स्वामी रामानंद
स्वामी रामानंद
महाराष्ट्रातले संत कोण म्हणून विचारले तर आपण ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम वगैरे नावे पटकन सांगू शकाल. पण
महाराष्ट्राबाहेरच्या संतांची नावे विचारली तर, कबीर, मीराबाई, तुलसीदास .. अं,अं ला सुरवात होईल. एखादा सुरदास, नरसी मेहता वगैरे एखाद दुसरे नाव जोडेल पण बहुदा आपली धाव येथपर्यंतच. उत्तर हिन्दुस्थानातील संतांची ही गत तर दक्षिणेतील पुरंदरदास इत्यादींची माहीती नसणे स्वाभावीक आहे. आळवार हे संतांचे नाव की लुगड्याचा प्रकार हेही सांगता येणार नाही. विषय निघाला श्री. नितिनजी यांच्या प्रतिसादावरून. त्यांना रामपंथ की रामानंदी पंथ या बाबतच संभ्रम होता व त्याचा संबंध परदेशातील अयुथ्या नगराशी असावा असेही त्यांना वाटले. तर आज या रामानंदी पंथाची व त्याचे संस्थापक रामानंद यांची माहीती घेऊ.
रामानंद (इ.स.१४१०-१५१०)
रामायत वा रामानंद संप्रदायाचे (पंथाचे) प्रणेते व आचार्य. प्रयागचा जन्म.काशीला राघवानंद नावाचे अद्वैती संन्यासी होते त्यांचे शिष्य. आपल्याकडील चांगदेवांची कथा आहे त्या प्रमाणे राघवानंदांनी योग व समाधी यांचे शिक्षण देऊन रामानंदांचा अपमृत्यु टाळला व पुढे रामानंद चांगले १०० वर्षे जगले. राघवानंदांच्या संप्रदायात जातपात व खाण्यापिण्याबाबतीत कडक निर्बंध होते. रामानंदांना ते मान्य नव्हते. ते म्हणत
जातीपांती पुछै नही कोई !
हरिको भजै सो हरिका होई !!
रामानंदांनी आपला नवा संप्रदाय प्रवर्तित केला. त्यात सर्व जातींना,स्त्रीयांना प्रवेश होता.रामानंद विशिष्टाद्वैत मानणारे होते. प्रभावी प्रचारक व उच्च नीतिमत्ता व सर्वाभूती समभाव यांच्यामुळे अनेक चरित्रकारांनी त्यांचा गौरव केला आहे. मौ. रशिदुद्दिन या समकालीन फकिराने मुसलमानी संतांच्या चरित्राचे पुस्तक लिहले आहे. त्यात तो रामानंदांबद्दलही लिहतो
काशीत पंचगंगा घाटावर एक तेज:पुंज, पूर्णयोगेश्वर महात्मा रहातो. तो वैष्णवांचा आचार्य सदाचार व ब्रह्मनिष्ठा याचा मूर्तिमंत पुतळाच आहे. परमात्मतत्वाचे रहस्य तो पूर्णपणे जाणतो.खर्याखुर्या भगवद्भाक्तांवर व ब्रह्मवेत्त्यांच्या समाजावर त्याचा उत्कृष्ट प्रभाव आहे. धर्मसत्तेत तो हिन्दूंचा धर्म-कर्म सम्राट आहे. त्या पवित्र आत्म्याला स्वामी रामानंद म्हणतात. त्याचे पाचशेहून अधिक शिष्य आहेत.
प्रा.बलदेव उपाध्याय लिहतात :" हिन्दु समाजात जातिभेदविरहित ऐक्य निर्माण करून स्वामींनी मुसलमान आक्रमणाला तोंड दिले. भारतीय संस्कृती व सभ्यता टिकवून धरण्यात त्यांचे मोठे अनुदान आहे." स्वामींनी संस्कृत व हिन्दी भाषेत १५-१६ ग्रंथ लिहले.ते युगधर्म ओळखणारे धर्मसुधारक होते. मुसलमानांनी बळजबरीने बाटवलेल्या हिन्दूंना त्यांनी रामतारक मंत्र देऊन परत हिन्दू बनविले.
