नकाशा आणि कुंडली

एका परिचिताला भेटायला मी त्याच्या घरी गेलो होतो, त्या वेळेस तो घरी नव्हता. त्याच्या शाळकरी मुलाने दरवाजा उघडला. "आई आणि बाबा थोड्याच वेळात येणार आहेत." असे मला सांगितले आणि तो पुन्हा आपल्या अभ्यासाला लागला. त्या वेळी तो भूगोलाचा गृहपाठ करीत होता. तो संपल्यावर त्याने वह्या, पुस्तके आणि नकाशे नीट जागेवर ठेवले आणि तो माझ्यासमोर येऊन बसला.
मी त्याला विचारले,"तुला भूगोल विषय आवडतो का रे?"
तो म्हणाला, "हो. जगाची खूप माहिती त्यातून आपल्याला मिळते."
"तुझ्याकडे अजून एखादा कोरा नकाशा आहे कां?"
"आहेत ना. नेहमीच ते लागतात म्हणून मी भरपूर नकाशे आणून ठेवले आहेत."
"एक घेऊन येशील? आईबाबा येईपर्यंत आपण एक खेळ खेळू."
मी त्याला विचारले, "तू नुकताच कोठल्या गांवाला जाऊन आलास?"
तो म्हणाला,"मागल्या महिन्यात आम्ही सगळे डेक्कन क्वीनने पुण्याला गेलो होतो."
मी म्हंटले, "अरे वा! मग आता आज पुण्याला जायला निघालेली दख्खनची राणी या वेळी कुठपर्यंत गेली असेल ते दाखव."
त्याने मनाशी थोडा विचार केला आणि खंडाळ्याच्या घाटाची जागा नकाशात दाखवली आणि मला म्हणाला, "आता तुम्ही लेटेस्ट कुठे गेला होता ते दाखवा."
"मी परवाच संध्याकाळच्या विमानाने कोलकात्याहून परत आलो. या वेळेपर्यंत ते विमान नागपूरच्या आसपास इथे कुठे तरी उडत असणार." असे सांगत मी नकाशावर खूण केली.

एवढ्यात त्याचे आईबाबा परत आले. आल्या आल्या वडिलांनी सांगितले, "एका आप्ताबद्दल मार्गदर्शन घ्यायला त्याची कुंडली घेऊन आम्ही आमच्या गुरूंकडे गेलो होतो.?"
मी म्हंटलं, " मला ती कुंडली पहायला देता का? मलाही त्यात काय काय दिसतंय् ते जरा पहायचंय्."
मी जास्तच आग्रह धरल्यावर त्या व्यक्तीच्या कुंडलीच्या घड्या घातल्या आणि त्याचे नांव, गांव, जन्मतारीख इत्यादी सर्व तपशील व्यवस्थितपणे झांकून फक्त कुंडलीची चौकट त्यांनी माझ्यासमोर धरली. त्यातल्या त्रिकोन चौकोनात मांडलेले १ ते १२ आंकडे आणि कुठेकुठे लिहिलेली र चं मं असली अक्षरे यातून मला काडीचाही बोध होणे शक्यच नाही याची त्यांना दोनशे टक्के खात्री होती.

त्या गृहस्थाने माझ्यासमोर धरलेली कुंडली थोडी पाहून होताच मी डोळे मिटून एक दीर्घ श्वास घेतला आणि खर्जाच्या आवाजात बोलायला सुरुवात केली. "मी त्या मुलाच्या जन्मकाळात गेलो आहे. रात्रीचा पहिला प्रहर आहे. सगळीकडे अंधार पसरला आहे. चंद्र अजून मावळायचा आहे. पण आकाशात ढगांची गर्दी असल्यामुळे फारसे चांदणे दिसत नाही. झांजा आणि टाळ्या वाजवून बरेच लोक आरत्या करताहेत. त्यात मोठ्या घंटांचा आवाज नाही. याअर्थी त्या आरत्या देवळात नसून घरोघरी चालल्या आहेत. सगळीकडे आरास केलेली दिसते आहे. हो, हा गणेशोत्सवच साजरा होत आहे. कांही जागी गौरींचे मुखवटेसुद्धा दिसत आहेत. इथपर्यंत बरोबर आहे ना?"

