राजारामशास्त्री भागवत यांचे लेख
काही महिन्यांपूर्वी उपक्रमाचे सदस्य श्री. शरद यांच्या भेटीत एका उत्तम पुस्तकाची ओळख झाली : "राजारामशास्त्री भागवत यांचे निवडक साहित्य". या लेखांचे संकलन त्यांच्या कुटुंबातील दुर्गा भागवत यांनी केलेले आहे, आणि लेखसंग्रहाला दीर्घ प्रस्तावनासुद्धा लिहिली आहे.
हे लेखन वाचून उपक्रमावर काही लिहावे, अशी त्यांची आणि माझी इच्छा होती पण आजवर काय लिहावे ते सुचत नव्हते. शरद यांनी हल्लीच लिहिलेल्या "वैचारिक गोंधळ" लेखाच्या निमित्ताने हे स्फुट सुचले आहे. खरे तर दुर्गाबाईंच्या एकदोन परिच्छेदांना माझ्या मनातील संदर्भांच्या मध्ये बसवले आहे इतकेच.
- - -
राजारामशास्त्री भागवत (१८५१-१९०७) यांनी त्यांच्या जीवनकाळात प्रचुर लेखन केले. पेशाने ते कॉलेजात संस्कृताचे अध्यापक होते. तसेच त्यांनी शाळाही स्थापन केली. त्यांचे संशोधन इतिहास, वेद, शककालविचार, हिंदू देवतांबद्दल विचार, वगैरे, असे विस्तीर्ण होते. त्यांच्या काळात इतिहासाची साधने तुटपुंजी होती, त्यांचे लेखन इतिहासकार राजवाडे यांच्या लेखनासारखे नव्हे. त्यातही महाराष्ट्राच्या अभिमानास्पद इतिहासाबद्दल त्यांनी जी माहिती समोर आणली, त्याच्यापैकी पुष्कळ माहिती आज आपण सुपरिचित मानतो. त्यांचा मर्हाट्यांचा इतिहास, आणि एकनाथाचे चरित्र हे आज वाचताना आपल्याला नवीन असे काही दिसत नाही, पण त्या काळासाठी ते नवीन होते. (त्यांच्या ऐतिहासिक लेखनाचे तात्कालिक महत्त्व समजूनही आज नाविन्य न वाटल्यामुळे त्याबद्दल येथे, उपक्रमावर, मला लेख लिहिण्याची स्फूर्ती झाली नाही.)
बरेचसे लेखन सामाजिक विषयांबद्दल होते. त्यांनी हाताळलेले विषय मुखतः (१) चातुर्वर्ण्य आणि जातिभेद (विरोध), (२) धार्मिक कर्मकांडांत सुधारणा - मुंजी सर्वांच्या कराव्यात, मुलींच्याही कराव्यात वगैरे... अशा प्रकारचे होते.
त्यांचा आणखी एक प्रिय विषय होता महाराष्ट्रधर्माची आणि मराठी भाषेची महती. (महाराष्ट्र मंडळ - हल्लीचा महाराष्ट्र आणि आजूबाजूचा प्रदेश - हे एक राष्ट्र आहे, असे त्यांचे मत होते.) संस्कृत भाषा राष्ट्रभाषा होण्यालायक नाही, तशी या राष्ट्राची भाषा मराठीच आहे, आणि ही मराठी भाषा मोठ्या लायकिची आहे, अशा प्रकारचे लेख त्यांनी लिहिले.
मला हे सर्व लेख रोचक वाटले. त्यांची सामाजिक मते, त्या काळासाठी प्रगतिशील होती, पण आजसाठी कालबाह्य होत चालली आहेत. जशी जशी नवी मते पटलीत, तशी त्यांनी मते बदलली सुद्धा. सुरुवातीला विधवाविवाह धर्मबाह्य आहे, असे त्यांचे मत असून, जीवनात पुढे त्यांचा विरोध खूपच कमी झाला. (एक वैचारिक व्यक्ती म्हणून मला हे फार रोचक वाटले तरी त्या काळास लागू असलेली त्यांची मते आज पुन्हा मुद्दे म्हणून पुनरुज्जीवित करण्यास मला स्फूर्ती वाटली नाही.)
