आपले धर्मग्रंथ कधी लिहिले गेले ? - भाग 2

वाल्मिकी रामायण

गंगा नदीच्या खोर्‍यात असणार्‍या कोसल या राज्याचा राजा श्रीराम याची कथा किंवा रामायण ही भारतीय संस्कृतीचा मानबिंदू आहे असे म्हटले तरी चालेल. आपल्या संस्कृतीत जे जे उत्तम, उदात्त आणि आदर्श म्हणून मानले जाते ते सर्व या राम या व्यक्तीरेखेत एकवटले आहे यात शंकाच नाही. ज्या काली रामायणाची मूळ कथा घडली असावी त्या कालातील समाजापुढे काय आदर्श होते हे रामचरित्रावरून समजू शकते. पित्याच्या आज्ञेवरून, या राजपुत्राने राज्यत्याग करून वनवास पत्करला. स्वत:च्या पित्याला तीन राण्या होत्या तरी रामाने एकपत्नीव्रत अंगिकारलेले आहे. तो कुशल योद्धा, सेनानी आणि राज्यकर्ता आहे. आलेल्या परिस्थितीपुढे अगतिक न होता त्या परिस्थितीचा सामना तो करत राहतो व शेवटी यश मिळवतो. या सगळ्या गोष्टींमुळेच रामकथेला भारतीय जनमानसात अनन्यसाधारण महत्व मिळालेले आहे.

रामायण ही एक अगदी साधी व सरळ कथा आहे.कोसल राज्याचा राजपुत्र असलेल्या रामाचा विदेह राज्याची राजकन्या सीता हिच्याशी विवाह होतो. रामाच्या सावत्र आईची तिच्या मुलाला राज्य मिळावे अशी इच्छा असल्याने ती कारस्थानाने रामाला चौदा वर्षे वनवासाला पाठवते.भारतीय द्वीपकल्पाच्या (Peninsula) मध्यवर्ती भागात असलेल्या, विंध्य पर्वताजवळच्या, दाट जंगलांच्यात राम, सीता व त्याचा धाकटा भाऊ लक्ष्मण हे अरण्यवासी जनांसारखे राहू लागतात.लंकेचा राक्षस राजा रावण हा सीतेचे हरण करतो. राम एक सैन्य उभे करतो. त्यासाठी तो वानरांचा एक नेता हनुमान याची मदत घेतो. रामाचे रावणाबरोबर तुंबळ युद्ध होते. त्यात रावण व त्याचे सैन्य हे मारले जातात. चौदा वर्षाचा वनवास संपल्याने राम, सीता व लक्ष्मण कोसल राज्यात परततात. त्यांचे तेथे स्वागत होते. व शेवटी रामाचे राज्यारोहण होते. कथेच्या या आराखड्यावरून हे लक्षात येते की ही कथा एखाद्या लोक कथेसारखीच आहे. यातल्या नायकाला अडचणी येतात तो त्यावर मात करण्यासाठी असिम शौर्य गाजवतो व आपल्यापुढच्या सर्व अडचणी सोडवतो.

प्रसिद्ध इतिहासतज्ञ श्रीमती रोमिला थापर यांच्या मताप्रमाणे वाल्मिकी या कवीने, मौखिक परंपरेने चालत आलेल्या, रामाबद्दलच्या निरनिराळ्या लोककथा व लोकगीते यांच्या आधाराने, इ.स.पूर्व 500 या कालखंडाच्या आसपास वाल्मिकी रामायण हे महाकाव्य रचले असावे (संदर्भ1). श्रीमती थापर यांच्याच शब्दात सांगायचे तर " रामायण हे महाकाव्य, महाभारताच्या आधीच्या कालखंडात रचले गेले असावे असा सर्व साधारण समज आहे. तरीही त्याची भाषाशैली अतिशय Polished आहे. नंतरच्या कोणत्याही कालखंडातल्या समाजाच्या, नीतिमत्तेच्या कल्पनांशी ते एकरूप होऊ शकते. हे महाकाव्य म्हणजे जाणीवपूर्वक रचलेली अशी संस्कृतमधील पहिली साहित्यिक कलाकृती आहे." श्रीमती थापर पुढे म्हणतात की "राम आणि रावण यांच्यातील युद्ध हे गंगेच्या खोर्‍यातील एक राज्य व भारतीय द्वीपकल्पाच्या मध्यवर्ती भागात असलेल्या, विंध्य पर्वताच्या परिसरातल्या, अरण्यवासी गिरीजनांचे राज्य, यांच्यामधल्या स्थानिक स्वरूपाच्या झगड्याचे अतिरंजित स्वरूप वाटते. कोसल राज्य, गंगेच्या खोर्‍यात उदयास येणार्‍या नवीन राज्यांचे प्रतिनिधी आहे तर रावणाचे राक्षस राज्य हे जंगलांच्यात रहाणार्‍या गिरीजनांच्या टोळ्यांचे अवास्तव व अतिरंजित स्वरूप आहे. मूळ स्वरूपात, गावात वसाहत करून रहाणारे नगरवासी व जंगलात वास्तव करणार्‍या गिरीजन टोळ्या यातला हा संघर्ष आहे." "पुढच्या कालात, भारतीय द्वीपकल्पात मानवी वसाहती जसजशा वाढत गेल्या तसतशी रामायणाची भौगोलिक व्याप्तीही वाढत गेली. व याचाच परिणाम म्हणून लंका व तिथली अमाप श्रीमंती यांचा या महाकाव्यात समावेश झाला.”

