माझे नाडी ग्रंथ भविष्य लेखन कार्य भाग ५

माझे नाडी ग्रंथ लेखन कार्य ...पुढे चालू...
भाग 5 वा

तमिळ संगम

आज दि 25 ऑगस्ट 2009ला अनेक दिवसांनी या पुढील लेखन करायला हुरुप आला. त्याला हैयोहैयैयो काही अंशी प्रेरक आहे. नाडीकेंद्रावर एक कोर्ट केस झाली होती. त्या केसच्या निकालाची तमिळभाषेतील प्रत नाडीकेंद्रातर्फे मला नुकतीच मिळाली होती. त्या तमिळमधील कोर्टाचा निकालवाचून वाचून हैयोहैयैयोने त्याचे इंग्रजीत रुपांतर करून ईमेलने कळवले की त्यात कोर्टाने सबळ पुराव्या अभावी (फिर्यादीच्या त्रुटीपुर्ण व खोट्या पुराव्यांमुळे - हे माझे शब्द) नाडीकेंद्राच्या संचालकाला निर्दोष सोडले आहे. त्याचे असे झाले की 4 मार्च 2007 च्या पेपरातून सर्व भाषातून “तमिळनाडूतील नाडी भविष्यकेंद्राने केलेली फसवणूक उघडकीला - केंद्राच्या संचालकाला कोर्टात खेचले”. असे ठळक मथळ्यात छापून आले होते. त्या घटनेला पीटीआयच्या अन् टीव्ही चॅनल्स व अन्य प्रसिद्धिमाध्यमांनी लाऊन धरल्याने ती बातमी वाऱ्यासारखी जगभर पसरली. इतकी प्रसिद्ध मिळाली की त्यामुळे नाडी ज्योतिष जगतात बरीच खळबळ माजली होती.

मला अनेक भागातून विचारणा येऊ लागल्या. ‘बोला ओक, आता आपले काय म्हणणे ते? मला ही नेमके कळेना काय झाले आहे ते. शेवटी मी वैदीश्वरनकोईलच्या ज्यांच्यावर ती केस केली गेल्याचे वृत्त होते त्या शिवसामींना फोन लावला. तेंव्हा कळले की काही विरोधी विचाराच्या संस्थांनी एका फाटक्या व्यक्तीला पुढे करून त्याच्या हाती एका मृत माणसाचा अंगठाछाप देऊन शिवसामींच्या नाडी केंद्रावर पाठवले होते. नेहमीप्रमाणे हो-नाही करत नाडीपट्टी शोधल्यावर एका पट्टीतील वर्णनाशी जुळणाऱ्या मजकुराला त्या व्यक्तीने हो-हो म्हणून मान्यता दिल्याने व ती ताडपट्टी त्या अंगठेवाल्याचीच आहे असे सांगितले गेल्याने, त्या पट्टीतील मजकूर एका वहीत लिहून टेपसह तो त्या आलेल्या व्यक्तीला दिला गेला होता. नंतर त्या व्यक्तीच्या संगममताने नाडीग्रंथ विरोधकांनी आणखी एकाचा अंगठ्याचा ठसा देऊन त्याच्या वही व कॅसेटच्या आधारे असा दावा कोर्टात ठोकला की ज्याची पट्टी सापडली असा नाडी केंद्राने दावा केला आहे व त्याची वही आणि कॅसेट बनवून दिली तो वस्तुतः काही काळापुर्वीच मेलेला व्यक्ती होता. त्यामुळे नाडीवाले पैसे मिळवण्याच्या नादात नाडीभविष्य कथनाच्या नावाखाली फसववणूकीचा व्यवसाय करत आहेत. त्याला पायबंद घातला जावा म्हणून त्यांच्यापैकी महत्वाच्या व बड्या मानल्या जाणाऱ्या नाडी केंद्राच्या संचालकावर वैदीश्वरनकोईल या नाडी केंद्रासाठी प्रसिद्ध गावाजवळील सिरघळी या तालुक्याच्या गावातील कोर्टात केस केली आहे.

मी फोन वरून जेंव्हा त्यांच्याशी बोललो तेव्हा ते म्हणाले, ‘मला ही पेपर मधूनच ही बातमी कळली. अजून कोर्टातर्फे काहीच विचारणा आलेली नाही. आम्ही काही खोटेपणा केलेला नाही. पण ते कोर्टात शाबीत व्हायला हवे म्हणून आम्ही केस लढवायचा विचार करत आहे’. त्या दाव्याचा निकाल 29 जुलै 2009 रोजी नाडी केंद्राच्या बाजूने लागला. त्या कोर्टाच्या निकालाची प्रत मला शिवसामींनी आवर्जून पाठवली होती. शिवसामींच्या सांगण्यावरून या दाव्याच्या संदर्भात मी त्यांच्या वकीलांना काही मुद्दे सुचवले होते. ही केस विरोधकांनी परत घेण्याचा प्रयत्न केला तरी नाडीकेंद्रवाल्यांनी ती लढवली पाहिजे. कारण त्यातील फिर्यादी, आरोपी, दोन्हीकडील वकील व स्वतः न्यायाधीश हे सर्व तमिळभाषेचे जाणकार आहेत. कदाचित त्यापैकी काहींनी नाडी ग्रंथांचा अनुभव देखील घेतलेले असेल. त्यामुळे अशा केसेस तमिळनाडूतच लढवल्या गेल्या पाहिजेत व त्यामुळे न्यायालयातर्फे नाडीग्रंथांची कसोटी होऊन ताडपट्टयातील मजकुराच्या खरे-खोटेपणाची शहानिशा होऊन नाडीकेंद्रांच्या सचोटीला मान्यता मिळेल. तसेच गैरमार्गाने कोणी नाडीग्रंथांचा उपयोग करत असेल तर त्यालाही जरब बसेल. शिवाय असे अनेक मुद्दे होते ते ऐकून वकील म्हणाले, ‘गरज पडली तर आम्ही आपणांस साक्षीदार म्हणून बोलावू’. अर्थात ती वेळ आली नाही. या कोर्ट केस बाबत नंतर पुढे सवडीने लिहू. असो.

