मराठीचा अभिमान कि दुराग्रह

मराठीचा अभिमान कि दुराग्रह

आज विधानसभेत मराठीमधून शपथग्रहण करण्यावरुन जे काही झाले त्याला काय म्हणावे, महाराष्ट्रात मराठीतून विधानसभेत सर्वच कामकाज कामकाज चालावे हि मागणी रास्त असू शकते पण आज जे झाले ते तसेच व्हावे कि काही मर्यादा सांभाळून होणे जनतेच्या हिताचे असेल, तसेच मनसेचे आमदारांवर ४ वर्षे निलंबनाची कारवाई हे मराठी द्वेशाचे राजकारण आहे का? यावर चर्चा घडावी.

लेखनविषय: दुवे:

Comments

संतापमिश्रीत दु:ख

अबु आझमी हा कितीही नालायक असला तरी महाराष्ट्राच्या विधानसभेची बिहार विधानसभा झालेली पाहून संतापमिश्रीत दु:ख झाले.
मनसेने चालवलेला मराठीचा हट्ट हा निव्वळ राजकारणात आपली पोळी भाजण्यासाठी आहे.

मुळात कशासाठी पाहिजे मराठीचा इतका दुराग्रह?
असले राडे करुन जगवण्याची वेळ अजून तरी मराठीवर आलेली नाही.
आणि इतकेच असेल तर महाराष्ट्राने भारतात राहू नये. स्वतंत्र राष्ट्र उभे करावे. युरोपात जशी भाषावार राष्ट्रनिर्मीती झाली त्या धर्तीवर महाराष्ट्राचे 'नवनिर्माण' स्वतंत्र राष्ट्रात करावे. आणि मग वाट्टेल ते कायदे बनवावेत.

मराठी माणसाला नोकर्‍या वगैरेही झूठ आहे. एम्प्लॉयमेन्ट न्यूज वाचण्यापासून मराठी तरुणांना कुणीही अडवलेले नाही. बिहारी लोकांची दादागीरी वाढते आहे तर त्या दादागीरीला चोख प्रत्युत्तर द्या. त्यासाठी कायदा आणि अंमलबजावणी बळकट करा त्याचा मराठीशी काय संबंध आहे?

स्वतंत्र भारतात कुणालाही कुठेही काम करण्याचे स्वातंत्र्य आहे. बेंगलोरमध्ये काम करणारे मराठी बांधव तिथल्या भूमीपुत्रांना मिळालेले काम संपल्यावर उरलेले काम करत आहेत का? तिथला भूमीपुत्र जर उपाशी असेल तर काठ्यामारुन ह्या मराठी बांधवांना हाकलून दिले पाहिजे का?

वसुलि
वसंत सुधाकर लिमये

+१ सहमत

श्री लिमये यांच्या प्रतिसादाशी सहमत आहे. भारतात सशक्त लोकशाहीची मूळे अजुनही रुजलेली नाहीत हेच खरे. लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनीधींनी अशा प्रकारे वागावे हे संतापजनक आहे. यावर इतरत्र वाचलेल्या चर्चांवरूनही या निंदनीय कृत्याचे दुरगामी परिणाम तसेच लोकशाहीतील संस्थांचे वाढत चाललेले अवमूल्यन याविषयी सूज्ञ लोकांना तीळमात्रही संताप वाटत नाही, याचे सखेद आश्चर्य वाटते.

महाराष्ट्राबाहेर तडीपार करायला हवे

आझमीही ड्यांबिस आहेत. म्हातारी मेल्याचे दुःख नाही पण.... राज ठाकरे आणि त्यांच्या गुंडाना महाराष्ट्राबाहेर तडीपार करायला हवे. विरोध करण्याची ही पद्धत नाही. असल्या गुंडगिरीचे समर्थन करणारा मराठी माणूस आपला आत्मविश्वास गमावून बसला आहे असेच म्हणावेसे वाटते.

.......फुत्कारही टाकू नकोस असे नव्हते सांगितले.

मराठी माणसाची अवस्था त्या गोष्टीतल्या सापा सारखी आहे. त्या सापाला साधुने शेवटी सांगितले की बाबा तुला मी लोकांना चावू नकोस असे सांगितले होते, फुत्कारही टाकू नकोस असे नव्हते सांगितले. आजच्या घटने सारखे फुत्कार ही जर टाकले नाही तर हे विरोधी लोक त्या सापासारखे मराठी लोकांना मुंबईच काय सर्व महाराष्ट्रात जिणे मुश्किल करतील.

फुत्कार

मराठी लोकांना मुंबईच काय सर्व महाराष्ट्रात जिणे मुश्किल करतील.

इतके काही आभाळ मराठी माणसावर कोसळलेले नाही. अंगमोडून मेहनत करणार्‍या मुंबईतल्या मराठी माणसाला उपाशी झोपताना मी तरी पाहिलेले नाही. कष्ट करणारा मराठी माणूस उपाशी मरतो आहे तो खेड्यापाड्यातून शेतात राबताना. त्याचे जिणे बिहारी आणि यूपीच्या लोकांनी मुश्किल केलेले नाही. पण त्याची पर्वा कुणाला आहे?

वसुलि
वसंत सुधाकर लिमये

जो राबतो त्याला जागा आहे

मुंबई आणि महाराष्ट्रातच नव्हे, तर अवघ्या जगातच ज्याची अंग मोडून मेहनत करण्याची तयारी आहे आणि ज्याच्या दोन कानांमध्ये किमान काही ऐवज आहे, अशा प्रत्येक व्यक्तीला जगायला जागा आणि संधी आहे. आळशी, ऐदी आणि इतिहासातून बाहेर न पडू इच्छिणार्‍या मराठी माणसाचे ( इन्क्लूडिंग युवर्स सिन्सिअरली) आयत्या मिळालेल्या पोळीने (पक्षी: महाराष्ट्र) समाधान झालेले नाही, त्याला त्यावर तूपही हवे आहे. याचा फायदा राजकारणी न घेतील तरच नवल. हे अबू आझमींचे समर्थन नाही. या माणसाची मस्ती त्याच्या भाषेतून आणि देहबोलीतून दिसतेच. पण हे राज ठाकरेंचेही समर्थन नाही. याही माणसाची मस्ती त्याच्या भाषेतून आणि देहबोलीतून दिसते. मग यांतला 'लेसर डेव्हिल' कोण?
नवनिर्वाचित (हा मराठी शब्द आहे का?) आमदारांच्या निलंबनाच्या निषेधार्थ 'मनसे' ने केलेल्या राड्यात बसेसवर दगडफेक करुन कामांवरुन घरी परतणार्‍या असंख्य 'मराठी' नागरिकांची गैरसोय केली (आणि त्यांच्या मालिकांचे काही अत्यंत महत्वपूर्ण असे भाग बुडवले) असे न म्हणता त्यांच्या जिवंत शरीरांत आणि मेलेल्या मनांत नवनिर्माणाचे वारे फुंकले असे म्हणावे का?
सन्जोप राव
होगा कोई ऐसा भी, कि 'गालिब' को न जाने?
शाइर तो वो अच्छा है, प' बदनाम बहोत है

चुकीची विधाने

मराठी माणसाला महाराष्ट्र आयता मिळाला, ह्या विधानावर माझा तीव्र आक्षेप आहे. पुराणातील किंवा अगदी पंधराव्या-सोळाव्या शतकातील इतिहासाबद्दल वाद असू शकतात, पण कालपरवा होऊन गेलेल्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीची किंमत शून्य करणारे हे विधान कसे करवते?

