तर्कनिष्ठता की भावना?

फोर्थ डायमेन्शन - 22

तर्कनिष्ठता की भावना?
मानसी एक सर्व साधारण तरुणी. पदवीपर्यंत शिकलेली. अर्थशास्त्र, मानसशास्त्र यांचा अभ्यास व वैचारिक वाचनाची आवड यांच्यामुळे विवेकयुक्त वर्तणुकीवर भर देणारी. तर्क व विवेक यांच्याच आधारे निर्णय घेण्याचा आग्रह धरणारी. जाणुन बुजून तरी अविवेकीपणाने वागणाऱ्यातली ती नव्हती. काही गोष्टी बुद्धीप्रामाण्यवाद व तर्कनिष्ठतेच्या पलिकडे आहेत याची पण तिला जाणीव होती. उदाहरणार्थ प्रेम (!), मित्र-मैत्रिणी, नातेसंबंध, खाण्या-पिण्याच्या आवडी-निवडी, वेषभूषा, अवांतर गप्पा-टप्पा, इत्यादींना विवेकवादाच्या चौकटीत बसवणे कठिण जाते, याची पूर्ण कल्पना तिला होती. परंतु विवेकी वागता येत नाही म्हणजे तो अविवेकीपणाच असा तिचा अजिबात आग्रह नव्हता.आपल्याला केळीपेक्षा आंबा आवडतो यात अविवेकीपणा नाही याची तिला पुरेपूर खात्री होती. फक्त आंबे महाग असताना केळीऐवजी आंबे खाणे अविवेकीपणाचे द्योतक ठरेल, असे तिला मनोमन वाटत होते.
आज मात्र तिला एका मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागणार आहे. हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या तिच्या एका मैत्रिणीने सार्वजनिक ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून काही 'अपराध्यां'ना मारणे हे विवेकीपणाचे लक्षण आहे असे तिला पटवून दिले आहे. मैत्रिणीची तर्कपद्धती स्वीकारार्ह वाटली तरी त्यात काही तरी चूक आहे असे तिच्या मनात कुठे तरी वाटू लागले आहे. पण ते तिला पटवून देता येइनासे झाले आहे. हा बॉम्ब लवकरात लवकर ठेवण्यातच विवेक आहे हेही मैत्रिणीने पटवून दिल्यामुळे कुणाशी तरी सल्ला-मसलत करून निर्णय घेण्याइतका वेळही तिच्याकडे नाही.
यापूर्वी विवेकी विचारांना थारा न देता भावनेच्या आहारी जावून कृती करणे कधीच तिला जमले नव्हते. त्यामुळे ती आज जास्त अस्वस्थ झाली आहे. मैत्रिणीच्या तर्कातील चूक सापडत नसल्यामुळेसुद्धा ती कोंडीत सापडली आहे. आपले हे बॉम्ब ठेवण्याचे दुष्कृत्य शेकडोंचा बळी घेणार, याची तिला पूर्ण कल्पना आहे. त्यामुळे मैत्रिणीचे तर्कशुद्ध विचार पटल्यामुळे बॉम्ब ठेवावे की थोडेसे भावनेच्या आहारी जावून शेकडोंचा जीव वाचवावा, हा प्रश्न आता तिच्यासमोर 'आ' वासून उभा आहे.