तर माझे मराठीतील पुस्तक मी अनेक नाडीकेंद्रांना सप्रेम भेट देत असे. त्यावेळी ते म्हणत, “सामी आपण आमच्याकडून नाडीग्रंथांची माहिती गोळाकरून हे पुस्तक लिहिलेत पण आम्हा तमिळलोकांसाठी एखादे पुस्तक केंव्हा तयार होणार?” त्यांची मागणी लवकरच पुर्ण होणार होती पण मला त्याची कल्पना नव्हती. मी त्यांना म्हणे, ‘एक तर मला तमिळमधे भाषांतर करणारे लोक पाहिजेत. शिवाय इतका खर्च करायला माझ्याकडे पदरचे पैसेही नाहीत. त्यावर ते म्हणत, ‘पैशाची काळजी नको. ते आम्ही पाहू. मात्र मला कोठल्याही नाडीकेंद्राचे पैसे घेऊन त्यांचे मिंधे व्हायचे नव्हते. त्यावर मी तोड काढली की आपल्याकडे येणाऱ्या ग्राहकांपैकी कोणी जर नाडी ग्रंथांचा त्यांना आलेला अनुभव सांगून त्यांच्या धंद्याची जाहिरातकरून आपल्याला आर्थिक मदत दिली तर मला चालेल. त्यावर ताबडतोब अनेक नाडीकेंद्रांनी त्यांच्याकडील नामीगिरामी ग्राहकांचे फोननंबर दिले. त्यांच्याशी संपर्क केल्यावर त्यांनी आपले अनुभव मोठ्या आनंदाने सांगून आपल्यातर्फे कॉम्प्लीमेंटरी जाहिराती देऊन ती गरज पूर्ण केली.

आता प्रश्न होता. मराठीचे तमिळमधे भाषांतर कोण करणार? मी एक दिवशी ऑफीसमधे कोणाला तरी याबाबत फोनवरून सांगत होतो. ते तेथे उपस्थित असलेल्या एकांनी ऐकले व मला म्हणाले, ‘आपल्याला अशा तमिळ माणसाची गरज आहे काय, जो मराठीतून भाषांतर करेल? माझ्या माहितीत एक ग्रहस्थ आहेत त्यांना विचारून पहा. असे म्हणून त्यांनी एका दुकानाचा पत्ता दिला. मी तात्काळ त्या दुकानाला भेट दिली. एक साठीतील काळेसे ग्रहस्थ होते. ‘मी गोपाळ राव’ म्हणून त्यांनी आपली ओळख दिली. मी त्यांना माझी गरज सांगितली तेंव्हा ते म्हणाले, ‘मी कारवारी भागातील मराठी बोलणारा आहे. आमच्या काही पिढ्या येथे गेल्या. तरीही आम्ही घरी मराठीतून बोलतो. पुर्वी मी दासबोधाचे तमिळमधे रुपांतर केले आहे. शिवाय मी हिंदीतून तमिळमधे रुपांतर करण्याचे काम करतो. आपल्याला माझे काम आवडले तर पुढेचे पाहू’. म्हणून त्यांनी माझे पुस्तक वाचायला घेतले. थोडेसे मोठ्याने त्यानी त्यातील मजकूर वाचला तेंव्हा मी त्यांना म्हटले, ‘आपण जर दासबोधाला रुपांतरीत केले आहेत तर हे काम फारच साधे आहे. आपण काम सुरु करावे’. ते म्हणाले, ‘जरी मी मराठी वाचतो तरी आपण मला हिंदीतून याचा अनुवाद दिलात तर मला तो जास्त सोईचा होईल’. त्यानुसार मी स्वतः हिंदीत रुपांतर करायला लागलो. शिवाय माझ्या विज्ञानवादी मित्राच्या सासरेबुवांनी मला मदत केली. असे करत करत बराच भाग हिंदीत आपसुक तयार झाला. पुढे त्यांनी तमिळमधील रुपांतरित लेख माझ्या हातात दिले व म्हणाले, ‘अहो इतकी वर्षे आम्ही इथे तामिळनाडूमधे राहतोय पण आम्हाला या नाडी भविष्याबद्दल जरा देखील माहिती नव्हते! माझी मुले मधल्याकाळात ते जाऊन पाहून आली व त्यातील अचुक माहिती आलेली पाहून चकीत झाली. आपण इतक्या लांबून येऊन या बद्दल कसे आकर्षित झालात? महर्षींच्या लोकसेवेपुढे माझी भाषांतराची कामगिरी तुच्छ आहे. मी आपणांकडून काही मोबदला घेऊ इच्छित नाही’.