मराठी माणसे सर्वसाधारणपणे ऐदी, आळशी , व 'कामास मागे, आणी स्वतःच्या असलेल्या/ नसलेल्या हक्काविषयी झेंडे घेऊन पुढे' हेही व्यकिशः मान्य आहे. उत्तर भारतीयांनी मुंबईत अथवा महाराष्ट्राच्या अन्य भागात येऊन कामधंदे करावेत की नाही ह्याविषयी खरे तर काही वाद होऊ शकत नाही. . परंतु 'अंग मोडून मेहनत करण्याची तयारी आहे आणि ज्याच्या दोन कानांमध्ये किमान काही ऐवज आहे' ह्या निकषांवर त्यातील बहुसंख्य उतरताहेत का? एकतर त्यांच्या प्रदेशात इतकी पराकोटिची, भरडून टाकणारी गरिबी आहे, की मुंबई, महाराष्ट्रच काय, ते आसामसाऱख्या दूरवरच्या ठिकाणीही गेलेले आहेत. कारण असे करतांना 'दे हॅव नथिंग टू लूज'. अगदीच फारफारतर आगीतून फुफाट्यात पडतील. दुसरे निदान मुंबईत तरी गेल्या वीस वर्षांत तेथून जे आले त्यांच्या बाबतीत अंग मोडून राबण्याची तयारी आहे म्हणून ते आत्ता आपले पाय रोवून् उभे आहेत, असे म्हणणे धार्ष्ट्याचे ठरेल. उदा पहायचे/ अनुभवायचे असले तर मुंबईत जाऊन टॅक्सी एकदा घ्यावी. अजिबात काहीही ड्रायव्हिंग येत नसलेले, कुठलेच रस्ते अथवा ठिकाणे माहिती नसलेले, आणि अत्यंत उर्मट असे हे लोक निव्वळ खाबूगिरीमुळे परवाने मिळवतात. त्याने तुम्हाला ठरल्याप्रमाणे नीट नेले तर आश्चर्य मानावे. मधेच टॅक्सी बंद पडेल,नाहीतर काही सबबी निघतील, बरेच नवनवे अनुभव तुम्हाला मिळू शकतील.

खर तर

खर तर कुठलेच विधान सरसकट करता येत नाही.
प्रकाश घाटपांडे

मराठी आणि अमराठी माणूस

संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचे गोडवे आणखी किती दिवस गाणार? आजच्या मराठी माणसाला त्या चळवळीतला त्याग वगैरे जाऊ द्या, त्या चळवळीत नेमके काय झाले हे तरी माहिती आहे का? महाराष्ट्रावर तावातावाने हक्क सांगणार्‍या मनसेचा आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा सुताइतका तरी संबंध आहे का?
उत्तर भारतियांची मला काही वकिली करायची नाही, पण आज घर रंगवायचे झाले, फर्निचर करुन घ्यायचे झाले, गळका नळ दुरुस्त करुन घ्यायचा झाला तर मला बहुतेक वेळा अमराठी माणसाला शरण जावे लागते. उर्मट आणि कामचुकार मराठी माणसापेक्षा तो परवडला अशी आजची परिस्थिती आहे. मुंबईतल्या अमराठी टॅक्सीचे जाऊ द्या, पुण्यातली मराठी रिक्षा घ्या. आपला स्वाभिमान संपूर्ण गुंडाळून ठेवून फसवणूक करुन घेण्याची तयारी असेल तरच या रिक्षात बसावे अशी परिस्थिती आहे. उर्मटपणाबाबत तर कुणीच कुणाची कुणाशीही तुलना करु नये. मराठी माणूस अमराठी माणसापेक्षा नम्र आहे असे विधान करण्यासाठी सिंहाचेच काळीज लागेल. आणि पराकोटीची, भरडवून टाकणारी वगैरे गरिबी महाराष्ट्रातही आहे. त्यासाठी अगदी गडचिरोली जिल्ह्यात जावे लागणार नाही. सांगली, कोल्हापूरसारख्या तथाकथित समृद्ध जिल्ह्यांतही ही गरिबी आहे. यातले किती मराठी लोक जिवाचा हिय्या करुन शहरांत जाऊन अंगमेहनतीची कामे स्वीकारतील? दुचाकीचे आणि चारचाकीचे पंक्चर काढण्याच्या धंद्यावर केरळी आण्णांचा एकाधिकार का आहे? महाराष्ट्रात जोरात चालणारी सर्व हॉटेले शेट्टी मंडळींची का आहेत?
एक मराठी माणूस म्हणून मला जेवढा असायला पाहिजे तेवढा अभिमान जरुर आहे, पण याचा अर्थ मराठी माणसाचे सगळे दोष डोळ्याआड करुन तो फक्त मराठी आहे, म्हणून त्याचे सगळे दुर्गुण माफ असे म्हणण्याइतपत मनाचा मोठेपणा माझ्याकडे नाही.

सन्जोप राव
होगा कोई ऐसा भी, कि 'गालिब' को न जाने?
शाइर तो वो अच्छा है, प' बदनाम बहोत है

प्रतिसाद आवडला

श्री राव यांचा नेमका प्रतिसाद आवडला. उर्मटपणावर कुठल्या प्रदेशाची मक्तेदारी नाही, तसेच अंगमेहनतीवरही. मराठी माणसे शहरांत स्थलांतर करण्यास तयार होत नाही, हे मात्र मान्य नाही. वापी, सुरत या शहरात जाऊन पाहील्यास कामगारवर्ग मोठ्या प्रमाणात उत्तर महाराष्ट्रातून स्थलांतरीत झाल्याचे दिसते.

सत्यस्थिती

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.सन्जोप राव लिहितातः

"उत्तर भारतियांची मला काही वकिली करायची नाही, पण आज घर रंगवायचे झाले, फर्निचर करुन घ्यायचे झाले, गळका नळ दुरुस्त करुन घ्यायचा झाला तर मला बहुतेक वेळा अमराठी माणसाला शरण जावे लागते. उर्मट आणि कामचुकार मराठी माणसापेक्षा तो परवडला अशी आजची परिस्थिती आहे. मुंबईतल्या अमराठी टॅक्सीचे जाऊ द्या, पुण्यातली मराठी रिक्षा घ्या. आपला स्वाभिमान संपूर्ण गुंडाळून ठेवून फसवणूक करुन घेण्याची तयारी असेल तरच या रिक्षात बसावे अशी परिस्थिती आहे"

शतप्रतिशत सहमती. माझा अनुभव असाच आहे.किंबहुना सार्वत्रिक अनुभव असाच असावा. अर्थात काही अपवाद असतीलच. पण त्यांची संख्या नगण्य.
तर हे वास्तव मान्य करावे. वास्तव नाकारता येते पण त्याचे परिणाम स्वीकारावेच लागतात.

सहमत

पुर्णतः सहमत आहे.
"गरीब, बेराजगार, अल्पशिक्षित, अपरिपक्व जनतेला हाताशी धरुन त्यांच्यात द्वेषाच्या आधारावर एखादी अस्मितेची नशा निर्माण करायची त्याला 'स्वाभिमान` हे नाव द्यायचं व त्याचा झुंडशाहीसाठी कुशलतेने वापर करायचा. या नशेत ती जनता आपले मूलभूत प्रश्न विसरते. एखाद्या दारुडयाला भूक लागली की त्याला अन्नाऐवजी दारुच द्यायची. हळूहळू त्याचे शरीर भूक लागल्यानंतर अन्नाऐवजी दारुचीच मागणी करु लागते. जो ती मागणी पूर्ण करतो तो त्याला आपला हितचिंतक वाटतो. जो त्याला अन्न द्यायचा प्रयत्न करतो तो त्याला शत्रू वाटतो. अशा पद्धतीने जनतेची कोंडी करुन त्याला मार्ग दाखवल्याचा आभास निर्माण केला जातो."
असे आम्ही आजचा सुधारक मधे पुर्वीच म्हटले आहे. उपक्रमावर ते पहाता येईल
प्रकाश घाटपांडे

सन्जोप राव व प्रकाश घाटपांडे

सन्जोप राव व प्रकाश घाटपांडे ह्यांचे प्रतिसाद फार आवडले.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

डुकरांसमोर मोत्यांचा चारा!!

