छाप - काटा!

फोर्थ डायमेन्शन 41

छाप - काटा!

आज सचिनला सणकून भूक लागली होती. सकाळच्या आठ वाजल्यापासून सुरु केलेले काम रात्रीचे अकरा वाजले तरी संपता संपत नव्हते. संगणक प्रणालीला अंतिम स्वरूप देण्यात कसा वेळ गेला हेच त्याला कळले नाही. आता मात्र पोटात कावळे ओरडू लागले. दोन घास पोटात पडल्याशिवाय आपले काही खरे नाही असे त्याला वाटू लागले. त्यासाठी त्याला पिझ्झा हट किंवा डॉमिनोज पिझ्झाला जायला हवे. हे दोनच हॉटेल्स रात्रीच्या वेळी उघडे असणार. त्याच्या कामाच्या ठिकाणापासून या दोन्ही हॉटेलचे अंतर सारखेच आहे. कुठलीही पिझ्झा खाल्ली तरी चवीत (वा त्यांच्या किमतीत!) काहीही फरक नसणार याची पूर्ण खात्री त्याला होती. त्यामुळे कुठल्या हॉटेलात जावे हा प्रश्न आता त्याच्यासमोर आहे. कारण आजकाल त्याच्या मानगुटीवर विवेकवादाचे भूत बसलेले आहे. कुठलीही (लहान वा मोठी!) गोष्ट करायची असल्यास त्यामागील कारण परंपरा शोधूनच विवेकी निर्णय घ्यायचा चंग त्यानी बांधला आहे. यानंतर उत्स्फूर्ततेला थारा न देता विवेकी निर्णयप्रक्रियेतूनच जायचे बंधन त्यानी स्वत:वर लादून घेतलेले आहे. त्यामुळे कुठे जेवायला जायचे हा आता किरकोळ प्रश्न न राहता यक्षप्रश्न झाला आहे. काही केल्या त्याला सुचेनासे झाले आहे.
उपाशी राहणे हा काही त्यावरील तोडगा नाही वा विवेकीपणाचे लक्षणही नाही, याची त्याला पुरेपूर खात्री होती. त्यामुळे जेवायला जाणे भाग होते. याचाच विचार करत असताना, जेवायला नेमके कुठे जायचे हे ठरवण्यासाठी, त्याला एक नामी युक्ती सुचली. स्वत: निर्णय घेण्यास असमर्थ असल्यामुळे जेवणाच्या ठिकाणाच्या निवडीची जवाबदारी आपण एखादे नाणे उडवून छाप-काटा करून का ठरवू नये? छाप पडल्यास पिझ्झा हट व काटा पडल्यास डॉमिनोज पिझ्झा! अशा त्रिशंकु अवस्थेत हातावर हात ठेवून काहीही न करता उपाशी मरण्यापेक्षा एखादे नाणे उडवून निर्णय घेणे सयुक्तिक व विवेकशील ठरेल अशी त्याला खात्री वाटू लागली.
परंतु पुढील काही क्षणातच सचिनला आपण आपल्या विवेकीपणाशी प्रतारणा करत आहोत की काय असे वाटू लागले. आपला प्रत्येक निर्णय तर्कशुद्ध व विवेकी असेल या स्वत:वर लादून घेतलेल्या बंधनाचे काय होईल? छाप-काटा वा अशा प्रकारच्या असंबद्ध गोष्टीवरून (अविवेकी) निर्णय घेणे विवेकात बसेल का? यानंतर सरळ सरळ देवाला कौल मागणे यालाही विवेकी कृती म्हणणार की काय? विवेकी अविवेकीपणा कितपत विवेकी असू शकेल? या प्रकारच्या प्रश्नांना त्याच्याजवळ उत्तर नव्हते व उत्तर शोधण्यासाठी फुरसतही नव्हती. विवेकी-विचाराच्या दबावामुळे त्याला आणखी जास्त भूक लागली. व नेमके काय करावे हा प्रश्न तसाच अधांतरी राहिला.