त्यांनी केलेले तमिळ लेखन मी माझ्या ऑफिसमधील तमिळ जाणकारांना वाचायला देत असे. त्यांनी शेरा दिला अत्यंत समर्पक रुपांतर आहे. नाडीकेंद्रांच्या माहितीतील एका प्रिंटिंग प्रेसला छपाईचे काम देण्यात आले. इकडे छपाई चालू झाली. हजार प्रतीं विविध नाडीकेंद्रांना मोफत द्यायच्या असे मी ठरवले होते. उरलेल्या हजार विक्रीसाठी कोण घेणार असा प्रश्न होता. त्याच सुमारास मला चिपॉक स्टेडियमवर क्रिकेटमॅचच्या सेक्युरिटीच्या संदर्भात एका मीटींगला जायचे होते. हवाईदलाच्या गाडीतून युनिफॉर्ममधे मी जात असताना वाटेत एके ठिकाणी थांबावेसे वाटले. ते होते मईलापुरमच्या भागातील गिरी ट्रेडींग कंपनीचे ऑफीस. पोचलो तर एका गादीवर एक जण तमिळ प्रचलनाप्रमाणे अर्धे शरीर उघडे, पांढरी भारी धोतीची लुंगी, गळ्यात रुद्राक्षापासूनच्या सोन्याच्या अनेक माळा अशा अवतारात बसलेले होते. तेच मालक गिरी होते. मी कोण हे सांगताच त्यांनी हात पसरले व अस्खलित इंग्रजीत म्हणाले, ‘आज किती तरी वर्षांनी मला हवाईदलातील वरिष्ठ व्यक्तीला भेटण्याचा योग येत आहे’. पुढे म्हणाले, ‘मी ही खूप वर्षांपुर्वी हवाईदलात होतो. मला त्याचा अभिमान आहे. तुम्ही काही बोलायच्या आधीच सांगतो की माझ्याकडे काही काम असेल तर ते झालेच असे समजा’. मी नाडी भविष्यावरील पुस्तकाच्या वितरणाची जबाबदारी आपणाकडे घ्यावी असा प्रस्ताव मांडला. ‘हो नक्कीच. अहो एवढेच काय, हे पुस्तक मीच छापले असते. मला आधी माहिती असते तर’ असे म्हणून त्यांनी आपल्या स्टाफला तसे आदेश दिले. यथावकाश त्या पुस्तकाच्या प्रती त्यांच्याकडून वितरित झाल्या. त्याचा सर्व हिशोब मला वेळोवेळी मिळत असे.

झाले. असे करता करता नाडी भविष्यावर तमिळ पुस्तक तयार झाले. त्याचे नाव होते, “अतीशय कन्निपिडिपु - नाडि जोतिडम” अर्थात “चक्रावून टाकणारा चमत्कार – नाडी भविष्य’.

रमणी गुरुजींच्या आश्रमात दर शुक्रवारी माझ्या चकरा असत. त्यांनी या पुस्तकाचे उदघाटन करावे अशी माझी इच्छा त्यांना बोलून दाखवली. त्यांनी आनंदाने होकार दिला. एका संध्याकाळी सर्वांसमक्ष काकभुजंदर नाडीचे मोठ्याने वाचन झाल्यावर त्यामधील कथनाचा गोषवारा आमच्या सारख्या तमिळ न समजणाऱ्यांसाठी सांगताना रमणी गुरुजींनी म्हटले, ‘समस्त महर्षींचे आशीर्वाद तुला या नाडीवरील कामामुळे लाभले असल्याने, यापुढे तू हे काम निष्काम भावनेने करशील तेंव्हा तेंव्हा तुला आमची सतत मदत होईल’ असा आश्वासक आशीर्वाद दिला. तेथल्या तेथे अनेक प्रती विकत गेल्या. होता होता आज अशी वेळ आली आहे की माझ्याजवळ तमिळच्या दोन हजारापैकी व मराठीतील पहिल्या आवृत्तीच्या पाच हजारापैकी फक्त एक-एक प्रत आठवण म्हणून शिल्लक आहे.

“तेरा काम हो जाएगा” या योगी राम सूरत कुमारांच्या विधानाचा प्रत्यय मला वेळोवेळी असा आला व पुढेही येत राहिला. हिंदीतील पुस्तक कसे आश्चर्यकारकपणे प्रसिद्ध झाले. नाडी भविष्याच्या संदर्भातील झालेल्या संपूर्ण पत्रव्यवहारावर आधारित “बोध अंधश्रद्धेचा” या पुस्तकाने अंनिसची त्रेधा तिरपिट कशी उडवली व भल्या भल्यांची कशी भंबेरी उडवली त्याचा इतिहास, ‘इतिहास पत्रिका प्रकाशन’ ठाणेतर्फे डॉ. विजय बेडेकरांनी रचला ते यथावकाश कळेल.

क्रमशःचालू

लेखनविषय: दुवे:

Comments

पुढील भागाच्या प्रतिक्षेत

मृत माणसाचा अंगठाछाप देऊन शिवसामींच्या नाडी केंद्रावर पाठवले तेव्हा,
मृत माणसाचे काय भविष्य सांगितले त्याची खूप उत्सूकता लागली आहे.

कोर्टाचं प्रकरण तपशिलवार सांगा त्याची उत्सूकता आहे.

पण नाडीभविष्यवाल्यांची गोची करायची आयडिया चांगली होती, हहपुवा झाली.

-दिलीप बिरुटे
(शशिओक यांच्या लेखनाचा फॅन)

उत्सुक

मृत माणसाचे काय भविष्य सांगितले त्याची खूप उत्सूकता लागली आहे.

हा हा हा .. खरे आहे.. मला सुद्धा उत्सुकता आहे.

नाडी भविष्याच्या संदर्भातील झालेल्या संपूर्ण पत्रव्यवहारावर आधारित “बोध अंधश्रद्धेचा” या पुस्तकाने अंनिसची त्रेधा तिरपिट कशी उडवली व भल्या भल्यांची कशी भंबेरी उडवली त्याचा इतिहास, ‘इतिहास पत्रिका प्रकाशन’ ठाणेतर्फे डॉ. विजय बेडेकरांनी रचला ते यथावकाश कळेल.