रामायण, ऋग्वेद व महाभारत या तिन्ही ग्रंथावर अगदी धावती नजर टाकली तरी ऋग्वेद व महाभारत या दोन्ही ग्रंथांपेक्षा, रामायणाची नैतिक व सामाजिक मूल्ये वेगळी असल्याचे लगेच लक्षात येते. रामायणात राम आणि त्याचे तीन भाऊ यांच्यात प्रेम आहे. वडीलांची आज्ञा राम शिरसावंद्य मानतो तर दुर्योधन वडिलांच्या आज्ञेला झुगारून देतो. भावाचे राज्य स्वीकारण्यास भरत नकार देतो तर पांडव व कौरव राज्यासाठी भांडत रहातात. रामायणातला राम मर्यादा पुरुषोत्तम आहे. नीतिमूल्यांची बंधने तो पाळतो. ऋग्वेदातला इंद्र नीतिमत्तेचे कोणतेच बंधन पाळत नाही.रामायणात लैंगिक संबंधाबद्दलचे उल्लेख किंवा चर्चा नाही. ऋग्वेदात(संदर्भ 2) ते अनेक ठिकाणी आहेत. (उदा.10.86, 10.95) राज्यकर्ता निष्कलंकच असला पाहिजे प्रसंगी त्याने त्याची गर्भवती पत्नी व राज्याचा वारस गमावला तरी चालेल अशा विचारांचा रामायणातला राम हा आहे. महाभारतातील राजे पुत्रप्राप्ती होत नाही म्हणून पत्नीला परपुरुषासाठी संबंध ठेवायला सांगतात. रामायणात कोणतीही व्यक्ती दिवास्वप्ने (Hallucinations) दाखवणारी पेये पीत नाहीत. ऋग्वेद ज्या वनस्पतीपासून हे पेय तयार केले जाते त्या वनस्पतीलाच देवरूप देतो(संदर्भ 2) त्याची प्रार्थना करतो(8.79).

श्रीमती रोमिला थापर यांची वर निर्देश केलेली मते मान्य केली तर रामायणातील काही विसंगतींचा (apparent contradictions) उलगडा होऊ शकतो. रामायणाच्या मूळ कथेशी संबंध नसणारी वसिष्ठ किंवा विश्वामित्र ही पात्रे राम कथेत कशी आली? अयोध्या नगरीची निर्मिती, मनु या वेदकालीन व्यक्तीने कशी केली? किंवा भटक्या टोळीवाल्यांचा (Pagan) अश्वमेध यज्ञ हा विधी रामायणात कसा आला? ही पात्रे किंवा हे विधी इ.स.पूर्व 500 या शतकानंतर रामकथेत आले असावेत असा अंदाज करता येतो.

थोडक्यात सांगायचे म्हणजे रामायण हा नागरीकरण होणारा समाज व जंगलात रहाणार्‍या, शिकारीवर जगणार्‍या जंगली टोळ्या यांच्यातला कलह किंवा संघर्ष आहे. रामकथेला, वाल्मिकीने इ.स.पूर्व 500 च्या सुमारास महाकाव्याचे स्वरूप दिले. त्याच्या आधी ही कथा, लोक कथा किंवा लोक गीते या स्वरूपात होती.या मूळ कथेच्या कालाचा काही अंदाज करता येतो का हे पुढच्या भागात बघू.

