गार्गी अजून जिवंत आहे...

आज अचानक मंगला आठलेकर यांचं "गार्गी अजून जिवंत आहे" हे पुस्तक हातात पडलं. जन्मतारीख वगैरे नसणार्‍या काळात साधारण १९१४-१५ च्या सुमारास उत्तरप्रदेशात इलाहाबादला जन्मलेल्या गुलाबबाईची ही कहाणी. सातव्या वर्षी लग्न होऊन दहाव्या वर्षी मुलाला जन्म दिलेल्या ह्या गुलाबबाईने इतक्या जुन्या काळात इलाहाबाद-प्रयागसारख्या कट्टर धार्मिक परंपरा असलेल्या शहरात अंत्यसंस्काराच्या कामाला वयाच्या अकराव्या वर्षी सुरवात करून तिने "स्त्रियांनी स्मशानपौरोहित्य का करू नये?" असा प्रश्न तत्कालीन धर्ममार्तंडांना केला होता. ह्या स्त्रीबाबत लेखिका एक दोन पानी लेख वाचते आणि त्या स्त्रीला भेटायचंच या विचाराने तिचा शोध घेते. तिला शोधल्यावर तिच्या कडून, इतरांकडून ऐकलेल्या गुलाबबाई उर्फ अम्मा हे चरित्र - कहाणी व त्यावरील लेखिकेचे ससंदर्भ भाष्य म्हणजे हे पुस्तक "गार्गी अजून जिवंत आहे".

पुस्तक सुरवातीपासूनच पकड घेतं आणि आपल्याला आताही असलेल्या कर्मठ हिंदू समाजाचं दर्शन होऊ लागतं. गुलाबबाईला शोधत असताना लेखिका आधी वाराणसीला जाते. तिथे अशी स्त्री आहे हेच मान्य करणं सोडा, स्त्री ह्या कामात असु शकते ही शक्यताच धुडकावली जाते, तेही आजच्या काळात तेव्हाच लेखिका जेव्हा गुलाबबाईला भेटेल तेव्हा तिची कहाणी कशी असेल याचा अंदाज येऊ लागतो.

अत्यंत गरीब घरात जन्मलेल्या गुलाबबाईची ही कथा, तिच्या शेजारच्या घरात तिने पाहिलेल्या स्त्रीभृणहत्येवरून सुरू होते. मुलगी झाली की तिला माठात लिंपून कोंडून मारून टाकायचे ही त्या काळचा समाजमान्य रीत. त्या मुलीच्या आईच्या इच्छेचा प्रश्नच नसायचा . अशात पहिली मुलगी असूनही बापाने जिवंत ठेवायला परवानगी दिलेली ही मुलगी. बाकी घरात तिच्या पाठीमागचे आठ भाऊ. वडील दारागंज घाटावर "महापात्र" म्हणजेच अंत्यविधी करणार्‍या पंड्यांचे प्रमुख होते. त्याच्याबरोबर जाणार्‍या चिमुकल्या गुलाबचेही मंत्र तोंडपाठ होते. पुढे सातव्या वर्षी लग्न झाले व दहाव्या वर्षी मूल. सासरी सतत जाच. त्यामुळे गुलाब एका खोलीत कोंडून घेऊन व्यायाम करीत असे व तिने चक्क शरीर कमावले होते. तिला पुढे मुलगा झाल्याने त्याला मारण्याचा प्रश्न नव्हता मात्र तेव्हाच गुलाबचे वडील वारले. आता तिच्या माहेरी फक्त गरिबी होती. अश्या वेळी माहेर व सासरची गरिबी व नाकर्त्या नवर्‍याकडे पाहून तिने एक निर्णय घेतला तो अंत्यविधी करून माहेरच्यांचे व घरच्यांचेही पोट भरण्याचा.