दोघांनीही थोड्या आश्चर्यानेच होकारार्थी माना डोलावल्या. मी पुढे सांगायला लागलो, "उत्सव सुरू आहे, पण त्यात नेहमीचा उत्साह दिसत नाही. सगळे लोक कसल्या तरी भीतीच्या दाट छायेत वावरत आहेत. या मुलाच्या घरातील वातावरण तंग आहे. जवळची कोणी व्यक्ती भूमीगत झालेली आहे किंवा बंधनात अडकली आहे. त्यामुळे इतर लोकांची अवस्था 'तोंड बांधून बुक्क्यांचा मार' अशागत झाली आहे. मुलाच्या जन्माचा आनंद गाजावाजाने साजरा करायच्या मनस्थितीत यावेळी कोणीही नाही."

जसजसे मी एक एक वाक्य हळू हळू बोलत होतो आणि त्या दोघांचे चेहेरे पहात होतो, त्यांच्या मनातले वाढते आश्चर्य त्यावर दिसत होते. भूतकाळातून हलकेच मी वर्तमानकाळात येऊन सांगितले, "हा मुलगा आता तिशीत गेला असला तरी अजून नीटपणे मार्गी लागलेला दिसत नाही. नेहमी धरसोड करण्याची त्याची वृत्ती आहे. कुठल्याही गोष्टीत तो उत्साहाने भाग घेत नाही. त्याच्या मनात कसली हौस, ऊर्मी, महत्वाकांक्षा नाही. कोणतेही काम करतांना त्याला आत्मविश्वास वाटत नाही. त्यामुळे सगळ्यांना त्याच्या भविष्याची काळजी वाटते."
"पण तुम्हाला इतकी तंतोतंत बरोबर माहिती कुठून मिळाली?" त्यांनी मला आश्चर्याने विचारले.
"अहो या कुंडलीमधून!"
"म्हणजे तुम्हाला ही माहिती कुंडलीमध्ये मिळाली?" त्यांचा विश्वास बसत नव्हता.
मी सांगितले, "तुम्ही जरी माझ्यापासून लपवून ठेवली असली तरी त्या मुलाच्या जन्माची वेळ मला या कुंडलीतल्या ग्रहांच्या जागांवरून मिळाली. त्या वेळी वर्षा ऋतु होता, गौरीगणपतीचा उत्सव सुरू होता, देशात आणीबाणीची परिस्थिती होती आणि त्याचा तुमच्या परिवारावर जबर आघात झाला होता हे सगळं सामान्यज्ञानावरून ओघानं माझ्या ध्यानात आलं. कुटुंबावर आलेल्या त्या संकटांसाठी या तान्ह्या मुलाला जबाबदार धरून आणि त्याला नतद्रष्ट अपशकुनी कारटं म्हणून त्याची अवहेलना आणि हेळसांड झाली असेल. अशा परिस्थितीत आणि वातावरणात वाढलेल्या मुलाच्या मनावर त्याचा काय परिणाम झाला असेल यावर मी मानसशास्त्राच्या आधाराने अंदाजाने खडे मारत राहिलो आणि ते नेमके लागत गेले एवढेच!"
"पण तुम्हाला त्या मुलाच्या जन्माची वेळ तरी कुंडलीवरून कशी समजली?"
"ते एक सरळ साधे विज्ञान आहे. ही जन्मकुंडली म्हणजे आभाळाचा एक नकाशा आहे आणि त्या मुलाच्या जन्माच्या वेळी कोणते ग्रह आकाशाच्या कोणत्या भागात होते ते त्यात दाखवलेले आहे. आता मी अमोलबरोबर खेळत होतो तेंव्हा भारताच्या नकाशावर या खुणा केल्या आहेत. मुंबईहून पुण्याला जाणारी दख्खनची राणी त्या वेळी कोठे धावत असेल आणि कोलकात्याहून मुंबईकडे येणारे विमान कोठे उडत असेल ते खुणा करून या नकाशात दाखवले आहे. या कुंडलीचे स्वरूप अगदी तसेच आहे. आणखी तासाभरात डेक्कन क्वीन पुण्याला पोचेल आणि विमान मुंबईला. म्हणजे त्यांच्या जागा बदलतील. त्याचप्रमाणे हे ग्रह आपल्या कक्षेत फिरत असतांना एका राशीतून दुसर्‍या राशीत जात असतात. आपल्याला त्यांच्या गती माहीत असतील तर त्यांच्या स्थानावरून वेळेचा हिशोब करता येतो."
