहिल्या पत्नीपासून एक अपत्य होते .पण हि गोष्ट कशी शक्य झाली याचे वर्णन पुस्तकात असले तरी अश्लील असल्याने येथे देत नाही )
हि माहिती झाशीच्या विविध कागद पत्रात विखरून आली आहे. अर्थात याचा महत्वाचा स्त्रोत म्हणजे गोपाळ गोडसे लिखित माझा प्रवास हे पुस्तक .
गोपाळ गोडसे भटजी हे वसईचे रहाणारे. कर्ज झाले असता हे फेडण्यासाठी काही तरी उपायाच्या शोधात होते .हा उपाय त्यांना सापडला. शिंदे सरकार मोठा यज्ञ करणार होते .या यज्ञात जावून दक्षिणा मिळवावी अश्या हेतूने ते उत्तरेकडे निघाले .नेमके त्याच वेळेस १८५७ च्या उठवला सुरवात झाली आणि त्यांच्या मनसुब्यावर पाणी पडले. जीव वाचला हेच फार झाले असे म्हणायची वेळ आली. परत आल्यावर त्यांनी या प्रवासाच्या काहीकती लिहून काढल्या
.या गोष्टी चे पुस्तक माझा प्रवास किंवा १८५७ च्या बंडाच्या हकीकती या नावाने प्रसिध्द झाले .सध्या नवीन आवृत्ती पुण्याच्या राजहंस प्रकाशनाने काढली आहे .
त्याकाळ मुलींचे वडील पैसे घेवून मुलीचे लग्न लावत. वर वर्णन केलेल्या गंगाधर राव यालाही पहिली बायको गेल्यावर पुन्हा मुली बघायला सुरवात झाली .पण राजाच्या विचित्र सवयींमुळे कोणीही कऱ्हाडे ब्राह्मण त्यास आपली मुलगी देण्यास तयार नसे. यास मुलगी देण्यापेक्षा मुलगी पाण्यात लोटणे बरे असे गरीब लोक हि म्हणत .
पण पेशव्यांच्या होम शाळेतले मोरोपंत तांबे मुलगी द्यायला तयार झाले. पैसे मागितले नाहीत .पण पहिली पत्नी गेल्यामुळे आणि मुलगा नसल्याने दुसरे लग्न करून द्या व तेथेच रहायला जागा द्या अशी अट घातली .अति मंजूर झाल्यवर भाड्याची गाडी करून झाशीला आले .११ व्या वर्षी मानिकार्निका यांचा विवाह होऊन त्या झाशीच्या राणी झाल्या .त्यांचे नाव लक्ष्मीबाई असे ठेवले. त्यांच्या वडलांना वाडा , आचारी ,पाणके ,ब्राह्मण ,कारकून वगैरे देण्यात आले .पुढे त्यांच्या बायकोला रजो दर्शन होऊन एक मुलगा व एक मुलगी झाली .
पहिले अपत्य
हे अपत्य कोण होते? त्याचा अकाली मृत्यू झाला की ती मुलगी होती. प्रश्न विचारण्याचा उद्देश असा की जर गंगाधररावाला अपत्य होते तर दत्तकपुत्र का घ्यावा लागला? तसेच, लक्ष्मीबाईंनाही अपत्य झाल्याचे परंतु त्याचा बालमृत्यू झाल्याचे सांगितले जाते. त्यानंतर दामोदररावांना दत्तक घेतले, डलहौसीने ते नाकारले आणि पुढील इतिहास सर्वांना माहित आहेच. परंतु मग लक्ष्मीबाईंचेही अपत्य होतेच ना गंगाधररावांकडून?
अजुन एक प्रश्न
इतर सर्व छोट्या मोठ्या घटनांचे तपशीलवार वर्णन गोडसेभटजींनी त्यांच्या पुस्तकात केलेले आहे पण या अपत्याचा साधा उल्लेखही त्यांनी का केला नसावा?