----------- ---------- --------- -----------

या विचारप्रयोगामध्ये मानसीच्या मैत्रिणीने नेमके काय सांगितले याचा उल्लेख नाही. मैत्रिणीचे विवेकी, तर्कशुद्ध विचार काय आहेत याची आपल्याला कल्पना नाही. त्यामुळे मैत्रिणीच्या विचारपद्धतीचे विश्लेषण आपण करू शकत नाही. एक मात्र खरे की 'विवेकी विचार' पटल्यामुळेच दुष्कृत्य केलेली हजारो उदाहरणं मानवी इतिहासाच्या पाना-पानात सापडतील. किंबहुना आपण केलेले दुष्कृत्य पूर्ण विचारांती केलेले असून त्यातच खरा विवेक होता, अशी मनोमन खात्री असलेली ती माणसं होती. त्यामुळे त्यांना आपल्या कृत्याचा कधीच पश्चात्ताप वाटला नाही. स्टॅलिनच्या रशियामध्ये, माओच्या चीनमध्ये, हिटलरच्या जर्मनीमध्ये, मोदीच्या गुजरातमध्ये शेकडो - हजारो निरपराध्यांना मारण्यातच (इतर!) सर्वांचे हित आहे, असे पटवून दिल्यामुळेच मोठ्या प्रमाणात मानवी हत्या झाली, याला इतिहास साक्षी आहे. हिरोशिमा - नागासाकीवर अणुबॉम्बचा हल्ला करण्याचा निर्णय पूर्ण विचारांती घेतला होता असे नमूद केलेली कागदपत्रं उपलब्ध आहेत. आणि त्या विचारांच्या प्रभावा (दबावा!)मुळेच अणुबॉम्ब टाकून लाखो निरपराध्यांना काही क्षणातच मारून टाकण्यात तेथील आम जनता (प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे) सहभागी झाली होती हे आपण कधीच विसरू शकणार नाही. परंतु त्यांनी केलेल्या कृतीसाठी ज्या विवेकीवादाचा आश्रय ते घेत होते वा घेत आहेत तो मुळातच चुकीचा होता हे आता पश्चातबुद्धीने आपल्याला कळत आहे.
मानसी बरोबर मैत्रिणीने केलेल्या युक्तीवादाची सविस्तर माहिती मिळाल्यास आपणही त्यातल्या चुका निदर्शनास आणू शकलो असतो. तर्कशुद्ध विचारांती घेतलेला निर्णय नेहमीच वा दरवेळी बरोबरच असतो असा जर आपला आग्रह असल्यास मानसी करत असलेली बॉम्बची पेरणी योग्यच आहे असे म्हणावे लागेल. जर तर्कच चुकीचा आहे असे वाटत असल्यास युक्तीवादामध्ये कुठे तरी भावनांचा शिरकाव झालेला असून त्यांनी विवेकावर मात केली असावी असे म्हणण्यास भरपूर वाव आहे.
याचाच अर्थ तर्क केव्हाही बरोबरच असते हेच चुकीचे आहे. मानसिकरित्या विकृत असलेल्यांच्या तार्किक बुद्धीत काही बिघाड नसून त्यांच्या भावनेत काही तरी घोळ आहे असे मानसतज्ञांचे मत आहे. अठराव्या शतकातील डेव्हिड ह्युम या तत्त्वज्ञाने बुद्धीने भावनांची गुलामी करावी अशी आग्रहाची भूमिका मांडली होती. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात गोलमन यानी औद्योगिक व्यवस्थापनात भावनिक बुद्धीमत्तेला पर्याय नाही अशी मांडणी केली आहे. बुद्धीला भावनेची जोड नसल्यास आपल्या कृतीचे योग्यपणे मूल्यमापन करण्यात काही उणीवा राहिलेले आहेत असे समजावे लागेल.
कदाचित हा दृष्टिकोन नकारात्मक वा बुद्धिमत्तेवर अन्याय करणारा आहे असे वाटेल. कारण विवेकी विचारांती घेतलेला निर्णय दुष्कृत्य करण्यास उद्युक्त करणार ऩाही अशी आपली ठाम समजूत आहे. तरीसुद्धा आपण शंभर टक्के विवेकी आहोत याची खात्री देता येत नाही. ज्यांना स्टॅलिनीझम वा माओइझममध्ये तर्क आढळत होता त्यांना त्या विचारसरणीत एकही चूक सापडली नाही. मानसी कितीही तल्लख असली तरी सार्वजनिक ठिकाणी स्फोट घडविण्यात विवेकवाद असू शकतो वा तिच्या मैत्रिणीच्या युक्तीवादात काही मूलभूत दोष आहे हेच तिला जाणवले नाही.
तर्कनिष्ठतेलाच सर्वश्रेष्ठ मानावे की मानवीबौद्धिक क्षमता तर्कनिष्ठतेचे योग्यपणे मूल्यमापन करू शकते यावर दृढविश्वास ठेवावा, हाच आता आपल्या समोरचा ज्वलंत प्रश्न आहे!

