नामसंकीर्तन साधन पैं सोपें |

नामसंकीर्तन साधन पै सोपे
परब्रह्म,परमात्मा,जीवात्मा,मोक्ष या संकल्पना आपल्याकडे उपनिषद्कालापासून आहेत. जीवात्मा परमात्म्यात विलीन होणे म्हणजे मोक्ष. मग पुनर्जन्म नाही.मोक्ष मिळवणे हेच माणसाच्या जीवनाचे परम ध्येय.मोक्षाचे हे वेड महाभारतकालापर्यंत तरी (किंबहुना त्यानंतरही बराच काळ) सार्वत्रिक नसावे. कारण मोक्षप्राप्तीचे मार्ग अत्यंत बिकट मानलेले म्हणून सर्वसामामान्य जनांच्या आवाक्या बाहेरचे होते.काही ज्ञानी,योगी(हटयोगी) संन्यासी असे मोजकेच लोक मोक्षप्राप्तीच्या मागे असत.
मोक्षासाठी भक्तिमार्गाचा सार्वत्रिक प्रसार कधी झाला ठाऊक नाही. ( म्हणजे मला). पण त्यामुळे मोक्षप्राप्ती सर्वसामान्यांच्या आवाक्यात आल्याचे चित्र निर्माण झाले . ज्ञान नको,तप नको,संन्यास नको, संसाराचा त्याग नको.केवळ नामजप करा. विठ्ठल विठ्ठल म्हणा. नामसंकीर्तनाने मोक्ष मिळवा.या भक्तिमार्गामुळे समाजात मोठ्या प्रमाणात निष्क्रियता वाढली.भजन-कीर्तनांद्वारे ब्रह्म,माया,शिवात्मा,जीवात्मा,पुनर्जन्म,संचित,प्रारब्ध ,ब्रह्म सत्यम् जगन् मिथ्या।
अहं ब्रह्माsस्मि| अशा अनेक भ्रामक संकल्पना सर्वतोमुखी झाल्या.
म्हणजे ज्या इहलोकात आपण राहातो.,जो प्रत्यक्ष दिसतो, अनुभवता येतो, तो खोटा आणि जो "पाहिला ना देखिला ना कुणा अनुभावला" असा परलोक खरा !
तिथे अखंड ब्रह्मानंद,परमसुख आहे असे मानायचे.त्याच्या प्राप्तीसाठी सारा आटापिटा करायचा. केव्हढे हे वैपरीत्य! केव्हढा हा भ्रम!!
माणसाने भ्रामक गोष्टींच्या मागे लागावे लागावे म्हणजे किती ? काही सुमार?
खरे तर या इहलोकात, या जगातच आपल्याला राहायचे आहे.दु:खाचा तसेच आनंदाचा उपभोग इथेच घ्यायचा आहे.हे जग अधिक चांगले, अधिक सुंदर ,अधिक सुविधापूर्ण, अधिक सुरक्षित करायचे आहे. निसर्ग नियमांचे अधिकाधिक ज्ञान मिळवायचे आहे. मानवी जीवन अधिक सुविधापूर्ण ,अधिक समृद्ध करण्यासाठी नवनवीन शोध लावायचे आहेत. इथेच प्रगती करायची आहे.समाजातील दु:ख, दारिद्र्य,अज्ञान कमी करायचे आहे.कारण आपल्या भावी पिढ्यासुद्धा इथेच वाढणार आहेत.आपल्याला मिळालेला हा पहिला आणि शेवटचा जन्म.माणसांचा(स्त्री/पुरुषाचा) पुनर्जन्म होतो तो त्यांच्या जनुकांच्या स्वरूपात.अपत्यांच्या माध्यमातून.
हा वास्तववादी विचार कुणाही सुबुद्ध माणसाला पटावा.पण वेदवाक्य, ऋषी मुनींची वाणी,संत महात्म्यांची वचने,जगद्गुरूंचे उपदेश या शब्दप्रामाण्यात गुरफटून गेल्याने पूर्वग्रहविरहित शुद्ध बुद्धीने विचार करता येत नाही.
छे:! या अध्यात्माच्या आहारी जाऊन मोक्षाच्या मागे लागल्याने आपली अपरिमित हानी झाली आहे बुवा!!

लेखनविषय: दुवे:

Comments

कदाचीत

छे:! या अध्यात्माच्या आहारी जाऊन मोक्षाच्या मागे लागल्याने आपली अपरिमित हानी झाली आहे बुवा!!

कदाचीत तुमची हानी झाली असेल, आमची (माझी) नाही....त्याचे कारणही कदाचीत गीतेत दिलेल्या एका श्लोकात येते:

श्रद्धेने मेळवी ज्ञान, संयमी नित्य सावध, ज्ञानाने शिघ्र तो पावे, शांती शेवटची ती मग ||
नसे ज्ञान, नसे श्रद्धा, संशयी नासला पुरा, न हा लोक, न तो लोक, न पावे सुख संशयी||

श्रद्धावान् लभते ज्ञानम् ...संशयात्मा विनश्यति

बाकी "आपली हानी" म्हणजे समाजाची म्हणत असाल तर तसेही काही वाटत नाही. कारण आपला एकूण समाज आणि देश यांचे जगातील स्थान कमी होण्याऐवजी वाढतच चालले आहे हे दुरून पहाताना दिसते.

माझ्या लेखी आपली हानी कुठे चालली आहे तर ती पर्यावरण संतुलन बिघडण्यात, सामाजीक साधन संपत्तीच्या (वीज, पाणी, रस्ते, कचरा, स्वच्छता आदी) व्यवस्थापनाचा अभाव, त्यातून निर्माण होणारी रोगराई यात आहे. त्याला कुठलेही अध्यात्म जबाबदार नाही तर दुर्दैवाने आपली स्वतःच्या चौकटीबाहेर न बघण्याची आणि इतरांना तुच्छ लेखायची वृत्ती जबाबदार आहे.

वास्तवीक येथे या विषयाच्या बाजूने अथवा विरुद्ध कोणीही काही लिहीले तर एक नक्की की त्यांची अध्यात्मात बुडाल्याने अथवा न बुडाल्याने काही हानी झाली आहे असे वाटत नाही. त्यामुळे जे डोळे उघडे ठेवून जागे आहेत त्यांच्यातच जागृती करण्यात काय अर्थ?

म्हणून म्हणतो की अध्यात्म, धर्म हे इतर अनेक विषयांप्रमाणेच झिंग चढवणारे विषय आहेत. ती झिंग केवळ अध्यात्मात बुडून जाणार्‍यालाच लागते अशातला भाग नाही तर त्यावर उठसुठ टिका करणार्‍यांना पण तितकीच लागते.

स्थान

>>कारण आपला एकूण समाज आणि देश यांचे जगातील स्थान कमी होण्याऐवजी वाढतच चालले आहे हे दुरून पहाताना दिसते.

ते वाढत आहे ते मोक्षाची आस बर्‍याच अंशी सोडल्यानंतरच वाढत आहे. पूर्वीही जे सुवर्णयुग होऊन गेले ते मायावादाचा आणि मोक्षाचा चळ लागायच्या (इसवीसनाच्या ८व्या १० व्या शतकाच्या) पूर्वी येऊन गेले.

नितिन थत्ते

म्हणजे...

ते वाढत आहे ते मोक्षाची आस बर्‍याच अंशी सोडल्यानंतरच वाढत आहे.

म्हणजे मूळ लेखात काळजी व्यक्त करण्याऐवजी आनंद व्यक्त करायला हवा असे वाटते का? "आता आपण मोक्षाच्या आहारी जाणे कमी करत आहोत तेंव्हा आपली हानी होणे पण कमी होत आहे" असे काहीसे वाक्य असायला हवे असे वाटते का?

मूळ

लेखात मोक्षाच्या आहारी जाणे कमी करीत आहोत याबद्दल काळजी कुठे व्यक्त केली आहे?
तुम्ही जे वाक्य लिहिले आहे तसाच लेखाचा रोख आहे.

मोक्षाची आस सोडल्याने प्रगती होत नाही. मोक्षाची आस सोडल्यावर आपण काही (करायला हव्या अशा) चांगल्या गोष्टी करू लागलो तर प्रगती होते.

नितिन थत्ते

उलट

लेखात मोक्षाच्या आहारी जाणे कमी करीत आहोत याबद्दल काळजी कुठे व्यक्त केली आहे?

मी तसे नव्हतो म्हणत. लेखात, "..या अध्यात्माच्या आहारी जाऊन मोक्षाच्या मागे लागल्याने आपली अपरिमित हानी झाली आहे बुवा!!" असे वाक्य आहे, जे वर्तमान स्थिती दाखवते. या उलट आपण म्हणता की आपण मोक्षापासून मोक्ष घेत आहोत (म्हणजे लांब जात आहोत!). माझा आधीचा प्रतिसाद या संदर्भात होता.

--------------

संशयातूनच ज्ञानप्राप्ती होते ह्यावर गीतेचा विश्वास नसावा

श्रद्धावान् लभते ज्ञानम् ...संशयात्मा विनश्यति

संशयातूनच ज्ञानप्राप्ती होते ह्यावर गीतेचा विश्वास नसावा. "संशय हे न्यायशास्त्राचे मार्गदर्शक तत्त्व आहे," हे गौतमाच्या न्यायशास्त्राचे पहिले सूत्र आहे असे कुठेतरी वाचल्याचे आठवते. म्हणजे प्रत्येक गोष्टीचा विचार करताना "का?" हा प्रश्न विचारला पाहिजे आणि त्याचे तर्कशुद्ध उत्तर हुडकून काढले पाहिजे. ह्यावर जाणकारांचे मत जाणून घ्यायला आवडेल.

पटता तो टेक. नहीं तो रामटेक.

संशय, संयम आणि सावधपणा

संशयातूनच ज्ञानप्राप्ती होते ह्यावर गीतेचा विश्वास नसावा.

मला वाटते थोडा शाब्दीक फरक असावा.

आधीच्या ओळीत गीतेत म्हणले आहे की ज्ञानाची इच्छा करणारा हा संयमाने प्रयत्न करतो तसेच येणार्‍या प्रत्येक अनुभवास सावधपणे पहातो. अर्थात तसे वागताना त्यात त्याची ज्ञान मिळवण्यासाठी श्रद्धा असते.

मात्र जेंव्हा निव्वळ संशय असतो, तेंव्हा डोळसपणे काहीच बघितले जात नाही, उत्तरे शोधण्याचा प्रयत्न न करता /स्वानुभव न घेता अनुमाने काढली जातात तर, यात काय, त्यात काय, असे शक्यच का नाही असे विचार येतात आणि मग असे संशयात्मा हे ज्ञान मिळवू शकत नाहीत म्हणून खर्‍या अर्थाने सुखी देखील होऊ शकत नाहीत...