चंद्रशेखर

संदर्भ:-
1.Early India by Romilla Thaper pp.102-104
2.The Rig Veda by Wendy Doniger O' Flaherty

लेखनविषय: दुवे:

Comments

वा

हा लेख खरच छान वाटला वाचायला.
मूळ स्वरूपात, गावात वसाहत करून रहाणारे नगरवासी व जंगलात वास्तव करणार्‍या गिरीजन टोळ्या यातला हा संघर्ष आहे.

हे मत इंटरेष्टींग आहे.
(प.वि. वर्तक वास्तव रामायण या पुस्तकात असेच मत मांडतात... असे आठवले)

वाल्मिकीने इ.स.पूर्व 500 च्या सुमारास महाकाव्याचे स्वरूप दिले.

वाल्मिकीची कालनिश्चिती श्रीमती थापर यांनी कशी केली या विषयी काही सांगू शकाल का?

Early India मी कुठे मिळते का तेही पाहीनच.
संदर्भांबद्दल धन्यवाद.

आपला
गुंडोपंत

वाचतो आहे

वाचतो आहे. पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत!
वाचल्यानंतर सहज मनात आलेला एक प्रश्न - नगरवासी आणि गिरीजन असा एक भेद या विषयांवरील चर्चेत सातत्याने होत आला आहे. याकरीता वापरता येणारे सारेच संदर्भ नगरजनांच्याकडून लिहिले गेले आहेत की, असे काही संदर्भ या गिरीजनांकडूनही लिहिले, मांडले (म्हणजे लेखी व मौखीक) गेले आहेत? नगरवासींनी त्यांना गिरीजनांपासून वेगळे कसे, कोणत्या निकषांच्या आधारे व का ठरवले असावे? त्यांच्यातील हा भेद उच्च-नीच असाही होता का?

उच्च-नीच असा भेद

वाली घायळ झाल्यावर रामाने त्याला केलेला उपदेश यावरून नगरवासी आणि गिरीजन यांच्यात उच्च-नीच असा भेद असावा असे वाटते.

अधिक माहितीसाठी वाली आणि रामातील प्रश्नोत्तरांचा हा उतारा वाचावा. माझ्या आठवणीप्रमाणे येथे अधिक प्रश्न हवेत (सुमारे ५-६) परंतु विकीवर तीन दिसतात. असो, ते तीन प्रश्न योग्य आहेत असे आठवते आणि त्यानंतर रामायणात येणारी -वालीचे समाधान झाले आणि त्याने प्राण सोडला ही टिप्पणीही. (या टिप्पणीबद्दल काही न बोलणे उत्तम)

काही इतर प्रश्न असे -

प्रश्नः मी तुझ्या राज्याला, शहराला, लोकांना कोणत्याही प्रकारची हानी पोहोचवली नाही तरी माझ्याशी असे वर्तन का?
उत्तरः ही संपूर्ण भूमी इक्श्वाकु वंशाची आहे. (हे उत्तर मला शिक्षिताने अडाण्याला मारलेली सरळ सरळ थाप वाटते.)

प्रश्नः निरपराध्याला का मारण्यात आले? (मी तुमचा अपराधी नव्हतो अशा प्रकारे घ्यावे)
उत्तरः तू राजाप्रमाणे वागला नाहीस हाच तुझा अपराध आहे आणि यानंतर राम वालीला नागरी राजाचे नितीनियम सांगतो. :-)

किष्किंधाकांडातील सदर प्रश्नोत्तरे सामान्य स्वरुपात दिली आहेत. शब्दशः भाषांतर नव्हे.

नगरवासी व गिरीजन

इंग्रजीमधे एक म्हण आहे. 'विनर टेक्स ऑल" एखाद्या बर्‍याच काल चाललेल्या संघर्षात, जिंकणार्‍या बाजूचा इतिहास असतो व हरणार्‍यांच्या दंतकथा. या बाबतीत इंग्रज-मराठे यांच्या युद्धाचा इतिहास हे ताजे उदाहरण आहे. नगरवासी व गिरीजन यांच्या संघर्षाच्या बाबतीत असेच घडले असावे.
चन्द्रशेखर

पुढील भागाच्या प्रतीक्षेत

रामायण त्रेतायुगात घडले आणि महाभारत द्वापारयुगात. यावरूनही रामायण हे महाभारताच्या आधी घडले असे म्हटले जाते. रामायणातील आदर्शवाद मात्र प्राचीन जमातींच्या राहणीशी संबंधीत वाटत नाही. एखाद्या आधुनिक कथानायकाची गोष्ट असावी (अगदी हिंदी सिनेमा) तसे रामायण घडते.

