ज्ञानेश्वर आणि शंकराचार्य

शंकराचार्यांच्या "ब्रह्म सत्य जगत् मिथ्या" या तत्त्वज्ञानाचा परिणाम अध्यात्मावर आणि भारतीय लोकांवर पडल्याने ते निष्क्रीय झाले अशी विचारसरणी एका लेखात व्यक्त झाली होती. त्यावर प्रतिसाद दिला आहेच. "ब्रह्म सत्य जगत् मिथ्या" ही विचारसरणी प्रमुख असली तरी सर्वमान्य किंवा बहुतांशी तत्त्वज्ञानी लोकांना मान्य होती अशी वस्तुस्थिती नाही. माझी ज्ञानेश्वरांच्या विचारांशी बर्‍यापैकी ओळख असल्याने त्यांचे विचार थोडक्यात सांगतो.

आधी शंकराचार्यांचे म्हणणे बघू. त्यांच्या मते जग ही माया आहे, आभास आहे, मिथ्या आहे. अ़़ज्ञानाने ब्रह्माला झाकल्याने हा मिथ्याभास होतो. याला विवर्तवाद असे नाव आहे. ज्ञानेश्वरांच्या मते जग आणि परमेश्वर दोन्ही सत्य आहेत. त्यांचा संबंध रत्न आणि त्याची प्रभा, सूर्य आणि त्याचे तेज या प्रकारचा आहे. त्यामुळे अ़ज्ञानरूपी जग ज्ञानरूपी ब्रह्माला झाकते हे बरोबर नाही. आता खालील ओव्या बघा

जालेनि जगें मी झाकें | तरी मग जगत्वे कोण फाके |
किळेवरी माणिक | लोपिजे काई || १२३||

अर्थ - जग झाल्याने मी झाकला जातो तर जगरूपाने कोण व्यक्त होते? रत्नाच्या प्रभेने रत्न झाकले जाते का?

अळंकाराते आले | तरी सोनेपण काई गेले |
की कमळ फाकले | कमळत्वा मुके || १२४||

फाकले = विकसित झाले

सांग पां धनंजया | अवयवी अवयविया |
आच्छादिजे कीं तया | तेंचि रूप|| १२५||

अर्थ - अवयवी (पुरुष) हा अवयवांनी झाकला जातो की अवयव तेच त्याचे रूप आहे?

कीं विरूढलेया जोंधळा | कणिसाचा निर्वाळा |
वेंचला की आगळा | दिसतसे || १२६||

अर्थ - जोंधळ्याचा पहिला कण पेरून त्याला अंकुर फुटून कणीस परिपक्व झाल्यावर तो पेरलेला दाणा नाहीसा झाला की पुष्कळ पटींनी वाढला?

म्हणोनि जग परौते | सारूनि पाहिजे माते |
तैसा नव्हे उखितें | आघवेचि मी || १२७ || अध्याय १४, ज्ञानेश्वरी

अर्थ - म्हणून जगाचा निरास करून मला पहावे, तसा मी नाही, तर सर्वांसकट मीच आहे. शंकराचार्यांच्या "ब्रह्म सत्य जगत् मिथ्या" याचे यापेक्षा स्पष्ट शब्दांत खंडन मी तरी दुसरीकडे कुठे वाचले नाही.

अमृतानुभवात तर या विचाराचे खंडन करणारे "अ़ज्ञानखंडन" हे जवळजवळ ३०० ओव्यांचे प्रकरण ज्ञानेश्वरांनी लिहिले आहे. त्यात पूर्वपक्ष - उत्तरपक्ष पद्धतीने या विचारांचे खंडन केले आहे. त्यातल्या अगदी निवडक ओव्या देतो.

