... तरी तुम्ही बोला मराठी

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/5490355.cms

आजच्या महाराष्ट्र टाईम्स मध्ये आलेली ही बातमी वाचण्यासारखी आहे. काही बातम्या त्यांच्या संकेतस्थळावर नंतर वाचायला मिळत नाहीत म्हणून काही भाग कॉपी पेस्ट करून देत आहे...
_____

च्यायला, आयला नाही... अरेच्चा!

मसुदा समितीने सुचवलेल्या शिफारसी मंजूर झाल्यास महाराष्ट्रातील लोकांना बोलतानाही थोडे सावध रहावे लागेल. बोली भाषेतील शब्द, वाक्प्रचार आदींच्या वापराने सार्वजनिक जीवनात संघर्ष होऊ नये, यासाठी काही शब्द वापरू नये, असे सांगत, समितीने त्याऐवजी कुठले शब्द वापरा, हेही सांगितले आहे. टाळता येणाऱ्या शब्दांची माहिती शिक्षक, पत्रकार, साहित्यिक, कलावंत, राजकीय नेते यांना असावी, यासाठी सूची तयार करण्याची शिफारसही समितीने केली आहे.

कुठल्या शब्दाऐवजी कुठला शब्द

च्यायला, आयला : अरेच्चा, धेडगुजरी : संमिश्र वा संकरित, चांभारचौकशी : नसत्या चौकशा, वेश्या : देहविक्रय करणारी व्यक्ती, बुद्दू : मुर्ख, गावंढळ, खेडवळ : ग्रामीण, खेडूत बाटगा : धर्मांतरीत, खेळखंडोबा : विचका, मलपृष्ठ :मूलपृष्ठ किंवा नवीन शब्द तयार करणे.

_____

प्रथम मला हे काय आहे आणि वर दिलेले शब्द कोणाला का खटकावेत हेच कळले नाही. लक्षपूर्वक वाचल्यावर त्यामागची मेख कळली. अशा शब्दांमुळे आपली जात, राज्य, धर्म, देव यांचा अपमान होतो आहे असे कोणाला वाटावे ही बाब मराठी भाषेच्या द्रुष्टीने नामुष्कीची गोष्ट आहे.
नेहमीच्या वापरातले अर्थपूर्ण शब्द असे नियम करून काढता येतील का?
मराठी भाषिक हे शब्द वापरणे बंद करायला तयार आहेत का?
अशा स्वरूपाचा कायदा सरकार करणार आहे का? असला तर त्याची अंमलबजावणी कशी करणार? या प्रश्नांची उत्तरे माझ्याजवळ नाहीत.

संतसाहित्यातही कैकवेळा येणारा वेश्या हा शब्द अजून चांगलाच वापरात आहे आणि त्याला सुचविलेल्या पर्यायात काही दम नाही हे कोणीही सांगू शकेल. तुकारामाच्या गाथेतील ही काही उदाहरणे...
* तुका ह्मणे वेश्या सांगे सवासिणी । इतर पूजनीं भाव तैसा
* शूद्र चांडाळां आहे अधिकार । बाळें नारीनर आदि करोनि वेश्या ही
* वेश्या दासी मुरळी जगाची वोंवळी । ते तुज सोंवळी वाटे कैशी
* वश्या ज्याच्या नामें तारिली गणिका । अजामेळासारिखा पापरासीं

सध्याच्या वर्तमानपत्रात/ जालावर हा शब्द कितीवेळा / कुठे वापरला गेला आहे ते येथे पाहा.
http://tinyurl.com/veshyaa

बाटगा : धर्मांतरीत
हे दोन शब्द समानार्थी नाहीत. दोन्ही शब्दांना भिन्न छटा आहेत. बाटलेला यात जबरदस्तीने धर्म बदलवायला लावलेला तर धर्मांतरीत यात स्वखुषीने धर्म बदललेला असा भाव आहे. मुसलमान झालेल्याला बाटगा तर ख्रिश्चन झालेल्याला धर्मांतरीत असाही एक कोन आहे.