वरील विनायक यांनी दिलेल्या उदाहरणाचाच विचार केला तर खगोलशास्त्राचे ज्ञान आत्मसात करताना "असे कसे शक्य आहे?" असा प्रश्न पडून पृथ्वीच सुर्याभोवती फिरते असे ज्ञान सप्रमाण मिळू शकले.

संशयी नव्हे

तेंव्हा डोळसपणे काहीच बघितले जात नाही, उत्तरे शोधण्याचा प्रयत्न न करता /स्वानुभव न घेता अनुमाने काढली जातात तर, यात काय, त्यात काय, असे शक्यच का नाही असे विचार येतात

तुम्ही ज्याचे वर्णन केले आहे तो सिनीकल (मोल्स्वर्थः खवचट) आहे, संशयी/ शंकेखोर (स्केप्टीक) नाही. दोन्ही मध्ये फरक आहे. गीतेमधे 'संशयात्मा विनश्यति' म्हंटले आहे.

मोल्सवर्थ

तुम्ही ज्याचे वर्णन केले आहे तो सिनीकल (मोल्स्वर्थः खवचट) आहे, संशयी/ शंकेखोर (स्केप्टीक) नाही. दोन्ही मध्ये फरक आहे. गीतेमधे 'संशयात्मा विनश्यति' म्हंटले आहे.

मोल्सवर्थमधे पटकन स्केप्टीकसाठी मराठी शब्द मिळाला नाही. कदाचीत तर्कट हा शब्द स्केप्टीकसाठी बरोबर ठरेल का? तर्काचे वर्णन करताना मोल्सवर्थ मधे, "विचार करूं लागलें म्हणजे अनेक प्रकारचे तर्क उत्पन्न होतात." असे उदाहरण दिले आहे. पण मला माहीत नाही.

बाकी, स्केप्टीक साठी संशय हा तितकासा बरोबर शब्द वाटत नाही (मोल्सवर्थमधे पण नाही आहे):

संशय [ saṃśaya ] m (S) Doubt, uncertainty, undeterminedness of opinion or mind. 2 Suspicion, surmise, apprehension of ill.

संशयखोर [ saṃśayakhōra ] c संशयवाईक c (Vulgar formations.) One ever doubting, hesitating, scrupling; or one distrusting or suspecting.

संशयग्रस्त [ saṃśayagrasta ] a (S) Swallowed up by doubt; doubtful, dubious, suspicious, apprehensive.

प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

स्क्पेप्टिक

माझ्यामते स्केप्टिकचा अर्थ शंकेखोरच. मोल्सवर्थमधेही तसाच अर्थ दिला आहे. जाणकारांनी प्रकाश पाडावा.

संशयापन्नमानस (p. 835) [ saṃśayāpannamānasa ] a S (संशय, आपन्न, मनस्) Of a doubting and irresolute mind; doubtful, sceptical, undecided.

प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

चिकित्सक?

चिकित्सक हा शब्द स्केप्टीकच्या जवळ जाणारा असावा का?

ट्याग बंद करण्याचा प्रयत्न


ग्रे रंगाचा ट्याग बंद केला. बाकी चालू दे.

प्रश्न

श्री चित्तरंजन, मी गीता वाचलेली नाही त्यामुळे याबाबत काही मत व्यक्त करत नाही. तुमच्या प्रतिसादातील पुढील वाक्य वाचले.

संशयातूनच ज्ञानप्राप्ती होते ह्यावर गीतेचा विश्वास नसावा.

हे वाक्य वाचून एक प्रश्न पडला. संशयातूनच ज्ञानप्राप्ती होते ह्यावर गीतेचा विश्वास नसेल तर ज्ञानप्राप्तीतूनच संशय निर्माण होतो असे काही असेल का?

काही स्वैर विचार

सर्वप्रथम, गीता मी वाचलेली नाही, आणि आपण उद्धृत केलेल्या विचारधारेतील अभ्यासक नाही, तज्ज्ञ तर नाहीच नाही, त्यामुळे मत - त्यातून गीतेतील विचारांवर मत - देऊ शकत नाही, पण ज्ञानप्राप्ती, संशय, विज्ञान वगैरे बाबतीतील काही माझे, काही कधीकाळच्या श्रवणभक्तीने अर्धवट समजलेले (गीतेतील किंवा गीतेशी संबंधित नव्हे!) असे काही स्वैर विचार (चुकीचेही असतील कदाचित, पण तरीही कृपया गोड मानून घ्यावेत.) - आणि कदाचित माझ्याच काही शंका - मांडण्याची आगळीक करू इच्छितो.

संशयातूनच ज्ञानप्राप्ती होते ह्यावर गीतेचा विश्वास नसावा.

सर्वप्रथम, या विधानाचा नेमका अर्थ काय? 'संशयातून ज्ञानप्राप्ती होत नाही असे गीतेला वाटत असावे' असा, की 'संशयाव्यतिरिक्त ज्ञानप्राप्तीचे इतरही मार्ग असू शकतात असे गीतेला वाटते' असा? थोडक्यात, 'संशयातूनच' मधील 'च'वर कितीसा आघात आहे?

मी स्वतः गीता वाचलेली नसल्यामुळे मला याबाबत काहीच माहीत नाही, परंतु आपण हे विधान जसे लिहिलेले आहे, त्यावरून मला तरी दुसरा अर्थ समजतो. या कारणास्तव, खात्री करून घेण्यासाठी हा प्रश्न विचारत आहे. (तसे असेल तर हा दुसरा अर्थ पटण्याकडे निदान माझा तरी कल आहे असे वाटते. म्हणजे, 'असे गीतेला वाटते' हा भाग वगळून.)

प्रत्येक गोष्टीचा विचार करताना "का?" हा प्रश्न विचारला पाहिजे आणि त्याचे तर्कशुद्ध उत्तर हुडकून काढले पाहिजे.

संशय घेण्याचे ज्ञानप्राप्तीत, ज्ञानवृद्धीत आणि ज्ञानशोधनात (refinement of knowledge) फायदे आहेत हे खरेच. परंतु त्यामुळे कधी त्याच ज्ञानवृद्धीला मर्यादाही येऊ शकतात असे वाटते. मुळात 'असे का?' हा प्रश्न नेमका कधी विचारावा आणि कधी विचारू नये (अर्थात निव्वळ ज्ञानोपासकाच्या ज्ञानप्राप्तीच्या फायद्याच्या दृष्टिकोनातून) याचा निर्णय घेता येणे ही एक कला असावी, आणि हा निर्णय प्रत्येक ज्ञानोपासकाच्या ज्ञानप्राप्तीच्या गरजेनुसार आणि दिशेनुसार वेगवेगळा असावा असे वाटते.

जगात मिळवण्यासारखे ज्ञान पुष्कळ आहे. (अज्ञाताचे नेमके परिमाण माहीत नसल्याकारणाने आणि कितीही ज्ञान मिळवले तरी काही अज्ञात शिल्लक राहत असावे, एवढेच नव्हे तर ज्ञानसुद्धा बदलत असल्यामुळे एखाद्या बाबीचे आजचे ज्ञान हे पूर्ण आणि शेवटचे ज्ञान नसून उद्या नवनवीन अज्ञात निर्माण होत असावे या कारणाने, मिळवण्यासारखे ज्ञान अनंत आहे असेही बहुधा म्हणता यावे.) अर्थात जगातील सर्व ज्ञान कोणत्याही व्यक्तीस एका आयुष्यात प्राप्त करणे शक्य नाही. (हे केवळ आयुष्याच्याच मर्यादेमुळे नव्हे, तर विभिन्न बाबतींतील ज्ञान ग्रहण करण्यातील व्यक्तिगत रस, कुवत, पूर्वग्रह वगैरे अनेक घटक मर्यादा निर्माण करू शकतात. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीस पदार्थविज्ञानात उत्तम गती असू शकेल, परंतु त्याच व्यक्तीस चिनी पाककला शिकण्यात रस नसेल, ग्रीक तत्त्वज्ञानात किंवा पौर्वात्य भाषांच्या व्याकरणांच्या तौलनिक अभ्यासात गती नसेल आणि भारतीय चित्रपटांच्या इतिहासाच्या अभ्यासात त्याचे चित्रपटांबद्दलचे पूर्वग्रह आड येऊ शकतील.)

त्यापुढे, ज्ञानपिपासू व्यक्तीकरिता ज्ञान हे केवळ इकडूनतिकडून वेचलेल्या ज्ञानाच्या संकीर्ण खिचडीच्या स्वरूपात रहायचे नसल्यास अशा ज्ञानपिपासू व्यक्तीस ज्ञानाचा (ज्याच्यात्याच्या वैयक्तिक रसानुसार) सुसूत्रपणे, काही एका दिशा ठरवून आणि त्या दिशेने पुढे जाऊन अभ्यास करणे प्राप्त आहे. ज्ञानाच्या अशा सुसूत्र आणि सुसंघटित विभाजनातून निर्माण होणार्‍या ज्ञानविभागास 'विज्ञान' असे म्हणता यावे. (संदर्भ: व्याख्या: science : a department of systematized knowledge as an object of study.) अर्थात, असे विज्ञानविभागही अनेक आहेत, आणि अर्थातच कोणत्याही एका व्यक्तीची सर्व विज्ञानविभागातील - किंवा कोणताही एक विज्ञानविभागातीलसुद्धा - ज्ञान ग्रहण करण्याची शक्ती मर्यादित आहे.

आता कोणतीही विज्ञानशाखा घेतली, तर त्यात काही मूलभूत गृहीतके असतात. त्या मूलभूत गृहीतकांच्या बांधणीच्या विटांवर (building blocks) त्या विज्ञानशाखेचा पुढील सर्व डोलारा उभा असतो. ही गृहीतके सर्व परिस्थितीत आपल्या जगाच्या अनुभूतीशी तंतोतंत मिळतीजुळती असतात असे नाही, आणि त्या विज्ञानशाखेपुरते पाहता त्याची गरजही नसते. कोणत्याही विज्ञानशाखेतील सर्व निष्कर्ष हे त्या विज्ञानशाखेच्या मूलभूत गृहीतकांशी आणि एकमेकांशी सुसंगत असणे हे पुरेसे असते. 'प्रत्यक्षा'शी त्याची तंतोतंत सांगड घालता यावीच, असा विज्ञानाचा आग्रह नसतो.

(विज्ञान हे शेवटी प्रत्यक्ष विश्वाच्या कोणत्या ना कोणत्या अंगाच्या आकलनाकरिता स्पष्टीकरणात्मक विश्लेषण करण्याचे एक साधन म्हणून बनवलेले एका प्रकारचे प्रतिरूप किंवा मॉडेल असते. मॉडेल हे प्रत्यक्षाशी सर्व तपशिलांत आणि अंगांत तंतोतंत जुळण्याची आवश्यकता नसते, आणि ते शक्यही नसते. फार फार तर प्रत्यक्षाशी कमी किंवा अधिक प्रमाणात जुळणारा तो एक अंदाज असतो. आणि अभ्यासकाच्या विशिष्ट गरजेप्रमाणे निरनिराळ्या गृहीतकांवर आधारलेली निरनिराळी मॉडेल्स बनवता येतात.)