रामायण इ. स. पूर्व ५०० च्या सुमारास रचले गेले किंवा संकलित केले गेले असे म्हणणे मी देखील पूर्वी वाचले आहे.

रामायणात कोणतीही व्यक्ती दिवास्वप्ने (Hallucinations) दाखवणारी पेये पीत नाहीत.

हे मात्र योग्य नाही. रामायणात सुरेचे उल्लेख आहेत. एक प्रसिद्ध उल्लेख जो या आधीही दिलेला आहे तो असा की गंगा नदी ओलांडताना सीता नदीला नवस बोलते की अरण्यातील ही वर्षे संपवून आम्ही सुखरुप आलो तर तुला सहस्त्र घडे दारू, मांस आणि भाताचा प्रसाद दाखवेन. (अयोध्याकांड, सर्ग ५२, श्लोक ८९) गंगा ही देवीस्वरुप. तिला असे नवस बोलणार्‍या व्यक्ती स्वतः दारु पित असण्याची शक्यताही आहेच.

परंतु, रामायणात या पेयांचे उदात्तीकरण नाही. किंवा महाभारतासारखे स्त्रिया-पुरुष दारू पिऊन ऐशोआराम करत असण्याचे संदर्भ नसावेत.

रामायण हे महाकाव्य, महाभारताच्या आधीच्या कालखंडात रचले गेले असावे असा सर्व साधारण समज आहे. तरीही त्याची भाषाशैली अतिशय Polished आहे.

भाषाशैली पॉलिश्ड आहे यावर थापर अधिक काही लिहितात का? यासंबंधी अधिक लिहावे किंवा प्रतिसादातून माहिती द्यावी.

सुरा, सोम वगैरे

दारू व सोमरस यात बराच फरक आहे असे वाटते. सुरा पान अगदी सर्वत्र आढळते तेंव्हा ते रामायणात असणारच. सोमरस हा 'एल.एस.डी' प्रकारात मोडणारा असावा. काही संशोधकांच्या मते सायबेरिया या प्रदेशात आढळणार्‍या एका कुत्र्याच्या छत्रीचा (मश्रूम) हा रस असावा. या संबंधी जास्ती माहिती पुढच्या लेखात देण्याचा प्रयत्न करीन.
ऋग्वेदाचे भाषांतर जरी बघितले तरी त्यातली भाषा रामायणाच्या मानाने किती 'अनसॉफिस्टिकेटेड' आहे हे लगेच लक्षात येते. लावणी आणि भावगीत यांचा भावार्थ जरी एक असला तरी सादर करण्याच्या पद्धतीत जसा जमीन अस्मानाचा फरक वाटतो तसाच या दोन ग्रंथातील भाषाशैलीत वाटतो.
चन्द्रशेखर

सोमरस

सोमरसावर यापुर्वीची चर्चा वारुणी या गुंडोपंतानी चालु केलेल्या धाग्यात पहायला मिळेल. http://mr.upakram.org/node/1134 देवांनी प्याला तर तो सोमरस आन राक्षसांनी प्याली तर ती दारु काय?
प्रकाश घाटपांडे

चांगली माहिती

लेख आणि प्रतिसादांतून चांगली माहिती मिळत आहे. लेखमाला सुरू केल्याबद्दल धन्यवाद.

पुढील् भागाच्या प्रति़क्षेत्.

असेच म्हणतो. मनात काही शंका आणि प्रश्न आहेत पण ते पुढच्या भागात सुटतील असे वाटत् असल्याने नंतरच् विचारेन.

वाचतोय.

रामायणाबद्दलची माहिती काळजीपूर्वक वाचतोय. महाभारताप्रमाणे रामायणाच्याही तीन आवृत्त्या होत्या असे म्हणतात.आता प्रमाण रामायण कोणते या बद्दल काही माहिती सांगू शकाल का ?

