थ्री इडियट्स्

थ्री इडियट्स आणि चालू दिग्दर्शक असे खरे तर ह्या चित्रपटाचे शीर्षक हवे. सामान्य प्रेक्षक अडाणी असतो सगळे सोपे करून चमच्याने भरवल्याशिवाय बहुसंख्य लोकांना चित्रपटाचा मजा लुटता येत नाही हा फंडा राजू हिरानीना बरोबर समजला आहे. उदाहरणार्थ चित्रपटाच्या सुरुवातीला प्रो. सहस्रबुद्धे सगळ्या मुलांना गोळा करून एक पेन दाखवतात. हे पेन म्हणे बक्षीस देण्यासाठी ते योग्य मुलाच्या शोधात असतात. आणि त्यांच्या पूर्ण कारकीर्दीत असा मुलगा त्यांना भेटलेला नसतो. आता सराईत चित्रपट प्रेक्षकाला इथेच समजले पाहिजे हा प्रसंग पेरण्याचा एकमेव हेतू म्हणजे चित्रपटाच्या शेवटी हिरोलाच हे पेन मिळणार. आणि तसे घडतेही. पण इथे पुन्हा सहस्रबुद्धे मास्तर भाषण ठोकतात मला पेन कुणी दिले? ते मी कुणाला देणार? वगैरे वगैरे... जणू काही गझनी पाहिल्यापासून अमीरच्या प्रेक्षकांना शॉर्ट टर्म मेमरी लॉस झाला आहे आणि तासाभरा पूर्वी घडलेला प्रसंग त्यांच्या लक्षातच नाही.

कॉलेज लाईफ, अमीर खान आणि ओवर सिम्प्लिफाइड कथानक असे हुकमी एक्के वापरले (आठवा- जो जिता वही सिकंदर) की चित्रपट गाजणारच हे बरोबर हेरून निर्माता दिग्दर्शकांनी आपापले उखळ पांढरे करून घेतले आहेत. ह्यावेळेला फरक इतकाच होता की १२वी पास होऊन नुकतीच कॉलेजात ऍडमिशन घेतलेला कोवळा दिसणारा रणछोडदास साकारण्यासाठी आता मात्र चाळीशी उलटलेला अमीर खान होता. पण मध्यंतरी इतकी वर्षे गेल्याने अमीर म्हातारा झाला असला तरी कंप्युटर आणि ग्राफिक्स तंत्रज्ञान मात्र कुठल्या कुठे गेले आहे. फ्रेम बाय फ्रेम फोटोशॉपवारुन् अमीरच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या काढल्या आणि सगळे काही गुळगुळीत केले की झाले. पुन्हा तोच कोवळा दिसणारा अमीर खान आणि कॉलेजचे वातावरण बस. मग त्या माधवनला कोण बघतंय? भले तो एखाद्या वयस्कर माणसासारखे सुटलेले पोट घेऊन आणि तशीच देहबोली दाखवत फर्स्ट इयरच्या वर्गात बसलेला का दाखवला असेना. त्याच्या घरी पण त्याचे आई वडील म्हणजे त्याचे भाऊ बहीण का वाटेनात. तसेच ७८ साली जन्मलेल्या म्हणजे साधारण १० वर्षांपूर्वी कॉलेजात असलेल्या मुलांचे कपडे, मोबाईलचा सुळसुळाट हे आजच्यासारखे का वाटेना. असले प्रश्न पडायचा संबंध नाही.