सन्जोप राव आणि विशेषत: घाटपांडेंचा प्रतिसाद फारच नेमका आणि सद्य परिस्थीचे योग्य आकलन करणारा वाटला. उठसूठ मारामारी, तोडफोडीची भाषा करणाऱ्या शिवराळ मवाल्यांवर अशा प्रतिसादांचा काहीही परिणाम होत नाही. त्यांच्यासाठी हे प्रतिसाद म्हणजे डुकरांसमोर मोत्यांचा चारा!! (casting pearls before swine)

असो! अशा गंभीर, प्रगल्भ प्रतिसादांमुळेच उपक्रमाचा दर्जा उठून दिसतो. हेच उपक्रमाचे खरे वैभव!

वसुलि
वसंत सुधाकर लिमये

काही मजकूर संपादित

वस्तुस्थिती

सर्व प्रथम वसुलि काकांच्या विधिनिषेधशुन्य लेखनाचा निषेध. तुमची चीड समजू शकतो, परंतु सार्वजनिक चर्चा मंचावर असे लेखन अपेक्षित नाही, किमान उपक्रमावर तर नक्किच नाही.

सन्जोप राव आपल्या लेखनाबद्दल मला आदर आहे, परंतु आपला वरील प्रतिसाद वस्तुस्थितीशी विसंगत वाटला.

महाराष्ट्रावर तावातावाने हक्क सांगणार्‍या मनसेचा आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा सुताइतका तरी संबंध आहे का?
अहो, पन्नास वर्षापुर्वी झालेल्या चळवळीचा तीन वर्षांपुर्वी स्थापन झालेल्या पक्षाशी कसा संबंध असेल.

उत्तर भारतियांची मला काही वकिली करायची नाही
अगदी मलाही मनसेची वकिली करायची नाही, परंतु चुकीच्या गृहितकांवर चर्चा रेटली जाऊ नये म्हणुन हा प्रपंच.

सर्वप्रथम मराठी माणूस आळशी आहे हा मुद्दाच मला मान्य नाही आणि त्यासाठी दिलेली उदाहरणे सुद्धा! कारण याच न्यायाने ज्यांचा आपण (म्हणजे भारतीयांनी ) रोजगार बळकावला ते गोरे सुद्धा आळशी म्हणायला हवेत. प्रदिप यांनी म्हटल्याप्रमाणे "त्यांच्या प्रदेशात इतकी पराकोटिची, भरडून टाकणारी गरिबी आहे, की मुंबई, महाराष्ट्रच काय, ते आसामसाऱख्या दूरवरच्या ठिकाणीही गेलेले आहेत. कारण असे करतांना 'दे हॅव नथिंग टू लूज'." म्हणुनच ते पडेल त्या पैशांत काम करण्यास तयार होतात. आपण भय्या पेंटर, कारपेंटर वा प्लंबर यांना प्राधान्य का देतो, कारण मराठी कारागीरांच्या तुलनेत ते स्वस्तात पटतात. आता तुम्ही म्हणाल मराठी माणसांनी पण कमी दरात काम करावे परंतु मराठी माणुस अजुनही भैय्यांच्या तुलनेत इतका बनचुका झालेला नाही. भैय्यां कमी भाव सांगतात परंतु कमी दर्जाचे सामान वापरुन तेवढीच मजुरी वसुल करतात.

आता परप्रांतियांच्या विनम्रपणा बद्दल म्हणाल तर तो त्यांच्या संस्कृतीतून नव्हे तर लाचारीतून आलेला आहे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या जेंव्हा हे अल्पसंख्य परप्रांतीय प्रस्थापित व बहुसंख्य होतात, तेंव्हा ते ही उर्मट होतात. अनुभवातुन सांगतो मुंबईत अगदी ९९% परप्रांतीय रिक्षा व टॅक्सी चालकांचे मीटर सदोष असतात. आणि त्यांच्या विनम्रपणा बद्दल तर काय बोलावे.

प्रश्न अंगमेहनतीची कामं करण्याचा नसून कायदा मोडण्याचा आहे. किती परप्रांतीयांची गॅरेजेस, पंक्चर काढण्याची दुकाने अधिकृत जागेत वसली आहेत? हॊटेलवाली शेट्टी मंडळीं नेहमी कंबरेला रिव्हॊल्वर वा पिस्टल लावून का असतात याचे उत्तर शोधल्यास ते या व्यवसायात का प्रस्थापित झाले आहेत याचे कारण नक्किच सापडेल.

मुंबईत मासळी केवळ मनपाने नेमुन दिलेल्या जागेवर विकावी असा नियम आहे. भैय्या डोक्यावर टोपली घेऊन दारोदारी हिंडून याचे बेधडक उल्लंघन करत आहेत. तीच गत भाजीवाल्यांची. मराठी माणसानेही असे अनधिकृतपणे धंदे करावेत अशी आपली अपेक्षा आहे काय?
.....

बाकी घाटपांडे काकांच्या प्रतिसादाशी तत्वत: सहमत आहे. परंतु अशी नशा करुन घेण्याची परिस्थिती मराठी माणसावर का यावी याचाही साकल्याने विचार होणे आवश्यक आहे. मला वाटतं, मनसेचा उदय ही एक स्पेस होती. ती राज ठाकरेंनी नेमक्यावेळी भरुन काढली. बाकी ते राजकारण करतात का समाजकारण हा वेगळा प्रश्न आहे.

जयेश

गोर्‍यांचा आळशीपणा

याच न्यायाने ज्यांचा आपण (म्हणजे भारतीयांनी ) रोजगार बळकावला ते गोरे सुद्धा आळशी म्हणायला हवेत.

बाकी वादात सहभाग नाही परंतु गोर्‍यांना आळशी म्हणायला जीभ कशाला कचरायला हवी? ते आळशी आहेत (सर्वच आहेत असे नाही. तसे काहीजण त्यांचा आळस जॉगिंग करून, गॉल्फ खेळून, पार्ट्या करूनही घालवतात.) असं माझं प्रामाणिक मत आहे आणि त्यांच्या देशांत कमी रोजगारावर चांगले काम करून देणारे आम्ही "भैय्ये" आहोत असे कोणी म्हटले तरी माझी सहमती आहे.

बाकी चालू दे.

मनोरंजक

जयेश यांचा मनोरंजक प्रतिसाद.
अहो, पन्नास वर्षापुर्वी झालेल्या चळवळीचा तीन वर्षांपुर्वी स्थापन झालेल्या पक्षाशी कसा संबंध असेल.
ते प्रदीप यांनी सांगावे. हा मुद्दा त्यांनी उपस्थित केला होता.
सर्वप्रथम मराठी माणूस आळशी आहे हा मुद्दाच मला मान्य नाही

सूट युअरसेल्फ! झोपलेल्याला जागे करता येते, झोपेचे सोंग घेतलेल्याला नाही!
आता परप्रांतियांच्या विनम्रपणा बद्दल म्हणाल तर तो त्यांच्या संस्कृतीतून नव्हे तर लाचारीतून आलेला आहे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या जेंव्हा हे अल्पसंख्य परप्रांतीय प्रस्थापित व बहुसंख्य होतात, तेंव्हा ते ही उर्मट होतात. अनुभवातुन सांगतो मुंबईत अगदी ९९% परप्रांतीय रिक्षा व टॅक्सी चालकांचे मीटर सदोष असतात. आणि त्यांच्या विनम्रपणा बद्दल तर काय बोलावे.