Source: The Paradox of Buridan's Ass in the Middle Ages

आयुष्याच्या नेहमीच्या चाकोरीत अशा प्रकारचे विरोधाभासाचे प्रसंग अनेक वेळा येत असतात. पुढे जाण्यासाठी एक पाऊल मागे टाकावे हा विरोधाभास पटकन लक्षातही येत नाही. आपणही अशा प्रकारची विरोधाभासात्मक विधानं सहजपणे करू शकतो. त्यासाठी प्रथम आपल्याला ज्याच्यावर भर द्यायचा त्याची यादी (उदा आस्तिक, शहाणा, आरोग्य, ज्ञान, मांजर इ.इ. ) व दुसऱ्या यादीत पहिल्या यादीतील शब्दांच्या विरुद्ध अर्थछटांच्या शब्दांची यादी (नास्तिक, मूर्ख, आजार, अज्ञान, कुत्रा वगैरे, वगैरे) अशा दोन याद्या करावे लागतील. "आस्तिकाच्या मुखवट्याखाली नास्तिक लपलेला असतो", "खरे शहाणे नेहमीच अत्यंत मूर्खासारखे वागत असतात", "आरोग्यवंतांचा आजार हा मुळातच आजार नसतो", "अज्ञानाविषयीचे संपूर्ण ज्ञानच उच्च प्रतीचे ज्ञान ठरेल", "मांजराबद्दलची इत्थंभूत माहिती हवी असल्यास कुत्र्यांच्या अभ्यासावर भर द्यावे" इ.इ.
सचिनची विचार करण्याची पद्धतही अशीच विरोधाभासयुक्त आहे. काही वेळा अविवेकीपणाने वागण्यातच विवेकीपणा असतो हे विधान एकदम तकलादू वाटेल. मांजरासाठी कुत्र्याच्या अभ्यासावर भर द्या या विधानाइतकेच ते असंबद्ध विधान असेल.
अविवेकी कृती करणे विवेकात बसत नाही, असे आपले ठाम मत असते. नाणे उडवून निर्णय घेणे ही अविवेकी कृती ठरेल. अशा प्रकारच्या अविवेकी कृतीमधून विवेकी निर्णय कधीच मिळणार नाही. मात्र कृती काही का असेना, अंतिम परिणाम/निर्णय विवेकात बसत असल्यास त्या कृतीचा एवढा बाऊ का करावा असेही वाटू लागेल. परंतु या गदारोळात साधनशुचितेला तिलांजली द्यावे लागेल. व साधनशुचितेला तिलांजली देणे विवेकात बसवता येत नाही.
इतर काहींच्या मते अशा प्रकारच्या विरोधाभासाचे मूळ विवेकी विचाराऐवजी भाषेतील त्रुटीत शोधायला हवे. आपण अविवेकी (irrational) व विवेकविरहित (non-rational) यामध्ये गल्लत करत आहोत. एखाद्या निर्णयासाठी नाणे उडवून छाप-काटा करणे ही अविवेकी कृती नसून विवेकविरहित कृती असे फार तर म्हणता येईल. यात विवेकही नाही व अविवेकही नाही. अशा कृतीत वा प्रक्रियेत विवेकाचा शोध घेत राहणे योग्य ठरणार नाही. आपण अशा प्रकारचे अनेक विवेकविरहित कृती करतच असतो. काहींना शाकाहारी जेवण आवडत असते तर काहींना मांसाहारी. काहींना चिकन तर काहींना मटण, .... काहींना शुभ्र पांढरा रंग व इतर काहींना आकाशी निळा.... काहींना सुती कपडे तर इतरांना रेशमीचे कपडे..... याप्रकारच्या वैयक्तिक आवडी-निवडीत विवेक वा अविवेक असे काही नसते. त्यामागील तर्क-कारणांचा शोध घेणेच अविवेकीपणाचे द्योतक ठरेल. त्या आवडी-निवडींचा अट्टाहास करणे मात्र अविवेकीपणा ठरू शकेल.
या तर्क पद्धतीचा स्वीकार केल्यास विरोधाभासातील हवाच निघून जाईल. अविवेकी प्रक्रियेचा वापर करून निर्णय घेणेसुद्धा काही वेळा क्षम्यच नव्हे तर विवेकयुक्त ठरेल. सचिनला कुठल्या ठिकाणी जेवायला जावे याचा निर्णय घेता आले नाही व त्यातील एकाच्या निवडीसाठी छाप-काटा करत असल्यास ते सर्वार्थाने विवेकीच असेल व त्यात कुठलाही विरोधाभास नसेल याची खात्री बाळगावी.
विवेकाला शिव्याशाप देणारे प्रत्येक कृती वा विधान विवेकशील असू शकत नाही असे नेहमीच म्हणत आले आहेत. यासाठीची कारणं काही का असेनात, त्यांचे निष्कर्ष मात्र अत्यंत चुकीचे आहेत. विवेकाचे आधिपत्य मान्य करणाऱ्यांना आपण विवेकी प्रक्रिया केव्हा वापरावे व विवेकविरहित प्रक्रिया केव्हा वापरावे याचे पूर्ण भान असते. उदाहरणार्थ वनौषधी वापरून एखादी व्याधी कमी होत असल्यास त्याचा वापर करणे विवेकयुक्त ठरेल. कदाचित ती वनौषधी कशामुळे व्याधी बरे करते हे माहितही नसेल. परंतु होमिओपथी उपचार पद्धती कधीच रोगोपचारात उपयोगी ठरणार नाही हे माहित असूनसुद्धा 'एकदा घेऊन बघायला काय हरकत आहे?' असे म्हणत ती उपचार पद्धती चालू करणे अविवेकीपणाचे लक्षण ठरेल.
विवेकविरहित असण्यामध्ये विवेक असू शकते असे विधान करत असल्यास आपण अविवेकीपणाचे दरवाजे सताड उघडे ठेवत आहोत असा अर्थ होत नाही. याचबरोबर संशयास्पद कृतींना विवेकविरहित कृती म्हणून काहीही करण्यास यात मुभा नाही हेही लक्षात ठेवावे लागेल.