अर्थात शेवटी मसाला/व्यावसायिक चित्रपट आहे म्हणून हे सगळे गळ्यात ढकलले तरी करीना कपूरला बोहल्यावरून आणायला गाडी जेव्हा वळण घेते तेव्हा कथेला जे वळण दिले आहे त्यामुळे क्षणोक्षणी घशात घास अडकल्या सारखे होते. मग व्याक्युम क्लिनरने केलेली डिलिवरी काय, आल इज वेल म्हटल्यावर बाळाने मारलेली लाथ काय सगळेच पचण्याच्या पलीकडे जाते. पण तरीही चित्रपट मला टाकाऊ वाटला नाही. कारण वासरात लंगडी गाय शहाणी असते. 'हिंदी चित्रपट' ह्या नावाखाली इतर वेळेला जे काय काय विकायला ठेवलेले पाहून हा चित्रपट त्यामानाने बराच सुसह्य वाटतो. जमेची बाजू म्हणजे कितीही सोप्प्पा करून मजा घालवला असला तरी मुळांतला संदेश चांगला आहे. मार्कांची पर्वा करू नका, जे मनाला आवडेल ते करा. हा मूळ संदेश असला तरी स्वतःशी प्रामाणिक राहा, हातात अंगठ्या घालून किंवा आत्महत्या करून प्रश्न सुटत नसतात इ.इ. उपसंदेश आजकालच्या रामदेवबाबा जनरेशनसाठी जास्त महत्त्वाचे वाटले. विनोद हे पानचट आणि ईमेल मधून तसेच कॉलेज कट्ट्यावर कितीदा तरी चघळलेले शिळे असले तरी सादरीकरण प्रभावी आहे. चमत्कार-बलात्कार वगैरे विनोद तर शालेय दर्जाचे असले तरी दिग्दर्शकाचे अभिनय करून घेण्याचे कसब उत्तम असल्याने प्रभावी साकारले आहेत. विशेष म्हणजे मुख्य कलाकारांबरोबरच इतर पात्रांकडूनही उत्कृष्ट काम करून घेतले आहे मग तो मिलीमिटर असो की कॉलेल मधले इतर प्राध्यापक. सर्वांना अभिनयाचे पूर्ण गुण.

इतरवेळी चित्रपट बरा आहे असे म्हणून सोडूनही दिले असते पण इतका उदो उदो चाललेला पाहून, 'चित्रपट आवडला नाही' असे म्हणणे म्हणजे ब्लास्फेमी की काय असे वातावरण झाल्याने राहवले नाही.

Comments

ह्म्म्म्..

बरं झालं हे वर लिहिलेलं वाचायच्या आधी पिक्चर बघितला.. भरपूर् एंजॉय करता आला..

असो.. आपली आपली मतं आणि आपली आपली आकलनशक्ति!
-सामान्य अडाणि प्रेक्षक..

बरं झालं....

बरं झालं हे वर लिहिलेलं वाचायच्या आधी पिक्चर बघितला.. भरपूर् एंजॉय करता आला..

असेच म्हणतो...!!!

व्याक्युम क्लिनरने केलेली डिलिवरी काय, आल इज वेल म्हटल्यावर बाळाने मारलेली लाथ काय सगळेच पचण्याच्या पलीकडे जाते.

परिक्षणात एवढीच गोष्ट मला पटली. बाकी, पसंद अपनी खयाल अपना !!!

अवांतर : 'नटरंग' चे परिक्षण वाचण्यास उत्सूक..!
[उपरोक्त पद्धतीनेच परिक्षण आले पाहिजे ही मात्र अट आहे] ;)

-दिलीप बिरुटे

मला तर आवडला

एखादी गोष्ट अनेक लेख/भाषणे/समुपदेशनाने फारच कमी लोकांच्या डोक्यात शिरत असताना.. एखाद्या (तद्दन फिल्मी का असेना) चित्रपटाने ती गोष्ट (अति)सोपी करून घराघरात पोहोचवली तर आनंदच आहे.
व्यावसायिक मसाला असला तरीही मलाही तो चित्रपट आवडला.

कॉलेजचा गृप परत जमवून हा चित्रपट(१०-१२च्या टोळक्याबरोबर ;) ) बघा अजून आवडेल हा फुकटचा सल्ला :)

ऋषिकेश
------------------
भ्रष्टाचार संपविण्याचा सर्वोत्तम आणि सर्वात सोपा(?) उपाय म्हणजे त्यात स्वतः सहभागी न होणे

उत्तम

लेख आवडला... चित्रपटाबद्दल ऐकून आणि त्याचे प्रोमो पाहून हा चित्रपट माझ्या टाईपचा नाही याची खात्री झालीच होती. भारतीय शिक्षणव्यवस्थेला अतिरेकी नावे ठेवणे ही सध्या कूल थिंग झाली आहे. जे काही ऐकले आहे त्यावरुन हा चित्रपट विद्यार्थ्यांनी कष्ट करुन एखादी गोष्ट प्राप्त करण्याऐवजी सिस्टीमलाच नावे ठेवणे सोयीचे असते ही बाब अधोरेखित करणारा असावा.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

मते ज्याची त्याची

मी पाहिला. करमणूक म्हणून मला आवडला.