त्यांना माझे सांगणे समजले नव्हते. ते म्हणाले, " तुम्ही या कुंडलीवरून इतक्या वर्षांपूर्वीची जन्मवेळ पटकन कशी काढली ते नीट सांगा."
मी सांगू लागलो,"त्यासाठी आधी तुम्हाला या कुंडलीचा ढोबळ अर्थ समजून घ्यावा सागेल. मघाशी मी सांगितलंच की कुंडली हा एका विशिष्ट वेळी आभाळातील ग्रहांची स्थिती दाखवणारा साधा नकाशा आहे. म्हणजे या मुलाचा जन्म ज्या वेळी झाला त्या वेळी कोणता ग्रह कुठल्या राशीमध्ये होता ते यांत दाखवले आहे. भूगोलातील नकाशा कसा काढायचा याचे कांही प्रमाणित नियम आहेत. कोणताही नकाशा आपल्यासमोर उभा धरला तर उत्तर दिशा नेहमी वरच्या बाजूला, दक्षिण दिशा खालच्या बाजूला, पूर्व आपल्या उजवीकडे आणि पश्चिम डावीकडे दिसते. मुंबई, दिल्ली, कोलकाता वगैरे गांवे त्यात वेगवेगळ्या दिशांना विखुरलेली दिसतात. कुंडली बनवण्यासाठी वेगळे नियम आहेत. यात आकाशगोलाचे बारा काल्पनिक समान भाग करून त्या भागांना बारा राशी अशी नांवे दिली आहेत. बाराव्या मीन राशीला लागून लगेच पुन्हा तिच्यापुढे पहिली मेष रास येते. अशा प्रकारे त्या बारा भागांची एक सलग साखळी बनते. एका आयताकृती आकृतीमध्ये त्रिकोन आणि चौकोन आंखून त्यात हेच भाग विशिष्ट तर्‍हेने बसवतात आणि त्यातील प्रत्येक खणातली रास अंकाद्वारे दाखवतात. उदाहरणार्थ मेष, वृषभ, मिथुन या राशी १, २, ३ अशा रीतीने दाखवतात. आकाशात या राशी ज्या क्रमाने दिसतात त्याच क्रमाने त्या कुंडलीत दाखवतात. त्याच क्रमाने सर्व ग्रहांचे या राशीमधून भ्रमण होत असते. त्याशिवाय संपूर्ण राशीचक्रच आकाशात सतत फिरत असते. एक एक रास क्रमाने पूर्वेला उगवते आणि पश्चिमेकडे सरकत जाऊन अखेर अस्त पावते. म्हणजे आता ज्या ठिकाणी मेष रास दिसते त्या जागी दोन तासानंतर वृषभ रास येईल, तिच्या जागी मिथुन वगैरे. यामुळे यातील प्रत्येक चौकोन व त्रिकोणातील आंकडे दर दोन तासांनी बदलत जातात, तसेच त्या राशीत असलेले ग्रह त्यांच्याबरोबरच कुंडलीमधल्या आपल्या जागा बदलत जातात. नकाशातील महाराष्ट्र, गुजरात वगैरे राज्ये आणि मुंबई, कोलकाता वगैरे गांवे आपापल्या जागी स्थिर असतात आणि त्यांच्या आधाराने आपण विमान किंवा आगगाडी कशी जाते हे दाखवू शकतो. पृथ्वीचा गोल (मॉडेल) आपण हाताने फिरवला तर त्यावर असलेले सारे खंड फिरतांना दिसतात. कुंडलीमधल्या राशी मात्र हळू हळू सरकत जात नेहमीच दर दोन तासांनी आपल्या जागा बदलतात आणि त्याशिवाय ग्रह एका राशीमधून दुसर्‍या राशींमध्ये जात असतात हा त्या दोन्हीमधला फरक आहे. त्यामुळे कुंडलीमध्ये दिलेली स्थिती ही फक्त एका विशिष्ट वेळेपुरती असते. ती एकदा बदलली की दुसर्‍या दिवशी त्याच वेळेस कदाचित येईल. तिसरे दिवशीपर्यंत चंद्राने रास बदललेली असते, महिनाभरात रवी, बुध आणि शुक्र हे ग्रह सरकतात आणि कालानुसार इतर ग्रह पुढील राशीत जात असतातच. यामुळे आपल्या आयुष्यभरात एकच स्थिती सहसा पुन्हा कधी तशीच्या तशी येत नाही,