Comments

चांगली लेखमाला

ही लेखमाला आवर्जून वाचते.

विवेकाचे आधिपत्य मान्य करणाऱ्यांना आपण विवेकी प्रक्रिया केव्हा वापरावे व विवेकविरहित प्रक्रिया केव्हा वापरावे याचे पूर्ण भान असते. उदाहरणार्थ वनौषधी वापरून एखादी व्याधी कमी होत असल्यास त्याचा वापर करणे विवेकयुक्त ठरेल. कदाचित ती वनौषधी कशामुळे व्याधी बरे करते हे माहितही नसेल. परंतु होमिओपथी उपचार पद्धती कधीच रोगोपचारात उपयोगी ठरणार नाही हे माहित असूनसुद्धा 'एकदा घेऊन बघायला काय हरकत आहे?' असे म्हणत ती उपचार पद्धती चालू करणे अविवेकीपणाचे लक्षण ठरेल.

जडीबुटीचा विवेकयुक्त वापर तेव्हा म्हणता येईल, जेव्हा एखाद्या गोष्टीचे सगळे नाही, तरी बहुसंख्य परिणाम काय आहेत हे माहिती असेल. म्हणजे औषधांवर लिहीलेले असते तसे की यामुळे काहींना हाय ब्लड प्रेशर, अपचन इ. इ. त्रास होऊ शकतात, म्हणून अमूक औषध अमूक आजारपण असलेल्यांनी घेऊ नये वगैरे. जेव्हा आपण करत आहोत त्याचे सर्व परिणाम माहिती नसतात, तेव्हा त्या दिशेने जायची विवेकी माणसाची खरे तर तयारी नसायला हवी.

होमिओपथीचा उपयोग नसला आणि ती काही वाईट परिणामही करत नसली तर ती केवळ मानसिक समाधानासाठी चालू ठेवणे हे फारतर विवेकविरहितपणाचे म्हणता येईल, अविवेकीपणाचे नव्हे. (मी स्वत: होमिओपथीचा वापर न केल्याने मला याबद्दल चांगले वाईट काहीच बोलायचे नाही. फक्त तुम्ही वापरले आहे म्हणून एक उदाहरण म्हणून दिले).

पण एखादे नवीन औषध बाजारात आले आहे, आणि त्याचे परिणाम स्वतःवर काय होतील हे समजून न घेता ते घेणे हे नक्कीच अविवेकीपणाचे लक्षण समजले जाईल.

चू. भू. दे. घे.

कसे ठरवणार?

पण एखादे नवीन औषध बाजारात आले आहे, आणि त्याचे परिणाम स्वतःवर काय होतील हे समजून न घेता ते घेणे हे नक्कीच अविवेकीपणाचे लक्षण समजले जाईल.

या बद्दल धनंजय अधिक लिहु शकतील. बाजारात औषध आणण्यापुर्वी त्याच्या काही चाचण्या घेतल्या जातात. अर्थात आपण त्यात समाविष्ट नसतो. स्वतःवर काय परिणाम होतील हे केवळ तर्काने आपण ठरवु शकतो. प्रत्यक्ष स्वतः घेतल्याशिवाय त्याचे काय परिणाम होतील हे ठरविणे अवघड. गंमत म्हणुन बाजारात आलेले औषध कोण घेईल? वैद्यकीय सल्ल्याशिवाय औषध घेणे विवेकी का अविवेकी? औषधपचाराबाबत वैद्यकीय सल्ला हा व्यक्तिसापेक्ष असणार नाही काय?
प्रकाश घाटपांडे

नक्कीच असेल

हेच म्हणायचे आहे, की माहिती नसताना औषध घेणे हे तितकेसे योग्य नाही.

माझ्या मते अमूक एक गोष्ट उपयुक्त नाही, पण निरूपद्रवी आहे हे बर्‍यापैकी नक्की माहिती आहे- उदा. सर्दी झाल्यावर आल्याचा चहा पिणे, सर्दीचा त्रास कमी व्हायला समजा आले घालून केलेल्या चहाऐवजी गरम पाणीही चालेल, तर असा चहा पिणे, आले किसणे, चहा करणे, त्यात वेळ घालवणे हे कदाचित वरील लेखाप्रमाणे विवेकविरहित समजू शकू (इथे आल्याची इतर औषधी उपयुक्तता वगळली आहे). पण अविवेकी नसावे. एवढेच म्हणायचे आहे.