शिपाईगडी
उत्तम
योग्य संदर्भांसकट दिलेल्या इतिहासातील गोष्टी वाचायला आवडतील. याचप्रमाणे हा ब्लॉगही मला आवडतो. अशाच वेगवेगळ्या ऐतिहासिक गोष्टींची माहिती करून देतो.
इतिहास आणि भारतीय
आपण भारतीयांना एक अतिशय वाईट खोड आहे. आपण प्रत्येक गोष्टीचे उदात्तीकरण करू बघतो. त्यामुळे आपल्याला इतिहासाकडे वस्तुनिष्ठतेने बघता येत नाही. इतिहासातील प्रत्येक व्यक्तीला गुणांबरोबर दोषही असतात हे आपण मान्यच करू शकत नाही. दुसर्या कोणी आपल्या इतिहासातील व्यक्तींच्या कडे वस्तुनिष्ठतेने पाहिले तर आपल्याला ते रुचत नाही व आपण त्या व्यक्तीच्या लिखाणाची होळी करायला निघतो. त्यामुळेच आपला खरा इतिहास शोधण्य़ासाठी आपल्याला परकीयांची मदत घ्यावी लागते.
चन्द्रशेखर
शंभर टक्के खरे
आपण भारतीयांना एक अतिशय वाईट खोड आहे. आपण प्रत्येक गोष्टीचे उदात्तीकरण करू बघतो. त्यामुळे आपल्याला इतिहासाकडे वस्तुनिष्ठतेने बघता येत नाही. इतिहासातील प्रत्येक व्यक्तीला गुणांबरोबर दोषही असतात हे आपण मान्यच करू शकत नाही.
चंद्रशेखर यांचा वरील मुद्दा मला शंभर टक्के पटतो.
उदात्तीकरणाची अजून काही उदाहरणे पहा,
कुंतीच्या अंगावर सुर्यकिरण पडले आणि तिला पुत्रप्राप्ती (कर्ण) झाली.
देव हनुमान आकाशातून उड्डाण करीत असतांना त्यांच्या घामाचे थेंब समुद्रात पडले व ते एका मगरीने गिळले आणि तिला पुत्रप्राप्ती झाली.
उदात्तीकरणच नव्हे
गोष्टींचे उदात्तीकरण आणि याबरोबरच व्यक्तिपूजा या दोहोंनी भारतीय इतिहासाची पुरेपूर वाट लावली आहे.
प्रत्येक महत्त्वाच्या व्यक्तिला कोणत्यातरी देवाचा अंश दाखवायचे आणि त्याच्या चुकांवर पांघरूण घालायचे ही दुसरी वृत्ती.
उदात्तीकरण...
कुंतीच्या अंगावर सुर्यकिरण पडले आणि तिला पुत्रप्राप्ती (कर्ण) झाली.
देव हनुमान आकाशातून उड्डाण करीत असतांना त्यांच्या घामाचे थेंब समुद्रात पडले व ते एका मगरीने गिळले आणि तिला पुत्रप्राप्ती झाली.
हे उदात्तीकरण नाही वाटत. हिरो-हिरॉइन जवळ आले की क्यामेर्याच्या लेन्ससमोर दोन फुलं एकत्र येतात त्याची सुरूवात इथे झाली असावी असे वाटते. ;) थोरामोठ्यांच्या असल्या उद्योगाबद्दल उघडपणे कसे बोलायचे? आणि असले विषय कसे मांडायचे वगैरे कुचंबणेतून आलेले असावे.
बाकी मूळ मुद्द्याशी सहमती आहेच.
बिपिन कार्यकर्ते
सांकेतिक
गावाकडे मारुतीच्या देवळात तपस्वी गुरुजी जेव्हा रामविजय, हरिविजय वाचायचे त्यावेळी हनुमान उडत असताना घाम खाली पडतोय व मगर ती गिळतीय असे दृष्य डोळ्यासमोर यायचे. मग मकरध्वजाचा जन्म कसा झाला असेल् या प्रश्न डोळ्यासमोर येत असे.
प्रकाश घाटपांडे
ब्रह्मचारी
>>थोरामोठ्यांच्या असल्या उद्योगाबद्दल उघडपणे कसे बोलायचे?