या कामाला सुरवात करताना तिला सामना कराव्या लागलेल्या प्रश्नांना लेखिकेने चित्रदर्शी शैलीत मांडले आहे. गुलाबला सासरीच काय पण माहेरीही प्रचंड विरोध झाला. ह्या आयुष्यभर झगडण्यात घालवणार्‍या स्त्रीने जेव्हा आपली शेती आपल्याच नोकराकडून मिळवण्याचे ठरविले तो प्रसंग मांडताना लेखिका गुलाबच्या भूमिकेत शिरून लिहिते "मी शेतावर पोचले तेव्हा बैलांच्या साहाय्यानं नांगरणी चालू होती. मी जाऊन सरळ उभी राहिले ती बैलांच्या समोर. दोन्ही हातांनी तो नांगर रेटून धरला. बैल थांबले. त्या नोकराला काय करावं ते कळेना. बाईसमोर हार कशी पत्करणार म्हणून तो चेवाने बैलांवर आसूड उगारणार इतक्यात मी आसूड मधेच अडवला व खेचून घेतला. आणि त्याच्याच पाठीवर तोच आसूड सपासप चालवू लागले"

gargi

हे पुस्तक ह्या असामान्य स्त्रीच्या कथेबरोबरचे ऋग्वेदाकालीन स्त्रीचं स्थान कसं होतं याचाही शोध घ्यायचा प्रयत्न करते. आणि दाखवून देतं की विविध ऋचा, श्लोक हेच दाखवतात की स्त्रियांना मानाचं स्थान तर होतंच पण अगदी अंत्यविधीमध्येही स्त्रियांचा विधीवत् सहभाग असे. इतकंच काय विधवा पुनर्विवाहास देखील मान्यता होती हे. पुढे मनुस्मृतीत मात्र स्त्रियांकडून हे सारं हिरावलेलं दिसतं. एक काळ तो होता जेव्हा स्त्रियांना समान वागणूक हाच धर्म होता व आता एक काळ असा आहे की स्त्री घरातून बाहेर पडण्यासाठी-स्वातंत्र्यासाठी पुरुषाच्या मर्जीवर अवलंबून आहे हा सामाजिक र्‍हास लेखिका ठळकपणे अधोरेखित करण्यात यशस्वी झाली आहे.याशिवाय लेखिका एकदा दारागंज घाटावर जाते जिथे अम्माचे वडील महापात्र होते. तिथे अजूनही स्त्रियांनी हे विधी करणे निषिद्धच मानले जाते. तिथे तेथील पंड्यांची मते वाचून मती कुंठित होते.

मला ह्या पुस्तकातील सर्वात काही आवडलं असेल तर गुलाबबाईचं स्वातंत्र्याचं तत्त्वज्ञान. तुम्ही इतर स्त्रियांना बळ देण्यासाठी काय करता ह्या प्रश्नांवर गुलाबबाईचं उत्तर मार्मिक तर आहेच पण अतिशय चिंतनीय आहे. ती लेखिकेलाच प्रतिप्रश्न विचारते "आजूबाजूच्या स्त्रियांसाठी मी काय करायला हवं होतं असं तुला वाटतं? माझ्यासाठी कुणी काय केलं? मला वडिलांनी स्वातंत्र्य दिलं म्हणशील तर ते माझ्या बहिणींनाही होतंच की! त्यांनी काय केलं त्या स्वातंत्र्याचं? तेव्हा मुळात असं कुणासाठी काही करून कुणी स्वतंत्र होत नसतो. आणि झालाच स्वतंत्र तरी ते स्वातंत्र्य त्याला वापरता येत नाही. कारण बेड्या गळून पडल्या तरी त्या हातापायांचं काय करायचं हेच त्यांना ठाऊक नसतं. मला काय हवंय, आयुष्यात काय करायचंय हे निश्चित झालं की ते मिळविण्यासाठी त्याची आतूनच एक जबरदस्त आस निर्माण होते. हेच स्वातंत्र्य! ते स्वतःलाच मिळवता येतं"
एकही इयत्ता न शिकलेल्या ह्या स्त्रीचं हे तत्त्वज्ञान वाचून लेखिकेइतकेच आपणही विस्मयचकित आणि निरुत्तर होतो हेच खरं.

सार्‍या ब्रह्मवृंदासमोर याज्ञवल्कल्याच्या बुद्धिमत्तेला आव्हान देणार्‍या गार्गीचा आता नसली तरी तिथे इलाहाबादच्या मुख्य घाटांवर काम करताना अगदी जिवावर उठलेल्या पंड्यांविरूद्ध दंड थोपटून स्वतःचा घाट बांधणार्‍या ह्या अम्माची कहाणी वाचली की वाचकाला लेखिके इतकीच "गार्गी अजून जिवंत आहे" ची खात्री पटते. थोडक्यात काय तर गुलाबबाई आपले प्रश्न कसे सोडवले हे मांडताना लेखिका नकळत आपल्या मनात त्याहून बरेच मोठे आणि अस्वस्थ करणारे प्रश्न सोडण्यात यश मिळवते. आणि स्वतःला हे न पडणारे प्रश्न पाडून घेण्यासाठी तरी हे पुस्तक मिळताच वाचा अशी शिफारस!

