या ज्योतिषाचं काय करायचं?
सिगारेट पिणे आरोग्यास अपायकारक आहे हे वैज्ञानिक दृष्टया सिद्ध झाले आहे. त्यासाठी संख्याशास्त्रीय चाचण्याही घेण्यात आल्या. त्यातील निष्कर्षानुसार ते आरोग्यास अपायकारक असल्याचे सिद्ध झालेने ते पाकिटावर वैधानिक इशारा म्हणून छापणे सक्तीचेही केले. तो इशारा वाचणे हे सिगारेट पिणाऱ्याना सक्तीचे नसले तरी त्याची त्यावर नजर जावी एवढया मोठया अक्षरात तो छापला गेला. मोठा आणि ठळक वाटला तरी त्यावर वाचकाची नजर स्थिरावणार नाही असा फॉन्ट जाहिरात कंपन्या वापरतात. बहुसंख्य लोक तो एकदा तरी नजरेखालून घालतात. तो वाचून किती लोकांनी सिगारेट पिण्याचे सोडून दिले आहे? सिगारेट पिणाऱ्यांमध्ये विद्वान , बुद्धीजीवी लोक नाहीत काय? या इशाऱ्याशी सहमत असणारे कित्येक डॉक्टर्स सुद्धा या सिगारेट पिणाऱ्यांमध्ये आहेत.
मग फलज्योतिष हे विज्ञान नाही असे प्रयोगांती सिद्ध झाले तर त्यामागे धावणाऱ्यांचे प्रमाण किती कमी होईल? ते विज्ञान आहे अशा भूमिकेतून फलज्योतिषावर विश्वास ठेवणारे व त्याचा वापर करणारे लोक किती?
वैज्ञानिक दृष्टिकोणातून एखाद्या गोष्टीकडे बघताना बहुसंख्य लोकांचा विश्वास ही बाब गौण ठरते.वस्तुनिष्ठ चाचणी घेवून, त्याचे पुन:पुन: प्रयोग करुन मगच निष्कर्ष काढणे ही गोष्ट आवश्यक ठरते. फलज्योतिष हे विज्ञान आहे की नाही हे ठरविण्याकरिता जे निकष लावावे लागतात ते निकष ज्योतिषांना मान्य आहेत की नाहीत? हा मुद्दा महत्वाचा ठरतो.नारळीकरांनी आवाहन केलेल्या ज्योतिषाच्या चाचणीचा कळीचा मुद्दा तोच आहे. फलज्योतिष हे विज्ञान आहे असे समर्थन करणाऱ्यांना जेव्हा कळून चुकले की हे विज्ञान ठरणे अवघड आहे त्यावेळी त्यांनी त्याला हे भौतिक विज्ञान नाही अशी भूमिका घ्यायला सुरवात केली काहींना ते विज्ञान म्हणून सिद्ध होण्याची गरजच वाटत नव्हती. कारण ते वस्तुनिष्ठ असण्या ऐवजी ते व्यक्तिनिष्ठ असण्यातच त्यांचे हित होते. वस्तुनिष्ठ गोष्टींचे विश्लेषण हे गुंतागुंतीचे असले तरी संगणक युगात हे विश्लेषण सहज शक्य आहे. परंतु तारतम्य हा घटक जो माणसाकडे असतो तो संगणकाकडे नसतो.त्यामुळे संगणाकाच्या आधारे फलज्योतिष शास्त्र आहे की नाही हा निर्णय लावणे उचित नाही असे काही ज्योतिषी लोकांना वाटते.
समजा, भविष्यात हा निर्णय लागला आणि फलज्योतिष हे शास्त्र नाही हे सिद्ध झाले. पुढे काय? एखादी गोष्ट शास्त्र नाही म्हणून ती काय लगेच त्याज्य बनते काय? हा प्रश्न उपस्थित होतोच. मेघमल्हार राग म्हटल्याने पाउस पडत नाही. कुठलेही संगीत हे २० हर्टझ ते २० किलो हर्टझ या ध्वनीलहरींच्या मर्यादेतच आहेत. कुठल्याही स्वरांची जुळवाजुळव कशाही पद्धतीने केली तरी ही मर्यादा ओलांडता येत नाही. या ध्वनी लहरींचे भौतिक गुणधर्माचे मोजमाप करता येते पण या ध्वनी लहरीतून निर्माण झालेले संगीत हे कुणाला किती आनंद देईल याचे मोजमाप भौतिक शास्त्रीय कसोटयातून करता येणार नाही.
