श्री.शं.बा.दीक्षित

शं.बा.दीक्षित
आपल्या विद्वत्तेने जगन्मान्यता मिळवणार्‍या मराठी माणसातले एक अग्रगण्य नाव म्हणजे श्री.शं.बा. दीक्षित. १८५३ ला कोकणात मुरुड येथे त्यांचा जन्म झाला व तेथेच प्राथमिक शिक्षणही.त्याच काळात त्यांनी अमरकोश पाठ करून काव्य,व्याकरण इ.संस्कृत विषयांचा प्राथमिक अभ्यास पुरा केला. १८७० ला पुण्यास येऊन त्यांनी ट्रेनिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. १८७३ ला ती परिक्षा व ७४ ला मॅट्रिक्युलेशन पास झाले. त्यांनी अध्यापन हाच व्यवसाय निवडला .त्यांचा सुरवातीचा पगार २५ रु. व निधन पावले तेंव्हा ४५ रु. या परिस्थितीतही त्यांनी अव्याहत विद्याव्यासंग चालू ठेवला व आपल्या ज्ञानाच्या दीप्तीने पाश्चिमात्य विद्वानांनाही चकित केले.
श्री. लेले यांच्या सायनवादाने प्रभावित झाल्याने त्यांचे लक्ष ज्योतिषशास्त्राकडे वळले व ठाण्यास असतांना श्री. मोडक यांच्या सहवासात त्यांनी ज्योतिषशास्त्राचा विशेष अभ्यास केला .सायनपंचांग ते प्रसिद्ध करू लागले. सूक्ष्म अध्ययनामुळे ज्योतिषक्षेत्रात दीक्षितांचा अधिकार एवढा वाढला डॉ. फ़्लीट सारख्या इतिहासतज्ञाला त्यांची मदत घ्यावी लागली. डॉ. फ़्लीट लिहतात की "यांची मदत नसते तर मला गुप्तांचा शककाल निश्चित करता आला नसता."रॉबर्ट सेवेलने दीक्षितांच्या मदतीने "इन्डिअन कॅलेन्डर" हा ग्रंथ निर्माण केला व तो भारतीय इतिहासाच्या संशोधनास अतिशय उपयुक्त ठरला.या ग्रंथात पंचांगासंबंधीच्या व कालगणनेच्यासर्व बाबींची माहिती दिली असून भारतातील प्राचीन व अर्वाचीन शकांची चर्चा केली आहे.इ.स. ३०० ते १९०० या सोळा शतकातील तिथि-तारखांचा मेळ दाखविणारी सारणी दिली आहे. भारतातील भूवर्णन या पुस्तकात प्राचीन स्थानांची निश्चिती केली आहे.
ज्योतिर्विलास उर्फ़ रात्रीची चार घटका मौज आकाशस्त ग्रहतार्‍यांची ओळख करून देणारे पुस्तक शास्त्रीय विषयावरचे असूनही मनोरंजक आहे.
"भारतीय ज्योतिषशास्त्र" हा त्यांचा जगप्रसिद्ध ग्रंथ होय. तो नीट समजवून घेता यावा म्हणून पाश्चिमात्य शास्त्रज्ञ मराठी शिकले ! या ग्रंथाच्या सिद्धतेसाठी त्यांनी पाचशेहून अधिक संस्कृत ग्रंथांचे अध्ययन केले.दुर्बोध बनलेल्या अनेक विषयांचा उलगडा केला. पंचांगशोधन व तत्संबद्ध मतमतांतरे यांचा परामर्श घेतला व हे शास्त्र केवळ भारतीयांनीच सुविकसित केले हे सिद्ध केले. 'कृत्तिका पूर्वेस उगवतात ; त्या तेथून चळत नाहीत' या शतपथ ब्राह्मणातून घेतलेल्या वाक्यावरून त्यांनी शतपथ ब्राह्मणाचा काल इ.स.पूर्व २००० वर्षे असा ठरवला. टॉलेमीपूर्वीच्या वासिष्ठ सिद्धांतात अंशाचे साथ भाग सापडतात हे त्यांनी दाखवून दिले व " टॉलेमीपासून हिंदूंना ज्योतिशाचे सर्वस्व मिळाले " या बर्जेच्या प्रतिपादनाला उद्ध्वस्त केले. आपला देश व आपली परंपरा यांचा गौरव वृद्धिंगत करणारा हा थोर मूलगामी प्रज्ञेचा व अव्याहत व्यासंगाचा थोर पुरुष वयाच्या पंचेचाळिसाव्या वर्षी १८९८ ला विषमज्वराने दिवंगत झाला.
शरद

लेखनविषय: दुवे:

Comments

???