पुस्तक: गार्गी अजून जिवंत आहे
लेखिका: मंगला आठलेकर
प्रकाशक: राजहंस प्रकाशन, पुणे
दुसर्‍या आवृत्तीतील पृष्ठे: ११६
दुसर्‍या आवृत्तीची किंमतः रु. ७०/-

Comments

उत्तम

पुस्तकपरिचय. भ्रूणहत्येतून वाचलेल्या एका स्त्रीने मोठेपणी जिवंत राहण्यासाठी अंत्यसंस्कारांचा समाजाला झुगारून आश्रय घ्यावा यातले विरोधाभास आजही अशी स्त्री असल्याचेच नाकबूल केले जाते ह्या सत्यापुढे फिके पडतात. स्वातंत्र्याबद्दलच्या तिच्या विचारांची प्रगल्भता बहिणाबाईंच्या काव्याची आठवण करून देणारी - अशिक्षित असल्या तरी जगताना जे जे शिकायला मिळायला त्याची अशा थेट वाक्यात मांडणी करण्याची क्षमता हा समान धागा.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

धर्माचा दुष्परिणाम

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.ऋषीकेश यांनी पुस्तकाचा उत्तम परिचय करून दिला आहे. त्यात त्यांची कळकळही प्रत्ययास येते.पुस्तक वाचनाची उत्सुकता वाढते.हे पुस्तक वाचणारच आहे.
श्री.ऋषीकेश लिहितातः..."हे पुस्तक ह्या असामान्य स्त्रीच्या कथेबरोबरच ऋग्वेदकालीन स्त्रीचं स्थान कसं होतं याचाही शोध घ्यायचा प्रयत्न करते........ विधवा पुनर्विवाहास देखील मान्यता होती. पुढे मनुस्मृतीत मात्र स्त्रियांकडून हे सारं हिरावलेलं दिसतं. एक काळ होता जेव्हा स्त्रियांना समान वागणूक हाच धर्म होता...."
... हे खरे आहे. कारण त्याकाळी धर्म प्रस्थापित झाला नव्हता.यज्ञसंस्था होती. इंद्रवरुणादि देवतांच्या प्रार्थना करीत. पण देवपूजेचे स्तोम नव्हते. व्रतवैकल्ये नव्हती.धर्माज्ञा, धार्मिक विधिनिषेधाज्ञा नव्हत्या.पुराणांतील भाकडकथा नव्हत्या.चातुर्वर्ण्य नव्हते. त्यामुळे मानवी समानता होती.सनातनधर्म प्रतिष्ठित झाल्यावर स्त्रियांना गौणत्व आले. पुरुषप्रधानता आली. (विरोधाभास असा की त्या धर्माचे आणि व्रतवैकल्यांचे स्त्रियाच अधिक निष्ठेने पालन करतात .समर्थनही करतात.खरेतर या धर्मग्रंथांतील एकही ओळ लिहिण्यात आमचा सहभाग नाही असे त्या अभिमानाने सांगू शकतील.)

ऋग्वेदकाळी चातुर्वर्ण्य होता

हे खालील ऋचेवरून दिसते. वर्णांच्या स्थानावरून असमानताही दिसते.

"ब्राह्मणो अस्य मुखमासीत|
बाहु: राजन्य कृतः|
उरू तदस्य यद्वैश्यः|
पद्भ्यां शूद्रो अजायत||" पुरुषसूक्त १३ वी ऋचा

विनायक

(अवांतर - विकीवर असलेल्या रोमन लिपीतील ऋचेवरून देवनागरीत रूपांतर केले आहे. तांत्रिक चुका होणे शक्य आहे.)