"धेडगुजरी" शब्दामुळे एका समाजाच्या, "चांभारचौकशी" या शब्दामुळे एका जातीच्या तर "खेळखंडोबा" या शब्दामुळे एका देवाच्या भक्तांच्या भावना अनावर झाल्या आहेत किंवा होतील असे मला वाटत नाही. मराठी माणूस इतका संकुचित विचारांचा नक्कीच नाही. आता "भटाला दिली ओसरी" किंवा "भटाचे काम, सहा महिने थांब" अशा म्हणींवरही संक्रांत येणार काय? पूर्वीच्या काळी माणसाचा परीघ हा त्याची जात/ व्यवसाय याच्या पुरताच मर्यादित होता आणि त्यामुळे मराठी भाषेचा विस्तारही त्या अंगानेच झाला आहे. शोधायला गेलो तर असे अनेक शब्द मिळतील. ज्यांची "न्युसेन्स व्हैल्यू" जास्त असेल अशी लोक एकत्र येऊन भाषाही ठरवू लागली तर मात्र मराठी भाषेची अवस्था खरेच कठीण होईल. वर दिलेल्या बातमीत शेवटी "किंवा नवीन शब्द तयार करणे" अशी मल्लिनाथी आहे. नवीन शब्द तयार करणे आणि रुळवणे हे खायचे काम नाही. नुकतेच मी कुठेतरी वाचले की सावरकरांनी सुचविलेले काही शब्द चांगले रुळले तरी अनेक शब्द मात्र प्रत्यक्ष वापरात आलेच नाहीत अथवा येऊ शकले नाहीत. मग सरकार पोलिसांच्या मदतीने हे काम करणार आहे का?

(बुद्दू , खेडवळ, मलपृष्ठ या शब्दांमुळे नक्की कोणाच्या भावना दुखावल्या जात आहेत याचा मी अभ्यास करीत आहे.)

Comments

किमान मराठी

हा मराठी शब्दांना पर्यायी मराठी शब्द कोणता वापरावा यासाठी काथ्याकुट आहे. इथे मराठीच्या वापरात कितीतरी इंग्रजी शब्द सहज प्रस्थापित झाले आहेत. त्यांना पर्यायी मराठी शब्द वापरले तर त्याचा सखाराम गटणे होतो व मराठी लोकातच उपहासास पात्र होतो.

बुद्दू , खेडवळ, मलपृष्ठ या शब्दांमुळे नक्की कोणाच्या भावना दुखावल्या जात आहेत याचा मी अभ्यास करीत आहे.

बुद्दु मुळे मतिमंद लोकांच्या भावना दुखावल्या जातील
खेडवळ मुळे ग्रामीण अस्मिता दुखावली जाईल
मलपृष्ठ कदाचित अनारोग्यकारक/अश्लिल वाटत असावा. त्याला पर्यायी गुदपृष्ठ शब्द दिला तर लईच वंगाळ दिसन ना!

ज्यांची "न्युसेन्स व्हैल्यू" जास्त असेल अशी लोक एकत्र येऊन भाषाही ठरवू लागली तर मात्र मराठी भाषेची अवस्था खरेच कठीण होईल

उपद्रवमूल्य हे अधिक प्रभावी असते.

पूर्वीच्या काळी माणसाचा परीघ हा त्याची जात/ व्यवसाय याच्या पुरताच मर्यादित होता आणि त्यामुळे मराठी भाषेचा विस्तारही त्या अंगानेच झाला आहे.

अगदी सहमत आहे.रामनगरकरांनी रामनगरी मधे न्हावगंड शब्द उच्चारला तोच अन्य जातीच्या लोकांनी वापरला असता तर अस्मिता दुखावली असती. नगर करांनी मात्र तो शब्द समाजचित्रणासाठी वापरला.
प्रकाश घाटपांडे

गंमतीदार्!

सामान्य मराठी माणसाला आपापसात बोलताना हे नविन शब्द वापरायला लागावेत (नपे़क्षा, जुने रुळलेले शब्द वापरता येउ नयेत) हे वाईट, या लेखकाच्या भावनेशी सहमत आहे.

पण हे नियम सामान्य संभाषणात लागु करणे शक्यच नाही असे वाटते. 'जाहीर मराठीत्' मात्र त्याच्या वापरावर् नियंत्रण येउ शकते. काही जातीवाचक शब्द मुद्दाम एखाद्याला हिणवण्याकरीता वापरले जात् असतील तर मात्र त्यावर अटकाव् आणणे योग्य. अन्यथा याचा 'खेळखंडोबाच' होईल् असे वाटते.