खरे तर मला लिहावेसे वाटले, पण साहित्य नव्हते ते या बाबतीत - या काळात वेगवेगळे विचारप्रवाह होते - टिळक, आगरकर, लोकहितवादी, चिपळूणकर, वगैरे, त्यांनी एकमेकांशी त्या काळात कुठल्या प्रकारे वादविवाद चालवला. अटीतटीच्या सामाजिक वादांमध्ये काय अपेक्षा करावी, काही धडे मिळतात का? प्रास्ताविक खंडात दुर्गाबाई म्हणतात -
मला तर असे वाटते, की लोकहितवादी, फुले, चिपळूणकर, टिळक, आगरकर, राजवाडे आणि केतकर या सर्व चळवळ्या पुरुषांवरील साधकबाधक टीकांवर एक ग्रंथ शास्त्रीय दृष्टीने कुणी लिहिल्यास, त्यापासून टीकाशास्त्राची फारच प्रगती होईल. वाईट टीकेतूनही काहीतरी सार काढणे सोपे काम नाही. ... त्यातल्या त्यात या सर्व व्यक्ती परस्परविरोधी असल्या तरी संस्कारक्षम आणि तडफेने काम करणार्या होत्या. त्यांचे आयुष्यात पटले नसले तरी...
म्हणूनच दुर्गाबाईंनी परिशिष्टात लेखांवरील काही पत्रव्यवहार दिलेला आहे. त्या काळात पत्रव्यवहार टोपणनावांनी लिहिण्याची पद्धत होती असे दिसते, आणि एकमेकांची चिरफाड करण्यात खंवटपणा आणि दुष्टपणा यांच्यात काटकसर करायची पद्धत नव्हती, असे माझ्या लक्षात आले. मराठी संकेतस्थळांवरती आपण सर्व टोपणनावांनी लिहितो, आणि कित्येकदा आमोरासमोर बोलणार नाही अशा तिखटपणे लेखाप्रतिसादी करतो. ही परंपरा दीडशे वर्षांची आहे! त्यामुळे "हा हंत - काय तो शालीनतेचा स्वर्णकाळ, काय हा पतित काळ, अशी आपल्या काळाची निर्भर्त्सना करून आपण हिरमुसले होऊ नये!
ती बाब सोडता, मला फार इच्छा होती की टिळकांच्या केसरीचे आणि राजारामशास्त्री भागवतांचे छापील वाद चर्चेत यावेत. पण याबद्दल साहित्य माझ्यापाशी नाही. परिशिष्टात दुर्गाबाई म्हणतात :
केसरी, मराठा, वाईचे मोदवृत्त, इत्यादि वृत्तपत्रांशी (राजाराम)शास्त्रीबोवांचे कधीच पटले नाही... शास्त्रीबोबांबद्दल अत्यंत त्रोटक मृत्युलेख पण केसरीत आला... त्यात आदरापेक्षा सुटकेचा निश्वासच टाकल्याचा भास होतो.
पण केसरीने भागवतांबद्दल काही थोडी चांगली वाक्ये कधी लिहिली आहेत, तीच उद्धृत केलेली आहेत. (हे चांगलेच केले.) बाकी फक्त "केसरीने व्याख्यानावर कडक टीका केली" अशी तारखेसह टीप दिलेली आहे. अर्थातच केसरीचे अंक हातात असते, तर टीकेचे मुद्दे वगैरे समजून घेता आले असते. केसरीतील टीकेबद्दल एकच वाक्य उद्धृत केलेले आहे, ते जर प्रातिनिधिक आहे की नाही माहीत नाही. केसरी म्हनतो :
आजच्या स्थितीत आम्हास हितकारक सद्बोध करणारी माणसे पाहिजेत, विघातक टीकाकार नकोत.
"आज आपल्याला भारताचा चांगुलपणा प्रांजळपणे कबूल करणारी माणसे हवीत, बुद्धिभेद करून देशाचे नुकसान करणारी माणसे नकोत." अशा प्रकारचे बोल आपल्याला आजकालही मराठी संकेतस्थळावर दिसतात. तसे त्या काळीही असावे. "आजच्या नाजूक काळात अंतर्गत टीकाकार विशेष धोकादायक" हे प्रत्येक काळात म्हटलेच जाणार, असे लक्षात आले की मग त्या वाक्याकडे दुर्लक्ष करण्यास बळ मिळते. (राजारामशास्त्री केसरीच्या सामाजिक मतांना "भिक्षुकी" म्हणून त्यांची संभावना करत, वेळोवेळी कडक टीका करत, याचा उल्लेखही दुर्गाबाईंनी परिशिष्टात केला आहे. कडवट लेखन दुतर्फा होते.)
