मृत्युंजय!

फोर्थ डायमेन्शन 35

मृत्युंजय!
शारदा विद्वांस हिचे वय निदान दोनशे वर्ष तरी असावे. तिच्या बोलण्यावरून तिने शनिवारवाड्यावरील पेशव्यांचा झेंडा उतरवून युनियन जॅक फडफडताना पाहिला होता. पुण्यात त्या दिवशी घरोघरी पुरणपोळीचे जेवण केल्याचे तिला स्मरत होते. 1857 च्या स्वातंत्र्य युद्धाच्या वेळी गोऱ्या सोजिरांच्या तुकड्या उत्तरेकडे रवाना होताना तिने पाहिल्या होत्या म्हणे. सावित्रीबाई फुलेच्या अंगावर सनातन्यांनी केलेल्या शेणाचा मारा ती विसरू शकत नव्हती. होळीच्या दिवशी 'सुधारक'कार आगरकरांची जिवंत असतानाच काढलेल्या प्रेतयात्रेची इत्थंभूत माहिती तिला होती. लोकमान्य टिळक मंडालेच्या जेलहून सुटून आल्यानंतरचा जल्लोष तिला अजूनही आठवत होता. शिरडी साईबाबांच्या मृत्यूनंतर पुन्हा उगवलेल्या प्रती साईबाबांचे अवतार व त्यांच्या दर्शनासाठी पुण्याहून मोटर गाडी (सिल्व्हर जुबिली मोटर्स) करून निघत असलेल्या झुंडीच्या झुंडी ती विसरू शकत नव्हती. डॉ. आनंदीबाई जोशींच्या आजारपणाची हकीकत तिला माहित होती. पुण्यातील प्लेगचा आजार, चतु:श्रृंगी परिसरातील त्यावेळच्या छावण्या, गोऱ्या पोलीसांनी शहरभर घातलेला धुमाकूळ, या आठवणी ताज्या वाटत होत्या. चाफेकर बंधूंच्या आरोळ्याची हकिकत ऐकून माहित होती. ती राहत असलेल्या वाड्यातील व गल्लीतील प्रायश्चित्ताच्या प्रकारांनी तिला वीट आणला होता. गांधीजी - आंबेडकरांच्या पुणे कराराची सविस्तर बातमी तिने दुसऱ्याच दिवशी पेपरात वाचली होती. 42 च्या चळवळीतील ते रोमांचकारी दिवस ती कधीच विसरू शकत नव्हती. 15 ऑगस्ट 1947 च्या स्वातंत्र्योत्सवाच्या दिवशी वेड्यासारखी शहरभर ती फिरत होती. 30 जानेवारी 1948 च्या नंतरच्या जाळपोळीच्या घटना, ब्राम्हण कुटुंबियांचे ते भेदरलेले डोळे ती विसरू शकत नव्हती. 1956-60 च्या दरम्यानचे संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे मंतरलेले दिवस अजूनही तिच्या आठवणीत आहेत. इंदिरा गांधीच्या आणीबाणीचा तो काळाकुट्ट काळ, चीन व पाकिस्तान बरोबरच्या त्या लढाया, अण्वस्त्र चाचणी, भिंद्रनवालेचा धुडगोस, इंदिरा गांधीची हत्या, लातूरचा भूकंप, भोपाळचा हजारोंनी बळी घेणारा अपघात, 1972 चा दुष्काळ, राजीव गांधीची हत्या, बाबरी मशीद प्रकरण, खैरलांजीतील दलितावरील अमानुष अत्याचार, गोध्रा हत्याकांड, 9/11च्या दहशतवाद्यांचा धसका, इ.इ. हजारो घटना तिच्या डोक्याचा भुगा करून ठेवत होत्या.
तिला बालपणापासूनच वाचणे, नाटक बघणे, शास्त्रीय व नाट्य संगीत ऐकणे या सवयी जडलेल्या होत्या. या छंदामुळे तिला तिचे जीवन थोडे फार तरी सुसह्य वाटत होते. मालाकार चिपळूणकर, साने गुरुजी, ह. ना. आपटे, राम गणेश गडकरी, देवल, बालगंधर्व, वीर वामनराव, भालचंद्र पेंढारकर, नाथमाधव, ना. सी. फडके, आचार्य अत्रे, वि. स. खांडेकर, रणजित देसाई, विजय तेंडूलकर, श्री. ना. पेंडसे, विजया मेहता, श्रीराम लागू, इत्यादीनी तिचे आयुष्य सुखावह केले. पुलंच्या नाटकांने, त्यांच्या पुस्तकांने तिला वेडे केले. शनिवारवाड्याच्या पटांगणावरील पुणे नगरपालिकेच्या भोंगळ कारभारावर सडकून टीका- टिप्पणी करणारे प्र.बा.जोग यांचे व्याख्यान ऐकण्यासाठी ती जातीने हजर राहायची. बडे गुलाम अलीखाँ, मोगूबाई कुर्डीकर, बखलेबुवा, सवाई गंधर्व, कुमार गंधर्व, भीमसेन जोशी, वसंतराव देशपांडे, गिरिजादेवी, गंगूबाई हानगल, अंमीरखाँ, हीराबाई बडोदेकर, माणिक वर्मा, पं जसराज, किशोरी आमोणकर, परवीन सुल्ताना, जितेंद्र अभिशेकी, इत्यादींच्या गाण्याच्या मैफलीमुळे काही काळ तरी स्वत:चे दु:ख विसरून ती जीवन जगत होती. सवाई गंधर्व संगीत महोत्सव हा तिचा जीव की प्राण होता. जुने - नवे असे कुठलाही भेद न करता जे चांगले, जे आवडले त्याचा रसास्वाद घेत ती आयुष्य ढकलत होती.
