रंगांची करामत!

फोर्थ डायमेन्शन 38
रंगांची करामत!

डॉ. सुशीला पाटील यांची रंगपट विज्ञान या विषयावर प्रभुत्त्व आहे. वर्णमालिकेतील लाल रंगाविषयी तिचा विशेष अभ्यास असल्यामुळे जगभरातील अनेक तंत्रज्ञ व वैज्ञानिक तिच्याशी सतत संपर्कात असतात. कारण तिच्या डॉक्टरेटसाठीचा विषय लाल रंग होता. त्यामुळे अंतरराष्ट्रीय स्तरावर तिच्या नावाचा फार गवगवा आहे. लाल रंग हा तिला आयुष्यभर पुरणाऱ्या अभ्यासाचा विषय झाला आहे. इन्फ्रारेडच्या पलिकडील रंग आपल्या डोळयांना का दिसत नाहीत? टोमॅटोचा रंग लालच का? रक्तातल्या काही पेशी तांबडया का दिसतात? सूर्योदयाच्या काळात आकाश तांबडा का दिसतो? माणसांना लाल रंगाचे एवढे आकर्षण का? इत्यादी हजारो प्रश्नांच्या उत्तरांचा साठा तिच्याकडे आहे. लाल रंगाविषयी कुठलीही शंका असो, सुशीला पाटीलकडून मुद्देसूद व तर्कशुध्द उत्तर मिळणार याची त्या क्षेत्रातील तज्ञांची खात्री होती.
यात काय विशेष असे प्रथमदर्शनी अनेकाना वाटण्याची शक्यता आहे. परंतु सुशीला जन्मत: रंगांधळी आहे हे कळल्यावर ते आपली मतं बदलण्याची शक्यता आहे. रंगांधळेपणामुळे एखाद्या जुन्या कृष्ण-धवल चित्रपटाप्रमाणे तिला सर्व जग फक्त काळे-पांढरे या दोनच रंगात दिसते, हे समजल्यावर अनेकाना धक्का बसेल. तिला काळा व पांढरा या दोन रंगाव्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्याही रंगाची अनुभूती नाही. तरीसुध्दा ती वर्णपट-वैज्ञानिक आहे व या विषयावर तिची अथॉरिटी आहे.
मात्र काही दिवसात हे चित्र पूर्णपणे बदलणार आहे. तिच्या डोळयाच्या दृक्पटलात कुठलाही दोष नसून तिच्या मेंदूला डोळयाकडून सूचना पोचत नाहीत, त्यामुळे ती रंगांधळी आहे, असा निष्कर्ष तेथील ख्यातनाम तज्ञ डॉक्टरानी काढला आहे. अत्याधुनिक वैद्यकीय संशोधनामुळे तिच्यातील हा दोष काढून टाकणे आता शक्य होणार आहे. यानंतरचे तिचे आयुष्य पूर्णपणे बदलून जाणार आहे. येत्या काही दिवसातच रंग म्हणजे नेमके काय याचा तिला प्रत्यक्ष अनुभव येणार आहे. तिच्या आयुष्यात रंगांची उधळण होणार आहे.
विविध रंगांच्या संबंधातील सर्व वैज्ञानिक नियम, सिध्दांत, तरंगांतर, तरंगांची लांबी-रुंदी, याविषयी जगभर चाललेले प्रयोग, त्यांचे निष्कर्ष, इत्यादीसंबंधीचे अद्यावत ज्ञान असूनही तिला लाल रंग म्हणजे नेमके काय हे माहित नसल्यामुळे तिचे ज्ञान अपुरे ठरत होते. रंगवैविध्य समजून घेण्यातील या उणिवेमुळे काहीतरी चुकल्यासारखे वाटत होते.
यानंतर मात्र हे सर्व बदलणार आहे!

