चाळीशी

"A mere forty years ago, beach volleyball was just beginning. No bureaucrat would have invented it, and that's what freedom is all about."

Newt Gingrich (अमेरीकन राजकारणी नव्वदच्या दशकातील रीपब्लीकन सभापती)

आज हे वरील वाक्य आठवायचे कारण जरा "स्पेश्शल" आहे. ज्या एका जाळ्यात गुंतत तुम्ही आम्ही आज केवळ मराठी संकेतस्थळांपुरतेच नाही तर दिवसातील अनेक गोष्टी करत असतो, त्याच्या शिवाय जगणे अशक्यच, ज्याने जगात वैचारीक मुक्तपणा (freedom)आणला... अशा एका तंत्रज्ञानाचा "औपचारीक" चाळीसावा वाढदिवस आहे. - २९ ऑक्टॉबर १९६९ ला युनिव्हर्सिटी ऑफ कॅलीफोर्नियाच्या प्राध्यापक क्लेनरॉक आणि त्यांच्या चमूने स्टॅनफर्ड विद्यालयात एक Advanced Research Projects Agency Network (or ARPANET) नावाचे जाळे वापरून संदेश पाठवायचा प्रयत्न केला. ते लिहीत आणि पाठवत होते शब्दः "login" पण "lo" टंकले आणि संगणक पद्दती कोलमडली (सिस्टीम क्रॅश!). मग परत प्रयत्न केला आणि हुर्रे! "login" हा शब्द इकडून तिकडे पाठवला गेला. नील आर्मस्ट्राँगच्या वाक्यात बदल करून सांगायचे झाले तर "शास्त्रज्ञासाठीचा एक शब्द हा संपूर्ण मानवीसंस्कृतीसाठीचा नवीन अध्यायच काय सारे ज्ञानभांडार होऊन बसला". - इंटरनेटचा उगम या दिवशी झाला असे समजले जाते. त्या वर्षा अखेरीस युनिव्हर्सिटी ऑफ कॅलीफोर्निया, सँटाबार्बरा आणि युनिव्हर्सिटी ऑफ उटाह मधे पण हे जाळे पोचले होते.

(साभार)

वर जरी गिन्ग्रिचच्या वाक्यात म्हणले असल्या प्रमाणे नोकरशहा काही संशोधन करत नसली तरी जगातील अनेक शोध हे प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे नोकरशाहीच्या गरजेमुळे लागलेले आहेत. इंटरनेट हा त्याला अपवाद नाही. पन्नासच्या दशकात शीतयुद्धाच्या इरीशिरीत जे काही चांगले(पण) घडले त्यात सोव्हीएटने स्फुटनिक सोडला, त्यामुळे अमेरिकेस खडबडून जाग आली. त्यातून अनेक गोष्टी होत असताना साठच्या दशकाच्या सुरवातीस प्राध्यापक क्लेनरॉक यांनी लष्करीसंशोधनाचा भाग म्हणून एक जाळ्यांचे तंत्रज्ञान (नेटवर्क टेक्नॉलॉजी) कागदावर तयार केली. त्याचेच प्रत्यक्ष रूप हे २९ ऑक्टोबर १९६९ला दिसले. अर्थात त्यानंतर इ-मेल येयला १९७२ उजाडले. पहीली इमेल करणारा आणि पाठवणारा रे टॉमलिन्सन याच्या कळफळकावर @ ही संज्ञा उपल्ब्ध होती म्हणून त्याने ती वापरली आणि इमेल अ‍ॅड्रेस तयार झाला...

