मनुस्मृती

मनुस्मृती

वेदांखालोखाल पूज्य मानला गेलेला हा मान्य व प्रमाणभूत धर्मग्रंथ साधारणपणे इ.स.पूर्व २०० ते इ.स.२०० च्या दरम्यान रचला गेला असावा. मनूच्या पूर्वापार चालत असलेले विचारांचे संकलन प्रथम भृगूने केले व नंतर त्यात देश, काल, परिस्थिती व समाजाच्या गरजा लक्षात घेऊन वेळोवेळी बदल केले गेले.सांप्रतच्या मनुस्मृतीचे १२ अध्याय असून २६८४ श्लोक आहेत.
लौकिक अर्थाने हा धर्मग्रंथ असला तरी येथे " धारयते स: धर्म: " हा अर्थ घ्यावयाला पाहिजे कारण या ग्रंथात समाजशास्त्र व राजशास्त्र यांचाही विचार केलेला आहे. आजच्या काळात न पटणारे "न स्त्री स्वातंत्र्यमर्हती" वा शूद्र समाजासंबंधीचे विचार आज त्याज्य मानले तरीही त्यातील बहुसंख्य विचार कालातीत आहेत. त्यातील काही वचने पाहू. (मराठी अर्थ द्यावा लागणार आहेच म्हणून संस्कृत वचने देत नाही.
ज्या मनुष्याची वाणी व मन शुद्ध आहेत आणि निषिद्ध विषयात ती प्रवेश करणार नाहीत अशा प्रकारे सार्वकाल सुरक्षित आहेत, त्याला वेदांतात सांगितलेली सर्वज्ञत्व, सर्वेशित्व, इ. फले प्राप्त होतात.
प्रथम संमृद्धीच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करूनही तिची प्राप्ती झाली नाहीतर " मी दुर्भागीच आहे" असा आत्म्याचा अवमान करू नये, तर आमरण ऐश्वर्यसिद्द्धीसाठी प्रयत्न करीत राहावे आणि लक्ष्मी दुर्लभ आहे असे कधी मानू नये.
जे जे पराधीन ते ते दु:ख व जे जे स्वाधीन ते ते सुख होय. संक्षेपात सुखदु:खाचे हे लक्षण मानावे.
यत्र नार्यस्तु पूज्यंते रमन्ते सर्व देवता: !
यत्रैतास्तु न पूज्यते सर्वास्तत्राफला:क्रिया !!
जो मनुष्य अधर्माने व्यवहार करतो, ज्याचे धन खोटेपणातून मिळवलेले असते व जो हिंसा करण्यात आनंद मानतो, अशा पुरुषाला इहलोकी कधीही सुख लाभणार नाही.
ब्रह्मविरहित क्षत्र वृद्धी पावत नाही. क्षत्रविरहित ब्रह्मही वाढत नाही.ब्रह्म-क्षत्र परस्पर संबंध होतात तेव्हा ते इहलोकी आणि परलोकी वृद्धी पावतात.
जो मनुष्य सर्व भूतांच्या ठिकाणी आत्म्याला आत्म्याच्व्या योगाने पाहतो तो सर्वत्र समतेचा अनुभव घेऊन परमपद अशा ब्रह्माला प्राप्त होतो.
मनुष्यातील आसुरी अंशाला नियंत्रित करावयाला राजाने विचाराने दंडाचा उपयोग करावा.
उच्छृंकल वा स्वेच्छाचारी राजावर नियंत्रण ठेवावयास मंत्रिपरिषद असावी.प्रत्येक मंत्र्याचा बौद्धिक मानसिक व आत्मिक स्तर सामान्य मनुष्याहून बराच उच्च असावा व त्याच्याकडे शौर्य हा गुण अवश्य असावा.
न्यायव्यवस्थेबद्दल विस्तृत विवेचन आहे. लेख, साक्ष्य व भोग ही तीन प्रमाणे ग्राह्य धरली आहेत.
कोणापासून किती कर घ्यावा याचे नियम घालून दिले आहेत.
मनुने स्वराष्ट्र,परराष्ट्र,मित्रराष्ट्र, शत्रुराष्ट्र व मंडलराष्ट्र असे विभाग केले आहेत.
नगरशासनाकरिता विशेष अधिकारी असत व गावाचे शसन ग्रामसंस्था करे.

परदेशातही मनुस्मृती मान्य होती. कंबोज, यवद्वीप, ब्रह्मदेश इत्यादी देशात मनुनुसार कायदे होते.
शरद

लेखनविषय: दुवे:

Comments

उद्देश

लेखाचा उद्देश काय आहे हे कळले नाही.

नितिन थत्ते

उद्देश

मनुस्मृतीबद्दल आपल्याला किती माहिती असते ? मनुवादी म्हणून जुन्याची टर उडवणे ही आजकालची फ़ॅशन झाली
आहे. मी माझ्या तीन-चार मित्रांना विचारले (त्यात यनावाला सरही होते) व माझ्या लक्षात आले की या ग्रंथाचा अभ्यास
झालेला नाही. लाखो लोकांवर शेकडो वर्षे कबजा (आपण गुलामीही म्हणावयास हरकत नाही) ठेवणार्‍या ग्रंथात ग्राह्य-अग्राह्य
काय हे तरी कळावयास पाहिजे. इतिहासात बायबल, कुराण सारखी थोडी उदाहरणे सोडली तर असे किती ग्रंथ सापडतात ?
माझी कळकळीची विनंती आहे की अभ्यासू (अर्थात त्याचीही फार गरज आहे असे नाही म्हणा! मत काय कुणीही द्यावे.) उपक्रमवासीयांनी अशा १० ग्रंथांची यादी अवष्य द्यावी.(दास कॅपिटल १०० वर्षातच नाहिसा झालेला दिसतो.)

(समित्पाणी) शरद

मनुस्मृतीबद्दल

धर्मग्रंथ साधारणपणे इ.स.पूर्व २०० ते इ.स.२०० च्या दरम्यान रचला गेला असावा.

मला वाटते की रचना आधीच झाली असावी. संकलन या काळात झाले असावे. चू. भू. द्या. घ्या. रचनाकालावर प्रकाश पाडावाच.

लाखो लोकांवर शेकडो वर्षे कबजा (आपण गुलामीही म्हणावयास हरकत नाही) ठेवणार्‍या ग्रंथात ग्राह्य-अग्राह्य काय हे तरी कळावयास पाहिजे.

मनुस्मृतीबद्दल माहिती देण्यास वरील लेखही अपुरा आहे. अधिक विस्ताराने देता आल्यास कृपया द्यावा. प्रतिसादांतून दिलीत तरी चालेल.

कोणत्याही (धर्म)ग्रंथात सांगितलेल्या विचारांचा उपयोग/ वापर त्या समाजाने किंवा त्यांच्या पुढील पिढ्यांनी कसा केला यावर त्यावर त्या ग्रंथाचा उपयुक्तपणा ठरतो असे वाटते.

हम्म !

शरदराव, लेखन अपूर्ण वाटते. काही श्लोक सांगून चांगले आणि वाईट असे काही ठरविता येणार नाही. उलट आपणच जर इतके श्लोक हे विश्वाच्या उत्त्पत्तीबद्दलचे आहेत. इतके श्लोक धर्माबद्दल आहे, इतके श्लोक गृहस्थाश्रमाची कर्तव्य सांगतात, इतके श्लोक पती-पत्नी यांचे कर्तव्य सांगतात. काही श्लोक वर्णांचे अधिकार सांगतात, इ.इ. असे काही सांगितले तर लेख समजून घेता येईल आणि आजच्या काळाच्या कसोटीवर टर उडविणारे टर कशाची उडवतात, वगैरे समजून घेऊन. चर्चेला पुढे नेता येईल असे वाटते.

अवांतर : आपण हा लेख वाचला का ?

-दिलीप बिरुटे

खरे आहे...

काही श्लोक सांगून चांगले आणि वाईट असे काही ठरविता येणार नाही.

खरे आहे आणि मला वाटते शरदरावांचा हाच मुद्दा आहे की लोकं माहीती न करताच वाईट म्हणायला सरसावतात. शिवाय समोरचा माणूस कसा जगतोय/वागतोय ह्याच्या कडे दुर्लक्ष करून मनुवादी शब्द शिवीसारखा वापरून तयार करतात... हे काही मी कुठल्याच बाजूच्या (मनूस्मृती चांगली की वाईट वगैर्रेच्या) समर्थनार्थ लिहीत नाही मात्र शरदरावांचा जो मूळ मुद्दा आहे त्याच्याशी संबंधीत नक्कीच आहे.

अवांतरासंदर्भातः आपण डॉ. कुमार सप्तर्षींच्या लेखाचा जो दुवा दिला आहे, त्यात त्यांनी १९७३ साली पुरीच्या ज्या शंकराचार्यांशी वाद घातल्याचे सांगितले आहे ते १९९२ साली शंकराचार्य झालेत असे गोवर्धनपिठाच्या अधिकृत संकेतस्थळावर म्हणलेले आहे... असो.

टर आणि आलोचना

शरद यांनी थोडक्यात काही ओळख करून दिलेली आहे.