तर कोणत्याही विज्ञानशाखेचा अभ्यास करावयाचा झाल्यास त्या विज्ञानशाखेच्या मूलभूत गृहीतकांबद्दल गृहीतकाच्या व्याख्येनुसार प्रश्न विचारावयाचे नसतात, आणि आपल्या वास्तवाच्या कल्पनेशी किंवा अनुभवांशी ती गृहीतके जुळतात की नाही हेही तपासायचे नसते. फक्त त्या विज्ञानशाखेतील निष्कर्ष अथवा प्रमेये त्या गृहीतकांशी सुसंगत आहेत की नाहीत, एवढेच तपासायचे असते.

अर्थात गृहीतकांना प्रश्न करून 'हीच गृहीतके काय म्हणून' असे विचारून आणि वेगळी गृहीतके मांडून त्या नवीन गृहीतकांशी सुसंगत अशा निष्कर्षांचा डोलाराही उभा करता येतो, आणि त्याचे फायदेही असू शकतात, परंतु मग अशी नवीन गृहीतके आणि त्यावर आधारित निष्कर्ष ही एक नवीन विज्ञानशाखा होते. ही नवी विज्ञानशाखा आणि जुनी विज्ञानशाखा या भिन्न गृहीतकांमुळे एकमेकांशी सुसंगत नसू शकतात, पण स्वतःअंतर्गत परिपूर्ण आणि सुसंगत असतात, आणि प्रत्यक्ष जगाच्या दोन वेगवेगळ्या अंगांच्या आकलनाकरिता या दोन्ही शाखा उपयुक्त असणेही शक्य असते. मात्र अशी एका विज्ञानशाखेच्या गृहीतकांबाबत प्रश्न करून आणि ती बदलून त्याजागी आणलेली नवी गृहीतके ही त्या नवीन विज्ञानशाखेच्या अभ्यासासाठी कितीही उपयुक्त ठरली तरी ज्याची गृहीतके बदलली त्या विज्ञानशाखेच्या अभ्यासाकरिता निरुपयोगी ठरतात. आणि आधी म्हटल्याप्रमाणे, दोन्ही विज्ञानशाखा या प्रत्यक्ष जगाच्या वेगवेगळ्या अंगांच्या आकलनाकरिता - किंवा व्यावहारिक गरजेप्रमाणे एकाच अंगाच्या कमीअधिक अचूक प्रमाणातील आकलनाकरिता - उपयुक्त ठरू शकतात. (आणि तसेही विज्ञानाला प्रत्यक्ष जगाशी मिळतेजुळते असण्याशी फारसे देणेघेणे नसते. मॉडेलमध्ये अंतर्गत सुसंगतता असण्याशी मतलब. प्रत्यक्ष जगाशी थोडेसे जुळले, उत्तम. अधिक जुळले, तरीही उत्तम. नाही जुळले, तरीही उत्तम. आज कशाशीही जुळत नाही पण उद्या भलत्याच कशाशी जुळून त्याच्या आकलनासाठी उपयोग झाला, तर दुधात साखर. मॉडेल वापरता आले, तर घ्या, दुसरे मॉडेल अधिक चांगले वाटले, तर याच्याऐवजी ते मॉडेल घ्या, आणि या मॉडेलचा काहीही उपयोग नाही असे वाटले, तर फेकून द्या आणि दुसरे ज्याचा उपयोग आहे असे वाटते ते मॉडेल घ्या. मॉडेल जोपर्यंत स्वतःअंतर्गत सुसंगत आहे तोपर्यंत ते मॉडेल आहे. आणि मॉडेल म्हणजे जग नव्हे.)

याची काही सोपी उदाहरणे देता येतील. शाळेत आपण २ + २ = ४ हे शिकतो. किंवा कोणत्याही दोन बिंदूंमधून एक आणि एकच सरळ रेषा जाऊ शकते हेही शिकतो. यांबद्दल आपण असे का हे प्रश्न विचारत नाही.

आता २ + २ = ४ हे पूर्णांकांच्या किंवा वास्तव संख्यांच्या अंकगणितात बेरजेच्या व्याख्येप्रमाणे योग्यच आहे, आणि ते मला पडताळूनही पाहता येते. (२ + २ = ४ हे नेमके मूलभूत गृहीतक आहे की काही मूलभूत गृहीतकांवरून निघालेला प्राथमिक सिद्धांत आहे याबद्दल या क्षणी माझ्या मनात थोडा गोंधळ आहे. अधिक विचार करावा लागेल. याबद्दल विचारही ऐकायला आवडेल.) आता '२ + २ = ४च का? इतर काही का नाही?' असा प्रश्न जर कोणी विचारला, तर कदाचित त्यातून काही वेगळ्या परिस्थितीत, वेगळ्या गृहीतकांनुसार २ + २ हे ४ न होता काही वेगळेही होऊ शकते, हे एखाद्याच्या लक्षात येऊ शकेल किंवा त्या दृष्टीने तो विचार करू शकेल. (उदाहरणार्थ, केवळ ० ते २ एवढे ३ पूर्णांकच असलेल्या चक्रीय गटाच्या गणितात त्या गटातील बेरजेच्या एखाद्या व्याख्येप्रमाणे २ + २ = (वास्तव संख्यांच्या अंकगणितातील ४) मॉड्युलो ३ = १ हेही योग्य ठरू शकेल.) त्या विशिष्ट चक्रीय गटावर आधारित गणिताचा अभ्यास करण्याकरिता त्याला याचा उपयोग होऊ शकेल (आणि हे 'वेगळे' गणितसुद्धा काही परिस्थितींत उपयुक्त असणे अशक्य नाही), परंतु असा प्रश्न विचारून अशी व्यक्ती पूर्णांकाचे किंवा वास्तव संख्यांचे अंकगणित शिकू शकणार नाही. तेव्हा, ते 'दुसरे' गणित शिकताना २ + २ = १ होणे ठीक आहे, परंतु पूर्णांकांच्या किंवा वास्तव संख्यांच्या अभ्यासात २ + २ = ४च!

कोणत्याही दोन बिंदूंतून एक आणि एकच सरळ रेषा जाऊ शकते हे युक्लिडीय प्रतलीय भूमितीचे मूलभूत गृहीतक आहे. (हे 'गृहीतक' आहे. व्यवहारात पडताळून पाहता आले तरी तो केवळ 'पडताळा' होतो, 'सिद्धता' नव्हे.) याबाबत प्रश्न विचारल्यास उदाहरणार्थ दोन बिंदूंतून अनंत 'सरळ रेषा' जाऊ शकणार्‍या विश्वाची कल्पना करता येते, आणि व्यवहारात त्याचे उपयोगही आहेत. गोलाच्या पृष्ठभागावरील भूमितीतील 'सरळ रेषे'शी समतुल्य संकल्पनेबरोबर हे त्या भूमितीतील मूलभूत गृहीतक होऊ शकते. "दोन बिंदूंतून एकच सरळ रेषा का म्हणून घालवायची? मी हव्या तेवढ्या घालवेन!" असे जर कोणी विचारले, तर तो त्या आधारे गोलाच्या पृष्ठभागावरील भूमितीचा अभ्यास करू शकेल (जेही उपयुक्त ठरू शकते), पण युक्लिडीय प्रतलीय भूमितीचा (जी इतरत्र उपयुक्त ठरते) अभ्यास करू शकणार नाही. गोलाच्या पृष्ठभागावरील भूमितीच्या अभ्यासाकरिता खुशाल 'दोन बिंदूंतून अनंत सरळ रेषा जातात' हे मानावे, नव्हे मानलेच पाहिजे, पण युक्लिडीय प्रतलीय भूमितीचा अभ्यास करायचा असेल, तर तेव्हा 'दोन बिंदूंतून एकच सरळ रेषा जाऊ शकते' हेच मानले पाहिजे.

तसेच, वास्तव संख्यांच्या अंकगणिताचा अभ्यास करताना 'ऋण संख्येचे वर्गमूळ होऊ शकत नाही' हे गृहीतक आपण शिकतो, पण 'काँप्लेक्स संख्यां'चे पूर्ण गणितच वास्तव संख्या आणि (-१)च्या वर्गमुळाच्या पटी यांच्यावर उभारलेले आहे. त्याचाही वेगवेगळ्या शास्त्रांच्या अभ्यासात उपयोग होऊ शकतो.

थोडक्यात, केवळ 'सर्व गोष्टींना सदैव प्रश्न करणे' हे नेहमी उपयुक्त ठरेलच, असे नाही. एखाद्या गोष्टीच्या अभ्यासाकरिता एखादा प्रश्न पोषक ठरू शकेल तर दुसरा प्रश्न घातक ठरू शकेल. मात्र तोच घातक प्रश्न दुसर्‍या एखाद्या गोष्टीच्या अभ्यासाकरिता पोषक ठरू शकेल आणि पहिला पोषक प्रश्न एखाद्या तिसर्‍या गोष्टीच्या अभ्यासाला घातक ठरू शकेल. केवळ 'प्रश्न विचारण्या'पेक्षा आपण कशाचा अभ्यास करतो आहोत त्याच्या अनुषंगाने 'योग्य वेळी, योग्य ठिकाणी आणि योग्य प्रश्न विचारता येणे' आणि अशी योग्य वेळ, असे योग्य ठिकाण आणि असा योग्य प्रश्न हे कोणते आणि कोणते नाही हे ठरवता येणे महत्त्वाचे. (याचे युनिवर्सल असे निश्चित गणित नसावे.)

शेवटचे वाक्य...

थोडक्यात, केवळ 'सर्व गोष्टींना सदैव प्रश्न करणे' हे नेहमी उपयुक्त ठरेलच, असे नाही... केवळ 'प्रश्न विचारण्या'पेक्षा आपण कशाचा अभ्यास करतो आहोत त्याच्या अनुषंगाने 'योग्य वेळी, योग्य ठिकाणी आणि योग्य प्रश्न विचारता येणे' आणि अशी योग्य वेळ, असे योग्य ठिकाण आणि असा योग्य प्रश्न हे कोणते आणि कोणते नाही हे ठरवता येणे महत्त्वाचे. (याचे युनिवर्सल असे निश्चित गणित नसावे.)

शेवटचा परिच्छेद आवडला.

बाकी इतर मुद्यांसंदर्भात काय वाटते हे नंतर सांगायचा प्रयत्न करेन. कृपया याला खाली प्रतिसाद देऊ नये म्हणजे इथे संपादीत करता येईल. धन्यवाद.