लाचारीतून विनम्रपणा येतो हे संशोधन रंजक आहे. मराठी माणूस काय कमी लाचार आहे का? महाराष्ट्रात शहरांबाहेर जाऊन पाहा. माणसे जनावराच्या पातळीवरचे आयुष्य जगत आहेत.आहेत ते नम्र? प्रश्न परिस्थितीचा नाही, वृत्तीचा आहे. 'राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा' मध्ये मराठी मानसिकतेवर (चुकून 'मनसिकतेवर' असे लिहीत होतो!) भाष्य नाही असे आपल्याला प्रामाणिकपणे वाटते का?
हॊटेलवाली शेट्टी मंडळीं नेहमी कंबरेला रिव्हॊल्वर वा पिस्टल लावून का असतात

बेष्ट्! हॉटेलाचे लायसन घेताना बहुतेक रिव्हॉल्वरच्या लायसनसाठीही अर्ज करावा लागत असेल. जनरलायझेशन किती म्हणजे किती करावे?
मुंबईत मासळी केवळ मनपाने नेमुन दिलेल्या जागेवर विकावी असा नियम आहे. भैय्या डोक्यावर टोपली घेऊन दारोदारी हिंडून याचे बेधडक उल्लंघन करत आहेत. तीच गत भाजीवाल्यांची.

पुन्हा तेच! भाजीवाले, मासळीवाले, भंगारवाले, रद्दी पेपरवाले वगैरे हे फक्त भय्येच आहेत का? मराठी माणूस अगदी कायदा तंतोतंत पाळणारा आणि सरसकट भय्ये कायद्याचे उल्लंघन करणारे असे आपल्याला म्हणायचे आहे का?
मला वाटते, मुद्दा मुंबई या एका शहराचा नसून महाराष्ट्राचा आहे. मुंबई म्हणजे महाराष्ट्र नव्हे.
सन्जोप राव
होगा कोई ऐसा भी, कि 'गालिब' को न जाने?
शाइर तो वो अच्छा है, प' बदनाम बहोत है

सहमत!

अतिशय नेमक्या शब्दात योग्य विचार मांडण्याचे घाटपांड्यांचे कसब वखाणण्याजोगे. प्रतिसाद फार आवडला.

मराठीचे भवितव्य

लिमये सरांच्या भावनांशी मी पूर्ण सहमत आहे. पाट्या इंग्रजीत लावल्या म्हणून मराठीचा र्‍हास होणार नाही किंवा त्या मराठीतून लावल्या म्हणजे तिचा प्रचार होणार नाही. हे सगळे राजकारण्यांचे उद्योग आहेत. माझ्या वैयक्तिक अनुभवावरून, इंटरनेट वर मराठीला जो प्रतिसाद मिळतो आहे त्यावरून मराठीचा र्‍हास होत नसून तिला चांगलेच दिवस येत आहेत असे म्हणता येते. कालानुसार मराठीचा वापर बदलतो आहे
चन्द्रशेखर

संस्कृतप्रेमींसाठी एक आनंददायक बातमी

भाजपचे गिरीश महाजन हे संस्कृतमधून शपथ घेत असताना पीठासीन अधिकारी गणपतराव देशमुख यांनी विरोध केला. परंतु त्या आधी गिरीश बापट यांना संस्कृतमधून शपथ घेण्यास पीठासीन अधिकारी मधुकर पिचड यांनी परवानगी होती. त्याचा उल्लेख करून बापट यांनी देशमुखांना आता विरोध का असे विचारले आणि सभात्याग केला. त्यानंतर देशमुखांनी महाजन यांना संस्कृतमधून शपथ घ्यायला परवानगी दिली. अधिक माहिती इथे वाचा

निषेधार्ह

मातृभाषेतून शपथ न घेता संस्कृतातून शपथ घेण्याचा खुळचटपणा करणार्‍या बापटांनाही झोडायला हवे होते.

-राजीव.

नै तर काय !

>>मातृभाषेतून शपथ न घेता संस्कृतातून शपथ घेण्याचा खुळचटपणा करणार्‍या बापटांनाही झोडायला हवे होते.

सहमत आहे. मराठी भाषेत शपथ घ्यायची सोडून यांना संस्कृत भाषेतून शपथ घ्यावी वाटली.
च्यायला, काही लोक असे डोक्यावर परिणाम झाल्यासारखे का वागतात काही कळत नाही.

पाच वर्ष विधानसभेत आणि सर्वच जीवन व्यवहारात संस्कृतच बोलणार का, असे कोणीतरी त्यांना विचारायला पाहिजे होते.

-दिलीप बिरुटे

विचारार्थ

जात धर्म. प्रांत, भाषा या वर आधारलेल्या अस्मिता हा भाग असणारच आहे. त्याचा अतिरेक( सापेक्ष) झाला कि मुळ प्रश्न बाजुला राहतो. कुठल्या भाषेत शपथ घेतली त्यापेक्षा घेतलेली शपथ प्रामाणिकपणे पाळली जाते का? या बद्दल कुठेच उहापोह दिसुन येत नाही.
प्रकाश घाटपांडे

झाले ते चांगलेच.

झाले ते ठीकच. फक्त आता परत एक् ठराव आणून शपथ घेण्याचा पिठावर उभे राहून चपलेला हात घालण्याची कृती करणार्‍या आझमीला पण विधानसभेबाहेर काढावे लागेल.
राहीला प्रश्न मराठीच्या आग्रहाचा, तर जोपर्यंत मराठी लोकं 'हिंदी' ही राष्ट्रभाषा आहे या भूलथापाना आणि भावनिक आवाहनाना बळी पडत आहेत तोवर मराठीच्या बाजूने प्रतिआव्हाने असणारच.

तसेच मनसेचे आमदारांवर ४ वर्षे निलंबनाची कारवाई हे मराठी द्वेशाचे राजकारण आहे का?
अर्थात. मग तीच कारवाई चप्पलेला हात घालण्याची कृती केलेल्या आझमीवर् का नाही घडली.

-पुण्याचे पेशवे

'हिंदी' माझ्यासाठी तरी 'राष्ट्रभाषा'च

मराठीच्या आग्रहाचा, तर जोपर्यंत मराठी लोकं 'हिंदी' ही राष्ट्रभाषा आहे या भूलथापाना आणि भावनिक आवाहनाना बळी पडत आहेत तोवर मराठीच्या बाजूने प्रतिआव्हाने असणारच.

हिंदी ही भारतीय भाषा आहे ना! महाराष्ट्र भारतात आहे ना! घटनेत अनुसूचित केलेल्या कुठल्याही भाषेत शपथ घेता येते ना!

आणि तुम्ही भूलथापा म्हणा किंवा दुसरे काहीही हिंदी ही अखिल भारताला जोडणारी भाषा आहे. काश्मीर ते कन्याकुमारी, अरुणाचल ते महाराष्ट्र, सगळ्यांना मोडकीतोडकी का होईना, हिंदी कळते. त्यामुळे 'हिंदी' ही 'राष्ट्रभाषा'च आहे, असे मी मानतो. तसेच मराठीप्रेम सिद्ध करण्यासाठी हिंदीचा किंवा कुठल्याही भाषेचा द्वेष करणे शहाणपणाचे लक्षण अजिबातच नाही.

काही मजकूर संपादित.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

गॉच्या, गॉच्या...!!!

आणि तुम्ही भूलथापा म्हणा किंवा दुसरे काहीही हिंदी ही अखिल भारताला जोडणारी भाषा आहे. काश्मीर ते कन्याकुमारी, अरुणाचल ते महाराष्ट्र, सगळ्यांना मोडकीतोडकी का होईना, हिंदी कळते.