ज्यांना भारतीय इतिहासाबद्दल रस आहे, त्या सर्वांसाठी मनुस्मृती वाचनीय आहे.

मनुस्मृती हा कायद्यांचा ग्रंथ आहे. शरद म्हणतात की त्यातील काही कायदे त्याज्य आहेत आणि काही कालातीत आहेत. (मी त्यात सुधार करेन तो असा : काही कायदे त्याज्य आहेत, आणि काही अजून आपल्याला लागू करणे ठीक वाटते. उद्या त्यातीलही काही आपल्याला त्याज्य वाटू शकतील.) पण त्याज्य कुठले, आणि ग्राह्य कुठले, यांचा विवेक कसा करावा, याचे मार्गदर्शन स्मृतीमध्ये मिळत नाही.

मग त्याज्य आणि ग्राह्य हे शरद यांनी कसे ठरवले असावे? बहुधा नीतिशास्त्राचा विचार करून. (माझ्या मते असे केल्यास योग्यच केले.)

"न स्त्री स्वातंत्र्यमर्हति।" श्लोकापाशी "या श्लोकाबद्दल स्वतंत्रपणे विचार करा" असे उपकलम नाही. ("यत्र नार्यस्तु पूज्यन्ते..." मध्ये अस्वतंत्र स्त्रीची पूजा ती नेमकी काय सांगितली आहे, जी कालातीत आहे?)

राजाने मंत्रीमंडळ नेमावे हे आज लागू आहे. ते कालातीत आहे, असे वेगळे मार्गदर्शन आपल्याला मिळत नाही.

मग राजाबद्दल मार्गदर्शन आजही लागू आहे, असे शरद कसे काय म्हणतात? तर बहुधा अद्यसंमत नीतिशास्त्राच्या विचारातून.

जर काय त्याज्य आहे, आणि काय ग्राह्य आहे ते अद्यसंमत नीतिशास्त्रावरूनच ठरवायचे आहे, तर मनुस्मृती मार्गदर्शन म्हणून काय कामाची? अद्यसंमत नीतिशास्त्र हेच आजच्या वर्तणुकीच्या मार्गदर्शनासाठी पुरे.

अद्यसंमत नीतिशास्त्र बाजूला ठेवून जर कोणी मनुस्मृतीतून (किंवा जुन्या करारातून, किंवा वाटेल त्या पुरातन कायदेग्रंथातून) मार्गदर्शन घेऊ लागले, तर त्या व्यक्तीची टर उडेल, आणि उडणे योग्यच आहे. तो व्यक्ती मग ही आपली टर नसून मनुस्मृतीची टर आहे, असा कांगावा करू लागेल. तर लवकरच ती मनुस्मृतीची टर होईल. चूक कोणाची?

मनुस्मृतीतील जाचक तपशिलांची आलोचना करण्यासाठी सारखेसारखे "पण राजाची कर्तव्ये तर बरी होती ना?" म्हणावे लागू नये. औरंगझेबाच्या जुलुमाची आलोचना करताना अधूनमधून, "पण तो उपभोगशून्य स्वामी होता, टोप्या शिवून आपली उपजीविका चालवे" वगैरे स्तुतीसुद्धा प्रत्येक वेळी केलीच पाहिजे, असे म्हणणे हास्यास्पद आहे.

ही आलोचना सद्यस्थितीच्या विचारात आहे. ऐतिहासिक अभ्यासाच्या दृष्टीने बघितले, तर आलोचना तशी करता येत नाही, कारण त्या काळात आजचे नीतिशास्त्र उपलब्ध नव्हते. स्मृतीग्रंथाच्या लेखकांची आलोचना त्या काळात उपलब्ध नीतिविचारांनीच करता येऊ शकते.

त्या काळातल्या सर्वच कायदेग्रंथांमध्ये ही त्रुटी होती - आणि हे सर्व ग्रंथ (स्मृती, जुना करार, कुर्'आन) पवित्र ग्रंथ होत - की त्यांत सर्वच कायदे समसमान पवित्रतेचे म्हणून लिहिले गेले होते. यातील काही कायदे काळानुसार त्यागावेत, अशी कुठलीच टिप्पणी त्या-त्या ग्रंथांत सापडत नाही.

कायद्यांसाठी तात्कालिक नीतिशास्त्रातीलही स्पष्टीकरणे आपल्याला मिळत नाही. कुर'आन हे देवाने प्रेषिताला सांगितले, जुना करारही वेगवेगळ्या प्रेषितांना दिव्य स्फुरणाने प्राप्त झाला. मनुस्मृतीतील सुरुवातीच्या अध्यायाचे श्लोक घेऊया :

मनुमेकाग्रमासीनमभिगम्य महर्षयः ।
प्रतिपूज्य यथान्यायमिदं वचनमब्रुवन् ॥ १ ॥
.
भगवन् सर्ववर्णानां यथावदनुपूर्वशः ।
अन्तरप्रभवानां च धर्मान्नो वक्तुमर्हसि ॥ २ ॥
.
त्वमेको ह्यस्य सर्वस्य विधानस्य स्वयंभुवः ।
अचिन्त्यस्याप्रमेयस्य कार्यतत्त्वार्थवित् प्रभो ॥ ३ ॥
.

(सारांश : महर्षींनी येऊन मनूला सर्व वर्णांच्या आणि त्या अनुषंगाने सर्व धर्माबद्दल मार्गदर्शन मागितले.)

स तै: पृष्टस्तथा सम्यगमितोजा महात्मभि: ।
प्रत्युवाचार्च्य तान् सर्वान् महर्षी: श्रूयतामिति ॥ ४ ॥
.
आसिदिदं तमोभूतमप्रज्ञातमलक्षणम् ।
अप्रतर्क्यमविज्ञेयं प्रसुप्तमिव सर्वतः ॥ ५ ॥
.
ततः स्वयंभूर्भगवानव्यक्तो व्यञ्जयन्निदम् ।
... ॥ ६ ॥

(मनु आपण सांगू त्या धर्माचा उगम प्रलयकाळापासून सांगतो आहे. म्हणजे हा सर्वच धर्म सार्वकालिक म्हणून सांगितला जाणार आहे. भगवानापासून जगताची चातुर्वर्ण्याची आणि नर-नारींची निर्मिती, वगैरे सांगितली आहे त्यात स्वयंभू मनूंची उत्पत्ती आहे.

अध्यायाचे शेवटचे श्लोक येणेप्रमाणे :
देशधर्मान्जातिधर्मान्कुलधर्मांश्च शाश्वतान् ।
पाषण्डगणधर्मांश्च शास्त्रेऽस्मिन्नुक्तवान्मनु: ॥ ११८ ॥
.
यथैदमुक्तवांशस्त्रं पुरा पृष्टो मनुर्मया ।
तथैदं यूयमप्याद्य मत्सकाशान्निबोधत ॥ ११९ ॥

म्हणजे हे शास्त्र शाश्वत आहे, ते थेट भगवानाने विश्व उत्पादन करताना स्वयंभू मनूंमध्ये उत्पन्न झाले, असे हे देशाचे, जातींचे, कुलांचे वगैरे धर्म आहेत. याच प्रकारचा "शाश्वत धर्म" प्रकार सर्व प्राचीन कायदेग्रंथांत आपल्याला दिसतो. कायदे आणि धर्म शाश्वत म्हणून सुरुवातीलाच सांगितल्यानंतर "हे कायदे काळानुरूप ग्राह्याग्राह्य ठरवा" असे म्हणायला जागाच कुठे राहाते?

अशा ग्रंथांचा फायदा हा की थेट विश्वनियंत्याकडून मिळालेले हे कायदे पर्याय नसला तर लोक प्रयत्नपूर्वक पाळतात. पण एकदा का कुठला पर्याय प्राप्त झाला, तर मोठी उलथापालथ होऊ शकते. मनूने भगवानापासून मिळवलेला धर्म थोडा-थोडा बदलता येत नाही. कारण तो स्वतःला पुरताच शाश्वत म्हणवतो. पूर्ण घ्या किंवा पूर्ण टाका. मग तो पूर्ण टाकून महंमदाने जगन्नियंत्याकडून मिळवलेला धर्म-कायदा पुरता स्वीकारायचाच पर्याय राहातो. किंवा बाटाबाटी झाल्यावर पुरता ख्रिस्ती धर्म स्वीकारायचीच वेळ येते. "पाव खाणारा हिंदू" (स्मृतीग्रंथ अर्धा-ग्राह्य-अर्धा-त्याज्य मानणारा) असण्यास मनुस्मृतीच प्रतिबंध करते.

हल्लीचे कायदेग्रंथ (लोकशाही देशांतले) मुद्दामून सांगतात - यातील कायदे शाश्वत नाहीत. काळानुसार बदलू शकतात. असे केल्यामुळे भारताची संपूर्ण राज्यघटना न टाकता एखाद्या कायद्याविरुद्ध आंदोलन करता येते. तो मग बदलता येतो. "मनुस्मृतीत लोकशाही असायला हवी" असे कालबाह्य विधान मी करत नाही. पण "पुरते घ्या किंवा पुरते सोडा - असे हे भगवान+मनूचे शाश्वत कायदे आहेत" या धोरणामुळे त्या कायदेसंस्थेचे मरण अटळ होते, हे ऐतिहासिक विश्लेषण करता येते.