हो ना! आणि त्यातून हनुमान ब्रह्मचारी म्हणून प्रसिद्ध झालेला.
(अवांतरः प्रत्यक्षात आकाशातून उडणार्याचा -माणसाचा- घाम असा कधीही खाली पडणार नाही. त्याचे थेंब तयार होण्यापूर्वीच तो वाळून जाईल. देवाचे माहिती नाही.)
नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)
मारुतीची बायको
ही चर्चा तुम्हा सर्वांनी वाचली आहे का? नसल्यास अवश्य वाचा.
माझा प्रवास
माझा प्रवास हे गोडसे भटजींचे (गोपाळ? वसईकर का वर्सईकर?) पुस्तक, मराठी पुस्तके मधे प्रकाशन करणे चालु आहे.
प्रमोद
वरसई असावे
लोकसत्तातील हा लेख वाचता वरसई असल्याचे कळते.
१८५७
वरसईच आहे (रायगड जिल्ह्यात खोपोली-पाली रस्त्यावर बहुधा हे गांव आहे)
त्यांचे नावही गोपाळ नसावे.
अजून एक म्हणजे गंगाधरपंत स्त्रैण होते याबरोबरच बुंदेलखंडात 'असले' लोक फार अशी टिपण्णीही केली आहे.
पुस्तक वाचलेले आहे. (प्रथम ते अंतुलेफेम प्रतिभा प्रतिष्ठान तर्फे प्रसिद्ध झाले होते).
१८५७ ची घटना शिपायांचे बंड नसून (व्यापक) स्वातंत्र्यलढा होती असे ऐकत आलो होतो. त्या दृष्टीने काडतुसांच्या चरबीची गोष्ट खोडसाळपणे ब्रिटिशांनी स्वातंत्र्यलढ्याचे महत्त्व कमी करण्यासाठी वापरली असावी असे वाटे. पण गोडसे भटजींच्या पुस्तकात त्या गोष्टीचा उल्लेख आहे.
एकुणात ते स्वातंत्र्ययुद्ध नव्हते अशा मताप्रत आलो आहे. म्हणजे 'परकीयां'च्या सत्तेपासून स्वातंत्र्य ही कल्पना कुणाच्याच डोक्यात नव्हती. ना शिपायांच्या ना संस्थानिकांच्या. ज्या संस्थानिकांची राज्ये (मांडलिक म्हणून का होईना) खालसा झाली ते 'आपली राज्ये टिकवून ठेवण्यासाठी' लढ्यात उतरले. ज्यांची राज्ये (मांडलिक म्हणून का होईना) शिल्लक होती ते ब्रिटिशांच्या बाजूने लढले. जे लढले त्यांची राज्ये खालसा झालेली नसती तर ?
शिपाई काही प्रमाणात स्वतःच्या धर्मविषयक कल्पनांनी लढले.
सामान्यांचा युद्धातील सहभाग किती होता हे सुद्धा त्या पुस्तकातून स्पष्ट दिसते. भटजी वगैरे मंडळी झाशीच्या किल्ल्यात असताना बाहेर लढाई चालू होती. त्यावेळी "आम्ही मौज पहात सज्जात (?) उभे होतो" असे वर्णन गोडसे भटजींनी केले आहे.
असो. विषयांतर झाले का?
अर्थात यात ते संस्थानिक, शिपाई किंवा सामान्य यांना दोष देण्यासारखे काही नाही. कारण परकीय सत्तेचे खरे स्वरूप आणि आर्थिक शोषण हे बहुधा दादाभाई नौरोजींच्या आधी कुणाला कळलेच नव्हते. किंबहुना ब्रिटिश परके ही कन्सेप्टही नव्हती तर सत्तेच्या साठमारीतले ब्रिटिश हेही एक प्लेअर आहेत अशीच कन्सेप्ट होती. कारण पेशवे+इंग्रज वि निजाम, शिंदे+इंग्रज वि पेशवे इत्यादि प्रकारच्या लढाया पूर्वी झालेल्या होत्या.
नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)
वरसई नक्की!
>>वरसईच आहे (रायगड जिल्ह्यात खोपोली-पाली रस्त्यावर बहुधा हे गांव आहे)
"माझा प्रवास" आता उपलब्ध आहे.
जुन्या भाषेत लिहलेले हे पुस्तक त्या काळाचा "आंखो देखा हाल" देते. हे भटजी कोकणातून मजल दरमजल करत कसे काय तिकडे बुंदेलात कसे पोचले ते वाचणे रोचक आहे.
राणीचा खरा इतिहास प्रतिभा रानडे यांच्या झांशीची राणी लक्ष्मीबाई या पुस्तकामध्ये फार अभ्यासपूर्वक लिहला आहे. रानडेबाईंनी माझा प्रवास मधले संदर्भ व्यवस्थितपणे आधुनिक
मराठीत आणलेले आहेत.
गौरी
१८५७
अहो असं काय करता? १८५७ चे स्वातंत्र्यसमर वाचले नाहीत का? :)
स्वातंत्र्ययुद्ध नसेल पण धर्मयुद्ध नक्कीच असावे.
“In 1857 the Hindus and Muslims set aside their centuries old religious war to fight the Christians.” (Savarkar Samagra, Vol. 5, p. 29).
वसुलि
वसंत सुधाकर लिमये
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू न
धर्मयुद्ध
या धर्मयुद्धाचे स्पष्टीकरण "माझा प्रवास" या पुस्तकात पान २०-२३ मध्ये दिले आहे. अवश्य वाचावे. काडतुसांच्या गोष्टीबरोबर, विधवा विवाह, ख्रिस्ती धर्म स्वीकारलेल्या लोकांचे हक्क वगैरे एकत्र जोडून सांगोवांगीच्या गप्पा पसरवताना या बंडाचे धर्मयुद्ध कसे झाले याचे रोचक वर्णन आढळते.
एकंदरीत पुस्तक वाचनीय आहे. त्याचा दुवा दिल्याबद्दल पटवर्धनांचे धन्यवाद.
विष्णुभट गोडसे
त्यांचे नाव विष्णुभट गोडसे असे आहे.
त्यांनी गंगाधरपंतांना स्त्रैण म्हटलेले नाही. षंढ मात्र म्हटले आहे. परंतु, पुढे बुंदेलखंडातील पुरुष षंढच होते अशी टिप्पणी ते करतात. मुद्दा अधिक सविस्तर करण्यासाठी लिहितात की यांच्या बायका सुंदर होत्या परंतु पुरुषांचा त्यांच्यावर वचक नव्हता. मंदिरात जातो वगैरे सांगून त्या सहज घराबाहेर पडत आणि एखाद्या सोद्याला भेटून येत. :-) पुढे ते लिहितात की गंगाधरपंतांनी आपल्या बायकोला वचकात ठेवले होते. लक्ष्मीबाईंना पुरुषी खेळ खेळण्याची, घोडेस्वारी करण्याची लहानपणापासून सवय होती परंतु गंगाधरपंतांनी त्यांना राजवाड्यातून बाहेर पडण्याची परवानगी दिली नव्हती.
वर प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे त्यांच्या वेगळ्या सवयींमुळे त्यांना कोणी मुलगी देत नव्हते परंतु ते एक कर्तव्यदक्ष आणि न्यायी राजे होते असेही म्हटले आहे.
असो. माझा प्रवास हे पुस्तक अतिशय रोचक आहे. एका बैठकीत चाळून काढले.
हा हा हा
यांच्या बायका सुंदर होत्या परंतु पुरुषांचा त्यांच्यावर वचक नव्हता.
कायस्थ मुळचे बुंदेलखंडातील काय?
(असो, हघ्या असे लिहून उपक्रमींच्या विनोदबुद्धीचा अपमान करीत नाही!)
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
शिपाई गर्दी
न. र. फाटकांनी यावर एक अतीशय उत्तम पुस्तक लिहीले होते त्याचे नाव शिपाई गर्दी.