( Source: What Mary Didn't Know: Frank Jackson, OUP, 1991)

आपले मानवी शरीर व आपले मन हे दोन्ही एकाच ठिकाणी असल्यासारखे वाटत असल्यामुळे आपल्या येथील अनेक जाणकारसुध्दा शरीर व मन हे भिन्न असू शकतात, असा विचार करत नाहीत. कदाचित विचार करण्याइतपत त्यांच्याकडे वेळ नसावा. एकेकाळचा अजरामर आत्मा (देव आनंदच्या गाईड चित्रपटातील ते संवाद आठवून पहा!) कालबाह्य, बिनबुडाचा, विनाअस्तित्त्वाचा ठरल्यामुळे विचारपध्दतीत फार मोठी पोकळी निर्माण झाली आहे. या आत्म्याची जागा आता मन घेऊ पाहत आहे. परंतु एखादी गोष्ट/संकल्पना चुकीची ठरली म्हणून उरलेल्या गोष्टी/संकल्पना अचूक आहेत असा अर्थ त्यातून ध्वनित होत नाही.
शरीर व मन भिन्न नाहीत याच्या पुष्टयर्थ काही पर्याय सुचवण्याचा खटाटोप नेहमीच केला जात असतो. कदाचित पर्याय म्हणून भौतिकवाद आपल्या डोळयासमोर चटकन उभा राहील. हे जग, या जगातील यच्चयावत घटना, येथील सर्व व्यवहार इत्यादींच्या मागे कुठलीही अद्भुत, अलौकिक, पारमार्थिक शक्ती नसून या सर्व गोष्टींचे, व्यवहारांचे, नैसर्गिक कोप-प्रकोपांचे इत्थंभूत वर्णन, त्यांच्या कार्य-कारणांचे विश्लेषण भौतिक तत्त्व, नियम, सिध्दांत इत्यादींच्याद्वारे करणे सहज शक्य आहे. काही वेळा काही वस्तु अणु-रेणूंच्याऐवजी ऊर्जेच्या स्वरूपात असल्या तरी इतर सर्व वस्तू खुर्ची-टेबलाप्रमाणे अणू-परमाणूंच्या रचनेतूनच निर्माण झालेल्या आहेत असे ठामपणे सांगता येणे शक्य आहे.
वर उल्लेख केलेल्या विधानांची पुनर्तपासणी केल्यास भौतिकवादाचे पुरस्कर्ते टोकाची भूमिका तर घेत नाहीत ना? असेही वाटण्याची शक्यता आहे. भौतिक नियम व सिध्दांतांच्या आधाराने वर्णन करता येणे शक्य नाही, अशी एखादी तरी वस्तु या जगात नक्कीच सापडेल असा आत्मविश्वास अनेकांना आहे. आज जरी त्या अद्भुत संकल्पना वाटत असल्या तरी भविष्यात त्या कदाचित अस्तित्वात येतील हे नाकारण्यात अर्थ नाही. उदाहरणार्थ पुरातन काळातील आकाशवाणीची ढोबळ व स्वप्नवत असलेली संकल्पना आज ती विज्ञान-तंत्रज्ञानाच्या मुशीतून सत्यस्थितीत अवतरलेली आहे हे नाकारता येत नाही. कोण जाणे, आजच्या अशाच काही कल्पनारम्य संकल्पना काही कालावधीनंतर अस्तित्वात येतीलही!
नेमकी हीच गोष्ट सुशीला पाटीलच्या बाबतीत घडत असावी. एक तज्ञ म्हणून लाल रंगाची सर्व भौतिक बाजू सुशीला पाटीलला माहीत आहे. त्याची तरंग लांबी, डोळयावर होणारे त्याचे परिणाम, परावर्तन, वक्रीभवन, विकीरण, रासायनिक गुणधर्म, डोळयात घडणारी जैविक प्रक्रिया, त्याच्या अणू-रेणूंची रचना इत्यादी सर्व बारकावे तिला माहित आहेत. तरीसुध्दा लाल रंग कसा दिसतो याची तिला अजिबात कल्पना नाही. रंगाविषयीच्या वैज्ञानिक ज्ञानसंग्रहामधून हा रंग नेमका कसा दिसेल हे ती कधीच सांगू शकणर नाही.