- - -

या अस्ताव्यस्त लेखनानंतर थोडा सारांश :
१. एक ऐतिहासिक दस्तऐवज म्हणून मनुस्मृती निश्चित अभ्यसनीय आहे.
२. मनुस्मृतीत जर काही अजून ग्राह्य आहे, तर ते मनूने सांगितले म्हणून नव्हे, तर आजच्या आपल्या नीतिशास्त्राला पटते म्हणून ग्राह्य आहे.
३. "न स्त्री स्वातंत्र्यमर्हति ।" बद्दल आलोचना करण्यासाठी "पण राजाच्या मंत्र्यांबद्दल चांगले वर्णन आहे" असे पालुपद लावणे अनावश्यक आहे.
४. कोणी आजच्या नीतिशास्त्राला बाजूला ठेवले, आणि मनुस्मृतीतले काही "सार्वकालिक" कायदे मनुस्मृतीतले म्हणून आज लागू मानले, तर ती व्यक्ती टर उडवण्यालायक आहे.

प्रमाण

धनंजय यांचे सारेच प्रतिपादन पटण्यासारखेच आणि वादातीत(सध्या) दिसते.

एखाद्या ग्रंथात ९० वाईट (आजच्या मान्य नीतिशास्त्रानुसार) आणि १० चांगली (आजच्या मान्य नीतिशास्त्रानुसार) वचने असतील तर त्या दहा चांगल्या वचनांचा दाखला देऊन कोणी त्या ग्रंथाची भलामण करू लागला, तर तो टर उडण्यास पात्रच ठरेल. आणि ती लागू करण्याचे सुचवू लागला तर तिरस्काराचा धनी होईल. सध्याच्या राजकारणातला मनुवादी हा शब्द या संदर्भातच घ्यायला हवा.

नितिन थत्ते

एक प्रश्न..

सध्याच्या राजकारणातला मनुवादी हा शब्द या संदर्भातच घ्यायला हवा.

सध्याच्या राजकारणात नक्की कोणी मनुस्मृतीचा पुरस्कार केला आहे का? (पुरस्कार म्हणजे - आपल्या देशात मनुस्मृतीचे कायदे पाळले जावेत वगैरे) मला तरी माहीत नाही. असल्यास अवश्य सांगावे. नसले तर नक्की टर कुणाची उडवायची हे पण समजायला हवे.

माझ्या लेखी मनुस्मृती हा भारताच्या इतिहासातील एक भाग आहे जितका चाणक्याचे अर्थशास्त्र आहे अथवा रामायण-महाभारत, गीता-उपनिषदे पासून ते अगदी तुकारामाच्या गाथा आणि सत्याचे प्रयोगापर्यंत वगैरे आहे तितकाच. प्रत्येकातील काही भावेल काही भावणार नाही, बरोबर वाटेल अथवा वाटणार नाही. पण ते वैयक्तिक असणार कारण शेवटी मनुस्मृती काही अधुनिक भारताची राज्यघटना नाही. अधुनिक कशाला गेल्या हजार-दोन हजार वर्षांतरी कुठल्या राजाने ती पुर्णपणे राज्यघटना म्हणून घेतली असेल हा देखील संशोधनाचा विषय होऊ शकेल...

मनुवादी

मनुस्मृती लागू करावी असे म्हणण्याच्या काळाच्या खूप पुढे आपण आलो आहोत. तसेच मनुस्मृतीतील विशिष्ट वर्गाचे हितसंबंध सांभाळण्याचा प्रयत्न करणारे प्रतिपादन याविषयी खूप चर्वितचर्वण झालेले आहे त्यामुळे तसे करावे असे कोणताच राजकीय पक्ष उघडपणे आजच्या लोकशाहीत म्हणणार नाही.

मनुवादी हा शब्द मायावती यांनी रूढ केला. त्या शब्दातून मनुस्मृतीतील वर्गव्यवस्था असावी असे इच्छिणार्‍यांचा निर्देश होतो. मनुस्मृती लागू व्हावी असे वाटणारे खूप लोक आजही (दहा तोंडी संघटनेत आणि त्यांच्या विरोधी संघटनांमध्येही) आहेत.

"लोकं न वाचताच टीका करतात" या म्हणण्यात "मनुस्मृती वाईट नाही" असे सांगण्याचा उद्देश नाहीच हे कसे म्हणावे?

नितिन थत्ते

शब्द बापुडे...

तसेच मनुस्मृतीतील विशिष्ट वर्गाचे हितसंबंध सांभाळण्याचा प्रयत्न करणारे प्रतिपादन याविषयी खूप चर्वितचर्वण झालेले आहे त्यामुळे तसे करावे असे कोणताच राजकीय पक्ष उघडपणे आजच्या लोकशाहीत म्हणणार नाही. (तसेच आपण पांढर्‍या रंगात ठेवलेले वाक्य) ....दहा तोंडी संघटनेत आणि त्यांच्या विरोधी संघटनांमध्येही...

या सर्वात कुठेही मूळ प्रश्नात विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर नाही. केवळ कडेकडेने आरोप करत गैरसमज पसरवणे आहे.

"लोकं न वाचताच टीका करतात" या म्हणण्यात "मनुस्मृती वाईट नाही" असे सांगण्याचा उद्देश नाहीच हे कसे म्हणावे?
नाही. "मनुस्मृती वाईट नाही", असे म्हणायचा अजिबात उद्देश नाही. न वाचताच कशालाही चांगले वाईट म्हणण्याचा जो प्रकार आहे, मग ते मनुस्मृतीबाबत असुंदेत अथवा मॅकॉलेबद्दल, त्यासंदर्भातील हे विधान होते.

मनुस्मृतीचा काल

मनुस्मृतीचा लेखनकाल

नेहमीसारखाच हा एक विवाद्य मुद्दा. याचे एक कारण म्हणजे ही स्मृती एकाने लिहलेली नाही. जुन्या मिळालेल्या श्लोकांत नवीन माणसाने भर घातली म्हणजे त्याच्या काळापर्यंत स्मृतीचा काळ ओढला जातो.म्हणून साधारणत: इ.स.पूर्व २०० ते इ.स. २०० इतका दीर्घ काल मानावा लागतो. तरीही एक वादाचा मुद्दा म्हणजे मनुस्मृती महाभारताच्या आधीची की नंतरची. इथे महाभारताचा काल म्हणजे सौतीने इ.स.पूर्व ३०० च्या सुमारास ते रचले तो काळ. या दोन ग्रंथांचा संबंध गुंतागुंतीचा आहे.श्री.मंडलिक म्हणणार मनुस्मृतीने महाभारताची उसनवार केली तर सर्वश्री बुल्हर-हॉपकिन म्हणणार महाभारत्रकारांना मनु माहित होता. महाभारताच्या सर्व पर्वात "मनुरब्रवित, मनो:राजधर्मा, मनो: शास्त्रम असे उल्लेख आढळतात. म.म.काणे यांचे मत : इ.स. पूर्व ४००च्या सुमारास प्रचेतस मनूचा राजधर्म व स्वायंभुव मनूचा धर्मशास्त्र असे दोन ग्रंथ असावेत व
सौतीने त्यांचा उपयोग केला असावा. यास्क, गौतम, बौधायन यांनी उल्लेखलेला मनु म्हणजे यांपैकी. आज आपल्यासमोर असलेली स्मृती म्हणजे या दोघांच्या ग्रंथांत इतरानी भर घालून रचलेला ग्रंथ.
प्रियालीताई, काही मार्ग दिसतो का चक्रव्युहातून ?
आ.धनंजय यांच्या टिपणीनंतर पटले की आपली मते न देता फक्त मनु काय म्हणतो तेवढेच द्यावे. तरीही १२ अध्यायांवर ४-५ ओळी प्रत्येकी लिहल्या तरी बरेच वाढेल हो. काय करावे ? बघू. आचार्य, तुम्हीच वेळ काढा की.

शरद

मला मार्ग माहित असता तर...

मला मार्ग माहित असता तर प्रश्न उपस्थित करायचे कारणच नव्हते. :-(

महाभारताच्या सर्व पर्वात "मनुरब्रवित, मनो:राजधर्मा, मनो: शास्त्रम असे उल्लेख आढळतात. म.म.काणे यांचे मत : इ.स. पूर्व ४००च्या सुमारास प्रचेतस मनूचा राजधर्म व स्वायंभुव मनूचा धर्मशास्त्र असे दोन ग्रंथ असावेत व सौतीने त्यांचा उपयोग केला असावा.

आता प्रचेतस मनू कोण १४पैकी, त्याने राजशास्त्राची रचना केली ही माहिती मला नवी आहे. मी कुठेतरी साक्षात ब्रह्माने राजशास्त्राची निर्मिती केल्याचे वाचले होते. असो. चू. भू. द्या. घ्या. मला वाटते की स्वयंभू मनू आणि वैवस्वत मनू या दोन प्रसिद्ध मनूंपैकी स्वयंभू मनूने मनु:स्मृती लिहिल्याची वदंता आहे. त्याचा उल्लेख महाभारतात असणे शक्य वाटते.