चातुर्वर्ण्य

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
पुरुषसूक्त हे ऋग्वेदात आहे. श्री.विनायक यांनी उद्धृत केलेल्या ऋचेत चारही वर्णांचा उल्लेख स्पष्ट आहे.हे सर्व खरे.पण चातुर्वर्ण्यावर आधारित समाजरचना इ.स.पू.३०० च्या सुमारास अस्तित्वात आली असे वाचल्याचे स्मरते. तसे खरेच आहे काय?माझा तरी तसाच समज आहे.ऋग्वेदाचा काळ त्याहून बराच प्राचीन आहे. मग ऋग्वेदात ही ऋचा कशी आली?
एक शक्यता अशी: पुरुषसूक्त हे फार प्रसिद्ध आहे. पूर्वी अनेक धार्मिक प्रसंगी ते म्हटले जात असे. सध्या अनेक कार्यक्रमांच्या शेवटी पसायदान म्हटले जाते त्याप्रमाणे.
चातुर्वर्ण्य समाजरचनेला वेदाचा आधार आहे असे दाखवण्यासाठी ही ऋचा पुरुषसूक्तात प्रक्षिप्त केली(घुसडली) असावी काय?.पसायदानातही:"आणि ग्रंथोपजीविये|विशेषे लोकी इये|दृष्टादृष्ट विजये होवावे जी|" ही ओवी प्रक्षिप्त वाटते.

प्रक्षिप्त -असहमत

हे खरे आहे. कारण त्याकाळी धर्म प्रस्थापित झाला नव्हता.यज्ञसंस्था होती. इंद्रवरुणादि देवतांच्या प्रार्थना करीत. पण देवपूजेचे स्तोम नव्हते. व्रतवैकल्ये नव्हती.धर्माज्ञा, धार्मिक विधिनिषेधाज्ञा नव्हत्या.पुराणांतील भाकडकथा नव्हत्या.चातुर्वर्ण्य नव्हते. त्यामुळे मानवी समानता होती.सनातनधर्म प्रतिष्ठित झाल्यावर स्त्रियांना गौणत्व आले. पुरुषप्रधानता आली.

वैदिक काळी सर्व काही आदर्श होते आणि त्यानंतर पुराणे, स्मृती वगैरेंमुळे वाईट गोष्टी वैदिक धर्मात घुसल्या हा युक्तिवाद दयानंद सरस्वती आणि त्यांचे आर्यसमाजी अनुयायी करायचे. वेदांमध्ये चातुर्वर्ण्य नाही हाही युक्तिवाद त्यांचाच. त्याला उत्तर म्हणून काही जुन्या वैदिकांनी पुरूषसूक्तातली वरील ऋचा उद्धृत केल्यावर ती प्रक्षिप्त आहे असा युक्तिवाद आर्यसमाजी लोक करत. त्यावेळी एक विचारवंत श्री. अप्रबुद्ध (श्री. पाळेकर असे काहीसे त्यांचे नाव होते) यांनी युक्तिवाद केला होता की प्रक्षिप्त काय आहे ते कसे ठरवायचे त्याचे नियम आहेत. त्याची उदाहरणेही त्यांनी दिली होती, आता इतक्या वर्षांनंतर मला नीट आठवत नाहीत तरीपण एखादी रचना अनुष्टुभ् छंदात आहे असे लिहिले असेल आणि एखादा श्लोक अनुष्टुभ् छंदात नसेल तर तो प्रक्षिप्त असे समजावा काहीसे लिहिलेले वाचले होते. (यात चूकभूल देणेघेणे)

मला सहज सुचणारे एक उदाहरण सांगतो. ज्ञानेश्वरीची रचना इ. स. १२९० मध्ये झाली आणि महाराष्ट्रात मुसलमानी आक्रमण इ. स. १२९७ च्या सुमारास झाले. त्यामुळे ज्ञानेश्वरीत परकीय शब्द नाहीत. उद्या एखाद्या प्रतीमध्ये बाजार, कायदा, मुक्काम, बाग, वजन असे शब्द असलेल्या ओव्या आढळल्या तर त्या नक्कीच प्रक्षिप्त म्हणजे घुसडलेल्या समजाव्यात.

"वैदिक काळातल्या समाजाच्या आदर्शांच्या कल्पना १९- २० व्या शतकातल्या आदर्शातल्या कल्पनांशी जुळायलाच हव्यात, तशा जुळत नसतील तर जिथे जुळत नाहीत तो वेदांचा भाग प्रक्षिप्त (घुसडलेला) आहे असे म्हणणे योग्य नाही आणि उद्या समाजाच्या आदर्शांच्या कल्पना बदलल्या तर 'ब्राह्मणो अस्य..' मूळ ठरून दुसर्‍या ऋचा प्रक्षिप्त ठरतील" हा अप्रबुद्धांचा युक्तिवाद होता.

