मॅरेथॉन शर्यत- शहरांचा शरीर आणि मानसिक आरोग्य आरसा

मुंबई मॅरेथॉन मधे माझ्या सहकाऱ्यांपैकी ३ जण - २ अर्ध व १ पूर्ण मॅरेथॉन धावले, शर्यत पुर्ण केली. त्यांच्या उत्साहाकडे आणि अनुभवाकडे पाहून मॅरेथॉन एका वेगळ्या नजरेने पाहिल्याची जाणीव झाली. त्यांची वये ३० शीच्या आसपास. त्यांचे अनुभव दुसऱ्या दिवशी ऐकून हे जाणवले की, हे शहरी लोक नुसता हौशी उत्साह न दाखवता शर्यत पुर्ण करु शकले हा काही योगायोग नव्हे.

शहरातील आजचे जगणे पाहता - त्यात रोज बाहेरील खाणे आले, कामाचा व इतर सगळा ताण आला, रोजचा प्रवास, ह्याची गोळाबेरीज केली तर शहरी लोकांची शारीरीक क्षमता कशी टिकून राहील असा प्रश्न पडेल. अशा जीवनशैलीतून वर्षानुवर्षे वाटचाल करतांना जे होते ते आपल्या रोजच कानावर येत असते. जर कोणी एखाद्या शहरातील लोकांचे आरोग्य कसे मोजायचे (इंडेक्स) असा प्रश्न विचारला तर त्याला मॅरेथॉनकडे बोट दाखवता येईल का असा वाटून गेले. त्या शहरातील किती लोक भाग घेताहेत, किती किलोमीटर पळून दाखवताहेत हे निश्चीतच एक परिमाण म्हणून बघता येईल असे वाटले. म्हणूनच मी मॅरेथॉनला शहराचा आरोग्य आरसा म्हणालो. पुढील प्रसंग चित्रणात तो आरसा मनाचे आरोग्यही कसे दाखवतो हे ही मांडले आहे.

ही मंडळी फार आधीपासून पळण्याची तयारी करत नव्हती; त्यांनी भाग घेण्याचे ठरवले व शर्यत पुर्णही केली. त्यांनी सांगितलेले अनुभवच मला येथे मांडायचे आहेत.
त्यांच्यातील संयम शर्मानी त्याचा अनुभव खाली दिला आहे.

मी मॅरेथॉनबद्दल ऐकल्यापासुनच मला त्यात भाग घ्यावासा वाटू लागला. ही माझी पहिलीच वेळ होती. माझी मनीषा ऐकून माझा कॉलेजमधील मित्र जो नेहमी मॅरेथॉनमधे भाग घेत आला आहे त्याने सांगितले की, तू आधी पासून सराव करावयास हवा होता पण, काळजी करु नकोस, आता राहिलेल्या काळात पळण्याची तयारी कर. मॅरेथॉनच्या आधीच्या दिवशी मात्र आराम कर. वेदना सहन करण्याची मानसिक तयारी हवी आणि त्यावर मात करण्यासाठी एकच योजना ठरव- मॅरेथॉन पूर्ण करणे. त्याच्या सल्ल्यानुसार मी रोज पळण्याचा सराव करु लागलो.

मॅरेथॉनच्या दिवशी मी प्रारंभरेषेजवळ ५ मिनिटं आधी पोहोचलो आणि मला स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता इतक्या संखेने आणि प्रचंड उत्साहाने लोक आलेले होते. शर्यतीला सुरुवात झाली. मी मनात ठरवले की, आधी ५ किमी धावावे मग पाहू. हे पहिले ५ किमी सहज पार झाले आणि माझा माझ्यावरचा विश्वास वाढला.