अधिक माहिती व स्पष्टीकरण

श्री शरद, माहितीबद्दल धन्यवाद. वर श्री थत्ते यांनी म्हटल्याप्रमाणे लेखाचा उद्देश समजला नाही. मनुस्मृतीत समाजशास्त्रीय व राज्यशास्त्रीय भाष्य असणे स्वाभाविकच आहे. मनुस्मृतीला कुणीही सैतानाने लिहिलेला ग्रंथ असे म्हणत नसल्याने त्यात व्यावहारीक चर्चा असणे, समाजाच्या उप्युक्ततेसाठी भाष्य असणे यात काही विशेष नाही. 'वेदांखालोखाल पूज्य मानला गेलेला' अशा या ग्रंथात तसे मानले जावे असे काय होते? मनु नक्की कोण होता? ज्यांनी या ग्रंथास पूज्य मानले होते त्यांच्या हितसंबंधांविषयी अधिक माहिती देता येईल का?

त्यातील बहुसंख्य विचार कालातीत आहेत

या बहूसंख्य विचारांवर तसेच ते आजच्या संदर्भात कसे योग्य आहेत याविषयी एक विस्तूत लेखमाला लिहावी, अशी विनंती. मनुस्मृतीसारख्या तथाकथित पुजनीय ग्रंथावर हा लेख त्रोटक वाटतो.

अक्षय यांच्याप्रमाणेच

>>'वेदांखालोखाल पूज्य मानला गेलेला' अशा या ग्रंथात तसे मानले जावे असे काय होते? मनु नक्की कोण होता?

मलाहि असेच प्रश्न आहेत.

>>ज्यांनी या ग्रंथास पूज्य मानले होते त्यांच्या हितसंबंधांविषयी अधिक माहिती देता येईल का?

हितसंबंधांविषयी म्हणजे कसं ते कळलं नाही. या ग्रंथास पूज्य का मानले आणि कोणि मानले ते कळले तर बरे होइल्.

खुलासा

खुलासा
(१)माझा उद्देश स्वच्छ आहे. मनुस्मृती या ग्रंथाची माहिती नसते, तीची ओळख करून द्यावी. यात माझे मत काय हा मुद्दा दुय्यम आहे. माझे पहिले मत म्हणजे ग्रंथावर टीका करावयाच्या आधी ग्रंथ वाचावा.मग ग्राह्य-अग्राह्य काय ते ठरवावे. दुसरे मत ग्रंथातील काही विचार कालातित आहेत. तिसरे मत वेदांखालोखाल पूज्य आहे.या शिवाय बाकी सर्व माहिती आहे. तीही सर्वस्वी खरीच असेल असे नाही कारण आपल्या जुन्या ग्रंथांबद्दल एवढेच सत्य असते की त्यांच्याबाबत १००% खात्री देता येत नाही. आता दोन-चार ठिकाणची माहिती गोळा करून देतांना उणे-अधिक होणारच. माझा अभ्यास तो किती ? शेवटी पळवाट म्हणून मी " जास्त माहिती श्री. धनंजय यांना विचारा" असे नेहमीच सांगत आलो आहे. असो.
(२) पहिल्या मताबाबतीत हे मान्य की मोठ्या मताधिक्याने उपक्रमवासीयांनी याची गरज नाकारली आहे. ' मत तर द्यावयाचे, त्याला अभ्यास कशाला ?' माझी नम्र विनंती अशी की( इतक्या दिवसांनंतर माझी ही सवय जाणे नाही,) आपण तिकडे दुर्लक्ष करा.
(३) कालातीत विचार : "ज्या मनुष्याची वाणी "... पासून " शौर्य हा गुण अवष्य असावा " यात दिलेले विचार मला कालातीत वाटतात. कोणाला वाटत नसतील तर त्याने आपले विचार मांडावेत,.
(४) द्वैत-अद्वैत वादी कोणीही आचार्य मनूला खोडून काढत नाही. संपूर्ण भारतात सगळ्या स्मृतींमध्ये मनुस्मृती श्रेष्ट मानली जाई. आता कोणी दुसरा एखादा ग्रंथ जास्त पूज्य आहे (उदा.गीता) असे म्हणत असेल तर माझे मत (स्मृतींमध्ये) असे सुधारून घ्यावे.
(५) मनुस्मृतील कायदे आज माना असे मी म्हटलेले नाही. ग्राह्य-अग्राह्य काय ते पहा एवढेच माझे म्हणणे. स्त्रीस्वातंत्र्य वा शूद्र विचार (आज) चूकीचे आहेत असेच माझे मत नोंदले आहे. पण मनुचे मित्रराष्ट्र-शत्रुराष्ट्र याबद्दलचे विचार आजही आपण विचारात घ्यावेत असे मला वाटते. ग्राह्य-अग्राह्य काय हेही प्रत्येकाने ठरवावे.
(६) ग्रंथातील दोन-चार विचार आजघडीला पटणारे नाहीत म्हणून ग्रंथ त्याज्य हे मला बरोबर वाटत नाही.
(७) ग्रंथ परिचयात अत्यल्प भागच देता येतो. हा विद्यावाचस्पतीचा शोधनिबंध नाही. विषयवारीतील टक्केवारी टक्केवारी द्या म्हणणे अंमळ मजेदारच वाटली. श्री नितिन थत्ते यांनी ९०% वाईट व १०% चांगली असा अभ्यास केलेला दिसतो. माझी त्यांना नम्र विनंती त्यांनी (२६९ श्लोक,एकुणाच्या १०%) चांगला भाग कोणता सापडला ते सांगावे व मला उपकृत करावे. मलाच का म्हणा, सगळ्यानाच. उरलेले वाईट सोडून देता येईल.
(८) श्री.धनंजय म्हणतात की चुकीच्या विचाराच्या समर्थनार्थ चांगला विचार देत बसणे योग्य नाही. मान्य. मी तसे म्हटलेले नाही.
(९) मध्यकालात ब्राह्मणांनी स्वत:च्या फायद्यासाठी मनुस्मृतीचा दुरुपयोग केला, त्याचा धिक्कारच केला पाहिजे. तसेच आज जर कोणी तसाच दुरुपयोग करत असेल तर त्याला शिक्षाच झाली पाहिजे, नुसती टर उडवून थांबता कामा नये. श्री.विकास म्हणतात त्या प्रमाणे आज फक्त उलटी प्रतिक्रिया दिसते. समाज विघटनाला हातभार लावणार्‍या
सगळ्या गोष्टींचा निषेध करावयास पाहिजे.
(१०) वर सांगितल्याप्रमाणे ब्राह्मणांनी स्मृतीचा स्वत:च्या फायद्यासाठी दुरुपयोग केला व त्यासाठीच ग्रंथाला पूज्य व अपरिवर्तनीय ठरवले. कायदेच काय, नीतीकल्पनाही बदलत गेल्या पाहिजेत, नव्हे, त्या बदलत जातातच. पण, इथेही गोची होतेच."माणसाचा जीव घेणे अयोग्य". मान्य. मग कसाबचे काय ?
(११) मनु हे माणसाचे नाव तसेच एक संकल्पना दिसते. दोन-तीन दिवसात माझ्या खरडवहीत लिहतो. श्री.विकास व टिंकर्बेल यांनी तेथे पहावे.
(१२) आज कोणीही मनूचे कायदे लागू करा असे म्हणत नाही. श्री. धनंजय म्हणतात त्याप्रमाणे हा अभ्यास करण्याजोगा ग्रंथ आहे एवढेच वाटते.
(१२)....(च्या, मनूने होडी बांधली नसती तर...)
शरद

.

.

कालातीत

श्री शरद, मनुस्मृतीतील प्रत्येक कालातीत विधानासाठी वेगळी चर्चा होऊ शकेल. एखाद्या विधानाची कालातीतता हा मोठा विषय आहे. श्री शरद यांनी यासंदर्भात दिलेल्या एक उदाहरणावर विचार करतोय.

प्रथम संमृद्धीच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करूनही तिची प्राप्ती झाली नाहीतर " मी दुर्भागीच आहे" असा आत्म्याचा अवमान करू नये, तर आमरण ऐश्वर्यसिद्द्धीसाठी प्रयत्न करीत राहावे आणि लक्ष्मी दुर्लभ आहे असे कधी मानू नये.

एका अतिशय शूर शूद्राने अथवा स्त्रीने अथक परिश्रम केले परंतु ते केवळ शूद्र किंवा स्त्री असल्याने यशस्वी ठरले नाहीत व ती व्यक्ति ऐश्वर्यसिद्धी प्राप्त करू शकली नाही तर मनुस्मृतीत या व्यक्तिंनी स्वतःचे कल्याण कसे करून घ्यावे यविषयी मार्गदर्शन आहे काय? शूद्र व स्त्री यांना मनुस्मृतीत दुर्भागी मानले आहे काय? मानले नसल्यास त्यांच्या कनिष्ठतेचे काय कारण दिले गेले आहे? जर कारण केवळ एका वर्णात जन्माला येणे असे असल्यास हा 'पुजनीय' ग्रंथ या 'कालातीत' विरोधाभासाने भरला आहे काय?

