फलज्योतिषचिकित्सकांना काही प्रश्न

नाडीपरीक्षेत विषयांतर नको म्हणून चिकित्सकांनी माझ्या प्रश्नांची उत्तरे द्यायचे प्रलंबित ठेवले (सोप्या मराठीत टाळले) म्हणून हा वेगळा लेख. इथे उत्तरे दिली तर विषयांतर होणार नाही. पण उत्तरे नेमकी, थोडक्यात आणि स्पष्ट असावीत आणि ती इथेच द्यावीत ही माझी भूमिका कायम आहे.

१. काही ज्योतिष्यांची काही भाकिते संख्याशास्त्रीय शक्यतेपेक्षा जास्त खरी होतात हे आपल्याला मान्य आहे का?
२. अश्या भाकितांबद्दल काकतालीय न्यायाशिवाय अन्य काही स्पष्टीकरण आपल्याजवळ आहे काय?
३. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे लोक जसे हातातून लिंबे, उदी काढून दाखवून ती हातचलाखी असल्याचे दाखवून भोंदू साधूंचा पर्दाफाश करतात तसा फलज्योतिषचिकित्सक फलज्योतिष्यांचा करतात का?
४. संख्याशास्त्रीय शक्यतेपलिकडे नक्की किती टक्के भाकिते खरी झाली म्हणजे फलज्योतिष हे शास्त्र होते? (एक उदाहरण म्हणून)३५% खरी झाली तर शास्त्र आणि २५% झाली तर थोतांड हे कोणी ठरवले?माझ्या समजुतीप्रमाणे अगदी एका ज्योतिषाचे एक भाकित जरी खरे ठरले तरी त्यावर अधिक संशोधन करणे आवश्यक होते.
५. खर्‍या होणार्‍या भाकितांबद्दल अधिक संशोधन करण्याची गरज आहे असे आपल्याला वाटते का?
६. नसेल तर आतापर्यंत झालेल्या संशोधनानुसार तर या भाकितांचे स्पष्टीकरण देता येणे शक्य आहे का?
७. हे शास्त्र थोतांड आहे इतकेच नव्हे तर सामान्य अडाणी जनतेला फसवण्यासाठी ब्राह्मणांनी तयार केले आहे असे एका थोर महात्म्याचे विचार आपण एका संकेतस्थळावर दिले होते त्याच्याशी आपण सहमत आहात का? महात्म्यांच्या विचारात शास्त्रीय विचार किती आणि ब्राह्मणद्वेष किती याचा सारासार विचार न करता केवळ फलज्योतिषविरोधी आहे इतक्याच भांडवलावर आपण त्याला उचलून धरलेत असा आक्षेप कोणी घेतला तर आपले काय उत्तर आहे?

कृपया "माझा हा लेख वाचा आणि तो लेख वाचा" असली मोघम उत्तरे न देता स्पष्ट अणि थोडक्यात उत्तरे इथेच द्यावीत ही विनंती.

विनायक

लेखनविषय: दुवे:

Comments

कोण महात्मा?

हे शास्त्र थोतांड आहे इतकेच नव्हे तर सामान्य अडाणी जनतेला फसवण्यासाठी ब्राह्मणांनी तयार केले आहे असे एका थोर महात्म्याचे विचार आपण एका संकेतस्थळावर दिले होते त्याच्याशी आपण सहमत आहात का? महात्म्यांच्या विचारात शास्त्रीय विचार किती आणि ब्राह्मणद्वेष किती याचा सारासार विचार न करता केवळ फलज्योतिषविरोधी आहे इतक्याच भांडवलावर आपण त्याला उचलून धरलेत असा आक्षेप कोणी घेतला तर आपले काय उत्तर आहे

?

काका, हे महात्मा कोण? ज्योतीबा फुले की मोहनदास गांधी? हे दोघे अ-ब्राह्मण असल्याने आपण ही विधाने करत आहात का की महात्मा हा शब्द स्वस्त झाला आहे? हे जे महात्मा आहेत त्यांच्या ब्राह्मणद्वेषाचा संदर्भ द्या. उठसूठ सगळेच ब्राह्मणद्वेष का करतात ते ही सांगा.

आपला,
राजू.

आधार?

उठसूठ सगळेच ब्राह्मणद्वेष का करतात ते ही सांगा.

'ऊठसूट सगळेच ब्राह्मणद्वेष करतात' या विधानामागील आधार कळू शकेल काय?

संदर्भ?

हे शास्त्र थोतांड आहे इतकेच नव्हे तर सामान्य अडाणी जनतेला फसवण्यासाठी ब्राह्मणांनी तयार केले आहे असे एका थोर महात्म्याचे विचार आपण एका संकेतस्थळावर दिले होते त्याच्याशी आपण सहमत आहात का?

नेमका संदर्भ मिळू शकेल काय? किमानपक्षी ज्या संकेतस्थळावरील ज्या लेखात दिले आहे त्याचा दुवा वगैरे? त्यायोगे मागीलपुढील संदर्भ तपासून विधान योग्य 'पर्स्पेक्टिव'मध्ये घेऊन काय तो सोक्षमोक्ष लावता येईल.

अजून काही संदर्भ

१. काही ज्योतिष्यांची काही भाकिते संख्याशास्त्रीय शक्यतेपेक्षा जास्त खरी होतात हे आपल्याला मान्य आहे का?

ह्याचा संदर्भ द्याल का? कोणा एका जोतिष्याने मारलेला तुक्का लागला म्हणून काही लगेच संख्याशास्त्रीय शक्यतेपेक्षा जास्त म्हणता येत नाही.सातत्याने बर्‍याच जोतिष्यांनी केलेली भाकिते खरी झाल्याचा दुवा द्या.

२. अश्या भाकितांबद्दल काकतालीय न्यायाशिवाय अन्य काही स्पष्टीकरण आपल्याजवळ आहे काय?

काकतालीय न्याय ह्या शब्दाची गंमत वाटली. आंतरजालीय काकांचा ह्या तालाशी काही संबध आहे का?

-वसुलि
वसंत सुधाकर लिमये

काही उत्तरे

मी खुद्द फलज्योतिषचिकित्सक नाही (म्हणजे या बाबतीत चिकाटी असण्याइतपत रस मला नाही). पण या बाबतीत संख्याशास्त्रीय मत मी मागे विचारपूर्वक दिलेले आहे (भारतीय ज्योतिषविषयक पद्धतीचा मतिमंदतेच्या संदर्भात अभ्यासप्रकल्प, भाग १, भाग २). म्हणजे काही प्रमाणात अशा चिकित्सेबाबत मला रस आहे. त्यामुळे वरील प्रश्नांना उत्तर देण्यास मी पात्र आहे की नाही, या बाबतीत मला संभ्रम आहे. आणि तेवढ्यात येथे दोन दुवेसुद्धा येऊन गेले आहेत, म्हणजे...

१. काही ज्योतिष्यांची काही भाकिते संख्याशास्त्रीय शक्यतेपेक्षा जास्त खरी होतात हे आपल्याला मान्य आहे का?
मी आजवर बघितलेल्या आकडेवारीनुसार - नाही. भाकिते संख्याशास्त्रीय शक्यतेपेक्षा जास्त खरी होत नाहीत.

२. अश्या भाकितांबद्दल काकतालीय न्यायाशिवाय अन्य काही स्पष्टीकरण आपल्याजवळ आहे काय?
उत्तर क्रमांक १ मुळे हा प्रश्न नि:संदर्भ होतो.

३. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे लोक जसे हातातून लिंबे, उदी काढून दाखवून ती हातचलाखी असल्याचे दाखवून भोंदू साधूंचा पर्दाफाश करतात तसा फलज्योतिषचिकित्सक फलज्योतिष्यांचा करतात का?
माहीत नाही.

४. संख्याशास्त्रीय शक्यतेपलिकडे नक्की किती टक्के भाकिते खरी झाली म्हणजे फलज्योतिष हे शास्त्र होते? (एक उदाहरण म्हणून)३५% खरी झाली तर शास्त्र आणि २५% झाली तर थोतांड हे कोणी ठरवले?माझ्या समजुतीप्रमाणे अगदी एका ज्योतिषाचे एक भाकित जरी खरे ठरले तरी त्यावर अधिक संशोधन करणे आवश्यक होते.
चांगला प्रश्न आहे. नेमकी किती टक्के भाकिते खरी होतात तेव्हा ती भाकिते कार्य करण्यास प्रेरक ठरावीत? (येथे फक्त कार्यप्रेरक भाकितांबद्दलच काही सांगता येते. जी भाकिते कुठलेच कार्य प्रेरित करत नाहीत, त्यांच्याविषयी प्रश्न वैयक्तिक आहेत, परस्परसहमतीचे नाहीत.)
हे पूर्णपणे भाकिताने सांगितलेल्या कार्याच्या फायद्यातोट्यावर अवलंबून आहे. येथे पैसा आणि वेळ दोन्ही गोष्टींच्या जमाखर्चाचा हिशोब करणे अपेक्षित आहे. उदाहरणार्थ "लॉटरी विकत घेतल्यास लॉटरी लागते" हे भाकीत दर सोडतीमध्ये कोणाच्यातरी बाबतीत खरे ठरते. पण लॉटरी विकत घेण्यापूर्वी त्या भाकिताच्या खरे असण्याची शक्यता पुष्कळ कमी असते. कित्येक लोकांना ती शक्यता लॉटरी तिकिटाच्या किमतीच्या मानाने नगण्य वाटते. मला स्वतःला नगण्य वाटते, मी स्वतःच्या पैशाने लॉटरी तिकिट विकत घेत नाही. (दुसर्‍यांच्या पैशानेही स्वतःसाठी लॉटरी तिकिट विकत घेत नाही.) काही लोकांना शक्यता नगण्य वाटत नाही. ते लोक लॉटरी तिकीट विकत घेतात.
संशोधनाची बाब अशी, की त्यासाठी जो खर्च करावा लागतो, तो लक्षात घ्यावा लागतो. त्या खर्चाच्या मानाने भाकिते खरी ठरावी लागतात. ते नेमके एक भाकीत, की किती हे खर्च करणार्‍याने ठरवावे.
(हे उत्तर बहुधा प्रस्तावात मागितल्यापेक्षा लांब आहे :-( क्षमस्व. )

५. खर्‍या होणार्‍या भाकितांबद्दल अधिक संशोधन करण्याची गरज आहे असे आपल्याला वाटते का?
वरील उत्तर क्र ४ बघावे. माझे पैसे (आणि माझ्या करवसुलीतले पैसे) सत्यशोधनासाठी वापरण्याइतपत योग्यता मला वाटत नाही. पण कोणी वैयक्तिक संपत्ती अशा संशोधनासाठी वापरल्यास मला सोयरही नाही आणि सुतकही नाही. मात्र वेगळ्या बाबतीत ज्योतिषाबद्दल संशोधन व्हावे अशी परिस्थिती आहे. माझ्या अनुभवाप्रमाणे लग्ने होण्याच्या बाबतीत काही कुटुंबांना ज्योतिषातील भाकितांचा त्रास होतो. ज्योतिषाच्या मोबदल्यात पैशांची उलाढालही होते. सध्याच्या अनुभवाप्रमाणे मानसशास्त्रीय, समाजशास्त्रीय आणि अर्थशास्त्रीय संशोधन जरूर व्हावे, असे मला वाटते.