जे काही ऐकले आहे त्यावरुन हा चित्रपट विद्यार्थ्यांनी कष्ट करुन एखादी गोष्ट प्राप्त करण्याऐवजी सिस्टीमलाच नावे ठेवणे सोयीचे असते ही बाब अधोरेखित करणारा असावा.

नाण्याच्या दोन बाजू आहेत. तुम्ही जी तुमची म्हणाल ती तुमची. वरच्या विधाना वरून सरसकट विधान करायचे झाले ते सगळेच जण सगळ काही एक सारखे कष्ट करून मिळवतात आणि आणि ज्याला काही मिळाले नाही तो कोल्ह्याला द्राक्षे अंबट म्हणतो असे वाटते.

चित्रपटात खरं तर फार नव अस काही नाही हे मान्य. पण मग, गांधीजींनी गावाकडे जावा म्हणून संदेश दिला तर तो दुर्लक्षीत करायचा आणि आज राहूल गांधीने सांगितले तर, वा !! या वयात हे विचार!! अनुकरण करायलाच हवं वगैरे वगैरे!! असो. मते ज्याची त्याची!!

मराठीच्या खोट्या अभिमानासाठी भरत जाधवचे टुकार चित्रपट पहण्यापेक्षा ३ इडियट्स पाहणं नक्कीच चांगल आहे हे माझं वैयक्तिक मत आहे. बाय द वे!! चित्रपटा बद्दल दोष चित्रपट चमूला द्यावा की असे चेतन भगतला?

असो, भारतातली शिक्षण पद्धत चांगली की वाईट अथवा काय कमी आहे काय जास्त आहे हा चर्चा विषय चांगला रंगेल कदाचित!!






फारा वर्षांपूर्वी...

फारा वर्षांपूर्वी रेडिफ आणि तत्सम संकेतस्थळांवरील चित्रपट परीक्षणे वाचून एक गोष्ट लक्षात आली होती की "चित्रपट भिकार आहे" असे म्हटले की आपण तो चित्रपट लगेच पहावा. :-) बरेचदा, असे चित्रपट सर्वसामान्य जनतेचे आणि थकलेल्या डोक्यांचे ३ घटका मनोरंजन करतात. चित्रपटांचे मूल्य माझ्यामते एवढेच असते आणि लेखकाने तर या चित्रपटाला भिकार म्हटलेले नसल्याने हा चित्रपटही मी अवश्य पाहेन.

मला सुद्धा आवडला

छान आहे पिक्चर.अमिर चा तर नादच करायचा नाही.
अशी सुद्धा डिलिवरी करता येते का......? मला पिक्चर बघून समजल.
"एखादी गोष्ट अनेक लेख/भाषणे/समुपदेशनाने फारच कमी लोकांच्या डोक्यात शिरत असताना.. एखाद्या (तद्दन फिल्मी का असेना) चित्रपटाने ती गोष्ट (अति)सोपी करून घराघरात पोहोचवली तर आनंदच आहे." पूर्णपणे सहमत.

ब्लासफेमी केल्याबद्दल धन्यवाद

परीक्षणातल्या निरीक्षणांशी सहमत आहे. विशेषतः दुसऱ्या परिच्छेदातल्या. हा सिनेमा टाइमपास आहे. काही शालेय, काही महाविद्यालयीन विनोदांचे नाट्यरूपांतर आहे. इंडक्शन मोटर छाप विनोद आम्ही फष्टियरात असताना ऐकले होते. जोकचा नंतरचा भाग मात्र चित्रपटात आलेला नाही.

