अनुवादासंबंधी काही नियम

नुकतंच काही कामाच्या निमित्ताने काही इंग्रजी लघुकथांचे मराठी अनुवाद अभ्यासण्याची संधी मिळाली. त्यावेळी माझ्या असे लक्षात आले, की बर्‍याच अनुवादकांच्या बेसिकमध्येच राडा आहे.

तसे बघायला गेले, तर अनुवादनाची आदर्श पद्धत ही कथेगणिक आणि अनुवादकागणिक बदलत जाते. प्रत्येक कथा वेगळी असते, प्रत्येक कथेची शैली वेगळी असते, तिची पार्श्वभूमी वेगळी असते, तिचा आशय वेगळा असतो. या आणि अशा अनेक घटकांना विचारात घेऊन मग अनुवादक अनुवादनाची पद्धत ठरवत असतो. शिवाय प्रत्येक अनुवादक वेगळा, त्याचा व्यासंग वेगळा, त्याच्या आवडी वेगळ्या, त्याचे अनुवादामागचे हेतू वेगळे, शैली वेगळी. त्यानुसार कोणी रुपांतर करायला जाते, कुठी फक्त भाषांतर करते तर कुणी करतो भावानुवाद. तेव्हा अनुवादनाची आदर्श शैली कुठली हे खरे म्हणजे कुणी कुणाला सांगू नये. पण तरीही काही मूलभूत नियम मांडले जाणे अत्यावश्यक आहे असे अगदी कळकळीने वाटते. कारण त्याच्या अभावामुळे बरेच जण फारसे कष्ट न घेता, फारसा विचार न करता, आणि बर्‍याचदा अजाणतेपणीही निकृष्ट दर्जाचे अनुवाद करत आहेत. शिवाय आपल्याकडे अनुवादकांनी पाळावयाची नैतिक मूल्ये यावरही फारसा विचार केला गेलेला नाही. याचा परिणाम असा झाला आहे, की आपल्याकडे दरवर्षी प्रचंड मोठ्या प्रमाणात अनुवाद प्रकाशित होत आहेत आणि तरीही त्यातले फारच थोडे अनुवाद यशस्वी होत आहेत, आणि तेही थोड्याशा प्रयत्नांनी अनुवादाचा दर्जा सुधारता येणार असताना.