६. नसेल तर आतापर्यंत झालेल्या संशोधनानुसार तर या भाकितांचे स्पष्टीकरण देता येणे शक्य आहे का?
उत्तर क्रमांक १ मुळे हा प्रश्न नि:संदर्भ होतो.

७. हे शास्त्र थोतांड आहे इतकेच नव्हे तर सामान्य अडाणी जनतेला फसवण्यासाठी ब्राह्मणांनी तयार केले आहे असे एका थोर महात्म्याचे विचार आपण एका संकेतस्थळावर दिले होते त्याच्याशी आपण सहमत आहात का?
ग्रहशांतीची खर्चिक कर्मकांडे आर्थिक फायद्यासाठी बनवलेली आहेत, या फुल्यांच्या विचाराशी मी सहमत आहे. फुल्यांच्या काळात बहुतेक जोशी हे ब्राह्मण होते, हे खरे आहे. (पण वर्णाश्रमाबाहेरील जमातींमधले ब्राह्मण नसलेले जादूटोणावालेसुद्धा आर्थिक फायद्यासाठी लोकांच्या गळी काहीबाही कर्मकांडे उतरवत असावेत - हे माझे मत आहे, फुल्यांचे नाही. जेथवर फुल्यांच्या काळातील ब्राह्मण यातून फायदा मिळवत होते, तेथवर माझी फुल्यांशी सहमती आहे.)

७.चालू- महात्म्यांच्या विचारात शास्त्रीय विचार किती आणि ब्राह्मणद्वेष किती याचा सारासार विचार न करता केवळ फलज्योतिषविरोधी आहे इतक्याच भांडवलावर आपण त्याला उचलून धरलेत असा आक्षेप कोणी घेतला तर आपले काय उत्तर आहे?
हा प्रश्न माझ्यासाठी नि:संदर्भ आहे.
फुल्यांच्या काळात काही ब्राह्मण "आपण ब्राह्मण आहोत" इतक्या भांडवलावर पैसे मिळवत. (अजूनही या भांडवलावर काही मिळवतात, असा माझा अनुभव आहे, पण त्यांचा विरोध करणारेसुद्धा काही ब्राह्मण दिसतात, हे आपल्या काळात उत्तम झाले आहे.)
त्या काळात अन्य (पैसे न उकळणारे) ब्राह्मण समाजात पटवून दिले नाही की "ब्राह्मणत्व म्हणजे हे ग्रहशांती-आणि-पूजेची-अवच्यासवा-दक्षिणा नव्हे". या प्रथा बंद पाडल्या नाहीत. तोवर ब्राह्मणात्वाची कुठली वेगळी प्रतिमा तयार होण्यास मार्ग नव्हता.

जी कृत्ये "ब्राह्मण्य" म्हणून समाजात मान्य होती, त्यांचा विरोध न करणार्‍या ब्राह्मणांबद्दल चीड १९व्या शतकात मला तर्कसंगत वाटते. फुल्यांच्या ब्राह्मणद्वेषाबद्दल सारासार विचार करूनही त्यांचे फलज्योतिषाबद्दल विश्लेषण मला विचारार्ह वाटते. त्यामुळे माझ्यावर वैयक्तिक आकस असल्याशिवाय वरील आक्षेप कोणी घेणार नाही. वैयक्तिक आकसाला उत्तर नाही, आणि तसा आकस नसलेले लोक हा फालतू प्रश्न विचारणार नाहीत. म्हणून हा प्रश्न माझ्यासाठी नि:संदर्भ आहे.

नेमके!

जी कृत्ये "ब्राह्मण्य" म्हणून समाजात मान्य होती, त्यांचा विरोध न करणार्‍या ब्राह्मणांबद्दल चीड १९व्या शतकात मला तर्कसंगत वाटते. फुल्यांच्या ब्राह्मणद्वेषाबद्दल सारासार विचार करूनही त्यांचे फलज्योतिषाबद्दल विश्लेषण मला विचारार्ह वाटते. त्यामुळे माझ्यावर वैयक्तिक आकस असल्याशिवाय वरील आक्षेप कोणी घेणार नाही. वैयक्तिक आकसाला उत्तर नाही, आणि तसा आकस नसलेले लोक हा फालतू प्रश्न विचारणार नाहीत. म्हणून हा प्रश्न माझ्यासाठी नि:संदर्भ आहे.

नेमके हेच! या विवेचनानंतर या मुद्द्यावर याहून अधिक टिप्पणी करण्याची गरज (निदान मला तरी) वाटत नाही.

श्री. धनंजय यांचे आभार.

समर्पक उत्तरे

धनंजय यांचा प्रतिसाद अत्यंत समर्पक आहे. त्यांनी दिलेल्या दुव्यातील संख्याशास्त्रीय विश्लेषण हे चिकित्सक आणि उदार दृष्टिकोनातून झाल्याचे मलातरी वाटले.

सध्याच्या अनुभवाप्रमाणे मानसशास्त्रीय, समाजशास्त्रीय आणि अर्थशास्त्रीय संशोधन जरूर व्हावे, असे मला वाटते.

असे संशोधन होणे गरजेचे पण अवघड असावे. ज्योतीष हे समाजाची कुठली एक मानसिक गरज पूर्ण करत असावे त्यामुळे त्यास विरोध करू नये असा युक्तिवाद होण्याची शक्यता आहे*. (अर्थात असा युक्तिवाद करणारे कुठलाही संख्याशास्त्रीय पुरावा देण्याची शक्यता कमीच.) अशी कुठली मानसिक गरज आहे असे मानले तरी ज्योतीष सोडून अनेक सकारात्मक पर्याय ती सामाजिक गरज (जी काही असेल) भागवू शकतात.

*या संदर्भात मानसशास्त्रज्ञ डॅनियल कानमन यांनी सांगितलेला एक किस्सा आठवतो: काही सैनिक आल्प्स पर्वतावर एका मोहीमेवर निघालेले असतात. हवामान खराब असल्याने ते हरवतात. बरेच दिवस रस्ता न सापडल्याने अगतिक झालेल्या सैनिकातील एकाला अचानक त्याच्याकडे त्या भागाचा नकाशा असल्याचे आठवते. ते त्या नकाशाप्रमाणे वाटचाल करतात आणि एका गावात पोहचतात. त्यांच्या बेसवर गेल्यानंतर त्यांचा अधिकारी त्यांना ते कसे परत आले त्याविषयी विचारणा करतो. ते म्हणतात, "आम्हाला अचानक एक नकाशा सापडला". अधिकारी नकाशा पाहतो आणि म्हणतो, "तुम्हाला नकाशा सापडला ते बरोबर आहे पण हा नकाशा आल्प्सचा नसून पीरनीझ पर्वताचा आहे.

रोचक

कहाणी रोचक आहे. चांगले उदाहरण

चुकिच्या नकाशानेही बरोबर ठीकाण कसे काय सापडले ह्यावर अधिक संशोधन करण्याची गरज आहे असे आपल्याला वाटते का? असे कुणी माठंच म्हणू शकेल.

वसुलि
वसंत सुधाकर लिमये

एक स्पष्टीकरण

१. काही ज्योतिष्यांची काही भाकिते संख्याशास्त्रीय शक्यतेपेक्षा जास्त खरी होतात हे आपल्याला मान्य आहे का?
मी आजवर बघितलेल्या आकडेवारीनुसार - नाही. भाकिते संख्याशास्त्रीय शक्यतेपेक्षा जास्त खरी होत नाहीत.

या प्रश्नाच्या बाबतीत माझा प्रश्न मला नीट मांडता न आल्याने गोंधळ झाला असावा. "संख्याशास्त्रीय शक्यतेपेक्षा" ऐवजी " शक्यतेपेक्षा (शक्यता =probability या अर्थाने) " असे वाचले तर माझे म्हणणे कळेल. एखाद्या ज्योतिषाचे एखादे भाकित उदा. धोंडोपंतांनी एका व्यक्तीला तुझा हरवलेला मोबाईल आज सोमवार आहे तर येत्या गुरूवारी दुपारी ४ ते ५ च्या दरम्यान अमुक ठिकाणी मिळेल असे भाकित केले तर ते खरे ठरण्याची "शक्यता" फार कमी आहे. याउलट एखाद्या गर्भार स्त्रीला मुलगा होईल की मुलगी यातील कुठलेही उत्तर खरे असण्याची "शक्यता" ५०% आहे. अश्या परिस्थितीत मोबाईल सांगितलेल्या गुरूवारी ४ ते ५ च्या दरम्यान आणि सांगितलेल्या ठिकाणी सापडण्याचे भाकित तंतोतंत खरे झाले म्हणजे "शक्यतेपेक्षा" खरे झाले असे मी समजतो. असे दोन तीन अनुभव मी स्वतः घेतल्याने त्यात काही तथ्य असावे असे मला वाटते. अश्या प्रकारे जोवर एखाद्या ज्योतिषाचे एखादेही भाकित बरोबर येते तोवर मी संशोधन झाले पाहिजे असे म्हणेन. अर्थात् कोणाला हा पैशाचा अपव्यय आहे वगैरे वाटेल तो वेगळा मुद्दा आहे.

