वेद् आपौरुषेय आहेत का ?

वेदांबद्दल 'संस्कृत' समुदायात बरीच रोचक आणि ज्ञान वाढवणारी चर्चा चाललेली आहे.
मी संस्कृतचा अभ्यास करतोय आणि त्या अन्तर्गत वेद हा एक विषय आहे. 'वेद अपौरुषेय आहेत' असे पारम्परिक भारतीय तत्त्वज्ञानाच्या काही शाखांचे मत आहे. 'वेद अपौरुषेय आहेत' म्हणजे 'त्यांचा कुणीही निर्माता नाही', 'सृष्टीच्या आरम्भापासून वेद स्वत:च अस्तित्वात आहेत' असा साधारणपणे होतो.
या विषयावर मी काही वाचन केले आहे आणि त्यातून बरेच काही नवीन ज्ञान मिळाले आहे. पण ते खूप कमी आहे. शिवाय ह्या विषयावर केलेला प्रकल्प विद्यापीठाला सादर झालेला असल्यामुळे त्यावर चर्चा होणे दुस्तर. म्हणून याबद्दल तुम्हा सगळ्या मण्डळींचे मत काय आहे ते मला जाणून घ्यायचे आहे.
माझे वेदांच्या अपौरुषेयत्त्वाबद्दल माझे विचार खाली व्यक्त करतोय. तुमचे विचार कळूद्या.

Comments

वेद आपौरुषेय आहेत का ?

प्रकल्पाकरिता सन्दर्भ म्हणून घेतलेले ग्रन्थ खालील प्रमाणे :
1. लौगाक्षिभास्कर अर्थसङ्ग्रह (संस्कृत, मराठी भाषान्तर) - लौगाक्षिभास्कर
2. ऋग्वेदसंहिता श्रीमत्सायणाचार्य विरचितभाष्यसमेता (संस्कृत)
3. ऋग्वेदभाष्यभूमिका (संस्कृत, इंग्लिश भाषान्तर) - सायणाचार्य
4. ऋग्वेदादिभाष्यभूमिका (संस्कृत, मराठी भाषान्तर) - दयानन्द सरस्वती
5. वेदांचे अपौरुषेयत्व (मराठी) - अप्रबुद्ध
6. निरुक्त (संस्कृत, मराठी & इंग्लिश भाषान्तर) - यास्काचार्य
7. मनुस्मृती (संस्कृत, मराठी भाषान्तर) - मनुमहर्षि
8. श्रीमद्भगवद्गीता (संस्कृत, मराठी भाषान्तर)
9. संस्कृत हिन्दी कोश - वामन शिवराम आप्टे
10. भारतीय संस्कृती कोश (मराठी) - महाराष्ट्र शासन प्रणीत
11. इरुसमय-विळक्कम् (तमिळ, इंग्लिश भाषान्तर) - हरिहराचार्य
12. The Secret of The Veda (इंग्लिश) - योगी ओरोबिन्दो

वेद आपौरुषेय आहेत का ?

सूर्य सिद्धांत या पुस्तकाचे नाव पुष्कळांनी ऐकलेले असेल. भारतीय ज्योतिर्विद्याशास्त्रावरचा हा इ.स. १००० च्या आसपास अपडेट झालेला ग्रंथ आहे. ग्रंथातील विचार अतिशय शास्त्रशुद्ध व आजमितीला लागू पडतील असेच आहेत. त्याबद्दल कधी परत लिहिता ये ईल.
या ग्रंथाच्या सुरवातीच्या भागात ग्रंथकार असे सांगतो की हा ग्रंथ त्याला सूर्याकडून प्राप्त झाला. यावर टिपणी करताना असे मत व्यक्त झाले आहे की आपला ग्रंथाला लोकमान्यता लवकर मिळावी म्हणून वापरलेली ही एक जिमिक आहे. त्यामुळे सर्वसाधारण वाचक फसतील व हा ग्रंथ पुढे वाचतील अशी ग्रंथकाराची अपेक्षा असावी.
वेदांच्या बाबतीत हे आपौरुषेयत्व याच प्रकारची जिमिक असावी असे मला तरी वाटते. आपली रचना आपण केलेली नसून ती आपोआपच निर्माण झालेली आहे किंवा देवांनी निर्माण केलेली आहे असे सांगितले की कोणी पुढे काय विचारणार? अशी विचारसरणी या मागे असावी.
चन्द्रशेखर

(1) भूमिका

(1) भूमिका
भारतीय समाजामध्ये ज्या वाङ्मयाला सर्वोच्च स्थान आहे त्या वाङ्मयाचे नांव ‘वेद’ असे आहे. वेद हे केवळ भारतीयच नव्हे तर समस्त जगातील वाङ्मयापैकी अत्यन्त प्रचीन आहेत. वेद निव्वळ अतिप्राचीन नव्हेत तर त्यांना एकप्रकारचे दिव्यत्व लभलेले आहे, त्यामुळेच त्यांचे स्वरूप अपौरुषेय असल्याचे मानले जाते. ‘अपौरुषेय’ म्हणजे कुणाहीकडून निर्माण न झालेले, विश्वाच्या अरम्भापासून स्वतःच अस्तित्वात असलेले, असे जे आहे ते.
‘वेद अपौरुषेय आहेत’ आणि ‘ते अपौरुषेय नाहीत’ असे दोन्ही प्रकारचे सिद्धान्त खूप पूर्वीपासून अस्तित्वात आहेत. प्रस्तुत प्रकल्पाचा हेतू वेदांच्या अपौरुषेय असण्या नसण्यासम्बन्धी निर्णय करणे असा नसून, ही अपौरुषेयत्वाची कल्पना काय आहे अणि तिचे महत्व काय आहे यासम्बन्धीचा विचार करणे असा आहे.

एक गोष्ट अत्यन्त स्पष्टपणे नमूद केली पाहिजे की, वेदांच्या अपौरुषेय असण्या नसण्या सम्बन्धीची चर्चा करण्याचा अधिकार खरे पाहाता शास्त्रवेत्त्या पण्डितासच आहे. अशा पण्डिताचा चाऱ्ही वेदसंहिता, ब्राह्मणे, आरण्यके, उपनिषदे आणि सहा वेदाङ्गे, या सर्व शास्त्रांचा किमान सैद्धन्तिक दृष्टीने अभ्यास झालेला असावा.

तसा अभ्यास नसताना या विषयाची चर्चा करणे म्हणजे दूरदर्शनवर क्रिकेटचा समना पाहाणाराने सचिन तेण्डुलकरच्या खेळातील कौशल्याची मीमांसा करण्यासारखे आहे. तरीही आपल्या थोडक्या अभ्यासातून काही विचार येथे माण्डायचा प्रयत्न केला आहे, त्याची माझ्या अल्पज्ञानानुसारच समीक्षा व्हावी असे निवेदन.

वेद् म्हणजे काय ?

(2) वेद म्हणजे काय ?

2.1 ‘वेद’ शब्दाचा व्याकरणात्मक अर्थ
संस्कृतात कोणत्याही शास्त्रासम्बन्धी विचार करताना त्या शास्त्राच्या नावाची व्याकरणात्मक मीमांसा केली जाते आणि तसे करणे शास्त्राच्या व विषयाच्या अकलनास उपयोगी ठरते. त्यानुसार ‘वेद’ शब्दाचा अर्थ पाहू -
पाणिनीय धातुपाठ व अष्टाध्यायीच्या नियमांनुसार ‘विद’ या द्वितीयगणातील परस्मैपदी सकर्मक धातूपासून घञ् प्रक्रियेने निर्माण होणारा पुंलिङ्गी शब्द म्हणजे ‘वेद’. या धातूचे ‘जाणणे’, ‘समजणे’, ‘ध्यान करणे’, ‘मनन करणे’, असे अर्थ आहेत, अर्थात् ‘वेद’ म्हणजे ‘ज्ञान’.

2.2 वेद वाङ्मयाची व्याप्ती
वेदांच्या अपौरुषेयत्वाबद्दल विचार करण्यापूर्वी वेद वाङ्मय म्हणजे नेमके काय हे लक्षात घेतले पाहिजे, कारण त्यामुळे आपल्या विषयाची व्याप्ती लक्षात येते.
वेद या शब्दाने सामान्यपणे सम्पूर्ण वैदिक वाङ्मय सूचित होते. ते वाङ्मय असे - संहिता, आरण्यके, ब्राह्मणे, उपनिषदे आणि परिशिष्टे.
परन्तु संहिता भाग सोडल्यास इतर सर्व वाङ्मय परम्परेने मानवरचित मानले जाते म्हणून त्यांच्या अपौरुषेयत्वाची चर्चा करण्याचा प्रश्न येत नाही. या प्रकल्पापुरता विचार करावयाचा ठरवला तर ऋक्, साम, यजुस् , आणि अथर्व, अशा चार संहितांकरिताच वेद संज्ञा वापरली जाणार आहे.

असे मानले जाते की संहिता वाङ्मय हे खूप पूर्वी (म्हणजे नेमके किती पूर्वी, हे नक्की कुणालाच माहित नाही) एकगठ्ठा होते. व्यास महर्षींनी त्याचा सम्पूर्ण अभ्यास केला व पुढील मण्डळींच्या सौकर्यासाठी या वाङ्मयाचे निरनिरळ्या विषयानुरूप वेगवेगळे चार भाग केले. एकेका भागास अनुक्रमे ऋक् , साम, यजुस् आणि अथर्व अशी त्यांच्या विषयानुसार नांवे दिली.

2.3 वेद (संहिता) वाङ्मयाचा निर्मितिकाल
वेदांच्या निर्मितिकालाविषयी निश्चित, प्रमाणसिद्ध अशी कोणतीच माहिती उपलब्ध नाही, याचे मुख्य कारण म्हणजे हे वाङ्मय अतिशय प्राचीन आहे. किम्बहुना, मानववंशाच्या उपलब्ध वाङ्मयातील, वेद हेच सर्वांत प्राचीन आहे, असे म्हणता येईल.
तरीही अनेक पुरातत्ववेत्त्यांनी अपार कष्ट करून असे अनुमान काढले आहे की, चार वेदांपैकी ऋग्वेद हा सर्वांत प्राचीन असून त्याच्या निर्मितीला साधारणपणे ख्रिस्तपूर्व 3000 वार्षांपूर्वी सुरुवात झाली. याबद्दल तज्ज्ञांमध्ये मतभेद आहेत पण तरीही आजच्या अधिकांश तज्ज्ञांना वरील मत मान्य आहे.
आज उपलब्ध असलेली अक्खी ऋग्वेद संहिता एकाच वेळी, किंवा फार थोड्या कालखण्डात निर्माण झाली असे मानणे चूक ठरेल. अत्यन्त प्रदीर्घ अशा काळात, किम्बहुना शेकडो वर्षे या वेदांची निर्मिती होत राहिली हे त्या वाङ्मयाच्या अभ्यासावरून स्पष्टपणे लक्षात येते.
(आपण या प्रकल्पाच्या विषयापासून फारकत घेत आहोत असे वाटत असले तरीही वेदांच्या अपौरुषेयत्वाबद्दल विचार करताना ही चर्चा नक्की उपयोगी पडेल.)
वेदवाङ्मयाच्य निर्मितीसोबतच त्या वाङ्मयाच्या स्वरूपाबद्दलही थोडक्यात आढावा घेतला पाहिजे.

2.4 वेद (संहिता) वाङ्मयाचे स्वरूप
सम्पूर्ण संहिता वाङ्मय मन्त्रात्मक आहे. हे मन्त्र तत्कालीन, म्हणजे आजपासून साधारण 4 - 5 हजार वार्षांपूर्वीच्या संस्कृत भाषेत आहे. याच भाषेला सामान्यपणे ‘वैदिक संस्कृत’ असे सम्बोधिले जाते. स्थान-काल-परत्वे याच भाषेत उत्तरोत्तर परिवर्तन होऊन पाणिनीय व नन्तरच्या काळत जी भाषा तयार झाली तिला आपण ‘अभिजात संस्कृत’ असे म्हणतो.
वेदांची भाषा अत्यन्त ओघवती, काव्यपूर्ण आणि प्रचण्ड अर्थवाही आहे. पण तरीही संस्कृत भाषेचे आणि त्याद्वारे प्राचीन समाजाचे एक स्पष्ट चित्र वेदांमधून अपाल्या डोळ्यापुढे उभे राहाते.