काही असहमती

श्री पर्स्पेक्टिव, तुमच्या प्रतिसादातील अनेक मुद्द्यांविषयी विचार करत आहे. खाली एक असहमतीचा मुद्दा मांडत आहे.

तर कोणत्याही विज्ञानशाखेचा अभ्यास करावयाचा झाल्यास त्या विज्ञानशाखेच्या मूलभूत गृहीतकांबद्दल गृहीतकाच्या व्याख्येनुसार प्रश्न विचारावयाचे नसतात, आणि आपल्या वास्तवाच्या कल्पनेशी किंवा अनुभवांशी ती गृहीतके जुळतात की नाही हेही तपासायचे नसते. फक्त त्या विज्ञानशाखेतील निष्कर्ष अथवा प्रमेये त्या गृहीतकांशी सुसंगत आहेत की नाहीत, एवढेच तपासायचे असते.

विज्ञानशाखांमध्ये गृहीतकांना सैल केल्यास निष्कर्ष कसे बदलू शकतील याचाही अभ्यास केला जात असावा असे वाटते. किंबहूना त्यामुळेच विज्ञान प्रवाही आहे आणि त्या ज्ञानशाखेचा विकास होत आहे. आकलन सुलभ व्हावे यासाठी अध्ययनशास्त्राच्या काही नियमांनुसार आरंभी काही गृहीतकांचा वापर केला जातो. काही गृहीतके बराच काळ टीकून राहतात पण विज्ञान ती गृहीतके आहेत असे स्पष्टपणे नमुद करते.

प्रतिवाद / काही दुरुस्ती

विज्ञानशाखांमध्ये गृहीतकांना सैल केल्यास निष्कर्ष कसे बदलू शकतील याचाही अभ्यास केला जात असावा असे वाटते. किंबहूना त्यामुळेच विज्ञान प्रवाही आहे आणि त्या ज्ञानशाखेचा विकास होत आहे. आकलन सुलभ व्हावे यासाठी अध्ययनशास्त्राच्या काही नियमांनुसार आरंभी काही गृहीतकांचा वापर केला जातो. काही गृहीतके बराच काळ टीकून राहतात पण विज्ञान ती गृहीतके आहेत असे स्पष्टपणे नमुद करते.

मान्य. पण त्या गृहीतकांना सैल करण्यापूर्वी ती गृहीतके मुळात काय आहेत, आधीच्या विज्ञानाचा डोलारा मुळात कोणत्या गृहीतकांवर आधारित आहे, त्यातून निघणारे निष्कर्ष काय आहेत ही चौकट तर मुळात समजून घ्यावी लागते! तेथेच प्रश्न करू लागलात तर काय उपयोग? आधी मूळ गृहीतके काय आहेत, त्यावरून निघणारे निष्कर्ष काय आहेत, त्यांच्या मर्यादांची चौकट काय आहे हे तर समजून घ्या, आणि मग खुशाल बदला (किंवा सैल सोडा) गृहीतके! त्या नवीन गृहीतकांच्या चौकटीत नवीन निष्कर्षांतून नवीन विज्ञानशाखा जरूर फुलेल. ती नवीन विज्ञानशाखा आपल्या परिमितीत योग्य राहील, आणि जुनी शाखा तिच्या परिमितीत टाकाऊ होईलच असेही नाही. फक्त परिमिती काय आहे हे जाणायला पाहिजे. उगाच इकडचे तिकडे आणि तिकडचे इकडे करून चालणार नाही. कदाचित या नवीन शाखेची परिमिती जुन्या शाखेपेक्षा पूर्णपणे वेगळी असेल (ज्या परिस्थितीत दोन्ही शाखा वेगवेगळ्या ठिकाणी उपयुक्त ठराव्यात) किंवा कदाचित या नवीन शाखेची परिमिती जुन्या शाखेपेक्षा अधिक व्यापक असेल. या दुसर्‍या परिस्थितीतसुद्धा जुनी शाखा पूर्णपणे टाकाऊ ठरेलच, असे नाही. कदाचित काही मर्यादित प्रमाणात ती अतिशय उपयोगी ठरेलही.

(डिस्क्लेमर: पुढील परिच्छेद मला अर्धवट कळलेल्या अत्यंत वरवरच्या ऐकीव/वाचीव माहितीवर आधारलेला आहे. या विषयात मला गती नाही, वाचन नाही, पगार तर नाहीच नाही, तेव्हा कृपया स्पष्टीकरण मागून इज्जत काढू नये. मात्र संबंधित विषयातील माहीतगारांनी यातील तपशिलांवर अधिक प्रकाश पाडल्यास आनंद होईल.)

न्यूटनचे गतिविषयक नियम किंवा न्यूटोनियन मेकॅनिक्स (याला 'न्यूटनचे गतिशास्त्र' म्हणावे का?) हे प्रकाशाच्या निर्वात पोकळीतील वेगाशी तुलना करता येण्याजोगा उच्च वेग असलेल्या पदार्थांच्या गतीच्या बाबतीत गैरलागू ठरते. तेथे आइनस्टाइनच्या विशेष सापेक्षतावादाचा आधार घ्यावा लागतो. आइनस्टाइनचा विशेष सापेक्षतावाद रोजच्या वापरातल्या (म्हणजे प्रकाशाच्या वेगाच्या तुलनेत नगण्य वेग असलेल्या) वस्तूंनाही तितकाच लागू होतो, या दृष्टीने तो न्यूटनच्या गतिशास्त्राच्या मानाने अधिक व्यापक आहे, आणि त्याच वेळी न्यूटनचे गतिशास्त्र ज्या पदार्थांना लागू होते त्याही पदार्थांना आपल्या कक्षेत समाविष्ट करतो. पण म्हणून न्यूटनचे गतिशास्त्र टाकाऊ होत नाही. रोजच्या वापरातल्या (म्हणजे प्रकाशाच्या वेगाच्या तुलनेत नगण्य वेग असलेल्या) पदार्थांच्या बाबतीत न्यूटनीय गतिशास्त्र आणि आइनस्टाइनचा सापेक्षतावाद या दोहोंतून येणारे निष्कर्ष, मोजमापे इत्यादींमध्ये इतका नगण्य (आणि व्यवहारात फरक न पडण्याइतका आणि बहुधा मोजता न येण्याइतका सूक्ष्म) फरक आहे, की रोजच्या व्यवहारात बहुतांश पदार्थांकरिता न्यूटनचे गतिशास्त्र हे एक अतिशय उत्तम ठोकताळा (approximation) म्हणून वापरता येते, त्याकरिता आइनस्टाइनच्या विशेष सापेक्षतावादात शिरण्याची गरज नसते. (अवकाशयानास पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणातून निसटण्याकरिता लागणारा किमान वेग: ११.२ किमी प्रतिसेकंद. प्रकाशाचा निर्वात पोकळीतील वेग: सुमारे ३,००,००० किमी प्रतिसेकंद. गरजूंनी तुलना करून पहावी.)

तेव्हा गृहीतकांना जरूर सैल करावे, वाकवावे आणि त्याचे परिणाम काय होतात ते जरूर पहावे. काहीही हरकत नाही. पण त्याचबरोबर मुळात आपण जी वाकवतोय ती गृहीतके नेमकी काय आहेत, त्यांचे ज्ञात चौकटीतील परिणाम (implications अशा अर्थी. म्हणजे त्यावर आधारित सध्याची प्रमेये, सिद्धांत, निष्कर्ष वगैरे) नेमके काय आहेत, आपण ती नेमकी कशासाठी (नेमके काय तपासण्यासाठी) वाकवू पाहतोय, तपासून झाल्यावर नेमके काय सापडले, अर्थात नवीन गृहीतकांचे नवीन चौकटीतील परिणाम काय, कोठली गृहीतके कोठल्या चौकटींकरिता आहेत आणि कोठली चौकट कधी लागू आहे, या सर्व गोष्टींचे भान ठेवणे महत्त्वाचे आहे.

एक सुधारणा:

वर मी दिलेल्या गोलाच्या पृष्ठभागावरील भूमितीच्या उदाहरणात, तपशिलाच्या काही अतिशय साध्या, वरवरच्या (silly mistakes म्हणता येतील अशा) पण महत्त्वाच्या चुका आहेत. प्रतिसाद लिहिल्यानंतर कालांतराने त्यावर विचार करता त्या माझ्या लक्षात आल्या. त्या उघडकीस येऊन बहुधा त्यांबद्दल मजबूत खरडपट्टी होईल अशी धाकधूक होती, पण सुदैवाने तसे काही घडले नाही. ही निष्क्रियता नामसंकीर्तन-परब्रह्म-मोक्षादींमुळे घडलेली नसून उदारमनाने माझ्या चुका उदरी घातल्या गेल्यामुळे आहे याबद्दल मला खात्री आहे. असो. त्या चुकांमुळे त्या उदाहरणातून मला जे काही दाखवून द्यायचे होते त्यात यत्किंचितही फरक पडत नाही, परंतु चुका महत्त्वाच्या असल्याकारणाने त्या सुधारणे इष्ट आहे.

सर्वप्रथम, गोलाच्या पृष्ठभागावरील कोठलेही दोन भिन्न बिंदू घेतले असता त्यांतून अनंत 'सरळ रेषा' (जिओडेसिक्स) निश्चितपणे जातीलच असे वाटत नाही. किंबहुना अशा बिंदूंच्या अनेक जोड्यांमधून बहुधा एक आणि एकच 'सरळ रेषा' जाईल असे वाटते. (याबद्दल खात्री करून घ्यावी लागेल.) मात्र, गोलाच्या कोणत्याही आसाच्या टोकाचे दोन बिंदू घेतले असता त्यांतून अनंत सरळ रेषा जातील. (आस = अक्ष = axis = गोलाच्या केंद्रातून जाणारी कोणतीही (त्रिमितीय भूमितीच्या अर्थाने) सरळ रेषा.) याचे उत्तम उदाहरण आपल्या परिचयाचे आहे. पृथ्वी हा एक गोल आहे. पृथ्वीचे दोन ध्रुव हे पृथ्वीच्या एका आसाच्या दोन टोकांवरील बिंदू आहेत. कोणताही एक रेखांश आणि त्याच्याशी १८० अंशाचा फरक असलेला दुसरा रेखांश हे मिळून होणारे 'मोठे वर्तुळ' - Great Circle - ही गोलीय पृष्ठभागावरील 'सरळ रेषे'च्या व्याख्येप्रमाणे एक 'सरळ रेषा' आहे. दोन ध्रुवांमधून अशा हव्या तेवढ्या १८० अंशाच्या फरकाच्या रेखांशांच्या जोड्या जाऊ शकतात. अशी प्रत्येक जोडी ही 'मोठे वर्तुळ' या कारणाने व्याख्येने एक 'सरळ रेषा' आहे.