सूक्ष्म अध्ययनामुळे ज्योतिषक्षेत्रात दीक्षितांचा अधिकार एवढा वाढला

???

ज्योतिषविद्येचा गाढा अभ्यास असणार्‍या दिक्षितसाहेबांच्या विद्येचा तत्कालीन सामान्य लोकांना काय फायदा झाला हे कळेल का?

एखाद्याचे समजा अगदी करेक्ट भविष्य जरी समजले तरी होणार्‍या गोष्टी टळत नाहीत, नियती कुणालाच चुकत नाही हे दिक्षितसाहेबांना मान्य होते का?

मान्य असल्यास जे जाणून घेण्यात काहीही मतलब नाही कारण त्यामुळे घडणार्‍या गोष्टीं टळत नाहीत, सबब अश्या निरुपयोगी विद्येच्या (?) मागे दिक्षितसाहेबांसारखा व्यासंगी आपली शक्ति व बुद्धी का खर्च करत होता हे कळेल काय?

आणि मुख्य प्रश्न पुन्हा तोच की दिक्षितांच्या ज्योतिषाचा सामान्य माणसाला/समाजाला काय फायदा झाला?

तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

राजज्योतिषी

दिक्षितांनी संस्थानिकाच्या दरबारी राजज्योतिषी असलेले पद नाकारले होते. त्यांचा ग्रंथ हा संशोधकांसाठी होता. सामान्य माणसाला त्याचा थेट फायदा झाला नाही. दिक्षित लौकिक अर्थाने ज्योतिषी नव्हते. ते ज्योतिष अभ्यासक होते. संपुर्ण ग्रंथात भविष्य कसे सांगावे याचा उल्लेख नाही. हा भारतीय फलज्योतिषाचा इतिहास नव्हे.
प्रकाश घाटपांडे

वा!

व्यक्तिमत्व माहिती
या सदरातील एक छान लेख.
ओळख आवडली.
नाव पुर्ण द्याल का?

मागे घाटपांडे साहेबांनीही काही माहिती दिली होती.
पण ही माहिती जास्त विस्तृत आहे.

असो, लेखकाचे "भारतीय ज्योतिषशास्त्र" हे साहित्य आज मिळू शकते काय?
प्रकाशक कोण आहे?
सध्या कुणी प्रकाशित करत नसल्यास पण कुणाच्या संग्रही असल्यास माझी प्रत झ्येरॉक्स करून घेण्याची तयारी आहे.
या ग्रंथावरील प्रताधिकार संपलाच असेल अशी आशा आहे.

आपला
गुंडोपंत

ज्योतिषशास्त्र

श्री. शंकर बाळकृष्ण दीक्षित हे कुंडली मांडून भविष्य सांगत नसत. आकाशातील नक्षत्रांच्या जागा बदलत असतात.
त्यावरून काळ ठरविता येतो. उदा. १७३० साली मघा नक्षत्र नेमके कुठे दिसत होते याचे गणित करता येते. पूरा
ग्रंथांतील असे उल्लेख पाहून ग्रंथ निर्मितीचा काल ठरविता येतो. श्री. तात्या यांनी योग्य प्रश्न विचारला आहे. माडी-माड्यातून वेळ काढून जे वर आकाशाकडे पाहूनही काही मौज मिळवू शकतात त्या सामान्य वाचकांकरिता ज्योतिर्विलास हा ग्रंथ आहे. भारतीय ज्योतिषशास्त्र हा विद्वानांकरिता, संशोधन करण्याकरिताचा ग्रंथ, तात्या, तुमच्या-आमच्या करिता तो नव्हे.( दुसरा गीतारहस्यच म्हणाना). श्री. गुंडोपंत, आपल्याला व्यनि पाठवतो.
शरद

वा!