Comments

पिंडे पिंडे

पिंडे पिंडे मतिर्भिन्नः
मनुष्यात भावना व बुद्धी या बाबींच प्रमाण ठरवणारा विवेक हा व्यक्तिसापेक्ष असल्याने भावनिक बुद्धीमत्ता या संकल्पनेचा आश्रय घ्यावा लागतो. एकाचे विवेकी असण हे दुसर्‍याच्या दृष्टीने अविवेकी असु शकते.
प्रकाश घाटपांडे

चूक

एक् तर्कशुद्ध विचार तिला नक्कीच करता येईल. बॉम्बने माणसांचा जीव जात असल्याने (आणि जीव जाणे हे रिव्हर्सिबल नसल्याने) तिने चूक सापडेपर्यंत वाट पहावी. म्हणजे चूक सापडल्यावर 'हे आपण काय केले असे वाटण्याची वेळ येणार नाही.

(मुळात युक्तीवाद काय केला हे सांगितले नसल्याने युक्तीवादातील चूक शोधायला मानसीला मदत करणे शक्य नाही. तेव्हा मानसीला सध्या तरी एवढेच सांगू शकतो).

खराटा

पश्चाद्बुद्धी

परंतु त्यांनी केलेल्या कृतीसाठी ज्या विवेकीवादाचा आश्रय ते घेत होते वा घेत आहेत तो मुळातच चुकीचा होता हे आता पश्चातबुद्धीने आपल्याला कळत आहे.

पश्चाद्बुद्धीचा मुद्दा महत्त्वाचा आहे.

विवेक (तर्क) करण्यासाठी गृहीतके घ्यावी लागतात, याचा कधीकधी विसर पडतो. गृहीतके ही (व्याख्येपासूनच) तर्काच्या पलीकडे (खरे म्हणायचे तर "अलीकडे") असतात. हे विसरले नाही, तर पश्चाद्बुद्धीने पश्चात्तापाची वेळ बहुधा येऊ नये.

"अमुक गृहीतकांच्या पुढे अमुक कृती त्या गृहीतकांशी सुसंगत आहे." हा तर्क पूर्वकाळात ठीक असला तर पश्चात्काळातही ठीकच असतो.

याचे रोजव्यवहारातले उदाहरण (मुद्दामून नैतिकदृष्ट्या क्षुल्लक उदाहरण घेतले आहे) :
गृहीतक १: माझे घड्याळ रेल्वेच्या घड्याळाशी जुळलेले आहे
गृहीतक २: तुरळक गर्दीतून आरामात चालत येथून फलाटावर पोचायला ५ मिनिटे लागतात
निरीक्षण १: गर्दी तुरळक आहे
निरीक्षण २: माझ्या घडाळ्याप्रमाणे गाडी सुटायला १० मिनिटे आहेत
निरीक्षण ३: आताची माझी स्थिती अशी की धावू शकतो, पण धाप लागलेली मुळीच आवडत नाही
कृती : आरामात चालत फलाटापर्यंत जाईन
(धावत जाण्याची कृती टाळेन)

माझी गाडी चुकली, पश्चाद्बुद्धीने इतके काय कळते की माझे गृहीतक १, किंवा गृहीतक २ चुकले आहे. पश्चाद्बुद्धीने तर माझा विवेकवादावरचा विश्वास उडत नाही. कारण मुळी विवेकाचा तर्कच जर-तरच्या भाषेत असतो.
जर {गृहीतक१ आणि गृहीतक२ आणि निरीक्षण१ आणि निरीक्षण२} तर {कृती पर्याय१ पर्याय२ पेक्षा ग्राह्य}
चुकीच्या गृहीतकामुळे गाडी चुकल्यामुळे हे "जर-तर" वाक्य असत्य ठरत नाही.