फॅन्टसी म्हणजे वास्तव नव्हे. पण तरीही माणूस त्यात गुंगून जातो. बहुतेक कविकल्पना या वास्तव नाहीत. शुक्रतारा मंद वारा चांदणे पाण्यातुनी चंद्र आहे, स्वप्न वाहे, धुंद या गाण्यातुनी ... या कवितेची चिरफाड करुन शुक्र हा तारा नाही तो ग्रह आहे असे म्हणून त्याचे रसग्रहण होउ शकेल काय? रामसे बंधूंच्या भयपटांचे 'थ्रिल` एन्जॉय करणारे, दुरदर्शनच्या गूढ मालिकां गूढ एन्जॊय करणारे पण रसिक प्रेक्षक आहेत ना.
भविष्य काळात डोकावण्याचे प्रयत्न पूर्वीपासून चालू आहेत. ते तसे असणंही स्वाभाविक आहे. खगोलीय स्थिती व भूतलीय घटना यांचा परस्पर काही संबंध आहे का? हे तपासण्याच्या प्रयत्नातूनच मेदिनीय ज्योतिषाचा जन्म झाला. नक्षत्र व पाउस यांचा परस्पर संबंध हा याच प्रकारात मोडतो. कृषीप्रधान काळात शेतीची कामे कुठल्या नक्षत्रावर करावीत हा ज्योतिषातील संहिता स्कंधाचा भाग आहे.खगोलीय घटनांचा भूतलीय घटनांशी संबंध व पुढे भूतलीय घटनांचा तुमच्या सुखदु:खाशी संबंध. याच सूत्रातून खगोलीय घटनांचा तुमच्या सुखदु:खाशी संबंध लावण्याच्या प्रयत्नातून होरा या स्कंधाचा म्हणजेच फलज्योतिषाचा जन्म झाला.
भूतकाळात घडलेल्या घटनांतून काही सूत्र मिळते का ते पाहून भविष्य काळाविषयी काही अडाखे बांधण्याची कल्पना निर्माण झाली. काही आडाखे बरोबर यायचे तर काही चुकायचे. मग सूत्र चुकतयं की त्याच्या अन्वयार्थावरुन बांधलेले आडाखे चुकतायेत याचे विश्लेषण चालू झाले. आजतागायत हे विश्लेषण चालूच आहे.
मटका ज्योतिष
मटका किंवा एक आकडी लॉटरी मध्ये चाळीस पन्नास आठवडयाच्या निकालातून काही सूत्र मिळते का? हे पहाणे याला लाईन म्हणतात. त्यातून काही आडाखे काढून नंगा, अपोझिट व सपोर्टिंग असे नंबर काढले जातात. नंगा म्हणजे एकच ’फिट्ट’ वाटणारा आकडा काढणे. अपोझिट म्हणजे एखादे सुलट चित्र काढल्यानंतर उलट चित्रही काढणे; न जाणो काळाला सुसंगत वाटणारी प्रतिमा ही आपल्या दृष्टीने उलट असेल तर? सपोर्टिंग म्हणजे उलट सुलट प्रतिमा झालेवर त्या प्रतिमेला पूरक वाटेल असे चित्र काढणे. आता येणारे हे चित्र ० ते ९ या आकडयांमध्येच असणार हे उघड आहे. समजा तुम्ही ठरविलेल्या चित्रांपैकी एक चित्र न येता वेगळेच चित्र आले तर इथे लाईन तोडली असे म्हणतात. एखद्याचे नंगा चित्र बरोबर आले तर त्याची लाईन फिट बसली असे म्हणता येते. नंगा आकडा खेळण्याची रिस्क नको म्हणून नंग्याच्या सोबत अपोझिटही खेळला जातो. ही रिस्क अजून कमी करण्यासाठी या दोन्ही सोबत सपोर्टिंगही खेळला जातो. कुठलाही आकडा येण्याची शक्यता दहात एक म्हणजे दहा टक्के असते. अपोझिट व सपोर्टिंग