(पृथ्वीच्या अक्षांशांपैकी केवळ विषुववृत्त हे 'मोठे वर्तुळ' असल्याकारणाने 'सरळ रेषां'मध्ये मोडते. मात्र, विषुववृत्तावरील एकमेकांपासून १८० अंश दूर असलेले कोणतेही दोन बिंदू घेतल्यास त्यांतून विषुववृत्तासह अशी हवी तेवढी 'मोठी वर्तुळे' - आणि म्हणूनच 'सरळ रेषा' - जाऊ शकतात.)

मात्र, उदाहरणादाखल, लंडन आणि पॅरिस (किंवा पुणे आणि मुंबई) हे कोणत्याही 'मोठ्या वर्तुळा'वरील परस्परविरुद्ध टोकांचे बिंदू नसल्यामुळे त्यांतून बहुधा एक आणि एकच 'सरळ रेषा' जावी.

('मोठे वर्तुळ' = गोलाला दोन सारख्या भागांत दुभंगणारे (युक्लिडीय प्रतलीय भूमितीच्या अर्थाने) वर्तुळ. हे पूर्णपणे गोलाच्या पृष्ठभागावर असून त्यावरील कोणत्याही बिंदूंमधील कमीत कमी अंतर हे त्या वर्तुळावरून एका ठराविक दिशेने प्रवास केल्यावर असल्याने गोलाच्या पृष्ठभागावरील 'सरळ रेषे'च्या संकल्पनेशी हे मिळतेजुळते आहे.)

दुसरे म्हणजे, "दोन बिंदूंमधून एक किंवा एकाहून अधिक/अनंत 'सरळ रेषा' जाऊ शकतात" हे गोलाच्या पृष्ठभागावरील भूमितीचे 'गृहीतक' आहे अथवा नाही याबद्दल मला खात्री नाही. कदाचित नसावे. (लागू आहे आणि साध्या निरीक्षणाने पडताळता येते एवढे निश्चित. 'गृहीतक' आहे की 'सिद्धांत' याबद्दल मला निश्चित खात्री नाही.) मात्र युक्लिडीय प्रतलीय भूमितीचे "दोन भिन्न बिंदूंतून एक आणि एकच 'सरळ रेषा' जाऊ शकते" हे गृहीतक गोलाच्या पृष्ठभागावरील भूमितीच्या गृहीतकांपैकी नाही, अतएव तेथे ते लागू नाही. आणि म्हणूनच "एका विज्ञानशाखेतील मूळ गृहीतके ही दुसर्‍या वि़ज्ञानशाखेकरिता गैरलागू असू शकतात" या मूळ मुद्द्यास त्यामुळे धक्का पोहोचत नाही.


"बिनपगारी हमालीत काही मजा नाही. वर पब्लिक पगार काढते ते वेगळेच!"

गृहीतक आणि विज्ञान

हा प्रतिसाद वरील प्रतिसादाला नसून पर्स्पेक्टिव यांच्याच दुसर्‍या पानावरील खालच्या प्रतिसादाला आहे. पहिल्या पानावर दिसावा म्हणून ही हीन युक्ती

'विज्ञान म्हणजे विश्वाच्या घडामोडींच्या आकलनाकरिता मांडलेले तर्कसुसंगत मॉडेल' या माझ्या व्याख्येनुसार माझ्या मते हे विज्ञान आहे. 'ईश्वर नावाचे काहीतरी विश्व नावाच्या कशाततरी अस्तित्वात असून विश्वातील सर्व घडामोडींचे ते स्पष्टीकरण आहे' एवढ्या एकाच गृहीतकाच्या आधारावर, त्या गृहीतकाशी सुसंगत राहून, विश्वातील सर्व घडामोडींचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करणारे मॉडेल म्हणून हे विज्ञानच ठरावे. (टीप: 'ईश्वर सर्वसमर्थ आहे' अशा प्रकारचा कोणताही दावा येथे केलेला नाही. 'ईश्वर काहीही करू शकेल' असे मुळीच म्हणणे नाही. केवळ 'जे जे घडते त्याचे स्पष्टीकरण ईश्वर' एवढेच गृहीतक आहे.)

'प्रगतीच्या (म्हणजे जे काही असेल त्याच्या) दृष्टीने या विज्ञानाचा उपयोग काय' असा जर का आपला प्रश्न असेल तर तो कदाचित रास्त ठरेल, परंतु तो पूर्णपणे वेगळा प्रश्न आहे. मला विश्वातील घडामोडींचे आकलन करून घ्यावयाचे आहे, त्याकरिता मला जर हे स्पष्टीकरण मिळाले तर तार्किकदृष्ट्या मला ते गृहीतकांशी सुसंगत आणि विश्वाच्या आकलनाकरिता परिपूर्ण वाटते, आणि त्या दृष्टीने माझ्या लेखी ते विज्ञान आहे. (अत्यंत प्राथमिक स्वरूपाचे विज्ञान असेल कदाचित, परंतु तरीही वि़ज्ञान आहे.) कदाचित विश्वातील विविध घडामोडींकरिता याहून अधिक तपशिलांत शिरून याहून भिन्न किंवा सखोल अशी वेगवेगळी स्पष्टीकरणे असू शकतीलही, आणि त्यांत अंतर्गत सुसंगती असल्यास विश्वाच्या त्यात्या अंगाचे स्पष्टीकरण देणारी विज्ञाने म्हणून मी त्यांना मान्य करेनही. परंतु विश्वाच्या एखाद्या घडामोडीचे (कदाचित वेगळे, कदाचित अधिक सखोल) स्पष्टीकरण देणारे दुसरे एखादे विज्ञान आहे म्हणून पहिल्या विज्ञानाचे विज्ञानत्व प्रश्नांकित होऊ नये

माझे मत थोडे वेगळे आहे. विश्वातील सर्व घडामोडींचे स्पष्टीकरण म्हणजे ईश्वर असे "गृहीतक" म्हणून मांडायला काहीच हरकत नाही. परंतु गृहीतक म्हणजे विज्ञान नव्हे असे वाटते. गृहीतकाच्या वापरातून वेगवेगळ्या उपपत्ती (हायपोथेसिस) मांडल्या जातात त्यांना विज्ञान म्हणतात आणि त्या उपपत्ती सत्य की असत्य हे वैज्ञानिक पद्धतीने पडताळून पाहिले जाते.
तुम्ही या गृहीतकावरून पुढे काही उपपत्ती मांडत नसाल तर हे गृहीतक निरुपयोगी आणि निरुपद्रवी आहे. परंतु अजून त्या गृहीतकावर आधारलेले विज्ञान मात्र बाहेर आलेलेच/तयार झालेलेच नाही.

धनंजय / आनंद घारे यांचे मत जाणून घ्यायला आवडेल.

नितिन थत्ते

वरील व्याख्या सामान्य उपयोगात नाही

वर निळ्या अक्षरात व्याख्या दिली आहे :
'विज्ञान म्हणजे विश्वाच्या घडामोडींच्या आकलनाकरिता मांडलेले तर्कसुसंगत मॉडेल'
ही व्याख्या सामान्य उपयोगात नाही. असामान्य असल्यामुळे "आकलन" शब्दाचीही व्याख्या देणे जरुरीचे आहे. "मॉडेल" शब्दाचीही व्याख्या जरुरीची आहे.

कारण कुठलातरी गृहीतकसंच मानून कुठलाही विधानसंच तर्कसुसंगत होतो -> अगदी "क्ष आहे आणि क्ष नाही" हेसुद्धा गृहीतक असल्यास तेही तर्कसुसंगत होते.

त्यामुळे वरील स्पष्टीकरणे मिळाली तर माझा हा गोंधळ कमी होईल.

नवीन व्याख्या करून "नवी व्याख्या विचार-संवादासाठी हल्लीच्या व्याख्येपेक्षा उजवी आहे" असे काम तत्त्वज्ञ नेहमी करत असतात. त्यामुळे या व्याख्येचा काय उपयोग पर्स्वेक्टिव्ह करतात, आणि तिचा प्रसार कसा करतात, याबद्दल कुतूहल आणि सदिच्छा आहेत. (प्रसार करताना "अशी व्याख्या केल्यामुळे तुमच्या विचारांसाठी अमुकतमुक सोय होईल" असा काही मुद्दा सांगितला जाईल, आधीच पटलेली उदाहरणे देऊन समजावले जाईल, "विज्ञान-नाही" अशी काही उदाहरणे देऊन समजावले जाईल, असे वाटते.) सध्या मात्र व्याख्या समजलेली नाही.

सहमत!

मीही अगदी हेच म्हंटले आहे. कुठलातरी गृहीतकसंच मानून कुठलाही विधानसंच तर्कसुसंगत होतो, त्यामुळे 'अवैज्ञानिक' ह्या संज्ञेला काही अर्थच उरणार नाही.

पण माझी आकलनशक्ती मर्यादित आहे असे विधान सदर विद्वान महाशयांनी केले.

वसुलि
वसंत सुधाकर लिमये

मर्यादित आकलनशक्ती

आकलनशक्ती मर्यादित असण्याचा दोष हा काही थोड्या दुर्भाग्यांचा दोष नाही. आपल्या सर्वांची आकलनशक्ती मर्यादित आहे, हे बहुतेक लोकांना प्राथमिक शाळेत जाणवते :-(

तरी आपण सर्व सारखे काहीतरी आकळायचा प्रयत्न करत असतो. सर्वांसाठी मर्यादेचे बंधन खरोखरचे असले, म्हणून हिरमुसून प्रयत्न थांबवण्यासाठी प्रयोजन नाही. :-)

प्रतिसाद पहिल्या पानावर दिसण्यासाठी.

प्रतिसाद पहिल्या पानावर दिसण्यासाठी.

हा प्रतिसाद वरील प्रतिसादाला नसून पर्स्पेक्टिव यांच्याच दुसर्‍या पानावरील खालच्या प्रतिसादाला आहे. पहिल्या पानावर दिसावा म्हणून ही हीन युक्ती

प्रतिसाद पहिल्या पानावर दिसण्यासाठी उघडझाप करण्याची सोय करतां येईल कां? ज्या वाचकाने वाचलेले आहेत ते प्रतिसाद त्याच्यासाठी झापलेले दिसावेत, जे वाचावयाचे राहिलेले आहेत ते उघडे दिसावेत असे काही तंत्र करतां येईल कां?

हा विचार कोठे कोणाकडे मांडावा ह्याची माहिती मला नाही, म्हणून येथे मांडला आहे. गै़र वाटल्यास काढून टाकावा.

धन्यवाद.

--
तमिळ्नाट्लेर्न्दु डैर्रक्टा मराट्टिदेडत्तुक्कु वंदु सेट्लान ओरु चिन्नमनिदनिन एळुत्तु यिदु!

हैयो हैयैयो!