आता थोडी डळमळीत नैतिक चर्चा घेऊ :
गृहीतक १ : प्राण-असलेल्या मनुष्य तसेच मनुष्येतर जिवाला कमीतकमी वेदना होतील अशा प्रकारे वागवावे.
गृहीतक २ : मनुष्येतर प्राण्यांच्या जिवाची नैतिक किंमत मनुष्याच्या भुकेपेक्षा कमी असते.
गृहीतक ३ : मनुष्येतर प्राण्यांच्या वेदनांची नैतिक किंमत मनुष्याच्या कर्मकांड-संमत वागण्यापेक्षा (म्हणजे कर्मकांडातून मिळणार्‍या मनःशांतीपेक्षा) कमी असते.
निरीक्षण १ : श्री. यहुदा (य) हे मनुष्य आहेत
निरीक्षण २ : य यांना दररोज भूक लागते.
निरीक्षण ३ : य यांच्या कर्मकांडात रक्तप्राशन वर्ज्य आहे.
निरीक्षण ४ : रक्तस्रावण फक्त जनावर जिते असतानाच केले जाऊ शकते.
तार्किक निष्कर्ष : जर {वरील गृहीतके आणि निरीक्षणे} तर {य यांचा मनःशांतिपूर्ण क्षुधाशांतीसाठी जनावराला थोड्या प्रमाणात वेदना देऊन रक्तस्राव करून, त्या जनावराला मारून खाणे नैतिक हिशोबात ग्राह्य आहे}
कृती : जनावराचा "कोशर" बळी देऊन सामिष अन्न तयार करणे.

आता कोणी गृहीतक ३ चुकीचे मानेल, तर कृती अनैतिक होते. जनावराला वेदना न देता झटक्यात मारायला हवे होते. कोणी गृहीतक २ चुकीचे मानेल तरी कृती अनैतिक होईल. जनावर अन्नासाठी मारताच कामा नये. वगैरे. पण चुकीचे गृहीतक असल्यामुळे फसणे हा विवेकाचा किंवा तर्काचा दोष नव्हे. कारण तर्क हा "जर गृहीतक तर कृति-योग्यता" असा सीमितच असतो. दोष दुष्ट गृहीतकाचाच असतो.

गृहीतकांचा भावनांशी संबंध आहे, हे मान्य. गृहीतकांशिवाय तर्क करण्यासाठी काहीच नसते. मग "तर्कनिष्ठा की भावना" या पर्यायाला मुळात काही अर्थच राहात नाही. म्हणून मला लेखाचे शीर्षक पटलेले नाही. पण आपल्या भावना नेहमी असतातच हे जाणून आपली कृती कितपत तर्कनिष्ठ आहे, कितपत यादृच्छिक आहे, याचा लेखाजोखा महत्त्वाच्या निर्णयांच्या बाबतीत करावा. असे जर लेखाचा निर्देश असेल तर मी त्या निर्देशाशी सहमत आहे.

+ १ धनंजयशी सहमत!

भावना ह्या आदिम आहेत. तर्क हा नंतर येतो. जो बिबट्या त्यानेच मारलेल्या माकडिणीच्या पिल्लाला सांभाळतो तेव्हा ते तर्कसंगत नसतेच पण वात्सल्याच्या आदिम प्रेरणेशी/मातृभावनेशी निगडित असते. भावना ही जीवांना यंत्रांपेक्षा उच्च स्थान देते.

(भावुक)चतुरंग

तर्कविसंगतीबाबत थोडा फरक

"आदिम मातृभावना ही एक प्रेरणा असते," असे गृहीतक असले, तर त्या बिबट्याचे वागणे तर्कसंगत आहे. (वर तर्कसंगत नसते असे लिहिले आहे.)

जर "बिबटे स्वभावाने नेहमीच माकडाच्या पिलाला मारतात हे सत्य असेल" तर "बिबट्या माकडाच्या पिलाला मारेल"
हा तर्क चित्रफीत पाहिल्यानंतरही खराच आहे. फक्त बिबट्याच्या स्वभावाबद्दलचे गृहीतक चुकलेले आहे. आणि त्याने तर्कशास्त्र कमी पडत नाही. तर्कशास्त्र हे सुयोग्य गृहीतकांकडून सुयोग्य निष्कर्षांपर्यंत नेण्यासाठी आहे. (होडीवाला आणलेला माल नदीपार नेण्यासाठी आहे.) आता कोणी गृहीतकच खोटे आणले, तर तर्काने निष्कर्ष चुकीचे निघतील. (मालच चुकीचा आणला, तर होडीवाला चुकीचा माल नदीपार नेईल.) पण त्यामुळे तर्कविसंगती येत नाही, तर्कशास्त्र लंगडे होत नाही, की निरुपयोगी होत नाही. फक्त गृहीतकाचा दोष असतो. (त्याने होडीवाला चुकार होत नाही, मालवाहातुकीसाठी निरुपयोगी होत नाही. दोष फक्त मालातच राहातो.)