परंतु वरील लेख लिहिण्यासाठी माझ्यापाशी हवी तितकी साधने नाहीत.
खरे सांगावे, तर मागचा एक मुद्दा परत गिरवतो. राजारामशास्त्र्यांची जी मते आपणा सर्वांना पटतील त्या विषयीचे लेखही "माहिती" म्हणून मला फारसे आवडले नाहीत. त्यावेळचि समाजाची स्थिती मला कळायची आहे, पण कळते ते फक्त राजारामशास्त्र्यांचे मत. कदाचित माझ्यासारख्या वाचकांना वेगळा दृष्टिकोन देण्यासाठी एके ठिकाणी दुर्गाबाई म्हणतात :
...पुष्कळदा शास्त्रीबोवांसारख्या अव्वल प्रतीच्या संशोधकाला संशोधनाच्या उच्च पातळीवरून खाली घसरावे लागे. त्यात शास्त्रीबोवा पडले समाजसुधारक...
त्यांच्या बर्याचशा बहुजनसमाजाला माहीत असलेल्या लिखाणांत संशोधन अपुरे वाटते आणि निष्कर्ष काढण्याची घाई झालेली दिसते. पन या बर्याचशा लेखांमागची शास्त्रीबोवांची भूमिका पडताळल्यास, ते लिहिताना त्यांचा हेतू काय आहे हे समजून घेतल्यास, हे लेख संशोधनात्मक ठरवण्याची चूक निदान कोणताही विद्वान करीलसे वाटत नाही.
समाज अमुक तर्हेने बदलावा या मताचे प्रतिपादन करणारा लेख, आणि समाजविषयक संशोधनात्मक लेख हे दोन वेगवेगळे प्रकार आहेत. पहिला सहेतुक (अजेंडा असलेला) असतो, तर दुसरा तटस्थ असतो. जर "समाजात अमुक बदल व्हावा" असे सांगायचे असते, तेव्हा "येथे संशोधनास हवा इतका तटस्थपणा नाही" ही टीकाच अप्रस्तुत आहे. "अमुक बदल हवा अशी खूप कळकळ मला वाटते" हे वाक्य तटस्थपणे सांगता येणे अशक्य आहे, असे मला वाटते. आणि राजारामशास्त्री भागवतांचे समाजसुधारणाविषयक लिखाण वाचताना तटस्थ संशोधन सापडावे ही माझी अपेक्षा योग्य नव्हती. आणि कळकळ असल्यास हेतू (अजेंडा) हा हवाच.
शास्त्रीबोवांचे संशोधनात्मक लेख, आणि समाजसुधारणात्मक लेख वेगवेगळ्या प्रकारचे लेख आहेत. ते वेगवेगळ्या अपेक्षेने वाचावेत, ही सुज्ञ सूचना दुर्गाबाई करतात. ती लक्षात ठेवली, आणि संग्रहाचे वाचन सुधारले.
- - -
वरील सर्व उद्धरणे "राजारामशास्त्री भागवत यांचे निवडक साहित्य : वरदा बुक्स, पुणे, पहिली आवृत्ती १९७९" यातील दुर्गाबाई भागवतांनी लिहिलेल्या प्रस्तावना खंडातली आहेत.
हा पुस्तकसंच मला भेट दिल्याबद्दल आणि त्याविषयी काही लेखन करण्याबद्दलही चालनाही देण्याबद्दल शरद यांचे धन्यवाद. कळकळीच्या मतप्रदर्शनात्मक लेखात तार्किक संशोधन "असलेच पाहिजे/नसणार हे अपेक्षित" अशी आरागॉर्न यांच्याशी माझी खरडचर्चा झाली. नसल्यास लेखकाचा वैचारिक गोंधळ आहे आरागॉर्न यांचे मत होते, तर अपेक्षा ठेवल्यास वाचकाचा वैचारिक गोंधळ आहे असे माझे मत होते. त्यावरून वरील स्फुट मला लिहावेसे वाटले.
Comments
सुरवात तर झाली
आचार्य धनंजय यांच्या अभ्यासाबद्दल आदर असल्याने शास्त्रीबुवांबद्दल त्यांनीच लिहावे असे मला वाटते. इतके दिवस वाट पाहून मी स्वत: एक दोन लेख लिहून उपक्रमवासियांना बुवांच्या लेखनाचा
परिचय द्यावा असा विचार करत असतांना सुखद धक्का बसला. तेंव्हा आता माझ्या अल्प लिखाणावर
त्यांची विस्तृत टीका सर्वांना वाचावयास मिळेल हीच अपेक्षा.