झिंग

म्हणून म्हणतो की अध्यात्म, धर्म हे इतर अनेक विषयांप्रमाणेच झिंग चढवणारे विषय आहेत. ती झिंग केवळ अध्यात्मात बुडून जाणार्‍यालाच लागते अशातला भाग नाही तर त्यावर उठसुठ टिका करणार्‍यांना पण तितकीच लागते.

हे बाकी खर हं! ही झिंग आहे म्हणुनच प्रगती झाली.

माझ्या लेखी आपली हानी कुठे चालली आहे तर ती पर्यावरण संतुलन बिघडण्यात, सामाजीक साधन संपत्तीच्या (वीज, पाणी, रस्ते, कचरा, स्वच्छता आदी) व्यवस्थापनाचा अभाव, त्यातून निर्माण होणारी रोगराई यात आहे.

सहमत आहे.
प्रकाश घाटपांडे

सहमत!

म्हणजे ज्या इहलोकात आपण राहातो.,जो प्रत्यक्ष दिसतो, अनुभवता येतो, तो खोटा आणि जो "पाहिला ना देखिला ना कुणा अनुभावला" असा परलोक खरा !
तिथे अखंड ब्रह्मानंद,परमसुख आहे असे मानायचे.त्याच्या प्राप्तीसाठी सारा आटापिटा करायचा. केव्हढे हे वैपरीत्य! केव्हढा हा भ्रम!!
माणसाने भ्रामक गोष्टींच्या मागे लागावे लागावे म्हणजे किती ? काही सुमार?

ऍरिस्टार्कसने सूर्यकेंद्रित विश्वाचे मॉडेल इ. स. पू. २५० च्या सुमारास मांडले. ते अगदी आर्किमिडीजसारख्या (जो ऍरिस्टार्कसपेक्षा २५ वर्षांनी लहान होता आणि ज्याची आजही विश्वातल्या तीन श्रेष्ठ गणितज्ज्ञांमध्ये गणना होते, न्यूटन आणि गॉस हे इतर दोघे) लोकांपासून अगदी सामान्य माणसापर्यंत पुढची १८०० वर्षे कोणालाही पटले नाही. त्या सर्वांचा युक्तिवाद आपण केला तसाच होता. " जिथे सूर्य, चंद्र, ग्रह आणि तारे रोज पृथ्वीभोवती फिरताना दिसतात ते खोटे आणि सूर्य - तारे स्थिर आणि पृथ्वीसकट सर्व ग्रह सूर्याभोवती फिरतात, पृथ्वी स्वतःभोवती फिरते वगैरे गोष्टी खर्‍या मानायच्या.त्यासाठी मोठ्या मोठ्या आकड्यांचे खेळ करायचे. केवढे हे वैपरित्य! केवढा हा भ्रम! काही सुमार? छे! या सूर्यकेंद्रित विश्वाच्या मॉडेलमागे लागून (ऍरिस्टार्कसने) आपल्या आयुष्याची अपरिमित हानी करून घेतली बुवा!!"

विनायक

१०० टक्के सहमत

हा वास्तववादी विचार कुणाही सुबुद्ध माणसाला पटावा.पण वेदवाक्य, ऋषी मुनींची वाणी,संत महात्म्यांची वचने,जगद्गुरूंचे उपदेश या शब्दप्रामाण्यात गुरफटून गेल्याने पूर्वग्रहविरहित शुद्ध बुद्धीने विचार करता येत नाही.
छे:! या अध्यात्माच्या आहारी जाऊन मोक्षाच्या मागे लागल्याने आपली अपरिमित हानी झाली आहे बुवा!!

अगदी आदि शंकराचार्यांनीही जडवाद्यांशी युक्तिवाद करताना वेदप्रामाण्याचा, शब्दप्रामाण्याचा टेकू घेतला आहे. त्यांना मनुस्मृती शिरोधार्य होती. मनूची वचने औषध आहेत ही त्यांची उक्ती तर प्रसिद्धच आहे.

पटता तो टेक. नहीं तो रामटेक.

शंकराचार्यांनी

शंकराचार्यांनी "अग्नी थंड आहे असे १०० वेदांनी सांगितले तरी ते खरे नाही" असेही सांगितल्याचे वाचले आहे.

नितिन थत्ते

शंकराचार्यांचा तर्काला मुळीच विरोध नव्हता

शंकराचार्यांचा तर्काला मुळीच विरोध नव्हता. त्यांच्यामते जो तर्क ब्रह्मविद्याविरोधी आहे तो तर्कच नव्हे! वेदप्रामाण्य न मानणारे तर्कशास्त्र ते भ्रामक मानीत. त्यांच्यामते मोक्षप्राप्तीच्या साध्याला साधन होऊ शकत नाही असे तर्कशास्त्र दिशाभूल करणारे आणि मायात्मक आहे. म्हणूनच स्मृतिकारांचा आणि शंकराचार्यांचा न्यायशास्त्राला कडवा विरोध होता. त्यांनी नैय्यायिकांची "हैतुक" म्हणून हेटाळणी केली आहे. ह्याबाबत यनावाला व धनंजयांसारखे जाणकार अधिक माहिती देऊ शकतील असे वाटते.

पटता तो टेक. नहीं तो रामटेक.

आश्चर्य

पण वेदवाक्य, ऋषी मुनींची वाणी,संत महात्म्यांची वचने,जगद्गुरूंचे उपदेश या शब्दप्रामाण्यात गुरफटून गेल्याने पूर्वग्रहविरहित शुद्ध बुद्धीने विचार करता येत नाही.

लेखातील एकांगी सूर पाहून आश्चर्य वाटले. भारतीय संस्कृतीमध्ये गेल्या दोन-अडीच हजार वर्षांमध्ये लिहील्या गेलेल्या साहित्याला तत्वज्ञानाचे सबळ अधिष्ठान आहे. तुकाराम-गाथा नीट वाचल्यास त्यात मानसशास्त्रीय विचार आहेत असे आढळून येईल. गीतेचा विचारही एका अर्थाने कृष्णाचे अर्जुनाला काउन्सेलिंग असा करता येईल. म्हणूनच डॉ. आनंड नाडकर्णी यांच्यासारख्या मानसोपचारतज्ञाला गीतेवर विषाद-योगासारखे पुस्तक लिहावेसे वाटले. भक्तिमार्गामुळे समाजात निष्क्रियता वाढली हे विधान बिनबुडाचे आहे. कुठल्याही संतांनी काम न करता बसून रहा असा उपदेश दिल्याचे उदाहरण नसावे. आधी करावा प्रपंच नेटका असे रामदासांनीच म्हटले आहे. खरेतर दासबोध भारतातील म्यानेजमेंटचे पहिले पुस्तक असावे.

कधीकधी विज्ञानवादी एका वेगळ्या प्रकारच्या अंधश्रद्धेच्या प्रभावाखाली आहेत असे वाटते. विज्ञान उपयोगी आहे हे निश्चित पण मानवी आयुष्यासाठी विज्ञान हे एकमेव उत्तर नव्हे. सुदृढ मन हवे असेल तर त्याला नैतिक मूल्यांचे अधिष्टान लागते. साहित्य, कला यांची जोड लागते. तत्वज्ञानची कासही धरावी लागते. या सर्व गोष्टींची विज्ञानाकडे उत्तरे नाहीत.

काही शंका

म्हणजे ज्या इहलोकात आपण राहातो.,जो प्रत्यक्ष दिसतो, अनुभवता येतो, तो खोटा आणि जो "पाहिला ना देखिला ना कुणा अनुभावला" असा परलोक खरा !
तिथे अखंड ब्रह्मानंद,परमसुख आहे असे मानायचे.त्याच्या प्राप्तीसाठी सारा आटापिटा करायचा. केव्हढे हे वैपरीत्य! केव्हढा हा भ्रम!!
माणसाने भ्रामक गोष्टींच्या मागे लागावे लागावे म्हणजे किती ? काही सुमार?

जो "पाहिला ना देखिला ना कुणा अनुभावला" असा परलोक खरा नाही, हे मानायला जागा आहे, हे मान्य.

ज्या इहलोकात आपण राहतो (असे आपल्याला* वाटते), तो तरी खरा कशावरून? (*द्वितीयपुरुषी आदरार्थी अनेकवचनी नव्हे. प्रथमपुरुषी अनेकवचनी.)

"Cogito, ergo sum" ("मी विचार करतो, म्हणजे मी आहे") हा आधार मानून "मी खरा" हे जर मानले, तर ज्या वस्तू विचार करत नाहीत (असे पुन्हा आपल्याला वाटते, उदा. दगड, पाणी इ.) त्या नक्की खर्‍या कशावरून?

बरे, "या गोष्टींचा मला अनुभव येतो (उदा. दगडावर पाय आपटला तर ठेच लागून दुखते, पाणी अंगावर पडले तर ओले लागते आणि थंडी वाजते, वगैरे)" म्हणून त्या खर्‍या आहेत, असे मानले, तर अमली पदार्थांचे सेवन केल्यावर नाही नाही त्या गोष्टींचे अनुभव येऊ शकतात, त्याचे काय? "अनुभव" हे तरी वास्तवतेचे प्रमाण कशावरून मानायचे? (मुळात आयुष्य हे अमली पदार्थाप्रमाणे वागत नाही हे नेमके कोणी, कधी आणि कसे तपासले आहे?)

अमली पदार्थच कशाला, कोणत्याही कारणाने मेंदूतील रसायनांचे संतुलन बिघडले तरी भ्रम होऊ शकतात, आणि ते वास्तव वाटतात असे ऐकले आहे. मग "मेंदूतील रसायनांचे योग्य संतुलन" म्हणजे नेमके काय? बहुसंख्यांच्या मेंदूंतील रासायनिक समतोलाची सरासरी? मग एका विशिष्ट समतोलातून जी अनुभूती येते ते वास्तव आणि इतर समतोलांतून येतो तो भ्रम, हे नेमके कोणी आणि कशाच्या आधारावर ठरवले? हे मुळात गृहीतकच असावे काय? "दोन्ही प्रकारच्या संतुलनांतून येणार्‍या अनुभूती हे भ्रमच, फक्त वेगवेगळ्या प्रकारचे भ्रम, फक्त पैकी एक बहुमतातील भ्रम तर उर्वरित सर्व अल्पमतातील भ्रम" असे गृहीतक त्याऐवजी मांडले तर?

"चक्षुर्वै सत्यम्" हा जर खरेपणाचा आधार मानला, तर मृगजळांचे काय? स्वप्नांचे काय? होलोग्रामचे काय? "दिसते तसे नसते म्हणून जग फसते" ही म्हण कोणत्या भावाने?

"मी विचार करतो" असे जे मी म्हणतो (किंवा असे जे मला वाटते), त्याला आधार "मी विचार करतो" अशी मला अनुभूती येते हा आहे. मुळात "माझी अनुभूती" हाच प्रकार जेथे संशयास्पद आहे, तेथे "मी विचार करतो" हा तरी भ्रम नाही कशावरून?