याबद्दल सुद्धा लिहावे. वाचायला उत्सुक आहे.
--लिखाळ.

पोपट रे!

अरे वा यावेळी थोड्या वेगळ्या अंगाने माहिती आहे.
बाकी अंगठ्याची आयडीया आवडली .. कोर्टात निकाल काहिहि लागो.. नाडी परिक्षेचा निदान ह्या अंगठ्याच्या टेस्टमधे पचका झाला म्हणायचा

ऋषिकेश
------------------
समाजातली सामाजिक जाणीवही अगदी नसल्यातच जमा आहे. सुस्त, मद्दड जनता गोळाभर अन्न गिळून, टीव्हीवरच्या मालिका बघून झोपी जात आहे - सन्जोप राव

पोपट?

पोपट?

नमस्कार,

न्यायालयाचा निर्णय काहीही लागो असे म्हणताना आपणांस काय सुचवायचे आहे? न्यायालयात अजूनतरी पोपटप्रेमी लोक भरती झालेली नाहीत, आणि अजूनही साक्षीपुरावे तपासून निर्णयाप्रत येण्याची कार्यपद्धती अवलंबिली जाते. आपण कितीही तर्कप्रेमी असलात तरी न्यायालयीन कार्यपद्धतीवर अविश्वास दाखवणे योग्य नव्हे. आपल्यावर न्यायालयात जाण्याची वेळ अजून आली नसावी, परंतु न्यायालयासंबंधी विचित्रवक्तव्ये करत राहीलात तर आपण शब्दप्रयोग करता त्याप्रमाणे आपल्याच बाबतीत घडणे कठीण नाही.

असो. मागे एकदा आपण 'नाडीपट्टी आदेश देते का फक्त भविष्य सांगते' अशी विचारणा केली होती, आणि त्यासंदर्भात आपण स्वतः अनुभव घ्यावा असे मी सुचविले होते. तर आपण हा अनुभव घेतलात का? आपले अनुभव वाचण्यास आम्ही उत्सुक आहो.

मृतमनुष्याचे भविष्य काय सांगण्यात आले, ह्यापेक्षा वादींची न्यायालयात प्रतिवादींच्या समोर कशी भंबेरी उडाली याची कथा मोठी रोचक आहे. एकवेळ वादी स्वतः आपला खटला मागे घेण्यास सिद्ध झाले होते असे सांगतात, तथापि पुढे काय झाले ते श्री. ओक सरांकडून ऐकणे सयुक्तिक ठरेल. कारण मी काय, केवळ निर्णयपत्र वाचले आहे; त्यांना सदर खटल्याबद्दल अथ-ते-इति माहिती आहे.

हैयो हैयैयो!

--
तमिळ्नाट्लेर्न्दु डैर्रक्टा मराट्टिदेडत्तुक्कु वंदु सेट्लान ओरु चिन्नमनिदनिन एळुत्तु यिदु!

हैयो हैयैयो!

हा हा हा

नमस्कार,

तुमचा घोळ झालेला दिसतोय.. पोपट न्यायालयाचा नव्हे तर नाडीवाल्यांचा झाला होता. अंगठ्याच्या आयडीयाने मृतमनुष्याचे भविष्य सांगून नाडीवाल्यांचा पोपट झाला होता (त्याची कारणे काहिहि असतील) असेच माझ्यासारख्या सामान्य निरिक्षला अजूनहि वाटते.

पुढे त्यांनी साक्षी-पुरावे, काहि तथ्यात्मक(!) बाबी कोर्टापुढे ठेऊन वगैरेंनी कोर्ट-कज्ज्यात लढाई जिंकली असेलहि.. ती लढाई रोचक नसेल/नाहि असे मी कुठेही म्हटलेले नाहि. वादींची उडालेली भंबेरीदेखील रोचक असेल तर तीही ऐकायला उत्सूक आहे. आम्ही काय कुंपणावरचे प्रेक्षक.. कोंबडे झुंजतात आम्ही मजा बघतो :प्

टीपः पचका होणे याला आम्ही बोली भाषेत पोपट होणे असेही म्हणतो

ऋषिकेश
------------------
समाजातली सामाजिक जाणीवही अगदी नसल्यातच जमा आहे. सुस्त, मद्दड जनता गोळाभर अन्न गिळून, टीव्हीवरच्या मालिका बघून झोपी जात आहे - सन्जोप राव

अविश्वास?

आपण कितीही तर्कप्रेमी असलात तरी न्यायालयीन कार्यपद्धतीवर अविश्वास दाखवणे योग्य नव्हे. आपल्यावर न्यायालयात जाण्याची वेळ अजून आली नसावी, परंतु न्यायालयासंबंधी विचित्रवक्तव्ये करत राहीलात तर आपण शब्दप्रयोग करता त्याप्रमाणे आपल्याच बाबतीत घडणे कठीण नाही.