या अशा मूलभूत नियमांची एक खूप मोठी यादी तयार होऊ शकते. सध्या माझ्या लक्षात आलेल्या काही गोष्टी नियमस्वरूपात खाली देते आहे.
१- सर्वप्रथम अनुवादकाने आपल्या अनुवादासोबत मूळ लेखकाचे आणि मूळ कथेचे शिवाय मूळ कथा ज्या भाषेत लिहिली गेली होती त्या भाषेचे नाव दिले गेले आहे ना, हे तपासून घ्यावे. ही जबाबदारी जितकी अनुवादकाची तितकीच संपादकाचीही आहे. अनुवाद ही अनुवादकाची कलाकृती हे मान्य, पण त्याने मूळ लेखकाचे ऋण मानलेच पाहिजे आणि मूळ कथेचे नाव वाचकाला उपलब्ध करून दिलचे पाहिजे. आपल्याला खोटे वाटेल, परंतू सर्वस्वी अनुवादांना वाहिलेल्या एका दिवाळी अंकात मूळ कथेचे आणि भाषेचे नाव देण्याचा साधा शिष्टाचार पाळला जात नाही. दुसर्‍या एका मासिकात तर चक्क "ढमक्या कथेचा अनुवाद" एवढेच शब्द लिहिले होते. मूळ कथा कुठल्या लेखकाची हे सांगण्याचीही तसदी घेतली गेली नव्हती.
२- मूळ कथा एकदा नीट वाचावी. कथेतील नावांचे उच्चार आपल्याला नीट करता येत आहेत ना याची खात्री करून घ्यावी. येत नसल्यास दुसर्‍या कुणाची मदत घ्यावी. एका अनुवादकाने हॉचकिसचे हॉटकिस केले होते. इथे "याने काय फरक पडतो?" हा मुद्दा उपस्थित केला जाण्याची शक्यता आहे. पण हॉचकिस हे नीट वाचलं आणि तसंच लिहिलं असतं तरी काय फरक पडला असता? मग शक्य तितकं प्रामाणिक देवनागरीकरण करायला काय हरकत आहे?
त्याचबरोबर काही वेळा असं घडतं, की कथेतल्या एका विशिष्ट शब्दाचे दोन वेगवेगळे अर्थ होऊ शकतात व त्यातला कुठलाही योग्य ठरू शकतो. परंतू मराठीत मात्र हे दोन्ही अर्थ एकाच शब्दाने दर्शविता येत नाहीत व त्यामुळे त्यातला कुठला तरी एकच अर्थ ग्राह्य धरावा लागतो. उदा. "अंकल" या इंग्रजी शब्दाचा अर्थ काका किंवा मामा यातला काहीही होऊ शकतो. अशा वेळी कथेतील अंकल आणि नेफ्यु यांची आडनावे कथेत दिली असल्यास ती ताडून पहा किंवा तत्सम क्लूज कथेत शोधा. हा मुद्दा फार किस काढल्यासारखा वाटेल. "असा शब्दाशब्दाचा किस पाडल्याने साहित्याचा आस्वाद घेता येत नाही." इ.इ. आक्षेप घेता येतील. परंतू कधी कधी हे मुद्दे फार महत्त्वाचे असतात. एका गुन्ह्याचा शोध घेणार्‍या रहस्यकथेतील दोन मुख्य पात्रे ही "अंकल-नेफ्यु" या नात्यातली होती आणि अनुवादकाने अनुवाद करताना त्यांना काका-पुतण्या म्हटले होते, तेही त्यांची आडनावे धडधडीत वेगवेगळी असताना. त्यामुळे पूर्ण कथेभर वेगळं आडनाव असलेल्या मुलाला आपला पुतण्या म्हणवणार्‍या काकावर माझा संशय होता आणि कथेतील गुप्तहेराने इतका साधा क्लू का सोडला हे मला कळत नव्हतं. मूळ कथा वाचल्यावर उलगडा झाला होता. थोडक्यात काय, तर आपल्या घोटाळ्यामुळे वाचकाच्या मनात कथा वाचताना अकारण गोंधळ उडू नये याची अनुवादकाने खबरदारी घ्यावी.
३- संदर्भग्रंथ मिळवा आणि आवश्यक ठिकाणी त्यांची मदत घ्या. इंग्रजी मधून मराठीमध्ये अनुवाद करणार्‍यांना उपयोगी पडेल असा बराच मोठा संदर्भग्रंथसाठा आज gigapedia या संकेतस्थळावर फुकट उपलब्ध आहे. यावरून मी मिळवलेल्या कोशांची एक यादी इथे देते, त्यावरून आपल्याला कल्पना येईल-
डिक्शनरी ऑफ इंग्लिश फोकलोअर, डिक्शनरी ऑफ मिडिव्हल टर्म्स अँड फ्रेजेस, डिक्शनरी ऑफ कलर- टर्म्स, डिक्शनरी ऑफ युनिट्स ऑफ मेजरमेंट, डिक्शनरी ऑफ क्लिशेज, डिक्शनरी ऑफ स्लँग, डिक्शनरी ऑफ स्वेअरिंग, डिक्शनरी ऑफ मेटॅफर्स, रफनर'स ऍल्युजन्स
याशिवाय विकिपिडियासारखी जुजबी माहिती मिळवण्यासाठी उपयुक्त संकेतस्थळे आहेत. शिवाय गुगल आहेच.
याशिवायही मूळ कथेचा लेखक हा त्या भाषेच्या साहित्यक्षेत्रातील नावाजलेली असामी असेल, तर त्याच्या लेखनाविषयीचे कोशही बनवले जातात. जसे आपल्याकडे कालिदासकोश आहेत. कधीकधी एखादी साहित्यकृती प्रचंड लोकप्रिय असेल आणि तिचा आवाकाही मोठा असेल, तर ती समजून घेण्यासाठी आवश्यक माहिती देणारे विशेष कोश बनवले जातात. उदा. ऍनोटेटेड शेरलॉक होम्स.
या सगळ्यांचा उपयोग करून शब्दांमागचे अधिकाधिक पदर समजून घेता येतात, त्यांचे सांस्कृतिक महत्त्व, त्यांमागच्या संकल्पना इ.इ. बर्‍याच गोष्टी समजून घेता येतात. एकदा का त्या समजून घेतल्या की त्यांच्या उल्लेखाचे कथेतले महत्त्व अधिक चांगल्या रीतीने स्पष्ट होते आणि जर ते महत्त्व मराठी भाषेचे आणि कथालेखनाचे नियम पाळून अनुवादाच्या वाचकापर्यंत पोचेल अशा रीतीने मांडता आले तर अनुवाद अधिक समृद्ध होतो. एका कथेतील कॅस्टानेट्स वाजवत प्रियेच्या घराच्या खिडकीखाली उभं राहून प्रियाराधन करणार्‍या रसिक प्रियकराचं वर्णन "उत्साही गायक गात होता" अशा शब्दांत करून अनुवादकाने पार विचका करून टाकला आहे.
४- आपली शब्दसंपदा वाढवा. बर्‍याचदा असे होते, की शाकाहारी लोकांना मांसाहाराशी संबंधित लोकप्रचारातील शब्द माहित नसतात. त्यामुळे बर्‍याच गमती-जमती होतात. एका अनुवादकाने आपल्या अनुवादात लँबच्या लेगपीसचा अनुवाद अर्ध्या ठिकाणी चिकन असा तर अर्ध्या ठिकाणी मटण असा केला आहे. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे नशा-पाणी या वर्ज्य विषयातली शब्द-संपदाही माहित असावी. शिवाय कुठल्या गोष्टीसाठी कुठला शब्द वापरल्याने नकारात्मक अर्थ प्रतीत होतो व कुठला शब्द वापरल्याने सकारात्मक अर्थ प्रतीत होतो, हे ठाऊक असले पाहिजे. उदा. मराठीत बोलताना प्रत्येकवेळी दारू/मद्य हा शब्द उघडपणे वापरलाच जाईल असे नाही. बर्‍याचदा दारूला औषध वगैरे असे सांकेतिक नावही दिले जाते. या गोष्टी सध्याच्या उपलब्ध इंग्रजी-मराठी शब्दकोशांतून कळणार्‍या नाहीत. याखेरीज तांत्रिक वळणाचे परंतू त्या-त्या क्शेत्रातील व्यक्तींकडून रोजच्या बोलण्यात वापरले जाणारे शब्ददेखील माहित असावेत.