शरद
उत्तम
पुस्तकपरीक्षण आणि त्यापेक्षाही या लेखामागचा मांडलेला विचारप्रवाह आवडला. नवीन विचारांच्या संदर्भात कदाचित या पुस्तकातून फारसे हाती लागणार नाही; तरी एक दस्तऐवज म्हणून आणि तुम्ही म्हणता तसे बरेचसे पूर्वग्रह, दृष्टिकोन आणि वाद घालण्याच्या पद्धती ह्या सनातन आहेत हे जाणवून द्यायला.
-- बव्हंशी सहमत आहे. मात्र ह्या दोहोंचा सुवर्णमध्य साधणारे लेखन सर्वाधिक परिणामकारक ठरत असावे असे वाटते. शब्दच्छल म्हणून म्हणत नाही; पण कदाचित तटस्थपेक्षा अलिप्त हा शब्द अशा आदर्श लेखनाच्या जवळ जावा. अर्थात अशा लेखनातला विचार स्वीकारण्यासाठी समाजही तितकाच प्रगल्भ हवा.
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
उत्तम
उत्तम परिचय. बर्यापैकी सहमत आहे. आत्ता मसावर चर्चा करताना येणारे अनुभव/अडचणी त्या काळीही असाव्यात हे विशेष वाटते. दुर्गाबाईंचे लिखाण नेहेमीच मुद्देसूद आणि वाचनीय असते. त्यांची प्रस्तावना रोचक असल्यास नवल नाही.
लेखातील माझ्या मताबद्दल सर्वांना खरड वाचायला लागू नये म्हणून माझे मत थोडक्यात सांगतो.
चर्चेमध्ये एखादा निष्कर्ष, अनुमान असल्यास त्याचा आधार काय हे चर्चाप्रस्तावकाने सांगितल्यास चर्चा अधिक रोचक होऊ शकते. तसेच विरोधी मतांची दखल घेतल्यास चर्चाप्रस्तावकालाही दुसरी बाजू अनुभवता यावी. कळकळीचे मतप्रदर्शन असेल तरी हे माझे मत आहे असे सांगितले तरी पुरे. (असे मला वाटते)
साधकबाधक
विषय व्यापक आहे. आणि सापेक्षही आहे.
संशोधन,मतनिश्चिती आणि प्रदर्शन,निष्कर्ष या बाबतीत केवळ समाजशास्त्रीयच नव्हे तर इतरही विषयांत बर्याच संशोधकांचा स्वतःच्या तटस्थतेविषयी गोंधळ होतो. आपले मत तेच ग्राह्य असे धरून संशोधन केल्यास हाती येणारे धागेदोरे त्याच दिशेने जात आहेत असे त्याला वाटू शकते.(कावीळ/रंगीत चष्मा वगैरे)
काही संशोधकांचे असे होत नाही , ते खरोखरीच सांगोपांग संशोधन करतात आणि कधीकधी संशोधनाअंती त्यांचे मत बदललेले दिसू शकते.
असे ज्यांचे होत नाही अशा संशोधकांना संशोधक म्हणावे की प्रचारक? असा प्रश्न वाचकांना (पक्षी मला)पडतो. लेखकाचा दृष्टीकोन काय आहे काय आहे ते समजल्यावर वाचकानेही उदार मनाने त्याची मते गृहित धरावीत, त्याच्या निष्कर्षावर अवलंबून राहू नये आणि त्याच्या लेखनात निखळ माहिती किती आणि काय सापडते ते पहावे. त्यामुळे वाचकाचा वैचारिक गोंधळ उडणार नाही आणि त्याला एखाद्या विषयाची निदान एकतरी बाजू बर्यापैकी कळू शकेल.
पण बर्याचवेळी असेही होते की वाचकाचीही काही ठाम मते असतात..(कावीळ/रंगीत चष्मा वगैरे) त्यावेळी लेखकाचे निष्कर्ष कितीही नि:पक्षपाती असले तरी वाचकाच्या मताविरुद्ध असतील तर ते त्याला पटणार नाहीत.त्याला लेखक / संशोधक काय करू शकतो?