आधी पाहिल्याप्रमाणे संहितावाङ्मय चार भागांत विभागलेले असे आपल्यापुढे आहे. त्याचे सर्वसाधारण स्वरूप खालीलप्रमाणे आहे -

2.4.1 ऋग्वेद
हा सर्वांत प्राचीन आहे. याचे स्वरूप सूक्तात्मक आहे. निरनिराळ्या ऋषींनि रचलेली निरनिराळ्या देवतांची स्तुतिपर सूक्ते यामध्ये आहेत.
ज्याप्रमाणे आधुनिक माराठी कवितेत चरण किंवा ओळ असते त्याप्रमाणे सूक्ताला ऋचा (मूळ संस्कृत शब्द ‘ऋच् ‘) असतात. ही सूक्ते प्राधान्याने स्तुतिपर असल्यामुळे या वेदास स्तुतिपर ऋचांचा वेद अर्थात् ऋग्वेद हे नांव प्राप्त झाले असे म्हणता येईल. ऋग्वेदातील एकूण सूक्तसङ्ख्या 1123 इतकी आहे.

2.4.2 यजुर्वेद
यजुर्वेद हा नांवाप्रमाणेच यज्ञक्रियेशी सम्बन्धित आहे. यज्ञयागासाठी लागणाऱ्या मन्त्रांचा ह्यामध्ये समावेश आहे. यज्ञाच्या अग्नीत हवि अर्पण करतेवेळी म्हणावयाच्या मन्त्रांसोबतच यज्ञप्रक्रियेच्या पूर्वतयारीचे तसेच यज्ञप्रक्रियेच्या सर्व उपाङ्गांचे मन्त्र सुद्धा यात आहेत. यजुर्वेदाच्या दोन अवृत्ती असून त्यांना अनुक्रमे कृष्णयजुर्वेद व शुक्लयजुर्वेद अशी नांवे आहेत.

2.4.3 सामवेद
सामवेद सुद्धा मन्त्रात्मक आहे. यातील 75 मन्त्र स्वतन्त्र तर अन्य मन्त्र ऋग्वेदातून घेतलेले आहेत.
मन्त्र गायच्या साङ्गीतिक चालींना ‘साम’ म्हटले जाते. ‘साम’ ह्या शब्दाच अर्थ ‘गायनासहित’ असा होतो. यावरून हे लक्षात येईल की सामवेद हा मन्त्रांच्या गायनाकरिता आहे. यज्ञाच्या वेळी काही देवतांची स्तुती वेगवेगळ्या चालींत मन्त्र गाऊन केली जाते, त्यावेळी सामवेदातील मन्त्रांचा उपयोग केला जातो.

2.4.4 अथर्ववेद
अथर्ववेद सुद्धा प्राचीन असून, मन्त्र, ऋचा, स्तोम, असे निरनिराळे काव्यप्रकार यात आढळतात. आधिभौतिक पीडा-निवारणासाठी तान्त्रिक जादू-टोणा चमत्कृती इ० उपाय यात असल्यामुळे अथर्ववेदावर एकप्रकारचे गूढत्व लादले गेले आणि त्याची प्रतिमा काहीशी नकारात्मक झाली.
तरीदेखील शस्त्रविद्या, वैद्यकशास्त्र, युद्धनीति, गृहस्थधर्म, गणित इ. अनेक व्यावहारिक शास्त्रांचा अधार या वेदामध्येच सापडतो. 20 व्या शतकात सम्पूर्ण जगात कीर्ती मिळवणाऱ्या वैदिक-गणिताची सर्व मूलभूत सूत्रे अथर्ववेदातच समाविष्ट आहेत

वरील सर्व मिळून साधारण अडीच हजार सूक्ते उपलब्ध होतात. यांमध्ये विषयांचे वैविध्य प्रचण्ड आहे. प्रथमदर्शी, वेदवाङ्मय स्तुतिपर आहे असे जरी म्हटले, तरी स्तुतीचे प्रकारही निरनिराळे आहेत.
स्तव्यविषयही प्रत्येक वेळी एकच आहे असे नाही. प्रत्यक्ष परमेश्वर (ब्रह्मन् ), प्रकृति (निसर्ग) आणि काही प्राकृतिक तत्त्वे, पंचमहाभूते, दैवत पदाला पोहोचलेले मानव, तपस्वी पुरुष, द्रष्टे ऋषी, तेजस्वी प्रज्ञावन्त, पराक्रमी पुरुष, अशा अनेकांची स्तुती करणारी सूक्ते आहेत.

धर्म, यज्ञयाग, इतिहास, पुराण, तत्त्वज्ञान, दैवतोपासना, कर्मकाण्ड, समाज-जीवन, गणित-विज्ञान, वैद्यक, युद्धनीती, शस्त्रविद्या, गूढविद्या, तन्त्र, इ० अनेक विषयांवर अत्यन्त सखोल चिन्तन वेदांमध्ये आढळते. यावरून वेदांच्या उपायोजनासम्बन्धी आणि पुढे त्याच्या अपौरुषेयत्वासम्बन्धी निश्चितपणे काही मते माण्डता येतील.

(3) वेदांचे प्रयोजन अथवा उपायोजन काय ?

3.1 वेदांची निर्मितिप्रक्रिया
ज्या काळात वेदांची निर्मिती झाली त्या काळात तिचे प्रयोजन काय होते याचा विचार करणे खूप कठीण आहे . याचे कारण, तो काळ निव्वळ अतिप्राचीन आहे, एवढेच नसून त्या काळातील समाज जीवन, जनरीती, भाषा-व्यवहार, लोक-व्यवहार, हे सर्व वेगळ्या स्वरूपाचे होते. लोकांच्या भौतिक गरजा, त्यांना पडणारे व्यावहारिक आणि तात्त्विक प्रश्न, ते सोडवण्याकरिता उपलब्ध साधने, व्यावहरिक गरजा भागवण्याकरिता लगणारा वेळा आणि तो सोडून इतर तात्त्विक मुद्द्यांची चर्चा किंव चिन्ता करण्याकरिता मिळणारा वेळ व त्याकरिता लागणारी शारीरिक-मानसिक बैठक आणि सामर्थ्य, या सर्वच बाबतीत वैदिक समाज हा आपल्याहून खूप भिन्न होता. एकमेकांशी संवाद साधण्याचे मार्ग आजच्याहून बऱ्यापैकी भिन्न होते. त्यामुळे वेदांची निर्मितिप्रक्रिया कशी होती याबद्दल निव्वळ अन्दाज बान्धता येतात.

तरीही एक जाणवते, की वेदांची निर्मिती अनेक वेळेस अत्यन्त निर्हेतुकपणे झाली असावी. तपस्वी आणि द्रष्ट्या ऋषी मुनींना चित्ताच्या अत्यन्त उन्मनी अवस्थेत काही खूपच आन्तरिक असे अनुभव आले ज्यांचे वर्णन त्यांनी तेव्हांच किंवा मागाहून सूक्तांद्वारे केले. अशाप्रकारची सूक्ते ही बहुधा पूर्णपणे स्तुतीपर (उदा० देवतांची सूक्ते) किंवा तत्त्वात्मक (उदा० पुरुषसूक्त, नासदीयसूक्त) आहेत.

पण काही काही वेळेस सहेतुक निर्मितीही झालेली असावीसे वाटत. विशेषतः अथर्ववेदातील वैद्यकविद्या, शस्त्रविद्या, गणित, इ. निरनिराळ्या शास्त्रांशी सम्बन्धित मन्त्र हे केवळ उन्मनी अवस्थेतील आधिभौतिक अनुभवांतून आलेले आहेत असे म्हणता येणार नाही.

3.2 यज्ञक्रियेत वेदमन्त्रांचे उपायोजन
वैदिक काळात यज्ञसंस्था अत्यन्त विकसित आणि प्रभावी होती. समाजातील अनेक स्तरांत विविध कारणांसाठी यज्ञ करण्याची पद्धत होती. त्यामुळे, यज्ञयागादि क्रियांसाठी वेदामन्त्रांची निर्मिती झाली असे मानणारे काही विचारवन्त आहेत. वेदमन्त्रांचा प्रामुख्याने यज्ञकाण्डासाठी होणारा वापर पाहाता, त्यांचा हा विचार पूर्णपणे चुकीचा जरी नसला तरी वेदांतील प्रत्येक मन्त्र हा यज्ञयागासाठीच रचला गेला असे म्हणणे चूक ठरेल.

अशीही काही सूक्ते आहेत, ज्यांचा यज्ञ क्रियेशी विशेष सम्बन्ध दिसून येत नसताना काही विद्वान् मण्डळींनी यज्ञक्रियेच्या मन्त्रांमधे त्यांचा समावेश केला. त्यांचे मूळ स्वरूप पाहाता त्यांचा यज्ञाशी थेट सम्बन्ध दिसत नाही आणि म्हणून यज्ञविधीकरिता त्यांचे प्रयोजन खास नाही.
उदा० निधन शान्तीचा होम करताना काही यजुर्वेदीय पुरोहित नासदीय सूक्ताचे पठण करतात.
नासदीय सूक्ताचे स्वरूप हे तत्त्वज्ञानपर आहे. सृष्टीच्या निर्मितीप्रक्रियेची चर्चा करणारे हे सूक्त असून सृष्टीच्या मूळ कर्त्यासम्बन्धी एखाद्या तत्त्वज्ञास पडणारे प्रश्न या सूक्तात माण्डलेले आहेत.
एखाद्या व्यक्तीच्या निधनामुळे घरात व आजूबाजूच्या परिसरात निर्माण झालेल्या व्याधीप्रवर्तक जन्तूंचा नाश करणे व घरातील इतर मण्डळींचे मानासिक दुःख शमविणे हा या निधनशान्तीचा प्रमुख हेतू असावा. अशा परिस्थितीत नासदीय सूक्तासारख्या तात्विक चर्चेचे औचित्य किती, हा प्रश्नच आहे.
(आधुनिक काळात लोकांना मुळातच संस्कृत समजत नाही त्यामुळे आशा शन्तीहवनात नासदीय सूक्ता ऐवजी त्याच चालीवर पुरुरवा-उर्वशीचे प्रणय सूक्त म्हटले तरी लोकांवर त्याचा तेवढाच प्रभाव पडेल यात शङ्का नाही !)

तरीही जवळ जवळ दोन सहस्रके वेदांचे उपायोजन प्रामुख्याने यज्ञकांडातच झाले असे दिसून येते. कदाचित त्यामुळेच वेदांवर भाष्य करणाऱ्या अनेक विद्वांसांचा कल हा यज्ञवैधानिक स्वरूपाचा असतो. सामान्यपणे यज्ञाला चार प्रमुख पुरोहित व प्रत्येकाचे तीन साहाय्यक असे एकूण सोळा पुरोहित असत. हे चार पुरोहित, त्यांची यज्ञातील कार्ये व उपायोजनाचे वेदमन्त्र खालीलप्रमाणे होत -

3.2.1 होतृ - ऋग्वेद
यज्ञविधीतील प्रमुख पुरोहितास ‘होतृ’ अशी संज्ञा आहे. यज्ञातील मुख्य व इतर देवतांना हवि अर्पण करताना तो ऋग्वेदातील मन्त्र म्हणतो. होतृ एकूण यज्ञविधीमध्ये अधीक्षकाची भूमिका निभावतो असे म्हणता येते.

3.2.2 अध्वर्यु - यजुर्वेद
‘अध्वर्यु’ हा यज्ञविधीच्या इतर सर्व अङ्गांची व्यवस्था करतो. यज्ञासाठी भूमी तयार करून घेणे, वेदी बान्धून घेणे, सर्व सामग्रीची व्यवस्थ करून घेणे, यज्ञात प्रत्यक्ष अग्नि प्रज्वलित करणे, बळीचा पशु आणणे व योग्य मुहूर्तावर त्याचा बळी देणे, त्याचप्रमाणे यज्ञाची साङ्गता करून दक्षिणेचे वितरण करणे इ० सर्व विधी अध्वर्यु करतो. यातील प्रत्येक विधीचे मन्त्र यजुर्वेदात असून अध्वर्यु व त्याचे साहाय्यक पुरोहित त्या मन्त्रांचे औचित्यानुसार पठण करतात.