तिच्या या सुदीर्घ आयुष्याचे रहस्य तिच्या व्यतिरिक्त इतर कुणालाही माहित असण्याची शक्यता नव्हती. कदाचित मृत्यूवर मात करू शकणाऱ्या एखाद्या संजीवनीचा सुगावा तिला लागलेला असावा. दोनेकशे वर्षापूर्वी नेमके काय घडले असावे याची कल्पना येणार नाही. परंतु तिचे वडील एक नामांकित आयुर्वेद पारंगत विद्वान होते. शारदा ही त्यांची एकुलती एक मुलगी. तिच्यावर त्यांचे अतिशय प्रेम होते. शारदेला लहानपणापासूनच ते शिकवित होते. शारदा हुशार होती. परंतु त्या काळच्या पुरुषप्रधान समाजामध्ये तिच्या विद्येचा काही उपयोग झाला नाही.
एके दिवशी आजारी असलेल्या शारदेच्या वडिलांनी तिला जवळ बोलावून घेतले. माणसाला अमरत्व बहाल करू शकणाऱ्या संजीवनी औषधीची कृती लिहिलेला एक कागद तिच्या हातात देत या संजीवनीचा स्वत:वर प्रयोग करून घेऊ नको असे कळकळीने सांगतच त्यानी शेवटचा श्वास सोडला. परंतु तारुण्याच्या उत्साहाच्या भरात व कुतूहलापोटी वडिलांना दिलेला शब्द न पाळता कागदावर लिहिलेल्या कृतीप्रमाणे औषधाचे मिश्रण करून तिने तोंडात घातले. त्या वेळी तिला विशेष असा कुठलाही फरक जाणवला नाही. इतराप्रमाणे ती स्वत:च अशा आयुर्वेदीय चमत्कारावर विश्वास ठेवायला तयार नव्हती. कारण त्याकाळी देव व दैव यांच्या भरवश्यावरच सर्व व्यवहार चालत होते. परंतु जसजसा काळ पुढे सरकू लागला तसतसे तिला आपल्यातील संजीवनीचा परिणाम जाणवू लागला. ती अस्वस्थ होऊ लागली. ती स्वत:ला दोष देऊ लागली. वडिलांचे आपण ऐकायला हवे होते, आपल्या हातून घोडचूक झाली असे दिवसातून किमान शंभर वेळा तरी ती म्हणत असेल. एकेक करत तिच्या मैत्रिणी, नातलग, परिचित मरू लागले. ती मात्र तब्बेतीने ठणठणीत होती. म्हातारपणाचा मागमूसही नव्हता. मृत्यूचे भय नव्हते. प्रत्येक नवीन पिढीशी जुळवून घेणे जड वाटू लागले. नवीन पिढीची भाषा कळेनासे झाले. ती एकाकी पडू लागली. एकाकीपणामुळे तिला जगावेसे वाटत नव्हते. आत्महत्या केल्यानंरसुद्धा मृत्यू येईलच याची शाश्वती नव्हती. मृत्यूचे भय नसल्यामुळे तिला कुठल्याही प्रकारची घाई नव्हती. आयुष्याला उद्देश नव्हता. नवीन काही तरी करावे, बघावे, जावे, असे काहीही वाटेनासे झाले होते. जे काही ती करू पाहत होती ते सर्व निरर्थक असे वाटू लागले. आता मात्र तिला मृत्युची घाई लागली होती. परंतु मृत्यू मात्र तिच्यापासून शेकडो कोस दूर होता. व आणखी दूर दूर जात होता. तिला मृत्यूची आस लागली होती.