चांगला परिचय
श्री धनंजय, राजारामशास्त्री भागवतांच्या लेखांचा परिचय करून दिल्याबद्दल धन्यवाद. उपक्रमावरील घडामोडींच्या संदर्भात लेख समयोचित तसेच प्रसंगोचित वाटला. परंतु काही ठिकाणी लेख विस्कळीत झाल्याचेही प्रांजळपणे नमूद करावेसे वाटते. मला दोनदा वाचल्यावर काही गोष्टी उलगडल्या. (हा माझ्या आकलनक्षमतेचा दोष असणेही शक्य आहे.) तुलनेने दुर्गाबाई भागवतांच्या प्रस्तावनेवर मूळ लेखांपेक्षा जास्त भाष्य आढळले. लेखाबद्दल पुन्हा एकदा आभार.
बरोबर - प्रस्तावनेवरती स्फुट विचार
तुमचे म्हणणे बरोबर आहे. वर दुर्गाबाईंच्या प्रस्तावनेवरील माझे स्फुट विचार दिले आहेत. राजारामशास्त्र्यांची संक्षिप्त ओळख, आणि त्यांचे लेख ऐतिहासिक महत्त्वाचे वाटूनही मला त्यांच्याबद्दल फारसे लिहावेसे वाटले नाही, याचे वैयक्तिक स्पष्टीकरण दिले आहे.
शीर्षक वेगळे असायला हवे होते.
"राजारामशास्त्री भागवतांच्या संकलित लेखनाला दुर्गाबाई भागवतांची प्रस्तावना : काही स्फुट विचार"
सहा-सात खंडांच्या या लेख-संकलनात एक पूर्ण खंड दुर्गाबाईंची प्रस्तावना आहे. हे वेगळे पुस्तक मानून त्याची ओळख आहे असे शीर्षकातच स्पष्ट दिसायला हवे. संपादकांना विनंती - शीर्षकात तसा फरक करावा.
धन्यवाद
श्री धनंजय, माझ्या मतास विचारात घेतल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही योग्य ते स्पष्टीकरण दिलेले आहे व लेखांच्या अनुषंगाने गतकाळातील विद्वानांच्या चर्चेच्या स्वरूपाकडे आमचे (वाचकांचे) लक्ष वेधले आहे. तुम्ही केलेले विश्लेषण मला पूर्णपणे पटले आहे. विनासंकोच शीर्षकात बदल करण्याची भुमिका हे तुमच्या वैचारिक उदारतेचे आणि प्रगल्भतेचे द्योतक आहे.
नवीन माहीती...
जरी अक्षय यांच्या प्रतिक्रीयेशी मी सहमत असलो तरी नवीन माहीती नक्कीच समजली. त्याबद्दल शरद, धनंजय (आणि ज्या मुळे धनंजय हे लिहीण्यास उद्युक्त झाले ते सर्व वाद) यांचा आभारी आहे... (ओळख स्वरूपातील असल्याने) लेखाला एकच एक असा नीटसा विषय नसल्याने त्यातील एक-दोन मुद्यांसंदर्भात जे वाटते ते:
त्या काळात पत्रव्यवहार टोपणनावांनी लिहिण्याची पद्धत होती असे दिसते, आणि एकमेकांची चिरफाड करण्यात खंवटपणा आणि दुष्टपणा यांच्यात काटकसर करायची पद्धत नव्हती, असे माझ्या लक्षात आले.... त्यामुळे "हा हंत - काय तो शालीनतेचा स्वर्णकाळ, काय हा पतित काळ, अशी आपल्या काळाची निर्भर्त्सना करून आपण हिरमुसले होऊ नये! ती बाब सोडता, मला फार इच्छा होती की टिळकांच्या केसरीचे आणि राजारामशास्त्री भागवतांचे छापील वाद चर्चेत यावेत.