प्रकाशु तो प्रकाशकी | यासी न वंचे घेई चुकी |
म्हणोनि जग असिकी | वस्तुप्रभा || २८९ ||

अर्थ - प्रकाश्य जगत् आणि प्रकाशक चैतन्य ही एकच आहेत, यात अन्यथा नाही. तू याला अ़ज्ञान म्हणतोस ही आपली चुकी पदरात घे आणि जग ही वस्तुप्रभा आहे असे म्हण (हे अ़़ज्ञाने आहे असे म्हणणार्‍यास उद्देशून म्हणतात)

विभाति यस्य भासा | सर्वामिदं हा ऐसा |
श्रुति काय वायसा | ढेकर देती || २९० ||

अर्थ - आत्म्याच्या प्रकाशाने हे सर्व त्रैलोक्य प्रकाशले जाते असे श्रुति व्यर्थच बडबडतात?

यालागी वस्तुप्रभा | वस्तुचि पावे शोभा |
जातसे लाभा | वस्तूसिची || २९१||

अर्थ - म्हणून नामरूपात्मक जगत्मिषाने एक ब्रह्मवस्तूच प्रकाशली आहे. तत्त्वतः जगत् काही नसून स्वयंप्रकाशाने ब्रह्मवस्तूच सुशोभित झाली आहे. म्हणून जगत्स्फुरणात ब्रह्मवस्तूचाच लाभ होतो.

वांचूनि वस्तु इया | आपणपे प्रकाशावया |
अ़ज्ञान हेतु वाया | अवघेचि || २९२ ||

अर्थ - ह्या ब्रह्मवस्तूला स्वतः दृश्य जगद्रूपाने प्रकाशावयाला अ़ज्ञान कारण आहे असे सर्व म्हणणे व्यर्थ आहे.

तर्कतीर्थांनी एका लेखात लिहिले होते " शंकराचार्यांचे अनुयायी स्वत:च्या सोयीसाठी उपनिषदे, गीता, ब्रह्मसूत्रे यांची ओढाताण करतात. त्यावर आमचा आक्षेप नाही. पण ज्ञानेश्वर हे शंकराचार्यांचेच तत्त्वज्ञान सांगतात हे सिद्ध करण्यासाठी ज्ञानेश्वरांच्या विचारांची ओढाताण करतात याला आमचा आक्षेप आहे. कारण असे करण्याने दोन पापे होतात असे ज्ञानेश्वर पुढील ओवीत सांगतात.

अखरीं तव गोवधु | पुढारा अनृत बाधु |
मा कैसा अ़़ज्ञान वादु | कीजे ज्ञानी || २७८ ||

अर्थ - गोवध केला नसता मी गोवध केला असे कोणी (हिंदू) म्हणेल तर हे शब्द उच्चारल्याचे पाप आहेच वर खोटे बोलल्याचे दुसरे पापही लागते. तसे ज्ञानाला अज्ञान म्हणणे हे एक पाप आणि अ़ज्ञान नसताना अ़ज्ञान म्हणणे हे दुसरे पाप.

अशीच दोन्ही पापे ज्ञानेश्वरांच्या विचारांची ओढाताण करून त्यांना शंकराचार्यांचे अनुयायी म्हणण्यार्‍यांना लागतात."

विनायक
संदर्भ - १. ज्ञानेश्वरी - दांडेकर प्रत २. सार्थ अमृतानुभव - जोगमहाराज

लेखनविषय: दुवे:

Comments

कसलं मिथ्या, कसलं काय!

"ब्रह्म सत्य जगत् मिथ्या" ही विचारसरणी प्रमुख असली तरी सर्वमान्य किंवा बहुतांशी तत्त्वज्ञानी लोकांना मान्य होती अशी वस्तुस्थिती नाही.

अगदी खरं आहे.. आपल्याला तर साला पयल्यापासनंच या शंकराचार्यांचं म्हणणं पटत नाय! हां, आता आपण सर्वमान्य नाय परंतु एक सागतो. समोर एखादी देखणी, सुंदर साडी नेसलेली, बिनबाह्यांचं पोलकं घातलेली, तारुण्याने मुसमुसलेली बाई असेल, कुठूनतरी तळलेली मासळीचा घमघमाट नाकात शिरत असेल, त्या बाईला पाहून डोक्यात हमीरचे छानसे सूर रुंजी घालत असतील तर तेच खरं ब्रह्म! उगाच कसलं काय मिथ्या वगैरे! छ्या..!