विज्ञान नेहमीच निरपेक्ष, प्रयोगात्मक, व मोज-माप करता येणारे असते. त्याउलट इंद्रियानुभव - किंवा मानसिक अनुभव - व्यक्तीसापेक्ष, प्रयोगाच्या आटोक्यात न येणारे, मोज मापाच्या पलिकडे असे काही तरी असते. त्यामुळेच एखाद्या वस्तूचे भौतिक/रासायनिक वर्णन कितीही अचूक, परिपूर्ण व साधार असूनसुध्दा त्यासंबंधात एखाद्याच्या मनातील आकलन काय असेल हे नेमकेपणाने सांगता येत नाही. मानसिकतेला भौतिक स्वरूपात सादर करणे जवळ जवळ अशक्यातली गोष्ट ठरेल.
भौतिकतेच्या पुरस्कर्त्यांना हे नेहमीच गोंधळात टाकणारे ठरत आहे. एखादी गोष्ट भौतिकदृष्टया अस्तित्वात नसतानाही मानसिकरित्या ती अस्तित्त्वात कसे काय असू शकते याचे नेहमीच त्याना आश्चर्य वाटत आले आहे. उदाहरणार्थ, ईश्वर ही संकल्पना बहुतांशाच्या मनामध्ये कशी काय अजूनही घर करून बसलेली आहे हे एक न सुटणारे कोडे ठरत आहे
सुशीला पाटीलला या सर्व प्रकाराबद्दल काय वाटत असावे याचाही विचार करता येईल. सुशीला पाटील भौतिकवादावर विश्वास दर्शवणारी असल्यास एखाद्या वस्तूचे बाह्यरूप व त्या वस्तूची सत्य स्थिती यात फरक असण्याची शक्यता आहे असे तिच्या लक्षात येईल. वस्तू जशी दिसते व ती कशी असते या दोन भिन्न गोष्टी आहेत. विज्ञानाचा संबंध ती कशी असते याच्याशी असून त्यावेळी वस्तु कशी दिसते हा विचार गौण ठरतो. वस्तु एखाद्याला कशी दिसते याच्याशी विज्ञानाचे काही देणे घेणे नाही. डॉ. सुशीला पाटीलला लाल रंगाविषयी साद्यंत ज्ञान आहे, इत्थंभूत माहिती आहे. फक्त इतराप्रमाणे हा रंग कसा दिसतो याचा तिला अनुभव नाही. कदाचित तिला लाल रंग धूसर पांढरा, फिका, काळसर असाही दिसत असेल, म्हणून काही फरक पडणार नाही.
सुशीला पाटीलच्या मेंदूवरील शस्त्रक्रियेनंतर प्रथमच - इतराप्रमाणे - ती लाल रंग बघू शकेल. परंतु त्यामुळे लाल रंगाविषयीच्या तिच्या ज्ञानात नवीन काही भर पडेल का? कदाचित नाही. फक्त तिला नैसर्गिकरित्या लाल रंग खरोखरच कसा दिसतो एवढेच कळू शकेल. बाकी तसा काही फरक पडणार नाही.
म्हणूनच सामान्यांची भाषा व त्यानी एखाद्या शब्दाचा लावलेला अर्थ आणि तज्ञांची भाषा व त्यानी त्या शब्दाला लावलेला अर्थ सर्वस्वी वेगवेगळे असण्याची शक्यता नाकारता येत नाही!