महाभारताप्रमाणेच रामायणाच्या मूळ विषयातही भर टाकण्यात आली असे म्हणतात. सीतेवरून झालेल्या राम-रावणाची युद्धाची कथा म्हणजे रामायण होती. दुसर्‍या आवृत्तीत उपदेशांची भर घालण्यात आली. सामाजिक नैतिक व धार्मिक आचारसंहितेचा समावेश करण्यात आला. तिसर्‍या आवृत्तीत कथा,दंतकथा,ज्ञान,तत्वज्ञान, असे सर्वसमावेशक त्याचे स्वरुप करण्यात आले म्हणतात.

रामायणाच्या कथा, महाभारतातील काही कथा एकाच काळातील होत्या असेही म्हणतात. हे असेच कुठेतरी वाचलेले, संदर्भ वगैरे काही नाहीत. की केवळ बुद्धीभेद करण्यासाठी असे सांगण्यात आले. काही माहिती मिळेल का ?

-दिलीप बिरुटे

डज्झड सक्कयकव्वं सक्कयकंव्वच निम्मियं जेण |
वंसहरम्मि पलित्ते तडयडतट्टत्तणं कुणइ ||

इरावती कर्वे

रामायणाच्या विषयी सोप्या भाषेतील अधिक माहिती साठी इरावती कर्वे यांचे संस्कृती हे पुस्तक वाचावे. (त्यात प्रा. कुरुंदकरांनी लिहिलेला 'श्रद्धांजली' हा भागही वाचनीय आहे).
इरावती बाईंनीही रामायणातील आधुनिक आदर्शवाद आणि भाषेविषयी लिहिले आहे.

नितिन थत्ते

चांगला लेख

श्री चंद्रशेखर, लेख मागील लेखाप्रमाणेच उत्तम झाला आहे.

मागे एकदा ग्रॅहॅम हॅन्कॉक यांच्या 'अंडरवर्ल्ड: द मिस्टेरियस ओरिजिन्स ऑफ सिविलायझेशन' या पुस्तकात काही भारतीय संस्कृतीच्या कार्यकालासंदर्भात काही अविश्वसनीय दावे वाचनात आले होते. (हे पुस्तक मी विकत घेतले नव्हते, भेट मिळाले होते.) त्या पार्श्वभुमीवर तुमच्या लेखातील माहितीतील काटेकोरपणा भावतो.

वर प्रियाली यांनी रोमिला थापर यांच्या विधानासंदर्भात अधिक माहिती विचारली आहे. मी त्यांच्या मताशी सहमत आहे. थापर यांना संस्कृत भाषेची ओळख नाही असा आरोप बर्‍याचदा ऐकण्यात आला आहे (उदाहरण). त्यांना संस्कृत भाषेचे ज्ञान नसल्यास भाषशैलीविषयी त्यांची विधाने विश्वासार्ह वाटणार नाहीत.

________________________
As an internet discussion grows longer, the probability of a comparison involving Nazis or Hitler approaches 1.
-Godwin's law

काहीच दम नाही

थापर यांना संस्कृत भाषेची ओळख नाही असा आरोप बर्‍याचदा ऐकण्यात आला आहे.

वरील स्रोताशिवाय कुठेकुठे आरोप केले, ऐकले आहेत ते सांगाल काय? हिंदुत्ववाद्यांकडून रोमिला थापर ह्यांच्यावर होत असणारे इंटरनेटीय हल्ले (विशेषतः अमेरिकेतल्या काही हिंदुत्ववादी दीडशहाण्यांकडून होत असणारे हल्ले) काही नवे नाहीत. ह्या आरोपांत काहीच दम नाही.

संस्कृत भाषेचे पुरेसे ज्ञान असूनही काही जण किती अचाट निष्कर्ष काढतात हे सूज्ञांना माहीत आहेच. त्यामुळे रोमिला थापर ह्यांना संस्कृत येत नसल्यास उत्तमच! काही अडत नाही.
हे वाचा:

  1. रोमिला थापर ह्यांच्या समर्थनार्थ नामवतं प्राध्यापकांनी, इतिहासकारांनी दिलेले निवेदन
  2. रोमिला थापर ह्यांच्या समर्थनार्थ लिहिलेले पत्र
  3. एन्नाराय हिंदुत्ववाद्यांबद्दल (मजेदार)
  4. सनातन.ओरजीची शिकली सवरली बहीण (मजेदार)