अस्सल मराठी

भाषा ही मग ती कोणतीही असो कालपरत्वे तिच्यात बदल होत आलेले आहेत आणि हेच भाषेचे स्वभाववैशिष्ट्यही आहे. दंडूकेशाहीने भाषा बदलायचे प्रयत्न करणाऱ्यांना मात्र प्रत्येकवेळी तोंडघशी पडावे लागते. ग्रामीण भागातून शहरात आल्यावर किंवा शहरी मध्यमवर्गीय संस्कृतीशी संपर्क आल्यावर हळूहळू शब्दांच्या वापरात आपसूकच बदल होत जातात. चार मध्यमवर्गीयांच्या समुहात एखादा इरसाल शब्द किंवा वाक्यप्रयोग झाला तर लगेच भुवया उंचावल्या जातात. परंतु ग्रामीण भागात तुझ्या मायला तुझ्या
असली वाक्ये दोन जिवलग मित्र गप्पा मारतांना कितीतरी वेळा सहजपणाने उच्चारुन जातात. तशीच गत जातीवाचक शब्दांचीही आहे. जातींनी माणसामाणसात उतरंडी निर्माण केल्या परंतु दोन वेगवेगळ्या जातीतले मित्र त्यांना जातीचा विखारीपणा अहंपणा कळु लागेपर्यंत अतिशय मोकळेपणाने दुसऱ्याच्या जातीचा उल्लेख टिकास्पदरित्या करतात. आणि तो अगदी सहजपणाने होतो. च्या मायला तुमी सोनार अन् कोनाला होनार.... किंवा चुंगुस मारवाडी असले वाक्यप्रयोग कित्येकदा खेळीमेळीच्या वातावरणात कानी पडतात. असो. शंतनू यांच्या बहूतेक मतांशी मी सहमत आहे. परंतु समोरच्यावर टिका करतांना ग्रामीण जीवनाच्या संचितातुन येणारा जातीतला उल्लेख आणि सुशिक्षित म्हणवल्या जाणाऱ्यांकडून कुत्सितपणे केली जाणारी शेरेबाजी यातले अंतर राखायला हवेच. त्यासाठी मग काही शब्द टाळता आले तर उत्तमच. पण तरीही भाषा ही आपले सांस्कृतिक व सामाजिक व्यक्तिमत्व घेऊन प्रकट होत असते. ते जोपर्यंत अस्सल महाराष्ट्रीयन आहे तो पर्यंत मराठीला वरुन कितीही रंग फासण्याचे प्रयत्न झाले तरी तिचा मूळ स्वभाव जायचा नाहीच.

खर आहे

परंतु समोरच्यावर टिका करतांना ग्रामीण जीवनाच्या संचितातुन येणारा जातीतला उल्लेख आणि सुशिक्षित म्हणवल्या जाणाऱ्यांकडून कुत्सितपणे केली जाणारी शेरेबाजी यातले अंतर राखायला हवेच.

ते केवळ देहबोली वरुन समजते. ब्राह्मण हा उल्लेख बाम्हन असा कधी ग्राम्य निरागस वळणाने केला जातो तर कधी कुत्सिततेने. भटुरडा हा उल्लेख मात्र कुत्सिततेनेच केला जातो.
प्रकाश घाटपांडे

शब्दाचा अर्थ घेता कसा...

'खेडवळ' शब्दाचेही तसेच आहे. खेडवळ म्हणजे 'खेड्यातला' ग्रामीण भागातला.
पण खेडवळ म्हणजे 'अक्कल नसलेला' 'बावळट' 'अडाणी' वगैरे अर्थही डोकावतोच.

-दिलीप बिरुटे

गमतीदार प्रकार..