शहाण्याने कोर्टाची पायरी चढु नये असे म्हणतात त्याचा अर्थ व्यावहारिक दृष्ट्या ती विलंबाची प्रक्रिया आहे व justice delayed is justice denied असा भावार्थ दडलेला आहे शिवाय आपल्याला 'अपेक्षित' न्याय मिळेल याची काय खात्री? अशी शंका/भीती देखील दडलेली असते.
आता न्यायालयीन कार्यपद्धतीवर काही टिप्पणी/मते ( चित्रविचित्र वक्तव्ये) करत राहिलात तर(खबरदार) contempt of court होईल ही भीती असते.
बाळासाहेब एकदा भाषणात न्याय यंत्रणेतील अनिष्ट प्रवृत्तींबाबत बोलताना म्हणाले कि त्यांच्या एका केसमध्ये त्यांच्या बाजुने निकाल लागण्यासाठी न्यायमुर्तीने २५ लाख(रक्कम कमी जास्त असु शकते) मागितले.मटाने ते छापले. त्यांच्यावर कंटेम्प्ट ऑफ कोर्ट केस झाली. त्यावेळी कुमार केतकर संपादक होते. ते म्हणाले कि जे बोलले त्यांच्यावर कंटेप्ट ऑफ कोर्ट नाही पण आम्ही छापले तर मात्र कंटेम्प्ट काय? त्यावर न्यायालयाने सांगितले कि ती वेगळी बाब आहे तुम्ही छापले हा कंटेम्प्ट होतो. पुढे त्या केस मधुन मटा सुटला हा भाग वेगळा. (हा किस्सा मी केतकरांच्या तोंडातुन पुण्यात एसेम जोशी सभागृहात ऐकला आहे)
आमचे मते कोर्ट 'निकाल' देत 'न्याय' देतेच असे नव्हे. ती बाब तांत्रिक आहे.न्या. नरेंद्र चपळगावकरांचे कायदा आणी माणुस ही सकाळ मधिल लेखमालिका आता पुस्तकरुपात आहे. ते वाचनीय आहे.
नाडी ग्रंथ वाल्या स्वामींच्या बाजुने निकाल दिला म्हणजे नाडीग्रंथ वैज्ञानिक अथवा न्याय्य ठरत नाहीत. मुळ मुद्दा अगदी साधा आहे कि नाडीग्रंथवाल्याला हा मृत व्यक्तीचा आंगठ्याचा छाप आहे हे समजले नाही. पत्रिकेवरुन देखील ती जिवंत व्यक्तीची आहे कि मृत व्यक्तीची आहे हे समजत नाही. तसेच ती स्त्री ची आहे कि पुरुषाची हे देखील समजत नाही.
नाडीग्रंथांभोवती एक गुढ वलय आहे हे नाकारता येत नाही.
प्रकाश घाटपांडे

माझेही हेच म्हणणे आहे.

माझेही हेच म्हणणे आहे.

नमस्कार,

माझेही हेच म्हणणे आहे. कुणाची कितीही इच्छा झाली तरीही न्यायलयाचा पोपट होणे शक्य नाही. न्यायालयीन प्रक्रियेमध्ये काही तत्त्वे असतात. न्यायाधीशाने पूर्वग्रहशून्य दृष्टीने आपणापुढील खटल्यातील घटना-कथांचे विश्लेषण करावे त्यानुसार साक्षीपुरावे तपासून, सत्यासत्य पडताळून निर्णयाप्रत यावे हे साधारण कार्यपद्धतीचे मुख्य तत्त्व आहे.

अर्थात ह्या ठिकाणी (निदान नाडिज्योतिषाबाबत तरी) ’पूर्वग्रहशून्य दृष्टी’ बाबतच्या तत्त्वांवर बोलणे उचित नाही. कारण आपण काय किंवा इतर कोणी काय, येथे पूर्वग्रहाने भारलेले सदस्य अधिक आहेत असे ह्या विषयावरचे पूर्वीचे लेख वाचून समजते. (ह्या विषयावरचेच कां, इतरही अनेक लेखांत पूर्वग्रहदोषयुक्त दृष्टीने खिल्ली उडवलेली दिसते!) ह्याच पूर्वग्रहदोषामुळे कुंपणावरील प्रेक्षक कुंपणापलिकडे जाऊ शकत नाहीत. पूर्वग्रह सोडून त्यांनी कुंपणापलिकडे जाणे केल्यास थोडी मजा आम्हालाही बघावयास मिळेल.

मृतमनुष्याच्या अंगठ्याबद्दल एक तांत्रिक मुद्दा असा, की केवळ वादीने तसे म्हटले म्हणून काही तो छाप मृतमनुष्याचा होत नाही. तसे न्यायालयात सिद्ध करावे लागते. आणि एकूणात ह्या अंगठा प्रकरणाला नाडिज्योतिषात असाधारण विशेष असे महत्त्व नाही असे मला स्वत:ला वाटते. आपल्या अंगठ्याचा छाप हा एक मार्गदर्शक म्हणून कार्य करतो. अधिक माहिती आपणास नाडिकेंद्रांवर मिळेल.

असो. घाटपांडे सरांनी एक विशेष मुद्दा उपस्थित केला आहे. मानवी न्यायालये न्याय करतांत की निर्णय देतात ह्या विषयावर न्यायमीमांसाशास्त्रांत अनेक विविध मते आहेत. तथापि एकाद्या न्यायालयाने दिलेल्या निर्णयाने ’न्याय होतच नाही’ असे म्हणतां येणार नाही. परंतु तो येथे चर्चेचा विषय नाही. प्रस्तुत खटल्यामध्ये ’नाडीग्रंथ हे वैज्ञानिक ठरतात अथवा नाही किंवा कसे’ हा प्रश्न न्यायालयापुढे नाही. तो प्रश्न सध्याच्या न्यायव्यवस्थेच्या कार्यकक्षेबाहेरील आहे, आणि त्या प्रश्नाचे उत्तर हे ज्योतिषशास्त्राभ्यासकांनी शोधावयाचे आहे. अर्थात हे कार्य पूर्वग्रहांना दूर ठेवून करणे आवश्यक आहे.