विनायक

शक्यतेचे गणित - कसे केले?

शक्यतेचे गणित करण्यासाठी काही पूर्वमाहिती लागते.

उदाहरणार्थ : गर्भ मुलीचा राहील की मुलाचा याबाबत काही माहिती लागते - म्हणजे पूर्वी बघितलेल्या गर्भधारणांमध्ये किती मुली होत्या आणि किती मुले होती. किंवा रंगसूत्रांबद्दल काही गृहीतके असावी लागतात.

घनचौरस फासा टाकला तर "::" हे चिह्न दिसण्याची शक्यता १/६ असते असे म्हणण्यापूर्वी एक तर फासा तोलूनमापून बनवला असल्याचे ज्ञान लागते (गृहीतक). किंवा ते ज्ञान नसल्यास तो फासा अनेक वेळा टाकून शक्यतेचा कामचलाऊ हिशोब लावावा लागतो.

"हरवलेला मोबाइल ४ ते ५ दरम्यान मिळणार" याची शक्यता किती आहे? मला माहीत नाही. माझ्यापाशी गृहीतके नाहीत. फासा टाकल्यासारखा प्रत्येक तासाला वस्तू मिळण्याची समसमान शक्यता आहे, तर काही गणित केले असते. पण ते बहुधा बरोबर गृहीतक नसावे. आणि मागचा अनुभव नाही -
"मागच्या १०० वेळा मोबाईल हरवला होता तेव्हा मला तो १२-१ दरम्यान १%, १-२ दरम्यान १%.... ७-८ दरम्यान १०%.... ४-५ दरम्यान २% वेळेला मिळाला"
- असा काहीच अनुभव नाही. फारफारतर माझा मोबाईल आतापर्यंत एकदोनदाच हरवला आहे. मग "शक्यता" फार कमी आहे, ते मला कसे कळणार? (तुम्ही शक्यतेचे गणित कसे केले?)

आणि ज्या गोष्टींच्या शक्यतेचे गणित करता येते, त्या सर्वांच्या बाबतीत घटना शक्यतेच्यापेक्षा अधिकच होतात. म्हणजे गर्भ मुलगा व्हायची शक्यता केवळ ५०%च असते. आता माझ्या नात्यातल्या एका बाईंना एकुलता एक मुलगा आहे. म्हणजे १००% मुलगा आहे. १००%>५०%. आता मी फासा टाकला समजा ":" हे चिह्न आले. याची "शक्यता" १६.६६...% इतकी असते, पण त्या एका फासा-टाकण्यावर १००%>१६.६६...% इतके ":" चिह्न आले. कुठलीही घटना (एका वेळीस एक घेतल्यास) नेहमीच शक्यतेपेक्षा अधिक प्रमाणात झालेली दिसते.

"शक्यतेपेक्षा अधिक" हा निकष मानला तर प्रत्येक घटना संशोधनास योग्य होऊ लागेल. (आता मी घड्याळात बघितले तर २:३१:१७ हा आकडा दिसला, याची दिवसातल्या सर्व सेकंदांत या आकड्याची शक्यता १/१२*६०*६० = १/४३२००० इतकी कमी आहे. म्हणजे ते २:३१:१७ हे दृश्य संशोधनाच्या योग्य होऊ लागेल.)

तर नव्हे. याचे उत्तर तुम्हीच दिले आहे -

"असे दोन तीन अनुभव मी स्वतः घेतल्याने त्यात काही तथ्य असावे असे मला वाटते."

अशा प्रकारे एक घटना नव्हे, तर अनेकांच्या अनुभवातल्या अनेक घटना विचारात घ्याव्या लागतील. शक्यतेचे गणित योग्य तर्‍हेने मांडावे लागेल, आणि घटना "शक्यतेपेक्षा कितपत जास्त असल्यास विशेष" हा निकष ठरवावा लागेल. तुमच्याच वरील वाक्यावरून तुमची सार्वत्रिक भूमिका तुम्ही म्हणता तशी "एकही पुरे" अशी नसावी, असे मला वाटते. हे योग्यच आहे. त्याच प्रकारे वरील प्रश्नांची उत्तरेसुद्धा हो/नाही अशा प्रकारची अपेक्षित नसावीत, तर "कितपत/कमीअधिक" अशा प्रकारची अपेक्षित असावीत.

गणिताचे एक उदाहरण

(तुम्ही शक्यतेचे गणित कसे केले?)

श्री. धनंजय आणि श्री. आनंद घारे

दोघेही शक्यतेचे गणित माझ्यापेक्षा चांगले जाणता. तरीपण हा एक प्रयत्न बघा. काही चुकले असेल तर सांगा.

गृहीतक म्हणून असे समजले की मोबाईल मिळण्याची शक्यता हरवल्यापासून फक्त पहिल्या एक आठवड्यातच आहे आणि दुसरे म्हणजे मोबाईल मिळू शकेल अशा जागा फक्त दहा आहेत. तर एका विशिष्ट तासात आणि एका विशिष्ट ठिकाणी मिळायची शक्यता पुढील गणिताने काढली.

एका आठवड्याचे १६८ तास (२४ गुणिले ७) त्यामुळे त्या विशिष्ट तासात मिळायची शक्यता १/१६८ आणि विशिष्ट ठिकाणी मिळायची १/१०. विशिष्ट ठिकाणी आणि विशिष्ट तासात मिळायची शक्यता १/१६८०.

इतक्या कमी शक्यतेचे भाकित जर खरे होत असेल तर फलज्योतिष्यामध्ये नक्कीच तथ्य आहे.

विनायक

शक्यता कोणाच्या वाट्याला?

इतक्या कमी शक्यतेचे भाकित जर खरे होत असेल तर फलज्योतिष्यामध्ये नक्कीच तथ्य आहे.

शक्यता कोणाच्या वाट्याला आली यावर बरेच काही अवलंबुन आहे. एखादी शस्त्रक्रिया यशस्वी होण्याचे प्रमाण हे ९९% आहे. याचाच अर्थ हे शंभरात एखादी शस्त्रक्रिया अयशस्वी होउ शकते. जेव्हा अशा एखाद्या अयशस्वी शस्त्रक्रियेतुन एखादा मृत्यु झाल्यास संख्याशास्त्रीय दृष्ट्या तो एका टक्क्यात मोडतो. पण त्याच्या कुटुंबासाठी हे अपयश १००% असते. अशावेळी एखादा ज्योतिषी काही काळजी करु नका १०१% टक्के चिंतेचे कारण नाही. सार काही ठीक होईल अस सांगतो त्यावेळी त्या कुटुंबाला १००% समाधान मिळते. समजा तसे झाले नाही तरी ती वेळ निभाउन जाते. शेवटी प्राक्तन कुणाला चुकलय? अस ज्योतिषी म्हणतोच.आणि मुख्य म्हणजे त्याला कुणी जाब विचारणार नसत!
हीच गोष्ट लॉटरीच्या बाबत उलटा घडेल
प्रकाश घाटपांडे

विषयांतर नको

रोखठोक प्रश्न विचारतो.

मी वर दिलेल्या उदाहरणात भाकित खरे ठरण्याची शक्यता १/१६८० इतकी कमी असताना ज्योतिषाने ते वर्तवले आणि खरे झाले तर ज्योतिषात तथ्य आहे हे मान्य करणार की नाही? बाकी सर्व सोडा.

माझ्या गणितात चूक असेल तर तेही सांगा.

विनायक

तथ्य

पूर्णतः चुकिच्या नकाशाने योग्य ठीकाणी पोचण्याची शक्यता किती? ह्याचे गणित करा. तरीही कर्क ह्यांच्या किश्श्यातील लोक योग्य ठीकाणी पोहचलेच ना? त्यात कसले तथ्य शोधायचे आता? योगायोग हा शब्द माहित नाही का तुम्हाला?

तथ्य शोधायचे असेल तर अजून १० वेळा तुमचा मोबाईल हरवा आणि किती वेळेला जोतिष्याने सापडण्याची योग्य वेळ सांगीतली ते नोंद करा. मग सापडेल आपसुक तथ्य. मोबाईल महाग असेल तर दुसरी एखादी वस्तू वापरण्यास हरकत नाही.

ज्याप्रमाणे तुम्ही हे तथ्य मागत आहात त्यावरुन तुम्ही विज्ञान शाखेतले दिसत नाही. असो..

वसुलि
वसंत सुधाकर लिमये

टॉलेमी

च्या पृथ्वी स्थिर आणि सूर्य तिच्याभोवती फिरतो या चुकीच्या सिद्धांतावरूनही कोपर्निकसच्या आधीपर्यंत खगोलशास्त्री लोक त्यावरून ग्रहणांच्या वेळा अचूक काढायचे. कदाचित् त्यामुळेच हे गृहीतक सुमारे १६०० वर्षे टिकून राहिले याला दुसरे काय म्हणाल?

विनायक

ग्रहणाची वेळ

ग्रहणाची वेळ काढण्यासाठी चंद्र पृथ्वीभोवती, पृथ्वी सूर्याभोवती आणि सूर्य आणखी कुठल्या बिन्दूभोवती फिरतो हे समजण्याची आवश्यकताच नसते. आकाशात चन्द्र व सूर्य कसे फिरतांना इथे बसून दिसतात याच्या निरीक्षणावरून ते समजू शकते हे मी माझ्या लेखमालेत दाखवले होते. त्यामुळे हे उदाहरण अशास्त्रीय आहे.