जसा मी ५ किमीचा टप्पा पार केला, मला वरळी सेतू समोर दिसू लागला. हा पुढचा टप्पा मला पार करता आलाच आणि मी जर खूप थकलो तर मी चालत-चालत पुढील अंतर पार करावे असे ठरवून मी धावणे सुरु ठेवले- जसजसे मी ७, ९, ११, आणि १२ किमी पार करत गेलो, त्याप्रत्येक वेळी मी मला हेच समजावत होतो. हाजीअली पार करेपर्यंत १२.७५ किमी पुर्ण झालेले होते आणि माझ्या गुढग्यात वेदना जाणवू लागल्या. असे वाटू लागले की, आता एखादा किमी चालावे मग जरा धाप ओसरली की, पुन्हा पळावे. असे म्हणून मी चालायला सुरुवात केली. मी फक्त १०० मीटरच चाललो असेन, रस्त्याच्या बाजूने उभे असलेले प्रेक्षक माझा नंबर वाचून ओरडायला लागले, "भाग दोस्त भाग", "मिस्टर १२७३९ रन"- ह्याने माझा उत्साह परत आला व मी पुन्हा धावू लागलो.

मॅरेथॉन पहायला आलेले लोक, मुलं स्पर्धकांना (!) पाणी, बिस्कीटं, केळी देत होते, चीयर करत होते तर काही जणांनी वेदनाशामक स्प्रे आणले होते ते ज्यांना हवे त्यांना देत होते. ह्या स्फुर्तीदात्यांमुळे मॅरेथॉनला एक वेगळीच शान आली आहे असे वाटू लागले. मी पुढे धावत राहिलो व १४ किमी पुर्णही केले. आता मात्र पुन्हा माझे गुढगे दुखू लागले व ह्यावेळेस जरा जास्तच जाणवत होते. नशीबाने जवळच एक वैद्यकीय केंद्र होते, तेथे मी जरासा थांबून त्यांच्याकडून गुढग्यांवर स्प्रे मारुन घेतला.

इथे मी एक योजना केली- १ किमी चालणे व २ किमी धावणे; १४ किमी पुर्ण केलेलेच होते व अजुन ७ किमी बाकी होते. मी चालायला सुरुवात केली; थोडासाच पुढे गेलो असेन, मला एक वयस्कर स्त्री- ५०शीची - धावतांना दिसली. मला माझ्या तन-दुरुस्तीची लाज वाटली. मी माझी योजना गुंडाळून ठेवली व पुन्हा नव्या जोमाने धावायला सुरुवात केली. पण हे सहज शक्य नव्हते- मला गुढगा त्रास देत होताच पण अशा सर्वत्र दिसणाऱ्या उत्साहाला पाहून मन सतत मला सांगत होतं की, मी धावत राहावं. मी मरीन ड्राइव्हला पोहोचलो; येथे आयोजकांनी ठसकेबाज संगीत लावले होते, पाणी, फळं ह्यांचं वाटप केले जात होते आणि खूप चीयरींग केले जात होते. हे खरंचं आवश्यक होते. ह्याने सगळ्याचा थकवा कमी होत होता व पुन्हा उत्साहाचे वारे संचारत होते. खरंच खूप छान अनुभव होता.

त्यानंतर मला एक मन अत्यंत हेलावून टाकणारे दृश्य दिसले. एक वृद्ध व्यक्ति साधारण ५०शीत असलेले, ज्यांना फक्त एकच पाय होता, ते कुबड्या घेऊन पळत होते. आणि एक अपंग सरदार मुलगा त्याच्या संपूर्ण कुटूंबाच्या मदतीने "चालत" होता. त्याचे वडील व भावू त्याला हाताला आधार देत चालायला मदत करत होते व त्याची आई त्याची चाक-खूर्ची पुढे-पुढे घेत येत होती व त्याला अधून मधून बसायला मदत करत होती. हे दृष्य माझी आतापर्यंतची सगळ्यात मोठी प्रेरणा होती.

आता शेवटचे १००-२०० मीटरचे अंतर बाकी होते आणि त्यावेळेस मला प्रचंड गलका, लोकांचे उत्साहाचे चित्कार ऐकू आले. मी शर्यत पूर्ण केली! चक्क २१ किमी!

मॅरेथॉन नंतर मी खूप थकलो होतो; मला एखादी बसण्यासाठी जागा हवी होती. पण मला धास्ती वाटत होती की, जर मी बसलो तर मला उठताच येणार नाही. मी तसाच एका मदत केंद्राकडे गेलो, तेथे मी पाणी पीलो काही खाल्ले व घरी गेलो. घरी आल्यावर पहिल्यांदा ऊन पाण्याने गुढगे शेकले व नंतर छानपैकी ताणून दिली. दुसऱ्या दिवशी मी ऑफीसमधे जाऊ शकलो.