नकाशा व कुंडली: आनंद घारे
नकाशा व कुंडली: आनंद घारे

आता ही कुंडली पहा. या कुंडलीमधील वरचा चौकोन लग्नरास दाखवतो. याचा अर्थ पूर्वेच्या क्षितिजावर जिथे सूर्य रोज उगवतो तिथे त्या वेळी अमूक रास होती. त्याच्या खालील चौकोनात पश्चिमेच्या क्षितिजावरील रास दिसते. उजवीकडच्या बाजूला दिसणार्‍या सगळ्या राशी त्या वेळी आभाळात होत्या आणि डावीकडच्या राशी मावळलेल्या होत्या. या कुंडलीत सूर्य डावीकडल्या घरात दिसतो, म्हणजे तो तासा दोन तासापूर्वीच अस्ताला गेला होता. त्यामुळे रात्रीच्या आरत्यांची वेळ झाली होती. चंद्र उजवीकडे दुसर्‍या घरात दिसतो. त्याला मावळायला अजून तीन चार तास अवकाश होता. प्रत्येक अमावास्येच्या दिवशी सूर्य व चंद्र आभाळात एकाच ठिकाणी येतात. सूर्यप्रकाशाने उजळलेला चंद्राचा अर्धा भाग पृथ्वीच्या विरुद्ध दिशेला असतो. चंद्राच्या पृथ्वीकडील बाजूवर सूर्यप्रकाश न पडल्याने काळोख असतो. शिवाय त्यावेळी सारे आभाळ सूर्याच्या प्रकाशाने उजळलेले असते. त्यामुळेच अमावास्येच्या दिवशी आभाळात सूर्य़ाच्या शेजारीच असलेला चंद्र आपल्याला दिसत नाही. त्यानंतर तो दररोज पन्नास मिनिटे सूर्याच्या मागे पडत जातो. या कुंडलीतला चंद्र सूर्यापासून तीन राशी दूर गेला आहे याचा अर्थ त्या दिवशी शुद्धपक्षातील सप्तमी किंवा अष्टमी ही तिथी होती. वेळ समजली आणि तिथी समजली. त्या वेळी सूर्य सिंह राशीत होता याचा अर्थ भाद्रपद महिना सुरू होता. म्हणजे गणपती आणि गौरीचे उत्सव सुरू होते. अशा रीतीने सूर्य व चंद्र यावरून अंदाजाने महिना, तिथी आणि वेळ मला समजली."
"पण तुम्हाला वर्ष कसं समजलं?"
"त्यासाठी गुरू आणि शनी या दूरच्या ग्रहांचा उपयोग होतो. गुरू आपल्या कक्षेतील भ्रमण बारा वर्षात पूर्ण करतो. त्यामुळे तो एका राशीत एक वर्षभर राहतो आणि दर बारा वर्षांनी पुन्हा सुरुवातीच्या राशीत परत येतो. या कुंडलीमध्ये गुरू ग्रह आजच्या मानाने २ घरे पुढे दिसतो. बारा वर्षांपूर्वी तो आजच्याच राशीत होता. म्हणजेच या कुंडलीतल्या जागेवर तो १० , २२ आणि ३४ वर्षापूर्वी होता. त्या वेळी शनी आजच्या मानाने १ घर मागे होता. त्याला एक रास ओलांडून जायला तब्बल अडीच वर्षे लागतात. त्यामुळे तोसुद्धा कुंडलीत दाखवलेल्या जागी ३-४ किंवा ३३-३४ किंवा ६३-६४ वर्षापूर्वी होता. या दोन्ही गोष्टी पाहिल्यावर ३३-३४ वर्षापूर्वीचा काळ निश्चित होतो. म्हणजे वर्ष. महिना, तिथी आणि वेळ या सगळ्या गोष्टींचा अंदाज मला या कुंडलीवरून आला. कुंडली म्हणजे काय हे माहीत असेल तर एवढी माहिती कळायला कितीसा वेळ लागला?"
-----------------------------------------------------

या गोष्टीतली संवाद काल्पनिक असले तरी दिलेली शास्त्रीय माहिती खरी आहे.