वा! ज्योति:शास्त्र हे भारतीय ज्ञानपरंपरेतील एक मौलिक शास्त्र होते हे निर्विवाद!
संपूर्ण आकाशाचा त्यातील ग्रह-गोलांचा, ज्योतिंचा इतका सखोल अभ्यास कोणी पुरातनकाळी केला होता हे अभिमानास्पद आहेच. त्यातही त्या अभ्यासाचे सुलभ दस्ताऐवजीकरण करण्याची कला आपण विकसीत केली होती याचाही खूप आनंद वाटतो.

श्री दीक्षित यांची ओळख करून दिल्याबद्दल आभार. मलाही दोन्ही पुस्तके (ज्योर्तिविलास व भारतीय ज्योतिषशास्त्र) संग्रही ठेवण्याची इच्छा आहे. प्रत विकत मिळत नसल्यास यांत्रिक प्रत (फोटोकॉपी) काढून घेऊन पुस्तक निश्चित परत करेन याची हमी देतो.

ऋषिकेश
------------------
भ्रष्टाचार संपविण्याचा सर्वोत्तम आणि सर्वात सोपा(?) उपाय म्हणजे त्यात स्वतः सहभागी न होणे

उपलब्धता

भारतीय ज्योतिषशास्त्राचा प्राचीन व अर्वाचीन इतिहास या पुस्तकाचा परिचय आपण इथे पाहु शकता. हे पुस्तक आजही वरदा बुक्स कडे उपलब्ध आहे. पोस्टाने मागवता येईल.
ज्योतिर्विलास देखील मुंबईच्या प्रतिभा प्रतिष्ठान ने प्रकाशित केले आहे ते उपलब्ध आहे. वितरक अनुभव वितरण शुक्रतारा संत जनाबाई मार्ग विलेपार्ले ( पुर्व ) मुंबई

प्रकाश घाटपांडे

प्राचीन भारतवषीय भूवर्णन

कै. ज्योतिर्विद् शंकर बाळकृष्ण दीक्षित ह्यांचा मुख्य अभ्यास खगोलशास्त्राचा होता. त्यांच्या भारतीय ज्योतिषशास्त्राचा इतिहास(अर्वाचीन व प्राचीन) या पुस्तकाव्यतिरिक्त आणखी एक गाजलेले पुस्तक आहे. त्याचे नांव: प्राचीन भारतवर्षीय़ भूवर्णन. हेही वरदा प्रकाशनाने प्रसिद्ध केले आहे; किंमत रुपये १५०. कालिदासाच्या मेघदूत आणि इतर काव्यांतून आलेली स्थळनावे, महाभारत, वेद, श्रुतिस्मृतिपुराणोक्त ग्रंथ(विष्णुपुराण, लिंगपुराण,भागवत इत्यादी), वराहमिहिर(बृहत्संहिता), भास्कराचार्य(सिद्धान्‍तशिरोमणि-गोलाध्याय) यांच्यात आलेली नावे, तसेच अबुल फ़ज़ल, फ़ाहियान, संगयून, ह्युएनसंग, टॉलेमी आदींनी वर्णन केलेला प्राकृतिक भूगोल, भूप्रदेश, गावांची व नद्यांची नावे यांची उत्तम माहिती या ग्रंथात आहे. मूळ ग्रंथात असलेले सहा नकाशे मात्र आता उपलब्ध नाहीत.
इच्छुकांनी हे तीनही ग्रंथ विकत घेऊन संग्रही ठेवावेत.--वाचक्‍नवी

माहीतीपूर्ण पुस्तक

प्राचीन भारतवर्षीय़ भूवर्णन. हेही वरदा प्रकाशनाने प्रसिद्ध केले आहे

हे पुस्तक खूप चांगले आहे. मात्र ते दिक्षितांच्या निधनानंतर (१८९८) पंधरा वर्षांनी त्यांच्या हस्तलिखितावरून ते छापले गेले. त्यामुळे वर वाचक्नवींनी म्हणल्याप्रमाणे त्यातील सहा नकाशे उपलब्ध नाहीत. एक मजेदार वाटलेला संदर्भ म्हणजे महाभारतात महाराष्ट्राचा उल्लेख नाही आहे पण कोकणाचा मात्र आहे!