त्याचे अधिक स्पष्ट उदाहरण :
जर "पाऊस पडला हे सत्य आहे" तर "आंगणातले गवत भिजले आहे"
आपण बाहेर जाऊन बघतो की पाऊसही पडला नाही (गृहीतकच चुकले होते) आणि गवतही ओले नाही. म्हणून वरील ठळक ठशातले जर-तरचे विधान चूक होत नाही. गवताचा कोरडेपणा तर्कविसंगत होत नाही. तर्कशास्त्र ठीकच राहाते. फक्त "पाऊस पडला" हे गृहीतक चुकले होते.

सहमत

धनंजय रावांच्या मताशी सहमत आहे. कोणताही तर्क हा त्यासाठी वापरलेल्या गृहीतकांवर अवलंबून असतो. ते एक गणिती सूत्राप्रमाणे आहे; गृहीतके आणि निरीक्षणांच्या आधारावर त्या सूत्रातून एकच निष्कर्ष निघतो. म्हणजे गृहीतके आणि निरीक्षणांच्या एका ठरावीक संचाचे एकापेक्षा वेगळे निष्कर्ष होत नाहीत. (परीक्षांमध्ये Logical Reasoning च्या प्रश्नांचे एकच उत्तर असते यावरून वरील विधान केले आहे. )

एक मात्र खरे की 'विवेकी विचार' पटल्यामुळेच दुष्कृत्य केलेली हजारो उदाहरणं मानवी इतिहासाच्या पाना-पानात सापडतील. किंबहुना आपण केलेले दुष्कृत्य पूर्ण विचारांती केलेले असून त्यातच खरा विवेक होता, अशी मनोमन खात्री असलेली ती माणसं होती. त्यामुळे त्यांना आपल्या कृत्याचा कधीच पश्चात्ताप वाटला नाही.

चुकीची गृहीतके घेऊन काढलेला निष्कर्ष हा चुकीचा असला तरी 'तर्कसंगतच' असतो.

तर्कनिष्ठतेलाच सर्वश्रेष्ठ मानावे की मानवीबौद्धिक क्षमता तर्कनिष्ठतेचे योग्यपणे मूल्यमापन करू शकते यावर दृढविश्वास ठेवावा.

वर-वर पाहता, या वाक्यात 'तर्कनिष्ठा' आणि 'मानवी बौद्धिक क्षमता' असे दोन पर्याय आहेत असे दिसते. परंतु माझ्या मते या दोन वेगवेगळ्या गोष्टी नसून तर्क हा मानवी बौद्धिक क्षमतेवर अवलंबून असावा. कारण कोणत्याही मानवाने किंवा मानव समूहाने तर्कासाठी वापरलेली गृहीतके ही त्याच्या/त्यांच्या मानवी बौद्धिक क्षमतेनुसारच असणार. त्यामुळे 'विवेक', 'तर्कनिष्ठा' या सापेक्ष गोष्टी आहेत असे वाटते.

उदाहरणे देताना...

स्टॅलिनच्या रशियामध्ये, माओच्या चीनमध्ये, हिटलरच्या जर्मनीमध्ये, मोदीच्या गुजरातमध्ये शेकडो - हजारो निरपराध्यांना मारण्यातच (इतर!) सर्वांचे हित आहे, असे पटवून दिल्यामुळेच मोठ्या प्रमाणात मानवी हत्या झाली, याला इतिहास साक्षी आहे. हिरोशिमा - नागासाकीवर अणुबॉम्बचा हल्ला करण्याचा निर्णय पूर्ण विचारांती घेतला होता असे नमूद केलेली कागदपत्रं उपलब्ध आहेत.

बाँबचे हल्ले पटवून देण्याच्या या केसस्टडी मधे गेल्या २-४ वर्षातील मुंबई, हैद्राबाद, अजमेर, जयपूर, अहमदाबाद, बंगलोर, दिल्ली, इम्फाल येथील एकाही बॉब हल्ल्याचे उदाहरण सुचले नाही का? ह्या बद्दल नक्कीच खेद वाटला. १२ मार्च १९९३ची स्फोट मालीका "जुनी" झाली म्हणून विसरलात असे समजतो...