रामानंद संप्रदाय ;
हा संप्रदाय पूर्वी "श्री" संप्रदायाची शाखा म्हणून ओळखला जाई. परंतू १०० एक वर्षांपूर्वी एका आंदोलनात "श्री" म्हणजे लक्ष्मी हा अर्थ सोडून
श्री म्हणजे सीता असा अर्थ घेऊन या पंथाने आपले निराळेपण सिद्ध केले. आनंदभाष्य या ब्रह्मसूत्रावरील भाष्याला या पंथात मान्यता आहे. त्यात शूद्रांना वेदाध्ययनाचा अधिकार दिला आहे. ब्रह्म शब्दाने रामाचाच बोध होतो.तो निर्गुण व सगुणही आहे.राम हा करुणासिंधू, कल्याणगुणाकार व तीनही लोकांमध्ये परमप्राप्य आहे. रामाचे दास्य स्विकारून भक्ताने ईर्षारहित व समाधानी राहावे.भगवान शेषी व भक्त त्याचा शेष आहे.भगवंताचे दास्य हे त्याचे एकमेव प्रयोजन आहे. भगवंताच्या कृपेने मोक्ष मिळतो.मूलमंत्र, रामद्वयमंत्र व चरममंत्र हे तीन रहस्यमय मंत्र आहेत.भक्ती ही परममहत्वाची गणली असून तीचे निरुपण केलेले आहे.पंथाच्या १० गाद्या पंजाब,राजस्थानात आहेत. सात आखाडे आहेत. त्यांची नावे, दिगंबर, निर्वाणी, निर्मोही,खाकी, निरालंबी, संतोषी व महानिर्वाणी.आखाड्यांची कर्तव्ये व शासनव्यवस्था ठरलेली आहे. सदस्य महंत निवडतात व तो आपले पदाधिकारी नियुक्त करतो. कुम्भमेळ्याच्या ठिकाणी नाशीक, प्रयाग, हरिद्वार व उज्जैन
येथे सर्व ठरलेल्या क्रमाने भेटतात. रामानंद व रामदास यांच्या कार्यात बरेच साम्य आढळते.
शरद
Comments
अरे वा
लेखमालेची उत्तम कल्पना आहे.
स्वामी रामानंद यांच्या विषयी अजून माहिती मात्र हवी होती.
आखाडे वगैरे नाशिकच्या कुंभ मेळ्यामुळे चांगले परिचयाचे आहेत. त्यांचे नियम असले तरी ते आपापसात भांडतातच.
मात्र त्याच वेळी सध्या त्यांना मिळणारा जनतेचा पाठींबा काहीच नाही हे मागच्या कुंभाच्या वेळी चांगलेच जाणवले!
म्हणजे पंथ समाजापासून तुटत चालला आहे की काय असे वाटायला जागा आहे. मात्र त्याच वेळी हे आखाडे खुप जमिनी आणि संपत्ती राखून आहेत, हे ही महत्त्वाचे.
पुढील लेखाच्या प्रतिक्षेत.
आपला
गुंडोपंत
जालावर
या लेख वरून प्रेरीत होऊन
जालावर स्वामी रामानंद असा मराठी शोध घेतला असता
स्वामी रामानंद तीर्थ यांनी जालाचा ताबा घेतल्याचे अनुभवाला आले.
आपल्याला ही महिती कुठे मिळाली?
संदर्भ नाही दिलेत?
ते ही महत्त्वाचे आहेत. पुस्तकाचे नाव वगैरे?
आपला
गुंडोपंत
लेख आवडला
जालावर स्वामी रामानंद असा मराठी शोध घेतला असता
आम्हीही मध्ययुगीन काळातील संतांचा शोध घेत होतो. स्वामी रामानंद सापडले नाही.
महाराष्ट्राबाहेरचे संत असल्यामुळे स्वामी रामानंद तुमच्यासारखेच आम्हालाही नवीन आहेत.
आपल्याला ही महिती कुठे मिळाली?
संदर्भ नाही दिलेत?ते ही महत्त्वाचे आहेत. पुस्तकाचे नाव वगैरे?
पंत, तुमचे सध्या उपक्रमवर लक्ष नाही. हा प्रतिसाद वाचला नाही का ?
अरे हो, स्वामी रामानंद यांच्या माहितीपूर्ण लेखनाबद्दल आभार...!
-दिलीप बिरुटे
सम्डाभः
भारतीय संस्कृती कोश. खंड ८ वा.
शरद