खेळल्यामुळे ती अजून वीस टक्के वाढते. तरीसुद्धा जर आकडा आला नाही तर इथे लाईन तुटली. एखाद्याची लाईन तुटली असेल तर दुसऱ्या कुणाची तरी लाईन फिट बसली असे घडू शकते. कारण त्याचे सूत्र हे वेगळे असते. म्हणजे कुणाचे तरी चित्र बरोबर आलेच ना! ज्योतिषांचीही भाकितचित्रे ही साधारण अशाच प्रकारची असतात. तुमच्या मनातील भूत वर्तमान वा भविष्याबाबत एखादा चित्ररुपी आकडा एखाद्या ज्योतिषाचा नंगा येतो, एखाद्याचा अपाझिट येतो तर एखाद्याचा सपोर्टिंग येतो. एखाद्या ज्योतिषाची लाईन तुटली तरी दुसऱ्या ज्योतिषाची लाईन फिट्ट बसते. सातत्याने मटका वा लॉटरी खेळून श्रीमंत झालेला माणूस अभावानेच मिळेल पण मटका खेळवून वा लॉटरी विकून श्रीमंत झालेले अनेक दिसतील. मटका किंवा लॉटरी ची लाईन काढून द्यायचा उद्योग करणारे काही लोक असतात. लाईन फिट बसली तर स्वत:हून लाभार्थी आपल्यातला काही वाटा या आकडेशास्त्री लोकांना देतो. नाही लागला आकडा तर त्याचे नशीब! ज्योतिषी लोकांचेही तसेच आहे. चुकले भाकित तर जातकाचे नशीब! बरोबर आले तर ज्योतिषाचा लाभ! जातकाचे भविष्य बरोबर येण्यासाठी जातक आणि ज्योतिषी यांचे परस्पर ग्रह जुळावे लागतात तरच ते भाकित बरोबर येते ते जर जुळले नाही तर महान ज्योतिषाने केलेले भाकित सुद्धा चुकते आता बोला?
असो! तर जोपर्यंत अनिश्चितता आहे तोपर्यंत फलज्योतिषाला मरण नाही हेच आमचे भाकित!
Comments
लेख इथे का?
हा लेख पुर्वी मिपावर संपादकियात लिहिला होता. उपक्रमावरील सर्वच लोक तिकडे जाउन तो लेख वाचतील असे नाही. शिवाय ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी.... हे फक्त उपक्रमावरच उपलब्ध आहे.म्हणुन हा प्रपंच.खरं तर फलज्योतिष हा विषयच असा आहे कि त्याचा 'निकाल' लागेल असे वाटत नाही. संजीव नाईक यांनी फलज्योतिषावरील आपली 'कला' दाखवली. या कलेची कदर करणारे उपक्रमावर फार लोक सापडणार नाहीत हे ही 'भाकीत' आम्ही वर्तवल होतं. फलज्योतिषावर श्रद्धा असणारा समाजात खुप मोठा वर्ग आहे हे विसरुन चालणार नाही.
फलज्योतिषावर विश्वास ठेवणारा वर्ग किती? याचा सर्व्हे अधिकृत रित्या मान्यता प्राप्त संस्थेने मोठ्या प्रमाणात घेतला नाही. वर्तमानपत्रांनी साप्ताहिक राशीभविष्य छापणे बंद केले तर काय होईल? चित्रलेखा या नियतकालिकाने हे धैर्य दाखवले आहे.
प्रकाश घाटपांडे
विज्ञान आणि वैज्ञानिक
विज्ञान म्हणजे काय?
इकॉनॉमिक्सला आपण विज्ञान म्हणतोय का? म्हणत नसू तर या इकॉनॉमिक्समधील आणि विज्ञानातील औपपत्तीक किंवा व्याख्येनुसार जाणारी भेदस्थळं काय आहेत? कारण काही मंडळी इकॉनॉमिक्सला अर्थशास्त्र असं म्हणतात.