दुसरे उदाहरण

टॉलेमीच्या गृहीतकाप्रमाणे पृथ्वी स्थिर असून सूर्य, चंद्र, इतर ग्रह आणि तारे तिच्या भोवती वर्तुळाकार कक्षेत फिरतात. यात एक अडचण अशी होते की मंगळाचे काही वेळा मागे जाणे आणि मग परत पुढे येणे - ज्याला ज्योतिषी वक्री आणि मार्गी म्हणतात - त्याचे स्पष्टीकरण देता येत नाही. टॉलेमीने मुख्य वर्तुळाकार कक्षेत (deferent) छोटी छोटी वर्तुळे (epicycles) कल्पून या गोष्टीचे स्पष्टीकरण केले आहे. अर्थातच ते सर्व चुकीचे आहे कारण सूर्य (पृथ्वी - इतर ग्रहांच्या तुलनेत) स्थिर आहे आणि मंगळ, पृथ्वी त्याच्याभोवती फिरतात, पृथ्वीची सूर्याभोवती फिरण्याची गती मंगळापेक्षा जास्त असल्याने मंगळ मागे गेल्याचा दृष्टीभ्रम होतो हे आज आपल्याला समजले आहे. तरीपण टॉलेमीच्या चुकीचे स्पष्टीकरण १६०० - १७०० वर्षे बहुतांश खगोलशात्रज्ञांना मान्य होते.

विनायक

चांगली माहिती

जोपर्यंत तर्कशुद्ध स्पष्टीकरणासह नवी माहिती पुढे येत नाही, तोवर जुनी माहिती व सिद्धांत ग्राह्य धरले जातात. टॉलेमीच्या एपिसायकल्स थिअरीमधून ग्रहांच्या वक्री होण्याचे एक स्पष्टीकरण मिळाले होते, जे शेकडो वर्षे समाधानकारक वाटले होते. कोपर्निकसला ते पूर्णपणे पटले नाही म्हणून त्याने वेगळा विचार केला. त्याचे सांगणेही त्याच्या मरणापर्यंत कोणाला पटले नव्हते. पण शंभर वर्षानंतर ते ग्राह्य मानले गेले. मात्र ग्रहांच्या कक्षा वर्तुळाकार आहेत असे तो समजत होता. पण नंतर आलेल्या शास्त्रज्ञांनी त्या लंबवर्तुळाकार असल्याचे दाखवून दिले. म्हणजेच कोपर्निकसच्या सांगण्यात चुका होत्याच. विज्ञानाची प्रगती अशा रीतीनेच होत आली आहे.
या सगळ्याचा फलज्योतिषाशी काही संबंध आहे असे मात्र त्यातल्या कोणीच सांगितले नसावे अशी माझी समजूत आहे.
कोपर्निकसच्याही हजार वर्षे आधी काही भारतीय विद्वानांना सूर्यमालिकेची माहिती होती असे सांगण्यात येते, पण त्यांनी ते कशा प्रकारे मांडले होते आणि ग्रहांच्या वक्री होण्याचे काय स्पष्टीकरण दिले होते ते मला माहीत नाही.

ऍरिस्टार्कस ऑफ समोस

या सगळ्याचा फलज्योतिषाशी काही संबंध आहे असे मात्र त्यातल्या कोणीच सांगितले नसावे अशी माझी समजूत आहे.

आधी इथे एका विद्वानाने मला "चुकीच्या नकाशावरून बरोबर ठिकाणी कसे पोचता येईल" अशा प्रश्न विचारला होता त्याला उत्तर म्हणून चुकीच्या सिद्धांताने एखाद्या निरीक्षणाचे तात्कालिक का होईना, समाधानकारक स्पष्टीकरण देता येते, याचे उदाहरण म्हणून या गोष्टी सांगितल्या होत्या. फलज्योतिषाशी संबंध नसलेल्या असंख्य गोष्टी या चर्चेत आहेत.

कोपर्निकसच्याही हजार वर्षे आधी काही भारतीय विद्वानांना सूर्यमालिकेची माहिती होती असे सांगण्यात येते, पण त्यांनी ते कशा प्रकारे मांडले होते आणि ग्रहांच्या वक्री होण्याचे काय स्पष्टीकरण दिले होते ते मला माहीत नाही.

»

भारतीय विद्वान सोडा. शीर्षकात दिलेल्या ग्रीक विद्वानाने इ. स. पू. ३१० - २३० या काळात म्हणजेच टॉलेमीच्याही आधी सूर्यकेंद्रित विश्वाची कल्पना मांडली होती. त्याने काही गणित करून चंद्र, सूर्यांचे आकार आणि त्यांनी पृथ्वीपासूनची अंतरे काढली होती. कोनांचे मोजमाप अचूक करता येत नसल्याने उत्तरे अचूक नसली तरी पद्धती अचूक होती. त्यावरून सूर्य पृथ्वीपेक्षा २० पट मोठा आहे आणि बराच दूर आहे. कदाचित् इतकी मोठी वस्तू पृथ्वीभोवती फिरते म्हणण्यापेक्षा पृथ्वी त्याभोवती फिरते असे म्हणणे तर्कशुद्ध आहे असे वाटून त्याने सूर्यकेंद्री विश्वाचे मॉडेल बनवले. (कदाचित् सूर्य आकाराने मोठा असूनही पृथ्वीपेक्षा हलका असू शकतो हा विचारही त्याने केला असेल. पण नेमका काय विचार करून त्याने सूर्यकेंद्री विश्वाचे मॉडेल बनवले या बद्दल नक्की माहिती नाही. एक तर्क फक्त वर दिला आहे) कोपर्निकसनेही आपल्या "डेस रिव्होल्युशनिबस"मध्ये त्याचा उल्लेख करून नंतर खोडला. आज हे मॉडेल ऍरिस्टार्कस - कोपर्निकस मॉडेल म्हणून ओळखले जाते. त्याच्या काळात हे मॉडेल मूर्खपणाचे वाटल्याने ते लोकांनी आपलेसे केले नाही.

माझा आपला वाद पूर्वी झाला त्यात "मी सूर्य पृथ्वीभोवती फिरतो हा दृष्टीभ्रम आहे" असे सांगणार्‍या ज्ञानेश्वरीतल्या ओवीचा (इ. स. १२९०) उल्लेख केला होता, त्यावर राधिकेने आर्यभटीयातल्या (इ. स. ४००) श्लोकाचे हे भाषांतर आहे असे सांगितले. त्यावर मी ऍरिस्टार्कस - आर्यभट - ज्ञानेश्वर असा संबंध असावा असे लिहिले होते ते न पटून तुम्ही माझी गणना "वेदात सर्वकाही आहे " असे म्हणणार्‍या वृथाभिमानी लोकांच्यात केली होती. आर्यभट ग्रीसमध्ये जाऊन तिथली विद्या शिकून आला होता ही जरी कथा अतिशयोक्त मानली तरी त्याला ऍरिस्टार्कसचे मत माहिती असावे. ऍरिस्टार्कस किंवा आर्यभटाच्या काळात ग्रहांचे वक्री होणे माहिती असावे की नाही याबद्दल शंका आहे. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ खगोलशास्त्रावर नसल्याने त्या ग्रंथात ग्रहांच्या वक्री होण्याबद्दल स्पष्टीकरण अपेक्षित नसावे.

विनायक

गणित पटत नाही

हे मी आधीच सांगितले आहे. वर मी लिहिले होते :

फासा टाकल्यासारखा प्रत्येक तासाला वस्तू मिळण्याची समसमान शक्यता आहे, तर काही गणित केले असते. पण ते बहुधा बरोबर गृहीतक नसावे.

हरवलेल्या मोबाईलचे उदाहरण मला माहीत नाही, पण अन्य हरवलेल्या वस्तू सापडल्याची थोडीफार आठवण आहे. या गोष्टी जेवण जेवताना, किंवा झोपी गेलो असताना मला कधीच मिळालेल्या नाहीत. म्हणजे प्रत्येक तासाला मिळायची शक्यता समसमान कशी? शिवाय हरवलेल्या वस्तू मिळण्याची शक्यता जसे दिवस जातात तशीतशी कमी होत जात असावी. मला तरी कित्येकदा हरवलेल्या गोष्टी त्याच किंवा पुढल्या दिवशी सापडतात. त्यामुळे वरील गणितात
२४*७ तास हे समसमान मानून १/१६८ असे गणित केलेले आहे. शिवाय त्या १६८ तासांत प्रत्येकात त्या दहाही जागांवरती तुम्ही पोचायची समसमान शक्यता आहे, असे गणित केलेले आहे. (माझ्या वस्तू ऑफिसच्या टेबलावर किंवा घरच्या टेबलावर असल्या तर रात्री ९-१० वाजता ऑफिसच्या टेबलावरची वस्तू मिळण्याची शक्यता कमी असते, आणि दुपारी २-३ वाजता घरच्या टेबळावरची वस्तू मिळण्याची शक्यता कमी असते.) शिवाय त्या दहा ठिकाणी वस्तू असण्याची शक्यता समसमान मानली आहे. वगैरे.

अशा प्रकारांत गृहीतकांवरून गणित करणे म्हणजे केवळ "गायगो" (कुठलेतरी आकडे गुणिले-भागिले तर कुठलेतरी गुणोत्तर आकड्यांत मिळणार, हे खरे. पण त्या आकड्याचा परिस्थितीशी काहीच संबंध असणार नाही.) अशा गुंतागुंतीच्या शक्यता गृहीतकांवरून काढता येत नाहीत, मात्र पूर्वानुभव असल्यास त्यावरून काढता येतात. म्हणून मी वरील प्रतिसादात असेही म्हटले :

आणि मागचा अनुभव नाही -
"मागच्या १०० वेळा मोबाईल हरवला होता तेव्हा मला तो १२-१ दरम्यान १%, १-२ दरम्यान १%.... ७-८ दरम्यान १०%.... ४-५ दरम्यान २% वेळेला मिळाला"
- असा काहीच अनुभव नाही.