माझ्या मते या शंकराचार्यांनी नकळत्या वयात आजन्म ब्रह्मचार्याची वगैरे शपथ घेतली असणार व जवानीत पस्तावले असणार! पण सांगतात कुणाला? मग "ब्रह्म सत्य जगत् मिथ्या" असलं काहीसं स्वत:शी घोकावं लागतं अन् पब्लिकच्या मनात पण ठासावं लागतं! अहो एखाद्या भुकेल्या वाघाला समोर शेळी दिसत असतांना म्हणा पाहू "ब्रह्म सत्य जगत् मिथ्या" म्हणून! तो शेळीआधी तुम्हाला खाईल! :)

आधी शंकराचार्यांचे म्हणणे बघू. त्यांच्या मते जग ही माया आहे, आभास आहे, मिथ्या आहे.

शंकराचार्यांशी असहमत....!

अर्थ - म्हणून जगाचा निरास करून मला पहावे, तसा मी नाही, तर सर्वांसकट मीच आहे. शंकराचार्यांच्या "ब्रह्म सत्य जगत् मिथ्या" याचे यापेक्षा स्पष्ट शब्दांत खंडन मी तरी दुसरीकडे कुठे वाचले नाही

जियो विनायकराव!

तर्कतीर्थांनी एका लेखात लिहिले होते " शंकराचार्यांचे अनुयायी स्वत:च्या सोयीसाठी उपनिषदे, गीता, ब्रह्मसूत्रे यांची ओढाताण करतात.

हा हा हा! सह्ही..! :)

पण ज्ञानेश्वर हे शंकराचार्यांचेच तत्त्वज्ञान सांगतात हे सिद्ध करण्यासाठी ज्ञानेश्वरांच्या विचारांची ओढाताण करतात याला आमचा आक्षेप आहे.

अगदी खरं आहे. विनायकराव, शंकराचार्यांच्या कंपूचा हा खोडसाळपणा दाखवून दिलात त्याबद्दल आभार..

शुभ दिपावली..

तर्कतीर्थ तात्याशास्त्री अभ्यंकर.

--
न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

अतिशय दरिद्री प्रतिसाद

श्री. विनायक, तुमच्या लेखाला वेळ मिळताच सविस्तर प्रतिसाद देणार आहे, तोवर राहवले नाही म्हणून हे लिहिले.

वसुलि
वसंत सुधाकर लिमये

मजकूर संपादित.

१०० टक्के सहमत

उगाच कसलं काय मिथ्या वगैरे! छ्या..!

विसोबा खेचरांच्या मताशी पूर्णतः सहमत आहे. जग आहे, जगात सुख आहे आणि दुःखही आहे. दुःखाशी सामना करत करत विधायकतेने जास्तीत जास्त सुखी होउन जगण्याचा प्रयत्न करत जीवन जगणे हे सत्यच. राबराब राबून काडीकाडी चा संसार उभा करून कृतकृत्य होऊ पाहणाऱया माणसाला तुझी सारी मेहनत म्हणजे निव्वळ फुकाचा व्यवहार आहे असे सांगणे म्हणजे जगाला सुखे सगळी मिथ्या म्हणायला लावून आपल्या सुखाची सोय लावण्याचा व जितेपणीच ब्रह्मप्राप्ती करण्याच्या प्रयत्नाचा भाग आहे.

जगाचा निरास करून मला पहावे, तसा मी नाही, तर सर्वांसकट मीच आहे.