जर कोणी सार्वजनीक ठिकाणी बाँबच काय कुठलीही हिंसक कारवाई करू लागले तर त्याला कायदा सुव्यवस्थेकडून यथोचीत विरोध करून नियंत्रणात आणून पूर्ण बंद करणे महत्वाचे आहे. याचे एक आदर्श उदाहरण म्हणजे गांधीजींच्या हत्येनंतर झालेल्या जातीय दंगलींना ताळ्यावर आणताना मुंबईप्रांताचे तत्कालीन गृहमंत्री मुरारजी देसाई यांनी ज्या पद्धतीने भुमिका घेतली ते आहे.

बाकी सार्वजनीक ठिकाणी बाँबस्फोट करण्यात कुठलाच विवेकवाद नसतो, कुणाचेही हित नसते. पुर्वीही नव्हते आणि आजही नाही... मात्र जेंव्हा दिशाभूल केली जाते तेंव्हा समाजात दरी पडून असे प्रकार घडू शकतात.

वर आपण दिलेल्यामधील एकाच भारतीय उदाहरणात सांगायचे झाले तर जसे गोध्रा हत्याकांडानंतर अनेक "(तथाकथीत) बुद्धीवाद्यांनी" जर ते कारसेवक असे गेले नसते तर असे झालेच नसते म्हणत आधी झालेला सार्वजनीक गुन्ह्यावर पांघरूण घातले आणि नंतर तोच प्रकार (म्हणजे क्रिया-प्रतिक्रीया) उलट बाजूने झाला. थोडक्यात जेंव्हा "कॉलींग स्पेड ए स्पेड" हे सातत्याने न होता "सिलेक्टीव्हली" होते तेंव्हा तसे करणारेच समाजातील विवेकवादाची हत्या करतात.

कॉमन सेन्स!

फक्त आंबे महाग असताना केळीऐवजी आंबे खाणे अविवेकीपणाचे द्योतक ठरेल, असे तिला मनोमन वाटत होते.

'आंबे परवडत नाहीत म्हणून खात नाही' असं चक्क म्हणावं की! 'अविवेकीपणाचे द्योतक!' असला भारीभक्कम शब्द कशाला हवा? कदाचित आंबे परवडत नसल्यामुळेच असा काहीसा शब्दच्छल तिला करावा लागत असेल! ;)

हां, आता उत्तम प्रतीचे आंबे खायचे म्हणजे खिशात दमड्या हव्यातच! नसतील परवडत तर सरळ 'इच्छा आहे पण परवडत नाय!' असं स्वच्छ म्हणावं ना! त्याला विवेकाविकेकाच्या द्योतकाची शुगरकोटेड झूल पांघरलेली पाहून अंमळ गंमत वाटली! :)

बाकीच्या लेखाबद्दल -

अहो बॉम्ब पेरून निरपराध माणसं मारण्यात कसला आलाय तर्क अन् विवेक?

तिने सरळ त्या बॉम्बची भाषा करणार्‍या मैत्रिणीच्या कानाखाली आवाज काढून तिला पोलिसाच्या ताब्यात दिले पाहिजे!

परंतु,

मानसशास्त्र यांचा अभ्यास व वैचारिक वाचनाची आवड यांच्यामुळे विवेकयुक्त वर्तणुकीवर भर देणारी. तर्क व विवेक यांच्याच आधारे निर्णय घेण्याचा आग्रह धरणारी.

तरीच! मानसशास्त्र, वैचारिक वाचन, तर्क, विवेक यांचा अतीविचार केला, अभ्यास केला की मानसीसारखीच गोंधळलेली अवस्था होते. आणि मग 'सार्वजनिक ठिकाणी बॉब्मस्फोटामुळे निरपराध माणसांचा बळी जातो, तेव्हा ते कृत्य केव्हाही वाईटच!' इतकी साधी गोष्टही समजेनाशी होते!

असो,

माझ्या मते मानसी ही मानसिक रुग्ण आहे...

आपला,
तर्कतीर्थ तात्याशास्त्री अभ्यंकर.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

इतकी साधी गोष्टही समजेनाशी होते!