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

संस्कृत भाषेची ओळख

संस्कृत भाषेतील जवळ जवळ सर्व ग्रंथांची इतर भाषांत कधीच दर्जेदार भाषांतरे झाली आहेत तेव्हा भारतीय इतिहास समजण्यास संस्कृत भाषेची ओळख हवी हा दावा फुटकळ वाटतो. (भाषेची ओळख असणे किंवा तिचा उपयोग अधिक संशोधनासाठी करणे यात काहीच गैर नाही. बहुधा, फायदाच असावा.) धम्मकलाडू यांनी म्हटल्याप्रमाणे संस्कृत भाषेचे आपल्या मतलबानुसार किंवा आपल्या (अ)ज्ञानानुसार भाषांतर करणारे अनेक तज्ज्ञ दिसून येतात. त्यांत रोमिला थापर यांचा समावेश नाही ही गोष्ट उत्तम आहे.

आरोप हिंदुत्ववाद्यांकडूनच

श्री धम्मकलाडू, संस्कृत भाषेच्या अज्ञानासंदर्भातील आरोप मूख्यत: हिंदुत्ववादी विचारसरणीच्या लोकांकडूनच ऐकले आहे. आपण दिलेल्या दुव्यांमध्ये त्या आरोपाचे खंडन आढळले नाही. रोमिला थापर यांच्या संशोधनाविषयी आदरच आहे. त्यांना संस्कृतचे ज्ञान नसल्याने त्यांचे भारतीय इतिहासाविषयी संशोधन विश्वासार्ह नाही असे अजिबात नाही. तुम्ही व प्रियाली यांनी यासंदर्भात मांडलेल्या मतांशी मी सहमत आहे. परंतु लेखात उदधृत केलेले विधान हे रोमिला थापर यांचे आहे. त्यांनी त्या विधानाच्या पुष्ट्यर्थ संस्कृततज्ज्ञांचे दाखले दिले असल्यास उत्तमच आहे. लेखात ते जसे आले आहे त्यावरून रोमिला थापर यांनी 'फर्स्ट हँड' या पुस्तकातील संस्कृत भाषाशैलीचा अभ्यास केला आहे असा माझा समज झाला आहे.

यासंदर्भात माझे वैयक्तिक मत मात्र त्यांनी संस्कृत भाषेशी परिचय करून घेतला असता तर अशा आरोपांना जागाच उरली नसती, असे आहे. एका प्रथम श्रेणीच्या संशोधकाकडून (ज्यांचे संशोधन मूख्यत: प्राचीन भारतीय संस्कृती आहे.) अशी अपेक्षा असणे हे स्वाभाविकच आहे.

शेवटचे दोन दुवे खरोखरच मजेशीर आहेत.
________________________
As an internet discussion grows longer, the probability of a comparison involving Nazis or Hitler approaches 1.
-Godwin's law

चर्चा व्हावी

उपक्रमावर काही चांगले संस्कृततज्ज्ञ आहेत. तुम्ही रोमिला थापर ह्यांचा उतारा इथे द्यावा. (थापर ह्यांच्या पुस्तकाआधी प्रकाशित झालेल्या"केंब्रिज शॉर्टर हिस्टरी ऑफ इंडिया"मध्येही थापर ह्यांच्यासारखेच मत दिले आहे. रोमिला थापर ह्यांचे 'अज्ञान' उघडे पाडायला फक्त काही हिंदुत्ववादीच पुढे आलेले दिसतात. गंभीर इतिहासकारांनी तुटून पडायला हवे होते. असो.) तज्ज्ञांची मते घेता येतील. ऋग्वेदातले 'मृग हस्तिन' म्हणजे नक्की काय ह्याबद्दल आपले मत ते मांडतील. आर्यांना हत्ती हा प्राणी नवा नव्हता, ते इथूनच जगभर पसरले असे संशोधनअंती सिद्ध झाल्यास प्रश्नच मिटला. त्यानंतर ज्यांना 'गॉच्या, गॉच्या' करायचे आहे ते 'गॉच्या गॉच्या' करत फिरतील.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

सहमत

जरूर चर्चा व्हावी.

तुम्ही रोमिला थापर ह्यांचा उतारा इथे द्यावा.

मी रोमिला थापर यांचे पुस्तक वाचलेले नाही आणि ते पुस्तक माझ्या संग्रही नाही. माझे मत या लेखातील त्यांच्या विधानासंदर्भात आहे. श्री चंद्रशेखर यांच्याकडे पुस्तक असल्यास तेच अधिक प्रकाश टाकू शकतील.