एखादे वाक्य लिहीतांना, बोलतांना आपल्याला स्वतःलाच त्यातील फोलपणा जाणवत असतो. तेव्हा ते वाक्य रडके होऊन येते. तसे इथे वाटते आहे.

नीट समजावून सांगावे

अरुणाचलचे खासदार किरण किरेन रज्जू
संसदेत बोलताना ऐकावे, बघावे.

सामान्य अरुणाचलीही छान हिंदी बोलतो.

आता एखादा एखादा मूर्खच म्हणेल
हिंदी राष्ट्रभाषा नाही म्हणून.

बुवा कशाला बरे असे दोनदा गॉच्या केलेत! तुम्हाला ते वाक्य रडके का वाटावे? त्यात कुठला फोलपणा आहे? नीट समजावून सांगावे. म्हणजे ज्ञानात भर पडेल आणि अधिक चांगले प्रतिसादही लिहू शकेन. आता त्या वाक्याकडे वळतो.
सगळ्यांना मोडकीतोडकी का होईना, हिंदी कळते.

एवढेच नव्हे तर हिंदी संपूर्ण भारतात बोलली जाते ही वस्तुस्थिती आहे. ('मोडकीतोडकी' ह्या शब्दाचा वापराने काही फरक पडत नाही. तसेही भाषाशास्त्र शुद्धाशुद्ध मानीत नाही.)

दोन वेगळ्या मातृभाषा असणाऱ्या व्यक्ती जेव्हा एकाच भाषेत संवाद करतात तेव्हा ती भाषा वैश्विकीकृत (ग्लोबलाइझ्ड) झालेली असते, असे भाषाशास्त्र म्हणते. ह्याची पराकोटी म्हणजे अनेकदा ह्या बोलणाऱ्यांची मातृभाषाही एक झालेली असूनही ते दुसऱ्याच भाषेत संवाद करतात. दोन मराठी भाषक जेव्हा इंग्रजीतून किंवा हिंदीतून संभाषण करताना आपण ऐकतो, बघतो. म्हणूनच हिंदी ही आमची राष्ट्रभाषा आहे. (राज्यघटनेने हिंदीला राष्ट्रभाषेचा दर्जा दिला आहे किंवा नाही ह्याची चर्चा पोरेटोरे करीत असतात. त्या चर्चेत मला रस नाही.)

दोन वेगळ्या मातृभाषा असणाऱ्या व्यक्ती जेव्हा एकाच भाषेत संवाद करतात तेव्हा ती भाषा वैश्विकीकृत (ग्लोबलाइझ्ड) झालेली असते, असे भाषाशास्त्र म्हणते. ह्याची पराकोटी म्हणजे अनेकदा ह्या बोलणाऱ्यांची मातृभाषा एक असूनही ते दुसऱ्याच भाषेत संवाद करतात. दोन मराठी भाषक इंग्रजीतून किंवा हिंदीतून संभाषण करताना आपण नेहमीच ऐकतो, बघतो. म्हणूनच हिंदी ही आमची राष्ट्रभाषा आहे. (राज्यघटनेने हिंदीला राष्ट्रभाषेचा दर्जा दिला आहे किंवा नाही ह्याची चर्चा पोरेटोरे करीत असतात. त्या चर्चेत मला रस नाही.)

धम्मकलाडू

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

  

राष्ट्रभाषा

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.प्रदीप यांच्या प्रतिसादावर श्री.धम्मकलाडू यांनी संयमी शब्दांत लिहिलेले स्पष्टीकरण अगदी पटण्यासारखे आहे.

"आणि तुम्ही भूलथापा म्हणा किंवा दुसरे काहीही हिंदी ही अखिल भारताला जोडणारी भाषा आहे. काश्मीर ते कन्याकुमारी, अरुणाचल ते महाराष्ट्र, सगळ्यांना मोडकीतोडकी का होईना, हिंदी कळते. "

ही श्री.धम्मकलाडू यांची विधाने वस्तुस्थितिदर्शकच आहेत.मला तर त्यात कसलाही फोलपणा दिसत नाही. श्री.प्रदीप यांनी याला रडके म्हणावे हे अनाकलनीय आहे.श्री.धम्मकलाडू यांच्याशी मतभिन्नता असली तरी असे लिहिणे समर्थनीय नाही. बहुसंख्य भारतीयांना समजते अशी हिंदी ही एकच भाषा आहे. कागदोपत्री ती राष्ट्रभाषा आहे की नाही हे गौण आहे.हिंदीचित्रपट भारतात सर्वत्र प्रदर्शित होतात,महाराष्ट्रात मराठी चित्रपटांपेक्षा हिंदी चित्रपटांचा प्रेक्षकवर्ग फार मोठा आहे, हे वास्तव आहे. वास्तव नाकारता येते पण त्याचे परिणाम स्वीकारावेच लागतात.

भाषा

भारताला जोडणारे खरे दुवे म्हणजे धर्म व क्रिकेट. अस्तित्वात नसलेली संस्कृत सुद्धा बहुतेक भारतीय भाषा भगिनी असल्याची चुणूक दाखवून जाते.

कागदोपत्री ती राष्ट्रभाषा आहे की नाही हे गौण आहे.

हिंदी हीच राष्ट्रभाषा आहे अशा अपप्रचाराला उत्तर म्हणून दिलेला दाखला चुकीचा वाटत नाही. खासकरून फक्त 'कायद्याने परवानगी दिली आहे म्हणून' अशा युक्तिवादाबाबत.

(हिंदी चित्रपट उर्दू आहेत की पंजाबी हाही चर्चेचा विषय होऊ शकतो :) )

तुम्ही भारतात असाल तर तुमच्या भ्रमणध्वनीवर उपक्रम चे नवे लेख एस.एम.एस. ने मिळवण्यासाठी हे पाहा.

संस्कृत अस्तित्वात नाही?

छे छे, तुम्हीसुद्धा. :-(

संस्कृतप्रेमी बडगा दाखवतील हो.

-राजीव.

इतका चांगला मुद्दा सुटला कसा!

हिंदी चित्रपट भारतात सर्वत्र प्रदर्शित होतात,महाराष्ट्रात मराठी चित्रपटांपेक्षा हिंदी चित्रपटांचा प्रेक्षकवर्ग फार मोठा आहे, हे वास्तव आहे.

इतका चांगला मुद्दा माझ्याकडून सुटला कसा कळत नाही.

वास्तव नाकारता येते पण त्याचे परिणाम स्वीकारावेच लागतात.

सहमत.

बहुसंख्य भारतीयांना समजते अशी हिंदी ही एकच भाषा आहे. कागदोपत्री ती राष्ट्रभाषा आहे की नाही हे गौण आहे.

यनावाला सर, मला म्हणायचे आहे ते किमान शब्दांत नेमके मांडल्याबद्दल धन्यवाद!

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

राष्ट्रभाषा

बहुसंख्य भारतीयांना समजते अशी हिंदी ही एकच भाषा आहे.

इंग्रजी कदाचित जास्त लोकांना समजते. तशा समजावण्याच्या अनेक भाषा आहेत म्हणा

माझ्या तामिळनाडू प्रवासात बहुतेक वेळा हिंदी कळत नाही पण इंग्रजी थोडिफार् कळते असे बरेचजण भेटले. आणी तसेही संख्येच्या बळावर राष्ट्रभाषा ठरवावी का हा वादाचा मुद्दा आहे

हिंदीचित्रपट भारतात सर्वत्र प्रदर्शित होतात,महाराष्ट्रात मराठी चित्रपटांपेक्षा हिंदी चित्रपटांचा प्रेक्षकवर्ग फार मोठा आहे (असेलही चर्चेशी काय संबध ) मी इंग्रजी तेलगु मराठी चित्रपटही पाहतो.