- - - -

हे घ्या माझ्या स्वतःविषयी एक भाकीत :
(हे खरे उदाहरण आहे.) काल कुठेतरी राहिलेले माझे जाकीट मला आज संध्याकाळी ५-६ च्या दरम्यान मिळेल. "५-६" हा आकडा मी सूर्याच्या आकाशातील ठिकाणावरून काढला आहे, म्हणजे भाकित ज्योतिषातले आहे, खास.
(ऑफिसची एक आणि घरच्या दोन खुंट्यांना जाकीट टांगले असायची शक्यता आहे. कदाचित कारच्या मागच्या सीटवर असू शकेल - लक्ष नव्हते. सूर्य लग्नापासून ६ घरे लांब असताना त्या सर्व खुंट्यांपाशी, कारपाशी मी पोचतो. निश्चित नाही, पण बहुतेक दिवशी असे होते.)
वरची करड्या ठशातली वाक्ये बाजूला ठेवून वरीलप्रमाणे गणित करूया :
२४ तास*७ दिवस*४जागा
हे १/(२४*७*४) = १/६७२ इतके अशक्य भाकीत बरोबर येते की नाही ते मी उद्या येथेच लिहून सांगतो. मग वर करड्या ठशातल्या वाक्याने शक्यतांचे गणित किती बदलते ते तुम्ही मला सांगा. ती वाक्ये, त्यांतही "बहुतेक दिवशी" वगैरे अनिश्चिततेमुळे गणित करणेच दुरापरस्त होते, असे मला वाटते.
पुन्हा - जाकीट कुठेतरी राहिल्याची घटना सत्य आहे.

उत्तरे

हरवलेल्या मोबाईलचे उदाहरण मला माहीत नाही, पण अन्य हरवलेल्या वस्तू सापडल्याची थोडीफार आठवण आहे. या गोष्टी जेवण जेवताना, किंवा झोपी गेलो असताना मला कधीच मिळालेल्या नाहीत. म्हणजे प्रत्येक तासाला मिळायची शक्यता समसमान कशी?

मी जेवत असताना किंवा झोपेत असताना ज्या व्यक्तीला माझा मोबाईल सापडला आहे ती व्यक्ती मला समक्ष आणून देऊ शकत नाही? किंवा मोबाईल मिळाल्याचा संदेश पाठवू शकत नाही? आणि त्याच वेळी माझ्या घरचे कोणी मला झोपेतून उठवून मोबाईल मिळाल्याचे सांगू शकत नाहीत? माझेच उदाहरण सांगतो. १९७९ मध्ये माझी सायकल चोरीस गेली होती. त्यानंतर ११- १२ दिवसांनी मी कॉलेजमध्ये जाण्याच्या आधी जेवत असतानाच घरी पोलीस सायकल सापडल्याचा निरोप घेऊन आला होता.

शिवाय हरवलेल्या वस्तू मिळण्याची शक्यता जसे दिवस जातात तशीतशी कमी होत जात असावी. मला तरी कित्येकदा हरवलेल्या गोष्टी त्याच किंवा पुढल्या दिवशी सापडतात.

जाणार्‍या दिवसाबरोबर वस्तू मिळण्याची शक्यता कमी होते हे मत जरी खरे मानले तरी नेमक्या कुठल्या गतीने कमी होते याचे गणित आणि त्यावरून वस्तू मिळण्याच्या शक्यतेचे गणित मला मांडता येत नाही. म्हणून पहिले सात दिवस एकसारखी असते असे समजले आहे. हे पण गृहीतक तसे रीझनेबल किंवा लेजिटिमेट आहे असे मला वाटते.

२४*७ तास हे समसमान मानून १/१६८ असे गणित केलेले आहे. शिवाय त्या १६८ तासांत प्रत्येकात त्या दहाही जागांवरती तुम्ही पोचायची समसमान शक्यता आहे, असे गणित केलेले आहे. (माझ्या वस्तू ऑफिसच्या टेबलावर किंवा घरच्या टेबलावर असल्या तर रात्री ९-१० वाजता ऑफिसच्या टेबलावरची वस्तू मिळण्याची शक्यता कमी असते, आणि दुपारी २-३ वाजता घरच्या टेबळावरची वस्तू मिळण्याची शक्यता कमी असते.) शिवाय त्या दहा ठिकाणी वस्तू असण्याची शक्यता समसमान मानली आहे. वगैरे.

रात्री मी घरी असताना माझा मित्र कामानिमित्त ऑफिसात गेला आणि त्याला मी तिथे दिवसा विसरलेला मोबाईल मिळाला किंवा दुपारी मी ऑफिसात असताना घरी बायकोला माझे टेबल आवरत असताना मी घरीच विसरून गेलेला मोबाईल मिळाला अशा गोष्टी शक्य नाहीत? हरवलेल्या वस्तूंच्या संदर्भात खरे तर अशाच जागी वस्तू मिळण्याची शक्यता जास्त असते.

आणि मागचा अनुभव नाही -
"मागच्या १०० वेळा मोबाईल हरवला होता तेव्हा मला तो १२-१ दरम्यान १%, १-२ दरम्यान १%.... ७-८ दरम्यान १०%.... ४-५ दरम्यान २% वेळेला मिळाला"
- असा काहीच अनुभव नाही.

एकाच व्यक्तीने त्याचा मोबाईल १०० वेळा हरवला असे खरोखर घडते का? माझ्या मते नाही. आकडेमोडीचा परिस्थितीशी संबंध असावा म्हणूनच या शक्यतेचा विचार केलेला नाही.

अशा प्रकारांत गृहीतकांवरून गणित करणे म्हणजे केवळ "गायगो" (कुठलेतरी आकडे गुणिले-भागिले तर कुठलेतरी गुणोत्तर आकड्यांत मिळणार, हे खरे. पण त्या आकड्याचा परिस्थितीशी काहीच संबंध असणार नाही.)

तुम्ही घेतलेल्या सर्व आक्षेपांवर मी यथामति उत्तरे दिली आहेत. वर दिलेली वाक्ये अनावश्यक आहेत.
विनायक

जाकीट मिळाले

जाकीट ५:४०ला मिळाले.

ऑफिसातल्या खुंटीवर माझे जाकीट माझ्या सहकार्‍याला मिळू कधीही शकले असते. तसेच घरच्या खुंट्यांवरती. दुपारी मला गाडीची गरज पडून मी गाडीतही जाकीट आहे-नाही बघू शकलो असतो.

वरील विचारधारेप्रमाणे माझे १/६७२ गणित बरोबर आहे, असे म्हणावे, तर माझे भाकित बरोबर असणे (मला ५-६ दरम्यान मिळाले) आश्चर्यकारक आहे. (पण गणित चुकलेले आहे. अथवा "गणित चुकले आहे", हा निष्कर्ष या भाकितातून निघतो.)

माहीत नसलेल्या शक्यतांच्या विभाजनाला (प्रॉबॅबिलिटी डिस्ट्रिब्यूशनला) समसमान मानण्याची चूक भलेभले संशोधक करतात - अशी चूक होणे सामान्य आहे. ("सामान्य म्हणून समजण्यासारखी" या अर्थी "रीझनेबल" आहे.) पण "तर्कसंगत" या अर्थी "रीझनेबल" नाही. आणि लेजिटिमेट तर मुळीच नाही.

माझी मते

१. काही ज्योतिष्यांची काही भाकिते संख्याशास्त्रीय शक्यतेपेक्षा जास्त खरी होतात हे आपल्याला मान्य आहे का?
नाही. कोठलीही गोष्ट खरी ठरण्याची किती टक्के शक्यता असते हे संख्याशास्त्राने ठरवता येते. तसेच सांगितलेली किती विधाने खरी असू किंवा नसू शकतात याची शक्यता आजमावता येते. या दोन्ही गोष्टी विचारात घेता कांही लोकांनी सांगितलेल्या कांही गोष्टी खर्‍या ठरण्याला कांहीही अर्थ नाही. सर्व भाकितांच्या खरेपणाचा एकत्र विचार करणे आवश्यक असते.

२. अश्या भाकितांबद्दल काकतालीय न्यायाशिवाय अन्य काही स्पष्टीकरण आपल्याजवळ आहे काय?
माझे स्पष्टीकरण वर दिले आहे.

३. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे लोक जसे हातातून लिंबे, उदी काढून दाखवून ती हातचलाखी असल्याचे दाखवून भोंदू साधूंचा पर्दाफाश करतात तसा फलज्योतिषचिकित्सक फलज्योतिष्यांचा करतात का?
मला माहीत नाही.

४. संख्याशास्त्रीय शक्यतेपलिकडे नक्की किती टक्के भाकिते खरी झाली म्हणजे फलज्योतिष हे शास्त्र होते? (एक उदाहरण म्हणून)३५% खरी झाली तर शास्त्र आणि २५% झाली तर थोतांड हे कोणी ठरवले?माझ्या समजुतीप्रमाणे अगदी एका ज्योतिषाचे एक भाकित जरी खरे ठरले तरी त्यावर अधिक संशोधन करणे आवश्यक होते.
मुळीच नाही. कोठलीही गोष्ट खरी किंवा खोटी ठरण्याची ५० टक्के शक्यता नेहमीच असते. एकाद्या माणसाची निदान ९० टक्के भाकिते तरी खरी ठरली किंवा ९० टक्के ज्योतिषांनी एकमुखाने केलेले एक तरी भाकित खरे ठरले तर त्याचा विचार करणे आवश्यक आहे.

५. खर्‍या होणार्‍या भाकितांबद्दल अधिक संशोधन करण्याची गरज आहे असे आपल्याला वाटते का?
उत्तर वर दिले आहे.

६. नसेल तर आतापर्यंत झालेल्या संशोधनानुसार तर या भाकितांचे स्पष्टीकरण देता येणे शक्य आहे का?
त्याची मुळात गरजच नाही. संख्याशास्त्रानुसार कांही भाकिते खरी ठरणारच. कांही हुषार लोक परस्परविरोधी भाकिते देऊन मोकळे होतात. म्हणजे त्यातले कांही झाले तरी जितम् मया असे म्हणायला त्यांना मोकळीक असते.