संत ज्ञानेश्वरांच्या या सर्वसमावेशक तत्वज्ञानापायीच त्यांना तत्कालिन कर्मठ वर्गाच्या टिकेचे ( कि अत्याचाराचे ) धनी व्हावे लागले. आज आश्चर्यकारकपणे संत ज्ञानेश्वरांचे मोठेपण सगळ्यांना जाणवू लागले आहे. (अरेच्या आपल्याला पिवळा चालत नाही आणि हा तर सगळ्या जगाला चालतो आहे. मग काय करावे बरं... चला हा पिवळा जरी दिसतो तरी तो खऱया अर्थाने लालच कसा आहे हे पटवून देऊ या.) कंसातल्या अशा सुप्त इच्छाशक्ती पायी अवघी ज्ञानतपश्चर्या ज्ञानदेवांचे तत्त्वज्ञान शंकराचार्यांच्या तत्त्वज्ञानाहून वेगळे नाही. परंतु ज्ञानदेवांनी त्याच दिशेने चिद्विलासवादाकडे जी झेप घेतली तीच ज्ञानेश्वरीची अपूर्वता आहे."
अशी ओढाताणीची विधाने करण्यात खर्ची घातली जाते. त्या पेक्षा ज्ञानेश्वरांना जगणे हे व्यर्थ या पाखंडी तत्वज्ञानाचे खंडन करुन जगत् व्यवहारात नवी उर्जा निर्माण केली हे खळखळ न करता मान्य केले तर काय बिघडते हा माझा भाबडा प्रश्न आहे.

विश्व ब्रह्मचि केले |

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.विनायक म्हणतात तसे ज्ञानदेवांनी संपूर्ण विश्व हेच ब्रह्म आहे असे प्रतिपादन केले हे खरे आहे.रामाजनार्दनरचित ज्ञानराजाच्या आरतीतः प्रकट गुह्य बोले| विश्वब्रह्मचि केले|असे म्हटले आहे.याला चिद्विलासमत असे म्हणतात.
पण जगन्मिथ्या हे आदि शंकरांचे मत बहुप्रचलित राहिले.
"ज्ञानेश्वरी: स्वरूप,तत्त्वज्ञान आणि काव्य" या पुस्तकात लेखक म.वा.धोंड लिहितातः
"ज्ञानदेवांनी शंकराचार्यांच्या मायावादाला चिद्विलासाची जोड देऊन त्यांचा अद्वैतविचार पूर्णावस्थेला नेला.शंकराचार्य मायावादाशीच घोटाळत राहिले.ज्ञानदेव चिद्विलासाच्या मार्गाने पूर्ण अद्वैताकडे गेले.ज्ञानदेवांचे तत्त्वज्ञान शंकराचार्यांच्या तत्त्वज्ञानाहून वेगळे नाही. परंतु ज्ञानदेवांनी त्याच दिशेने चिद्विलासवादाकडे जी झेप घेतली तीच ज्ञानेश्वरीची अपूर्वता आहे."
..ज्ञानदेवांनी शंकराचार्यांच्या मायावादाचे खण्डन केले असे लेखक धोंड यांनी म्हटले नाही.

शिव-शक्ती

न्यानेश्वरांनी शांकरमताचाच अनुवाद केला हाय हे लय अभ्यासकाचं मत हायेच .
माया बीया सब झुट असून जीव,जगत,परमात्मा,सर्व एकच असून ते ज्ञानस्वरुप हाय असे
न्यानेश्वर म्हणतात.

[अंदाजपंचे] बाबूराव :)

ह्याला काय वाटतं आणि त्याला काय वाटेल याचा इचार करायमधी आपून टैम नै घालीत फटकन लिहून मोकळं !

चर्चा...

या संदर्भात काही चर्च इथेही वाचता येईल!

आपला,
(दुवेदार) तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

दुवा

तुम्ही केलेल्या जाहिराती नुसार दिलेल्या दुव्यावर गेलो.

तर्कतीर्थ तात्यास्वामी तुमचे दोस्त जोशीबुवा यांनी खिशाला खार लावून असल्या विषयावर चर्चा करायला स्वतंत्र स्थळ काढून सोय करुन दिली आहे ना. तिकडे टाका.
मिपाचे उपक्रम करु नये, ही विनंती.

हा तिथला शेवटचा प्रतिसाद सोडून फारसे काही दिसले नाही. दुवा देण्याचे प्रयोजन?

(शंकेखोर) बेसनलाडू

 
^ वर