आणि मग माझ्या अनुभूती, माझे विचार करणे हेच जर भ्रम असतील, तर "Cogito, ergo sum"च्या राज्यात "मी आहे" हेच मुळात खरे कशाच्या आधारे मानायचे? आणि "मी आहे" हेच जेथे संशयास्पद आहे, तेथे माझ्या अनुभूतीतले हे "जग आहे" याला तरी नेमका आधार काय?

इहलोक

ज्या इहलोकात आपण राहतो (असे आपल्याला* वाटते), तो तरी खरा कशावरून? (*द्वितीयपुरुषी आदरार्थी अनेकवचनी नव्हे. प्रथमपुरुषी अनेकवचनी.)

मान्य आहे. इहलोक हा सुद्धा मायावी/आभासी असू शकतो. वादापुरते आहे असे धरले तरी 'परलोक' ही आणखी एक (मानवनिर्मित) संकल्पना, असलेल्या गोंधळात आणखी भर टाकणे सोडून काय करते?

एका दृष्टीने बरे

म्हणजे ज्या इहलोकात आपण राहातो.,जो प्रत्यक्ष दिसतो, अनुभवता येतो, तो खोटा आणि जो "पाहिला ना देखिला ना कुणा अनुभावला" असा परलोक खरा !
तिथे अखंड ब्रह्मानंद,परमसुख आहे असे मानायचे.त्याच्या प्राप्तीसाठी सारा आटापिटा करायचा. केव्हढे हे वैपरीत्य! केव्हढा हा भ्रम!!
माणसाने भ्रामक गोष्टींच्या मागे लागावे लागावे म्हणजे किती ? काही सुमार?

यनावाला यांच्या मताशी सहमत आहे. मात्र वरील ओळींतील परलोक खरा व तिथेच खरे सुख आहे असे मानणे एका दृष्टीने बरे आहे. त्यामुळे इहलोकातला जन्मच शेवटचा असे मानून इथे मिळेल तसे/जमेल तसे ओरबाडून सुख मिळवण्याची अनिष्ट पद्धत फोफावणार नाही.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

इहलोकात सुख मिळवण्यात काही अडचण नाही

त्यामुळे इहलोकातला जन्मच शेवटचा असे मानून इथे मिळेल तसे/जमेल तसे ओरबाडून सुख मिळवण्याची अनिष्ट पद्धत फोफावणार नाही.

श्री आजानुकर्ण, जमेल तसे सुख ओरबाडणे मोक्षप्राप्तीच्या खटाटोपास पूरक नाही असे श्री यनावाला यांनी म्हटलेले नाही. त्यांनी एकाच मार्गाचा (नामजप) उल्लेख केला आहे. खाली त्यांचे वाक्य देत आहे.

ज्ञान नको,तप नको,संन्यास नको, संसाराचा त्याग नको.केवळ नामजप करा.

सुख ओरबाडण्याचे प्रयत्न भारताच्या इतिहासात जागोजागी आढळतात. निष्क्रियतेची ओढ असणे हेही सुखच आहे. निष्क्रियता स्वतःसाठी, इतरांसाठी नव्हे. इतरांच्या सक्रियतेतून स्वत:चे कल्याण करण्यास काही प्रत्यवाय नसावा. अन्यथा वर्णव्यवस्थेसारखी शोषक व्यवस्था कशी उदयास आली असती?

फन फ्याक्ट

महाराष्ट्रात भक्तीमार्गाची परंपरा ऐन भरात असतानाच शिवरायांचा उदय झाला. त्यांना रामदासांसारख्या संतांचा सहवासही लाभला होता. असे असूनही शिवराय निष्क्रीय का बरे राहिले नसावेत? बहुधा त्या काळी मराठी सायटी नसाव्यात. :प्

भक्तीमार्ग आणि शिवराय

महाराष्ट्रात भक्तीमार्गाची परंपरा ऐन भरात असतानाच शिवरायांचा उदय झाला.

भक्तीमार्गाची सुरुवात नामदेवांपासून (१२ वे शतक?) शिवराय आले १६व्या शतकात. मग भक्तीमार्गाचा प्रभाव ३५० वर्षे अजिबात का पडला नाही? त्यामुळे या दोन्ही गोष्टींमध्ये बादरायण संबंध आहे.

त्यांना रामदासांसारख्या संतांचा सहवासही लाभला होता.

शिवाजी रामदास किंवा तुकाराम यांना खरेच भेटले होते का किंवा कसे याबाबत अनेक उलटसुलट मते आहेत. अनेक सबळ पुरावे अशी भेट झाली नसल्याचे सिद्ध करणारे आहेत.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

स्पष्ट

मग भक्तीमार्गाचा प्रभाव ३५० वर्षे अजिबात का पडला नाही? त्यामुळे या दोन्ही गोष्टींमध्ये बादरायण संबंध आहे.
स्पष्ट झाले नाही. कुठल्या गोष्टींमध्ये संबंध आहे?

शिवाजी रामदास किंवा तुकाराम यांना खरेच भेटले होते का किंवा कसे याबाबत अनेक उलटसुलट मते आहेत. अनेक सबळ पुरावे अशी भेट झाली नसल्याचे सिद्ध करणारे आहेत.
कृपया संदर्भ असल्यास द्यावेत. रामदासांनी शिवरायांना लिहीलेले पत्र बरेच प्रसिद्ध आहे.

विषय भरणे अनिवार्य आहे.

स्पष्ट झाले नाही. कुठल्या गोष्टींमध्ये संबंध आहे?

भक्तीमार्ग आणि शिवाजी यामध्ये संबंध नाही.

हे दोन दुवे प्राथमिक संदर्भासाठी उपयुक्त ठरावेत. त्या दुव्यांमध्ये दिलेली काही पुस्तके मी वाचली आहेत. व तशा प्रकारचे संदर्भ काही लेखकांच्या लेखनातही आले आहेत.

दुवा १
दुवा २


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

विषय भरणे अनिवार्य आहे.

भक्तीमार्ग आणि शिवाजी यामध्ये संबंध नाही.
मूळ लेखात भक्तिमार्ग आणि निष्क्रियता यात जितका संबंध आहे तितकाच संबंध इथे असावा. :)
दुव्यांबद्दल आभार. यात भेट झाली किंवा नाही याबाबत साशंकता आहे. हा मुद्दा बाजूला ठेवला तरी रामदासांच्या कार्य आणि लिखाणाची शिवरायांना ओळख होती असे मानण्यास हरकत नसावी.

धनंजय यांचा हा लेखही वाचावा

श्री. धनंजय यांचा हा लेखही वाचनीय आहे.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

आभार

दुव्याबद्दल परत आभार. भारतीय समाजाची निष्क्रियता यामागे एकाहून अधिक कारणे आहेत आणि हा किचकट विषय आहे असे मत प्राथमिक वाचनावरून झाले.

एक व्यक्ति आणि समाज

श्री आरागॉर्न, शिवरायांचे कार्य हे महाराष्ट्रातील सक्रियतेचे एक उत्तम उदाहरण आहे. परंतु श्री यनावाला यांनी संपूर्ण ऐतिहासिक समाजाविषयी सामान्यीकरण करून भाष्य केले आहे. शिवरायांची सक्रियता पुढे टीकून राहिली असती तर महाराष्ट्र पारतंत्र्यात गेला नसता असेही वाटते. तेव्हा समाजाच्या संकिर्ण इतिहासाच्या संदर्भात चर्चाप्रस्तावाकडे पाहणे योग्य ठरावे.

..

भक्तिमार्गाचा उदय होण्याआधी भारतीय समाज फार सक्रिय होता असेही नाही. माझा आक्षेप काही पुरावा नसताना निष्क्रियतेचे खापर भक्तिमार्गावर फोडण्याला आहे.

पार्श्वभूमी

शिवयरायांच्या उदयाच्या पार्श्वभूमी मध्ये तात्कालिक मराठी समाज कर्मकांडे, बुवाबाजी यामुळे निष्क्रीय व आदिलशाही/निजामशाहीच्या गुलामीबाबत उदासीन बनत होता असे काहिसे वाचल्याचे स्मरते.

तुम्ही भारतात असाल तर तुमच्या भ्रमणध्वनीवर उपक्रम चे नवे लेख एस.एम.एस. ने मिळवण्यासाठी हे पाहा.

सुलभीकरण

श्री यनावाला, तुमच्या प्रस्तावातील कळकळीचा मी आदर करतो. परंतु प्रस्तावात भारतीयांच्या परंपरागत मानसिकतेचे सुलभीकरण झाले आहे, असे दुर्दैवाने माझे मत झाले आहे. भारतीय समाजाच्या बाबतीत मोक्षप्राप्ती जर अडथळा ठरली तर जगातील इतर विकासाच्या दृष्टीने मागे असलेल्या सर्वच समाजात मोक्षप्राप्तीचा सामान्यांना मोह पडलेला नाही, असे दिसते. तेव्हा आपल्या समाजाच्या अपयशाचे खापर केवळ मोक्षप्राप्तीवर फोडणे संयुक्तिक वाटत नाही.