सकाळीच मटा वाचला तेव्हा हसायला आलं. महाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण ठरवण्यासाठी स्थापन केलेल्या समितीने आपला मसुदा सादर केला. आणि त्यात काही शब्दांना पर्याय शब्द सुचविले. आमच्या आवडत्या 'च्यायला' शब्दाच्या ऐवजी 'अरेच्चा' म्हणावे लागेल, नुसते कल्पनेनेच हसू आवरले नाही. असो, प्रतिसादात वर उल्लेख आलाच आहे की, भाषा कालपरत्वे बदलत असते ती आपल्या खास वैशिष्ट्यांसह. कायदा करुन 'शब्द' व्यवहारात आणता येत नसतात. असेच करायचे असेल तर कितीतरी ग्रामीण शब्द बदलावे लागतील. बोलीभाषेतील शब्दात मजा आहे ती, त्या-त्या शब्दामुळेच. त्यांना बदलून नवे शब्द भाषा व्यवहारात आणण्याचा प्रकार खूपच विनोदी आहे.

'चांभारचौकश्या' शब्द वापरल्यामुळे कोणी 'चांभार' न्यायालयात दाद मागायला गेल्याचे स्मरत नाही. पण सरकार 'मराठीच्या' प्रेमापोटी भाषेची गळचेपीच करत आहे असे वाटते.

-दिलीप बिरुटे

त्यापेक्षा...

मजेशीर प्रकार आहे.

त्यापेक्षा न्हावी, चांभार, धेड, भट, पुजारी वगैरे शब्दच मराठी भाषेतून रद्द करा. असे शब्द उच्चारायचेच नाहीत असा नियम करावा. ना रहेगा बांस ना रहेगी बांसुरी. ;-)

अगदी-अगदी

'महाराष्ट्र' या शब्दात 'महार' हा शब्द जातिवाचक आहे. तेव्हा तोही काढावा अशी मागणी भविष्यात पुढे येईल.

-दिलीप बिरुटे

मजेशीर प्रकार आहे

भाषेतील प्रचलित शब्द सारखे बदलत असतात, हेसुद्धा खरे.

त्यामुळे समाजाबरोबर भाषेत बदल झाला तरीही नैसर्गिक प्रवाही प्रवृत्तीच म्हणावी. उदाहरणार्थ हल्लीच्या प्रचलित भाषेत इंग्रजी मूळ असलेले अनेक शब्द असावेत. "हे शब्द कुठे गेले", "हरवलेले शब्द" वगैरे सदरांतून जाणवते, की कुठल्या समितीच्या न-सांगताही काही शब्द कालबाह्य होतात.

समितीचा प्रभाव असला, तर शालेय शिक्षणात या शब्दांचा वापर कमी होईल. यामुळे समाजात अन्यत्र वापर कमी होईल तो एखाद पिढीनंतर. वापरण्यास अवसर नसेल, तर शब्दांचे प्रचलन त्याही आधी कमी होईल.

("धेडगुजरी"मध्ये "धेड-" या अवयवाचा अर्थ "अधेड<<अर्ध" येथून आला असावा. लोकविशेषवाचक शब्द "गुजरी" असावा.)

धेड

नक्की माहिती नाही पण धेड हा महाराष्ट्र गुजरात सीमेवरील प्रदेशातील एक अस्पृष्य मानलेला समाज असावा. माझी आई लहानपणी (उंबरगाव येथे) सेवादलाचे काम करताना धेडवाड्यात समाजसेवा करायला जात असे.

त्यांची आणि गुजराती मिळून बनलेल्या भाषेला धेडगुजरी म्हणत असतील.

नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)

अरेच्चा

च्यायला मायला ऐवजी अरेच्चाला पूर्ण पाठिंबा. बाकी शब्दांबाबत उदासीन.
व्यक्तीला शिव्या देताना त्याच्या आईला नावे ठेवणे मला आवडत नाही आणि पटतही नाही.

शिवी नाहीच

आईला नावे ठेवणे

च्यायला आणि मायला या शब्दांच्या अर्थाची चिरफाड करून कदाचित त्या आई वरुन दिलेल्या शिव्या असल्याचे सिद्ध होत असेल. परंतु ग्रामीण भागात त्यांचा वापर जेव्हा सहजपणाने होतो तेव्हा तो शिवी या अर्थाने होत नाही. आईवरून शिवी तर नाहीच.

ओवी

परंतु ग्रामीण भागात त्यांचा वापर जेव्हा सहजपणाने होतो तेव्हा तो शिवी या अर्थाने होत नाही.