Comments

आनंद्शास्त्री घारे

वा वा आनंद शास्त्री घारे. उत्तम विवेचन. एकाने मला सांगितले कि ज्योतिषी खरा कि खोटा हे ओळखण्यासाठी राहु केतु एकत्र लिहायचे. मी त्याला म्हटले नकाशात मुंबईच्या जागी पुणे लिहिले तर तुला समजेले की नाही? तो हो म्हणाला. मग तसच ही कुंडली म्हणजे जन्मवेळचा नकाशा आहे. लहान मुलाची कुंडली घेउन ज्योतिषाला तु माझी आहे म्हणुन खोटा सांगितल तर तो ज्योतिषशास्त्राचा अवमान केला याची फळे भोगावी लागतील अशी भिती तो तुला घालेल व खर काय ते सांगेल.

प्रकाश घाटपांडे

सोप्या भाषेतला

कुंडलीची तोंडओळख करून देणारा लेख आवडला. कृपया क्रमशः लेखमाला लिहावी.

विनायक

फारच सुन्दर

कथेच्या आधारे कुन्डलीची माहीती सांगणारी पध्दत आवडली.

अजून येऊद्या.

अपेक्षेप्रमाणे घारेसरांनी एरवी क्लिष्ट वाटणारी माहिती रोचक पद्धतीने मांडली आहे.
अजून येऊद्या.
एखाद्या कुंडलीचे चित्र सोबत असते तर समकजायला अधिक सोपे गेले असते असे वाटले.

ऋषिकेश
------------------
समाजातली सामाजिक जाणीवही अगदी नसल्यातच जमा आहे. सुस्त, मद्दड जनता गोळाभर अन्न गिळून, टीव्हीवरच्या मालिका बघून झोपी जात आहे - सन्जोप राव

वा वा!

आनंद घारे यांचा, त्यांच्या शैलीला आणि लौकिकाला जागणारा लेख....

खूप आवडला. खरे तर इतक्या सोप्या भाषेत कुंडली वगैरे सारे समजावून सांगितले तर कोण त्यांना (म्हणजे कुंडली, भविष्य सांगणारे यांना) यापुढे नावे ठेवेल?

ऋषिकेश म्हणतो त्याप्रमाणे चित्र खरेच हवे होते. अजून स्पष्ट झाले असते.
कृपया देता आले तर प्रतिसादात द्यावे.

-सौरभ.

==================

जन्ममास कसा कळणार?

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.आनंद घारे यांचा लेख वाचून मी स्तंभित झालो. कुंडलीच्या पहिल्या घरात(तनु स्थान) लग्नरास नोंदवतात, पुढे क्रमाने अकरा राशी लिहितात, तसेच जन्मसमयी कोणते ग्रह कोणत्या राशीत आहेत तेही कुंडलीत असते.हे सर्व माहीत होते.पण रवि-चंद्र यांच्या स्थानांवरून जन्म शुक्ल पक्षात की वद्य पक्षात हे सहज ओळखता येते,जन्मतिथीचा अंदाज करता येतो, गुरु शनी यांची आजची गोचरस्थिती ठाऊक असेल तर पत्रिकेतील स्थानांवरून व्यक्तीच्या वयाचा अंदाज बांधता येतो, याची कल्पनाही नव्हती.हा लेख वाचून हे सर्व सहजतेने समजले.श्री.आनंद घारे यांना शतशः धन्यवाद!

सुंदर् लेख

वाचनीय लेख.

:-)

सुंदर लेखमाला

लेखमाला अतिशय सुंदर आणि सहज आहे.
पुढच्या भागात चित्रे ही आहेत. घारेजींच्या ब्लॉग वर आधी वाचले होते
.http://anandghan.blogspot.com/2008_10_01_archive.html
-आनंद कानडे.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

मस्त लेख!