मनुस्मृती वाचली नसल्याने प्रश्न विचारून जाणून घेण्यास प्रयत्नशील आहे याची श्री शरद यांनी नोंद घ्यावी. धन्यवाद.

प्रत्यक्ष

श्री नितिन थत्ते यांनी ९०% वाईट व १०% चांगली असा अभ्यास केलेला दिसतो. माझी त्यांना नम्र विनंती त्यांनी (२६९ श्लोक,एकुणाच्या १०%) चांगला भाग कोणता सापडला ते सांगावे व मला उपकृत करावे. मलाच का म्हणा, सगळ्यानाच. उरलेले वाईट सोडून देता येईल.--------इति शरद

न वाचताच कशालाही चांगले वाईट म्हणण्याचा जो प्रकार आहे, मग ते मनुस्मृतीबाबत असुंदेत अथवा मॅकॉलेबद्दल, त्यासंदर्भातील हे विधान होते.--------- इति विकास

येथे दोन्ही विधानातून मनुस्मृतीवर मत व्यक्त करण्यासाठी प्रत्यक्ष मनुस्मृती (त्यावरील भाष्ये किंवा पुस्तके नाही) असा सूर दिसतो. माझी भूमिका स्पष्ट करीत आहे. मी मनुस्मृती प्रत्यक्ष वाचलेली नाही परंतु मनुस्मृती विषयातील तीन चार लेखकांचे लिखाण वाचले आहे. (त्या वाचनातही ९०-१० ही मोजणी केलेली नाही. ते गट फीलिंग आहे).

माझ्या किंवा इतरही उपक्रमींच्या सामान्य जीवनात प्रत्येक ग्रंथ वगैरे वाचून मत व्यक्त करायचे झाले तर मत व्यक्त करायलाच नको. (नजिकच्या भूतकाळात यावरही आंतरजालावर कुठेतरी चर्चा झाल्याचे स्मरते).

समजा मनुस्मृतीत "गोमांस खावे" असे लिहिले आहे (क्ष.य या श्लोकात) असे विधान मी सावरकरांच्या लिखाणात वाचले; तर ते खरे असावे असे समजून चालतो. सावरकरांच्या विद्वत्तेविषयी सध्यातरी शंका नाही. क्ष. य या श्लोकाचा अर्थ असा होतच नाही- सावरकर काहीच्या बाही लिहित आहेत असे लिहिलेले माझ्या वाचनात येत नाही तोपर्यंत तरी ते खरे मानतो. तसेच या विधानाचा मनुस्मृती चांगली की वाईट हे ठरवण्याशी संबंध नाही.

या उलट "ब्राह्मणाकडून मासिक २* टक्के, क्षत्रियाकडून ३ टक्के, वैश्याकडून ४ टक्के आणि शूद्राकडून ५ टक्के व्याज घ्यावे" असे (म. न) या श्लोकात लिहिले आहे असे कुरुंदकरांच्या पुस्तकात वाचले तरी ते खरे समजतो. कुरुंदकरांच्याही विद्वत्तेविषयी सध्यातरी शंका नाही. कारण कुरुंदकर चुकीचे लिहितात असा वाईडस्प्रेड आरोप माझ्या ऐकण्यात/वाचनात नसतो. तसेच समाजातल्या तळागाळातल्या लोकांचा कर्जबाजारीपणा आणि वेठबिगारी वस्तुस्थिती म्हणून मला माहिती असते. (प्रश्न कुरुंदकरांनी चुकीचे लिहिले आहे असे वाचनात आल्यास मी मनुस्मृती वाचायला जाईन का? हा असू शकेल. त्याचे उत्तर 'मुद्दाम नाही' असे आहे. याचे कारण वेळेच्या कमतरतेशिवाय माझे संस्कृतचे तोकडे ज्ञान हेही आहे).
*हे दर आत्ता स्मरणातून लिहिले आहेत. चुकीचे असू शकतील, परंतु वर्णानुसार वेगळे हे मात्र बरोबर.

या उदाहरणात सांगितलेले व्याजाचे दर योग्य की अयोग्य तसेच वर्णानुसार वेगवेगळे असणे योग्य की अयोग्य हे धनंजय म्हणतात त्याप्रमाणे आजच्या नीतिशास्त्राप्रमाणे ठरवायचे आहे.

(चोरी केल्यावद्दल शिक्षा ब्राह्मणाला जास्त आणि शूद्राला कमी असेही वाचले आहे. तेथेही आजच्या नीतिशास्त्राचे निकष लावून चांगले की वाईट ते ठरवायचे आहे).

प्रत्यक्ष मनुस्मृती वाचायचा आग्रह म्हणजे टीका दडपण्याचा प्रयत्न असे वाटते. आम्ही न वाचलेल्यांनी उधळलेल्या मुक्ताफळांना मनुस्मृती वाचलेल्यांनी खोडून काढावे हे उत्तम.

नितिन थत्ते

परत संदर्भावीना (अर्थात आउट ऑफ कॉन्टेक्स्ट)

न वाचताच कशालाही चांगले वाईट म्हणण्याचा जो प्रकार आहे, मग ते मनुस्मृतीबाबत असुंदेत अथवा मॅकॉलेबद्दल, त्यासंदर्भातील हे विधान होते.--------- इति विकास

माझे वरचे वाक्य कशाला उत्तर होते ("त्यासंदर्भातील हे विधान") ते जर समजले नाही तर त्याचा अर्थ चूक-बरोबर जाउंदेत पण जो मूळ प्रतिसादात होता त्यापेक्षा वेगळा होतो. अर्थात ते विधान आपण जे माझ्याबद्दल मलाच, "लोकं न वाचताच टीका करतात" या म्हणण्यात "मनुस्मृती वाईट नाही" असे सांगण्याचा उद्देश नाहीच हे कसे म्हणावे?" विचारले होते त्या संदर्भात होते हे केवळ तपशील समजण्यासाठी देत आहे.

प्रत्यक्ष मनुस्मृती वाचायचा आग्रह म्हणजे टीका दडपण्याचा प्रयत्न असे वाटते.
मी माझ्या प्रतिसादापुरते इतकेच म्हणतो की टिका ही तुम्ही नुसती मनुस्मृतीवर न करता त्यात इतरांबद्दल मनुवादी म्हणत गैरसमज पसरवण्यासाठी, बदनाम करण्यासाठी करत आहात आणि ते ही कुठलाच संदर्भ/पुरावा न देता. माझा त्याला आक्षेप राहील.

अकारण वाद

मी लिहिलेला प्रतिसाद जनरल मूळ मनुस्मृती वाचण्याच्या आग्रहाबद्दल लिहिला होता. त्यात उदाहरण म्हणून विकास यांचे एक वाक्य आणि अजून एक वाक्य अशी लिहिली होती.

मी कुणालाच मनुवादी म्हटले नाही. मनुवादी म्हणून राजकारणात निर्देशिल्या जाणार्‍या व्यक्ती म्हणजे कोण याचे स्पष्टीकरण दिले होते.
तशा व्यक्ती अजून सर्वत्र आहेत असे म्हणणे म्हणजे मनुस्मृतीची बदनामी कशी होते हे कळले नाही.

प्रत्यक्ष मनुस्मृती न वाचता टीका करायची नाही हा आग्रह अयोग्य आहे असे माझे म्हणणे आहे.
पूर्वी अशाच प्रकारच्या विषयावर येथे चर्चा झालेली आहे.

मला न्यूटनचे नियम पाठ्यपुस्तकातून(किंवा रेसनिक- हेलिडे) न शिकता (लॅटिन भाषेतला) प्रिन्सिपिया वाचून शिकण्याची गरज वाटत नाही.

नितिन थत्ते

मनुस्मृती - काही विचार.

मनुस्मृती - काही विचार.

उपक्रमावर श्री. समित्पाणी शरद सर ह्यांनी मनुस्मृतीवर दोन लेख लिहून मनुस्मृतीबद्दल थोडक्यात ओळख करून दिली आहे. मनुस्मृती ह्या ग्रंथाबद्दल सर्वसामान्यांस तिच्या राजकीय उपयोगाशिवाय अन्य विशेष काही माहिती नसते. त्यामुळे तिच्याबद्दल माहिती व्हावी ह्या सद्हेतुने ह्या विषयावर लेखन करून त्यावर चर्चा करण्यांस इतरांना उद्युक्त करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल श्री. समित्पाणी शरद सरांचे अभिनंदन. त्यावर काही सदस्यांनी आपापली काही मतें अभ्यासपूर्वकरीत्या मांडली आहेत. त्या सर्व मतांच्या संदर्भात एकत्रितरीत्या विचार करून मी येथे माझे मत नोंदवू इच्छितो. वास्तविक हे मत टंकावयास मी पूर्वीच आरंभ केला होता परंतु कार्यबाहुल्यामुळे प्रसिद्ध करण्यास अंमळ विलंब होतो आहे. असो. श्री. शरद सरांचा मूळ लेख, मान्यवर सदस्यांचे आत्तपर्यंतचे त्याखालील प्रतिसाद ह्यांच्या संदर्भाने हे मत नोंदवितो आहे.