एक शेवटचा प्रयत्न म्हणून ती आपल्या वडिलानी लिहून ठेवलेले हस्तलिखितं वाचू लागली. त्यांचा अभ्यास करू लागली. संदर्भांची जुळवाजुळव करू लागली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे कागदपत्रांची जुळवाजुळव करताना अचानकजणे मृत्यूवर विजय मिळवणाऱ्या संजीवनीला प्रतीकार करू शकणाऱ्या औषधाच्या कृतीचा शोध लागला. तिच्या आनंदाला उधाण आले. आपण आता मरणार हा विचारच तिला उत्साहवर्धक वाटत होता. तिने ताबडतोब ग्रंथात लिहिल्याप्रमाणे प्रतीसंजीवनीच्या औषधाला लागणारे पाला-पाचोळा गोळा करू लागली. लिहिलेल्या कृती प्रमाणे औषध तयार करून पिऊन टाकली. काही दिवसातच त्या औषधाचे दृष्य परिणाम दिसू लागले. तिला आता थकवा जाणवू लागला. अवयव गलित गात्र होऊ लागले. मृत्युच्या चोरपावलांची चाहूल लागली. त्याच वेळी आपल्या वाटेला आलेल्या दीर्घायुष्याचे भोग इतर कुणाच्याही वाटेला येवू नये यासाठी संजीवन औषधीच्या कृतीचा नामो-निशाण राहणार नाही, असे तिला वाटू लागले. मृत्यूवर मात हे वरदान नसून शाप आहे याची तिला खात्री पटली. म्हणूनच संजीवऩी औषधीच्या कृतीचा कागद हातात घेऊन त्याचे तुकडे करून त्यांना जाळ लाऊन त्याची राख केली व राखेकडे बघतच बसली. आता तिला हायसे वाटू लागले. कित्येक वर्षानी तिच्या चेहऱ्यावर स्मित हास्य उमटले असेल.
------------------- -------------------------- -
जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाच्या आयुष्यातील सर्वात निश्चित व अटळ अशी घटना कोणती असे विचारल्यास मृत्यू असेच उत्तर येईल. कदाचित मृत्युच्या जाणिवेमुळेच प्रत्येकाला आपले आयुष्य फारच दु:खमय आहे असे वाटत आले आहे. परंतु शारदा विद्वांसाची कथा या मर्त्य आयुष्याच्या कल्पनेला छेद देणारी ठरत आहे. तिच्या आयुष्यात जिवंत राहणे हेच शाप असून मृत्यू वरदान ठरत आहे. अमरत्वाच्या फोलपणाला अधोरेखित करण्याचा प्रयत्न ही गोष्ट करत आहे. मृत्यूमुळेच आपल्या आयुष्याला आकार येतो, त्यातूनच अर्थपूर्ण जगणे शक्य होते, मरणाची जाणीव (वा भीती) नसल्यास जीवन हे नीरस, निरर्थक व कंटाळवाणे झाले असते. हाच दृष्टीकोन बाळगून आयुष्याकडे बघू लागल्यास कित्येक धार्मिकांना अभिप्रेत असलेला मृत्यू नंतरचा तथाकथित नरकवास हा अजरामर आयुष्यापेक्षा कित्येक पटीने बरा असे वाटू लागेल.
तरीसुद्धा आपल्यातील बहुतेकांना मृत्यू नको असे वाटण्याची शक्यता आहे. मृत्युला जितके टाळता येणे शक्य आहे तेवढे सर्व प्रयत्न केले जात असतात. वैद्यकीय उपचारातील विलक्षण वेगाने होत असलेली प्रगती माणसांना मृत्यूपासून आणखी लांब लांब नेत आहे. ज्यांना शक्य आहे ते स्वत:ला मरणापासून वाचवण्याच्याच खटपटीत असतात. कारण त्यांना आताचे हे मर्यादित आयुष्य जीवनातील आनंदाचा पुरेपूर उपभोग करू देत नाही. जास्तीत जास्त जगणे शक्य झाल्यास त्यांच्या आनंदात, सुख-समाधानात अनेक पटीत वाढ होण्याची शक्यता त्यांना खुणावत असते. म्हणूनच सुदीर्घ काळ जगण्याची आकांक्षा मनात बाळगूनच ते जीवन जगतात. हे आयुष्य किती वर्षाचे असावे याला जास्त महत्व नाही. आताचे सत्तर वर्षाचे आयुष्य अगदीच अपुरे वाटत आहे. आयुष्यभरात कित्येक गोष्टी करायच्या असतात. ठिकठिकाणी जायचे, हिंडायचे असते. अनेक चित्र - विचित्र गोष्टींचा अनुभव घ्यायचा असतो. नॅशनल जिऑग्राफ्रिक, डिस्कव्हरी, ट्रॅवल अँड लिविंग, इत्यादी टीव्ही चॅनलवर दाखवत असलेल्या ऐषारामी, साहसपूर्ण आयुष्याचा रोमांचकारी अनुभव घ्यायचा असतो. परंतु सत्तर-ऐंशी वर्षाच्या काळात हे सर्व जमत नाही. आपल्याजवळ तेवढा वेळ नसतो. दीर्घ काळचे बालपण, मधला उमेदीचा (व कौटुबिक जवाबदारीचा) काळ, व नंतरचा वार्धक्याचा कंटाळवाणा काळ यामध्ये आयुष्य विभागल्यामुळे खऱ्या - खुऱ्या जीवनानंदाचा आस्वादच आपण घेवू शकत नाही, असेच अनेकांना वाटत आले आहे. आपल्या आयुष्यातील वर्षे भराभर निघून जातात. केव्हा, कुठल्या क्षणी आजारपण येईल व मृत्यूत त्याचे पर्यावसान होईल, वा अचानकपणे मृत्यू झडप घालेल, हे सांगता येत नाही. म्हणूनच मृत्यू नको असे अनेकांना वाटत असावे.