७. हे शास्त्र थोतांड आहे इतकेच नव्हे तर सामान्य अडाणी जनतेला फसवण्यासाठी ब्राह्मणांनी तयार केले आहे असे एका थोर महात्म्याचे विचार आपण एका संकेतस्थळावर दिले होते त्याच्याशी आपण सहमत आहात का? महात्म्यांच्या विचारात शास्त्रीय विचार किती आणि ब्राह्मणद्वेष किती याचा सारासार विचार न करता केवळ फलज्योतिषविरोधी आहे इतक्याच भांडवलावर आपण त्याला उचलून धरलेत असा आक्षेप कोणी घेतला तर आपले काय उत्तर आहे?
श्री घाटपांडे यांनी उद्धृत केलेले महात्मा ज्योतीबा फुले यांचे फलज्योतिषाबद्दल मांडलेले विचार निश्चितच तर्कशुद्ध आहेत. त्याबद्दल सारासार विचार करायचा म्हणजे नेमके काय करायचे? हे विचार अज्ञ लोकांच्या प्रबोधनासाठी त्यांनी मांडले होते की कोणाच्या द्वेषामधून मांडले होते ही चर्चा आज निरर्थक आहे असे मला वाटते. कुठल्याही उद्देशाने ते मांडले असले तरी ते विचार बरोबरच आहेत.

स्वतः

>>अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे लोक जसे हातातून लिंबे, उदी काढून दाखवून ती हातचलाखी असल्याचे दाखवून भोंदू साधूंचा पर्दाफाश करतात तसा फलज्योतिषचिकित्सक फलज्योतिष्यांचा करतात का?

आपले घाटपांडेसाहेब स्वतः उत्तम ज्योतिष जाणतात (म्हणजे ज्योतिषाची थिअरी जाणतात). ते भविष्यही सांगू शकतीलच. पण भविष्य सांगू शकल्याने साध्य काय होणार ते कळले नाही.

उतरांचा प्रयत्न

काही ज्योतिष्यांची काही भाकिते संख्याशास्त्रीय शक्यतेपेक्षा जास्त खरी होतात हे आपल्याला मान्य आहे का?
आनंद घारे यांचे उत्तराशी सहमत
२. अश्या भाकितांबद्दल काकतालीय न्यायाशिवाय अन्य काही स्पष्टीकरण आपल्याजवळ आहे काय?
संभवनीयतेचे कितीतरी अनुभव तुमच्या दैनंदिन जीवनात येत असतात. उदा. तुम्ही एखाद्याची आठवण काढायला आणि ती व्यक्ती तुम्हाला भेटायला किंवा फोन यायला, तुम्ही एखादे गाणे गुणगुणायला आणि नेमके तेच गाणे रेडिओवर लागायला. एखाद्या घटनेची भीती व्यक्त करायला व ती घटना घडायला एकच वेळ येते. पण हीच संभवनीयता जर ज्योतिषाकडून व्यक्त झाली आणि त्याप्रमाणे घटना घडली तर मात्र ते प्रत्यंतर वा प्रचिती. या संभवनियतेविषयी दीड हजार वर्षांपूर्वी भट्ट नारायण लिखित 'वेणीसंहार` नाटकात दुर्योधनाच्या तोंडी एक वाक्य घातले आहे. ते म्हणजे-
ग्रहाणां चरितं स्वप्नो निमित्तान्युपयाचितम् ।
फलन्ति काकतालीयं तेभ्य: प्राज्ञा न बिभ्यति ।।
अर्थ :- ग्रहांच्या गती, स्वप्न, शकुन, नवस हे काकतालीय न्यायाने फळतात. शहाणे लोक त्यांना घाबरत नाहीत.
३. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे लोक जसे हातातून लिंबे, उदी काढून दाखवून ती हातचलाखी असल्याचे दाखवून भोंदू साधूंचा पर्दाफाश करतात तसा फलज्योतिषचिकित्सक फलज्योतिष्यांचा करतात का?
होय पण प्रमाण अतिशय कमी. मोठे उदा फक्त बडोद्याचे बोलका पत्थर वाले पटवर्धन. छोटी उदाहरणे ही स्थानिक आहेत. पण एखादा बाबा/ ज्योतिषी बोगस निघाला तर लोक् बाबाबुवा बदलतात मानसिकता नाही.
४. संख्याशास्त्रीय शक्यतेपलिकडे नक्की किती टक्के भाकिते खरी झाली म्हणजे फलज्योतिष हे शास्त्र होते? (एक उदाहरण म्हणून)३५% खरी झाली तर शास्त्र आणि २५% झाली तर थोतांड हे कोणी ठरवले?माझ्या समजुतीप्रमाणे अगदी एका ज्योतिषाचे एक भाकित जरी खरे ठरले तरी त्यावर अधिक संशोधन करणे आवश्यक होते.
संख्याशास्त्रीय चाचणीत ५-१० टक्क्यांचा टॉलरन्स क्षम्य मानल्यास उदाहरणे खरी ठरल्यास शास्त्रिय जगतात मान्यत मिळेल. कार्यकारणभाव नंतर तपासता येईल. ट्क्केवारी कोणा एका व्यक्तिने ठरविली नाही
५. खर्‍या होणार्‍या भाकितांबद्दल अधिक संशोधन करण्याची गरज आहे असे आपल्याला वाटते का?
होय मला तसे वाटते. पण संशोधनासाठी लागणारा पैसा हा सहजपणे उपलब्ध होत नाही. माहिती संकलन वा संपादन हा मूलभूत संशोधनासाठी आवश्यक असणारी बाब आपल्याकडे अपवादाने आढळते. अशासकीय संस्थांकडून सर्वेक्षण उपलब्ध करुन मग त्यावर संशोधन हा उपाय आहे पण मूळ प्रश्न असा की संशोधन कशासाठी? कुणासाठी? आणि करणार कोण? फलज्योतिष समर्थक म्हणतात हे शास्त्र आहे हे सिद्ध करण्यासाठी म्हणून जर संशोधन असेल तर त्याची आम्हाला गरज नाही. बहुसंख्य लोकांचा विश्वास, श्रद्धा व अनुभव हीच आमची सिद्धता. विरोधक म्हणतात कि जे शास्त्रच नाही त्यावर संशोधन करण्यात वेळ, श्रम व पैसा घालण्याची काय गरज आहे? फलज्योतिष हे शास्त्र आहे असे म्हणणाऱ्यांची आपले विधान सिद्ध करण्यासाठी संशोधन करणे ही जबाबदारी ठरते.
वि.म. दांडेकरांनी जेव्हा हा प्रयत्न केला त्यावेळी त्यांना विश्वासार्ह डाटा मिळण्यात सुद्धा अडचणी आल्या. फलज्योतिषावरील संशोधन करण्यासाठी जन्मवेळ, जन्मतारीख व जन्मठिकाण हा महत्वाचा डाटा आहे. तो विश्वासार्ह मिळण्यासाठी हॉस्पिटल मधील बिनचूक नोंदणी असणे आवश्यक आहे. आपल्याकडे कुटुंबात सुद्धा व्यक्तिची ही माहिती बिनचूक असेल अशी खात्री नसते. समजा हा डाटा मिळाला तरी ग्रहयोग व मानवी जीवन यांचा परस्पर संबंध ही बाब तपासण्यासाठी कुठले मॉडेल सॅम्पल म्हणून निवडावे ? या विषयी एकवाक्यता नाही. चिकित्सक बुद्धीच्या विवेकवादी लोकांना असे वाटते की जर हे शास्त्र इतके लोकप्रिय आहे तर त्याच्यात खरोखरी काही तथ्य आहे की नाही ते आपणच तपासून पाहिले पाहिजे. ते तपासून पहाण्यासाठी त्यांच्यापुढे काही मार्ग आहेत. पहिला मार्ग म्हणजे या शास्त्राचा मुळापासून चिकित्सकपणे अभ्यास करुन त्यात काही तथ्य असू शकेल का ते ठरवायचे. हा मार्ग आम्ही निवडला व या शास्त्रात वैज्ञानिक दृष्टया तथ्य असणे का अशक्य आहे ते अन्यत्र दाखवून दिले आहे. दुसरा मार्ग असा की एखादे समान लक्षण असलेल्या शेकडो माणसांच्या कुंडल्या जमवायच्या आणि त्या कुंडल्यात काही समान ग्रहस्थिती आढळते का व ती किती प्रमाणात आढळते ते पहायचे, किंवा असे करायचे की एकाच प्रकारची ग्रहस्थिती असलेल्या पुष्कळ कुंडल्या घेउन त्या कुंडल्यांच्या माणसांत काही समान लक्षणे आढळतात का व ती किती प्रमाणात आढळतात ते पहायचे, व त्यावरुन हे शास्त्रातील तथ्य ठरवायचे. तिसरा मार्ग असा की घडून गेलेल्या निसंदिग्ध घटना व त्याचा काळ यापैकी एकच माहिती ज्योतिषांना पुरवायची व उर्वरित दुसरी माहिती ज्योतिषांनी वर्तवायची हा प्रयोग करणे. एखादा निष्कर्ष हा जेव्हा आपल्याला प्रतिकूल ठरतो त्यावेळी डाटा पुरेसा नव्हता अथवा विश्वासार्ह नव्हता. असे म्हणण्याची सोय आहे. अशा प्रकारचे संशोधन पाश्चात्य देशात मुबलक प्रमाणावर झालेले आहे. त्याचे निष्कर्ष बहुतांशी या शास्त्राला प्रतिकूल असेच निघाले आहेत. पण त्यांचा विशेषसा परिणाम सामान्य लोकांवर झालेला दिसत नाही. अशा संशोधनात ज्योतिष्यांची मदत घ्यावी लागते. आपल्याकडचे ज्योतिषी अशी मदत करण्यास कधीच पुढे येणार नाहीत. हात दाखवून अवलक्षण कोण करुन घेईल ?
आपल्याकडे यूजीसीने विद्यापीठात फलज्योतिष हा विषय अभ्यासक्रमात समाविष्ठ करण्याच्या अगोदर या विषयात काही तथ्य आहे काय? हे तपासण्यासाठी जर एखाद्या विद्यापीठास पायलट प्रोजेक्ट म्हणून संशोधन करण्यास अनुदान दिले असते तर ते अधिक उचित ठरले असते.
६. नसेल तर आतापर्यंत झालेल्या संशोधनानुसार तर या भाकितांचे स्पष्टीकरण देता येणे शक्य आहे का?
लागु नाही
७. हे शास्त्र थोतांड आहे इतकेच नव्हे तर सामान्य अडाणी जनतेला फसवण्यासाठी ब्राह्मणांनी तयार केले आहे असे एका थोर महात्म्याचे विचार आपण एका संकेतस्थळावर दिले होते त्याच्याशी आपण सहमत आहात का? महात्म्यांच्या विचारात शास्त्रीय विचार किती आणि ब्राह्मणद्वेष किती याचा सारासार विचार न करता केवळ फलज्योतिषविरोधी आहे इतक्याच भांडवलावर आपण त्याला उचलून धरलेत असा आक्षेप कोणी घेतला तर आपले काय उत्तर आहे?
त्याकाळात ब्राह्मणद्वेष् असलेले साहित्य भरपुर् होते. पण तो विद्रोहाचा भाग आहे. यावरुन मला "देशाचे दुष्मन" हे दिनकरराव जवळकर लिखित १९२५ सालचे पुस्तक आठवते. त्यावेळी नगरपालिकेत फुल्यांच्या पुतळ्याचा वाद निर्माण झाला होता. त्याला उत्तर म्हणुन जवळकरांनी हे पुस्तक लिहिले.त्यातील भाषा अत्यंत विखारी वाटावी अशी आहे.केशवराव जेधे यांनी ते प्रकाशित केले होते. पुस्तकाला केशवराव बागडे यांची प्रस्तावना आहे. त्यात ते म्हणतात,"या पुस्तकातील भाषापद्धती अगर विचारप्रदर्शनपद्धती ब्राह्मणांना आवडणार नाही; परंतु त्यामुळे रुष्ट न होता, सदर गृहस्थांचे पुस्तक वाचून त्यावर एकंदर पुर्व परिस्थिती ध्यानात घेउन विशेषतः रा. चिपळुणकर यांनी केलेली महात्मा फुले यांची निंदा लक्षात घेउन शांतपणे मनन केले पाहिजे. क्रियेस प्रतिक्रिया हा निसर्गदेवीच्या साम्राज्यातील अबाधितपणे व अव्याहतपणे परिणामकारक होणारा नियम आहे. तदनुरोधाने महात्मा ज्योतिराव यांची निंदा करणार्‍यांना प्रत्युत्तर मिळणे साहजिक आहे. या प्रत्युत्तरादाखल केलेल्या प्रयत्नाने चिडुन जाउन प्रत्याघात करण्याचाही मोह कित्येकांना अनावर होण्याचा संभव आहे. परंतु त्यायोगे जनतेचा अगर देशाचा फादा न होता तोटाच होणार ही गोष्ट सर्वांच्या नजरेस आणणे माझे कर्तव्य आहे...."
फुल्यांच्या लेखनातील ब्राह्मण विरोध हा कालसुसंगत आहे. मी फुल्यांच्या विचारांशी सहमत आहे. द्वेष सरकट वाटला तरी क्षम्य मानावा अशीच परिस्थिती होती. फुल्यांचे फलज्योतिषविषयक विचार केवळ ब्राह्मण विरोधामुळे वा इतक्याच भांडवलावर उचलुन धरले नाहीत
अवांतर्- काही प्रतिसाद सोयीसाठी चिकटवले आहेत हे लक्षात आलेच असेल