केवळ भारतीय इतिहासाबद्दल रस असणार्‍यांसाठीच मनुस्मृती वाचनीय आहे असे नव्हे; तर मनुस्मृती वाचनीय असण्यासाठी ह्याव्यतिरिक्त इतरही काही कारणे असावीत. हल्लीच्या आशियाई, मध्यपूर्वीय तसेच पाश्चिमात्य विविध देशांतील विविध अधिनियमांतदेखील मनुस्मृतीतील काही विषय आढळतात. मनुस्मृतीतील विचार जसाच्या-तसा ह्या स्वरूपांत नसला, तरीही तो ह्या ना त्या रूपाने असतो. ह्या अर्थाने समाजमनावर आजही विलक्षण पकड ठेवलेल्या काही विचारांचा - तत्त्वांचा एक अभ्यास करता येण्यासाठी म्हणूनही ती वाचनीय आहे. मनुस्मृतीमध्ये धर्मातील अविभाज्य अंगे ती - समाजशास्त्र तसेच राज्यशास्त्र ह्यांचा विचार विस्ताराने केला आहे त्यामुळे आधुनिक न्यायशास्त्राभ्यासासाठी तथा समाजशास्त्राभ्यासासाठी एक संदर्भ ह्या अर्थाने तसेच आज त्यातील तत्त्वांचा जो अर्थ केला जातो आहे, तो कितपत योग्य अथवा अयोग्य असावा हे कळणे ह्याही कारणासाठी ह्या ग्रंथाचा विशेष अभ्यास होणे आवश्यक आहे असे वाटते. असा अभ्यास करतांना मुख्यत्त्वेकरून अंतरंगपरीक्षण ह्या अंगाने अभ्यास करावा लागतो. बहि:रंगपरीक्षण (ग्रंथांचा रचना-संकलनकाल इत्यादि) येथे विशेष उपयोगाचे नाही. अशा अभ्यासासाठी त्यातील तत्त्वांची ग्राह्याग्राह्यता हा विषय खरे पाहतां फार दूरचा ठरावा. असो.

ग्राह्याग्राह्यतेच्या दृष्टीकोनांतून विचार करणार्‍यांच्या मते ग्रंथातील काही तत्त्वें कालातीत असून इतर काही तत्त्वें ही कालबाह्य आहेत. आधुनिक समाजशास्त्राच्या मते, ह्या प्रकारच्या ग्रंथांतील कालबाह्य आणि कालातीत तत्त्वें ह्यांचा ग्राह्याग्राह्यतेसाठी एकत्रितरीत्या विचार करणे आवश्यक असते. ह्याचे कारण असें, की समाजास लागू केली जाणारी तत्त्वें ही कोण्या एका व्यक्तीने अथवा व्यक्तीसमूहाने ठरविणे हे योग्य नव्हे. समाजास लागू केली जाणारी तत्त्वें - त्यांवर कोण्या एका व्यक्तीने अथवा व्यक्तीसमूहाने भाष्य केल्यास अंदाधुंदी माजून पर्यायाने मूळ तत्त्वांबद्दलच काही एकांगी प्रश्न उद्भवू शकतात. असो. श्री. शरद सरांच्या विधानावर श्री. धनंजयांनी सुधारणा सुचविली ती ही: ’मनुस्मृतीतील काही अधिनियम आज त्याज्य आहेत, आणि काही अजूनही आपल्याला लागू करणे ठीक वाटते. उद्या त्यातीलही काही आपल्याला त्याज्य वाटू शकतील.’

एक समाजशास्त्राभ्यासक ह्या नात्याने भविष्यातील अनेक प्रकारच्या शक्यतांच्या अस्तित्त्वाकडे सर्वसकटपणे दुर्लक्ष करणे मला योग्य वाटत नाही. म्हणून श्री. धनंजयांच्या सुधारणेमध्ये मी एक सुधारणा अधिक सुचवू इच्छितो ती अशी: स्मृतीतील काही अधिनियम आज त्याज्य वाटतात, काही इतर अधिनियम आजही लागू करणे सयुक्तिक वाटते. आज लागू करण्यास सयुक्तिक वाटणार्‍या नियमांपैकी काही अधिनियम हे भविष्यांत आपणांस त्याज्य वाटू शकतील. ह्याच न्यायाने आज आपणांस त्याज्य वाटणार्‍या अधिनियमांपैकी काही अधिनियम आपणांस उद्या स्वीकारार्हही वाटू शकतील.

समाजव्यवस्थेस लागू होणारे काही नियम हे देश, भाषा, वेषभूषा, रंग, लिंग, जाती - पाती, वंश, धर्म ह्या सर्वांपलिकडे असू शकतात. हे नियम समाजास प्रवाही करतात. समाज हा प्रवाही असतो ह्या नियमाने, समाजात बदल हे नेहमीच घडत असतांत. काल नको असणारा विचार समाजाने काल टाकून दिला ह्याच न्यायाने आज टाकून दिलेला विचार उद्या स्वीकारार्हही वाटू शकतो. ही केवळ एक शक्यता आहे, तरीही 'केवळ शक्यता आहे' असे म्हणून तिच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आधुनिक अधिनियमांचा अर्थ कसा लावावा ह्या विषयाचे Interpretation of Statutes नामक एक शास्त्र आहे; त्यांत हें तत्त्व अधिक विस्ताराने विविध उदाहरणांसह चर्चिले गेले आहे. हे शास्त्र अभ्यासणें अजून एका कारणाकरिता आवश्यक आहे. पुरातनकालीन ग्रंथांमध्ये काही त्रुटी होत्या असे काही अभ्यासकांचे प्रतिपादन असते. ह्याबाबतीत उपरोक्त शास्त्र असें सुचवितें की अभ्यासकाने सरळ-सरळ अधिनियमावलींमध्येच त्रुटी शोधण्यापूर्वी आपल्या अर्थ लावण्याच्या पद्धती तपासून पाहाव्यात. अनेकदा अर्थ लावण्याच्या पद्धती चूक असल्यामुळे अकारणतः अधिनियमावलींवर त्रुटी असल्याचा आरोप लावण्यात येतो असे आढळून आले आहे. लिखित अधिनियमांच्या बाबतीत हा प्रश्न जेथे जेथे उद्भवला आहे, तेथे तेथे न्यायालयाची हीच भूमिका असते. असो.

आजच्या नीतिशास्त्रास मनुस्मृतीमधील काही तत्त्वें ही ग्राह्य वाटत नाहीत तर इतर काही तत्त्वें ग्राह्य वाटतांत हे विधान जरी बरोबर असले, तरी एखाद्या ग्रंथातील विधाने ग्राह्य असल्यास केवळ 'आजचे आपले नीतिशास्त्र त्यास पटते म्हणून ग्राह्य' हे विधान अंशत: बरोबर आणि अंशत: त्रोटक वाटते. माझ्या मते, आजचे नीतिशास्त्र आणि ग्रंथांतील तत्त्वें हे दोन्हीही एकमेकांना पूरक असेल तरच असे ग्रंथ अथवा त्यातील काही तत्त्वें ग्राह्य वाटू शकतांत. ह्या ठिकाणी ग्राह्याग्राह्यतेचा विवेक कसा करावा याचे मार्गदर्शन मनुस्मृतीमध्ये मिळत नाही. एखाद्या श्लोकाबद्दल ’स्वतंत्रपणे विचार करा’ असे सुचविणारे उपकलम नाही. त्यामुळे तत्त्वांची ग्राह्याग्राह्यता कशी ठरवावी ह्यावर प्रश्न उद्भवू शकतांत. अर्थातच ही ग्राह्याग्राह्यता ही अद्यसंमत नीतिशास्त्रानुसार ठरविता येतें. अद्यसंमत नीतिशास्त्रास बाजूला ठेवून मनुस्मृतीतील तत्त्वांचा अर्थ लावणे हे मनुस्मृतीसही अपेक्षित नसावें - नाही. ह्याचे कारण, अद्यसंमत नीतिशास्त्र आणि मनुस्मृती ह्यांचा विभक्त पद्धतीने विचार करून काहीही मार्गदर्शन मिळणार नाही. म्हणून त्या ग्रंथांतील तत्त्वांची परीक्षा करणारे ’आजचे आपले नीतिशास्त्र’ हे किती काटेकोर, किती अचूक, पर्यायाने किती पाण्यात आहे हेही तपासून पाहण्याकरिताही एकार्थाने मनुस्मृती ग्रंथांचा संदर्भ म्हणून विचार करतां येवू शकतो - ह्याही कारणाने ती ग्राह्य आहे.

माझ्यामते, ज्याअर्थी ग्राह्याग्राह्यतेचा विवेक कसा करावा ह्याचे मार्गदर्शन मनुस्मृतीमध्ये नाही त्याअर्थी मनुस्मृतीने तिचा अर्थ लावण्याचे स्वातंत्र्य / तिच्यावर टीका करण्याचे स्वातंत्र्य आपणांस दिले आहे असा होतो. त्यामुळे एखाद्या श्लोकाबद्दल स्वतंत्रपणे विचार करा असे स्पष्टपणे सुचविले गेले नसले, तरीही आपणांस आपापल्या काळाचा विचार करून त्याबद्दल स्वतंत्ररीत्या अर्थ करतां येईल. अर्थात् असा अर्थ आपण आधुनिक नीतिशास्त्राच्या नियमांच्या अनुषंगाने - आधुनिक काळांस अनुरूप असाच करणार. असे करतांना आपण आपणांस अपेक्षित तें संदर्भ विचारात घेतल्याने मूळ ग्रंथाच्या शाश्वततेमध्ये काही अंतर पडणार नाही. ह्याठिकाणी कालातीत - कालबाह्य तत्त्वें काय आहेत ह्याचा विचार त्या-त्या वेळीच्या समाजाने एकत्रितरीत्या करणें गृहित अथवा अपेक्षित असल्याने त्याबद्दल वेगळे असे मार्गदर्शन असणेंच मुळांत आवश्यक नाही असेही मला वाटते.