आमीर खानने भरपूर ज्ञान पिलवले आहे, पेट्रनाइझ केलेले आहे. पण मेसेजबिसेज ठीक आहे चांगला आहे. माझ्यापुढच्या रांगेतले नवरा बायको रडत होते सिनेमा बघताना. एकंदरच थेटरात हसता हसता बरेच आवंढे गिळले जात होते. या जगात बहुतेक कुणालाच मनाप्रमाणे जगता येत नसते हा निष्कर्ष मी पुन्हा एकदा काढला. मी ज्या मुलीवर लाइन मारायचो तिचा बाप प्रोफेसर नव्हता, तिला मोठी बहीणही नव्हता. भाऊ होता. असो. भावासाठी वॅक्यूम क्लीनरचे काम काय? असोच.

कोलबेर, तुम्ही 'ब्लासफेमी' केल्याबद्दल धन्यवाद. पुढील परीक्षणाची वाट पाहतो आहे.

(हेरटिक) धम्मकलाडू

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"


१.
प्रोफेसर: इंडक्शन मोटर सुरू कशी होते.
विद्यार्थी: ....घूंघूंघूं+++
प्रोफेसर: ओह..स्टॉपिट
विद्यार्थी: घूंघुघु ----.....

परिक्षण आवडले आणि (परिक्षणपूर्व) पूर्वग्रह

श्री कोलबेर, परिक्षणाबद्दल धन्यवाद. चित्रपट पाहिलेला नाही त्यामुळे मत मांडत नाही पण परिक्षण वाचायला मजा आली. चित्रपट आवडणार नाही असे वाटते.

चित्रपट

पहिल्या एक-दोन आठवड्यांत ज्यांनी चित्रपट पाहिला, त्यांना तो बेहद्द आवडला आणि त्याबद्दल एवढं ऐकून जे पहायला गेले त्यांना तो तितकासा ग्रेट वाटला नाही, असं एकंदरीत मित्रांच्या प्रतिक्रियांवरून आढळलं. बाकी यावरून अभिरूची, उच्चभ्रूपणाचा आव याबद्दलचे पवित्रे आंतरजालबाह्य जगातही दिसले आणि काही चर्चा आठवल्या. मागे राजेंद्रने यासंदर्भात लेखही लिहिला होता.

फारसा विचार करण्याच्या भानगडीत पडला नाहीत, तर पिक्चर टाईमपास आहे. अपेक्षित वळणं असली तरी काही विशिष्ट प्रसंगाच्या वेळी चित्रीकरण कृष्णधवल होणे, मित्राच्या यशावरील प्रतिक्रिया इ. बारीकसारीक गोष्टी चांगल्या टिपल्या आहेत. मात्र वर म्हटले तसे इंडक्शन मोटरचा विनोद, रशिया-अमेरिका यांच्यातील अंतराळस्पर्धेपासून चालत आलेला बॉलपेन-पेन्सिलचा विनोद आणि ह्या जाहिरातीतून"प्रेरणा" घेऊन उभा केलेला प्रसंग इ. कोमट विनोद आधी ठाऊक असले तर तितकेसे रंगतदार वाटत नाहीत.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

ब्लास्फेमी

परिक्षण वाईट आले, म्हणून मग चित्रपट आवडला म्हटले तर आपली अभिरूची काढतील का काय ही पण एक प्रकारची भितीच, पण, त्याचा धोका स्विकारून चित्रपट मला आवडला, चार घटका करमणूक करणारा, आणि ज्यांना शिक्षणव्यवस्थेबद्दल बोलता येत नाही, आणि "शिक्षणमहर्षीं"बद्दल काहीही माहिती नसल्याने नको तेवढा आदर असतो, अशांचे प्रतिनिधित्व करणारा वाटला हे मुद्दाम नमूद करावेसे वाटते. शिवाय नात्यांचे, मित्रांचे, कुटुंबांचे प्रेमाचे घरेलू संबंध ज्यावर आजकाल बरेचसे हिंदी चित्रपट कसलेच भाष्य करताना दिसत नाहीत ते अगदी जवळून दाखवले आहेत. काही विनोद आणि सिच्युएशन्समधला अतिरंजितपणा वगळता चित्रपट जरूर बघावा, असा आहे.