इतिहासातील काही मजेदार कथा यावर यं. न. केळकर (न.चि केळकरांचे पुत्र) यांनी 'इतिहासातील सहली' असे पुस्तक लिहीले आहे. या पुस्तकाचा एकच भाग मी पाहिला आहे. इतर भाग कुठे मिळतात याच्या मी शोधात आहे.
प्रमोद्
माझा प्रवास
अभ्यासुसाठी ही ''माझा प्रवास'' ची लिंक.
http://www.dli.ernet.in/scripts/FullindexDefault.htm?path1=/data_copy/up...
अलिकडेच वाचलेल्या काही माहिती वरुन् माझही मत काहीसं नितीन थत्तेंसारखंच् झालं आहे. झाशीच्या बण्डाकडे देखील संशयपुर्वक बघणारा लेख कुठेतरी वाचला ( बहुदा खट्टामिठावरच).
(आवडेल आणि पचेल असा इतिहास लिहिणार्या, वाचणार्या, दाखवणार्या आणि बघणार्या समाजात आपण रहतो आहोत हे वरील लेख वाचुन प्रकर्षाने जाणवलं)
अभिषेक
धर्मयुद्ध
शेषराव मोरे यांचे "१८५७ चा जिहाद" या नावाचे एक पुस्तक आहे. यामधे, १८५७ चा उठाव हा, प्रामुख्याने कडव्या मुस्लिम शक्तींनी केलेला जिहाद होता हा दृष्टीकोन मांडलेला आहे. हे सर्व विवेचन सावरकरांच्या "स्वातंत्र्यसमरा"च्या मुद्द्याच्या अगदी उलट आहे आणि मोरे तसा स्पष्ट उल्लेख प्रस्तावनेत करतात. १८३० पासून ही आग धुमसत असल्याचे दाखले दिले आहेत आणि त्याचाच स्फोट ५७ मधे झाला असा एकंदर व्यूह पुस्तकात मांडलेला आहे.
आंबेडकरांनी हे प्रतिपादन १९४० मधे केले होते अशी आठवण मोरे सांगतात. या बंडानंतर मुस्लिम नेते सर सय्यद अहमद खान आणि त्यांच्या अनुयायांनी प्रयत्नपूर्वक " भारतातली मुस्लिम जनता ही इंग्रजांच्या विरुद्ध नसून, ती सगळ्यात जास्त राजनिष्ठ जमात आहे." अशा प्रकारचा प्रसार (यशस्वीरीत्या) केला आणि या सर्व प्रयत्नांमधे बंडाचे जिहादी स्वरूप पूर्णपणे पुसून टाकण्यात आले अशा प्रकारचे दाखले या पुस्तकात दिले गेलेले आहेत.
अप्रकाशित
येथे अप्रकाशित याचा अर्थ सर्वसामान्यांना सहसा ठाऊक नसलेला इतिहास्, असा घ्यावा लागेल. कारण अशा इतिहासाच्या पृष्ट्यर्थ ठोस पुरावे द्यावेच लागतील, जे प्रकाशितच असणार आहेत. पुराव्यांअभावी दिलेला "अप्रकाशित" इतिहास हा केवळ ठोकताळ्यांवर अवलंबून असलेला चालणार नाही.
असो, गंगाधरराव (नेवाळकर?) यांच्याबद्दल बरीच रोचक माहिती मिळाली. मनकर्णिका (लक्ष्मीबाई) यांचा जन्म कर्जतचा हे खरे काय?
अजून अशीच रोचक माहिती येऊदे.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
अनोळखी
येथे अप्रकाशित याचा अर्थ सर्वसामान्यांना सहसा ठाऊक नसलेला इतिहास्, असा घ्यावा लागेल. कारण अशा इतिहासाच्या पृष्ट्यर्थ ठोस पुरावे द्यावेच लागतील, जे प्रकाशितच असणार आहेत. पुराव्यांअभावी दिलेला "अप्रकाशित" इतिहास हा केवळ ठोकताळ्यांवर अवलंबून असलेला चालणार नाही.