थोडक्यात स्वतःच्या मताच्या सोयीनुसार प्रक्षिप्त - ग्राह्य ठरवणे हे योग्य नसल्याचे श्री. अप्रबुद्ध यांचे मत होते आणि मी त्याच्याशी अगदी सहमत आहे.

विनायक

सहमत

वेदातील वर्णसंस्थांचे विवेचन डॉ. चिं. ग. काशीकर यांनी त्यांच्या 'वैदिक संस्कृतीचे पैलू' या पुस्तकात केले आहे. त्यांनी या ऋचा प्रक्षिप्त असल्याचे म्हटलेले नाही.

---
"भाई बनना है तेरेको?" -- भिकू म्हात्रे

खरे आहे

मीही असेच वाचले आहे. ऋग्वेदात, विशेषतः १०व्या मंडलात, बऱ्याच ऋचा घुसडल्या आहेत. १०व्या मंडलातली संस्कृत वेगळी आहे. ऋग्वेदकालीन संस्कृत नाही असे म्हणतात.

पटता तो टेक. नहीं तो रामटेक.

भाषा वेगळी आहे - सहमत, "प्रक्षिप्त"बाबत व्याख्येचा फरक

पहिल्या आणि दहाव्या मंडलातली भाषा ही त्यातल्या त्यात अधिक "नवी" आहे. ("नवी" म्हणजे पुढे वापरल्या गेलेल्या पाणिनीय संस्कृताच्या अधिक जवळ जाणारी.) संदर्भ : म. म. का. वा. अभ्यंकरांची व्याकरणमहाभाष्यासाठी प्रस्तावना.

वैदिक सूक्ते/ऋचा या हजारो (किंवा शेकडो) वर्षांच्या कालावधीत संकलित केल्या असाव्यात. त्यामुळे उत्तरोत्तर काळात सूक्ते जोडली गेली. कुठल्याही लांब काळाच्या संकलनामध्ये "प्रक्षिप्त" शब्दाची व्याख्या कठिण आहे.

(संदर्भ बघावा लागेल, तोवर अर्धवट स्मृतीवरून :) शाकल्याने त्याच्या परंपरेच्या त्याच्या काळातल्या सूक्तांचे संकलन केले. संकलनातल्या मंत्रपाठातील अक्षरे वगैरेंची संख्या मोजून हिशोब केला गेला. शाकल्याच्यापेक्षा वेगळी संकलनेही होती, पण ती नामशेष झाली आहेत. म्हणून शाकल्याचे संकलन हल्ली सर्वमान्य आहे.

(वेगवेगळ्या परंपरांमधे फरक असावा, आणि तिखट वादविवाद असावा. नामशेष झालेल्या 'बाष्कल' शाखेचे नाव आता मराठीत निंदा म्हणून वापरले जाते! त्या अर्थी एका संकलनात असलेली सूक्ते दुसर्‍या परंपरेतले लोक "प्रक्षिप्त" मानत असतीलही.)

या संकलनाबद्दल मात्र "प्रक्षिप्त" वगैरे शब्दांची व्याख्या सोपी आहे. (कारण अक्षरांचा हिशोब "ताळेबंद" असा केला आहे जणू.) या संकलनानंतर कुठली सूक्ते आलीत तर अक्षरांचा हिशोब बिघडेल. किंवा या संकलनाच्या वेगवेगळ्या प्रती आहेत, त्यांच्यात फरक आढळला, तर प्रती-प्रतीमध्ये काही "प्रक्षेप" झाल्याचे आपण म्हणू शकतो. पण हे फार कमी.

पुरुषसूक्त हे शाकल्याने शाकल्याने संकलित केलेल्या संहितेत बहुधा प्रक्षिप्त नाही. पण बाकीच्या ऋग्वेदीय सूक्तांपेक्षा हे सूक्त नवीन आहे खास.

त्यामुळे वाटल्यास "शाकल्याने ताळा लावण्यापूर्वी बदलणार्‍या समाजाची भाषा आणि धर्मसमाज वेगवेगळ्या सूक्तांमध्ये दिसतात" असे म्हणता येते.