दासबोधातल्या

नवविधाभक्ती नामक चौथ्या दशकातल्या तिसर्‍या समासात समर्थ काय म्हणतात ते पहा -

समास तिसरा. : . नामस्मरणभक्ति . . . . . .
॥ श्रीराम ॥
मागां निरोपिलें कीर्तन। जें सकळांस करी पावन । आतां ऐका विष्णोःस्मरण। तिसरी भक्ती ॥ १॥
स्मरण देवाचें करावें। अखंड नाम जपत जावें । नामस्मरणें पावावें। समाधान ॥ २॥
नित्य नेम प्रातःकाळीं। माध्यानकाळीं सायंकाळीं । नामस्मरण सर्वकाळीं। करीत जावें ॥ ३॥
सुख दुःख उद्वेग चिंता। अथवा आनंदरूप असतां । नामस्मरणेंविण सर्वथा। राहोंच नये ॥ ४॥
हरुषकाळीं विषमकाळीं। पर्वकाळीं प्रस्तावकाळीं । विश्रांतिकाळीं निद्राकाळीं। नामस्मरण करावें ॥ ५॥
कोडें सांकडें संकट। नाना संसारखटपट । आवस्ता लागतां चटपट। नामस्मरण करावें ॥ ६॥
चालतां बोलतां धंदा करितां। खातां जेवितां सुखी होतां । नाना उपभोग भोगितां। नाम विसरों नये ॥ ७॥
संपत्ती अथवा विपत्ती। जैसी पडेल काळगती । नामस्मरणाची स्थिती। सांडूंच नये ॥ ८॥
वैभव सामर्थ्य आणी सत्ता। नाना पदार्थ चालतां । उत्कट भाग्यश्री भोगितां। नामस्मरण सांडूं नये ॥ ९॥

आधीं आवदसा मग दसा। अथवा दसेउपरी आवदसा । प्रसंग असो भलतैसा। परंतु नाम सोडूं नये ॥ १०॥
नामें संकटें नासतीं। नामें विघ्नें निवारती । नामस्मरणें पाविजेती। उत्तम पदें ॥ ११॥
भूत पिशाच्च नाना छंद। ब्रह्मगिऱ्हो ब्राह्मणसमंध । मंत्रचळ नाना खेद। नामनिष्ठें नासती ॥ १२॥
नामें विषबाधा हरती। नामें चेडे चेटकें नासती । नामें होये उत्तम गती। अंतकाळीं ॥ १३॥
बाळपणीं तारुण्यकाळीं। कठिणकाळीं वृधाप्यकाळीं । सर्वकाळीं अंतकाळीं। नामस्मरण असावें ॥ १४॥
नामाचा महिमा जाणे शंकर। जना उपदेसी विश्वेश्वर । वाराणसी मुक्तिक्षेत्र। रामनामेंकरूनी ॥ १५॥
उफराट्या नामासाठीं। वाल्मिक तरला उठाउठी । भविष्य वदला शतकोटी। चरित्र रघुनाथाचें ॥ १६॥
हरिनामें प्रल्हाद तरला। नाना आघातापासून सुटला । नारायेणनामें पावन जाला। अजामेळ ॥ १७॥
नामें पाषाण तरले। असंख्यात भक्त उद्धरले । माहापापी तेचि जाले। परम पवित्र ॥ १८॥
परमेश्वराचीं अनंत नामें। स्मरतां तरिजे नित्यनेमें । नामस्मरण करितां, येमें- । बाधिजेना ॥ १९॥
सहस्रा नामामधें कोणी येक। म्हणतां होतसे सार्थक । नाम स्मरतां पुण्यश्लोक। होईजे स्वयें ॥ २०॥
कांहींच न करूनि प्राणी। रामनाम जपे वाणी । तेणें संतुष्ट चक्रपाणी। भक्तांलागीं सांभाळी ॥ २१॥
नाम स्मरे निरंतर। तें जाणावें पुण्यशरीर । माहादोषांचे गिरिवर। रामनामें नासती ॥ २२॥
अगाध महिमा न वचे वदला। नामें बहुत जन उद्धरला । हळहळापासून सुटला। प्रत्यक्ष चंद्रमौळी ॥ २३॥
चहुं वर्णां नामाधिकार। नामीं नाहीं लाहानथोर । जढ मूढ पैलपार। पावती नामें ॥ २४॥
म्हणौन नाम अखंड स्मरावें। रूप मनीं आठवावें । तिसरी भक्ती स्वभावें। निरोपिली ॥ २५॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे नामस्मरणभक्तिनिरूपणनाम . . . . समास तिसरा ॥ ३॥

ह्यातल्या पिवळ्या रंगाने रंगवलेल्या भागात समर्थ स्पष्टपणे सांगतात की तुमचे नित्यकर्म, कामधंदा, जेवणखाण, संसार काहीही सोडू नका. फक्त हे करीत असताना नामाचे अनुसंधान राहील असे पहा.
इतक्या अधिकाराने सांगितल्यावर अधिक काही बोलायला लागू नये असे वाटते. प्रत्यक्ष प्रयोगानेच प्रचिती यावी.

चतुरंग

धन्यवाद

श्री चतुरंग, रामदासांचे श्लोक/ अभंग येथे दिल्याबद्दल धन्यवाद. पण प्रस्तावात श्री यनावालाही असेच म्हणतात. प्रस्तावातील एक विधान खाली देत आहे.

ज्ञान नको,तप नको,संन्यास नको, संसाराचा त्याग नको.केवळ नामजप करा.

हो मग तेच तर सांगितले आहे रामदासांनी

तुमचं जे काही संसाराचं रहाटगाडगं आहे ते तसंच चालू राहूदे त्यात फक्त नाम घेणे ठेवा.

चतुरंग

खुलासा

तुमचं जे काही संसाराचं रहाटगाडगं आहे ते तसंच चालू राहूदे त्यात फक्त नाम घेणे ठेवा.

श्री चतुरंग, अधोरेखित क्रिया केल्याने सामान्य जनांस मोक्षप्राप्तीकडे जाता येईल असे संतांनी सांगितले, याबद्दल तुमचे व श्री यनावाला यांच्यात एकमत दिसत आहे. श्री यनावाला यांचा निष्कर्ष आहे की अशाने समाज निष्क्रिय बनतो. रामदासांनी समाज कशाने निष्क्रिय किंवा सक्रिय बनतो याविषयी पिवळ्या पार्श्वरंगातील ओळींमध्ये काही भाष्य केलेले दिसत नाही. त्यामुळे मला वाटले की दासबोधातील ओळींमुळे श्री यनावालांच्या नाम जप करा असे संतांनी सांगितले या मतास पुष्टी मिळते. मात्र त्यांच्या निष्कर्षास ओळींमुळे पुष्टी मिळते किंवा तुम्ही श्री यनावालांच्या निष्कर्षाशी सहमत आहात असे मी म्हणत नाही आहे, याची कृपया नोंद घ्यावी. श्री यनावालांच्या मांडणीस संत साहित्यातील पुराव्याची जोड दिल्याबद्दल पुनश्च आभारी आहे.

समाजाने फक्त नामच घेतले आणि काम केले नाही

तर तो निष्क्रीय बनेल आणि म्हणूनच रामदास सांगतात की तुमचा संसार/प्रपंच सोडू नका, ती कामे व्यवस्थित मार्गी लावणे हे तुमचे कर्तव्यच आहे त्याव्यतिरिक्त नामही घ्या ज्याने तुम्ही कर्तव्याला न चुकता उन्नती करु शकाल.
रामदास हे स्वतः अतिशय कर्तबगार होते सुतारकाम/गवंडीकाम कसे असावे इथपासून ते उत्तम अक्षर कसे असावे इथपर्यंत व्यवहार, राजकारण, समाजकारण, बलोपासना, अध्यात्म अशा अनेकविध विषयांत अधिकार प्राप्त केलेले ते व्यक्तिमत्त्व होते. अतिशय् नि:संदिग्ध शब्दात परखड उपदेश करावा तो त्यांनीच.

दासबोध दशक २ समास१ (मूर्खलक्षण) आणि समास २ (उत्तमपुरुषलक्षणे) वाचलीत तर समजते की आपल्या रोजच्या व्यवहाराचा किती सूक्ष्म आणि सांगोपांग विचार त्यांनी केला होता. इतका विचार करुन लिहिणारा माणूस निष्क्रीय रहा असे सांगेल किंवा सूचितही करेल असे मला मुळीच वाटत नाही.
फार कशाला हीच एक ओळ पहा -
विद्या वैभव ना धन। पुरुषार्थ सामर्थ्य ना मान । कोरडाच वाहे अभिमान। तो येक मूर्ख ॥ ३२॥
म्हणजे विद्या, वैभव, धन हे सगळे हवे त्याला कशालाही त्यांची ना नाहीये. मार्ग फक्त योग्य हवा आणि तो तसा रहावा ह्यासाठी नाम!

चतुरंग

रामदासांविषयी

अधिक माहिती मिळाली. धन्यवाद.

चुकीचा समज

या चर्चेचे शीर्षक वाचून मोक्षापेक्षा भक्तिमार्ग बरा असा काहीसा श्री. यनावाला यांचा संदेश असावा असा माझा ग्रह झाला होता. आपण वर दिलेले वाक्य अपुरे आहे. कारण श्री. यनावाला त्या वाक्याच्या पुढे काय म्हणतात ते बघा.

ज्ञान नको,तप नको,संन्यास नको, संसाराचा त्याग नको.केवळ नामजप करा. विठ्ठल विठ्ठल म्हणा. नामसंकीर्तनाने मोक्ष मिळवा.या भक्तिमार्गामुळे समाजात मोठ्या प्रमाणात निष्क्रियता वाढली.भजन-कीर्तनांद्वारे ब्रह्म,माया,शिवात्मा,जीवात्मा,पुनर्जन्म,संचित,प्रारब्ध ,ब्रह्म सत्यम् जगन् मिथ्या।
अहं ब्रह्माsस्मि| अशा अनेक भ्रामक संकल्पना सर्वतोमुखी झाल्या.
म्हणजे ज्या इहलोकात आपण राहातो.,जो प्रत्यक्ष दिसतो, अनुभवता येतो, तो खोटा आणि जो "पाहिला ना देखिला ना कुणा अनुभावला" असा परलोक खरा !
तिथे अखंड ब्रह्मानंद,परमसुख आहे असे मानायचे.त्याच्या प्राप्तीसाठी सारा आटापिटा करायचा. केव्हढे हे वैपरीत्य! केव्हढा हा भ्रम!!
माणसाने भ्रामक गोष्टींच्या मागे लागावे लागावे म्हणजे किती ? काही सुमार?

म्हणजेच मोक्षमार्ग आणि भक्तिमार्ग दोघांमुळे निष्क्रियता वाढली. त्यातल्या त्यात भक्तिमार्ग सामान्य माणसापर्यंत पोचल्याने सामान्य मनुष्य निष्क्रीय झाला. त्या आधी मोक्षमार्ग अगदी थोड्या लोकांपुरताच मर्यादित असल्याने थोडेच लोक निष्क्रीय झाले असावेत. त्यातूनही तर्कदृष्ट्या विचार केला असता दोन्ही मार्ग एकाच भ्रामक वस्तूच्या प्राप्तीचे मार्ग असल्याने सारखेच निरर्थक आहेत. त्यातही भक्तिमार्ग जास्त लोकांना निष्क्रीय बनवत असल्याने अधिक निंदनीय आहे असे काहीसे असावे.

म्हणजे मी स्वतः लेखकाचे मत मोक्षापेक्षा भक्तिमार्ग बरा असे असावे इथपासून दोन्ही सारखेच त्याज्य आणि त्याहीपुढे जाऊन भक्तिमार्ग जास्त लोकांना निष्क्रीय बनवत असल्याने जास्त त्याज्य यापैकी कोणते आहे याचा निर्णय करू शकलेलो नाही. हे लेखकाचे प्रस्ताव मांडण्याचे कौशल्य म्हणावे लागेल.

त्यातही लेखकाने इथे लोकांनी उपस्थित केलेल्या शंका, आक्षेप, प्रतिवाद यापैकी कशालाही उत्तर न देता पुलंची तीन वाक्ये समर्थनार्थ लोकांच्या तोंडावर फेकून पळ काढल्याने आता काही निश्चित उत्तर मिळायची आशाही संपली.

विनायक

 
^ वर