खरेच साधी आहे का?

"पाकव्याप्त काश्मिरातील (म्हणजे भारताचा भाग आहे हे लक्षात असू द्या) स्थिती आहे. एका गावातल्या लोकांना (हे भारताचे नागरिक आहेत, लक्षात असू द्या) धाकात जमवून अतिरेक्यांची सभा चालू आहे. हे अतिरेकी मोठ्या प्रमाणात घातपात करणार आहेत. हे कसाबसारख्या कोणाकडून आपल्याला खात्रीलायक कळलेले आहे. अनायासे म्होरके एकत्र जमलेले आहेत. आपला गुप्तहेर तिथे एकटा पोचू शकतो. एकटा लढायला गेला तर हकनाक मरेल. पण बाँबस्फोटाने तो स्टेज उडवू शकेल. पण कित्येक गावकरी (म्हणजे पाकव्याप्त काश्मिरातले भारतीय नागरिक) मरणार. गुप्तहेराने काय करावे?"

तुमच्या साध्या कॉमन सेन्स मधून काय निष्कर्ष निघतो? भारताने पाकव्याप्त काश्मिरातल्या गुप्तहेर कारवाया बंद कराव्यात - असे तुमचे सोपे उत्तर आहे का? (तेथील गावकरी भारतीय नागरिक आहेत हे क्षणभरही विसरू देऊ नका.)

मानसशास्त्र, वैचारिक वाचन, तर्क, विवेक यांचा अतीविचार केला, अभ्यास केला की मानसीसारखीच गोंधळलेली अवस्था होते.

हं :-) हे वाचन न-केलेले लोक कसे छान गुण्यागोविंदाने राहातात, नाही का? प्रत्येक भांडणात नेमके कोणाचे चुकले आहे हे साधे-सोपे कळत असते, तर भांडणे सोडवणे किती सोपे झाले असते!

विचार करून काय कळते, ते बघू. "कोणाचे चुकले-बरोबर याबाबत मतभेद असू शकतात, हे गुंतागुंतीचे असते, तरी प्रश्न सोडवायची गरज असते" हे तरी कळते. तात्यांनी नक्कीच मित्र लोकांची "माझे बरोबर... नाही माझे बरोबर..." अशी भांडणे सोडवली असतील. त्यांनी कुठलाही विचार न सांगता मित्रांना कसे पटवले? (मी खुद्द एखादवेळी ड्रिंकने भांडणे सोडवतो, पण समेट उद्यापर्यंत टिकत नाही!)

'आंबे परवडत नाहीत म्हणून खात नाही' असं चक्क म्हणावं की!

काहीतरी काय! परवडत नाही, कसे? दागिने गहाण ठेवून आंब्यांसाठी पैसे मिळतील ना. (आणि "रिण काढून सण साजरे करणारे कोणी नसतेच," असे तुम्ही म्हणू नये. माझ्या आश्चर्याची सीमा ताणून तुटेल - मी नि:शब्द होईन.) टोकाची नव्हे,मधली स्थिती घेऊ. नेहमीच्या गरजेच्या किराणाखरेदीत काटकसर करून कोणी आंबे विकत घेऊ शकतो.
"रिण की सण" "तूरडाळ की आंबे" "ग्लेनफिडिश की आंबे" असा काही पर्याय आहे. मग 'आंबे परवडत नाहीत म्हणून खात नाही' असे चक्क म्हणाल ते कसे? आपल्यापैकी काही जण समभाग बाजारातही खरेदी-विक्री करतात. कधीच विचार करावा लागत नाही? - तसा विश्वास बसत नाही! बहुतेक दलाल कुठल्याही कंपनीचा एक तरी समभाग विकत घेऊच शकत असले पाहिजेत. मग "चक्क परवडत नाही" असे कसे म्हणणार? "हे अमुक फायदे आणि ते तमुक तोटे - हिशोब करून, या किमतीला हा समभाग मला घ्यायचा नाही," असे काहीतरी विवेकाविकेकाच्या द्योतकाची शुगरकोटेड झूल पांघरलेले कारण देत असतील. का खरेच काहीएक विचार न करता "चक्क कळते" म्हणून शाहाणे लोक समभाग खरेदी करतात? करत असतील तर पुन्हा माझी बोलती बंद.