पुरुषसूक्तावेगळा चातुर्वर्ण्याचा उल्लेख ऋग्वेदसंहितेत नाही, असे वाचले आहे. फार पूर्वीच्या वैदिक भाषेतल्या काळात आणि सूक्तांत चातुर्वर्ण्याचा उल्लेख नाही, तर सर्वात अर्वाचीन वैदिक भाषेतल्या सूक्तांत चातुर्वर्ण्याचा हा एक(च) उल्लेख आहे.

यावरून ज्याला आपण "वैदिक" म्हणतो, त्या प्रचंड कालखंडाच्या शेवटच्या खंडातच मंत्र रचणार्‍या ऋषींना चातुर्वर्ण्यसंस्था उल्लेखनीय वाटली, असे म्हणता येते.

परिचय आवडला

पुस्तक परिचय आवडला.

मुळात असं कुणासाठी काही करून कुणी स्वतंत्र होत नसतो. आणि झालाच स्वतंत्र तरी ते स्वातंत्र्य त्याला वापरता येत नाही. कारण बेड्या गळून पडल्या तरी त्या हातापायांचं काय करायचं हेच त्यांना ठाऊक नसतं. मला काय हवंय, आयुष्यात काय करायचंय हे निश्चित झालं की ते मिळविण्यासाठी त्याची आतूनच एक जबरदस्त आस निर्माण होते. हेच स्वातंत्र्य! ते स्वतःलाच मिळवता येतं.

हम्म! या थोड्याशा वाक्यात या बाईने अतिशय चिंतनीय मत व्यक्त केले आहे.

बाकी,

सनातनधर्म प्रतिष्ठित झाल्यावर स्त्रियांना गौणत्व आले. पुरुषप्रधानता आली.

यनावाला म्हणतात त्यात तथ्य आहे आणि नाहीही. सनातनधर्म प्रतिष्ठित व्ह्यायच्या आधीही स्त्रियांना गौणत्वच होते. पुरुषप्रधान संस्कृतीतर वैदिककाळापूर्वीपासूनच असावी असे वाटते. फरक फक्त एवढाच की या काळात स्त्रियांवर जाचक निर्बंध कमी होते कारण यना म्हणतात तसे धर्माज्ञा, धार्मिक विधिनिषेधाज्ञा नव्हत्या. सनातनधर्मासोबत हे गौणत्व अधिक दृढ झाले.

विरोधाभास असा की त्या धर्माचे आणि व्रतवैकल्यांचे स्त्रियाच अधिक निष्ठेने पालन करतात .समर्थनही करतात.खरेतर या धर्मग्रंथांतील एकही ओळ लिहिण्यात आमचा सहभाग नाही असे त्या अभिमानाने सांगू शकतील.

अगदी अगदी! :-)

अधिक वाचायला आवडेल...

विरोधाभास असा की त्या धर्माचे आणि व्रतवैकल्यांचे स्त्रियाच अधिक निष्ठेने पालन करतात .समर्थनही करतात.खरेतर या धर्मग्रंथांतील एकही ओळ लिहिण्यात आमचा सहभाग नाही असे त्या अभिमानाने सांगू शकतील.

अगदी अगदी! :-)

मीही बर्‍याच वेळा ऐकले आहे...कधी मधी टीव्हीवरच्या मालिकांतूनही पाहतो. खासकरून कलर्स चॅनेलवरच्या मालिका. बहुतेक ठिकाणी स्त्रियाच कर्मकांडे, प्रथा, शकुन-अपशकुन पाळण्यात किंवा घरातील इतर स्त्रियांना त्रास देण्यात मग्न असतात. मंगला आठल्येकरांरसारलख्या लेखिकांच किंवा उपक्रमींचं यावर काय मत आहे हे वाचायला आवडेल. हे असं दाखवतात यात कितपत तथ्य आहे. असल्यास असे का असावे?