3.2.3 उद्गातृ - सामवेद
यज्ञामध्ये, विशेषतः सोमयज्ञामध्ये, निरनिराळ्या ‘साम’ म्हणजे चालींवर वेदमन्त्रांचे गायन करणारा जो पुरोहित त्यास ‘उद्गातृ’ अशी संज्ञा आहे. खरं म्हणजे सम्पूर्ण यज्ञभर वेदमन्त्रांचे पठण होतच असते. तरीही उद्गातृ मात्र मन्त्रांचे निव्वळ पठन न करता ‘गायन’ करतात त्यामुळे हा विधी हा थोडासा मनोरञ्जनात्मक असावा. यज्ञाच्या प्रदीर्घ कार्यक्रमामधे कुठेतरी मनाला थोडासा मोकळेपणा मिळावा व त्यानुषङ्गाने काव्य-शास्त्र-विनोद घडावा ही यामागची भूमिका असावी असे वटते.
(हे सर्व लक्षात घेता सामवेदातून गान्धर्ववेद नांवाच्या उपवेदाची म्हणजेच सङ्गीत-शास्त्राची उत्पत्ती झाली हे नवल नाही)

3.2.4 ब्रह्मन् - अथर्ववेद
‘ब्रह्मन्’ अशी संज्ञा असलेल्या पुरोहिताचे सम्पूर्ण यज्ञविधीवर बारीकपणे लक्ष ठेवण्याचे कार्य असते. विधींमध्ये कुठेकी काही चूक घडली किंवा अनवधानाने एखादा विधी राहून गेला तर अशाप्रकारच्या दोषाचे निवारण अथर्ववेदातील मन्त्रांच्या साहाय्याने करण्याची जवाबदारी या ब्रह्माची आहे.

3.3 यज्ञाखेरीजचे वेदमन्त्र
आधी म्हटल्याप्रमाणे, निरनिराळ्या शास्त्रांशी सम्बन्धित मन्त्र हे त्या त्या शास्त्रकारांच्या व अभ्यासकांच्या उपयोगाकरिता निर्माण झाले असावे.
उदा० अथर्ववेदातील वैदिक गणितासमबन्धीचे मन्त्र हे गणिते करतांना नुसते म्हणावयाचे नसून त्यांत गणिताची सूत्रे आहेत. त्या सूत्रांचा उपयोग हा उचित ठिकाणी गणित सोडवण्याकरिता किंवा वैज्ञानिक संशोधनाकरिता केला पाहिजे .
(अन्यथा एखाद्या इष्टी-यज्ञात अथवा ललितापूजेत ते मन्त्र रटण्याने निव्वळ उच्चार शुद्ध होतात, घसा मोकळा होतो, ऐकणाऱ्यांचे मनोरञ्जन होते, आणि वातावरण भारल्यासारखे होते, याव्यतिरिक्त इतर काही होत नाही.)

3.4 वेदप्रयोजन
वरील चर्चेतून वेद म्हणजे काय ते साधारण लक्षात येते. वेदांमध्ये प्रामुख्याने देवतांची स्तुती, धर्माचरणासम्बन्धीचे सङ्केत, ईश्वरोपासनेचे प्रकार आणि सृष्टिनिर्मितीचे तत्वचिन्तन आहे. इतर शास्त्रचर्चाही उदण्ड आहे, परन्तु कलौघात त्या चर्चेला द्वितीयत्व आले आणि परमेश्वराबद्दलच्या व धर्माबद्दलच्या सर्व बाबींना आत्यन्तिक महत्त्व प्राप्त झाले. ही चर्चा करण्याचे प्रयोजन म्हणजे वेदांच्या अपौरुषेयत्वाच्या कल्पनेचे बीज बरेचसे यात आणि बाकीचे वेदांच्या शब्दप्रामाण्यात सापडते. इतर अनेक घटकांनी या कल्पनेचे पोषण केले आणि अगदी २० व्या शतकातील अनेक पण्डितदेखील वेदांना अपौरुषेय मानतात.

(4) वेदांचे दृश्य (श्राव्य) रूप

4.1 वेदांचे वाङ्मयीन रूप
सध्या वेद कोणत्या रूपात आपल्यापुढे आहेत हे पाहाणेही औचित्याचे ठरावे. वेदांची निर्मिती झाली त्या काळात त्यांचे रूप हे थोडथोड्या प्रमाणात मनोऽनुभवात्मक, सैद्धान्तिक, तात्त्विक, शास्त्रीय आणि वाङ्मयीन होते असे मानता येते. पण त्यानन्तर त्यांच्या सन्धानाचा प्रश्न निर्माण झाल्यावर एकच माध्यम निश्चितपणे श्रेष्ठ ठरले ते म्हणजे वाङ्मयीन रूप. बहुतांश वेदभागाला निर्मितीच्या वेळेसच वाङ्मयीन रूप प्राप्त झालेले होते, तरीही, ज्या भागाचे रूप तसे नव्हते त्यास सहेतुकपणे वाङ्मयीन रूप देऊन त्याच्या सन्धानाची व्यवस्था केली गेली.

4.2 मौखिकपरम्परेतून वेदांचे सन्धान
त्या काळात लिखाणाची साधने व्यावहारिक करणांस्तव दुर्लभ होती आणि म्हणून मौखिक परम्परेनेच या वाङ्मयाची अखण्डता राखली गेली हा इतिहास सर्वांना माहित आहे. सम्पूर्ण जगामध्ये केवळ मौखिक परम्परेद्वारे टिकून राहिलेल्या वाङ्मयापैकि वेदांइतके उत्कृष्ट, प्रचण्ड आणि अक्षत असे दुसरे कोणतेही नाही. यामध्येच आपल्या मौखिक पमपरेचा गौरव आहेसे वाटते. वैदिक मन्त्रांचे अक्षतत्व हा त्यांच्या अपौरुषेयत्वाकरिता आणखी एक आधार म्हणून वापरला जातो.

4.3 वेदांचे आपल्यापुढील रूप
अर्थात् आज आपल्यापुढे जे वेद आहेत ते वाङ्मयरूपात आहेत. म्हणजे त्यांतील दिव्यत्व, अपौरुषेयत्व, प्राचीनत्व, इ० बाबी काही काळाकरिता दुर्लक्षित केल्यास वेदांची तुलना ही आधुनिक काळातील कवितेशी करता येते.
चाऱ्ही वेद हे सम्पूर्णपणे मन्त्रात्मक आहेत. सामगायनातील चाली वगळल्या तरीही वेदमन्त्रांना गेयता आहे. त्यांमध्ये निश्चितपणे एकप्रकारची निबद्धता दिसून येते. ऋषींना वैदिक मन्त्र दिसले किंवा ते त्यांच्या प्रज्ञाचक्षूंपुढे प्रकट झाले असे जरी म्हटले तरीही वाङ्मयीन रूपातील त्यांच्या रचनेमध्ये एक निश्चितशी सुसूत्रता दिसते. तसे जर नसते तर छन्दःशास्त्राचा जन्मच झाला नसता.

ज्यार्थी या ऋषींना उत्स्फूर्तपणे अशी उत्कृष्ट काव्यसिद्धि जमली त्यार्थी त्या ऋषींचे इतर शास्त्रांसोबतच वाङ्मयशास्त्रातही दीर्घकालीन प्रशिक्षण झालेले असावे अन्यथा त्यांच्या नैसर्गिक प्रज्ञेला इतके सुबद्ध रूप प्राप्त झाले नसते. अपवादानेच एखादी व्यक्ती जन्मजात प्रज्ञा-प्रतिभा घेऊन जन्मते आणि सुरुवतीपासूनच तिची काव्यनिर्मिती हि विशेष प्रकारची होते, पण असे अपवाद शतकातून एखाद दोन कवी किंवा ऋषींच्या बाबतीत सम्भवतात. चाऱ्ही वेद रचणाऱ्या ऋषींची सङ्ख्या एकत्रपणे जवळपास 500 च्या आसपास जाते हे लक्षात घेतल्यास इतके अपवाद एकाच क्षेत्रात झाले हे मान्य करणे कठीण जाते.

या सर्व चर्चेचा मथितार्थ एवढाच, की आज उपलब्ध असलेल्या संहिता वाङ्मयाची निर्मितीपासून सङ्कलनापर्यन्तची सम्पूर्ण प्रक्रिया अत्यन्त नियोजनबद्धपणे झालेली आहे. त्यामागची प्रेरणा निश्चित उत्स्फूर्त असेल पण अंमलबजावणी मात्र अवश्य नियोजनबद्ध आहे यात शङ्का नाही. आणि हे सगळे निव्वळ मौखिक परम्परेने साध्य केलेले आहे.

4.5 वेदांचे शब्द (ध्वनी) स्वरूप
पुस्तकातील लिखित स्वरूपातील वेद हे मूळ वेद नव्हेत तर गुरुकडून शिष्याकडे परम्परेने आलेले वेद हेच मूळ वेद आहेत. काळाच्या ओघात त्यामध्ये विकार येऊ नये याकरिता शक्य तेव्हां ते लिहिले गेले इतकेच त्या लिखाणाचे महत्त्व आहे.
वेद हे सम्पूर्णपणे वाङ्मयरूपातून आणि मौखिकपरम्परेने आपल्यापर्यन्त पोहोचले हे मान्य केले की आणखी एक गोष्ट मान्य करावी लागते ती म्हणजे वेद शब्दरूप किंवा ध्वनिरूप आहेत. शब्द ‘नित्य’ म्हणजे ‘अपौरुषेय’ असतात, म्हणजेच शब्दांचा कुणीही निर्माता नसतो, ते स्वतःस्फूर्त असतात असे मानले जाते. शब्दनित्यत्व म्हणजे नेमके काय हे जाणण्याकरिता शब्दनिर्मितीची प्रक्रिया थोडक्यात पाहिली पाहिजे.

पाणिनीय शिक्षेत शब्दनिर्मिती अशाप्रकारे साङ्गितलेली आहे -
आत्मा बुद् ध्या समेत्यार्थान् मनो युङ्क्ते विवक्षया ।
मनः कायाग्निमाहन्ति स प्रेरयति मारुतम् ।
मारुतस्तूरयसि चरन्मन्दं जनयति स्वरम् ॥
(मनुष्याला जे बोलणे अभीष्ट आहे त्याचा, बुद्धीच्या साहाय्याने, आत्मा निश्चय करतो. हा निश्चय झाल्यावर आत्मा त्या गोष्टीस बोलू इच्छितो. आत्म्याने प्रेरित झालेले मन शरीराच्या आभ्यन्तर वह्नीस उत्तेजित करते. हा कायाग्नी शरीरातील वायूस अभिलषित स्वरयन्त्रातून निघण्यास प्रेरित करतो. हा वायू मग त्या विशिष्ट स्वरयन्त्रावर आघात करतो आणि त्यातून शब्द उत्पन्न होतो. या प्रक्रियेतून निर्माण झालेला शब्द अर्थवाही होऊन श्रोत्यास बोध करून देतो. )

भगवद्गीतेत हा कायाग्नि ईश्वरस्वरूप वर्णिलेला आहे. त्याचप्रमाणे हा वायू प्राणरूप असून शरीरातून निःश्वासरूपाने प्रकट होतो. शब्दांची निर्मिती निश्वासाच्या साहाय्याने होते हे तर आधुनिक विज्ञानही मान्य करते.
हा केवळ एका प्रकारचा शब्द झाला. मनुष्यनिश्वासजन्य शब्दाव्यतिरिक्त इतरही शब्द (ध्वनी) सृष्टीत उत्पन्न होत असतात. याही शब्दनिर्मितीत वायू हा घटक असून तिथे मात्र तो निराळ्या प्रकारे कार्यरत असतो. त्या सर्व शब्दांना सृष्टीचे निःश्वास मानले जाते. सृष्टी ही अनादि-अनन्त म्हणजेच नित्य आहे. त्यामुळे त्या सृष्टीचे निश्वास म्हणजे ‘शब्द’ हे नित्य असतात. ते स्वतःच सृष्टीमध्ये प्रकट होत असतात.
एखादा असे म्हणेल की शब्द केवळ बोलणाऱ्याच्या प्रयत्नानन्तरच व्यक्त होतात आणि आपल्याला ते तेव्हांच ऐकू येतात. तर त्यावर ह्या सिद्धान्ताचे उत्तर असे आहे की आपण शब्द ऐकतो-बोलतो याचा अर्थ आपल्या प्रयत्नाने ते निर्माण होतात व मग नष्ट होतात असा नसून, बोलणाऱ्या आणि ऐकणऱ्याच्या इच्छा-सामर्थ्य-प्रयत्नानुसार ते वागिन्द्रिय व श्रवणेन्द्रियांना केवळ गोचर होतात. एकदा अशी इच्छा-सामर्थ्य-प्रयत्न नष्ट झाले की पुन्हा ते अगोचर स्थितीला जातात.
ज्याप्रमाणे शब्द हे सृष्टीचे निश्वास मानले जातात त्याचप्रमाणे वेदांनाही या सृष्टीच्या निर्मात्याचे निश्वास मानले जाते आणि म्हणून वेदही नित्य मानले जातात. ऋग्वेदाचा भाष्यकार सायणाचार्य आपल्या ऋग्वेदभाष्याभूमिकेत वेद हे परमेश्वराचे निश्वास असल्याचे नमूद करतो. परमेश्वराचा निश्वास असल्यामुळे वेद अपौरुषेय आहेत असे मानले जाते.