लोकशिक्षण

वरील परीक्षण विनोदी पद्धतीने केले म्हणून वाचताना मजा वाटली. मात्र हा चित्रपट कशावर आहे ह्याची काही कल्पना नसताना इथे आल्या आल्या, चित्रपटगृहात पहात असताना मात्र माझे त्यातील मूळ संदेशाकडेच लक्ष गेले. "मार्कांची पर्वा करू नका, जे मनाला आवडेल ते करा" आणि अंधश्रद्धा बाळगून काही मिळत नसते हा त्यातील जो भाग आहे तो भावला. तसेच आई-वडीलांनी दबाव आणणे आणि प्राध्यपकांचे वागणे पण वास्तवाला धरूनच दाखवले गेले आहे असेच वाटले. त्याचे कारणही जरा वेगळे आहे. पूर्ण व्यक्तीगत आहे, असे सांगायला आवडत नाही, उगाच चढवून सांगणे हा उद्देशही नाही, पण हा विषय लहानपणापासून खूप जवळून पाहीलेला असल्याने हे लिहील्याशिवाय राहवतही नाही...

... आमच्या घरी अनेक पालक, विद्यार्थी वडीलांचा (मोफत) सल्ला घेयला येयचे. त्यात प्रवेश मिळवणे हा जसा भाग होता, तसेच कधी कधी इतर प्राध्यापक कसे मग्रुरीने वागत आहेत, कसा त्रास देत आहेत, एखादा विषय कसा जमत नाही, इतकेच काय मैत्री आणि पुढील सल्लेपण नंतर मुले घेयला येयची कारण त्यांना वडील हे प्राध्यापक वाटायच्या ऐवजी त्या शब्दाची इंग्रजीतील जी व्याख्या friend, philosopher & guide आहे, तसेच वाटायचे आणि मोकळेपणाने बोलायला येयचे. ते जर घरात नसतील तर माझ्या आईशी बोलून मन मोकळे करायचे. हा प्रकार एकदा का प्रवेशाचा काळ आला (जून-जुलै) की खूपच चालायचा. त्यांना (पालकांना) माहीत असायचे की प्रवेश हा केवळ गुणवत्तेवरच मिळणार आहे, पण Anxiety म्हणून एक प्रकार असतो जो त्यावेळेस स्वतःच्या नकळत चावत असतो. त्यावेळेस (हे मी ७०-८०च्या दशकातील सांगत आहे) इंजिनियरींग आणि मेडीकलला प्रवेश नाही म्हणजे जगबुडीच झाल्यासारखे वाटायचे.

त्यानंतर विद्यार्थ्यांना छळणारे प्राध्यापक हा अजून एक वेगळा प्रकार असतो, किमान असायचा (कारण त्या काळात ट्यूशन हा प्रकार इंजिनियरींग मधे नव्हता). मुलांना रडवलेले पाहीलेले आहे, निव्वळ घरी येणार्‍यांचे अनुभवकथन ऐकूनच नाही तर स्वतः कॉलेजात असतानापण हे पाहीले आहे. त्यात फार कमी प्राध्यापक असे होते की जे मुलांना उत्तेजन देण्याच्या अर्थाने मदत करत. परीक्षा म्हणजेच सर्व नाही हे सारखे अशा काळजीतील मुलांना आणि त्यांच्या पालकांना सांगून पण बरेच फरक पडायचे, केवळ त्याच वेळेस नाही तर नंतरही. एकदा एका अशाच कारणांनी डिप्रेशनमधे असलेल्या एका विद्यार्थाने अशा पद्धतीने मन मोकळे झाल्यावर जो अनुभव आला तो मला सांगितला, "वास्तवीक लोकलमधून कॉलेजला जाताना मला दरवाजाच्या बारवर हात अडकवून वारा खात जायला आवडायचे. पण माझ्या त्या काळात मी ते सोडले, कारण असे नको होयला की चुकून अपघातात मी मेलो आणि लोकांना वाटले की मी पळपूटा आहे आणि मी आत्महत्या केली..."