पत्रव्यवहार हा टोपणनावाने होई ही नवीनच आणि नक्कीच रोचक माहीती आहे. बाकी प्रत्येक वैचारीक विरोधाचे सामने हे तेंव्हाही (म्हणजेच आत्ताही) कडक शब्दात होत (होतात) असे वाटत नाही. टिळकांच्याच बाबतीत उदाहरण देयचे झाले, तर टिळक-आगरकर वाद हा जगजाहीर आहे. तीच कथा थोड्या सौम्य प्रकारे टिळक आणि शाहू महाराजांच्या बाबतीत झाली....आत्ता संदर्भ हाताशी नाही, पण, वाचनाच्या आठवणीवर टिळकांनी समाजसुधारणेवरून महर्षी कर्व्यांवर कधी टिका केल्याचे ऐकलेले नाही. किंबहूना त्यांनी असे काही म्हणले होते की तुमचे कामपण महत्वाचे आहे पण ते माझ्या आत्ताच्या कामात महत्वाचे (प्रायॉरीटीमधे) नाही आणि ज्या साठी मी माणसे एकत्र करत आहेत त्या संदर्भात माझ्याकडून प्रत्यक्ष मदत झाली नाही तरी तुम्हाला तोटा नक्की होणार नाही. महात्मा फुले हे टिळकांसाठी ज्येष्ठ होते. पण त्यांनी त्यांच्या सहकार्याकरवी टिळक-आगरकरांचा जामीनही भरला होता आणि ते तुरूंगातून सुटून आल्यावर त्यांचा स्वहस्ते सत्कारही केला होता. याचा सरळ अर्थ इतकाच की टिळकांचे आणि महात्मा फुल्यांचेदेखील वैर नसावेच... थोडक्यात टिळकांनी आयुष्यातील ध्येय हे स्वातंत्र्यप्राप्ती हेच ठेवले होते (स्वातंत्र्य बघायला जगलो तर नंतर गणिताचा प्राध्यापक होईन हे दुसरे ध्येय होते) आणि त्यासाठीचा लोकसंपर्क...
या संदर्भात कुरंदकरांनी राजा राममोहन रॉय यांच्या सतीचालबंदी आणि विधवाविवाहा वर जे काही काम आहे त्यासंदर्भात, 'त्यात वेळ घालवायची गरज नव्हती कारण शेकडा ८०-९० विधवांची लग्ने होत असत आणि सतीप्रथा पण संपूर्ण भारतात नव्हती अशा अर्थाचे लिहील्याचे आठवते. अर्थात याचा अर्थ कुरंदकरांना सतीप्रथेबद्दल काही पडले नव्हते असा नव्हता तर स्वातंत्र्यचळवळीच्या विचारात त्याचे महत्व (प्रॉयॉरीटी) कमी असे त्यांना म्हणायचे असावे...
म्हणूनच मला देखील नक्कीच टिळक-भागवत वाद झाले असले तर ही नक्की कशावरून, ही माहीती करून घेयला आवडेल.
समाज अमुक तर्हेने बदलावा या मताचे प्रतिपादन करणारा लेख, आणि समाजविषयक संशोधनात्मक लेख हे दोन वेगवेगळे प्रकार आहेत. पहिला सहेतुक (अजेंडा असलेला) असतो, तर दुसरा तटस्थ असतो.
एक वेगळे उदाहरण म्हणून पहा: परदेशातील भारतीय, ते ही विशेष करून अमेरिकास्थित, जर भारतात जाऊन कितीही उदात्त हेतूने म्हणू लागले की अरे प्रदुषण कमी होणे महत्वाचे आहे, कचरा/धूळ यांचे नियंत्रण होणे महत्वाचे आहे, इत्यादी इत्यादी तर काय होईल (विशेषतः जालावर ;) )? त्यात आता म्हणा की गाड्या कशाला हव्यात? राडाच होईल... मग पुढे जाऊन पुण्यात रहदारीचे नियम न पाळल्याने किती अपघात होतात, बाईकर्सनी हेल्मेट घालणे महत्वाचे ह्यावर चर्चा केली तर तुम्हाला काय वाटते सगळे जण +१ म्हणतील का? अर्थातच नाही. आता भारत कशाला हेच अमेरिकेत देखील होते - इथल्या प्रश्नांवरून - उ.दा. साधे ऑफिसात आपण प्लॅस्टीकच्या बाटल्यातून पाणी नको, नळाचे फिल्टर पाणी हे पोलंड स्प्रिंग वगैरेचे फाउंटन न वापरता वापरायला लागू म्हणून पहा, तेच गाडी चालू ठेवून नुसते बसू नका (आयडलींग) असे सांगून पहा. अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत, त्या सरळ सांगून माणूस अथवा समाज बदलत नसतो. ती देखील एक उत्क्रांतीच असते आणि तशीच व्हावी लागते...
आता अजून एक गोष्ट उद्या मेधा पाटकरांना जर कोणी पर्यावरणावरून लेक्चर झोडायला लागले, प्रकाश आमटे/अभय बंग सारख्यांना समाजसेवेवरून तर काय उपयोग?