अर्थात अनेक लष्करी शोधांचे रुपांतर नंतर शांतीमय जीवनासाठीपण होऊ शकते. इंटरनेट हे केवळ शांतीमय जीवनालाच उपयुक्त आहे असे कोणीच म्हणणार नाही, पण आज त्याच्याच मुळे ज्ञानगंगा ही माहीतीच्या रूपाने का होईना सर्वत्र पसरली आहे. लोकशिक्षणापासून ते आपत्कालीन परीस्थितीत लोकसंपर्कापर्यंत, रस्तावर दिशा मिळवायला मदत घेण्यापासून ते वैद्यकीय उपचारांना दिशा देण्यापर्यंत, फोनपासून ते टिव्हीपर्यंत, तसेच समाजकारणापासून ते उद्योगधंदे तसेच राजकारणापर्यंत पसरलेले हे जाळे "हृदयी न ठावला ब्रम्हाकारे" असे झाले आहे. अर्थात तसे जनसामान्यांपर्यंत पोच्ण्याचे जे श्रेय आहे हे राजकीय विरोधक असूनही न्यूट गिन्ग्रीच मनमोकळे पणे देतात ते तत्कालीन काँग्रेसमन आणि नंतरचे उपराष्ट्राध्यक्ष, नोबेल विजेते अ‍ॅल गोअर ना. गोअर यांच्या वाक्याचा असंबद्ध संदर्भ लावून त्यांचे राजकीय हसे बुश विरुद्धच्या निवडणूकीत झाले खरे, पण १९७८ साली काँग्रेसमधे असताना अतीजलद दूरसंचार तंत्रज्ञानाचा उपयोग उद्योगधंद्यांची अर्थव्यवस्था तसेच शिक्षणप्रसाराला होवू शकतो असे म्हणत गोअर यांनी सुरवात केली आणि १९९१ साली सिनेटमधे असताना "गोअर बिल" आणले, संमत करून घेतले आणि तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बूश यांनी ते सही करताना, यामुळे अर्थव्यवस्थेत अमुलाग्र बदल होणार आणि आंतराष्ट्रीय बाजारपेठा जवळ येणार असे म्हणले आणि तत्कालीन $६०० मिलीयन डॉल्सर्सनी पहीलीवहीले राष्ट्रीय जाळे (National Research and Education Network ) तयार करायला सुरवात केली...

आज आपण सर्वच त्याची फळे चाखत आहोत. गाडीतून एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी आलो तर जसे त्यात आपले कर्तुत्व नसते, असले तर फार तर ती गाडी पकडली इतकेच काय ते... तेच कधी कधी इंटरनेटच्या संदर्भात वाटते. आज जगभर अनेक उद्योग नभुतो मोठे झालेत, बिल गेट्स पासून अनेक स्मार्ट धंदेवाईक तयार झालेत, स्टिव्ह जॉब्ज आणि नंतर गुगलने तर जगाला अजूनच पुढे नेले आणि जवळ आणले. ओपनसोअर्स सॉफ्टवेअर्समुळे जाळे स्वस्तही झाले आणि ड्रूपलसारख्या तंत्रज्ञानाने तसेच गमभनसाराख्या प्रणालीने आपण एरव्ही कधी संपर्कात आलो नसतो ते जालाच्या माध्यमातून जवळ आलो. मात्र या अनादी नाही, तरी अनंत प्रवासाच्या एक "औपचारीक" सुरवात ही केवळ "लॉगईन" या एका शब्दाने झाली...

आजची अवस्था बघता हे तंत्रज्ञान उत्तरोत्तर विकसीत होत राहील पण लॉगईन ने आत शिरलेल्या या अलीबाबाच्या गुहेतून आपण मानवी संस्कृती म्हणून किमान नजिकच्या भविष्यात तरी "लॉग आउट" होऊ शकू असे वाटत नाही!

-----

(हा विषय आणि संदर्भ विशेष असल्याने दोन आवडत्या संकेतस्थळांवर प्रकाशीत करत आहे.)

Comments

ह्म्म्म्

लेख आवडला. अलिकडेच देवनागरीत आता पत्ते लिहिता येणार असे वाचले आणि असेच काहीसे विचार मनात आले.






देवनागरी पत्ते

डॉट इन ऐवजी आता डॉट भारत होणार असल्याने अक्षरे वाढली डोमेन नेमसर्वर ला काही फरक पडणार नाही पण टंकणार्‍याला फरक पडेल.
उत्तम आढावा
प्रकाश घाटपांडे

नाही हो.

अहो पण आता पूर्ण डोमेन नेमच मराठीमध्ये घेता येईल त्याचे काय?
त्यामुळे सरकारी स्थळांसाठी जरी भारत म्हणावे लागले तरी प्रत्यक्षात भा म्हंटले तरी चालेले अशी सोय नक्केच करत येईल.

बाकी संकेतस्थळांची मराठी नावे कशी वापरली जातील या विषयी मात्र कुतुहल आहे.
कारण तुम्हाला अजूनही 'कोणताही न्याहाळक' सरळ संकेतस्थळाचे नाव त्या पत्त्याच्या खिडकीत टंकू देत नाही.
गमभन चे फायरफॉक्स जोडणी वापरूनही 'तेथे' पत्ता टंकता येत नाही हे ध्यात घ्या.