असो. यावर लिहीता येण्यासारखे बरेच आहे, पण तुर्तास इतकेच. आजही हा प्रकार कमी झाला आहे असे वाटत नाही. त्यामुळे लोकशिक्षणाची गरजही कमी झालेली नाही. ते लोकशि़क्षण हे नुसते दूरदर्शनवर चर्चा करून होते का? प्रत्येकजण कुणाकडे जाऊन समुपदेशन करून घेऊ शकतो का? ह्या विषयावर त्या काळात एक मराठी नाटक आणि नंतर मालीका आली होती, "बोल बाबी बोल" म्हणून. अर्थात त्यात भर हा घरातील दबावावर होता. पण असाच विषय मात्र अतिशय गंभीर पद्धतीने घेत एका अर्थी परीणामांची केवळ भितीच जनतेच्या डोक्यात बसेल असे दाखवले होते. त्याला आल्टरनेटीव्ह काय हे मात्र सांगितले नव्हते. अशा गंभीर आणि भितीदायक पद्धतीने काहीच साध्य होत नाही.

हा चित्रपट म्हणून वेगळा वाटला. एखादा चांगला किर्तनकार जसे नाचत नाचत कथा सांगत शेवटी तात्पर्य सांगत अंतर्मुख करू शकतो. किर्तनकारच कशाला बर्‍याचदा स्ट्रीटस्क्रिप्ट करणारे (साम्यवादी) चळवळेही असे पाहीले आहेत जे अशी नाटके करत त्यांचा लोकशिक्षणाचा मुद्दा पुढे नेतात. त्यात गैर काहीच नसते तर लोकांच्या मनात कुठेच ताण निर्माण न करता तो विचार पुढे नेणे असते. त्याच पद्धतीने या चित्रपटातदेखील अतिशयोक्ती नक्कीच आहे. (सगळ्यात हाईट म्हणजे पाच वर्षात ४०० पेटंट्स!). उद्या कोणी याला ऑस्करला पाठवा म्हणले तर कठीण होईल...थोडक्यात प्रतिसादाचा उद्देश चित्रपटाची भलावण हा नाही. पण आपण त्यातील नुसती अतिशयोक्ती बघायला जात आहोत का त्यातील मेसेज बघायला अथवा आपल्याला गरज नसली तरी तो ऍप्रिशिएट करायला हा प्रश्न आहे.

म्हणूनच केवळ तुमच्या, "मार्कांची पर्वा करू नका,....सर्वांना अभिनयाचे पूर्ण गुण." ह्या भागाशी पूर्ण सहमत. तो संदेश देण्याचा हा एक प्रकार झाला. शिक्षणाच्या त्या बोटीत असलेले,त्यातून काही हसत खेळत व्यावहारीक सत्य शिकले तर त्यातून टिमने स्वार्थ आणि परमार्थ साधला असे म्हणता येईल.

बाकी प्रश्न राहीला उदो उदो करायचा. ज्यांना करायचे ते करतील. ज्यांना तो "एन्जॉय" करायचा ते तो निव्वळ "एन्जॉय" करतील. ज्यांना आवडला नाही त्यांना त्यातील संदेश अथवा कामे आवडली नसली तर त्यातही काहीच गैर नाही. पसंद अपनी अपनी हे वर सर्वांनीच म्हणले आहे. पण जर आवडले असले आणि तरी देखील त्यातील इतर गोष्टींवरच भर देत टिकात्मक विश्लेषण करण्याचे कारण काय असा प्रश्न मात्र जरूर पडू शकतो.

--------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

सहमत..

माझा "एंजॉय केला" म्हणण्यामागे हाच् उद्देश् होता कि काहिही पूर्वग्रह न करून् घेता सिनेमा बघितला म्हणून् आवडला आणि एंजॉय केला.

वरचा लेख वाचून् गेलो असतो तर् उगाचच् एरंडेल प्यायलेल्या चेहर्‍याने गेलो असतो आणि मजा गेली असती..