मॅरेथॉन शर्यत मला एक उत्साहवर्धक, चित्तवेधक आणि एक पुर्ण सांघिक घटना वाटली. त्यात मला जी दृष्ये दिसली, ती मी कधीच विसरु शकणार नाही व मला नेहमीच प्रेरणा देत राहतील. मी पुन्हा मॅरेथॉनमधे भाग घेईन.

ज्यांना शर्यतीत भाग घ्यायचा आहे त्यांना मी इतकेच सांगेन की, पहिल्यांदा अर्ध-मॅरेथॉनचे ध्येय ठेवावे. त्यादिवसा आधी ४ आठवडे तरी सराव केला पाहिजे. मी साधारणतः रोज ५ किमी धावण्याचा सराव केला व वेळेवर लक्ष ठेवले. मॅरेथॉनचे आयोजक आपण काय खाल्ले पाहिजे ह्याची माहिती देतात; त्या सुचना पाळल्याच पाहिजेत. शर्यतीच्या आदल्या दिवशी काय-काय आणि किती खाल्ले पाहिजे ते त्याप्रमाणे पालन करणे हे ही अत्यंत महत्वाचे असते.

मी पुढेच्या मॅरेथॉन मधे पुर्ण शर्यतीत भाग घेऊन २ तासांच्या आत शर्यत पुर्ण करण्याचे ध्येय ठेवले आहे. माझा संपर्क sanyyam@yahoo.com ला होऊ शकेल व मला तुमच्या प्रश्नांना प्रतिसाद देणे आवडेल.

ह्या तिनही सहकाऱ्यांकडे त्यांच्या कामाची गुणवत्ता पाहीली तर मला नेहमीच ती खूपच वरच्या पातळीची दिसते. ते नेहमी कामात, बोलतांना, उत्साही असतात. असे वाटले की, जो स्वतःच्या आरोग्याकडे काळजीने पाहू शकतो तो इतरही कामे काळजीपुर्वक करतो हे आश्चर्य नव्हे.

Comments

संयम शर्मा

स्फुरणदायी.

स्फुरणदायी. धन्यवाद. हा मी निघालो.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

वाचून बरं वाटलं...

नुकतीच पुण्यामध्ये वारी बघितली. वारकर्‍यांना जागोजाग लोकं, दुकानं खायला, प्यायला, चहा, बिस्किटं देत होते. मॅरॅथोन ही आधुनिक वारीच (लहान प्रमाणात का होईना) म्हणायला हवी. तीच निष्ठा, तेच कष्ट, व लोकांचाही तसाच कौतुकाचा वर्षाव. या उत्साहात सामील होणार्‍या सर्वांचं अभिनंदन...

जर कोणी एखाद्या शहरातील लोकांचे आरोग्य कसे मोजायचे (इंडेक्स) असा प्रश्न विचारला तर त्याला मॅरेथॉनकडे बोट दाखवता येईल का असा वाटून गेले....पुढील प्रसंग चित्रणात तो आरसा मनाचे आरोग्यही कसे दाखवतो हे ही मांडले आहे.

कल्पना उत्तम आहे. असे अभिनव मानदंड स्वीकारले नाहीत तर आपल्याला प्रसारमाध्यमांतून दिसणार्‍या बटबटीत चित्रांपलिकडचं सामान्य माणसांचं जग स्पष्ट दिसणार नाही.

उपक्रमींच्या सुपीक डोक्यात अशा इतर काही भन्नाट इंडेक्सच्या कल्पना येतात का?

राजेश

भन्नाट बायका!

मुंबई मॅरेथॉनला येण्याची खूप इच्छा असूनही काम टाकून येणं शक्य नसतं. पण ह्या लेखाच्या रुपाने मुंबईचे धावपटू भेटल्याचा आनंद झाला!

गेली काही वर्षे मी बंगलोरच्या १० कि.मी.शर्यतीला नेमाने जाते. सुरवातीला काही तरी दुखेल-खुपेल म्हणून जपणारी मी, पहिल्या ५ कि.मी. नंतर अलगद पुढे जात राहते. एकटे धावतांना जरा धाप लागली की मन कचरते पण मॅरेथॉनमध्ये तुमच्या पाठीसुद्धा कुणीतरी असते. सारे शहर तुमच्यात आणि तुम्ही शहरात इतके मिसळून जाता की स्वत:चे पाय दुखत आहेत ही जाणीवच मुळी नष्ट होते. ही सुद्धा एक ध्यान धारणाच आहे.