म्हणजे आता ऑपरेटींग सिस्टीमची 'सहजतेने मराठी टंकन सुवीधा' देण्याची गरज झाली आहे.
विकासराव या गरजे वरकाही उपाय आहे का?

मराठी आय एक इ हा उपाय कसा आह्रे या विषयी मात्र काही कल्पना नाही. अजून वापरून पाहिले नाहीये.
तसेच लायनक्स किंवा तत्सम सिस्टीम्स चे काम कसे चालते यावरही चर्चा व्हावी.

आपला
गुंडोपंत कुतुहल

नवीनच

ही बातमी माझ्यासाठी नवीनच होती. पण आता वाचल्याप्रमाणे .भारत हे ३० ऑक्टोबरपासून (आजपासून?) उपलब्ध होणार आहे. लॅटीन/रोमन लिपी व्यतिरीक्त प्रथमच वेगळ्या भाषेत (हिंदी आणि मराठीत) हे उपलब्ध होत आहे!

हते तर होतेच

लॅटीन/रोमन लिपी व्यतिरीक्त प्रथमच वेगळ्या भाषेत (हिंदी आणि मराठीत) हे उपलब्ध होत आहे!

नाही हो. हे तर जुनेच आहे. कारण तुम्ही मराठी विकिवर एखादा लेख पाहिलात तर तेथे मराठी अक्षरे यु आर एल मधे दिसतातच. यात काही नवे नाही.
नवे हे आहे की, आता या स्थळांचे शेवट रोमन अथवा लॅटीन अक्षरांनी होणार नाहीत म्हणजे पुर्णपणे मराठी वापरात येईल.

म्हणजे उपक्रम.org असे न घेता उपक्रम.मराठी असेही घेता येईल.

प्रश्न हा आहे की भारतात कुणा दयाळू सॉफ्टवेयर चोराच्या कृपेने जास्त मासॉ वापरले जाते. (अर्थात दुसरा पर्याय आहे कुठे म्हणा?
)

आणि मासॉ च्या कोणत्याही सिस्टीम अजून कोणतीही जोडणी न करता 'सरळ' मराठीत टंकन करू देत नाहीत. हा खरा अडथळा आहे. शिवाय मराठी संगणक कळफलकही अजून मला दिसले नाहीत.
हे यावेत!

ज्या दिवशी हे 'सहजतेने' होईल तेंव्हा मराठी आंतरजालावर खुली होईल.

आपला
गुंडोपंत

पंत, बरह चा उपयोग करावा!

पंत, बरह चा उपयोग करावा!

आणि मासॉ च्या कोणत्याही सिस्टीम अजून कोणतीही जोडणी न करता 'सरळ' मराठीत टंकन करू देत नाहीत. हा खरा अडथळा आहे. शिवाय मराठी संगणक कळफलकही अजून मला दिसले नाहीत.

नमस्कार पंत, बरह नामक एक बहुभाषी-टंकनप्रक्रिया-सुलभीकरण-प्रणाली आहे, त्याचा वापर करावा. त्याने आपणांस सरळ मराठीत सरल टंकन करणे सहजशक्य होईल. तसेच आपणांस इतर भाषांमधून टंकणे असल्यास तेही सहजशक्य होईल. मी स्वतः बरह उपयोग करतो. (कन्नड शब्द 'बरह', त्याचा मराठी अर्थ 'लिहिणे' असा.)

अवांतरः गमभन मध्ये तेलुगु, मलयाळम् तथा तमिळभाषेत अचूक कसे काय टंकावयाचे हे कोडे मला अद्यापपावेतो उलगडलेले नाही. बाङ्लाभाषेत टंकताना अक्षरे फार छोटी दिसतांत. उर्दुभाषेत टंकताना मात्र गमभन छान आहे. तरीही गमभन वर टंकलेले उर्दु दुसरीकडे चिकटवतांना (चिटकवतांना?) अक्षरे उलटीपालटी होतात, त्याची काळजी घ्यावी लागते.

लेटिन् अथवा रोमन् लिपींची इंद्रनेत्रावरील मक्तेदारी संपुष्टात येते आहे हे पाहून थोडासा नॉस्टल्जिक् झालो! परंतु भारतीय भाषांमधून अभिव्यक्ती करणे सोपे होते आहे हे काय कमी नाही!

असो!

धन्यवाद!