(5) वेदांची भाषा व तिचे नित्यत्व

5.1 देवभाषा संस्कृत
आधी उल्लेखिल्याप्रमाणे वेदांची भाषा ही 4 - 5 हजार वर्षांपूर्वीची संस्कृत भाषा आहे. ही भाषा साहित्यिक आणि व्यकरणात्मक दृष्टीने अतिशय प्रगत आशी असून ह्या भाषेत शब्दसमृद्धी रूपसमृद्धी भरपूर प्रमाणात आढळते. एकन्दरच ही भाषा तत्कालीन समाजाच्य अत्यन्त विकसित अशा अवस्थेची निदर्शक आहे असे मानावयास प्रत्यवाय नाही. त्यामुळे या भाषेस ‘देवभाषा’ , ‘देववाणी’ अशी विशेषणे प्राप्त झाली.
अर्थात् या भाषेत निर्माण झालेल्या अतिप्राचीन आणि अत्युत्कृष्ट वाङ्मयास ‘देववाङ्मय’ मानले जाणे साहजिकच होते.

5.2 नैसर्गिकभाषा संस्कृत
काही विद्वानांचे मत तर असे आहे की जगात संस्कृत ही एकच भाषा नैसर्गिक आहे, बाकी सर्व भाषा साङ्केतिक आहेत. साङ्केतिक भाषा नामरूपाचा सम्बन्ध जोडून शिकविली जाते. नैसर्गिक भाषा ईश्वरकृपेने प्राप्त होते. आणि म्हणून ईश्वराचीच असलेली संस्कृत ही एकमेव नैसर्गिक भाषा आहे.
वैदिक शास्त्राचा असा सिद्धान्त आहे की वस्तूचा आणि शब्दाचा मानवाच्या सङ्केताने न जोडलेला असा काही सम्बन्ध असून तोच सम्बन्ध औत्पत्तिक सम्बन्ध आहे. तो सम्बन्ध उत्पत्तीने सिद्ध होतो. त्या सम्बन्धाप्रमाणे, शब्दापासून वस्तूची प्रत्यक्ष उत्पत्ती होते म्हणून तो खरा औत्पत्तिक सम्बन्ध. म्हणूनच वस्तूला ‘पदार्थ’ म्हणतात – ‘पद’ म्हणजे शब्द आणि त्याचा खरा अर्थ म्हणजे ती वस्तू .

संस्कृताभिमान्यांच्या मतानुसार, केवळ संस्कृत भाषेतच या औत्पत्तिक अर्थानुसार पदसिद्धी होते आणि म्हणून संस्कृतात निर्माण झालेल्या वेदांचा सृष्टीतील वस्तूंशी औत्पत्तिक सम्बन्ध आहे. किम्बहुना ही सृष्टी म्हणजे शब्दस्वरूप वेदांचेच इतर महाभूतांच्या साहाय्याने झालेले दृश्यरूपान्तर आहे. म्हणून वेद हे अपौरुषेय आहेत.

(6) आपौरुषेयत्वाचा सिद्धान्त

वेदांविषयी इतकी माहिती करून घेऊन त्यांचे साधारण स्वरूप लक्षात घेतल्यावर आपण आता त्यांच्या अपौरुषेयत्वाकडे वळू. अपौरुषेयत्व म्हणजे नेमके काय याबद्दल अगदी थोडक्यात विचार करू.
या ठिकाणी पुन्हा व्याकरणात्मक विचार करावा लागेल.

6.1 अपौरुषेयत्व - व्याकरणात्मक विचार
अपौरुषेयत्व हे अपौरुषेय या शब्दाचे भाववाचाक नाम आहे . अपौरुषेय असण्याचा जो भाव त्या भावाचे नांव अपौरुषेयत्व.
अपौरुषेय हे पद पौरुषेय या पदाचे नकारत्मक रूप आहे. पौरुषेय हे पद पुरुष या पदाचे तद्धित रूप आहे. आता ‘पुरुष’ म्हणजे काय, हे पाहिल्यास, त्या शब्दाची उत्पत्ती साधारण अशी आहे :
पुरि शेते इति पुरुषः - नगरात जो झोपतो तो पुरुष.
(पुर् म्हणजे नगर किंवा शहर , तसेच, झोपणे असा अर्थ असलेल्या शीङ् या द्वितीय गणातील धातूचे षः हे रूप आहे. नगरात किंवा शहरात जो झोपतो म्हणजे राहातो तो पुरुष).
याचे दोन अर्थ होतात – (1) देहरूपी नगरात राहाणारा तो पुरुष म्हणजे आत्मा. (2) विश्वरूपी नगरात व्याप्त होऊन राहाणारा म्हणजे परमात्मा अर्थात् परमेश्वर.
(हा दुसरा अर्थ वेदांना अनेक ठिकाणी अभिप्रेत आहे असे म्हटले जाते. यजुर्वेदातील पुरुषसूक्तात ज्या पुरुषाचे वर्णन आहे ते सगळे याला लागू पडते.)
यानुसार, पौरुषेय म्हणजे या पुरुषाशी सम्बन्धित किंवा याच्यापासून उत्पन्न झलेले जे काही आहे ते. म्हणून, अपौरुषेय म्हणजे याच्यापासून उत्पन्न न झालेले, स्वतःच अस्तित्वात असलेले.

6.2 वेदांचे अपौरुषेयत्व
आता लक्षात घेण्यायोग्य गोष्ट अशी आहे की, वेदांच्या अपौरुषेयत्वाच्या सिद्धान्ताप्रमाणे वेद हे या पुरुषाने म्हणजे परमेश्वरानेही निर्माण केले नाहीत. वेद हे कुणीच निर्माण केले नाहीत कारण ते पूर्वीपासून आहेत व अनन्त काळापर्यन्त असेच असणार आहेत. परमेश्वराबद्दलही असाच सिद्धान्त आहे की तो अनादि व अनन्त आहे. त्यामुळे अपौरुषेयत्वाचा सिद्धान्त असा आहे की, किम्बहुना वेद हे परमेश्वराचेच रूप आहे.
‘परमेश्वराने वेद निर्मण केले’ असे म्हणणे म्हणजे ‘त्याने स्वतःला निर्माण केले’ असे म्हणण्यासारखे असून ते अतार्किक आहे.
आता, वेदांचा कर्ता म्हणून परमेश्वरालाही जिथे नाकारले जाते तिथे मानवाचा काय पाड लागणार ? त्यामुळे वेद हे मानवनिर्मित असल्याची चर्चा करणेदेखील चुकीचे आहे असे वेदापौरुषेयत्ववाद्यांचे म्हणणे आहे.

6.3 वेद अपौरुषेय कशावरून ?

6.3.1 वेद म्हणजे ज्ञान व ज्ञान अपौरुषेय असते
वेद या शब्दाचा व्याकरणात्मक अर्थ आपण पहिला आणि त्यातून वेद म्हणजे ज्ञान हे आपल्या लक्षात आले आहे. आता ज्ञान हे कुणीही निर्माण करू शकत नाही, ते स्वतःच अस्तित्वात असते. उदा० 100 अंश सेण्टिग्रेड किंवा त्याहून अधिक तापमानाला पाण्याचे बाष्प होते ही गोष्ट जरी वैज्ञानिकांनी शोधली असली, तरी पाण्याचे बाष्पीभवन ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया काही कुणी निर्माण केलेली नाही आणि म्हणूनच अपौरुषेय अशी आहे.
त्याचप्रमाणे, वेद ज्या ज्या विषयांबद्दल प्रतिपादन करतात ते सर्व विषय (प्रामुख्याने - परमेश्वर, ही सृष्टी, पञ्चमहाभूतादि नैसर्गिक तत्त्वे, इ०) हे मानवाधीन नसून अपौरुषेय आहेत. त्यामुळे त्यंच्याबद्दलचे सत्य ज्ञान देणारे वेददेखील अपौरुषेयच असले पाहिजेत.

6.3.2 वेदांना निर्माता नाही
वेदांची तुलना इतर वाङ्मयाशी केल्यास हे लक्षात येते की वेदांचा म्हणून कुणी निर्माता नाही. रामायण हे वाल्मीकींनी रचले किंवा मनुस्मृती मनुमहाराजांनी रचली, त्याप्रमाणे वेदांचा रचयिता असा कुणी माहित नाही. वेदाध्ययन करणारे ऋषी मुनी व त्यांच्या शिष्यपरम्परा यांतून केवळ वेद आपल्यापर्यन्त पोहोचले.
ज्या वेदांना कुणीही कर्ता नाही ते वेद पौरुषेय असूच शकणार नाहीत म्हणून ते अपौरुषेय आहेत.

6.3.3 वेदांचा प्रतिपाद्य विषय आणि त्याचे अपौरुषेयत्व
वेदांमध्ये प्रतिपाद्य विषय अनेक असले तरीही प्रामुख्याने वेद परमेश्वराबद्दल चर्चा करतात असे मानले जाते. या सृष्टीच्या निर्मात्याविषयी ज्ञान देणे हे वेदांचे प्रमुख कार्य आहे. वेदांतील अनेक मन्त्रांवरून हेही प्रतिपादन झालेले आहे की परमेश्वर हा निर्गुण-निराकार-अनादि-अनन्त असा आहे, त्याचा कुणीही निर्माता नाही. अर्थात् तो स्वयम्भू म्हणजेच अपौरुषेय आहे आणि त्यामुळे त्याचे सत्यज्ञान करून देणारे जे वेद ते देखील अपौरुषेयच आहेत.

6.3.4 ऋषींना वेद दिसले
असे मानले जाते की अनेक ऋषींनी त्यांच्या प्रज्ञाचक्षूंद्वारे वेद पाहिले. त्यांनी वेद निर्माण केले नसून, त्यांच्या प्रखर ज्ञानामुळे व तपश्चर्येमुळे ते वेद पाहू शकण्याच्या अवस्थेप्रत पोहोचले आणि परमेश्वराने त्यांच्या ज्ञानचक्षूंपुढे वेद प्रकट केले. त्यांनी केवळ ते त्यांच्या भाषेत (वेदकालीन संस्कृतात) आपल्या शिष्यांना साङ्गितले. पण मुळात परमेश्वराकडून प्राप्त झालेले आणि या ऋषींच्या व्यक्तिगत रचना नसलेले वेद हे अपौरुषेयच आहेत.

6.3.5 शब्दनित्यत्व - वेदनित्यत्व – अपौरुषेयत्व
वरील लेखनखण्ड क्र० 4.5 मध्ये शब्दांच्या नित्यत्वाचा सिद्धान्त स्पष्ट झालेला आहे. शब्द जर नित्य असतील तर शब्दरूप असलेले वेददेखील नित्यच असले पाहिजेत. नित्य म्हणजेच कधीही नष्ट न होणारे.
आता, ‘निर्माण झालेली गोष्ट ही नष्ट होणारच’ हा याच सृष्टीचा नियम असल्यामुळे, वेद हे जर नित्य म्हणजे कधीही नष्ट न होणारे असतील तर ते कधीही निर्माण झालेले नसून अनादि काळापासून अस्तित्वात असलेले असे आहेत. याचाच अर्थ वेदांचा कुणी निर्माता नाही अर्थात् ते अपौरुषेय आहेत.