अगदी अलिकडे पर्यंत मला धावणार्या बायका फार माहित नव्हत्या. गेल्या वर्षी मी फक्त बायक्यांच्या ग्रूपमध्ये धावू लागले आणि माझा आत्मविश्वास आणखीच वाढला. बंगलोरच्या आमच्या ह्या ग्रूपचे शंभरावर सदस्य आहेत. आणि कब्बन पार्क, सारजापूर रोड वर आम्ही नियमितपणे धावतो. यांत सर्वात मला आवडतात त्या अगदी ’नवीन’ आया...नुकताच जन्म देऊन पुन्हा ’फिट’ होऊ पाहणार्या ’झाशीच्या राण्या’! विशेष म्हणजे इथे सर्व आकाराच्या, वयाच्या आणि वजनाच्या मैत्रीणी एकत्र येतात. आणि कुणाची भीड न ठेवता मनसोक्त भन्नाट धावतात. यातील काहीजणी मुंबईच्या रनला पण आल्या होत्या.

धावण्याच्या टीप्स् साठी पहा: "http://www.runnergirlsindia.com/scheduleblr.php

आमच्या एका रनची नोंद् टी.व्ही. ने सुद्धा घेतली होती.
http://ibnlive.in.com/news/watch-women-in-bangalore-run-for-their-health...

गौरी

हो असाच अनुभव आहे

http://www.runnergirlsindia.com संकेतस्थळ माहितीपूर्ण आहे.

"सुरवातीला काही तरी दुखेल-खुपेल म्हणून जपणारी मी, पहिल्या ५ कि.मी. नंतर अलगद पुढे जात राहते. एकटे धावतांना जरा धाप लागली की मन कचरते पण मॅरेथॉनमध्ये तुमच्या पाठीसुद्धा कुणीतरी असते. सारे शहर तुमच्यात आणि तुम्ही शहरात इतके मिसळून जाता की स्वत:चे पाय दुखत आहेत ही जाणीवच मुळी नष्ट होते. ही सुद्धा एक ध्यान धारणाच आहे."

हो असाच अनुभव आहे! :-)

छान!

छान! धावा लेको सगळे! :)

तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

पळाले वाट्टं सगळे

पळाले वाट्टं सगळे. कुठून ते विचारू नका हं तात्याकाका.

- राजीव.

हम्म! धावा अजून!

हम्म! धावा अजून!

पुण्यात कोरेगाव पार्कात बॉम्बस्फोट..!

आज सकाळीच आम्ही एके ठिकाणी याबद्दल लिहिले होते.. की अतिरेकी बिनधास्त बाँब वगैरे फोडून मोकळे होतात आणि आम्ही आपले 'देश के लिये' धावतोच आहोत..

धावा अजून!

तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

वा!

स्फूर्तीदायक!

एक प्रश्नः मी दरवर्षी जेव्हा नोंदणी करायचे ठरवतो तेव्हा तेव्हा नोंदणी फुल्ल दिसते. हि नोंदणी चालु केव्हा होते आणि कुठे करता येते?

ऋषिकेश
------------------
भ्रष्टाचार संपविण्याचा सर्वोत्तम आणि सर्वात सोपा(?) उपाय म्हणजे त्यात स्वतः सहभागी न होणे

आंतरजालावर नोंदणी

मॅरेथॉनची नोंद्णी आंतरजालावर साधारण दोन महिने आधीपासून असते. तुमचा धाव क्रमांक आणायला एक दिवस आधी जावे लागते किंवा कोरियरने घरपोच मागवता येतो.
हे पैसे समाजकार्यांसाठी वापरले जातात. पाच कि.मी. ची 'फन् रन्' सर्वांसाठी सहज शक्य असते.
गौरी

स्फूर्तिदायक

स्फुर्तिदायक.

मित्रांचा अनुभव येथे टंकल्याबद्दल धन्यवाद.

 
^ वर