एजंडा असणे चुकीचे नाही, जर त्यात समाजासाठी/देशासाठी/(अगदी संपूर्ण) मानवजातीसंदर्भात तळमळ असेल तर... पण तो एजंडा राबवताना शब्द हे समाजात (चांगल्या अर्थी) शस्त्रक्रीयेचे हत्यार म्हणून वापरता आहात की स्वांतसुखाय (कशी समोरच्याची जिरवली) हे दाखवण्यासाठी वाग्युद्धातील शस्त्र म्हणून वापरत आहात यावर बरेच काही ठरत असते. त्यात केवळ त्या व्यक्तीचे यशापयश ठरत नसते तर समाजाचे फायदे-तोटे देखील. म्हणूनच आगरकरांसारख्या व्यक्तीचे दुर्दैव आणि महर्षी कर्व्यांसारख्या व्यक्तीचे त्याकाळासाठीचे यश हे दोन्ही सामाजीकच असते.
थोडक्यात मी जो फरक करत आहे, तो एजंडा असणार्यात आणि तटस्थ असणार्यात नाही. तटस्थ असणार्याचा काहीच उपयोग नसतो. डांटेचे एक चांगले वाक्य आहे, "The hottest places in hell are reserved for those who in times of great moral crises maintain their neutrality." तेंव्हा अशा व्यक्तींबद्दल बोलण्यात काही फायदा नाही. पण एजंडा हा स्वतःच्या वैयक्तीक अहंकाराच्या बाहेर जाऊन अथवा प्रखर बुद्धीवाद हा समाजाच्या पातळीवर काम करताना बाजूस ठेवून (उ.दा. आगरकर, रं.धो. कर्वे आणि अंशतः सावरकर, जे करू शकले नाहीत) काम करणे अथवा त्याउलट... या दोन गटांवरून किमान भारतात एखादी गोष्ट समाज घडवणार की एक पाऊल मागे टाकणार हे ठरवते.
सरते शेवटी अजून एक आठवले म्हणून उदाहरणः डॉ. भा.नि. पुरंदरे यांच्या शल्यकौशल्य पुस्तकात त्यांनी एक जाता जाता केलेले तक्रार वजा विधान आठवले (अशा अर्थी) - त्यांच्या म्हणण्यानुसार आणिबाणीच्या काळात जे कुटूंबनियोजनाचे काम हातात घेतले गेले होते ते चांगलेच होते. पण त्यात अतिरेक झालाच. परीणामी नंतर आलेल्या जनतासरकारने लोकसंख्येच्या राक्षसास बाटलीतून पूर्ण मोकळे सोडले....
उत्तम लेख
धनंजय, लेख आवडला. विकास यांनी म्ह्टल्याप्रमाणे लेख माहितीपूर्ण झाला आहे. टोपणनावाने किंवा निनावी संवाद करतांना टिकेत थोडा खवटपणा येतो, हे खरे आहे. हे केवळ मराठी संकेतस्थळांच्या जगातच घडते असे नाही. मागे एकदा Double-Blind (शोधनिबंधाचे लेखक व रेफ्री दोघांनाही एकमेकांचे नाव माहीत नसते) आणि Single-Blind (शोधनिबंधाच्या लेखकांना रेफ्रींचे नाव माहीत नसते पण रेफ्रींना लेखकाचे नाव माहीत असते.) अशा दोन प्रकारच्या नियतकालिकांत शोधनिबंधाच्या पीअर-रिव्ह्यु पद्धतीत काही फरक आहे का? अशा विषयाचा एक शोधनिबंध वाचण्यात आला होता. त्यातील एक दुय्यम किंवा उपनिष्कर्ष असा होता की डबल ब्लाइंड नियतकालिकांचे रेफ्री हे जास्त काटेकोर असतात. मी लहान असतांना आमचे एक स्नेही त्यांच्या वरिष्ठांविरुद्ध तक्रारीची निनावी पत्रे माझ्याकडून लिहून घेत असत हेही आठवले.
लेखाबद्दल धन्यू...
धनंजय लेख वाचल्यानंतर लक्षात आलं की लेखाचा विषय जरी रामशास्त्री भागवत असले तरी, मथळा आणि विचार मात्र 'वैचारिक गोंधळ'चे स्पष्टीकरण आहे असे वाटले. आणि तसे असेल तर तुमचे म्हणने पटण्यासारखेच आहे. लेखाबद्दल आणि स्पष्टीकरणाबद्दल धन्यू.....!