शिवी म्हणजे लैंगिकतेची ओवीच. रोष, नाराजी, राग, अगतिकता व्यक्त करण्यासाठी या ओव्यांचा वापर करण्याची परंपरा खूप जुनी आहे. सहनही होत नाही व सांगताही येत नाही या अवस्थेतून बेडा पार करण्यासाठी या ओव्यांचा आधार घ्यावा लागतो.................... स्वगत मधुन उधृत
प्रकाश घाटपांडे

त्या शिव्याच आहेत.

कुणी कितीही समर्थन करो, या आईवरून शिव्याच आहेत, किंवा शिव्यांचा अर्धा भाग आहेत. अर्थात्‌, त्या शब्दांऐवजी ’अरेच्च्या’ किंवा ’अगं बाई’ वापरणेच उचित या म्हणण्याला माझा पूर्ण दुज़ोरा--वाचक्‍नवी.

:)

पोलिटिकली करेक्ट राहण्याची बाधा आपल्यालाही लागली वाटते!

याला..

याला अजूनही "आचरटपणा" असे म्हणता येईल! बरं यातील एखादा शब्द कोणी हिंदीत बोलला तर त्याचा अर्थ काय होईल?

बाकी, कधी कधी वाटते की असे शब्दप्रयोग बदलण्याऐवजी, वकील (शब्दच नाही तर) हा प्रकारच जगातून नाहीसा झाला तरी बरेच प्रश्न मिटतील...

बाकी या "आचरटपणाचे" कारण कुठेतरी "व्हिपी सिंग" यांची देणगी असलेला, "ऍट्रॉसिटी ऍक्ट" असावा असे वाटते. एका ऐकीव उदाहरणाप्रमाणे, एक सरकारी अधिकारी त्याच्या हाताखालील अधिकार्‍यास(च), जो सरकारी नियमाप्रमाणे कनिष्ठ जातीतील होता त्याला आणि त्याच्या चमूस कामात चुका केल्या म्हणून ओरडताना, "तुम्ही लोकं म्हणजे..." असे म्हणत ओरडला... त्यावर या कनिष्ठ अधिकार्‍याने "ऍट्रॉसिटी ऍक्ट"च्या अंतर्गत तक्रार नोंदवली की साहेबाला माझी जात काढायची होती म्हणून "तुम्ही लोकं.." असे म्हणाला...

आता ऍट्रॉसिटी ऍक्ट असावा का, असल्यास कसा असावा, त्याचा इतकी वर्षे ज्या समाजघटकांना अन्याय सहन करावा लागला त्यांना खरेच फायदा होतो आहे का, त्याची उन्नती त्याचा फायदा घेऊन कशी करावी, यावरून विचार/चर्चा करणे वेगळे आणि मान्य. आधी शब्द हे शस्त्र, आणि कायदा म्हणजे काय शब्दांचे जाळे - म्हणजे शस्त्रागार! त्याचा वापर कसा करावा हे तो वापरण्यावरच ठरते. त्या अशा कायद्यावरूनच हा "विचका" झाला असावा असे वाटते. :-)

--------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

म्हारावानी...

सुमारे वीस वर्षांपूर्वी दूरदर्शन वर लोकगीतांचा कार्यक्रम झाला होता. त्यात
"आला माझा सासरचा वैद्य
अंगात अंगरखा फाटका तुटका.."
हे गाणं होतं. त्यात ती मुलगी सासरच्या वैद्याची सगळी दैन्यावस्था वर्णन करते व शेवटी म्हणते
"दिसतो कसा बाई म्हारावानी, बाई म्हारावानी."
अर्थातच दूरदर्शनने ते शब्द बदलून
"दिसतो कसा बाई भिकार्‍यावानी , बाई भिकार्‍यावानी ." असे केले होते ते आठवलं...

आक्षेप नोंदवावेत

महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक धोरणाचा मसुदा १ फेब्रुवारी, २०१० रोजी महान्यूज वेबपोर्टलवर अपलोड केले जाणार आहेत, तेव्हा आपण आपणास वाटलेले आक्षेप नोंदवावेत असे वाटते.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

एक प्रश्न...

तेव्हा आपण आपणास वाटलेले आक्षेप नोंदवावेत असे वाटते.

आक्षेप नोंदवताना, नवीन परीभाषा वापरून का बोली भाषा चालेल? ;)

--------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

शासनदरबारी समजेल अशी भाषा !