बरोबर आहे. अप्रकाशितपेक्षा अनोळखी किंवा अप्रचलीत हे शब्द योग्य ठरावेत. अनेकदा, आपण प्रचलीत कथा, चित्रपट, किर्तने इ. इ. वरून ठोकताळे बांधत असतो आणि त्यात खर्या गोष्टी हरवून जातात.
अशाचप्रकारे, शकुंतलेचे कालिदासाने केलेले चित्रण किंवा दुष्यंत शकुंतलेची कालिदासाने सांगितलेली कहाणी अधिक प्रचलीत आहे. नंतरच्या काळात स्त्रियांना अबला, मनमिळाऊ, पुरुषांच्या अन्यायाने पिडित वगैरे दाखवले गेले. (मला येथे सीतेची भूमिका करणार्या, [भूमिका कसली ,केवळ रडणे आणि माना वेळावणे] शोभना समर्थ नेहमी आठवतात.) परंतु, महाभारतात येणारी शकुंतला इतकी मानी आहे की ती ज्या शब्दांत दुष्यंताची निर्भर्त्सना करते त्या शब्द वापरण्यास आजकालच्या स्त्रियाही कचरण्याची शक्यता आहे. :-)
प्रचलित
हा फरक महाभारत व रामायण याच्यात एकंदरीतच दिसून येतो. द्रौपदीही सर्वांना एकवस्त्रा असताना फटकारते. वनवासात धर्माला बोल लावते. महाभारतात प्रत्येक व्यक्तिरेखा ही 'खऱ्या' माणसांची आहेत, तर रामायणात नुसते आदर्शत्वाचे मेणाचे पुतळे आहेत. एकटा रावणच काय तो जिवंत वाटतो. महाभारत मनोरंजनाचं व रामायण भक्तीचं वाङमय असा साधारण फरक वाटतो. ही भक्ती नंतर गीतेतसुद्धा शिरली, तो भाग वेगळा...
पण प्रचलित हे देखील किती विश्वासार्ह, हा तुम्ही मांडलेला प्रश्न रास्त आहे. मिडिआ नसलेल्या जगात 'माणूस कुत्र्याला चावतो' हे वाचायला, ऐकायला भावणारं साहित्यातच दिसणार.
राजेश
द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी
नाही बरं का!
नाही बरं का! हे आदर्शाचे पुतळेही मागाहून प्रचलित काव्य-साहित्यातून आलेले. वाल्मिकी रामायणात लक्ष्मण रामाला शोधायला जात नाही तेव्हा सीतेने त्याला दिलेली दूषणे ऐकली तर नक्कीच आश्चर्य वाटेल. रामायणातला राम (बालकांड आणि उत्तरकांड सोडून) कोणत्याही नॉर्मल मनुष्यासारखाच आहे. देवबाप्पा नाही.
सत्य?
गोडसेभटजींच्या 'माझा प्रवास' या पुस्तकाची नवीन प्रत माझ्याकडे आहे. प्रियाली म्हणते तसे पुस्तक छानच आहे आणि एका बैठकीत वाचले जाते.
या पुस्तकातील गंगाधररावाबद्दलचे काही उतारे वर दिले गेले आहेत. पण एक महत्वाचा उतारा मात्र कोणासही द्यावासा वाटला नाही याचे आश्चर्य वाटले.
हा राजा स्त्रैण होता आणि तसेच सगळे वर्तन करीत असे हे तर खरेच. पण त्याला तिथल्या इंग्रज रेसिडंटाने त्या बद्दल एकदा विचारले तेव्हा 'सध्या सर्व जगात केवळ इंग्रजच तेवढे पुरूष आहेत आणि बाकी सगळे हतबल आहेत म्हणून मी असे वर्तन करतो' अशा आशयाचे उत्तर गंगाधरराव देतात. या मधून त्यांची अगतिकता दिसतेच पण 'गांधीगिरी' टाईप मार्गाने स्वतःची कुचंबणा जगजाहिर करण्याची हुशारी पण दिसते. त्यांच्या कर्तबगारिची पण खूप स्तुती केलेली आढळते. त्यावरून, गंगाधरराव हे खरे स्त्रैण नसून केवळ स्वतःची अगतिकता धूर्तपणे मांडण्यासाठी त्यांनी असे वर्तन ठेवले असावे असे वाटते.
