जय व शंतनवः बाल वैद्न्यानिक
'शोले'तील जय-वीरू ही जोडी त्यांच्या मैत्री करता अख्ख्या भारतात हीट झाली ती सत्तरच्या दशकात. पण आज जय-शंतनू ही जोडी नुसत्या भारतातच गाजली नाहीतर ह्या जोडीने 'नासा'ला दणाणून सोडलं आहे. नासा ह्यावरून तुमच्या लक्षात आलंच असेल की ही जोडी चित्रपट सृष्टीतील नसून ही जोडी आहे बालवैज्ञानिकांची. ह्यांना 'बाल'च म्हणावे लागेल कारण नासात झालेल्या निबंध सादरीकरणासाठी आलेल्या सर्व विद्यार्थ्यांमध्ये वयाने लहान असणारे हे दोघेजण होते. नवव्या वर्गात शिकणारे जय पत्रीकर व शंतनू माणके हे दोघेही निकालस सोमलवार, नागपूर चे विद्यार्थी. हे दोघेजण पहिलीपासून एकाच वर्गात शिकणारे म्हणून फक्त वर्गमित्र. खगोलशास्त्राची आवड ह्या समान धाग्यामुळे सहावीत मैत्रीचे बंध जुळले. हे मैत्रीचे बंध घट्ट व मजबूत झाले ते ह्या निबंध प्रकल्पामुळे. हा निबंध तयार करणे ते थेट तो नासात सादर करणे ह्या एकूण प्रवासाबद्दल त्यांच्याकडून जाणून घेतलंय. मुलांनी अतिशय सखोल अभ्यास केलाय. मुलं जिज्ञासू तर आहेतच पण चुणचुणीतही आहेत.
प्र: सगळ्यात आधी तुमचे हार्दिक अभिनंदन! आणि थोडेसे ह्या निबंध स्पर्धेबद्दल सांगा.
शंतनू: माझ्या वडिलांनी नेटवर ह्या निबंधस्पर्धेविषयी वाचलं व मला सांगितलं. दरवर्षी अश्याप्रकारच्या स्पर्धा होत असतात. विशिष्ट वयोगटाकरिता विशिष्ट असे विषय असतात. निबंधाचा विषय असा की तुम्हाला अंतराळात एक लाख लोकांसाठी वसाहत निर्माण करायची आहे पण पृथ्वीची कमीत कमी मदत घेऊन.
जयः शंतनुने जेव्हा ह्या निबंध स्पर्धेबद्दल सांगितले आधी तर अशक्यच वाटलं, हे शिवधनुष्य पेलू शकू की नाही अशी शंका होती. पण प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे असा विचार करून कामाला लागलो.
प्र: सुरुवात कश्याप्रकारे केली?
शंतनू: आंतरजालावर भरपूर माहिती उपलब्ध आहे ती वाचली. पूर्वी झालेल्या स्पर्धेतील निबंध वाचून काढले. त्यात कोणत्या त्रुटी आहेत, ते शोधलं, ह्या विषयावरचे चित्रपट बघितले. ह्या स्पर्धेतील मुख्य अट अशी की ह्यात चोरी केलेली वाक्य/विधानं/सिद्धांत किंवा पूर्वी प्रकाशित झालेली माहिती कुठेही येता कामा नये.
जय: देवाने पृथ्वीवर राहण्यासाठी आवश्यक सगळ्याच गोष्टी मुबलक प्रमाणात उपलब्ध करून दिल्या आहेत. अंतराळात ह्या सगळ्या गोष्टी नसल्यामुळे त्या तिथे निर्माण करणं म्हणजे एक मोठं आव्हानच. पण एक एक गोष्टीवर विचार करत गेलो तसं तसं सुचत गेलं, गुंता सुटत गेला, कोडी उलगडत गेली. जसं आपल्याला जर का घर बांधायचं असेल तर सर्वप्रथम आधी जागा शोधावी लागते त्याचप्रमाणे राहण्यायोग्य अशी आम्ही जागा शोधली ती म्हणजे एल५. ही जागा निवडण्याच कारण म्हणजे इथे कुठलीही वस्तू स्थिर राहू शकते कारण ही जागा पृथ्वी व चंद्राच्या मध्यभागी आहे.