प्रकाश घाटपांडे

अगा जे बोललेचि नाही

प्रकाशकाकांचे हे वाक्यः
५. खर्‍या होणार्‍या भाकितांबद्दल अधिक संशोधन करण्याची गरज आहे असे आपल्याला वाटते का?
होय मला तसे वाटते.

प्रकाशकाकांनी फलज्योतिष हे थोतांड आहे हे सिद्ध केल्याचा दावा पूर्पणपणे खरा नाही. वरील प्रतिसादानुसार फलज्योतिषाच्या चिकित्सेची आवश्यकता प्रकाशकाकांनाही वाटते असे दिसते.

श्री. धनंजय यांनी संख्याशास्त्रीय कसोट्या लावून फलज्योतिष थोतांड असावे असा दावा केल्याचे मात्र दिसते.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

संशोधन

>>खर्‍या होणार्‍या भाकितांबद्दल अधिक संशोधन करण्याची गरज आहे असे आपल्याला वाटते का?
तसे संशोधन करायचे तर ते पुढील निकषांवर/दिशेने करता येईल.

ज्योतिषाने कोणत्या गोष्टी (ग्रह, योग वगैरे) पाहून काय स्थिती दिसली म्हणून हे भाकीत केले?
अशाच स्थितीत इतर काही भाकिते केली होती का? त्यातली किती खरी झाली?
वगैरे.

(दुसर्‍या संकेतस्थळावर पूर्वी असाच प्रतिसाद दिला होता).
एक उदाहरण हे कुठल्याच अभ्यासासाठी पुरेसे नाही हे उघड आहे.

नितिन थत्ते

संशोधन

कुठल्याही प्रकारे संख्याशास्त्रीय चाचणी करायची तर विदा भरपूर असणे आवश्यक असते. एका उदाहरणावरून संख्याशास्त्रीय चाचणी किंवा संशोधन नाही करता येत.

फलज्योतिष हे शास्त्र आहे की नाही याचे संशोधन करणे म्हणजे एका उदाहरणाचे संशोधन नसून जे नियम (ठोकताळे) वापरून ते भाकीत केले त्याचे व्हॅलिडेशन करायचे असते. त्यामुळे ते नियम लागू आहेत की नाही कोणत्या इतर परिस्थितीत ते लागू होतात (लागू होत नाहीत) वगैरे गोष्टींचे संशोधन करायचे असते.

एक भाकीत बरोबर आले म्हणून ज्योतिषाला आणि ज्योतिष्याला प्रमाणपत्र द्या असे म्हणणे अगदीच काहीतरी.

समांतर उदाहरण म्हणून मॉन्सून भाकीताचे घेता येईल. त्यात राजस्थानात उन्हाळ्यातील तापमान जास्त असेल तर त्यावर्षी पाऊस जास्त पडतो असा नियम सांगायचा झाला तर आगोदरच्या ४०-५०वर्षांचे तापमानाचे रेकॉर्ड आणि पावसाचे रेकॉर्ड तपासून काही संबंध सापडतो का? इतर काही गोष्टींचा संबंध आहे काय*? वगैरे इतर अनेक गोष्टी तपासल्यानंतर तो नियम म्हणून मान्य होऊ शकतो.
*(एका माणसाने झुरळाचे सहा पैकी पाच पाय तोडले आणि तो त्या झुरळाला म्हणाला 'पळ', झुरळ पळाले नाही तेव्हा तो म्हणाला 'पळ सांगितलं ना, ऐकू येत नाही का?'. तरीही झुरळ पळाले नाही तेव्हा त्याने वहीत निष्कर्ष लिहिला- 'झुरळाचे पाच पाय तोडल्यावर त्याला ऐकू येत नाही')

दुसरा भाग म्हणजे त्या ज्योतिषाने असा पेपर ज्योतिषांच्या परिषदेत संख्याशास्त्रीय विदा देऊन प्रकाशित केला तर त्या नियमांना मान्यता मिळू शकेल आणि ज्योतिष हे शास्त्र म्हणून मान्य होण्यात एक पाऊल पुढे टाकले जाईल. (ठोकताळे नियम प्रसिद्ध केले तर ते ज्ञान सर्वांना उपलब्ध होऊन त्या ज्योतिषाचा धंदा बसण्याची शक्यता मात्र आहे). अशा संशोधनाला तयार नाही हेच तर दुखणे आहे (ऍक्चुअली संशोधन कशाला म्हणतात हेच समजून घ्यायला तयार नाहीत).

नितिन थत्ते

लाख बोललात!

ऍक्चुअली संशोधन कशाला म्हणतात हेच समजून घ्यायला तयार नाहीत
हे वाक्य ज्योतिषांनाच नव्हे तर त्यावर विश्वास ठेवणार्‍या बहुतेक भाविक लोकांना लागू पडते असे दिसते.

संशोधन - माझी भूमिका

"मी विज्ञान शाखेचा नसावा "किंवा "माझ्यासारखे लोक संशोधन कशाला म्हणतात हेच समजून घ्यायला तयार नाहीत" असे प्रतिसाद आले आहेत. ते देणार्‍यांचे आभार.

मी रसायनशास्त्रात पी. एच. डी. केली आहे. आधी भारतात संशोधन आणि आता अमेरिकेत संशोधन करतो. सुमारे २० पेपर्स. पोस्टर्स, पेटंटस् माझ्या नावे आहेत ही माहिती वरील लोकांना पुरेशी असावी. "रसायनशास्त्र हे वि़ज्ञान शाखेचा विषयच नाही किंवा त्याचे संशोधनाचे नियम मान्यताप्राप्त नाहीत" असा प्रतिसादही आला तरी त्याची तयारी ठेवलेली आहे.