ह्या ठिकाणी अजून एका गोष्टीचा विचार करणें आवश्यक आहे. मनुस्मृतीतील तत्त्वांच्या कालातीततेवर अथवा कालबाह्यतेवर विचार करणारे आपण आहोत. स्वत: मनुस्मृती त्यातील तत्त्वांच्या कालातीततेवर अथवा कालबाह्यतेवर काही कलह करित नाही - नसावी. ती केवळ ही तत्त्वें शाश्वत असल्याचे प्रतिपादन करतें. ’शाश्वत’ ह्या शब्दाचा स्मृतिकारांना काय अर्थ अपेक्षित आहे हे जाणून न घेता केवळ आपल्या तर्काच्या आधारे अर्थ करणे चूक ठरू शकते असे मला वाटते. (वाचावे: Interpretation of Statutes) स्मृतितील शब्दयोजनांचा अभ्यास करतां (आणि कालातीतता-कालबाह्यता ह्यावर तीत भाष्य नसावें हे गृहित घेता) ’शाश्वत असणें’ हे कालबाह्यता आणि कालातीतता ह्या दोहोंच्याही पलिकडले असावे. 'शाश्वत' ह्याचा अर्थ काळानुरूप बदलू शकणार नाही असा मी करणार नाही. काळानुरूप काय घ्यायचे अथवा काय नाही ह्याचा विचार आपण करणे अपेक्षित असते. एक सोपें उदाहरण: सूर्य हा शाश्वत आहे. ज्या ठिकाणी तो सहा महिने उगवित नाही त्या ठिकाणी तो कालबाह्य झाला असावा असे वाटू शकते. एखाद्या ठिकाणी पर्जन्यकाळांत तो झाकला गेला की तो कालातीत नाही असेही वाटू शकते. परंतु हे 'वाटणे-न वाटणे' आपले आहे - त्याची सहस्रावधि कारणे आहेत. त्याशिवाय, सूर्यापासून मिळणार्‍या ऊर्जेचा आपण हवा तसा उपयोग करून घेवू शकतो. ऊर्जेसह येणारी उष्णता आपणांस नको असल्यास आपण आडोसे बांधून तिच्यापासून स्वसंरक्षण करू शकतो. शाश्वत असे म्हणतांना 'पूर्ण घ्या किंवा पूर्ण टाका' असा नव्हे, तर 'पाहिजे तितके घ्या, नको वाटते ते घेवू नका' असा विचार आहे. हे सर्व करतांना मूळ सूर्य हा शाश्वतच आहे. आपल्यासाठी तो त्याच्या अंता-अनंतापर्यंत शाश्वतच राहणार. त्याच्या शाश्वततेबद्दल काही टिप्पणी करण्यास आपण नेहमीच असमर्थ असू.

त्यामुळे अद्यसंमत नीतिशास्त्रांस काही तत्त्वे कालातीत अथवा कालबाह्य वाटत असली तरीही त्यांच्या शाश्वततेबद्दल तें (अद्यसंमत नीतिशास्त्र) काहीही भाष्य करण्यास असमर्थ आहे. ह्याचे कारण पूर्वी नोंदविल्याप्रमाणे - भविष्यातील अनेक प्रकारच्या शक्यतांच्या अस्तित्त्वाकडे सर्वसकटपणे दुर्लक्ष करणे योग्य नाही. ह्याहीउपर, नीतिशास्त्रातील तत्त्वांचा विचार हा स्थल-काल-व्यक्ती इत्यादिपरत्त्वें विविध पद्धतींनी होवू शकतो. नीतिशास्त्राची मूलभूत तत्त्वें काही ठिकाणी एकच असल्याचे आढळते, तर काही ठिकाणी भिन्न पद्धतीने विचार केल्यामुळें तीच तत्त्वें भिन्न वाटू शकतांत. ह्याकारणें शुद्ध नीतिशास्त्राचाच विचार केला तर साहजिकच समाजात चित्तभ्रांति निर्माण होणे शक्य आहे. हे टाळण्यासाठीही मूळ ग्रंथ हा मुळांतून अभ्यासणे आवश्यक आहे. ह्या प्रकारचा पूरक अभ्यास सतत होत राहणे हे आवश्यक असते. अद्यसंमत नीतिशास्त्राची मर्य्यादा अशी एकदा लक्षांत आली, की ’पुरातन ग्रंथ काय कामाचे’ अशी अर्धपक्व तरीही अभिवृत्तीग्रस्त पृच्छा बहुधा (निदान) अभ्यासकांच्याकडून तरी होणार नाही.

जुन्या ग्रंथाचा असा अभ्यास न करतांच, आजच्या काळाच्या कसोटीवर टर उडविणे; इतरांनी लावलेल्या अर्थांचा अनावधानाने अथवा हेतुपुरस्सरत: चुकीचा-संदर्भविहीन अर्थ लावून मूळ ग्रंथाचीच आलोचना करणे हे गुण सर्वसामान्यत: 'अभ्यासकांचे गुण' नाहीत. असे करणार्‍या लोकांकडे सरळ दुर्लक्ष करावे. ते स्वत: टर उडविण्याच्याही पात्रतेचे नाहीत. मात्र त्याच वेळी ते टर कां उडवित आहेत, कशाची टर उडवित आहेत ह्या प्रश्नांचा विचार होणे आवश्यक आहे. चुकीच्या विचारांतून अथवा चुकीचे संदर्भ अभ्यासून कोणी टर उडवित असेल तर त्यांची चूक त्यांच्या ध्यानीं आणून द्यावी. टर उडवणे हे अभ्यासाच्या कमतरतेतूनही येवू शकते, परंतु अधिक अभ्यास करा असे सुचविले आणि त्या ठिकाणी टर उडविणार्‍यांचा अहंकार आड येत असेल, तर सुज्ञानींनी काय ते वेळीच ओळखावे. असो. ग्राह्याग्राह्यतेवर भाष्य करावयाचे असल्यास शक्यतो मूळ ग्रंथाचा विधीवत् अभ्यास करून स्वतःस तसे भाष्य करण्यास पात्र करणे हे उत्तम; एवढेंच सांगावयाचा हेतु.

अर्थात्, केवळ 'ते नियम मनुने सांगितले' ह्यावर त्याची ग्राह्यता आणि अग्राह्यता - दोन्हीही निश्चितच ठरू शकणार नाही ह्या विधानाशी मी पूर्णत: सहमत आहे. न्याय हा दोन्ही बाजूंस समान असावा ह्या नियमाने, ’केवळ मनुने म्हटलें म्हणून ग्राह्य’ हे विधान जितके मूर्खपणाचे ठरते, तितकेच ’केवळ मनुने म्हटलें म्हणून अग्राह्य’ हेही विधान मूर्खपणाचे ठरते.

असो. मनुस्मृतीसारखा, एक स्फोटक ठरू शकणारा हा विषय येथील सदस्यांनी ज्या संयमाने - तरलतेने हाताळला आहे, त्याबद्दल सर्व सदस्यांचे अभिनंदन.

-

तमिळ्नाट्लेर्न्दु डैर्रक्टा मराट्टिदेडत्तुक्कु वंदु सेट्लान ओरु चिन्नमनिदनिन एळुत्तु यिदु!

हैयो हैयैयो!

हेलसिंकीत

ह्याच न्यायाने आज आपणांस त्याज्य वाटणार्‍या अधिनियमांपैकी काही अधिनियम आपणांस उद्या स्वीकारार्हही वाटू शकतील.

असें नेमकें कोणत्या देशात झाले असावे बरें?

मनुस्मृतीसारखा, एक स्फोटक ठरू शकणारा हा विषय येथील सदस्यांनी ज्या संयमाने - तरलतेने हाताळला आहे, त्याबद्दल सर्व सदस्यांचे अभिनंदन.

हेलसिंकीत नागरीकांनी फिनिश रक्ताच्या महानतेची चर्चा ज्या सयंमाने - तरलतेने हाताळली, त्याबद्दल सर्व नागरीकांचे अभिनंदन.

हैयोकाका, गोर्‍यांच्या देशांत त्यांच्याच मतलबाच्या चर्चांवर अभिनंदन कसले करायचे हो?

- राजीव.

पुन्हा अभ्यास

>>शाश्वत असे म्हणतांना 'पूर्ण घ्या किंवा पूर्ण टाका' असा नव्हे, तर 'पाहिजे तितके घ्या, नको वाटते ते घेवू नका' असा विचार आहे.