रोमिला थापर ह्यांचे 'अज्ञान' उघडे पाडायला फक्त काही हिंदुत्ववादीच पुढे आलेले दिसतात.

हा आरोप मूख्यत्वे हिंदुत्ववाद्यांनीच केलेला आढळतो.

तेच विधान इकडे टाकावे

मी रोमिला थापर यांचे पुस्तक वाचलेले नाही आणि ते पुस्तक माझ्या संग्रही नाही. माझे मत या लेखातील त्यांच्या विधानासंदर्भात आ

हे.
तेच विधान इकडे टाकावे व चर्चा घडवून आणावी. म

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

डकवत आहे

श्री धम्मकलाडू, इकडे म्हणजे कोठे हे न समजल्याने खाली डकवत आहे.

रामायण हे महाकाव्य, महाभारताच्या आधीच्या कालखंडात रचले गेले असावे असा सर्व साधारण समज आहे. तरीही त्याची भाषाशैली अतिशय Polished आहे. नंतरच्या कोणत्याही कालखंडातल्या समाजाच्या, नीतिमत्तेच्या कल्पनांशी ते एकरूप होऊ शकते. हे महाकाव्य म्हणजे जाणीवपूर्वक रचलेली अशी संस्कृतमधील पहिली साहित्यिक कलाकृती आहे.

दुवादेखील द्यावा

तुम्ही आधी दिलेल्या पानावर वरील मजकूर दिसला नाही. दुवादेखील द्यावा, ही विनंती.
तुम्ही दिलेल्या पानावर 'मृग हस्तिन'बाबत लेखकाने घेतलेला आक्षेप पटण्यासारखा नाही. एकंदरच तो दुवा मजेशीर आहे. वेद सर्व ज्ञानांचे आगर आहे असे अजूनही अनेकांना वाटते.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

समजले

As I said earlier, one of the main criticisms levelled against Thapar is that she has no first hand knowledge of Sanskrit. Now our lady turns tables by saying the charge is an “absurdity.” This is clear when you read this a rather longish passage I have reproduced...

अधोरेखित वाक्यात 'संस्कृतविषयी अज्ञान' हा ऐकीव आरोप दिसतो. हे वाक्य वर दिलेल्या दुव्यातील लेखातच आहे. इतर आणखी काही दुवे आहेत पण ते या दुव्यापेक्षा हास्यास्पद वाटण्याची शक्यता आहे. तुम्ही श्री चंद्रशेखर यांच्या लेखातील वाक्य किंवा रोमिला थापर यांच्या पुस्तकातील परिच्छेद विचारत आहात असा माझा गैरसमज झाला होता.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

वर्गकलह्

रामायणाच्या लेखन-रचनेचा काल
या लेखात रामायणाचा लेखन काल इ.स.पूर्व ५०० असा दिला आहे व त्याला आधार श्री.थापर यांचा दिला आहे.काळ बरोबर असेल, पण आधार फारसा विश्वसनीय नाही. डावी विचारसरणी असलेल्या लेखकांची मते पारखून घेणे गरजेचे असते कारण आपली मार्क्सवादी विचारसारणी पुढे ढकलण्यास ते बर्‍याच गोष्टींचा विपर्यास करतात. उदा. सगळ्या इतिहासात त्यांना वर्गकलह दाखवावयाचा असतो. अस्तु. बौद्ध-जैन वाङ्मय, पुराणे यांचा उपयोग करणे जास्त उचित वाटते.
"थोडक्यात सांगावयाचे म्हणजे रामायण हा नागरीकरण होणारा समाज व जंगलात रहाणार्‍या, शिकारीवर जगणार्‍या जंगली टोळ्या यांच्यातला कलह किंवा संघर्ष आहे."
कस काय ? प्रथम राम-लक्ष्मण म्हणजे "समाजीकरण होणारा समाज" नव्हे. अयोध्या व तत्सम राज्यांची सैन्ये लढाईला गेली असती तर एकवेळ असे म्हणावयास जागा झाली असती.
इ.स.पूर्व ३००० मध्ये किंवा पूर्वीच हिन्दुस्थानात नागरीकरण झालेले होते. (पहा: सिन्धुसंस्कृति).तेंव्हा "नागरीकरण होणारा" हे बरोबर वाटत नाही. दुसरे किष्किंधा व लंका ही मोठी शहरे होती. तसेच दंडकारण्यात खराकडे १४००० सैनीक होते म्हणजे तिथेही नगर असणारच. द्राविड संस्कृति ही सिन्धुसंस्कृतीच्या आधीपसून होती असे मानले जाते.तेंव्हा नागरी-अनागरी (किंवा जंगली) यातील कलह वा संघर्ष हे वर्णन चुकीचे वाटते.
रामाने खर, वाली व लंकेत रावण व त्याचे सैन्य यांच्याशी युद्ध केले. यात "जंगली टोळ्या" कोठून आल्या ? पहिल्यांदी १४००० सैनीक, दुसर्‍यांदी एक व्यक्ती व तिसर्‍यांदी लाखो सैनीक: यांना जंगली टोळ्या गणू नये.( या तर्‍हेच्या वर्गकलह ओढूनताणून आणणार्‍या विचारसरणीला मी साम्यवादी विचारसरणी म्हणतो )
शरद