प्रः जागा तर शोधली पण माणसाच्या प्राथमिक गरजा अन्न, वस्त्र, निवारा ह्या कशा पूर्ण करणार?
शंतनू: इथे घरे असतील ती मॉड्युलर प्रकारची. इथे शेती करावी लागणार ती माती विरहित, न्युल्कियर फिल्म टेकनिक पद्धतीने.ग्राफ्टिंगची पद्धतही इथे वापरण्यात येईल त्यामुळे एकाच झाडाला वेगवेगळ्या पद्धतीची फळे लागतील.पृथ्वीवरून आणलेल्या झाडांना सगळी पोषक द्रव्यांचा पुरवठा करून झाडे वाढवायची.
प्रः हे सगळ्ळं होईलच पण गुरुत्वाकर्षणाचा प्रश्न कसा सोडवणार?
शंतनू: ही वसाहत फिरती राहणार. सतत फिरत राहिल्यामुळे गुरुत्वाकर्षण तयार होईल.
प्र: गुरुत्वाकर्षणाचा प्रश्न सुटला आता वातावरणाचं काय?
जयः विमानात ज्याप्रमाणे वातावरण निर्माण करतात त्याच पद्धतीने वातावरण तयार करायचं. इथलं टेम्परेचर २२ डिग्री सेल्शियस असेल.
प्रः कारे इथले दिवस-रात्र कसे असतील?
शंतनू: अर्थात अनैसर्गिकच असतील. इथे मोठाले पॉवरहाऊस लावलेले असतील. ऑप्टीक फायबर ग्लास वापरून अनैसर्गिक दिवस रात्र करण्यात येतील.
प्रः ह्या इथल्या अनोख्या शहरात उर्जेची सोय काय?
जयः इथे आम्ही अनाशवंत गोष्टींचाच वापर अधिकाधिक करण्यात येणार आहे आणि ज्या नाशवंत आहे त्यासाठी रीसायक्लिंग करून वापरणार आहोत. ऊर्जेसाठी सौरऊर्जेचा वापर करणार. एल १ अशी जागा आहे तिथून भरपूर प्रमाणात सौरऊर्जा इथल्या वसाहतीकरिता तर घेता येईलच व काही पृथ्वीवरही पाठवता येईल.
प्रः माणूस तिथे राहणार म्हटल्यावर करमणूक, मनोरंजनाची सोय काय असेल?
शंतनू: अर्थात ह्या गोष्टीचाही आम्ही विचार केला आहे. ह्यासाठी दोन भाग केले आहेत. एक सेंट्रल सिलेंडर जिथे गुरुत्वाकर्षण नसेल तिथे खेळ खेळता येतील. दुसरा रिक्रीएशन तोरस जिथे नाच, गाणे सिनेमा बघता येतील.
प्रः अरे वा! छान! मजाच आहे. ही वसाहत वसायला किती वर्षांनी वसणार ? अजून अशी काही वसाहती असतील का?
जयः अशी शहरं वसायला बरीच वर्षे जावी लागणार आहेत कमीत कमी पन्नास साठ. हो, अश्या बऱ्याच वसाहती असतील कारण प्रचंड प्रमाणात वाढणारी लोकसंख्या. आपण एका गावाहून दुसऱ्या गावाला जातो त्याप्रमाणे एका वसाहतीहून दुसऱ्या अश्या वसाहतीला जाण्यासाठी स्पेस शटल असतील. अंतर्गत दळणवळणाकरिता विजेवर चालणाऱ्या गाड्या असतील शिवाय प्रत्येकासाठी बग्ग्या असतील.सामानाचे दळणवळण एलिवेटरने केलं जाईल. संपर्कासाठी एक आम्ही यंत्र तयार केलंय. ज्याच्यामुळे एकमेकांशी बोलता तर येईलच शिवाय त्या व्यक्तीची वर्चुयल एमेज पण दिसेल. वसाहत म्हटलं की त्याची निगा राखणं आलंच त्यासाठी आम्ही यंत्रमानव तयार केले आहेत. काही हातयंत्रमानवही केले आहेत जे आपली छोटी-मोठी कामे करतील. त्याला कॉफी बनवून आणायला सांगितलं तर बनवून देईल.