आपण नेहमीच आपल्या आयुष्याची विभागणी आपापल्या गरजेनुसार करत असतो.बालपण इतकी वर्षे, तारुण्याचा काळ अमुक वर्षे, प्रौढत्व व कौटुंबिक जवाबदारीसाठी इतकी वर्षे अशा समजुतीने आपण आपल्या संसाराचा गाडा ओढत असतो. आयुष्यातील प्रत्येक टप्प्यासाठी कितीही काळ दिला तरी ते पुरेसे नसते. बालपण दीर्घकाळ टिकावेसे वाटते. तारुण्यात अनेक गोष्टी करायच्या राहून गेल्या याची हळहळ वाटू लागते. प्रौढपणा जाचक ठरतो. कुठलीही जवाबदारी नसलेला वार्धक्यसुद्धा (रुग्णशय्येवर आडवे पडले तरी) दीर्घकाळ असावा असे अनेकांच्या मनात असते.
यापैकी तारुण्याचेच उदाहरण म्हणून घेता येईल. काही पिढ्यांपूर्वी बहुतेक सर्व जण वयाच्या विशीच्या आतच लग्न करून मुला-बाळांच्या संसाराचा गाडा चालवत होते. आजकाल मात्र तरुण-तरुणींच्या हातात बऱ्यापैकी पैसा खुळखुळत असल्यामुळे व आपण दीर्घ काळ जिवंत राहणार आहोत याची (पूर्ण!) खात्री असल्यामुळे आपल्या तारूण्याच्या कालावधीत आणखी वाढ करून तिशीच्या नंतरच लग्न-संसार यांचा विचार केला जात आहे. प्रत्येक तरुण पिढी आपल्या मागच्या तरूण पिढीपेक्षा जास्त प्रवास करत आहे. जास्त अनुभवी होत आहे. त्याचप्रमाणे जास्त सुखलोलुपही होत आहे. परंतु या विस्तारित तारुण्यामुळे ते सर्व सुखी व समाधानी आहेत का, हा प्रश्न मात्र निरुत्तरितच राहतो. अजूनही काही काळ तारुण्य टिकून रहावे असे अधाशासारखे ते इच्छा बाळगून असतात. माणसाची जित्याची खोड अशी आहे की जे आपल्याकडे नाही तेच नेमके व जास्त हवीहवीशी वाटत असते. व त्याबद्दल जास्त विचार करत ते जास्त दुखी होतात व समोर असलेले सुख नीटजणे उपभोगू शकत नाहीत.
आपल्याला कितीही दीर्घकाळाचे आयुष्य लाभू दे ते कधीच पुरेसे ठरणार नाही. याचा अर्थ असा नव्हे की आपण आपल्याला मिळालेल्या आयुष्याचा पुरेपूर उपयोग करत आहोत. परंतु जेव्हा आपण अमर्त्य होऊ तेव्हा वेळेचा सदुपयोग ही कत्पनाच निरर्थक व कालबाह्य ठरेल. कारण अजरामर आयुष्यात वेळेचा हिशोब करण्याची गरजच नसणार. उलट मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेल्या वेळेत करायचे काय हाच प्रश्न सतत भेडसावत राहणार. आयुष्य वाया घालवत आहोत असे म्हणण्याचीही सोय अमरत्वात नसणार. परंतु कुठलाही उद्देश नसलेल्या अशा आयुष्यात जगणेही निरुयोगी ठरू शकेल. या दीर्घायुष्याच्या ओझ्याचे करायचे काय?
कदाचित आपण आपल्या अल्प आयुष्याकडे विनाकारण समस्या म्हणून बघत आहोत. आपण आपला जीवन काळ बदलू शकत नाही म्हणून या अल्पायुष्याला दोष देण्यात अर्थ नाही. या अल्पकाळातील भोगास दूषण देत राहिल्यास हाती काहीच लागणार नाही. आपण आपले आयुष्य कसे जगावे (उधळावे) हे सर्वस्वी आपल्या हातात आहे. त्यामुळे मला अजून थोडीशी कालावधी मिळाली असती तर असे म्हणण्याऐवजी मी मला मिळालेल्या कालावधीचा योग्य वापर करू शकलो तर.... असे म्हणणेच रास्त व शहाणपणाचे ठरेल.