शरद

साम्यवादी नसेल तर हिंदुत्ववादी

साम्यवादी नसेल तर हिंदुत्ववादी विचारसरणी घ्यावी का हो शरदकाका? हिंदुत्ववादी विचारसरणी ओढूनताणून आणलेली नसते. ती बळजबरीने तोंडात/ डोक्यात कोंबली जाते.

पटत नसेल तर सनातन.ओआरजी ला भेट द्या.

-राजीव.

अरे हो

अरे हो, मार्क्सवादी विचारसारणी हा मुद्दा माझ्या लक्षात आलाच नव्हता! पण विकि चे त्यांचे पान चाळलेतासता तसे काही दिसले नाही....?

आणि दुसरे, किष्किंधा व लंका ही मोठी शहरे होती. या संदर्भात प. वि वर्तक त्यांच्या वास्तव रामायण या पुस्तकात म्हणतात आपण ज्यांना राक्षस म्हणतो ते तत्कालीन इतर जमातींपेक्षा खरे तर अधिक प्रगत होते. या साठी त्यांनी अनेक उदाहरणेही दिली आहेत.
(पुस्तक हाताशी नाही अन्यथा अवतरणे आणि पान क्रमांक देवू शकलो असतो.)

आपला
गुंडोपंत

विकीचे पान

मार्क्सवादी विचारसारणी हा मुद्दा माझ्या लक्षात आलाच नव्हता! पण विकि चे त्यांचे पान चाळलेतासता तसे काही दिसले नाही....?

हम्म! तिथे भाजपाने इतिहासाची पाठ्यपुस्तके बदलून काही ऐतिहासिक संदर्भांना चाट दिल्याच्या गदारोळाबद्दल लिहिले होते ना. मागे वाचले होते. विकिपानावर हिंदुत्ववाद्यांचा फेरा पडला नसेल तर अद्यापही तेथे असावे. :-)

मस्त

रामायणावरील लेख आवडला. रामायण हा नक्की कोणा मधील संघर्ष आहे त्याबद्दल अनेक मते वाचली आहेत् त्याततीलच हे एक. काहि आठवतात ती अशी:
१. मानव वि. आदीमानव
२. परकीय वि. स्थानिक
३. सुधारणावादी (एकपत्नीव्रत वगैरे) वि. परंपरावादी
४. आर्य वि. द्रविड
५. नागर वि. जंगली
व सगळ्यात भन्नाट!!.. (ऐकीव असला तरी रोचक आहे)...

६. होमो इरेक्टस(वानर सदृश) व होमो सेपियन(प्रगत मानव) यां प्रांण्यांची युती वि. एक वेगळ्याच ब्रीडचे स्थानिक मानव (ज्यांचे नाव होमो काहितरी ऐकले होते.. आता आठवत नाहि.. ) मात्र वरील दोन अशक्तांच्या युतीने त्या ओरीजीनल मानवांना हरवले :)

याशिवाय सोमरसावरून डिस्कवर इंडीया या मालिकेचा भाग-१ आठवला

ऋषिकेश
------------------
भ्रष्टाचार संपविण्याचा सर्वोत्तम आणि सर्वात सोपा(?) उपाय म्हणजे त्यात स्वतः सहभागी न होणे

एक अजून दुवा

हे मिनि रामायण ऐकले आहे का?

मजेदार आहे.

आपला
गुंडोपंत

 
^ वर