संस्कृत भाषा राष्ट्रभाषा होण्यालायक नाही, तशी या राष्ट्राची भाषा मराठीच आहे, आणि ही मराठी भाषा मोठ्या लायकिची आहे, अशा प्रकारचे लेख त्यांनी लिहिले.
अरे वा ! माझे आणि त्यांचे विचार चांगले जुळतात असे वाटते. आणि असा विचार आणि त्याचे समर्थन करणारे आजच्या काळातही आहे, याची संस्कृतच्या अभ्यासकांनी नोंद घ्यावी. ;)
असो, केसरीच्या निबंधवजा लेखनाचा संग्रह माझ्या पाहण्यात आहे.(वाचण्यात नाही) त्यातल्या टीका कोणावर आहेत. वगैरे पुन्हा कधी ते पुस्तक हाताला लागले तर वाचेन.
मराठी संकेतस्थळांवरती आपण सर्व टोपणनावांनी लिहितो, आणि कित्येकदा आमोरासमोर बोलणार नाही अशा तिखटपणे लेखाप्रतिसादी करतो. ही परंपरा दीडशे वर्षांची आहे!
टोपण नाव घेतले असते तर बरे झाले असते. असा विचार माझ्या मनात मसंस्थळावर वावरतांना अनेकदा येतो. मला वरीजनल नावाने तितका खवटपणे लिहिता येत नाही. उलट खडूस बोलणे बर्याचदा ऐकावे लागते.
बर्याचशा बहुजनसमाजाला माहीत असलेल्या लिखाणांत संशोधन अपुरे वाटते आणि निष्कर्ष काढण्याची घाई झालेली दिसते. पन या बर्याचशा लेखांमागची शास्त्रीबोवांची भूमिका पडताळल्यास, ते लिहिताना त्यांचा हेतू काय आहे हे समजून घेतल्यास, हे लेख संशोधनात्मक ठरवण्याची चूक निदान कोणताही विद्वान करीलसे वाटत नाही.
संशोधनाच्या बाबतीत आपण पुर्वसुरींच्या मतांचा ॠणनिर्देश करुन नव्या मतांची मांडामांड करत असतो. तेव्हा टीका करतांना अनेकदा गोंधळ होतो.पण टीका करणे थांबवतो थोडे. त्यासाठी काही ग्रहिते ही असतातच. उदाहरण म्हणून देतो आता संदर्भ नाही. अनिष्ट गोष्टींवर म.फुल्यांनी टीका केली. आपल्यासमोर कोणता म्हापुरुष कोणते धर्मग्रंथ आहेत याची फीकीर त्यांनी केली नाही. सामान्य जनांमधे त्यांनी 'विवेक' उभा केला. आणि हे करीत असतांना अनेक पारंपारिक मतांना नाकारावे लागलेच. त्या बदल्यात त्यांना 'तुमच्या कृत्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील' असे म्हटले तरी फुल्यांचे वैचारिक चिंतन-मंथन थांबले नाही.
विधवांच्या केशवपणाचे समर्थन करणारे पित्याच्या मृत्युनंतर जसे मुलाचे डोक्याचे केस काढतात, तसे पतीच्या निधनानंतर विधवेचे केशवपण केलेच पाहिजे असे म्हणनारे होते. आणि त्यासाठी वेद, स्मृती, याचे दाखले दिल्या जात होते. पण पुढे कुठे तरी अभ्यासकांनी सांगितले असे कुठे काही सांगितले नाही. तर कोणी म्हणाले एकदाच केशवपण करावे पुन्हा पुन्हा करण्याची गरज नाही. असा बदल होत-होत ती रुढी बाजूला पडली आणि आज कायमची बंद पडली.
स्त्रीने नवर्याबरोबर जेवणे हा नवर्याचा अपमान होता. नौकरीच्या गावी बायकोने जाऊ नये, ती बिचारी सास-याच्या घरी खितपत पडत असे. स्त्रीने शिकली तर पाप ठरेल, ती बिघडेल अशा काही विचारांना विरोध समाजसुधारकांना करावा लागला.
सारांश : एखादा विचार हा समाजाच्या विरोधात असू दे की बाजूने असू दे, निष्कर्षाला आणि त्यातल्या निपक्षपातीपणा समजून घेण्याला जरा वेळ लागतो. तेव्हा काय व्हायचा तो गोंधळ होऊ द्या. पण विचार मात्र थांबवू नये असे वाटते.
-दिलीप बिरुटे