कोणत्याही प्रकारे भाषा वाकवायचा प्रयत्न केला तरी शाश्वत या शब्दाचा हा अर्थ मान्य होण्यासारखा नाही.
"हे नियम अमक्याकडून ....प्राप्त झाले" अशा स्वरूपाचे प्रतिपादन असल्याने (हे नॉन मनुस्मृती पुस्तकात वाचले आहे) शाश्वत या शब्दाचा अर्थ कायमस्वरूपी असाच करायला हवा.

>>परंतु अधिक अभ्यास करा असे सुचविले आणि त्या ठिकाणी टर उडविणार्‍यांचा अहंकार आड येत असेल,

एखादा मनुस्मृतीत सांगितलेला नियम आजच्या नीतिशास्त्राप्रमाणे त्याज्य आहे हे सर्वांनाच मान्य आहे अशी परिस्थिती असेल तर अजून अभ्यास करणे म्हणजे तो नियम (आपल्याला वाटतो तसाच) मनुस्मृतीत सांगितला आहे का हे तपासून पहाणे एवढाच असेल.
(त्या अभ्यासात- आर्यभटाच्या सूर्यकेंद्री सिद्धांतावरील भाष्यात आर्यभटाला असे म्हणायचे नव्हते/नसावे असा शब्दच्छल केला असल्याचे ऐकून आहे- तसे होण्याची शक्यता - दोन्ही बाजूंनी व्हायची शक्यता आहे. अशावेळी घटनेच्या इंटरप्रिटेशनचा नियम- एखाद्या वाक्याबद्दल संदेह असेल तर कॉमन पार्लन्स मधील अर्थ ग्राह्य धरावा लागू करावा लागेल).

>>काल नको असणारा विचार समाजाने काल टाकून दिला ह्याच न्यायाने आज टाकून दिलेला विचार उद्या स्वीकारार्हही वाटू शकतो.

सहमत. त्याचमुळे मनुस्मृती त्याज्य/टाकाऊ याचा अर्थ मनुस्मृतीच्या पृथ्वीच्या पाठीवरील सर्व प्रती नष्ट कराव्या असा नाहीच.

>>केवळ मनुने म्हटलें म्हणून ग्राह्य’ हे विधान जितके मूर्खपणाचे ठरते, तितकेच ’केवळ मनुने म्हटलें म्हणून अग्राह्य’ हेही विधान मूर्खपणाचे ठरते.

हे मान्यच आहे. म्हणून आजच्या नीतीशास्त्राला मान्य नसणारे नियम काढून टाकून जर तो ग्रंथ मनुस्मृती या नावाने लागू केला तर कोणाचीच हरकत असणार नाही.
(मला कोणी महिना खूप पगार देणार असेल तर त्या पगार देणार्‍याने मला मॅनेजर म्हटले काय किंवा शिपाई म्हटले काय; मला काय त्याचे? असे नोकरी करणार्‍यांमध्ये विनोदाने बोलले जाते....तसेच काहीसे).

नितिन थत्ते

हम्म

आजच्या नीतीशास्त्राला मान्य नसणारे नियम काढून टाकून जर तो ग्रंथ मनुस्मृती या नावाने लागू केला तर कोणाचीच हरकत असणार नाही.

पटले नाही. आजच्या नीतीशास्त्राला मान्य नसणारे नियम काढून टाकून जर तो ग्रंथ मनुस्मृती या नावाने लागू केला म्हणून मनु स्मृतीतून जाईल? असे झाले असते तर रामगढके शोले किंवा रामूचा शोले नावाचे टुकारपट - अमजद, धर्मेंद्र आणि जयच्या भूमिकेतील अमिताभ शिवायही चालले असते ना. ;-) (आता ते मूळातच टुकार होते ही गोष्ट वेगळी. सांगण्याचा मुद्दा एवढाच की शोले म्हटले की जे आठवते ते त्याच्या आवृत्तीत बदल केला म्हणून आठवत राहणार नाही असे थोडेच आहे.)

माझ्यामते मनुस्मृती हा ऐतिहासिक ग्रंथ आहे. इतिहास अभ्यासण्यासाठी त्याचा उपयोग व्हावा आणि इतकेच.

अवांतरः


मला कोणी महिना खूप पगार देणार असेल तर त्या पगार देणार्‍याने मला मॅनेजर म्हटले काय किंवा शिपाई म्हटले काय; मला काय त्याचे? असे नोकरी करणार्‍यांमध्ये विनोदाने बोलले जाते....तसेच काहीसे

पण ते विनोदापुरतेच मर्यादित राहते. सत्यात आलेले दिसत नाही. तसा प्रत्येक मॅनेजर हा त्याच्या हाताखालच्यांना शिपायाच्याच तोडीचा वाटत असतो ही गोष्ट वेगळी.

सोदाहरण मांडणी करावी

श्री हैयैयो, आपला मनुस्मृतीचा अभ्यास आहे, हे जाणून आनंद झाला. तुम्ही वर मांडलेली मते सोदाहरण स्पष्ट केल्यास तुमचा युक्तिवाद व्यवस्थित समजावून घेता येईल. उदाहरणार्थ,

स्मृतीतील काही अधिनियम आज त्याज्य वाटतात, काही इतर अधिनियम आजही लागू करणे सयुक्तिक वाटते.

जे अधिनियम आजही लागू करणे संयुक्तिक वाटते त्याची काही उदाहरणे द्यावीत.

मनुस्मृती वाचलेली नसल्याने इतर अभ्यासकांस प्रश्न विचारून त्याविषयी जाणून घेणे हा हेतू आहे, हे पुन्हा एकदा स्पष्ट करतो. धन्यवाद.

मनुस्मृती मराठीत कोठे मिळेल?

मनुस्मृती मराठीत कोठे मिळेल?
वरीच चर्चा वाचून एकदा वाचुन बघावीशी वाटत आहे.

ऋषिकेश
------------------
भ्रष्टाचार संपविण्याचा सर्वोत्तम आणि सर्वात सोपा(?) उपाय म्हणजे त्यात स्वतः सहभागी न होणे

जुन्या ग्रंथाचा अभ्यास न करतांच... ऐवजी अभ्यासू मित्रगणांना

...जुन्या ग्रंथाचा असा अभ्यास न करतांच, आजच्या काळाच्या कसोटीवर टर उडविणे; इतरांनी लावलेल्या अर्थांचा अनावधानाने अथवा हेतुपुरस्सरत: चुकीचा-संदर्भविहीन अर्थ लावून मूळ ग्रंथाचीच आलोचना करणे हे गुण सर्वसामान्यत: 'अभ्यासकांचे गुण' नाहीत. असे करणार्‍या लोकांकडे सरळ दुर्लक्ष करावे. ते स्वत: टर उडविण्याच्याही पात्रतेचे नाहीत. मात्र त्याच वेळी ते टर कां उडवित आहेत, कशाची टर उडवित आहेत ह्या प्रश्नांचा विचार होणे आवश्यक आहे. चुकीच्या विचारांतून अथवा चुकीचे संदर्भ अभ्यासून कोणी टर उडवित असेल तर त्यांची चूक त्यांच्या ध्यानीं आणून द्यावी. टर उडवणे हे अभ्यासाच्या कमतरतेतूनही येवू शकते, परंतु अधिक अभ्यास करा असे सुचविले आणि त्या ठिकाणी टर उडविणार्‍यांचा अहंकार आड येत असेल, तर सुज्ञानींनी काय ते वेळीच ओळखावे. असो. ग्राह्याग्राह्यतेवर भाष्य करावयाचे असल्यास शक्यतो मूळ ग्रंथाचा विधीवत् अभ्यास करून स्वतःस तसे भाष्य करण्यास पात्र करणे हे उत्तम; एवढेंच सांगावयाचा हेतु...

श्री. हैयो,
आपले विचार नेहमीच संयत व सुयोग्य दिशेने वाटचाल करायला प्रवृत्त करतात.
याचा प्रत्यय पुन्हा आपल्या या लेखातील विचारांनी पक्का झाला. आपले वरील विचार नाडी ग्रंथांच्या संदर्भात नेमके लागू होतात. त्यामुळे आपल्या तमिळभाषा-लिपीतील विशेषज्ञानाचा व विद्वत्तेचा उपयोग करून या ज्ञानशाखेवर विविधांगानी प्रकाश टाकावा. नव्हे जे काम तमिळ चिकित्सकांकडून आपेक्षित आहे ते आपण हाती घ्यावे व जागतिक स्तरावर य़ा शोधकार्याला प्रेरणा द्यावी.
कूटलिपीवरील आपल्या दिवाळी अंकाच्या लेखानंतर नाडीग्रंथांवरील शोध अभ्यासासाठी आपण वेळ देऊ असे मान्य केले होते. त्या अनुसार एक कार्यशाळा जानेवारी२०१० च्या तिसऱ्या करायची ठरवले आहे. आपणांस विनम्रपणे सुचवू इच्छितो की येथे वा मिपा व अन्य मराठी वाचक स्थळांवरील सदस्यांना, आणि तमिळ वाचक स्थळांवरील आपल्या अभ्यासू मित्रगणांना या साठी सहभागी करता आले मला आणखी आवडेल.

शशिकांत ओक

 
^ वर