--
तमिळ्नाट्लेर्न्दु डैर्रक्टा मराट्टिदेडत्तुक्कु वंदु सेट्लान ओरु चिन्नमनिदनिन एळुत्तु यिदु!

हैयो हैयैयो!

पूर्वग्रह..

आपण काय किंवा इतर कोणी काय, येथे पूर्वग्रहाने भारलेले सदस्य अधिक आहेत असे ह्या विषयावरचे पूर्वीचे लेख वाचून समजते.

अशा काही विषयावर लोक पुर्वग्रहाने चर्चा करतात कारण अशा गोष्टींवर त्यांचा विश्वास असतो किंवा नसतो.म्हणून आपापल्या समजाने सन्माननीय सदस्य आपले मत व्यक्त करतात. म्हणून त्यांना पूर्वग्रहाने भारलेले सदस्य म्हणने योग्य नाही, असे वाटते. कदाचित अशा विषयांवरील चर्चेने त्यांचे मत परिवर्तन होऊ शकते. पूर्वग्रह बदलू शकतील. ज्योतिष विषय आल्यावर आपण म्हणता तशी खिल्ली उडवत असेल कोणी. म्हणून कुंपणापलीकडे पाहण्याची सवयच नाही, असे म्हणने योग्य नाही असे वाटते. आम्ही देवाचा विषय काढला की, अनेक आदरणीय सदस्य त्यावर टीका करतात. आम्ही त्याला खिल्ली उडवणे म्हणत नाही, पूर्वग्रहदूषित म्हणत नाही. कधीतरी त्यांचे विचार बदलतील असा आशावाद आमच्या मनात असतो.

मृतमनुष्याच्या अंगठ्याबद्दल एक तांत्रिक मुद्दा असा, की केवळ वादीने तसे म्हटले म्हणून काही तो छाप मृतमनुष्याचा होत नाही. तसे न्यायालयात सिद्ध करावे लागते.

मृत मनुष्याची माती झाली असेल तर आता कशाचा पुरावा राहील शिल्लक ?

-दिलीप बिरुटे

कारण आमचा शिक्काच खोटा आहे

आम्ही देवाचा विषय काढला की, अनेक आदरणीय सदस्य त्यावर टीका करतात. आम्ही त्याला खिल्ली उडवणे म्हणत नाही, पूर्वग्रहदूषित म्हणत नाही. कधीतरी त्यांचे विचार बदलतील असा आशावाद आमच्या मनात असतो.

कारण आमचा देव नावाचा शिक्काच खोटा आहे. त्यामुळे आम्ही त्याला खिल्ली उडवणे म्हणू शकत नाही, पूर्वग्रहदूषित म्हणू शकत नाही. कधीतरी त्यांचे विचार बदलतील असा भाबडा आशावाद बाळगणे तेवढेच आम्हा तर्कदुबळ्यांच्या हाती असते.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

पूर्वग्रह आणि इतर विचार.

पूर्वग्रह आणि इतर विचार.

अशा काही विषयावर लोक पुर्वग्रहाने चर्चा करतात कारण अशा गोष्टींवर त्यांचा विश्वास असतो किंवा नसतो. म्हणून आपापल्या समजाने सन्माननीय सदस्य आपले मत व्यक्त करतात.

आपले वाक्य सत्य आहे. एकासमयी एकाद्या गोष्टीवर प्रत्येकाचा विश्वास असणे शक्य नाही असे एक गृहितक आहे. अर्थातच सन्माननीय सदस्यांकडून विरोधी मते मांडली जाणे ह्यात काहीही वावगे नाही. नव्हे, ती तशी मांडली जावीत असेच माझे वैयक्तिक म्हणणे आहे. असे केल्याने विषयाच्या अभ्यासाला वृद्धी मिळते असे वाटते. परंतु ही विरोधी मते सुद्धा अभ्यासावर आधारीत असावीत अशी आमच्यासारख्या सामान्यजनांची एक सर्वसाधारण अपेक्षा असते, अन्यथा विषय भरकटण्याची भीती असते.

एखाद्या गोष्टीबद्दल पूर्वग्रह बाळगणे ही सामान्य मानवी प्रवृत्ती होय. ही प्रवृत्ती बळावली तर ते समाजास घातक असते असे परखड मत मा. सर्वोच्च न्यायालयाने नोंदविलेले आहे. उपक्रमावरील एक अलिकडचेच उदाहरण आपण आठवावे. येथे नुकतेच एका वाचकाने ’ज्योतिषशास्त्र ह्या विषयावर लिखित लेखांचा समावेश ह्या संकेतदळावर होऊ नये’ असा विनंतीवजा प्रस्ताव मांडला होता. भले; अजून तरी उपरोक्त विषयास येथे अधिकृतरितीने बंदी नाही!

तरी ती होण्यापूर्वीच एक विचार व्यक्त करू इच्छितो. अनुमति असावी. एकुणात ज्योतिषशास्त्र ह्या विषयाबाबत बोलावयाचे झाले तर उपक्रमावर त्याबाबत अनेकविविध मते मांडली जावून विविध पैलूंवर लक्ष वेधले गेले आहे. त्यातील सगळीच मते टाकाऊ आहेत असे माझे अजिबात म्हणणे नाही. नाडिग्रंथ ह्या विषयापुरते पहावयाचे झाल्यास, येथील काही सन्माननीय सदस्यांची मते विचारात घेता, त्यांनी व्यक्त केलेले विचार अभ्यासपूर्ण नाहीत असे जाणवते. अनेक विचार पूर्वग्रहभारित आहेत असेही जाणवते. विषयाबद्दलचा विरोध हा लेखकाविरुद्धदेखील परावर्तित होऊ शकतो असे श्री. ओक सरांनी लिहिलेल्या ’रोजच्या आहारात’ नामक लेखावरील प्रतिक्रिया वाचून कळते. (येथेही पूर्वग्रह नाही असे आपणास म्हणावयाचे आहे काय?)