फलज्योतिष किंवा पत्रिकेच्या आधारे भविष्य वर्तवायची कला याबद्दल फारशी माहिती नाही. पण ज्योतिष म्हणजे गणित आणि पत्रिका म्हणजे आकाशगोलाचा 'भूगोल' हे माहीत होते. लेख वाचताना खूपच मजा आली. खरं म्हणजे लेख वाचताना आपण एखाद्या खजिन्याच्या शोधात भाग घेतो आहोत असेच वाटत होते. प्राचीन काळी ज्योतिषाचा मुख्य हेतू कालगणना हा होता असे ऐकले होते त्याची आठवण झाली.
लेख फारच आवडला. या विषयावर आणखी लेख वाचायला नक्कीच आवडेल.

--अदिती

-------------------------------------
वीज कडाडुन पडता तरुवर कंपित हृदयांतरि होती
टक्कर देता फत्तर फुटती डोंगर मातीला मिळती
झंझावातापोटी येऊन पान हलेना हाताने
कलंक असला धूऊन टाकणे शिवरायाच्या राष्ट्राने

भविष्यवाणी

फलज्योतिष किंवा पत्रिकेच्या आधारे भविष्य वर्तवायची कला या गोष्टीवर माझा विश्वास नाही. मला फक्त ऍस्ट्रॉनॉमीमध्ये किंचित रस आहे. ऍस्ट्रॉलॉजीमध्ये नाही.

चित्र

उपक्रमावर थेट चित्र देता येत नाही. त्याचा दुवा द्यावा लागतो. यात घोटाळा होऊ नये म्हणून मी ते दिले नव्हते. आता ते खाली देण्याचा एक प्रयत्न करीत आहे.

वर्तुळात्मक व पारंपरिक कुंडली
Horoscope

उत्तम

लेख आणि चित्रही आवडले.

कुंडली म्हणजे नकाशा असतो हे माहिती होते, पण इतकी माहिती एकाच लेखातून मिळाली. समजून घेत आहे.

छान लेख

गणित ज्योतिषाबद्दल मला नेहमीच कुतूहल आणि आस्था वाटत आली आहे.

आकाशाचा ग्रहणवर्तुळाच्या स्थानांचा (एक्लिप्टिक) नकाशा सूत्ररूपाने चौकोनी कागदावर मांडयची युक्ती फारच कल्पक आहे.

कथारूपाने नकाशाची ओळखही फार चांगली उतरली आहे.

उत्कृष्ट मांडणी

कुतुहल वाटणार्‍या विषयाची सुटसुटीत मांडणी केल्याने विषय चांगला समजला.

एक शंका - अक्षांशांचा विचार या खगोलगणितात मुळीच केला जात नाही काय?
(रेखांशांमुळे अनेक मिनिटांचा फरक पडतो. तसा अक्षांशांमुळे मुळीच पडत नाही काय? कृपया समजावून सांगावे.)

खगोल गणित

मला फक्त कुंडली कशी तयार करतात एवढे माहीत आहे. त्यासाठी पंचांगात प्रमाण जागा दिलेली असते, तसेच कांही मोठ्या शहरासाठी सूर्योदयाच्या वेळा वगैरे कांही पंचांगात दिलेल्या असतात. कुंडली तयार करण्याच्या सॉफ्टवेअरमध्ये अक्षांश व रेखांश हे दोन्ही द्यावे लागतात. माझी धाव त्यापुढे कधी गेली नाही.

आकाशगोलाचे अक्षांश

वरील प्रतिसादात मी पृथ्वीच्या अक्षांश व रेखांशाबद्दल लिहिले आहे. आपल्या डोक्यावरचे संपूर्ण तारामंडळ ध्रुवतार्‍याभोवती फिरत असलेले दिसते. त्या गोलाचे अक्षांश व रेखांश काढले तर त्याच्या प्रत्येकी तीस रेखांशामधून एक रास बनते. त्यातील अक्षांशाचा उल्लेख कुंडलीत होत नाही. उत्तर ध्रुवावर गेल्यास बाराच्या बारा राशींचा उत्तरेकडील अर्धा भाग एका वेळी पहायला मिळेल आणि उरलेला अर्धा भाग कधी दिसणारच नाही.