या नियमावलीत बरीच भरू शकते. त्याचप्रमाणे यावर बरीच टीकाही होऊ शकते. परंतू मूळ लेखकाच्या आणि मूळ कथेच्या दृष्टीकोनातून विचार केल्यास यातले मुख्य मुद्दे पटू शकतील असे वाटते.

मला असे वाटते की, अगदी ब्रह्मदेवालाही १००% योग्य अनुवाद करता यायचा नाही. कितीही प्रयत्न केले तरी मूळ लेखकाला विशिष्ट शब्दरचनेतून नेमके काय-काय अभिप्रेत होते, ते कळणार नाही. शिवाय प्रत्येकाची लेखनशैली, भाषेवरची पकड वेगवेगळी असते. त्यामुळे आदर्श अनुवाद प्रत्यक्षात उतरणं कठीण. भाषांतले आणि संस्कृतीतले फरक हे मुख्य मुद्दे तर सोडूनच द्या. मुळात अनुवाद करण्यात एवढे अडथळे असल्यावर मूळ कथा नीट वाचणे, सहजगत्या उपलब्ध असलेल्या माहितीस्रोतांचा वापर करणे एवढ्या गोष्टी करणे तरी पक्केपणाने आपल्या हातात आहेत. तेव्हा या गोष्टी पाळल्या गेल्याच पाहिजेत.

लेखनविषय: दुवे:

Comments

'केल्याने भाषांतर' व विद्यासागर महाजन

धन्यवाद. ह्यानिमित्ताने 'केल्याने भाषांतर' व विद्यासागर महाजन ह्यांच्या कार्याची प्रकर्षाने आठवण झाली. 'ट्रान्सलेशनवाला' हा विद्यासागर महाजन ह्यांच्यावरचा श्रद्धांजलिपर लेख आवर्जून वाचावासा आहे. त्यांना मी पुन्हा एकदा श्रद्धांजली वाहतो.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

चांगले

अनुवादकर्त्यांनी लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टींचे चांगले संकलन केले आहे.

सर्व नियम लक्षात ठेवण्यासारखे

सर्व नियम लक्षात ठेवण्यासारखे आहेत.

(मागे अनुवादाबद्दल दीर्घ चर्चा झाली, त्याचा दुवा देता येईल का?)