आक्षेप नोंदवताना, नवीन परीभाषा वापरून का बोली भाषा चालेल? ;)

कोणतीही चालेल. आक्षेप मात्र जरुर नोंदवावेत. :)
मसुदा समितीच्या भुमिकेचा आज पहिला भाग प्रकाशित झाला आहे.
१) भाग एक

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आक्षेप?

तिथे आक्षेप लिहायला कुठलीही सोय ठेवलेली नाही. महान्यूज़मधे वापरल्या जाणार्‍या भाषेवर, संकेतस्थळ सुरू झाल्याझाल्या माझे अनेक आक्षेप मी यापूर्वी विपत्रांनी कळवले होते. त्याला ढिम्म प्रतिसाद मिळाला होता. संकेतस्थळ आवडले, छान आहे, असेच चालू ठेवा अशा एका वाक्यातल्या प्रतिसादांनी अख्खे पान भरले आहे. प्रतिसाद एकवाक्यी असावा यासाठी तेथे तेवढीच जागा ठेवली आहे.--वाचक्‍नवी

भाग दोन..!

>>तिथे आक्षेप लिहायला कुठलीही सोय ठेवलेली नाही.
पुढील काही भागात त्याबद्दल माहिती येईल असे वाटते. पण, एक बरं आहे. प्रतिसाद एकवाक्यी ठेवला आहे.
प्रमाण भाषावाल्यांनी कितीतरी चुका सतत दाखवून त्यांची बेजारी केली असती. आणि बोलीतील कित्येक शब्दांना प्रति शब्द देऊन बोलीतील शब्दांची वाट लावली असती, असे वाटते. असे असले तरी, जे काय असतील ते आक्षेप मात्र जरुर लिहा :)

२) भाग दोन

मसुदा समितीच्या दोन भागामधे अनेक चांगले उपक्रम आहेत. पैकी,

८. प्रमाण भाषा कोश - मराठीसाठी प्रमाण भाषा कोश नाही. अशा प्रकारचा प्रमाण भाषा कोश तयार करण्यासाठी 'प्रमाण भाषा कोश मंडळ' स्थापन करण्यात येईल. मराठी प्रमाण भाषेच्या समृद्धीसाठी मराठी प्रमाण भाषेमध्ये प्राकृत, संस्कृत इत्यादी भाषांसह मराठी भाषेच्या विविध बोलींतील निवडक शब्दांचाही आवर्जून समावेश करण्यात येईल. याशिवाय भारतातील अन्य भाषांतून आणि विदेशी भाषांतून स्वीकारण्यात आलेले आणि आता मराठीत रुळलेले शब्दही विचारात घेतले जातील.

आणि

९. मराठी बोली अकादमी - राज्याच्या वेगवेगळ्या भागांत मराठीच्या विविध बोली बोलल्या जातात. या बोलींचे अध्ययन, अध्यापन, संशोधन, कोशनिर्मिती, साहित्यनिर्मिती तसेच या बोलींतून होणार्‍या कलांच्या सादरीकरणाचे संवर्धन इत्यादींसाठी एक स्वतंत्र ‘मराठी बोली अकादमी’ स्थापन करण्यात येईल. काही बोली या परप्रांतीय वा परकीय भाषांच्या प्रभावातूनही तयार झालेल्या आहेत. अशा बोलींविषयींचे प्रकल्पही या अकादमीमार्फत राबविण्यात येतील.

प्रमाणभाषेचा आग्रह धरणार्‍या आणि बोलीभाषांना जपणार्‍या अशा दोघाही अभ्यासकांना संधी मसूदा समिती देत आहे. लेखन अजून काळजीपूर्वक वाचायचे आहे.

[संपादक आणि मालकांना विनंती की, मसुदा समितीचे प्रकाशित झालेले लेख स्वतंत्र असे प्रकाशित करता येतील का ? ]

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कुणी सांगितले?