लेखनविषय: दुवे:

Comments

रोचक

मात्र "माणसांना लाल रंगाचे एवढे आकर्षण का?" या प्रश्नाचे उत्तर डॉ. सुशिला पाटील अन्य प्रकारे देतील असे वाटते.

सौंदर्य/आस्वाद/आकर्षण यांच्या बाबतीत प्रत्यक्ष इंद्रियांनी अनुभव हवाच.

अत्यंत् रोचक्.

रोचक् विषय आणि खुप् नविन माहीती.

धनंजय यांचा खालील् प्रतिसाद् खुपच माहितीपुर्ण!

सौंदर्य/आस्वाद/आकर्षण यांच्या बाबतीत प्रत्यक्ष इंद्रियांनी अनुभव हवाच.

मला वाटतं सौंदर्य आस्वाद या 'कल्पनांचा' उगम हा इंद्रीयांच्या अनुभवातुनच असावा.

जाता जाता, मी श्रवणबधीर् आहे हा शोध आज् लागला! :(

रंगच नव्हे तर सर्वच ज्ञानेंद्रिये

रंगांधळेपणाबाबत आपल्याला माहीत आहे, परंतु ही बाब सर्वच ज्ञानेंद्रियांबाबत आहे.

चव-आंधळेपणा : "दुपारच्या आमटीची चव बिघडली आहे, टाकून दे" असे बाबा आईला सांगत. कधीकधी चवीत फरक मलाही कळायचा, पण कित्येकदा "चवीत काय फरक पडला आहे?" हे कळायचे नाही. अशा प्रकारचा अनुभव कितीतरी लोकांना स्वतःबद्दल किंवा ओळखीच्या लोकांबद्दल आला असेल.

काही लोकांना चव-आंधळेपणा असतो अशापैकी एका द्रव्याचा अभ्यास झाला आहे - पीटीसी - या द्रव्याची वैशिष्ट्यपूर्ण कडवट चव काही लोकांना जाणवते, काही लोकांना मुळीच कुठली चव जाणवत नाही.

घ्राण-आंधळेपणा: काही लोकांना अमुक एक वास किंवा तमुक एक वास जाणवत नाही. याला "स्पेसिफिक ऍनॉस्मिया" असे वैद्यकीय/जीवशास्त्रीय नाव आहे (ज्यांना उतरवणे जमेल त्यांच्यासाठी "नेचर" मासिकातला दुवा). त्याच प्रमाणे काही लोक जन्मतःच पूर्णपणे घ्राण-आंधळे असतात (कॉन्जेनिटल ऍनॉस्मिया).

श्रवणबधिरपणा : लहान मुलांना जितके अतितारस्वर ऐकू येतात तितके प्रौढांना ऐकू येत नाहीत. इतकेच काय "आपले काही हरवले आहे" ही जाणीव नाही. म्हणजे जे हरवले, त्याबाबत फ्रीक्वेन्सी वगैरे प्रकारचे तांत्रिक ज्ञान आहे, पण जाणीव अशी काही नाही. याबाबत एक रेडियो वृत्तांत येथे ऐकू/वाचू शकाल, जमल्यास अतितार स्वरातील ध्वनी आपल्याला ऐकू येतात की नाही, त्याची स्वयंचाचणी घेऊ शकाल. (जन्मबधिर लोकांना काय जाणवत न/असेल त्याची स्वल्पशी जाणीव स्वानुभवातून करण्यास उपयोगी आहे... सुदैवाने मला त्या कथनातील ध्वनी आजही ऐकू येतो आहे. म्हणजे काही वर्षांनी मी त्या स्वरासाठी बहिरा झाल्यानंतर "काय हरवले" याची आठवणतरी राहील.)

स्पर्शआंधळेपणा : माझा अनुभव असा की बोटांनी ब्रेल वाचायचा मी जितका काही प्रयत्न केला आहे, त्यात कागदाचा खडबडीतपणा मला स्पष्ट जाणवतो, पण खडबडीतपणातला आकार जाणवत नाही. त्यामुळे अंध लोकांना असणारी स्पर्श-चित्र-जाणीव मला नाही. त्या दृष्टीने मी आंधळा आहे.

दृष्टीबाबतही : मी लहानपणीच चष्मा लावू लागलो. पण त्यापूर्वी दूरचे डोंगर म्हणजे ढोबळ ठिपके होते - भव्य+सुस्पष्ट वस्तू/वास्तू याची दृश्य जाणीव मला नव्हती. चष्मा डोळ्यांवरून उतरवून त्या आंधळ्या स्थितीत मी सहज पोचतो.

- - -

मला वाटते, की डॉ. सुशीला पाटील यांच्या काल्पनिक रंग-आंधळेपणाच्या उदाहरणातून निर्देश घेऊन, जर आपण स्वतःच्या अनुभवांची छाननी केली, तर वरील लेखातील विचार केवळ तांत्रिक राहाणार नाही. अनुभवलेला होईल.