आवडला

विकासशी शब्दशः सहमत.
मी फाईव्ह पॉइंट समवन वाचले होते. ते फारसे आवडले नव्हते त्यामुळे पिक्चर पहायचा असे मनात नव्हते. पण पाहिला आणि आवडला. पुस्तकापेक्षा पिक्चर चांगला वाटला.

व्हॅक्यूम क्लीनरने डिलिव्हरी ही अतिशयोक्त असली तरी त्यातला मेसेज महत्त्वाचा. उपलब्ध असलेल्या साधनांचा चतुराईने वापर.

नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)

हाहाहाहा.

एकदा एका अशाच कारणांनी डिप्रेशनमधे असलेल्या एका विद्यार्थाने अशा पद्धतीने मन मोकळे झाल्यावर जो अनुभव आला तो मला सांगितला, "वास्तवीक लोकलमधून कॉलेजला जाताना मला दरवाजाच्या बारवर हात अडकवून वारा खात जायला आवडायचे. पण माझ्या त्या काळात मी ते सोडले, कारण असे नको होयला की चुकून अपघातात मी मेलो आणि लोकांना वाटले की मी पळपूटा आहे आणि मी आत्महत्या केली..."

हाहाहाहा. मस्त. आवडले. त्या साहेबांना नमस्कार कळवा!

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

भन्नाट

तुम्हाला 'अमर अकबर एन्थोनी' चित्रपटातील रक्तदानाचा सीन आठवतो का? एवढा खतरनाक सीन तोपर्यंत (किंवा अगदी आज पर्यंत) कोणत्याही सिनेमात झाला नसावा. पण चित्रपट मात्र सुपरहिट!

सांगायचा मुद्दा हा की, चित्रपटातील गोष्टी, पात्रं हे सगळं लार्जर दॅन लाइफ असतं. मी पण फस्ट डे फोर्थ शो पाहीला, तो ही दुपारी ३ वाजता. (सकाळी ६ वाजताचा शो सुद्धा हाऊसफूल होता). तीन तास फूल टाइमपास!

एका व्यावसायिक सिनेमाकडून प्रायोगिक वा समांतरच्या अपेक्षा ठेवणं म्हणजे जरा....असो. शेवटी प्रत्येकाची आवड्.

प्रत्येक पालकांनी आधी 'तारे जमीन पर' व नंतर 'थ्री इडीयट्स' जरुर पहावा. बाकी आपल्या शिक्षण पद्धती बद्दल काय बोलणार! सध्या विद्यार्थ्यांचं जे आत्महत्या सत्र सुरु आहे, त्याने यावर पुन्हा चर्चा करणं भाग पाडलं आहे. परंतु आपल्याकडे केवळ चर्चाच होतात. या सर्व पार्श्वभूमीवर 'थ्री इडीयट्स' डोळ्यात अंजन घालणारा आहे. खरच आजकाल लोक काही बाबतीत इतके अडाण्यासारखे वागतात की त्यांना सोपं करुनच सांगावं लागतं. या चित्रपटात तेच केलं आहे. एस.एस.सी. बोर्डाची सातवी ते दहावीची क्रमिक पुस्तकं वाचल्यास, त्यातलं शिक्षकांना तरी किती समजत असेल असा प्रश्न मनात येतो.

याच विषयावर एखादा वास्तववादी (आर्ट फिल्म टाईप) सिनेमा बनविला असता तर किती लोकांनी तो पाहिला असता?
ज्यांनी अजुनही पाहिला नसेल त्यांनी जरुर पहावा आणि तो ही थेटरातच पहा तरच खरी मजा येईल. आतापर्यंतचा बिझनेस पाहिल्यास या सिनेमाने उत्पनाचे आजवरचे सर्व उच्चांक मोडीत काढत नवा विक्रम स्थापित केला आहे.

बापरे! अजुन किती जणांना हा सिनेमा इडीयट बनविणार आहे.

जयेश

आभारी आहे.

सर्वप्रथम प्रतिक्रियांबद्दल सर्वांचा आभारी आहे.