(कुजका) कुमार जयेश काटकर

फोल विधान

सध्याच्या अरुणाचल प्रदेशावरून तापलेल्या भारत चीन संबंधांमुळे अरूणाचलीही हिंदी बोलतो हे महत्वाचे झाले. पण दक्षिणेतील अनेक राज्यात हिंदी बोलली जात नाही- अगदी तुम्ही, परकीय, तेथे जाऊन हिंदीतून त्यांच्याशी संवाद करू लागलात तरीही-- ह्याकडे तुम्ही सोयिस्कर दुर्लक्ष करत आहात. तेथील बहुसंख्य जनता हिंदीला राष्ट्रभाषा मानत नाही. तेव्हा तेही माझ्याप्रमाणेच मूर्ख असावेत.

किमान सूज्ञांनी वास्तव नाकारू नये

पण दक्षिणेतील अनेक राज्यात हिंदी बोलली जात नाही- अगदी तुम्ही, परकीय, तेथे जाऊन हिंदीतून त्यांच्याशी संवाद करू लागलात तरीही-- ह्याकडे तुम्ही सोयिस्कर दुर्लक्ष करत आहात.

अजिबात नाही. तमिळनाडातल्या लोकांना हिंदी कळते ह्याचे असंख्य पुरावे गोळा करता येतील. चेन्नईतल्या आटोत बसून रजनीकांतला किंवा विजयकांतला हिंदीत शिव्या देऊन बघाव्या. तुमच्या हिंदी बोलण्याकडे दुर्लक्ष होणार नाही.

व्यापार-उदिम करणारे चेन्नईत जाऊन हिंदीतून व्यवहार करतात. गोऱ्यांना आपण काय बोलतो आहे हे कळू नये, असे वाटते तेव्हा एकाच हपिसात काम करणारे गुजराती, तेलुगू, तमिळ, मराठी बांधव हिंदीतून संवाद साधतात.

तेथील बहुसंख्य जनता हिंदीला राष्ट्रभाषा मानत नाही

.
फरक पडतो का? सवाल मानण्याचा नाही, न मानण्याचा नाही. सगळी तथ्ये समोर असताना किमान सूज्ञांनी तरी वास्तव नाकारू नये.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

हिंदी हैं हम्

'हिंदी हैं हम' या सीएनएन आय बी इन वर झालेल्या कार्यक्रमात प्रेक्षकांना 'हिंदी राष्ट्रभाषा आहे का?' अशा प्रश्नाचे (ज्याचे तांत्रिक उत्तर होय आहे.) उत्तर प्रेक्षकांनी ५२%-४८% अशी मतविभागणी करून दिले होते.

भारतात १९९१ ची हिंदी भाषकांची संख्या सुमारे ४२% असल्याचेही यात दाखवले गेले जी १९७१ ला सुमारे ३५% होती.

यावरून ज्यांची मातृभाषा हिंदी नाही अशा ५८% मधले सुमारे २०% च हिंदीला राष्ट्रभाषा मानतात असा अर्थ होतो का?

विशेष म्हणजे चर्चेचा मुद्द हिंदी वि. मराठी नसून हिंदीची आरेरावी हा होता.

तुम्ही भारतात असाल तर तुमच्या भ्रमणध्वनीवर उपक्रम चे नवे लेख एस.एम.एस. ने मिळवण्यासाठी हे पाहा.

गृहभाषा

सीएनएन आय बी इन वर झालेल्या कार्यक्रमात प्रेक्षकांना 'हिंदी राष्ट्रभाषा आहे का?' अशा प्रश्नाचे (ज्याचे तांत्रिक उत्तर होय आहे.)

राष्ट्रभाषा असेल नसेल पण माझ्यासारख्या अनेकांची हिंदी ही गृहभाषा आहे. माझ्या घरात आम्ही हिंदी बोलतो. (जशी येते तशी.) माझ्या अनेक नातेवाईकांच्या आणि मित्र-मैत्रिणींच्या घरातही (ज्यांचे जोडीदार अमराठी आहेत किंवा मध्यप्रदेशातील मराठी आहेत [असे माझ्या कुटुंबात बरेच आहेत.]) हिंदी ही गृहभाषा आहे.

अधिकृत

राष्ट्रभाषा असेल नसेल पण माझ्यासारख्या अनेकांची हिंदी ही गृहभाषा आहे.

अबु आझमींची ही असेल. पण महाराष्ट्राची 'अधिकृत भाषा' मराठी आहे. (यासाठी हट्ट करावा का किंवा कसा करावा हा स्वतंत्र मुद्दा आहे.)

(राष्ट्रभाषा आहे, असल्यात जमा आहे, नसली म्हणून काय झाले.. ऐवजी ती '२२ वगैरे पैकी एक' राष्ट्रभाषा व २ पैकी एक 'अधिकृत भाषा' आहे हे केंव्हाही सुटसुटीत आहे.)

तुम्ही भारतात असाल तर तुमच्या भ्रमणध्वनीवर उपक्रम चे नवे लेख एस.एम.एस. ने मिळवण्यासाठी हे पाहा.

महाराष्ट्राच्या अधिकृत भाषेतून

अबु आझमींची ही असेल. पण महाराष्ट्राची 'अधिकृत भाषा' मराठी आहे. (यासाठी हट्ट करावा का किंवा कसा करावा हा स्वतंत्र मुद्दा आहे.)

माझ्या मनात प्रश्न महाराष्ट्राची अधिकृत भाषा कोणती हा नसून हिंदीचा दुस्वास कशासाठी असा आहे. महाराष्ट्राच्या अधिकृत भाषेतूनच शपथ घ्यावी असा कायदा आहे का? असल्यास अहिराणी, इंग्रजी, संस्कृतातून शपथ घेणार्‍यांच्याही श्रीमुखात भडकवायला हवी होती. :-(

हिंदीचा दुस्वास

मुद्दा हिंदीचा दुस्वास असा नसावा. (तसा असताच तर सपाच्या च्या खुळचट तर्काप्रमाणे महाराष्ट्रात हिंदी चित्रपट प्रदर्शनावरही/गाणे ऐकण्यावर मनसेचा विरोध असायला हवा होता.)

मराठीचा (व इतर सर्व भारतीय प्रादेशिक भाषांचा) दुस्वास/हिंदीची अरेरावी असा असावा. (सेनेचे सर्व दक्षिण भारतीयांना आण्णा म्हणणे किंवा मद्रासी म्हणणे हे याच मानसिकतेचे नमुने ज्याचे तो समर्थन करू शकत नाही.)

मुद्दा मुंबईत येणारा युपी-बिहारींचा थवा रोखणे हा असावा. हिंदीतून शपथ घेणार्‍या आणखी दोघांना मनसे ने न रोखणे याचा अर्थ या प्रकरणाला अबु-राज यांच्या पूर्व-संघर्षाशी ठळक पार्श्वभूमी आहे.

याला हिंदीप्रेम-विरोध (म्हणजेच देशप्रेम / देशद्रोह) असे रूप देणे म्हणजे शुद्ध धूळफेक आहे.

(आझमी देखील शुद्ध हिंदी न बोलता उर्दू मिसळतात. 'बम्बैया हिंदी' बोलणे हाही हिंदी भाषेचा अवमानच आहे.)

तुम्ही भारतात असाल तर तुमच्या भ्रमणध्वनीवर उपक्रम चे नवे लेख एस.एम.एस. ने मिळवण्यासाठी हे पाहा.