तर अर्थात प्रत्येकाच्या प्रत्येक मतांस अर्थ अथवा विचारमूल्य असतेच असे नाही. किंबहुना, अनेक वेळेला लोक पोकळ निरर्थक मते मांडणे ह्यातच स्वत: तसेच इतरांच्या वेळेचा अपव्यय करतांत. काहींना तर निरर्थक मते देखील व्यवस्थित मांडता येत नाहीत, ते नुसतेच चिथावणीखोर लेखन करतात असे माझे येथील निरिक्षण आहे. असे लेखन अभ्यासू लोकांकडून दुर्लक्षिली जावीत. एकूण निरिक्षणांती, एकाद्या विषयावर चर्चा होत असताना दोहो बाजूंकडून अभ्यासपूर्णच विचार मांडले गेले पाहीजेत असे माझे ठाम मत झाले आहे. असे झाल्यासच वर लिहिल्याप्रमाणे विषयाच्या अभ्यासाला वृद्धी मिळेल.

असो. वर मांडलेल्या विचाराच्या अनुषंगाने अजून एक विचार मांडण्याचे स्वातंत्र्य घेतो. इ.स. २००८ मे महिन्या मध्ये काही मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली फलज्योतिष्याच्या सत्यासत्यतेविषयक एक ’परिक्षणयोजना’ करण्यात आली होती आणि तिचा अहवाल आला होता असे मला येथेच समजले होते. इतरांना देखील ह्याबाबत माहिती असावी असे मी गृहीत धरू इच्छितो. सदरील प्रकल्पात श्री. घाटपांडे सरांचा मुख्यत्वेकरून सहभाग होता असेही वाचनात आले आहे. ह्या पार्श्वभूमीवर नाडिज्योतिषावर जे काही लेखन करण्यात आले आहे, त्याची सत्यासत्यता तपासून वरीलप्रमाणे एक अहवाल सादर केला जावा असे सुचवू इच्छितो.

उपक्रमावरील आपल्या पुस्तकांत उल्लेखल्याप्रमाणे श्री. घाटपांडे सर स्वत: नाडिकेंद्रांस भेटी देऊन आलेले आहेत. श्री. घाटपांडे सर स्वत: नाडिज्योतिष-नाडिग्रंथम ह्या विषयाची सत्यासत्यता जाणून आहेत असे त्यांनी मांडलेल्या अभ्यासपूर्ण मतांवरून वाटते. आणि एक फलज्योतिषचिकित्सक तथा अभ्यासक ह्या नात्याने नाडिज्योतिष हा विषय आपल्याला वर्ज्य नाही असे प्रतिपादनही त्यांनी मागे एकदा मजजवळ केले होते. त्यांनी नाडिकेंद्रांशी पत्रव्यवहारदेखील केला असल्याचे वाचल्याचे स्मरते. ते स्वत: एक फलज्योतिषाभ्यासक आहेतच, तथा एक चिकित्सक ह्या नात्याने त्यांचा ह्या क्षेत्रातील अनुभव दांडगा आहे असे जाणून आहे. त्यांच्या विचारांना प्रमाणवाक्यता प्राप्त आहे हे मी पाहातोच आहे.

तरी श्री. घाटपांडे सरांनी स्वत: अथवा त्यांच्या मार्गदर्शनाखाली इतर कोणी प्रातिनिधिक पुढाकार घ्यावा; श्री. ओक सर आणि त्यांच्याप्रमाणे मते बाळगणारी इतर मंडळी ह्यांस नाडिकेंद्रात घेऊन जावे आणि नाडिज्योतिषाचे खरे स्वरूप उघड करून ह्या मंडळींची सर्वांची दिशाभूल झाली असल्याचे प्रत्यक्ष पुराव्यानिशी सिद्ध करावे. पूर्वीप्रमाणेच अहवाल सादर करावा. इतरही कोणा व्यक्ति अथवा संस्थेस नाडिज्योतिषाच्या सत्यासत्यतेबद्दल शंकाकुशंका असतील तर त्यांनी ते श्री. घाटपांडे सरांचेकडे सादर करावेत. असे केल्याने ह्या कार्यास एक सामुहिक प्रतिनिधित्व प्राप्त होईल.

सदरील शोधाभ्यासात नाडिज्योतिषाप्रमाणे जातकास सांगण्यात आलेले भविष्य हे खरोखरच कथनाप्रमाणे सत्य ठरते काय? ह्या प्रश्नावर चर्चा करण्यापेक्षा:

१. नाडिपट्टींमध्ये खरोखरीच लेखन केलेले असते काय;
२. लेखन केले असल्यास

अ. ते कोणत्या लिपीमध्ये कोणत्या भाषेमध्ये असते,
ब. त्या भाषेस काही व्याकरण आहे काय,
क. व्याकरण असल्यास त्यावरून त्या लेखनाचा साधारण काल कोणता असावा;

३. लेखनामध्ये खरोखरच भविष्यकथन केलेले असते काय,
४. त्यायोगे जर कां नाडिपट्टीमध्ये संबंधित जातकाचे नांव, त्याच्या जन्मदात्यांचे नांव, त्याचे जातकम (कुंडली/पत्रिका) तथा वैयक्तिक माहितीचा उल्लेख असतो काय ह्या गोष्टीचा शोध घेण्यात यावा.