6.3.6 धर्मप्रतिपादकत्वामुळे नित्यत्व
काही दार्शनिक असे मानतात की वेद हे धर्मप्रतिपादक आहेत. ‘धारयति इति धर्मः’ अशी धर्माची सर्वसाधारण व्याख्या केली जाते आणि ही व्याख्या वैश्विक स्वरूपाची असल्याचेही मानले जाते. धर्म हा जर विश्वाला धारण करत असेल तर हे विश्व जितके नित्य तितकाच धर्मही नित्य आणि अशा धर्माचे प्रतिपादन करणारे वेदसुद्धा नित्य म्हणजे अपौरुषेयच आहेत.

6.3.7 परमेश्वर-निश्वासरूपी वेद
परमेश्वर अनादि-अनन्त आहे आणि म्हणून त्याच्या क्रियाही नित्य आहेत. वेद हे परमेश्वराचे निश्वास आहेत आणि म्हणून ते नित्य म्हणजेच अपौरुषेय आहेत.

6.3.8 परमेश्वराचे रूप वेद
ज्यावेळेस काही प्रज्ञावन्त सदाचारी सिद्ध व द्रष्ट्या ऋषींच्या मनांत परमेश्वराबद्दलची जिज्ञासा जागृत झाली त्यावेळेस त्यांनी तपाचरण केले अणि त्याच्या फलस्वरूप त्यांना परमेश्वराचे दर्शन झाले. हे दर्शन म्हणजे चर्मचक्षूंना दिसलेल्या वस्तू नसून प्रज्ञाचक्षूंना दिसलेले परमेश्वराचे स्वरूप होते व त्या स्वरूपाचे वर्णन करताना या द्रष्ट्या ऋषींनी जे दिव्य शब्द उच्चारले ते वेद. परमेश्वर नित्य आहे आणि म्हणून परमेश्वराचे रूप असलेले वेद सुद्धा नित्य अर्थात् अपौरुषेय आहेत.

6.3.9 वेदांचे पूर्णत्व – अक्षतत्व
एखादी मानव निर्मित गोष्ट ही काळानुसार बदलत जाते आणि तिच्यात स्थल-कालपरत्वे काही वृद्धी किंवा क्षय होत राहातो. तसे वेदांचे झाले नाही.
वेद हे दिव्यद्रष्ट्या ऋषींनी ज्या स्वरूपात प्रकट केले त्याच स्वरूपात त्यांच्या शिष्यांनी मौखिक परम्परेद्वारे जपले व आपल्यापर्यन्त पोहोचवले. वेदनिर्मितीच्या काळापासून आतापर्यन्त त्यांच्यात काहीही विकार उत्पन्न झालेला नाही. तसेच नन्तरच्या काळात अनेक शास्त्रवेत्ते पण्डित झाले, तरीही त्यांनी वेदांमध्ये काही नवीन वाढ केली नाही अथवा वेदांशी तुल्यबळ असे काही वाङ्मय निर्माण केले नाही. याचा अर्थ, मानवी कृतींमध्ये असणारे जे प्राकृतिक दोष आहेत ते वेदांना लागू होत नाहीत. ही गोष्ट केवळ दिव्य वाङ्मयाच्या बाबतीतच शक्य आहे आणि म्हणून वेद हे दिव्य असून अपौरुषेय आहेत.

6.3.10 संस्कृत भाषेत असल्यामुळे वेद अपौरुषेय
वेद संस्कृतात आसल्यामुळे ते दिव्य व अपौरुषेय असल्याचे काही पण्डित मानतात. हा सिद्धान्त दोन प्रकारचा आहे. ते दोन्ही प्रकार समजून घ्यावे लागतील –
6.3.10.1 संस्कृत ही देवांची भाषा
संस्कृत ही देवांची भाषा आहे. आता, देव म्हणजे इन्द्र, वरुण, अग्नी, वायु, रुद्र, इ० वैदिक देवता. त्वष्टा ऋभू इ० मण्डळी मानवी असून स्वतःच्या अतिमानवी परक्रमाने देवत्वाला गेलेले असे होत. तसेच कालान्तराने शिव, पार्वती, गणपती, विष्णु, लक्ष्मी, इ० पौराणिक विभूतींनाही देवत्व लाभले. या सर्व मण्डळींची भाषा संस्कृत होती व त्यामुळे संस्कृत ही अत्यन्त दिव्य भाषा असून त्या भाषेतील आद्य वाङ्मय म्हणजे वेद हेही तितकेच दिव्य आहेत.

6.3.10.2 जगातील एकमेव नैसर्गिक भाषा संस्कृत
वरील लेखनखण्ड क्र० 5.2 मध्ये साङ्गितल्याप्रमाणे संस्कृत ही जगातील एकमेव नैसर्गिक भाषा असल्याचे काही विद्वानांचे मत आहे. याचा सरळ सरळ अर्थ असा की संस्कृत ही मानवनिर्मित भाषा नसून ती सृष्टीनिर्मित भाषा आहे व सृष्टी इतकीच अनादि-अनन्त आहे. जोवर ही सृष्टी अस्तित्वात आहे तोवर संस्कृतसुद्धा अस्तित्वात असेल आणि या भाषेत प्रकट झालेले वेद हे देखील असेच नित्य असणार आहेत.

(7) वेद अपौरुषेय नाहीत

वेदांना अपौरुषेय न मानणारेही काही तत्त्वज्ञ आहेत. त्यांचे स्वतःचे असे काही सिद्धान्त आहेत व वेदांना अपौरुषेय न मनण्यामागे त्यांची निश्चित अशी एक भूमिका आहे. ती आपण पाहू -

7.1 ‘वेद’ संज्ञेबद्दलचा सम्भ्रम
वेदांना अपौरुषेय मानणाऱ्या निरनिराळ्या दार्शनिकांमध्येसुद्धा ‘वेद’ या संज्ञेविषयी एकवाक्यता नाही. काही दार्शनिक केवळ ऋक्- यजुस्- साम-अथर्वण या संहिता म्हणजे वेद असे मानतात, इतर काही जण मन्त्रब्राह्मणयोर्वेदः असे म्हणतात, तर अन्य काही मण्डळी संहिता, ब्राह्मणे व आरण्यके यांना वेद मानतात.
परिशिष्टे देखील मन्त्रांचाच एक विस्तारित भाग असल्यामुळे तीही वेदांमध्येच समाविष्ट असल्याचेही काहींचे मत आहे.
आता खरी गम्मत यापुढेच आहे. संहिता, ब्राह्मणे, आरण्यके, उपनिषदे आणि परिशिष्टे, हे सर्व वेदांचेच अविभाज्य भाग आहेत असे म्हणणारे मण्डळीच त्यातील फक्त संहिता तेवढ्या अपौरुषेय आहेत व बाकी सगळे वाङ्मय मानवनिर्मित आहे असे मानतात.
मग ‘वेद नेमके अपौरुषेय की पौरुषेय की दोन्ही थोडे थोडेसे ?’ असा प्रश्न पडतो.
(काहीकासेना, संहितांच्या अपौरुषेयत्वाबद्दल मात्र अपौरुषेयत्ववाद्यांमध्ये नक्की वाद नाही म्हणून या प्रकल्पापुरता आपण फक्त त्यांचाच विचार करत आहोत. शिवाय संहितांखेरीज इतर वाङ्मायाच्या कर्त्यांची महिती त्या त्या वाङ्मयात वा अन्यत्र काही प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे त्यांच्या पौरुषेयत्वाबद्दल संशय नसल्याचे दिसते.)

7.2 अपौरुषेयत्व ही भ्रामक कल्पना
काही तत्त्वज्ञांच्या मते आपल्या ज्ञानेन्द्रियांना कळते तेवढेच हे विश्व आहे आणि त्यापलिकडे दुसरे काहीही नाही. जे काही आहे ते याच सृष्टीत, इथेच निर्माण होणारे आणि इथेच सम्पणारे आहे. अनादि-अनन्त परमेश्वर असा कुणी अस्तित्वातच नाही. त्यामुळे अपौरुषेयत्व ही कल्पनाच मुळी भ्रामक आहे. आणि म्हणून, वेदच काय पण सृष्टीतील कोणतीही गोष्ट अपौरुषेय नाही.

7.3 परमेश्वराव्यतिरिक्त इतर काही अपौरुषेय नाही
अन्य काही तत्त्वज्ञ असे मानतात की परमेश्वर हा एकमेवाद्वितीय असा असून तोच तेवढा नित्य असतो.
त्याच्या व्यतिरिक्त इतर कोणतीही गोष्ट नित्य किंवा अपौरुषेय नाही. भक्ति, ज्ञान, कर्म, इ० त्या परमेश्वरापर्यन्त नेणाऱ्या अनेक मार्गांपैकी काही आहेत, पण परमेश्वर आणि त्याच्याप्रत पोहोचण्याचे मार्ग या दोन भिन्न गोष्टी असून, परमेश्वराखेरीजच्या या इतर गोष्टी नित्य किंवा अपौरुषेय असणे शक्य नाही.

7.4 अपौरुषेयत्वाच्या सैद्धान्तिक कारणांचे प्रतिवाद

वरील लेखनखण्ड क्र 6.3.1 ते 6.3.10 मध्ये वेदांना अपौरुषेय मानण्यची जी कारणे दिलेली आहेत, त्यांचा प्रतिवाद करणारे काही मुद्दे आहेत. त्यांचाही विचार करायला लागेल, अन्यथा ही चर्चा एकाङ्गी होईल.

6.3.1 वेद म्हणजे ज्ञान व ज्ञान अपौरुषेय असते
7.4.1 ज्ञानाचे साधन अनित्य/पौरुषेय
ज्ञान अपौरुषेय असते हे बरोबर, पण ते ज्ञान मिळविण्याचे साधन मात्र पौरुषेय असते. 6.3.1 मध्येच दिलेल्या उदाहरणात साङ्गितल्याप्रमाणे, पाण्याचे बाष्पीभवन ही क्रिया नैसर्गिक म्हणजेच अपौरुषेय आहे हे निश्चित, पण ह्या क्रियेचे आकलन होण्यासाठी जी साधने निर्माण होतात (उदा० वैज्ञानिक सिद्धान्तांची पुस्तके, रासायनिक प्रयोगशाळा, प्रायोगिक उपकरणे इ०) ती सर्व निःसंशयपणे पौरुसेय असून अनित्य असतात. त्याचप्रमाणे या विश्वाच्या अस्तित्वाबद्दल अथवा परमेश्वराच्या स्वरूपाबद्दल सत्यज्ञान करून देणारे साधनरूपी वेद हे देखील अनित्य किंवा पौरुषेय आहेत.
शिवाय ज्ञानप्राप्तीसाठी एकच साधन नसून, अनेक साधने असतात. म्हणजेच, ज्या ज्या म्हणून साधनांनी ते विशिष्ट ज्ञान निःसन्देहपणे मिळते त्या त्या प्रतेक साधनाचे महत्त्व तेवढेच असते. त्यामुळे जर त्यांतील एखाद्या साधनास अपौरुषेय वा नित्य मानले तर इतर सर्व साधनांसही तोच दर्जा द्यावयास पाहिजे. या न्यायाने जर वेद अपौरुषेय असतील तर वेदांखेरीज परमेश्वराचे सत्यज्ञान करून देणारे इतर जे कोणते वाङ्मय वा शब्द आहेत ते सर्व नित्य वा अपौरुषेय होतील.
आता, वेदांखेरीज सत्यज्ञानप्रतिपादक असे इतर काहीच नाही असेही अनेकांचे मत आहे, पण हे मत मात्र सङ्कुचित मनोवृत्तीचे निदर्शक असून अशा अप्रगल्भ दृष्टीला परमेश्वराचेच नव्हे तर जीवसृष्टीचेही नेमके ज्ञान होण्याची शक्यता नाही.