भाषेचा अवमान

मुद्दा हिंदीचा दुस्वास असा नसावा. (तसा असताच तर सपाच्या च्या खुळचट तर्काप्रमाणे महाराष्ट्रात हिंदी चित्रपट प्रदर्शनावरही/गाणे ऐकण्यावर मनसेचा विरोध असायला हवा होता.)

मान्य.

हिंदीतून शपथ घेणार्‍या आणखी दोघांना मनसे ने न रोखणे याचा अर्थ या प्रकरणाला अबु-राज यांच्या पूर्व-संघर्षाशी ठळक पार्श्वभूमी आहे.

हेच.

'बम्बैया हिंदी' बोलणे हाही हिंदी भाषेचा अवमानच आहे.

हे मात्र अमान्य. प्रत्येक भाषेत सरमिसळ होत असतेच. शुद्ध हिंदी उत्तर प्रदेशातही किती प्रमाणात बोलली जाते आणि प्रमाण मराठी महाराष्ट्रातही किती प्रमाणात बोलली जाते हे तपासायला हवे. स्थळानुसार भाषेत बदल होत असतोच. हिंदीत पंजाबी, भोजपुरी, उर्दू अशा अनेक भाषांची यामुळेच सरमिसळ झालेली दिसेल. याने भाषेचा अवमान होतो असे वाटत नाही. फारतर, ज्यांना आणि जेथे शुद्ध हिंदी अपेक्षित आहे त्यांचा आणि तेथे अवमान होईल.

शुद्ध हिंदी

त्याचा अनुभवामध्ये सर्वसाधारणपणे मध्यप्रदेशातील हिंदी बरीच लाघवी आहे. (या खालोखाल शुद्ध/गोड हिंदी तामिळांचीच) युपी व बिहारमधील गोड हिंदी (खडी बोली) बोलणार्‍या व्यक्ती त्याच्या माहितीत प्रत्येकी एक इतक्याच आहेत.

ही हिंदी ऐकल्यास स्वतःला ती येत नाही याची खंत वाटते व बंबैया हिंदी बोलणार्‍यांची कीव येते.

तुम्ही भारतात असाल तर तुमच्या भ्रमणध्वनीवर उपक्रम चे नवे लेख एस.एम.एस. ने मिळवण्यासाठी हे पाहा.

येथे

नवभारत टाइम्सवरील प्रतिक्रिया.
विरुद्ध
सकाळ मधील प्रतिक्रिया

सकाळ मधील प्रतिक्रिया पाहिल्या तर मराठी लोकांचा अबुला मोठा विरोध आहे असे वाटते.
पण नवभारत टाइम्सवरील प्रतिक्रियातून हिंदी भाषिक लोकं काळजीत आहेत असे वाटते.

एकुणच मनसे आमदारांनी झकास काम केले आहे!

यासोबतच मराठीचा जोर वापरातही कसा वाढेल हे पण पाहिले पाहिजे.

इंग्रजी च्या वापरासाठी लोकांना बडवावे लागत नाही, कारण त्यात आर्थिक संबंध आहे. मराठी भाषेशी असा संबंध संलग्न कसा होईल हे पाहिले पाहिजे.
उदा. कॉल सेंटर ला कॉल केल्यावर मराठीतच बोलायचा आग्रह धरणे यातून आपोआप मराठी मुलांना संधी मिळेल. म्हणजेच
भाषेशी आर्थिक संबंध जोडला जाईल.
हेच लिखित कागदप्त्रांविषयीपण लागू...

काय वाटते?

आपला
गुंडोपंत

न बसलेल्या थपडीचे विश्लेषण

वाहिन्यांवर विधानसभेत घडलेल्या दंग्याचे चित्रिकरण पाहिल्यावर राम कदमांचा हात अबु आझमीच्या नेमका कानशीलावर पडल्याचे दिसत नाही. बहुधा निसटता कपाळाला स्पर्शुन गेल्याचे जाणवते. त्यामुळे तांत्रिक दृष्टिकोनातून तरी थप्पड मारली असे न म्हणता केवळ हात उगारला असे म्हणता येईल :-)

असो, आता थोडे विश्लेषण...
खरतर या निवडणुकीत वाढती महागाई, प्रचंड बोकाळलेला भ्रष्टाचार, भारनियमन, शेतकर्‍यांच्या आत्महत्या आणि अंतर्गत सुरक्षा या सारखे महत्त्वाचे मुद्दे असतानाही मनसेने केवळ मराठी अस्मितेच्या मुद्यावर निवडणुका लढविल्या आणि पहिल्याच प्रयत्नात तब्बल तेरा जागा जिंकल्या. राज ठाकरेंची निवडणूकीतील भाषणे ऐका. त्यात त्यांनी अतिशय आक्रमकतेने मराठीचा मुद्दा मांडला होता. त्यामुळे पोटाच्या प्रश्नांपेक्षाही लोकांना मराठीवर होणार्‍या आक्रमणाचा मुद्दा महत्त्वाचा वाटला व त्यांनी केवळ मराठी अस्मितेची लढाई लढण्यासाठीच मनसेला निवडून दिले आहे हा निष्कर्ष निघतो.

अगदी अधिवेशनाच्या सुरुवातीस सुद्धा मनसेने मराठीच्या मुद्यावर आपण आक्रमक राहणार याचा इशारा दिला होता. असे वर्तन केल्यावर निलंबन अटळ आहे याची सुद्धा त्यांना नक्कीच कल्पना होती असणार. त्यामुळे प्राप्त परिस्थितित मनसे आमदारांचे वर्तन लोकभावनेला अनुसरुनच होते असे म्हणता येईल. उलटपक्षी त्यांनी शिवसेनेसारखी बोटचेपी भुमिका घेतली असती तर त्यांना निवडून दिलेल्या मतदारांशी प्रतारणा ठरली असती.

आता राहता राहिला तो सुवर्ण महोत्सवी वर्षात महाराष्ट्राच्या संसदीय परंपरेला काळीमा लावण्याचा प्रश्न. खरतर गेल्या पन्नास वर्षात ज्याचा महाराष्ट्राला अभिमान वाटावा असे काय विशेष घडले आहे. भायखळा, वरळी, कुर्ला, वांद्रे, उल्हासनगर, वसई, भिवंडी (माहितगारांनी अधिक मतदारसंघ जोडावेत:-) येथून जेंव्हा गुन्हेगारी पार्श्वभुमीची मंडळी निवडून आली आणि त्यांच्या पाठिंब्यावर सरकारे बनली तेंव्हा मा. अशोक चव्हाण म्हणतात ती संस्कृती कुठे होती. राजकीय प्रतिस्पर्ध्याचा खुन करणारे नेते कोणत्या पक्षात आहेत याची सर्वांना कल्पना आहे. एखाद्या सभ्य सदस्याच्या बाबतीत असा प्रकार घडला असता तर त्याचे नक्कीच वाईट वाटले असते. परंतु गुंडांना त्यांच्याच भाषेत उत्तर देणे अपेक्षित आहे.

त्यामुळे जे झाले ते काळाची गरज होती असे म्हणून सोडून द्यावे.

जयेश

विश्लेषणाशी सहमत

भ्रष्टाचारी राजकारण्यांनी आधीच लोकशाहीला एवढे काळेकुट्ट केले आहे..की त्यात अजून काय काळीमा फासणार?

एकमेकांशी हातघाईवर येण्यापेक्षा परस्पर सहकर्याने पैसा खात राहिल्याने महाराष्ट्राच्या संसदेत बिहारइतकी हाणामारी कधी दिसली नाही.

अभिजित यादव
ता. कर्‍हाड जि. सातारा

उत्तर

परंतु गुंडांना त्यांच्याच भाषेत उत्तर देणे अपेक्षित आहे.