Comments

आवडला

लेख आवडला व बरीचशी मते पटली. 'किती जगलात यापेक्षा कसे जगलात हे महत्वाचे' हे तर आहेच. आयुष्य कितीही दीर्घ असले तरी जगात करावीशी वाटणारी प्रत्येक गोष्ट करणे शक्य नाही. आयुष्याला मर्यादा आहे, मानवी लालसेला, वासनेला नाही, हे बरोबरच आहे.
सन्जोप राव
होगा कोई ऐसा भी, कि 'गालिब' को न जाने?
शाइर तो वो अच्छा है, प' बदनाम बहोत है

आवडला

लेख आवडला, बरीचशी मते पटण्यासारखी. ह्यावरुन 'द मॅन फ्रॉम द अर्थ' ह्या सुंदर सिनेमाची आठवण आली.

+१

हेच म्हणतो. लेखातली बोधकथा व विवेचन आवडले. नाईल् यांनी उल्लेखिलेला चित्रपट पाहिला आहे. चित्रपटाची पटकथा व संवाद प्रभावी होते; मात्र एकंदर हाताळणी व अभिनय तितकासा आवडलेला नव्हता.

जी ए कुलकर्णींच्या रूपककथांमधे अशा प्रकारचे मृत्यूबद्दलचे चिंतन आल्याचे आठवते ( ऑर्फियस व अश्वत्थाम्याच्या कथा पटकन आठवतात. इतरही आहेत. ) "पिक्चर ऑफ डोरियन ग्रे" , "ययाति" या इतर काही आठवलेल्या कृतींमधेही चिरयौवनादि संकल्पनांना चितारलेले आठवते.

+२

बोधकथा आणि विवेचन आवडले.

नाईल यांनी उल्लेखलेला चित्रपट बघितलेला नाही, पण मुक्तसुनीत यांनी उल्लेखलेला "डोरियन ग्रे" हा चित्रपट बघितलेला आहे. शिवाय पौराणिक संदर्भही आहेतच.

जॉनथन स्विफ्ट याने "चिरयौवनाशिवाय अमरत्व" यांच्याबद्दल "स्ट्रुल्डब्रुग" ही कल्पना चितारली आहे, आणि त्यातूनही अमरत्व हा मोठा शाप असू शकेल, असे विवेचन केले आहे. आणि गलितगात्रता हा एकच शाप नव्हे. प्रियजनांचे मरण बघणे, आपल्या स्मृतींमुळे नव्या पिढीच्या स्मृतिदारिद्र्याशी कदापि पटून न घेता येणे, त्यामुळे येणारा एकाकीपणा - हेसुद्धा शाप होत.

लेख आवडला

बोधकथा व विवेचन आवडले.

अवांतर : होळीच्या दिवशी 'सुधारक'कार आगरकरांची जिवंत असतानाच काढलेल्या प्रेतयात्रेची इत्थंभूत माहिती तिला होती.

योगायोगानं दोनेक दिवसापूर्वी य.दी.फडके यांचे 'व्यक्ती आणि विचार' पुस्तक चाळतांना वरील वाक्यासंबंधी दीर्घ लेख चाळायला मिळाला. त्यात असे म्हटले आहे की, प्रतिकात्मक प्रेतयात्रा सर्वच सुधारकांच्या घरासमोर टेकवून पुढे जात होती. ती एकट्या आगरकरांची प्रेतयात्रा नव्हती. सर्वच सुधारकांची प्रतिकात्मक प्रेतयात्रा होती.

-दिलीप बिरुटे
[जमेल तिथे पो टाकणारा]

 
^ वर