अमूक एक केल्याने अमूक एक प्रकारचा फायदा होऊ शकेल,आणि अमूक एक प्रकारचे नुकसान होईल, पण फायदा नुकसानाहून अधिक आहे, हे समजावण्याची प्रक्रिया वेगळी असायला हवी. त्यासाठी पद्धती काय वापरली आहे, का वापरली आहे, (विवेकी आहे/ अविवेकी) इ. इ. माहिती पाहिजेच, पण वर्तनात बदल हा ती पद्धती वापरल्याने होणारा भविष्यातील फायदा भविष्यातील नुकसानापेक्षा मोठा आहे हे दाखवून देण्यानेच होईल.

कोण् ठरवणार?

परंतु होमिओपथी उपचार पद्धती कधीच रोगोपचारात उपयोगी ठरणार नाही हे माहित असूनसुद्धा 'एकदा घेऊन बघायला काय हरकत आहे?' असे म्हणत ती उपचार पद्धती चालू करणे अविवेकीपणाचे लक्षण ठरेल.

यात होमिओपथी ही रोगोपचारात कधीच उपयोगी ठरणार नाही हे कोणास माहित असते? उपाय होणार नाही पण अपाय तर होणार नाही ना या समजुतीतुन त्याने वापरले तर? उपचार घेणार्‍यांवर प्लासिबो काम करीत असेल तर? असे प्रश्न उपस्थित होतातच.
आणि भुक लागल्यावर विवेक तत्वज्ञान वगैरे सुचत नाही. या गोष्टी भरल्यापोटीच सुचतात.
प्रकाश घाटपांडे

छापा काटा कशासाठी

उत्स्फूर्ततेला थारा न देता विवेकी निर्णयप्रक्रियेतूनच जायचे बंधन त्यानी स्वत:वर लादून घेतलेले आहे
वही घ्यायला बाजारात गेल्यावर समोर ठेवलेल्या पन्नास वह्यांच्या चळतीतून पहिली घ्यावी की दूसरी की तिसरी याचा विचार विवेकानेच करायचा असे बंधन स्वतःवर लादून घेणेच मूळात अविवेकाचे ठरते. विवेक कुठे वापरायचा आणि कुठे नाही याचाही सारासार विवेक ठेवला गेला पाहीजे. ज्या वेळी एखादी व्यक्ती छापा काटा सारख्या कृतीतून आपला निर्णय ठरवण्याचा विचार करु पहाते तेव्हा खरे तर त्याला छापा पडो की काटा कुठलीही एक क्रिया करण्याबद्दलचा निर्णय हवा असतो. तो करणार असलेल्या दोन्ही ही क्रियांच्या फायद्यातोट्यात काहीही फरक नसतो. असा फरक असता तर छापा काटा करण्याची वेळच येत नाही.

कुठलाही निर्णय घेतांना त्याच्या भल्याबूऱ्या परिणामांना निर्णय घेणारा सर्वथा जबाबदार असतो. अशी जबाबदारी टाळण्यास्तव बऱ्याच वेळा छापाकाटा सारख्या किंवा कौल काढण्यासारख्या कल्पनांचा आधार घेतला जातो.

भुक लागल्यावर विवेक तत्वज्ञान वगैरे सुचत नाही. या गोष्टी भरल्यापोटीच सुचतात.

प्रकाशरावांच्या विधानाशी सहमत
अशा काहीच न सुचणाऱ्या सावजांच्या शोधात बरेच संधीसाधू असतात. आणि काहीच न सुचण्याची परिस्थिती कुठल्याही भुकेतून उद्भवते. त्याला फक्त पोटाचीच भूक हवी असेही नाही.

छाप काटा

जर दोन पर्याय संपूर्णपणे सारखे असतील तर निर्णयाचा प्रश्नच कुठे येतो? विवेकबुद्धीचा वापर हा दोन पर्यायांमधला फरक जाणून घेऊन त्यातला "योग्य" पर्याय स्वीकारण्यात असतो. सचिनने जो निर्णय घेतला तो पिझ्झा हट की डॉमिनोज असा नसून पुढच्या पाच मिनिटात खायचं की ज्या दोन पर्यायांत काहीही फरक सांगता येत नाही त्यात फरक करण्याचा प्रयत्न करायचा या दोन पर्यायांमध्ये घेतला. आणि त्यात त्याने अर्थातच विवेकबुद्धी वापरली. पिझ्झा हट की डॉमिनोज हा निर्णय मला non-rational पेक्षा rationality-irrelavant म्हणावासा वाटेल. गणितात शून्याने भागता येत नाही, त्याच प्रमणे याबाबतीत विवेकाचा विचारच करता येत नाही.

 
^ वर