चित्रपटातील काही अतिशयोक्ती दुर्लक्षीत करुन चित्रपट पाहिल्यास छान करमणूक होते आणि मुख्य म्हणजे संदेश चांगला पोहचवतो असा एक सूर बर्‍याच प्रतिसादांमधून जाणवला. दोन्ही गोष्टी मान्य असल्या असल्यातरी 'कुठे थांबायचे' हे समजणे ही फार मोठी कला आहे असे वाटते. जे बर्‍याच ठीकाणी न कळल्याने चित्रपट वाहवत गेला आहे. ह्याचा अर्थ रुक्ष समांतर सिनेमा बनवायला हवा होता असे नव्हे. व्यावसायिक हलक्या फुलक्या शैलीत पण वहावत न जाता सुद्धा उत्तम चित्रपट बनवता येतो ह्याचे गेल्या काही वर्षातले उदाहरण म्हणजे 'खोसला का घोसला' सारखा चित्रपट.वॅक्युम क्लिनरने डिलिवरी आणि बाळाची लाथ हे तर दोन प्रसंग झाले पण वरती विकास ह्यांनी म्हंटल्याप्रमाणे ४०० पेटंट्स चा उल्लेख, सुरुवातीला एखादा मिलिटरी कॅम्प असल्या सारखा पहाटे सगळ्या विद्यार्थ्यांना रस्त्यावर गोळा करुन देणारा प्राध्यापक, लडाख मधली अमीर खानची शाळा ज्यात तो काहीतरी वेगळे करतो आहे हे दाखवण्यासाठी ठेवलेले विनोदी प्रकार, करिना कपूरला पुन्हा कथानकात आणण्यासाठी लग्नातून पळवून आणायचा टिपीकल बॉलीवुड क्लिशे, अनेक प्रसंगात 'सटल' पद्धतीने दाखवता येतील अश्या भावनांचा केलेला मेलोड्रामा हे टाळता आले असते आणि त्यामुळे चित्रपट रटाळ न होता अजूनच मनोरंजक झाला असता.

तसेच चित्रपटातील मूळ संदेश जो मार्कांची पर्वा करु नका वगैरे आहे जो वारंवार अनेक कन्विनियंट प्रसंग घडवून लोकांच्या डोक्यात घुसवायचा प्रयत्न केला आहे त्याच्याविषयी मी अजूनही साशंक आहे. अभ्यास करायला आणि परिक्षा द्यायला कुणालाच आवडत नाही. शालेय जीवनात अभ्यास/शाळा ह्या प्रकाराचा प्रचंड तिरस्कार होता पण कडू औषध नाक दाबून प्यावे तसे तो अभ्यास कसाबसा करावाच लागतो. त्या वयात जर हा चित्रपट बघीतला असता तर अभ्यास करायचा कंटाळ्याला एक नविनच कारण मिळाले असते. हे मी कशाला शिकू? ३ इडियट्स मधे सांगितले आहे मनाला जे आवडेल ते करा मग कशाला अभ्यास करा? असा एक चुकिचा संदेश पोहचवला जातो आहे की काय असे वाटते. 'बचपन H2SO4 मे जल गया अब एक् पल तो जिने दो' वगैरेतून नक्की काय सांगायचे आहे? तेंडूलकर आणि लता मंगेशकर लाखात एखाद दुसरेच असतात बाकी (माझ्या सारख्या) बहुसंख्यांचे छंद हे टीवी बघत सोफ्यावर लोळणे इतके साधे सोपे असतात. त्यांना नक्की कोणता संदेश अभिप्रेत आहे? म्हणूनच मला आवडले ते उपसंदेश! उदा. स्वत:शी आणि इतरांशी प्रामाणिक राहा. शर्मन जोशीच्या इंटरव्यूचा प्रसंग त्यामुळे अमीरखानच्या कुठल्याहि भाषणाबाजीपेक्षा जास्त आवडला. शॉशँक रिडीम्पशन मधल्या मॉर्गन फ्रीमनच्या परोल ऑफीसरच्या शेवटच्या इंटरव्यूशी साधर्म्य दाखवणारा.

असो. कसलाही पूर्वग्रह न ठेवता सर्वांनी हा चित्रपट पाहावा.

 
^ वर