बिपिन कार्यकर्ते
एकमेव दस्त ऐवज ?
१८५७ सालाला फार जास्त अवधी होऊन गेलेला नाही. 'माझा प्रवास' हे पुस्तक हा दीडशे वर्षांपूर्वीचा एकमेव दस्त ऐवज असेल आणि त्यात लिहिलेले प्रत्येक वाक्य सत्यच असेल असे मला तरी वाटत नाही. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी एक उदात्त उद्देश मनात ठेऊन देशभक्तीपर लिहिले असण्याची शक्यता आहे. आपल्या अभ्यासू इतिहाससंशोधकांनी याबद्दल काय लिहिले आहे हे वाचायला आवडेल.
मराठी
दीडशे वर्षे होऊन गेली आहेत. गोडसे भटजींनी हे लिहिले त्यालाही १०० वर वर्षे झाली असावीत. १८५७च्या बंडाला समकालीन, युद्धाकडे त्रयस्थपणे (?) पाहणारे आणि मराठीतले एकमेव लेखन उपलब्ध असावे. (लोकहितवादी वगैरेंनी काही लिहिले होते का? तेव्हा ३४ वर्षांचे असावेत.)
बाकी इतरांनी शिपाईगर्दी म्हटल्याचे कुणीतरी लिहिले आहेच.
(महाराष्ट्रातील **** *** समाजात असले लेखन इतिहास म्हणून खपते असे सावरकरांच्या पुस्तकाविषयी यदुनाथ सरकार यांनी म्हटल्याचे वाचले होते)
नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)
मराठी
महाराष्ट्रात त्या वेळी फारसे कांही घडलेच नाही. गोडसे भटजी उत्तर भारतात जाऊन आले आणि त्यांनी हे पुस्तक लिहिले. ज्या भागात सारे महाभारत घडले तिथल्या सरकारी व खाजगी पत्रव्यवहारात (उर्दू किंवा हिंदी भाषेत) काहीच उपलब्ध नसेल? इतिहासाचे संशोधन करणार्या विद्वानांना त्यातले काहीच सापडले नसेल? ऐतिहासिक घटनांवर चर्चा करतांना खरा इतिहास काय आहे हे पाहणे गरजेचे आहे असे मला वाटते. कथा कादंबर्या लिहिणारा त्यात आपल्या कल्पना मिसळेल अशी शक्यता असतेच.
सहभाग
>>इतिहासाचे संशोधन करणार्या विद्वानांना त्यातले काहीच सापडले नसेल?
त्या सापडलेल्या गोष्टींवरूनच शिपाईगर्दी म्हटले गेले असेल. जरी ते इंग्रजांच्या डॉक्युमेन्टेशनमधून असेल तरी कदाचित म्हणावा तसा खाजगी पत्रव्यवहार नसेल/मिळाला नसेल. जर संस्थानिकांचा सहभाग व्यापक योजनास्वरूप नसेल तर तसे डॉक्युमेंटेशन नसण्याची शक्यता अधिक.
नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)
एकमेव दस्तऐवज नाही
हा एकमेव दस्तऐवज नक्कीच नाही. इंग्रजांच्या दप्तरी याविषयी अनेक उल्लेख आहेत आणि ऐतिहासिक लेखनही झाले आहे परंतु ते इंग्रजांच्या पक्षातून. माझा प्रवास हे पुस्तक दीडशे वर्षांपूर्वीचे प्रत्यक्ष "आंखो देखा हाल" असे मराठी लेखन आहे. अशा प्रकारचे लेखन विरळाच असावे. (नसेलच असे नाही परंतु कमी असावे.) त्यातील प्रत्येक वाक्य सत्य असण्यासाठी ते जाणून बुजून केलेले इतिहास लेखन नव्हे तर प्रवासवर्णन आहे. त्यामुळे त्यात सांगोवांगीच्या कथा, धारणा इ. इ. येणारच. सावरकरांचे लेखन आणि माझा प्रवास हे लेखन एकाच तराजूत तोलता येणार नाही.
