टू दी लाष्ट बूलेट..च्या निमित्तानं

26/11 च्या हल्ल्यात शहीद झालेले अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक कामटे यांच्या पत्नी आदरनिय विनिता कामटे यायनी 'टू दी लाष्ट बूलेट' चरित्रवजा लेखन लिव्हलं. अशोक कामटेंच्या जल्मापासून ते अखेरच्या श्वासापर्यंत ते शूर म्हणून कसे जगले त्याबद्दल लिव्हलं म्हणत्यात. आयुष्याचा आधार घरातलं माणूस जातो तव्हा त्याचं दु:ख सोसणार्‍यालाच म्हाइत. 'अशोक कामटेंना' भारतीय म्हणून सलामच हाये.
तसे मान्स हायेत म्हून आमी सुरक्षीत हावोत. आम्हाला त्यायचा अभिमान हाये.

पर एक गोठ या बूकाच्या निमित्तानं खटकून राह्यली. विनिता कामटे यायनी माहितीचा अधिकार वापरुन सारी माहिती गोळा केली. माहिती मिळण्यासही उशीर झाला. अशोक कामटेंना मदत मिळाली असती तर ते वाचले असते.

१) पोलिसाच्या कंट्रोलरुममधील 'गोपनिय संदेश' माहिती अधिकारात घेणे योग्य हाय का ?
२) 'पोलिसांचा समन्वयच नव्हता' म्हणून या घटना घडल्या असा संदेश समाजमनात जाणे योग्य हाय का ?

आपल्याला काय वाट्टं

Comments

पश्चात विश्लेषण

१) पोलिसाच्या कंट्रोलरुममधील 'गोपनिय संदेश' माहिती अधिकारात घेणे योग्य हाय का ?

कंट्रोलरुममधुन बिनतारी वाहनाला कुठे जा काय करा असे संदेश जात / येत असताता त्याचे महत्व हे तात्कालीन असते. पोलीसखात्यात पारदर्शकता ही घातक असते. गंमत म्हणजे कुणीही ब्रॉडबॅंड रिसिव्हर लावला तर त्यालाही हे संभाषण सहज ऐकु येउ शकते. तुम्हालाही येईल. जोपर्यंत तो प्रक्षेपक वापरित नाही तोपर्यंत आपल्या संभाषणात कुणी हस्तक्षेप करतय हे बिनतारी विभागाला समजत नाही. जरी समजले तरी पकडणे अवघड जाते. कारण डायरेक्शन फाईंडर ने पक्षेपकाची दिशा समजते पण ती बदलत राहीली तर गुंगारा मिळत राह्तो. कॉलसाईन या गोपनीय असतात पण अनाकलनीय नव्हे. ठाण्यला एक जॉनी वॉकर नावाने पोलीस बिनतारी संदेश यंत्रणेत हस्तक्षेप करणारा अवलिया होता. हे संदेश स्क्रँबल्ड असतातच असे नाही.
दिलेले आदेश आणि केलेली कृती यात अंतर असेल तर? बिनतारी यंत्रणा ही 'आवाज' टिपणारी आहे 'दृष्य' कृती नव्हे.
नकाशाचे अक्षांश रेखांश हे सुद्धा सर्वे ऑफ इंडिया च्या धोरणानुसार गोपनीय दस्त ऐवज आहे.
२) 'पोलिसांचा समन्वयच नव्हता' म्हणून या घटना घडल्या असा संदेश समाजमनात जाणे योग्य हाय का ?
अहो जिथे मानवी बाँब म्हणुन जीवावर उदार होउन काम करणारे अतिरेकी असतात तिथे कोणता आलाय समन्वय आन् सुरक्षितता. सामाजिक असंतोषासमोर सर्व सुरक्षायंत्रणा फिकी पडते.आपत्कालीन यंत्रणेत समन्वायची तार्किक गणिते कोलमडुन पडतात.

प्रकाश घाटपांडे

आपत्कालीन

बिनतारी संदेश पोलिसाच्या व्हॅनमधी सार्‍याला ऐकाला येतो
ते नाय म्हणाचं. कंट्रोल रुममधी येणारे सारेच फोन टॅप होतेत का ?
आन ती माहिती सेव्ह राहती का ?

ह्याला काय वाटतं आणि त्याला काय वाटेल याचा इचार करायमधी आपून टैम नै घालीत फटकन लिहून मोकळं !

बाबूराव :)

चूक

एकूण प्रकरणात दोन मुद्दे महत्त्वाचे आहेत.