अक्षांश : आणखी माहिती

इतरत्र (म्हणजेच विकी आणि गूगलवर) ;) शोधले. काही पाश्चात्य कुंडली पद्धती अक्षांशांचा विचार करतात असे आढळले.
कोच आणि प्लाचिडियन 'गृह' पद्धतीत (House Systems)असा विचार केला जातो. (हे आणि हेही पहा)
भारतात असा विचार केला जातो का? अभ्यासकांनी खुलासा करावा.

उत्तम लेख

लेख कालच वाचला होता पण प्रतिसाद देण्यास आत्ता वेळ झाला. सोप्या भाषेतला माहितीपूर्ण लेख खूपच आवडला. अशा पद्धतीचे आणखी लेख येऊ द्यात.

सहमत

आहे, लेख अतिशय आवडला. याबद्दल अधिक वाचायला आवडेल.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

विसुनाना आणि ऋषिकेशशी सहमत

विसुनाना आणि ऋषिकेशशी अगदी सहमत. उपक्रमाच्या सत्याग्रही व पुरोगामी परंपरेला धरून दिलेले फलज्योतिषाची 'पोल' खोलणारे तुमचे प्रतिसाद तर भयंकर आवडले होते.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

छान लेख

आनंदराव.
लेख खूपच सुंदर आणि माहितीपूर्ण आहे. ज्योतिषशास्त्रातील क्लिष्ट गणित इतके सोपे करून सांगितले त्याबद्दल आभार.

हा लेख वाचून या विषयाबद्दल असलेले कुतूहल आणखी वाढले. खरंच, या विषयावर लेखमाला लिहा. आमच्या ज्ञानात अमूल्य भर पडेल.

चित्र कुंडलीचे

Swair Thokatalyache Bharud
आडवी कुंडली उभी केली की समजायला सोपी जाते. आमचे ज्येष्ठ मित्र व गुरु कै. माधव रिसबुड यांच्या फलज्योतिष शास्त्र म्हणजे केवळ स्वैर ठोकताळ्यांचे भारुड या पुस्तकातील चित्र पहा खर तर या निमित्ताने हे दुर्मिळ पुस्तक इथे द्यायला हव. असो
(निरुत्साही)
प्रकाश घाटपांडे

सुंदर चित्र

हे छान चित्र मी लिहिलेल्या गोष्टी अधिकच स्पष्ट करते.
एक महत्वाची गोष्ट अशी आहे की आकाशात असलेल्या राशींचा क्रम पश्चिमेकडून पूर्वेकडे घड्याळाच्या उलट (अँटिक्लॉकवाइज) दिशेने वाढत जातांना दिसत आहे. याचाच अर्थ सर्व ग्रह आपल्या डोळ्यांना रोज रात्री पूर्वेकडून पश्चिमेकडे जातांना दिसत असले तरी ते राशीचक्रात पश्चिमेकडून पूर्वेकडे जात असतात. त्यामुळे ते आपल्याला इतर तार्‍यांच्या मानाने मागे पडतांना दिसतात. सूर्य रोज एक अंश मागे पडतो तर चंद्र तब्बल तेरा अंशाने मागे जात रोज नक्षत्र बदलतो.

शंका

आपण दिलेल्या चित्राचा संदर्भ घेता, कुंडलीच्या लग्न घरात (१ लिहिलेल्या घराला असेच म्हणतात ना?) कोणत्या राशीचा क्रमांक येणार? मिथुम की कर्क? म्हणजे ३ की ४?
मिथुन असावी असं मला वाटतंय पण साशंक आहे.