हेच का गुंडांना त्याच भाषेत उत्तर...

पीएमपीच्या १६, एसटीच्या १, तर ५ खासगी बसवर दगडफेक करण्यात आली होती. वारजे माळवाडी, सिंहगड रस्ता, धायरी येथे पीएमपीच्या १५ बस फोडण्यात आल्या, तर एक बस बालाजीनगरमध्ये फोडण्यात आली. एसटीच्या भोर-पुणे बसवर धनकवडी येथे दगडफेक करण्यात आली.

त्यामुळे सर्वसामान्यांना जीव घेऊन पळण्याची वेळ आली. मनसेच्या कार्यकर्त्यांनी रात्री साडेआठ वाजेपर्यंत ३० बस फोडल्या होत्या.

वसुलि
वसंत सुधाकर लिमये

अपरिहार्य वळण

मनसेच्या आमदारांनी घातलेला धिंगाणा ज्यांना दिसतो त्यांना केवळ चर्चा आणि संसदीय परंपरा यांच्या नावावर चाललेली जनतेची लूट दिसत नाही? लिमये म्हणतात तशी मराठीबाबत चिंतेची वेळ आलेली नसली, तरी तशी येईपर्यंत वाट पाहायची का? मनसेला मराठीची खरी काळजी नसून राजकारणाची पोळी भाजण्याचा हा उद्योग असूही शकतो, मात्र मग कॉंग्रेस-राष्ट्रवादीला धर्मनिरपेक्षतेची खरी चाड आहे आणि शिवसेनेला हिंदुत्वाची तळमळ आहे, ही वाक्ये अगदी खरी मानायची का? ती त्यांच्या राजकारणाची चलनी नाणी नाहीत, हे खरं मानायचं? लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींनी असे वर्तन करू नये म्हणताना, लोकं नक्की कशा प्रकारचे वर्तन करतात हे आपण पाहतो का? इंटरनेटवर मराठीला प्रतिसाद मिळतो तो चर्चा आणि संवादाला, त्यातून पोटापाण्याचा प्रश्न नाही मिटत. त्यासाठी अशीच आंदोलने करावी लागतात. सनदशीर मार्गांनी आंदोलने करण्याऱ्यांचे काय हाल होतात, हे अण्णा हजारे किंवा अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या उदाहरणांनी दिसून येते. अंनिसने तर शेवटी स्वतःच्या थोबाडीत मारून घेणे आणि रक्ताने पत्र लिहिणे असेही प्रकार केले, तरी प्रशासन सुस्त आहे. मग प्रशासनाला हलविण्यासाठी असंच करावे लागते. त्यात वावगे काही नाही. लोकशाही परंपरांचा जन्म जिथून झाला त्या फ्रान्समध्येही व संसद निष्प्रभ ठरल्यावर लोकांना हातात शस्त्रे घ्यावीच लागली ना?

असभ्य वर्तन

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
मराठीचा अभिमान कि दुराग्रह
या लेखावर सर्वश्री.वसंत लिमये,अक्षय,धम्मक लाडू, सन्जोपराव आणि चन्द्रशेखर यांनी लिहिलेल्या प्रतिसादांशी मी पूर्णतया सहमत आहे. सन्जोपराव यांचे प्रतिसादलेखन अप्रतिम आहे.
...
सभा या नामापासून सभ्य हे विशेषण सिद्ध झाले आहे. सभेत बसण्यास पात्र तो सभ्य, अपात्र तो असभ्य. भरल्या सभेत उठून आरडा ओरडा आणि दांडगाई करणारे तिथे बसण्यास अपात्र , हे उघड आहे.म्हणून त्यांचे निलंबन योग्य.

+१

अभिमान की दुराग्रह - या प्रश्नाचे उत्तर आमच्या (आणि शिरीष कणेकरांच्या) मते - "आपला असतो तो अभिमान आणि दुसर्‍याचा असतो तो दुराग्रह" अशी सध्याची परिस्थिती आहे - कौरव आणि पांडव दोन्ही गटात.

अमित

यनावाला सरांच्या प्रतिसादाशी सहमती व्यक्त करण्यामागे गणपतीच्या पृथ्वीप्रदक्षिणेसारखी ट्रिक करण्याचा हेतू आहे (म्हणजे सर्वांशीच सहमती दाखवण्यासाठी).

मुंबईच काय सर्व महाराष्ट्रात जिणे मुश्किल करतील........

......मुंबईच काय सर्व महाराष्ट्रात जिणे मुश्किल करतील.
असे मी लिहितो ते http://www.mimarathi.net/guestbook/0?page=1 ईथे असे काही तरी वाचतो म्हणून. सोई साठी खाली देत आहे.

प्रेषक :पुणेरी, गुरू, 11/12/2009 - 18:32
@ धम्या - तुम्हीच पुनमला या. मला इकडुन तिकडं येणं, नंतर परत बापट रोड, कर्वे रोड करत जाणं त्रासाचं होईल. श्रामोना पण बोललोय, ते पण असंच म्हणताहेत.

म्हणजे तिथे वाढती सुबत्ता, त्यायोगे मिळणारी नवे कामं..त्यासाठीचा नोकरवर्ग/मजुर....त्यांची स्वस्ताई...म्हणजे इथेही मुंबईकरणच होतंय असं नाही वाटत?
ते तर सार्वत्रिक आहे. ते ग्रामीण भागातही होतं. माझ्या गावात जी शेती राहीलीये, ती करायला गेली २० वर्षे असेच मजुर आले. स्थानिक पोरं बेकार. ते मजुर चाळीत १० बाय १० च्या खोलीत रहातात, सगळ्यात मिळुन एकदाच डाळ तांदुळ शिजवतात अर्थातच खर्च कमी. स्थानिक लोकांच तसं जमत नाही. तरी काही पोरं जायची कामाला शेतात. एकदा त्या पोरांवर फायर केला हे आम्हीच बघणार म्हणुन. मग हळुहळु भाजीवाले, भंगारवाले, फळवाले, बेकरीवाले आले. ते पण असेच संटे रहातात. बायकांशी उर्मट बोलतात. पैसे, वस्तु दे-घे करताना हात दाबतात. तिकडुन पर्वतीची झोपडपट्टी वडगांव पर्यंत पोहोचलीय अन इकडुन वारज्याची. तिथ सगळे असेच आगा पीछा नसलेले. तिथुन येऊन रात्रीत एकेका इमारतीत दहा दहा फ्लॅट फोडतात. पोलिस म्हणतात चोर सापडतच नाहीत. कसे सापडतील? पर्वतीत डोळ्यावर आले की वारज्याला जातात रहायला.

सध्या कामवाल्या बाया परप्रांतिय असतील तर अजुनच माज. त्यांना हवं तेच आपण करायचं. नाही तर परप्रांतियांचा छ्ळ म्हणुन पोलिसात अर्ज करतात, एन सी होते. मग ती मिटवायला अजुन खर्च.

दृक हिंसेचा नमुना

मग हळुहळु भाजीवाले, भंगारवाले, फळवाले, बेकरीवाले आले. ते पण असेच संटे रहातात. बायकांशी उर्मट बोलतात. पैसे, वस्तु दे-घे करताना हात दाबतात.

हं. काही मराठी संकेतस्थळावरही असे प्रकार घडतात असे आम्हाला कळलेले आहे. काही नमुने वानगीदाखल देता येतील.

बाकी हा प्रतिसाद म्हणजे दृक हिंसेचा (visual violence) उत्कृष्ट नमुना आहे. पार्श्वभाग लाल असल्यास मुद्दा थेट पोचतो असे तुम्हाला वाटत असल्यास ही चुकीची समजूत आहे.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

 
^ वर