6.3.2 वेदांना निर्माता नाही
7.4.2 वेदांचा निर्माता ‘माहीत’ नाही
एखाद्या वाङ्मयाचा निर्माता माहीत नसण्याने जर ते वाङ्मय मानवनिर्मित नसून अपौरुषेय मानता येत असेल तर या जगातील शम्भराहून अधिक देशांमधील सहस्रावधी पुस्तकांतील माहिती/ज्ञान अपौरुषेय मानावे लागेल.
(या न्यायाने लोकपरम्परेतून आलेले सम्पूर्ण जानपद साहित्य अपौरुषेय मानावे लागेल कारण त्या साहित्याचा रचयिता कुणालाही माहीत नाही अथवा निदानपक्षी ते साहित्य कोणत्या ठिकाणी वा काळात रचले गेले हेही निश्चितपणे साङ्गण्याचे धार्ष्ट्य कुणी विद्वान दाखवेल असे शक्य वाटत नाही.)
याही पलीकडे जाऊन, ‘वेदांना निर्माता नाही’ ही गोष्ट चुकीची असून ‘वेदांच्या निर्मात्याबद्दल माहिती उपलब्ध नाही’ ही खरी गोष्ट असल्याचे वेदांच्या अपौरुषेयत्वाचे प्रतिवादी मानतात. वेदांचे रचयिते ऋषी हे सत्यज्ञानाने समृद्ध असल्यामुळे वेदांद्वारे मिळालेले ज्ञानच तेवढे पुढील पिढ्यांपर्यन्त पोहोचवण्याची त्यांची इच्छा होती, व हे ज्ञान स्वनिर्मित नसून त्यावर स्वतःच्या स्वमित्वाची मोहोर उमटविण्याची आवश्यकता त्यांना भासली नाही, म्हणून त्या ऋषींबद्दलची माहिती आपल्याला उपलब्ध होत नाही असे मानले जाते.
शिवाय इतर कुणाला या निर्मात्यांविषयी माहीत असून त्याने ती महिती जरी नोन्दवून ठेवली असेल, तरीही वेद इतक्या प्राचीन काळी रचले गेले की काळाच्या ओघात ती माहिती नष्ट झाली असण्याचीही शक्यता नकारता येत नाही.

6.3.3 वेदांचा प्रतिपाद्य विषय आणि त्याचे अपौरुषेयत्व
7.4.3 परमेश्वर-प्रतिपादकत्वाचा प्रतिवाद
‘सृष्टिनिर्माता ईश्वर हा वेदांचा प्रतिपाद्य विषय असून तो अपौरुषेय असल्यामुळे वेद अपौरुषेय आहेत’ या मताच्या प्रतिवादाचे दोन भाग पडतात. ते दोन्ही भाग असे -
7.4.3.1 वेदांचा प्रतिपाद्य विषय केवळ परमेश्वर नाही
वेदांचा प्रतिपाद्य विषय केवळ ‘परमेश्वर’ एवढाच नसून वेद हे समग्र मानवी जीवनाबद्दल भाष्य करण्याचा प्रयत्न करतात असे मानण्यास वाव आहे. अन्यथा ज्याप्रमाणे वेदान्त तत्त्वज्ञानात केवळ आध्यात्मिक (म्हणजे परब्रह्म परामात्मा जीवात्मा यांविषयीच) चर्चा प्रामुख्याने व जीवनाच्या इतर अङ्गांची चर्चा ही केवळ आनुषङ्गिक दिसते, तसेच वेदांमध्येही दिसले असते. पण वेदांमध्ये वेगळा प्रकार दिसतो. किम्बहुना नन्तरची तत्त्वज्ञाने जेवढे म्हणून निवृत्तीचे महत्त्व साङ्गतात त्याच्याहून अधिक प्रमाणात वेद मनुष्याला प्रवृत्तीप्रत घेऊन जाण्याच्या प्रयत्नात दिसतात.
परमेश्वरासम्बन्धीचे चिन्तन, सृष्टीनिर्मितीची जिज्ञासा, या सर्व आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टी असल्या तरीही केवळ तेवढ्यानेच आयुष्य सफल होत नसल्याची निश्चित जाणीव वेदरचयित्या ऋषींना असल्याचे पदोपदी लक्षात येते. अन्यथा विविध सूक्तांमध्ये ते ते ऋषी केवळ आपल्या आराध्य देवतेचे स्तवन करून वा स्वरूप वर्णन करून गप्प बसले असते, पुत्र-पौत्र-धन-धान्य-हत्ती-घोडे-सैनिक-ऐश्वर्याभिवृद्धी वगैरेंची मागणी स्वतःकरिता सुद्धा केली नसती.
बरे, वेदांत जिथे स्तुतिप्रामुख्य दिसते तिथेही अनेकवेळा त्या स्तुतीमागे काही विशिष्ट भौतिक-आधिभौतिक फळाचीही अपेक्षा स्पष्टपणे दिसते.
यशिवाय अन्य भौतिक शास्त्रांविषयीही चर्चा वेदमन्त्रांमधून अनेकवेळा दिसते. त्या त्या ठिकाणी त्यांचे प्रयोजन काय असावे याबद्दल सविस्तर चर्चा वरील लेखनखण्ड क्र 3.1, 3.2, 3.3 मध्ये केलेलीच आहे. असे असताना वेद केवळ परमेश्वर प्रतिपादक आहेत हे विधानच चुकीचे ठरते व त्यामुळे वेदांच्या अपौरुषेयत्वाला बाध येतो.

7.4.3.2 विषयाचे अपौरुषेयत्व प्रतिपादनाचे नाही
वेद ईश्वरप्रतिपादक आहेत असे जरी मान्य केले तरी ईश्वराचे अपौरुषेयत्व वेदांना लागू होत नाही.
एखाद्या विषयावर काही चर्चा चालू असेल तर त्या चर्चेचे स्वरूपही विषयासारखेच आहे असे म्हणता येणार नाही. उदा० सङ्गीत हे अत्यन्त मनोरञ्जक असते म्हणून सङ्गीतशास्त्र देखील तितकेच मनोरञ्जक असेल असे म्हणता येणार नाही. तसेच, काही विशिष्ट प्रकारचे शरीरिक रोग हे किळसवाणे आहेत म्हणून त्यांचे निर्मूलन करण्यासम्बन्धीची चर्चादेखील किळसवाणीच आहे असे म्हणता येणार नाही.
आता, परमेश्वरासम्बन्धीच्या चर्चेला आपोआपच एक दिव्यत्वाचे वलय प्राप्त होते, तरी ती चर्चा परमेश्वरस्वरूपच आहे असे मानण्याने ‘चर्चा करणे’ म्हणजेच ‘परमेश्वरास जाणणे’ असा गैरसमज होऊन चर्चेच्या मूळ हेतूलाच बाध येऊ शकतो. त्याचप्रमाणे, परमेश्वर-प्रतिपादक वेद देखील परमेश्वरा इतकेच अपौरुषेय आहेत असे मानल्याने निव्वळ वेदपठन करणेदेखील परमेश्वराला जाणण्या सारखेच आहे अशी धारणा होऊ शकते आणि हळू हळू वेदांच्या मूळ हेतूलाच बाधा येऊ शकते.

6.3.4 ऋषींना वेद दिसले
7.4.4 ज्ञानचक्षूंना दिसणे हे अपौरुषेयत्वाचे लक्षण नाही
वेद हे वैदिक ऋषींच्या प्रज्ञाचक्षूंपुढे प्रकट झाले आणि मग त्यांनी ते आपल्या वाणीद्वारे इतरांपुढे प्रकट केले हे जर खरे असेल तर, ‘ऋषींच्या प्रज्ञाचक्षूंपुढे वेदांच्या प्रकट होण्याची प्रक्रिया’ एवढाच भाग केवळ अपौरुषेय होता व त्यापुढील (म्हणजे त्यांनी ते अनुभव त्यांच्या वाणीद्वारे प्रकट करणे इ०) सर्व भाग निश्चितपणे पौरुषेय म्हणजेच मनुष्यकृत होता असे म्हणावे लागेल.
याही पुढचा एक सिद्धान्त म्हणजे एखादी गोष्ट आपल्या चर्मचक्षूंना न दिसता ज्ञानचक्षूंना दिसली म्हणजे ती गोष्ट अपौरुषेय असते असेही म्हणता येणार नाही.
उदा० आधुनिक काळातील प्रणयगीते लिहिणाऱ्या गीतकाराला त्या गीतातील नायक-नायिका प्रत्यक्ष शृङ्गार करताना ज्ञानचक्षूंपुढे दिसत असतात, तेव्हांच त्याचे वर्णन वास्तवदर्शी होते. मग अशा अवस्थेत लिहिलेली गीते अपौरुषेय मानायची का ? (वेदांतही काही सूक्ते प्रणय विषय हाताळणारी आहेत हे वास्तव दुर्लक्षिण्याजोगे नाही.)

6.3.5 शब्दनित्यत्व - वेदनित्यत्व – अपौरुषेयत्व
7.4.5 शब्दनित्यत्व – वेदनित्यत्व सन्देहास्पद
मुळात शब्दनित्यत्वाबद्दलच वाद-प्रतिवाद आहेत आणि अगदी प्राचीन काळातीलही सर्व तत्वज्ञांना शब्दांचे नित्यत्व मान्य होते असे नव्हे. तरीही, ‘शब्द नित्य असतात’ असे मान्य केल्यास, निव्वळ वेदच नव्हे, तर, शब्दांतून व्यक्त झालेले जे जे काही आहे ते ते सगळे नित्य असले पाहिजे.
महाकवि कालिदास चोवीस तास एका हातात कागद-दौत-लेखणी घेऊनच दिवसाचे सर्व व्यवहार करत होता असे मानणे मूर्खपणाचे ठरेल. त्यामुळे कालिदासाने जी जी म्हणून वाङ्मय निर्मिती केली ती सर्व प्राथमिक स्थितीत शब्दरूपच होती. मग शब्दरूपच असलेले वेद तेवढे नित्य आणि कालिदासाचे वाङ्मय अनित्य असे म्हणणे अन्यायकारक ठरेल.

6.3.6 धर्मप्रतिपादकत्वामुळे नित्यत्व
7.4.6 धर्मप्रतिपादकत्व सन्देहास्पद - प्रतिपादन अपौरुषेय नाही
वरील लेखनखण्ड क्र० 7.4.3 मध्ये, ‘वेद ईश्वरप्रतिपादक आहेत आणि ईश्वरप्रतिपादकतेमुळे वेदांना अपौरुषेयत्व आहे’ याचा प्रतिवाद करण्याकरिता जे मुद्दे उपस्थित केलेले आहेत, तेच मुद्दे इथेही लागू पडतात. अर्थात् असे म्हणता येईल की वेद केवळ धर्माचे नव्हे तर इतर अनेक विषयांचे प्रतिपादन करतात
आणि धर्माचे प्रतिपादन जरी ते करीत असले तरी त्यामुळे धर्माचे अपौरुषेयत्व वेदांकडे हस्तान्तरित होत नाही.
आणखीही एक मुद्दा असा आहे की ईश्वर म्हणजेच धर्म असे मानले तरच धर्म अपौरुषेय ठरतो अन्यथा धर्माला जर ईश्वराकडे जाण्याचा एक मार्ग असे मानले तर धर्मदेखील अनित्य म्हणजे पौरुषेयच ठरतो. मग अशा अनित्य धर्माचे प्रतिपादन करणाऱ्या वेदांच्या अपौरुषेयत्वाचा प्रश्नच थेट निकालात निघतो.

6.3.7 परमेश्वर-निश्वासरूपी वेद
7.4.7 परमेश्वराचे निश्वास काल्पनिक
परमेश्वराचे निश्वास ही केवळ एक कविकल्पना असू शकते, फार तर फार तिला ऋषिकल्पना म्हणता येईल.
श्वास-निश्वासादि क्रिया ह्या आपल्यासारख्या मर्त्य जीवांना कराव्या लागतात. परमेश्वर अनादि-अनन्त आहे हे मान्य केले, की त्याला श्वास निश्वास वगैरे क्रिया कराव्या लागत नाहीत हेही मान्य करावे लागते. परमेश्वर निश्वास करीत नाही म्हटल्यावर ‘परमेश्वर-निश्वास-रूपी-वेदांचा’ अक्खा सिद्धान्त खोटा ठरतो.
बरे, ईश्वर निर्गुण-निराकार असल्याचे खुद्द वेदांतच काही ठिकाणी म्हटलेले आहे. त्यामुळे ईश्वर श्वास निश्वास वगैरे करतो असे म्हटले तर वेदांच्याच तत्वाज्ञानाला छेद दिल्यासरखे होईल.