अनुभुती

एखाद्या गोष्टीचा 'अनुभव' मी घेणे आणि 'अनुभुती' घेणे यात काय नेमका फरक आहे हे दाखवणारी धनंजयची ही प्रतिक्रिया मला वाटते. धनंजयाने अनुभुती हा शब्द कुठेही वापरला नाही.वैज्ञानिक दृष्टी लाभलेले लोक 'अनुभव' घेतात तर श्रद्धाळु/अंधश्रद्धाळु लोकांना अनुभुती येते हे प्रहसनात्मक द्वैत मला स्वतःला पटत नाही. अनुभवात 'सत्य' आहे आणि अनुभुतीत 'भ्रम' आहे हे देखील पुर्णतः मान्य करणे जड जाते. 'अनुभव' व 'अनुभुती' यात नेमका फरक काय हा शब्दोच्छल होउ शकेल. एकच 'अनुभव' दोन व्यक्तींना आला तरी व्यक्ती वेगळ्या असल्याने 'अनुभुती' वेगळी असणार आहे. त्या 'अनुभवाचा भावलेला अर्थ' या भुमिका वेगळ्या असु शकतात. त्यात व्यक्तीचे पुर्वदुषित/पोषित ग्रह हा महत्वाचा घटक ठरतो.
धनंजयची प्रतिक्रिया भावली.
प्रकाश घाटपांडे

उत्तम

विचारांना चालना देणारा लेख, धनंजय यांनी प्रतिसादात दिलेले दुवेही छान - विशेषत: श्रवणबधीरतेचा. अगदी वैयक्तिक, शब्दांत जो अनुभव प्रत्येकालाच पकडता येत नाही वा दुसर्‍याला सांगता येत नाही अशा या अनुभवाबद्दल चर्चा करताना वारंवार लाल रंगाचा उल्लेख यावा हे फार रोचक आहे.
प्रत्येकाची अनुभव घेण्याची आणि समजण्याची वेगवेगळी क्षमता - परिणामी प्रत्येकाचे निरनिराळे आकलन - त्यातून निर्माण होणारे वाद - लाल रंगासारख्या रोजच्या व्यवहारातील मूर्त, इंद्रियगोचर गोष्टीपासून अभिरूची, कलेची आवड, ईश्वराचे अस्तित्व यासारख्या अमूर्त बाबींवर या भिन्नतेचा होणारा परिणाम या सार्‍यांची फार सुरेख चर्चा/वर्णन ओरहान पामुक यांच्या 'माय नेम इज रेड' या पुस्तकात आहे; ती मुळातूनच वाचण्याजोगी.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

ह्याच बरोबर आठवणीतून साठवलेल्या

इंद्रीय अनुभवातून, प्रत्यक्ष समोर ती गोष्ट नसली तरीही काही प्रमाणात तो आनंद आपल्याला मिळू शकतो. आपण तो अनुभव जणू काही पुन्हा घेतो आहोत अशी अनुभूती होते.
म्हणजे मला कृष्णाकाठच्या हिरव्या वांग्याची खरपूस चव पक्की माहीत आहे. नुसत्या आठवणीने माझ्या जिभेवर जणूकाही ती चव घोळू लागते. :) ही समरसून घेतलेल्या अनुभवाची करामत!

चतुरंग

फरक

सुशीला पाटीलच्या मेंदूवरील शस्त्रक्रियेनंतर प्रथमच - इतराप्रमाणे - ती लाल रंग बघू शकेल. परंतु त्यामुळे लाल रंगाविषयीच्या तिच्या ज्ञानात नवीन काही भर पडेल का? कदाचित नाही. फक्त तिला नैसर्गिकरित्या लाल रंग खरोखरच कसा दिसतो एवढेच कळू शकेल. बाकी तसा काही फरक पडणार नाही.

१) कदाचित नाही- बाकी तसा काही फरक पडणार नाही
२) कचाचित हो- बाकी तसा काही फरक पडणार नाही
या दोन्ही तील फरक कदाचित सुशीला पाटील यांनाच कळेल आपल्याला नाही. ;)
प्रकाश घाटपांडे

 
^ वर