प्रः ह्या वसाहतीला नाव काय दिलंय?
जयः इ नेक्स्ट.
प्रः बापरे! कित्ती बारीक-सारीक गोष्टींचा विचार केलाय खरंच तुमचं जेवढं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. इथे धोके कुठल्या प्रकारचे असतील?
शंतनू: इथे सगळ्यात मोठा धोका असणारे तो रेडियेशनचा. त्यावर उपाययोजना तीन प्रकारे केली आहे. ग्राफाईट नॅनो फायबर दुसरी कुत्रीम ओझोन तयार करणे व तिसरी पृथ्वीप्रमाणे वसाहतीचा मॅग्नेटो स्फीयर राहील. अश्या वसाहती वसायला अजून बरीच वर्षे जावी लागणार आहेत तोपर्यंत मानवाने इतकी प्रगती केलेली असेल की काही रोग नष्ट झालेले असतील किंवा बहुतेक रोगांवरच्या लसी शोधलेल्या असतील. परग्रहावरून, परवसाहतीवरून येणाऱ्या प्रवाशांची योग्यप्रकारे चाचपणी केल्यावरच प्रवेश देण्यात येईल. इथे दवाखाने, शाळा, चित्रपटगृहे, हॉटेल्स अश्या अनेक प्रकारच्या सोयी-सुविधा असणार आहेत. ज्याप्रमाणे आपल्या इथे कॉर्पोरेशन असते त्याचप्रमाणे इथलं व्यवस्थापन असेल. गरीब-श्रीमंत लोकंही असतील. श्रीमंत लोकांसाठी ड्युप्लेक्स असतील तर त्यांचे स्वतःचे स्पेसजेट असतील.
प्रः मी तर हे सगळ्ळं ऐकून थक्कच झालेय. केवढी मेहनत केलीये तुम्ही! कसं काय केलं हे सगळं?
जयः अर्थात आमची मेहनत तर होतीच पण घरच्यांच्या पाठिंब्याशिवाय हे शक्यच नव्हतं. आमच्या दोघांच्याही आई-बाबांनी आम्हाला खूप प्रोत्साहन दिलं. माझ्या ताईचं तर बारावीच वर्ष होतं पण आई-बाबांनी दोघांकडे सारखंच लक्ष दिलं आणि ताईने पण तिला जमेल तशी मदत केली. ह्या पूर्णं प्रक्रियेला साडेचार महिने लागले. वेळेच पालन अगदी योग्य तऱ्हेने केल्यामुळे हे शक्य झालं असं आम्हाला वाटतं. आमच्या शाळेच्या मुख्याधापिका, शिक्षकवर्ग, व्हीएनआयटीचे प्राचार्य, प्राध्यापक, माझे वडील वकील आहेत त्यांच्या स्टेनोने रात्र-रात्र जागून आमचा निबंध टाईप करून दिला अश्या अनेक लोकांची आम्हाला मदत झाली.
प्रः तुमच्य निबंधाला प्रथम क्रमांक मिळाल्याचं कळलं त्याक्षणी तुमची अवस्था काय होती?
शंतनू: मी व्हिसासाठी मुंबईत होतो. जयचा मला फोन आला. त्याला आमच्या शाळेच्या प्रिंसीपॉल मॅडमने कळवले होते त्यांना ही बातमी तार न्युजवाल्यांनी कळवली होती. अर्थात खूपच आनंद झाला ..
जयः मी तर इतक्या जोराने ओरडलो की आजूबाजूची लोकं गोळा झाली. मी बेभान होऊन नाचतच सुटलो.