मराठीसाठी प्रमाण भाषा कोश नाही. कुणी सांगितले की मराठी भाषेसाठी प्रमाण-भाषा कोश नाही? मराठी भाषेचेच नाहीत तर जगातील सर्व भाषांचे कोश प्रमाण भाषेचे कोशच असतात. हो, स्लँग किंवा कलोक्विअल बोलींसाठी काही स्वतंत्र कोश असतात. पण असे शब्द सहसा सर्वसाधारण कोशांत देण्याची पद्धत नाही. लिखित कोश हे लेखी भाषेकरिता असतात आणि अशी लेखी भाषा ही प्रमाणभाषाच असते! बोलीभाषेतील शब्द नेहमीच्या कोशांत टाकता येणार नाहीत असे नाही.निश्चित येतील, पण त्यासाठी कोशाची जाडी अनेकपटीने वाढवावी लागेल. घोडं, केळं, पोळं, असं, तसं, कसं हे सगळे शब्द कोशात द्यावे लागतील. शिवाय बोलीभाषेतील शब्द दिल्यावर त्या प्रत्येक शब्दापुढे तो महाराष्ट्राच्या कुठल्या भागात वापरला जातो त्याची नोंद करायला लागेल. संस्कृत र्‍हस्व इकारान्त-उकारान्त शब्द मराठीत उच्चारानुसार दीर्घान्त लिहितात, तरीसुद्धा मराठीच्या १९६२च्या नियमांनुसार, शब्दकोशांत असे तत्सम शब्द र्‍हस्वान्तच दाखवावेत असा दंडक घालून दिला आहे!
मोल्सवर्थ-कॅन्डीने कुर्‍हाडणे, तुकडणे, बेजारणे अशी मुख्यत्वे संतकवींनी वापरलेली क्रियापदे कोशात देण्याचे सांगूनसवरून टाळले आहे. त्या कोशातल्या काही शब्दांपुढेतर ते फक्त कोंकणात, राजापूर भागात, उत्तर देशी(देश म्हणजे कोकण सोडून उरलेला पश्चिम महाराष्ट्र) किंवा वाडी जिल्ह्यात वापरले जातात असा स्पष्ट उल्लेख आहे.
तस्मात्, सामान्यांच्या आटोक्यातली किंमत नसलेला अनेकखंडी कोश निर्माण करून प्रकाशकाच्या कपाटाचीच धन करून तो तिथेच कुजवायचा असेल तरच बोलीभाषेतले शब्द कोशात घ्यावेत. अर्थात्, अभ्यासूंसाठी असे कोश जरूर असावेत. फक्त सरकारने किंवा कुणी दानशूर व्यक्तीने ते सवलतीच्या मूल्याने विकावेत.--वाचक्नवी

शब्दांना बदल सुचवा....वेलांटी एकच.. ?

बोलीभाषेतील शब्दांसाठी आणि प्रमाणशब्दांसाठी कोश असावा याच्याशी जसा सहमत आहे तसा असे शब्दकोश सहजपणे आणि कमी किंमतीत उपलब्ध व्हावेत याच्याशी सहमत. बाय द वे, बोलीभाषा शब्दाचा कोश आहे का ? किंवा ग्रामीण शब्दांचा ?

मराठीसाठी प्रमाण भाषा कोश नाही हे मसुदा समितीचे मत आहे, माझे नाही.
आज तिसर्‍या भागात मसुदासमितीने काही शब्द दिले आहेत. पण कुठे आक्षेप नोंदवायचे ते काही कळवले नाही. मात्र मसुदा समिती म्हणते की,

१) मोडी लिपीमध्ये एकच वेलांटी व एकच उकार असतो. मराठीमध्ये देवनागरीसाठी हीच लेखनपद्धती स्वीकारता येईल काय?

२) विरामचिन्हे वापरण्यासंदर्भात निश्चित धोरण नव्याने तयार करणे आवश्यक आहे काय ?

३) या समितीने मराठीमधील शब्दांच्या समासांविषयी नव्याने विचार करावा. उदा. ‘क्रीडानैपुण्यविकास’ असा समास करण्याऐवजी ‘क्रीडा नैपुण्य विकास’ असे लिहिणे विकल्पाने प्रमाण मानावे काय?

४) ‘मोहिमेंतर्गत’, ‘शाळेंतर्गत’, योजनेंतर्गत’ असे पूर्वरुप संधी मान्‍य करावेत काय ?

५)शब्‍दांना शब्‍दयोगी अव्‍यये जोडण्‍याच्‍या बाबतीत निश्चित नियम करण्‍याची गरज आहे काय ?

-दिलीप बिरुटे

 
^ वर