आमच्या रसायनशास्त्रात आम्ही रासायनिक प्रक्रिया करतो. ती करताना अनेकदा मुख्य प्रॉडक्टबरोबर एखादे अपेक्षित नसलेले प्रॉडक्ट येते अगदी कमी प्रमाणात(१- २ % किंवा त्याहीपेक्षा कमी). पण ते काय आहे, ते कसे तयार झाले याबद्दल उत्सुकता असते आणि त्यामुळे आम्ही त्यावर अधिक मेहनत घेऊन त्याचे गुणधर्म काय, त्याचा उपयोग काय होऊ शकतो, उपयोग असेल तर त्याचे प्रमाण कसे वाढवता येईल किंवा अन्य काही मार्गाने तयार करता येईल का यावर संशोधन करतो. अशा प्रकारचे अनपेक्षित प्रॉडक्ट तयार होण्याची शक्यता असलेल्या १०० - २०० रासायनिक प्रक्रिया आधी करून संख्याशात्राप्रमाणे ३० - ४०% (किंवा जे काही संख्याशास्त्रमान्यप्रमाण असेल ते) इतक्या प्रक्रियांमध्ये अशा प्रकारे प्रॉडक्ट तयार होणार असेल तरच मी त्यावर संशोधन करेन किंवा प्रत्येक प्रक्रियेत त्याचे प्रमाण ५०% च्या वर असेल तरच मी संशोधन करेन अन्यथा नाही असा विचार आम्ही करत नाही. अनपेक्षित प्रॉडक्ट देणारी , तेही अगदी कमी प्रमाणात, एक प्रक्रियासुद्धा आम्हा रसायनशास्त्रज्ञ लोकांना संशोधन करायला प्रवृत्त करते. यात जर काही चुकीचे नसेल तर खरे होणारे ज्योतिषाचे एकसुद्धा भाकित संशोधन करायला पुरेसे आहे हे म्हणणे चुकीचे कसे?

विनायक

संशोधनाचे प्रयोजन

आपल्या संशोधनकार्याबद्दल आदर बाळगून मला कांही सुचवावे असे वाटते.
ज्या वेळी १ टक्का प्रक्रियेत अनपेक्षितपणे वेगळा बायप्रॉडक्ट आलेला दिसतो, त्याच वेळी ९९ टक्के प्रक्रियेत तो आलेला नसतो. त्या प्रक्रिया अपेक्षेप्रमाणे घडलेल्या असतात आणि त्या तशा का घडतात हे आपणास चांगले ठाऊक असते. अशा वेळी त्या १ टक्क्यात नेमके काय वेगळे घडले हे जाणून घेणे हा संशोधनकार्याशी सुसंगत असा भाग आहे. माझ्या प्रगत मेकॅनिकल इंजिनियरिंगच्या क्षेत्रात सुध्दा आम्ही झीरो डिफेक्ट आणण्याचा प्रयत्न करतो आणि १ टक्का फरकसुध्दा सहसा खपवून घेतला जात नाही. तो कां झाला याची कसून चौकशी केली जाते, तो टाळण्याचा प्रयत्न केला जातो, तसेच तो कशामुळे घडला हे समजल्यास त्या माहितीचा विधायक उपयोगसुध्दा केला जातो. तंत्रज्ञानातील अनेक सुधारणा अशा प्रयत्नातून झाल्याची उदाहरणे आहेत.

पण कोणीतरी कधीतरी सांगितलेली एकच गोष्ट खरी ठरली हे ती तशी कां ठरली याचे संशोधन करण्यास पुरेसे आहे असे मला वाटत नाही. ते करायला आपल्याकडे वेळ आणि साधनसामुग्री नसते आणि ती जुळवण्यासाठी पुरेसे प्रयोजन असावे लागते. त्या माणसाने सांगितलेल्या बहुतांश गोष्टी खर्‍या ठरत असल्याचे दिसले तरी त्या गोष्टी तो कशावरून सांगतो हे समजून घ्यायला हवे आणि त्यातला कार्यकारणभाव स्पष्ट व्हायला हवा. आपण दिलेल्या फलज्योतिषाच्या उदाहरणात मला या गोष्टी दिसत नाहीत.

उत्तर आणि समारोप

पण कोणीतरी कधीतरी सांगितलेली एकच गोष्ट खरी ठरली हे ती तशी कां ठरली याचे संशोधन करण्यास पुरेसे आहे असे मला वाटत नाही.

मान्य आहे. अगदी एकच गोष्ट ही जरा अतिशयोक्ति झाली. पण साधारणपणे ५ - १० ते क्वचित् २०% पर्यंत भाकिते खरी होतात असे चिकित्सक म्हणतात ही गोष्ट योगायोग किंवा संख्याशास्त्रीयदृष्ट्या नगण्य आणि म्हणून संशोधन करण्यास अयोग्य असे इथे बहुतेक लोक म्हणतात ते योग्य नाही. संशोधनाची आवश्यकता आहे हे मान्य असावे.

ते करायला आपल्याकडे वेळ आणि साधनसामुग्री नसते आणि ती जुळवण्यासाठी पुरेसे प्रयोजन असावे लागते.

एकदा जर आवश्यकता मान्य केली तर जमेल तश्या वेळेतून आणि मिळेल त्या पैशातून साधनसामग्री मिळवून संशोधन करता येईल.

त्या माणसाने सांगितलेल्या बहुतांश गोष्टी खर्‍या ठरत असल्याचे दिसले तरी त्या गोष्टी तो कशावरून सांगतो हे समजून घ्यायला हवे आणि त्यातला कार्यकारणभाव स्पष्ट व्हायला हवा. आपण दिलेल्या फलज्योतिषाच्या उदाहरणात मला या गोष्टी दिसत नाहीत.

ज्योतिषी लोक हे हातातून उदी, लिंबे काढून दाखवणार्‍या भोंदू लोकांप्रमाणे हातचलाखी, लबाडी करत नाहीत. तुमची पत्रिका किंवा प्रश्न विचारण्याची वेळ पाहून ते गणित मांडतात. येणार्‍या गणितावरून जे उत्तर येईल ते तुम्हाला सांगतात. भाकितात अचूकता यावी यासाठी त्यांच्या जगातही संशोधन चाललेले असते. उदाहरणार्थ कृष्णमूर्ती पद्धती वापरून जास्त अचूकता येते असे आजकाल अनेक ज्योतिषी म्हणतात. [ याच कृष्णमूर्तींचा परिचय श्री. घाटपांडे यांनी "या कृष्णमूर्तींचा प्रसिद्ध तत्त्वज्ञ जे कृष्णमूर्तींशी काही संबंध नाही" असा एका वाक्यात करून दिला होता. त्यांच्या कामगिरीबद्दल अवाक्षरही न काढता केवळ या एका वाक्यात त्यांची अशी बोळवण करणे हे योग्य नाही.] ज्याला थोडीफार आकडेमोड येते आणि ज्याला ही विद्या शिकण्यात रस आहे त्याला ती शिकता येते. कूट तमिळ लिपी, पट्ट्यांवरील मजकूर सतत बदलत राहणे वगैरे लबाड्या त्यात नाहीत. त्यामुळे ज्योतिषी भाकिते कशावरून सांगतो हे अगदी स्पष्ट आहे. आज तुम्हाला - मला शिकायचे असेल तर शिकता येईल अशी परिस्थिती आहे.

राहता राहिला संबंध कार्यकारणभावाचा. माझ्या वडिलांच्या एका मित्राने मला सांगितले होते "अमुक ग्रहस्थितीमुळे पृथ्वीवर अमुक एक गोष्ट घडते असा कार्यकारणभाव आम्ही ज्योतिषी मानत नाही. फक्त आकाशात अमुक एक ग्रहस्थिती असता पृथ्वीवर अमुक गोष्टी घडतात हे निरीक्षण आहे." आता कुठल्याही वै़ज्ञानिक संशोधनाची सुरूवात अश्या निरीक्षणांपासूनच होते. कार्यकारण भाव सांगणारी थिअरी एखादा प्रतिभावान शास्त्रज्ञ नंतर शोधून काढतो. पण कार्यकारणभाव माहीत नाही म्हणून "निरीक्षणेच खोटी आहेत "असे नाहीत हे मी आपल्याला सांगावे असे आहे का? भाकितात अचूकता येणे आणि कार्यकारणभाव समजणे यासाठीच संशोधन आवश्यक आहे असे मी म्हणतो. यासाठी ज्योतिष्यांच्या कलाकलाने काम करावे लागेल. त्यांच्या पद्धती काय आहेत वगैरे समजावून घेऊन मग पुढे जावे लागेल. [हेच मी तुम्हाला व्यनिमध्ये लिहिले होते. त्याला उत्तर न देता "यांना संशोधन म्हणजे काय तेच समजत नाही" याला "लाख बोललात" असा नास्टी प्रतिसाद दिलात यातून आपलाही बौद्धिक अप्रामाणिकपणा दिसला. ]

असो. या विषयावर आलेल्या प्रतिसादाबद्दल सर्वांचे धन्यवाद. घाटपांडे यांचा अपवाद वगळता बाकी बहुतेक प्रतिसाद हे बौद्धिक अप्रामाणिकपणाचे आहेत असे माझे मत झाले आहे. कठोर शब्द वापरल्याबद्दल क्षमा करा. माझ्याशी मतभेद आहेत म्हणून मी असे म्हणत नाहीये. "संशोधनाची आवश्यकता"यावर कितीही टोकाचा वाद करायची माझी इच्छा आहे. आतापर्यंत सर्व आक्षेपांना समर्पक आणि नम्रपणे उत्तरे दिली. पण बहुतेक प्रतिसादक व्यक्तीगत पातळीवर हीन टीका किंवा टिंगलटवाळी (अगदी धनंजयांनी माझ्या गणितावर घेतलेल्या आक्षेपातही ती दिसते "कुठल्याही संख्येला कुठल्याही संख्येने गुणून .." वगैरे, त्याचे यथामति उत्तर मी दिले आहेच) याशिवाय वेगळा युक्तिवाद करताना दिसत नाहीत.

अर्थात् मला फक्त घाटपांडे यांच्याच प्रतिसादाची अपेक्षा होती आणि त्यांनी संशोधनाची आवश्यकता मान्य केली यात त्यांचा प्रांजळपणा दिसतो. आता फक्त मी गणिताबद्दल दिलेल्या उत्तरांबद्दल श्री. धनंजयांचा प्रतिसाद बाकी आहे. अर्थात त्याही बाबतीत मला आणखी काही सांगायचे नसल्याने माझ्याकडून हा विषय संपला.

विनायक

 
^ वर