6.3.8 परमेश्वराचे रूप वेद
7.4.8 परमेश्वराला रूप नाही
वर साङ्गितल्याप्रमाणे परमेश्वर निर्गुण-निराकार असून त्याला कोणतेही रूप नसल्याचे वेदच ठिकठिकाणी म्हणतात. ते खरे मानले तर वेद हे परमेश्वराचे रूप असणे शक्य नाही.
ईश्वरजिज्ञासू असलेल्या ऋषींना प्रज्ञाचक्षूंद्वारे झालेली ईश्वराची दिव्य जाणीव म्हणजे वेद हे मान्य करता येईल. पण मग त्याचप्रमाणे पुढच्या चार-साडेचार हजार वर्षांमध्ये इतर अनेक जणांना तशीच दिव्य जाणीव झालेली असून त्यांनीही अनेक प्रकारे आपले अनुभव व्यक्त केलेले आहेत. कुणी वाङ्मय रचलेले आहे तर कुणी काही मन्दिरे बान्धलीत तर अणखी कुणी मूर्ती घडवल्यात. वेदांप्रमाणे या सर्व वस्तूंना मग अपौरुषेय म्हणावे लागेल. ईश्वराने ही सृष्टीच एका दिव्यस्फूर्तीने निर्माण केली असे मानले तर हे अक्खे चराचर अपौरुषेय ठरेल !

6.3.9 वेदांचे पूर्णत्व – अक्षतत्व
7.4.9 वेदांचे पूर्णत्व - अक्षतत्व - निर्दोषत्व सन्देहास्पद
वेद रचल्या रचल्या लगेच कुणीतरी पाटी पेन्सिल घेऊन लिहून काढले असे मान्य करता येत नाही. तसे मान्य केले तर त्याचा अर्थ होतो की ‘आपल्या गुरुजींच्या दिव्यस्फूर्ती व ईश्वरदर्शन होण्याच्या वेळा कोणत्या’ याचे जपानच्या रेल्वेप्रमाणे काटेकोर वेळापत्रक त्यांच्या शिष्यांना माहीत होते. मग हा उत्स्फूर्ततेच सारा सिद्धान्त गळून पडतो.
वेद निव्वळ मौखिक परम्परेने बराच काळ एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे येत राहिले आणि पुढे मागे केव्हांतरी कुणी व्यक्तींनी विकारभयास्तव किंवा विनाशभयास्तव ते लिहून काढले. व्यासांनी सखोल अभ्यासातून वेदांचे विषयवार विभाग केल्याची चर्चा आपण केलेलीच आहे.
मौखिकपरम्परेतून जास्तीत जास्त अक्षय्यपणे टिकलेले वाङ्मय वेदच आहे हेही मान्य करावयास हरकत नाही, पण या मौखिक परम्परेत वेदांच्या अगदी नगण्यदेखील भागाचा लोप झालेला नाही असे मानणे धाडसाचे ठरेल. आज आपल्यापुढे संहितारूपी जे आहेत तेच आणि तेवढेच मन्त्र अडीच हजार वर्षांपूर्वी यास्काचार्यापुढे होते किंव त्याही पूर्वी वेदांचे सङ्कलन करणाऱ्या व्यासाचार्यांपुढे होते असे आपण छातीठोकपणे साङ्गू शकत नाही. त्यामुळे वेद अक्षत वा सम्पूर्ण आहेत असे मानणे चुकीचे ठरेल.
‘वेद निर्दोष आहेत का नाहीत’ वगैरे समीक्षा निदान आता तरी कुणीही करू शकत नाही, कारण तशी समीक्षा करणारे विद्वान स्वतः तेवढेच समर्थ असावे लागतील. आधुनिक काळात जिथे अभिजात संस्कृताची समीक्ष करताना नाकी नऊ येतात तिथे वेदांची समीक्षा कशी करणार ?
वैदिक संस्कृत भाषा दोन सहस्रकांपूर्वी नाहीशी झाली. शिवाय वेद अपौरुषेय नाहीत म्हणणारी मण्डळी त्यांतील विषय गहन, गूढ आणि काही वेळा अत्यन्त दुर्गम असल्याचे अमान्य करीत नाहीत. त्यामुळे वेदांच्या सदोष-निर्दोषत्वाबद्दल बोलू नव्हे हेच शहाणपण.

6.3.10 संस्कृत भाषेत असल्यामुळे वेद अपौरुषेय
7.4.10 संस्कृतभाषेबद्दलचे समज
‘संस्कृत ही देवांची भाषा’ असे म्हटले जाते. ‘हे देव कोण व किती होते किंवा आहेत ?’ असे विचारल्यास, सूर्य-अग्नी-वायु-वरुण इ० असल्याचे साङ्गितले जाते. ही सर्व खरे म्हणजे नैसर्गिक तत्त्वे आहेत त्यामुळे त्यांचा एकमेकांशी संवाद होतो हे (म्हणजे सूर्यकिरणांमुळे समुद्रातील पाण्याचे बाष्प होते, इ०) मान्य केले तरीही तो संवाद मानवांसारखा मौखिक भाषेतून होतो हे मान्य करता येत नाही.
काही जण, ‘देव म्हणजे ब्रह्मा, विष्णू , महेश, पार्वती, लक्ष्मी, गणेश, इ०’ असे म्हणतात. या देवांच्यात पती-पत्नी-पिता-पुत्र अशी नाती आहेत. म्हणजे यांना जन्म आहे, आणि वैदिक तत्त्वज्ञानानुसार, ज्यांना जन्म आहे त्यांना मृत्यूही आहे, म्हणजे हे देव म्हणून जे कुणी आहेत ते प्रत्यक्ष मर्त्य आहेत. संस्कृत ही जर मर्त्य मण्डळींची भाषा असेल तर ती इतर भाषांपेक्षा सैद्धान्तिक दृष्टीने श्रेष्ठ ठरत नाही. त्यामुळे या भाषेतले वाङ्मय निव्वळ ‘या भाषेतले’ आहे एवढ्या निकषावर अपौरुषेय ठरत नाही.
आता यावर काही मण्डळी म्हणतील की संस्कृत ही ‘ईश्वराची’ भाषा आहे. वेदांनी ‘निर्गुण-निराकार’ असे वर्णिलेला ईश्वर मानवांच्यासारख्या एखाद्या भाषेतून बोलत असेल हेही बुद्धीला पटत नाही.

लेखनखण्ड क्र० 5.2 मध्ये माण्डलेला ‘वस्तू व पदाचा औत्पत्तिक सम्बन्ध दर्शविणारी संस्कृत ही जगातील एकमेव भाषा’ असल्याचा सिद्धान्त केवळ बाळबोध आहे. कोणत्याही मानवी भाषेची उत्पत्ती ही काही विशिष्ट सिद्धान्तांनुसारच होत असते आणि त्या सिद्धान्तांना अपवाद असलेली एकही भाषा या जगात दिसत नाही. ज्याप्रमाणे जगातील सर्व माणसे श्वास-निश्वास, खाणे-पिणे, बघणे, ऐकणे, स्पर्श करणे, झोपणे, मैथुन करणे, या क्रिया एकसारख्याच करतात त्याचप्रमाणे बोलण्याचीही क्रिया सर्व माणसे एकसारखीच करतात. त्यामुळे बोलण्याकरिता लगणारे साधन म्हणून निर्माण झालेली भाषा ही सारखीच असते. स्थल-कालपरत्वे भिन्न समाजांच्या गरजांनुसार त्या त्या भाषांची काही प्रादेशिक वैशिष्ट्ये असतील परन्तु ‘सैद्धान्तिकदृष्ट्याच आमची भाषा भिन्न व श्रेष्ठ आहे’ असे कुणी म्हटल्यास ते सत्य नसून केवळ मातृभाषाभक्तिजन्य विधान आहे असेच समजावे. त्यामुळे भाषाविज्ञानाच्या सिद्धान्तांच्या निकषांवर, संस्कृत ही काही जगातील एकमेवाद्वितीय भाषा नाही, आणि म्हणून वेद हे केवळ ‘संस्कृतात आहेत’ एवढ्या कारणास्तव विशेष नाहीत.

(8) वेदांच्या अपौरुषेयत्वाचे महत्त्व

वेद अपौरुषेय आहेत व ते तसे नहीत अशी दोन्ही प्रकारची मते आणि त्या मतांना पुष्टी देणारे वा खण्डन करणरे वाद-प्रतिवाद आपण पाहिले. एवढा ऊहपोह होण्याइतके ह्या विषयाचे खरोखरच महत्त्व आहे का अशी शङ्का माझ्या मनात आल्याशिवाय राहिली नाही. वेदांना अपौरुषेय किंव पौरुषेय मानल्याने आपल्या वेदांबद्दलच्या आकलनात काय फरक पडतो हे जाणून घेणे महत्त्वाचे वाटले. म्हणून हा अपौरुषेयत्वाचा सिद्धान्त इतका महत्त्वाचा का ठरतो तेही आपण आता पाहू .

वेदांसारख्या वाङ्मयास अपौरुषेय किंवा ईश्वरप्रणीत मानण्याची परम्परा ही जगात सर्वत्र दिसते. क्रिस्ती धर्मात बायबलातील दशादेशांना ( 10 commandments) अपौरुषेय मानले जाते. इस्लामसुद्धा कुर्आन् हे लिखित-रचित नसून ईश्वराकडून मुहम्म्दांवर अवतीर्ण झाल्याचे मानते.
यामागे, आपल्या शास्त्राला किंवा विचारांना लोकांची सम्पूर्ण आणि निःसंशय स्वीकृती मिळावी हा प्रमुख हेतू दिसून येतो. शिवाय बऱ्याचवेळी अशा शास्त्राचे कर्ते अज्ञात असतात. त्यामुळे या शास्त्राचे कर्तृपद साहजिकच ईश्वराकडे जाते किंवा असे शास्त्र आपोआप अपौरुषेय ठरते.

सर्वसाधारणपणे, वेदांना अपौरुषेय मानल्याने अथवा न मानल्याने वेदांच्या आकलनात काही विशेष फरक पडत नाही. पण तरीही, काही दार्शनिकांचे मत असे आहे की वेदांना त्यांच्या अपौरुषेयत्वामुळेच प्रामाण्य आहे आणि म्हणून जगात अत्यन्त मानाचे स्थान आहे.
अर्थात् वेदप्रामाण्य न मानणाऱ्या दर्शनिकांचे मत नेमके उलट आहे. त्यांच्या मते, वेदांना अपौरुषेय मानल्यामुळे वेदांचे अवास्तव महत्त्व वाढले, यज्ञकाण्डाचे अनावश्यक स्तोम माजले आणि मनुष्याने मिथ्या विचारात आपले सत्त्व गमावले.

वेदांना अपौरुषेय मानल्यामुळेच त्या वाङ्मयाचे जे काही आहे ते शुद्धत्व टिकले आहे. अन्यथा अन्य वाङ्मयात जितक्या प्रमाणात विकार उत्पन्न झाले तेवढे वेदांतही झाले असते. अत्यन्त प्रज्ञावन्त पण तितकेच वक्रबुद्धी असलेल्या लोकांनी स्वतःच्या मनाप्रमाणे वेदवाङ्मयात भर घातली असती किंवा बदल केला असता आणि वेद आपल्यापर्यन्त आज आहे त्या स्वरूपात पोहोचले नसते. वेदांचे रक्षण मौखिक परम्परेतून केल्याबद्दल भारतीय गुरु शिष्य परम्परेचा जो गौरव होताना दिसतो तो झाला नसता.

शब्दनित्यत्वासारखा सिद्धान्त वेदांच्या अपौरुषेयत्वाच्या कल्पनेमुळेच माण्डला गेला असे म्हटले तर वावगे ठरू नये. यास्कांच्या निरुक्ताला जगभरात भाषाशास्त्रातील आद्य ग्रन्थाचा मान मिळाला.
निरुक्ताच्या निर्मितीमागे शब्दनित्यत्वाचा म्हणजेच अप्रत्यक्षपणे वेदांच्या अपौरुषेयत्वाचाच सिद्धान्त कारणीभूत आहे. त्याचप्रमाणे वेदांतील भाषाशास्त्राचे ग्रन्थ म्हणजेच प्रातिशाख्ये, पाणिनीय अष्टाध्यायी, त्यावरील कात्यायनाची वार्तिके आणि पतञ्जलीचे महाभाष्य हे ग्रन्थराज देखील याच सिद्धान्तावर निर्माण झाले.