उत्तम लेख

अनेक निरिक्षणे मांडलेला उत्तम लेख आहे. त्याबद्दल धन्यवाद. धनंजय ने म्हटल्या प्रमाणे (रेडिमेडी) दुवे मिळाले तर अधिक बरे.
प्रकाश घाटपांडे

दिलीप चित्रे

खरे आहे. प्रामुख्याने हे इंग्रजी अनुवादाच्या दृष्टीकोनातून लिहिलेले जाणवते. पण इतर भाषक अनुवादातूनही असे घडते. त्याचवेळी याच्या उलटही काही घ़डते. मध्यंतरी इंदूरमध्ये दिलीप चित्रेंच्या कवितावाचनाचा श्रद्धांजलीपर कार्यक्रम झाला. त्यात चित्रेंच्या हिंदीत चंद्रकांत देवताले अनुवादित कविता वाचल्या गेल्या. चित्रेंच्या एका मुळ कवितेत 'न्हात्याधुत्या मुलीं' असा उल्लेख आहे. याचा अर्थ वयात आलेल्या रजस्वला मुली असे त्यांना अभिप्रेत असल्याचे मूळ कवितेवरून जाणवते. पण अनुवादात मात्र 'अंघोळ करणार्‍या मुली' असा उल्लेख आहे. संबंधित ठिकाणी असेल्या एका ज्येष्ठ मराठी महिलेने ही चूक निदर्शनास आणून दिले.

एकवेळ इंग्रजीतून मराठीत होणार्‍या अनुवादात चूक झाली तर कळू शकेल. पण इतर भाषांतून मराठीत होणारे अनुवाद किती सरस होताहेत हे पहावे लागेल. अगदी रोजच्या व्यवहारातली हिंदीही वास्तविक अनेक प्रादेशिक लहेजे घेऊन आहे. त्यातल्या काही बाबींचे तर अनुवाद करणे अवघड होते. मध्यंतरी फणिश्वरनाथ रेणुंच्या कथा वाचत होतो. त्यातल्या अनेक बाबी मराठीत आणणे किती अवघड आहे हे जाणवले.

ता.क. लोकमतने यंदाचा दिवाळी अंक दलित विशेषांक म्हणून काढला आहे. त्यात काही इतर भाषक दलित कथांचे अनुवाद दिले आहेत. त्यातल्या काही कथा हिंदी ग्रामीण भागातल्या आहेत. अनुवाद करताना उगाचच त्यातला ग्रामीणपणा जपण्यासाठी व्यक्तिरेखांचे संवाद मराठी ग्राम्य भाषेत दिले आहेत. कडी म्हणजे त्यातले काही शब्द जे मुळातच आपल्या संस्कृतीत नाहीत, ते मात्र हिंदीत ठेवले होते. (उदा कफन वगैरे.) हे प्रकर्षाने खटकले.

(भोचक)
रविवार पेठ नि कुठेही भेट !

चांगले उदाहरण!

चित्रेंच्या एका मुळ कवितेत 'न्हात्याधुत्या मुलीं' असा उल्लेख आहे. याचा अर्थ वयात आलेल्या रजस्वला मुली असे त्यांना अभिप्रेत असल्याचे मूळ कवितेवरून जाणवते. पण अनुवादात मात्र 'अंघोळ करणार्‍या मुली' असा उल्लेख आहे. संबंधित ठिकाणी असेल्या एका ज्येष्ठ मराठी महिलेने ही चूक निदर्शनास आणून दिले.

छान उदाहरण. फार वर्षांपूर्वीची गोष्ट. कोल्हापूर पुढारीच्या कार्यालयात मित्राला भेटायला गेलो असताना कालहरणासाठी पीटीआयच्या वृत्तांचे अनुवाद चाळत बसलो होतो. ह्या अनुवादित बातम्या फार मनोरंजक असू शकतात. एका बातमीत स्नेकचार्मर ह्या शब्दाचा सर्पप्रेमी असा अनुवाद केलेला बघून मी तेव्हा वेडा झालो होतो. अगदी पुण्याच्या सकाळातही ह्यूमन ट्रॅफिकिंगचा अनुवाद माणसांची चोरटी वाहतूक असा केलेलाही वाचला.

बाकी, लहेजाला काय म्हणायचे हो मराठीत?

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

 
^ वर