नैसर्गिक कुंडली

समजण्याच्या सोयी साठी येथे आकृती क्रमांक १ मधील खालील आकृती प्रथमस्थानात लग्नरास ही मेष(१) घेतली आहे. राशीचा आकडा स्थानात लिहिण्याची पद्धत आहे. पण वरील आकृतीत मात्र पुर्वक्षितिजावर मिथुन रास उगवलेली आहे. वर्तुळाच्या बाहेरील आकडा राशीचा आहे तर वर्तुळाच्या आतील आकडा स्थानाचा आहे. ( जरा गोंधळच झाला आहे इथे) अवकाश गोल म्हणजे एक कलिंगड आहे असे मानले तर त्याचे समान १२ खाप करायचे.म्हणजे एक फोड झाली ३० अंश ची. थोडक्यात अवकाशगोलातील ३० अंशांचा दक्षिणोत्तर पट्टा म्हणजे रास्. आता अवकाश गोल हे एक कलिंगड मानुन तुम्ही जमीनवरुन अवकाशात पहात असलेला अर्धा गोलार्ध (उदित) व पायाखाली पाताळात (अनुदित) असणारा गोलार्ध हा मिळुन बारा राशी. पुर्वेकडे तोंड करुन उभे रहा. क्षितिजाला चिकटलेला पुर्व बिंदु म्हणजे लग्न बिंदु आकाशाकडे पहात तोंड मागे न्या पश्चिम क्षिताजापर्यंत . डोक्यावरचा बिंदु म्हणजे दशम स्थान . पश्चिम क्षितिजावर सप्तमस्थान . आता अंदाजाने अवकाशाच्या सहा फोडी करा. डोक्यापासुन पुर्व क्षितिजापर्यंत ३ व पश्चिम क्षितिजापर्यंत ३ एकुण सहा राशीत १८० अंश पुर्ण.
प्लॅनेटोरियम मधे जसे घुमटावर पुर्वेकडुन पश्चिमेकडे मावळणारे तारे सरकत जातात त्या विवक्षित ३० अंशाच्या पट्टयाला रास मानुन असा पट्टा सरकत जातो २४ तासात १२ राशी प्रत्येक रास २ तास
प्रकाश घाटपांडे

हम्म

राशीचक्र थोडक्यात समजावून सांगितल्याबद्दल धन्यवाद.

मिथुन

माझ्या मते या चित्रात मिथुन रास उगवलेली दिसत आहे, कर्क रास अजून जमीनीच्या खाली आहे. क्षणभरानंतर ती रास लग्नरास बनेल. सीमारेषेवर नेहमीच थोडा संभ्रम असतो

संभ्रम

सीमारेषेवर नेहमीच थोडा संभ्रम असतो.

अश्यावेळी नेमकं काय करतात? आधीची रास, जी उदित आहे, तिलाच पहिली रास मानतात का?

माहीत नाही

आकाशात प्रत्यक्षात रेघा मारलेल्या नाहीत. त्याची बारा राशींमध्ये केलेली विभागणी काल्पनिक आहे. त्यातसुद्धा मतभेद आहेत. पाश्चिमात्य लोकांच्या गणितानुसार सूर्य २१-२२ तारखेकडे एका राशीतून दुसर्‍या राशीत जातो तर भारतीय पद्धतीनुसार त्याची सगळी संक्रमणे १४-१५ तारखेच्या सुमारास येतात. जे लोक कॅलेंडरे, पंचांगे वगैरे तयार करतात ते त्यांच्या परंपरागत पद्धतीनुसार हे ठरवतात. त्यात नैसर्गिक असे काहीसुद्धा नाही.

धन्यवाद

माझ्या लेखाला मिळालेले प्रतिसाद वाचून मला धन्य वाटले. त्यातले 'लौकिक' वगैरे शब्द वाचून थोडे अवघडल्यासारखे होते. कारण या क्षेत्रात मला कोणी साधे ओळखत असेल असे मला वाटत नाही. मी एक मेकॅनिकल इंजिनीअर आहे आणि माझा सर्व जन्म लोखंडाशी ठाकठूक करण्यात घालवला आहे. (त्यामुळे कधी कधी नकळत माझ्या हातात हातोडा येत असेल). इतर विषयात प्राविण्य मिळवण्याइतका माझा अभ्यास नाही. त्यामुळे लेखमाला करणे थोडे कठीण आहे, पण जमेल तसे आणि सुचेल तसे लिहिण्याचा प्रयत्न करीन. सर्व प्रतिसादलेखकांना धन्यवाद

वा...

मला फार आवडला हा लेख!!! मस्तच लिहीलाय, आणि संवादांमुळे अजुन मजा आली!

छानंच!

सोप्या शब्दात सुंदर माहिती. लेख खूप आवडला.

 
^ वर