ஐயோ! ஐயையோ!
ഹൈയോ! ഹൈയൈയോ!
హైయో! హైయైయో!
ಹೈಯೋ! ಹೈಯೈಯೋ!
हैयॊ! हैयैयॊ!
હૈયો! હૈયૈયો!
ਹੈਯੋ! ਹੈਯੈਯੋ!
হৈয়ো! হৈয়ৈয়ো!
ହୈଯୋ! ହୈଯୈଯୋ! उडियामध्ये टंकतांना कानेमात्रेमध्ये काही उलटीपालटी गडबड झालेली आहे, ती गमभन आणि बरहा दोन्हीहीमध्ये होते.
හෛයෝ! හෛයෛයෝ!

--
तमिळ्नाट्लेर्न्दु डैर्रक्टा मराट्टिदेडत्तुक्कु वंदु सेट्लान ओरु चिन्नमनिदनिन एळुत्तु यिदु!

हैयो हैयैयो!

पण

आपला उपाय छान आहे. मी तसेच करेन.

पण प्रश्न सगळ्याच लोकांना सहजतेने आहे त्या ऑपरेटींग सिस्टीम द्वारेच
आपापल्या स्थळावर जाता यावे हे सर्वात सोपे नाही का?
मग ती सोय होणे आवश्यक आहे असे माझे म्हणणे आहे. ही सोय जर इंग्रजी तसेच चीनी भाषे साठी आहे तर मग भारतीय भाषांसाठी का नको?
इथे आपली सरकारी धोरणे आणि त्यांची या कंपन्याना वाकवण्याची क्षमता कमी पडते असे वाटते.

बरह चा उच्चार सांगितल्याबद्दल आभार. मी त्यास बरहा म्हणत असे.
गमभन अजून हळू हळू सुधारत् जाईलच. ज्या कोणत्या तरी टेक्स्ट ऍडिटर वापरून गमभन बनवले आहे तसेच कुणीतरी गमभन वापरून् पुढचे काही प्रगत प्रत बनवेल.
(हो गमभन चा साचा एका फुकट मिळणार्‍या एडिटरवर आधारीत आहे. पुढे फक्त अक्षरे कशी उमटावीत हे सांगण्याचे काम गमभन करत असावे अशी माझी समजूत आहे.)
आपला
गुंडोपंत

होय.

होय.

बरह चा उच्चार सांगितल्याबद्दल आभार. मी त्यास बरहा म्हणत असे.

धन्यवाद. मीही पूर्वी गमभनस गमाभाना म्हणत असे. (सरिगामा सारखे). गमभन ह्या नांवामागील कोडे एका मित्राने कळविल्यावर उलगडले. असो.

पण प्रश्न सगळ्याच लोकांना सहजतेने आहे त्या ऑपरेटींग सिस्टीम द्वारेच
आपापल्या स्थळावर जाता यावे हे सर्वात सोपे नाही का?
मग ती सोय होणे आवश्यक आहे असे माझे म्हणणे आहे. ही सोय जर इंग्रजी तसेच चीनी भाषे साठी आहे तर मग भारतीय भाषांसाठी का नको?
इथे आपली सरकारी धोरणे आणि त्यांची या कंपन्याना वाकवण्याची क्षमता कमी पडते असे वाटते.

सरकारी धोरणे - त्यांना वाकविण्यासाठी प्रथम आपण सरकारास वाकविणे शिकलो पाहिजे! ;-)

--
तमिळ्नाट्लेर्न्दु डैर्रक्टा मराट्टिदेडत्तुक्कु वंदु सेट्लान ओरु चिन्नमनिदनिन एळुत्तु यिदु!

हैयो हैयैयो!

बरोबर का?

माझ्या मते http://mr.upakram.org या ऐवजी //मराठी.उपक्रम.संस्था असा यु.आर.एल् बनविता येईल. बरोबर ना?
http चे काय होणार?

ऋषिकेश
------------------
भ्रष्टाचार संपविण्याचा सर्वोत्तम आणि सर्वात सोपा(?) उपाय म्हणजे त्यात स्वतः सहभागी न होणे

हट्टप

हट्टप

http चे काय होणार?

हट्टप//मराठी.उपक्रम.संस्था

हट्टी अभ्यासकांची मराठीतून परिक्षा घेण्याचा उपक्रम राबविणारी संस्था ;-)

--
तमिळ्नाट्लेर्न्दु डैर्रक्टा मराट्टिदेडत्तुक्कु वंदु सेट्लान ओरु चिन्नमनिदनिन एळुत्तु यिदु!

हैयो हैयैयो!

 
^ वर