वेदांना अपौरुषेय मानल्याने केवळ समाजाचा फायदाच झाल असे मात्र म्हणता येत नाही. एखाद्या वाङ्मयाला दिव्यत्व आले की त्या वाङ्मयाबद्दल पावित्र्याची भावना आणि मग त्यासम्बन्धात निरनिराळे सङ्केत निर्माण होतात. अनेकदा हे सङ्केत निषेध किंव बन्धनांच्या रूपात असतात.
वेदांना अपौरुषेयत्व आले, त्यामुळेच यज्ञामध्ये वेद म्हणण्याच्या, इतकेच नव्हे तर, यज्ञाखेरीज वेदांचे निव्वळ पठन किंवा वाचन करण्याच्या अधिकारावर मर्यादा आल्या. त्यामुळे ‘वेदांचा अधिकार’ नावाची एक नवीनच सङ्कल्पना निर्माण झाली. ह्या सङ्कल्पनेचे पुढे पुढे इतके स्तोम माजले की त्यावरून समाजामध्ये निरनिराळे गट तयार झाले. या गटांचे रूपान्तर नन्तरच्या काळात सम्प्रदाय आणि जातींमध्ये झाले असे म्हणता येते.
(‘समाजात जाती निर्माण होण्याचे हे एकच कारण होते’ असा मात्र याचा अर्थ नाही पण जातीजातींमधील भेदाच्या आगीला इन्धन पुरवण्याचे काम ‘वेदाधिकार’ या सङ्कल्पनेने नक्कीच केल्याचे दिसते.)

त्याचप्रमाणे ‘दिव्य’ वेदांच्या उपायोजनावरही बन्धने आली. वेद हे प्रमुख्याने यज्ञाविधीमध्ये व ईश्वरोपासनेपुरते मर्यादित राहिले. त्यातून वेदांतील शास्त्रीय विषयांची मीमांसा होण्यावर बन्धने आली.
पुढे पुढे जसजशी यज्ञसंस्थेला उतरती कळा लागली तसतसे वेदाध्ययनालाही मर्यादा पडल्या.

पाश्चात्य विद्वानांचा वेदांकडे पाहाण्याचा दृष्टीकोन कितीही पूर्वग्रहदूषित वा एकाङ्गी असो पण त्यांच्या वेदांतील स्वारस्यामुळे वेदाध्ययनावरची ही अप्रस्तव्य बन्धने काही प्रमाणात दूर झाली हे अमान्य करून चालणार नाही.

पुढे विसाव्या शतकात, दयानन्द सरस्वती, योगी अरविन्द (ओरोबिन्दो घोष), आदींनी, ‘वेदाचा अधिकार हा प्रत्येक मनुष्यास आहे’ असे प्रतिपादन केल्यामुळे वेदांच्या अभ्यासास आणखी चालना मिळाली.
(एक विरोधाभास मात्र नमूद केला पाहिजे : वेदांच्या अपौरुषेयत्वामुळे त्यांच्या अध्ययनावर बन्धने आल्याचे वर म्हटलेले आहे. परन्तु वेदांचा अधिकार सर्व मनुष्यांस आहे असे प्रतिपादन करताना दयानन्द सरस्वती वेदांच्या अपौरुषेयत्वाचाच दाखला देतात. त्यांच्या मते ‘वेद हे ज्या ईश्वराचे रूप आहे त्याच ईश्वराने निर्माण केलेल्या सृष्टीतील दोन व्यक्तींपैकी एकाचा वेदांवर जन्मजात अधिकार आहे आणि दुसऱ्याचा नाही हे अशक्य आहे’.)

(9) उपसंहार

प्रकल्पाच्या सुरुवातीच्या भूमिकेत म्हटल्याप्रमाणे येथे वेदांच्या अपौरुषेयत्वावर निर्णय करण्याचा हेतू नसून केवळ हा सिद्धान्त आणि त्याचे महत्त्व समजून घेणे एवढाच हेतू आहे. वरील चर्चेतून हा हेतू काही अंशी जरी पूर्ण झाला तरीही माझे यश आहे असे समजता येईल.
वेद अपौरुषेय आहेत व ते तसे नाहीत अशी दोन्ही मते व त्यांच्या त्यांच्या पुष्ट्यर्थ वेगवेगळ्या सिद्धान्तांचा शक्य तितका आढावा जरी वरील चर्चेत घेण्याचा प्रयत्न केला असला तरी अनेक मुद्दे अभ्यासात न आल्यामुळे ही चर्चा अपूर्ण असण्याची शक्यता दाट आहे. त्यामुळे जिज्ञासू मण्डळींकडून या विषयावर अधिक माहिती मिळाल्यास माझ्या ज्ञानात नक्की वाढ होईल असे वाटते.

वेदांच्या अपौरुषेयत्वाच्या चर्चेत न जाताही त्यांचा जर अभ्यास केला आणि वेद समजून घ्यायचा प्रयत्न झाला तर त्याने आपल्याला अधिक उपयोग होईल असे वाटते. आधी म्हटल्याप्रमाणे वेदाध्ययनावर अपौरुषेयत्वाचा विशेष परिणाम होत नाही. त्यामुळे वेदाध्ययन करणे त्यातील विषयांवर संशोधन करणे व त्यातून मिळालेल्या ज्ञानाचा आपल्या वैयक्तिक व सार्वजनिक विकासासाठी उपयोग करणे ही काळाची खरी गरज आहे.

तरीही ‘वेदांचे अपौरुषेयत्व’ ही अगदीच निरर्थक चर्चा नक्कीच नाही. त्याच चर्चेचा अनेक भाषाशास्त्रीय सिद्धान्तांसाठी उपयोग झालेला आहे हेही आपण पाहिले. त्यामुळे एका मर्यादेपर्यन्त ही चर्चा सार्थकी देखील लावता येईल हेही तितकेच खरे.

।। लेखनसीमा ।।

क्या बात् है

क्या बात् है सौरभ !!
अर्धे वाचले .. उर्वरित नक्की वाचेन.

(एक अवांतर शंका: ब्राह्मणात यजुर्वेदी, ऋग्वेदी ब्राह्मण आढळतात. हे वर्गिकरण कोणत्या आधारावर ? अन सामवेदी अथर्ववेदी ब्राह्मण का नाही आढळत ?)

+१

असेच म्हणतो - क्या बात है. अजून वाचतो आहे.

(प्रतिक्रियांच्या चौकटीत लेख लिहिणे नाविन्यपूर्ण आहे.)

प्रशंसेबद्दल धन्यवाद.

प्रशंसेबद्दल धन्यवाद.

आनंदयात्री यांच्या शंकेबद्दल मला जेवढं माहित्ये तेवढं सांगतो-
वेद हे प्रचंड वाङ्मय असल्यामुळे अक्ख्या ४ वेदांचा थोडथोडा अभ्यास करण्यापेक्षा एकाच वेदाचा सखोल अभ्यास करण्याची प्रथा पडली असावी. याचा अर्थ बाकीच्या ३ वेदांचा फक्त प्राथमिक अभ्यास करून एखाद्या वेदावर मात्र सखोल चिन्तन वगैरे करायचं.
(म्हणजे १२वी सायन्स नन्तर मेडिकलला प्रवेश घेऊन आधी जनरल MBBS ची पदवी मिळवायची आणि नन्तर दन्तचिकित्सा, हृद्रोग, अस्थिरोग, इ० पैकी एकात स्पेश्यलायजेशन करायचं...असाच काहीसा प्रकार).
मग जे ऋग्वेदाचा सखोल अभ्यास करायचे ते स्वतःला ऋग्वेदी म्हणत, त्याचप्रमणे यजुर्वेदी, सामवेदी आणि अथर्ववेदी. म्हणजेच 'ऋग्वेदी' याचा अर्थ ऋग्वेदाचा किंवा त्यासम्बन्धी एखाद्या शास्त्राचा अभ्यास करणारा.
पण पुढे पुढे कर्मवाचक शब्द आपोआप जातिवाचक झाले. त्यामुळे ऋग्वेदाचा अभ्यास करणार्‍या एखाद्या पंडिताची पोरे-नातवंडे-पंतवंडे, वेदाचा अभ्यास करोत अथवा न करोत, पण स्वत:ला ऋग्वेदी नक्की म्हणवून घेत.

आता तुम्ही जर वरील लेखनखण्ड क्र. ३.२.१ - ३.२.४ वाचलेत तर हे लक्षात येईल की मुळात वेदांचाच वापर सर्वसामान्य व्यवहारातून बाद होऊन निव्वळ यज्ञयागादि क्रियांपुरता मर्यादित झाला. आणि यज्ञात सुद्धा साधारणपणे ऋग्वेद आणि यजुर्वेद यांचेच प्रामुख्य राहिले, कारण सामवेदाचे गायन केवळ विशिष्ट यज्ञात (सोमयज्ञ) व्हायचे आणि अथर्ववेदाचे मन्त्र तर केवळ यज्ञविधीतील चुका सुधरण्याकरिता केले जायचे. त्यामुळे आपोआप सामवेद आणि यजुर्वेदाच्या अभ्यासकांना एका प्रकारचे दुयाम महत्त्व आले आणि त्यांचा scope मर्यादित झाला. म्हणून त्या शाखांचे लोक मुळातच कमी. सध्या तर ते खूपच कमी आहेत. (अज्जिबात नहीत असे नाही, पण हाताच्या बोटांवर मोजता येतील इतपतच)

काय करू ?

धनंजय, +१ करिता थ्याङ्क्यू........:):):):)
'प्रतिक्रियांच्या चौकटीत लेख लिहिणे नाविन्यपूर्ण आहे' असं तुम्ही म्हणता, पण ही खरं म्हणजे प्रशंसनीय गोष्ट नाही, असे मला स्वत:ला वाटते. प्रतिक्रियांच्या चौकटीत लिहिल्यामुळे, लेख इतका लांबडा झालाय.....बघा, तुमच्या सारख्या व्युत्पन्नाला देखील अक्खा वाचायला इतका वेळ लागतोय !
काय गम्मत ए, की आपला लेख जर वेगवेगळ्या भागांत लिहायचा असेल तर त्याचे पुढील भाग प्रतिसादात न लिहिता पान क्र.१, पान क्र. २ असे कसे लिहायचे तेच मला ठाऊक नाही.
जरा सांगा नं....

मत विचारार्ह

चंद्रशेखर यांनी सूर्यसिद्धान्त या ग्रन्थाबाबत जे मत मांडले आहे ते विचार करण्याजोगे नक्कीच आहे. आपल्या ग्रन्थाला ईश्वरनिर्मित म्हटले की त्याला एका प्रकारचे अधिकारपद मिळते. मग ग्रन्थात व्यक्त झालेल्या विचारांवर शंका घेणे म्हणजे इश्वरावरच शंका घेण्यासारखे होते आणि बहुतेक विद्वन हा असला धोका टाळतात. शिवाय त्यातून ग्रन्थाची फुकटमध्ये प्रसिद्धीही होते.

पण वेदांचे स्वरूप जरासे वेगळे आहे. एकतर ग्रन्थ म्हणून आपल्यासमोर जे वेद अहेत त्यांचे रचयिते १-२ नसून अक्षरशः शेकडो आहेत. निव्वळ संहिता मन्त्रांचा जरी विचार केला तर त्यांच्या ऋषी-ऋषीणींची संख्या तीन-साडेतीनशेच्या वर जाते. आणि वेदमन्त्रंत व्यक्त झलेले विचार पाहिले तर ही सर्व ऋषी-मुनि-मंडळी अत्यन्त तर्कसंगत विचार करणारी होती. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी आपापल्या रचना एकत्र करून मग वेद नावाचा ग्रन्थ निर्मिला असा प्रकारच नव्हता. त्यामुळे त्यांनी वेदांना अपौरुषेयत्व बहाल केले असे म्हणता येणार नाही.

पण नन्तरच्या काही मंडळींनी हे केले असण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यात अगदी व्यास-यास्क-पाणिनि-जैमिनि-कपिल-शंकराचार्य वगैरे सगळे येतील. म्हण्जे वेद जर खरोखर अपौरुषेय नसतील तर या मंडळींनी सैद्धन्तिक दृष्टीने खरोखर एक मोठी चूक केली असे म्हणावे लगेल.

वेद हे पौरुषेयच!

कसली चूक आणि काय......बर्याच ऋषींनी कविता रचल्या, नंतर त्यांचे फॉर्मलायझेशन झाले. शेवटी रचयिते हे सर्व माणूसच होते. वेदांचे प्राचीनत्व वादातीत आहे आणि त्यातील विचारांची प्रगल्भता देखील. पण हे सोडल्यास बाकी लेबले त्याला लावणे सर्वथा चूक आहे.

दुष्टारी पुरता भारी | अवतरला गॉथम शहरी|
वाल्गुदेय हा निर्धारी| विदूषका जाण पां||

 
^ वर