असे विषय ह्या शोधाभ्यासानिमित्ते चर्चिल्या जावेत. हे मुद्दे सिद्ध झालेच तर तेथून पुढे ’भविष्यकथन बरोबर येते की नाही’ हा विषय चर्चिल्या जाऊ शकतो.

श्री. घाटपांडे सरांनी तथा इतर उपक्रमकरांनी माझ्या सूचनेबाबत आपले विचार व्यक्त करावेत. शक्य असल्यास पुढील कार्यक्रम ठरवावा.

शुभस्य शीघ्रम! नन्राह वेलैगळुक्काह तामदप्पडक्कूडादु!

-

तमिळ्नाट्लेर्न्दु डैर्रक्टा मराट्टिदेडत्तुक्कु वंदु सेट्लान ओरु चिन्नमनिदनिन एळुत्तु यिदु!

हैयो हैयैयो!

चर्चा

सदरील शोधाभ्यासात नाडिज्योतिषाप्रमाणे जातकास सांगण्यात आलेले भविष्य हे खरोखरच कथनाप्रमाणे सत्य ठरते काय? ह्या प्रश्नावर चर्चा करण्यापेक्षा:

१. नाडिपट्टींमध्ये खरोखरीच लेखन केलेले असते काय;
२. लेखन केले असल्यास
अ. ते कोणत्या लिपीमध्ये कोणत्या भाषेमध्ये असते,
ब. त्या भाषेस काही व्याकरण आहे काय,
क. व्याकरण असल्यास त्यावरून त्या लेखनाचा साधारण काल कोणता असावा;

३. लेखनामध्ये खरोखरच भविष्यकथन केलेले असते काय,
४. त्यायोगे जर कां नाडिपट्टीमध्ये संबंधित जातकाचे नांव, त्याच्या जन्मदात्यांचे नांव, त्याचे जातकम (कुंडली/पत्रिका) तथा वैयक्तिक माहितीचा उल्लेख असतो काय ह्या गोष्टीचा शोध घेण्यात यावा.

खर तर यापुर्वी ज्योतिषाकड जाण्यापुर्वी ...प्रश्नोत्तरातुन सुसंवाद या पुस्तकात भाग २ प्रकरण २ नाडीज्योतिष आणि फलज्योतिष मधे याबाबत चर्चा केलेली आहेच. ज्यांनी ती वाचली नसेल त्यांनी ती जरुर वाचावी म्हणजे पुनरावृत्ती होणार नाही
प्रकाश घाटपांडे

बैल दूध देत असतो काय?

नाडी ग्रंथ वाल्या स्वामींच्या बाजुने निकाल दिला म्हणजे नाडीग्रंथ वैज्ञानिक अथवा न्याय्य ठरत नाहीत. मुळ मुद्दा अगदी साधा आहे कि नाडीग्रंथवाल्याला हा मृत व्यक्तीचा आंगठ्याचा छाप आहे हे समजले नाही. पत्रिकेवरुन देखील ती जिवंत व्यक्तीची आहे कि मृत व्यक्तीची आहे हे समजत नाही. तसेच ती स्त्री ची आहे कि पुरुषाची हे देखील समजत नाही.

हे सांगायची गरज आहे काय? बैल दूध देत असतो काय? असे असताना काही शहाणेसुरते 'पोपटप्रेमी' ज्योतिष्याची चिकित्सा का करत बसतात? हेच मग "सामान्य माणसांना लग्न जुळविण्यासाठी पत्रिकेचा आधार घ्यावासा वाटला तर त्यात काही गैर नाही," असे का म्हणतात? कुणीतरी प्रकाश पाडावा, ही विनंती.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

काही मजकूर संपादित.

चिकित्सा

हे सांगायची गरज आहे काय? बैल दूध देत असतो काय?

दुसर्‍या आवृत्तीच्या निमित्ताने http://mr.upakram.org/node/777#comment-12763 वाचले तर् काही अंशी निराकरण होईल.
'फलज्योतिष ही एक अंधश्रद्धा आहे' हे समजावून सांगायला लागणे आणि तेही निरक्षरांना नव्हे तर डिग्री विभूषितांना, उच्चपद्स्थांना, समाजधुरिणांनादेखील, इथेच खरी शोकांतिका आहे. अशा वेळी तुम्ही अंधश्रद्ध आहात, फसव्या विचारसरणी मागे धावून आपले हसे करुन घेत आहात.' वगैरे आक्रमक प्रचार योग्य ठरत नाही." इति प्रो. जयंत नारळीकर

हेच मग "सामान्य माणसांना लग्न जुळविण्यासाठी पत्रिकेचा आधार घ्यावासा वाटला तर त्यात काही गैर नाही," असे का म्हणतात?

त्यासाठी सामान्य माणसाच्या (जातक) भुमिकेत जावं लागत. तो जर बुद्धीप्रामाण्यवादी/विवेकवादी असता तर त्याला पत्रिका ज्योतिषी यांची गरजच पडली नसती.

प्रकाश घाटपांडे

धन्यवाद.

दुसर्‍या आवृत्तीच्या निमित्ताने http://mr.upakram.org/node/777#comment-12763 वाचले तर् काही अंशी निराकरण होईल.

प्रकाशराव, धन्यवाद. आता तिथेच पुढचा प्रतिसाद दिलेला बरा राहील. ऊर्मी स्वस्थ बसू देत नाही, हेच खरे.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

 
^ वर