थोडी सुधारणा.

प्राचीन भारतीय भूवर्णन हा ग्रंथ शं.बा.दीक्षितांनी १८८४ मध्ये लिहून पूर्ण केला. तो छापला तर तो कसा खपणार या चिंतेने ते पुस्तक तब्बल पंधरा वर्षे प्रसिद्धच केले गेले नाही. दीक्षितांच्या मृत्यूनंतर एक वर्षाने, १८९९त हा ग्रंथ प्रसिद्ध झाला(पहिली आवृत्ती ३०० प्रतींची होती!), आणि १९९० मध्ये म्हणजे १०१ वर्षांनी त्याची दुसरी आवृत्ती छापली गेली. --वाचक्‍नवी

जुना धागा नव्याने

हा जुना धागा आत्ता वर काढण्याचे कारण असे की एका मित्राच्या चौकशीला उत्तर देतांना तो माझ्या नजरेस आज पहिल्यांदा पडला. धाग्यामध्ये आक्षेपार्ह काहीच नाही पण वरची 'विसोबा खेचर' (तात्या) ह्या आयडीची प्रतिक्रिया मला खटकली म्हणून हे लिहीत आहे.

विसोबा खेचर ह्यांनी दीक्षितांचे पुस्तक पहाण्याची वा दीक्षितांची अन्य काही माहिती गोळा करण्याची कसलीच तसदी न घेता आपली फटकेबाजी केली आहे. त्यांनी पुस्तक चाळले असते किंवा त्यात काय आहे हे जाणून घ्यायचा प्रयत्न केला असता तर त्यांना लगेचच उमगले असते की पुस्तकात भविष्य सांगणे वा फलज्योतिष ह्याबाबत काहीहि लिहिलेले नाही. पुस्तकाचा विषय आकाशस्थ तारे-ग्रह ह्यांच्या भ्रमणाचे भारतीयांना काय माहीत होते, त्यावरून त्यांनी कालगणना कशीकशी बांधली, कोठल्या काळात भारतीयांना काय ठाऊक होते, त्यापैकी त्यांचे स्वतःचे किती होते आणि अन्य संस्कृति (ग्रीक, बाबिलोनियन इ.), ह्यांच्याकडून त्यांनी काय घेतले आणि त्यांना काय दिले, प्राचीन काळापासून आणि आर्यभट, ब्रह्मगुप्त ह्यांच्यापासून अर्वाचीन बापूदेव शास्त्री, केरूनाना छत्रे ह्यांच्यापर्यंत कोण महत्त्वाचे ज्योतिर्गणिती होऊन गेले आणि त्यांचे कार्य काय अशा प्रकारची शास्त्रीय आणि गणिती अंगाने जाणारी चर्चा आहे. भारतीय गणित आणि ज्योतिष हे एकमेकांबरोबर वाढले ही गोष्ट सर्वश्रुत आहे. ज्योतिषाचा उल्लेख आला की ते फलज्योतिषच असणार हा तर्क दुष्ट आणि अज्ञानमूलक आहे.

ह्या विषयातील अधिकारी असे हे पुस्तक मराठी आहे ह्याचा खरे तर आपणांस अभिमान वाटायला हवा. भारतीय हवामानविभागाने १९६८ साली उज्जयिनीच्या जिवाजी वेधशाळेचे पर्यवेक्षक आर वी वैद्य ह्यांच्याकडून ह्या पुस्तकाचे इंग्रजी भाषान्तर करवून घेऊन ते छापले आहे. मूळ मराठी पुस्तक २० वर्षांपूर्वी ह.अ.भावे ह्यांच्या वरदा प्रकाशनाने पुनर्मुद्रित केले होते. इंग्रजी भाषान्तर http://www.scribd.com/doc/76777633/Bharatiya-Jyotish-Sastra-1 आणि http://www.scribd.com/doc/76935732/Bharatiya-Jyotish-Sastra-2 येथे जिज्ञासूंसाठी उपलब्ध आहे.

 
^ वर