अभिजित यादव
ता. कर्‍हाड जि. सातारा

स्त्रियांची परंपरानिष्ठता

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
जगातील सर्व धर्मांनी स्त्रियांना हीन लेखले.धर्माच्यानावे त्यांचा छळ केला.अपल्याकडे तर निरपराध स्त्रियांना जिवंतपणी जाळले. असे असूनही जगातील सर्व धर्माच्या स्त्रिया या पुरुषांपेक्षा अधिक धार्मिक,अधिक परंपराप्रिय आहेत.असे का?
..श्री.अभिजित यादव लिहितातः"..स्त्रियाच कर्मकांडे, प्रथा, ...पाळण्यात मग्न असतात. मंगला आठल्येकरांसारख्या लेखिकांचे यावर काय मत आहे हे वाचायला आवडेल. .."
..या प्रश्नावर R.Elizabeth Cornwell,PhD यांचा एक निबंध रिचर्ड डॉकिन्स . नेट या संकेतस्थळावर पूर्वी वाचल्याचे स्मरते.(मला तसा आवडला नाही.झुडूप झोडपणी फार आहे.) डार्विनी उत्क्रांतवादाला अनुसरून कारणमीमांसा केली आहे. काही मुद्दे सर्वस्वी नवीन आहेत.म्हणून निबंध अवश्य वाचावा. लेखिकेच्या नांवे गूगलशोध घेतल्यास सापडावा.

असेच

म्हणतो. परिचय आवडला.

---
"भाई बनना है तेरेको?" -- भिकू म्हात्रे

उत्तम परिचय

अत्यंत स्फूर्तिदायक चरित्र आहे. पुस्तक वाचावेसे वाटत आहे.

नाकर्त्या पुरुषांच्या बायकांनी थक्क करणारे प्रयत्न करून कुटुंबांचा चरितार्थ चालवल्याची स्फूर्तिदायक उदाहरणे आपल्याला आजही दिसतात. आमच्या घरी कामाला येणार्‍या बायकांपैकी अनेक स्त्रिया अशा स्वतंत्र धमकीच्या होत्या, म्हणून ही बाब अगदीच क्वचित-दिसणारी नसावी.

मला वाटते लेकरांचे प्रेम आणि जिवाचा आकांत असला तर आईच्या बाहूत समाजाशी झगडायची अगतिक ताकत येत असेल. पण जे गुलाब यांना जमले, ते त्यांच्या बहिणींना जमले नाही.

गुलाब यांची स्फूर्ती आपण घ्यावी. पण पुढे आपला समाज असा असावा, की तो कित्ता गिरवण्यासाठी गुलाब यांच्यासारखा असामान्य चिवटपणा आवश्यक होऊ नये. सामान्य स्त्रीला (किंवा कोणालाही) जर कुशलपणे एखादा व्यवसाय करता येत असेल, तर तो व्यवसाय करता यावा.

गार्गी जिवंत आहे! तिच्या तेजाने माझ्या-तुमच्याइतक्या सामान्य मुलामुलींनीही "जिवंत" व्हावे अशी शुभकामना (आणि प्रयत्न) करूया.

चांगला परिचय

श्री ऋषिकेश, एका चांगल्या पुस्तकाचा तितकाच चांगला परिचय करून दिल्याबद्दल धन्यवाद. गुलाबबाईंची कथा अत्यंत स्फुर्तीदायक आहे. गार्गीचा तसेच वैदीक कालाचा संदर्भ देण्याची गरज लेखिकेला का वाटली असावे हे थोडेफार लक्षात येत आहे.

पुस्तक परिचय

धन्यवाद, ऋषिकेश.

एका वेगळ्या पुस्तकाची माहिती मिळाली.

सुंदर.

छान परिचय करून दिला आहे पुस्तकाचा. नक्की विकत घेईन.
ते ७व्या वर्षी लग्न, १०व्या वर्षी मुलाचा जन्म, ११व्या वर्षी अंत्यसंस्काराचे काम वगैरे वाचून काय बोलावे हेच कळत नाही आहे...

पण

पुस्तकाचा विषय खुपच छान आहे यात वाद नाही.
पण मंगला आठलेकरांचे लेखन आणि त्याची मांडणी इतकी रटाळ आहे की विचारूच नका.
तुम्ही पुर्ण कंटाळलाच पाहिजे असे बनवलेले पुस्तक.

फार अगदीच काही वाचायला मिळत नसेल तरच वाचा असे म्हणेन.

आपला
गुंडोपंत

आभार

सर्व वाचकांचे व प्रतिसादकांचे आभार.

ऋषिकेश
------------------
भ्रष्टाचार संपविण्याचा सर्वोत्तम आणि सर्वात सोपा(?) उपाय म्हणजे त्यात स्वतः सहभागी न होणे

 
^ वर