२६ नोव्हेंबरचा हल्ला ही अभूतपूर्व (कदाचित जगात कुठेही - पूर्वानुभव नसलेली ) घडलेली घटना होती. तशा घटनांमध्ये सुरुवातीला गोंधळाचे वातावरण असणे स्वाभाविक म्हणावे लागेल. कारण नक्की काय घडत आहे हे कळायलाच वेळ लागला असू शकतो. (९/११ च्या घटनेतही तसेच झाले होते. दिवसाची वेळ असूनही २-३ तासांनंतरही 'ऍपॅरंट टेररिस्ट ऍटॅक असे म्हटले जात होते.) त्यामुळे त्यावेळच्या घटनांचा क्रम तपासून एकदम कोणावर दोषारोप करणे हे अयोग्य आहे. कोणत्याही घटनेनंतर यात या लोकांनी चुका केल्या
असे निष्कर्ष काढता येतातच. किंवा कोणतीही कृती अशा प्रकारे केली असती तर अधिक चांगली झाली असती असे नंतर म्हणता येतेच.
त्यामुळे अमूक यांनी तमूक केले असते तर हे किंवा ते वाचले असते असे म्हणणे योग्य नाही.

विनिता कामटे यांनी असे निष्कर्ष काढले आहेत की प्रसारमाध्यमांनी काढले आहेत हे माहिती नाही. परंतु कामटे यांच्या नंतरच्या वक्तव्यांवरून त्यांनाही तसेच म्हणायचे आहे असे वाटते.

मारियांची चूक झालीही असेल पण (विशेषतः) लोकांच्या भावना अजून तीव्र असताना न्यायाधीशांच्या थाटात कुणा अधिकार्‍यांना जवाबदार धरणे हे पूर्णतः अयोग्य आहे. तेही सर्व माहिती उपलब्ध झाली आहे की नाही, त्याचे विष्लेषण करण्याची व त्यातून निष्कर्ष काढण्याची आपली योग्यता आहे की नाही याचा विचार न करता.

आपल्या पतीच्या मृत्यूने संतप्त झालेल्या स्त्रीचे म्हणणे म्हणून हे पुस्तक वाचायला हरकत नाही. परंतु त्यातील निष्कर्ष योग्य/अचूक आहेत असे समजू नये हे समाजाने लक्षात घेणे आवश्यक आहे.

त्यांनी लिहिलेल्या गोष्टींचा उहापोह करून पोलीसांनी आपली सज्जता सुधारणे हे आवश्यकच आहे.

(सरकारने काळजी घेतली असती तर घटना टळली असती हे म्हणणे आणि मारियांनी हे केले असते तर कामटे/करकरे वाचले असते हे म्हणणे गुणात्मकदृष्ट्या वेगळे आहे. त्याचे भान ठेवणे आवश्यक आहे).

नितिन थत्ते

सहमत आहे

पोलिस यंत्रणेत अनेक त्रुटी आहेत. पण अशा निमित्ताने त्याचे निवारण्याचा प्रयत्न होतो. पण हा माहोल संपला कि 'येरे माझ्या मागल्या'.
लष्कर व पोलिस यातील महत्वाचा फरक म्हणजे लष्करात फ्रंटवर प्रथम अधिकारी जातात पोलिसात मात्र शेवटी. या प्रकरणात पोलिस अधिकारी पण आघाडीवर गेले आन दुर्दैवाने बळी पडले. बळी पडलेल्या कर्मचार्‍यांची मात्र वाच्यता होत नाही त्याची नोंद होते म्हणजे अदखलपात्र ठरल्याचा ठपका नको.
जेव्हा दोन अधिकारी एकाच ठिकाणि जातात त्यावेळी बरोबर प्रत्येकी १) कार/जीप २) त्याचा चालक ३)* आर टी पी सी ( रेडीओ टेलीफोनी पोलिस कॉन्स्टेबल)४) [वाटल्यास ]बॉडी गार्ड (कॉन्स्टेबल/नाईक दर्जाचा) असतात. प्रत्येकाचे आपले साम्राज्य असते.
* आरटीपीसी हा एक प्रकारचा वायरलेस ऑपरेटरच असतो. मुळ तो पोलिस शिपाई असतो. त्याला वायरलेस यंत्रणेचे जुजबी ज्ञान दिले जाते. वायरलेस ऑपरेटर ला मोर्स कोडचे ज्ञान असते. तो हवालदार दर्जाचा असतो. अधिक माहिती बिनतारी त्याला कोण मारी मधे पहाता येईल

आपल्या पतीच्या मृत्यूने संतप्त झालेल्या स्त्रीचे म्हणणे म्हणून हे पुस्तक वाचायला हरकत नाही. परंतु त्यातील निष्कर्ष योग्य/अचूक आहेत असे समजू नये हे समाजाने लक्षात घेणे आवश्यक आहे.

अगदी खर आहे. जातीय दंगली,जाळपोळ इ. हिंसाचारात निरपराध नागरिकांचेही बळी जातात. त्यांच त्यावेळी त्या ठिकाणी जाण हा त्यांच्या दैनंदिन जीवनाचा भाग असतो. तेही सामाजिक अव्यवस्थेचे बळी असतात. त्यांना शहीद म्हणत नाहीत.

प्रकाश घाटपांडे

 
^ वर