इतिहास
या लेखाचे शीर्षक 'अप्रकाशित इतिहास' असे आहे आणि त्यावर होणारी बहुतेक चर्चा गोडसे भटजींच्या 'माझा प्रवास' या पुस्तकावर चालली आहे.अधून मधून स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुस्तकाचा उल्लेख आला आहे. मला या दोन्ही पुस्तकांची तुलना करायची नाही. माझ्या मते ही दोन्ही पुस्तके वेगवेगळ्या उद्देशाने लिहिलेली आहेत आणि खरा इतिहास समजून घेण्यासाठी त्यांची उपयुक्तता मर्यादित आहे. ब्रिटीश इतिहासकारांनी लिहिलेले सगळे पूर्वग्रहदूषित म्हणून त्याज्य ठरवले गेले आहे. अशा प्रकारे आपण इतिहासाच्या जवळपास पोचण्याची शक्यता मला तरी दिसत नाही.
स्वातंत्र्यपूर्वीच्या काळातील राजवाडे यांच्यासारख्या इतिहासाचार्यांनी १८५७ मधील घटनांविषयी कांही लिहिले आहे काय किंवा स्वातंत्र्यानंतर गेल्या साठ वर्षातल्या इतिहाससंशोधकांनी त्यावर कांही नवा प्रकाश पाडला आहे काय हे जाणून घेतले तर इतिहास समजून घेण्याच्या दृष्टीने कदाचित त्याचा फायदा होईल असे मला वाटते.
ही चर्चा केवळ १८५७ च्या बंडाबाबत नाही
या लेखाचे शीर्षक 'अप्रकाशित इतिहास' असले तरी चर्चाप्रस्तावकाला बहुधा अप्रचलित इतिहास असे म्हणायचे असावे याबाबत प्रतिसादांतून उहापोह झालेला आहेच. चर्चाप्रस्तावकाने चर्चेचा उद्देश मांडून त्या अनुषंगाने पहिला प्रतिसाद दिला आहे त्यावरून चर्चा १८५७ च्या घटनांवर चाललेली नसून गंगाधररावांच्या वेगळ्या वागणूकीविषयी चाललेली आहे. (गंगाधररावांचा मृत्यू १८५७ पूर्वीचा) हे भाष्य ज्या पुस्तकात आहे त्याचा उल्लेख आणि त्यावर उहापोह आलाच. तेव्हा बहुतेक चर्चा जर गोडशांच्या 'माझा प्रवास' या पुस्तकावर चालली असेल तर माझ्यामते उत्तमच आहे. सर्वांना एका वेगळ्या पुस्तकाची माहिती झाली. मराठीत १८५७ च्या बंडातील असा सुरस ट्रॅवेलॉग आहे याची माहिती झाल्याने अनेकांची उत्सुकता चाळवणेही आलेच.
असे कोणी कोठे म्हणाल्याचे मलातरी दिसले नाही त्यामुळे वरील टिपण्णी अनावश्यक वाटते.
नक्कीच होईल त्या अनुषंगाने वेगळी चर्चा सुरु करावी.
राणीच्या विरोधात
झाशीच्या राणीच्या पराक्रमाकडे तिकडची काही मंडळी आणखी वेगळ्या नजरेनेही पहातात. इथे पहा.
(भोचक)
रविवार पेठ नि कुठेही भेट !
राणीच्या पराक्रमापेक्षा...
राणीच्या पराक्रमापेक्षा "मूळ इतिहास जातीच्या राजकारणात लपवला गेला आहे" हे सांगण्याचा प्रयास दिसला. असो, परंतु नवी माहितीही कळली.