प्रः बक्षीस काय मिळालं?
शंतनू: इथल्या सगळ्या पद्धती खूप वेगळ्या आहेत.रोख रक्कम किंवा एखादं मेडल असं नसतं, प्रमाणपत्र देतात. पण आमच्यासाठी मोठ्ठ बक्षीस होतं, नासात जाऊन एवढ्या मोठं-मोठ्ठाल्या वैज्ञानिकांसमोर प्रेझेंटेशन देणं. ते आम्ही हातात काहीही नोटस न घेता, ठरलेल्या पंधरा मिनिटात पूर्णं केलं अर्थात त्यासाठी खूप सराव करावा लागला होता. आमच्यासाठी खास लंच होता त्या लंचमध्ये आमची नावं जाहीर केली.
प्रः नासा हे वैज्ञानिकांच 'तीर्थस्थान' तिथल्या अनुभव कसा होता?
जयः तिथला अनुभव तर अविस्मरणीय! खूपच छान होता. खूप मोठं-मोठ्या लोकांची तिथे भेट झाली त्यांच्याशी संवाद साधता आला. त्यात चंद्रा नील आर्मस्ट्रॉग नंतर गेलेल्या डॉ बझ अलड्रीन ह्यांच्याशी भेट झाली, बोलता आलं.
शंतनू: ग्रॅड प्राईज विनरने प्रश्न विचारला तुमचं वय काय तर ती चौदा वर्ष ऐकून आश्चर्यचकितच झाली. जाण्याआधी एपीजे अब्दुल कलामांना भेटणं हा एक आमच्या आयुष्यातील अविस्मरणीय प्रसंग!
प्रः आयुष्यातील ध्येय काय?
जयः नजिकच्या काळातील ध्येय बारावीचं. मला एस्ट्रोनॉट बनायचं आहे.
शंतनू: मला स्पेस रिसर्चमध्ये करियर करायचं आहे.
प्रः स्वप्न काय आहे?
जय शंतनू: पहिल्या भारतीय चांद्रयानात जाणारे दोन भारतीय आंतराळवीर असतील जय व शंतनू!
प्रः खगोलशास्त्र ही तुमची पहिल्या नंबरवर असणारी आवड आहे ह्यात काही शंकाच नाही पण ह्याशिवाय आणखी कोणते छंद आहेत?
जयः आम्हा दोघांनाही वाचनाची खूप आवड आहे.
पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा!
Comments
अभिनंदन
चांगली मुलाखत. या दोन्ही गुणी मुलांचे मनःपूर्वक अभिनंदन. या वयांत त्यांनी केलेली कामगिरी कौतुकास्पद आहे.
वृत्तपत्रात वाचलेल्या बातमीत या दोघांसह मधुर नावाची मुलगीही या पारितोषिकाची मानकरी ठरली असे कळते. तिचा उल्लेख यावयास हवा होता.
अभिनन्दन
सर्वप्रथम जय आणि शंतनूचे हार्दिक अभिनन्दन! खगोलशास्त्र व अवकाश संशोधनात तुमची घोडदौड अशीच चालू राहो. आता इस्रोसुद्धा चंद्रावर मानव पाठवण्याच्या विचारात आहे. तुमच्यासारख्या धडाडीच्या पिढीची भारताला नितांत गरज आहे.
ही बातमी इथे पाठविल्याबद्दल मंजू यांचे आभार!
गौरी
अभिनंदन
जय आणि शांतनवांचे हार्दिक अभिनंदन. मुलाखत येथे दिल्याबद्दल धन्यवाद.
धन्यवाद
प्रियाली, गौरी, धनंजय धन्यवाद! प्रियाली,अनवधनाने मधुरचा उल्लेख राहून गेला. तिचे दहावीचे वर्ष असल्यामुळे खूप मदत करु शकली नाही तसेच तिला व्हिसा न मिळाल्यामुळे जाऊही शकली नाही पण टीममध्ये तिचे नाव होते त्यामुळे बातमीतही नाव होते.