तात्या "विवेकाविकवादाचे द्योतक" हे शब्द तुम्ही वापरत नसलात, तरी "कारण-काय? परिणाम काय?" वगैरे विचार कित्येकदा करत असाल. तोच विवेक, आणि तोच कमी पडला तर अविवेक. तुम्ही जर कधी म्हणता - "अरे, थोडा कारणा-परिणामाचा विचार कर!" तेव्हा त्याचा अर्थ - "अरे थोडा विवेक कर!" असा होय. तुम्ही जेव्हा म्हणता - "परिणामाचा काहीच विचार न करता असा काय गधडेपणा केला?" तेव्हा त्याचा अर्थ "अरे, काय हे अविवेकी काम केले!"

वरील प्रतिसाद वाचून वाटते, की कोणी "विचार नेहमी निरुपयोगी आहे" असे काही म्हणत आहे. आणि हे कोणी प्रामाणिकपणे म्हणू शकत असेल (एखादे परस्वाधीन मतिमंद मूल सोडले तर) यावर माझा तिळभरही विश्वास नाही.

लांब वाक्यांसाठी कधीकधी शब्द योजावे लागतात.

कारणा-परिणामांचा पुरेसा विचार = विवेक
स्पष्ट सांगितले नाही तरी बाजूला उजेड पडल्यासारखे कळून आले = द्योतक

वगैरे. या सोयिस्कर शब्दांना तुमचा इतका विरोध का आहे, तेच समजत नाही.

मागे तुम्ही उदाहरण दिले होते, की कुठल्याशा स्टेशनावर कोण्या आंधळ्या भिकार्‍याला फार सुंदर गाताना तुम्ही ऐकले होते. अशाच एखाद्या भिकारी पोराचा शुद्ध गंधार असा लागला की आहाहा! आता ते पोर खुद्द "शुद्ध गंधार" शब्द वापरत नसेल. म्हणून आपण "शुद्ध गंधार ही कल्पना म्हणजे एक निरर्थक झूल आहे" असे म्हणावे काय? (आता हे उरफाटे उदाहरण तुम्हाला पटवल्याचे पाप मला नको. तुमच्या पुढच्या संगीतविषयक लेखात शुद्ध गंधाराची जीवघेणी जागा जरूर दाखवावी, असेच माझे म्हणणे आहे. हे उदाहरण उलट्या उद्देशाने दिले आहे. उगाच गैरसमज नको.)

काही कुशल गायकांचे गाणे नि:शब्द असते. ते समजावून घेण्यासाठी कधीकधी आपल्याला "गंधार, त्रिताल, मींड" वगैरे शब्दांची सोय वाटते. (अरे, 'ही' मस्त जागा ऐक - ही कुठली...?) गुरू शिष्याला गाणे समजावून देताना हे शब्द वापरतो. ते सोयीसाठीच. शास्त्रीय संगीतातले यच्चयावत खास शब्द उद्या भाषेतून खारिज करूया. तरी ज्याच्या हृदयात गाणे आहे, तो गाईलच. पण गाणे शिकवायला-शिकायला अधिक त्रास होईल.

त्याच प्रमाणे हे तर्काबद्दलचे सगळे शब्द तुम्ही भाषेतून खारीज केलेत तरी लोक कठिण परिस्थितीत निर्णय घ्यायचे थांबणार नाहीत. पण ते समजावून सांगणे कठिण जाईल.

:)

तात्यांनी नक्कीच मित्र लोकांची "माझे बरोबर... नाही माझे बरोबर..." अशी भांडणे सोडवली असतील. त्यांनी कुठलाही विचार न सांगता मित्रांना कसे पटवले?

विचार वेगळा अन् अतिविचार वेगळा! मी अतिविचाराबाबत लिहिले आहे :)

(मी खुद्द एखादवेळी ड्रिंकने भांडणे सोडवतो, पण समेट उद्यापर्यंत टिकत नाही!)

हम्म! :)

काहीतरी काय! परवडत नाही, कसे? दागिने गहाण ठेवून आंब्यांसाठी पैसे मिळतील ना.

मग मानसी सोने गहाण ठेऊन आंबे का खात नाही? आणि तिच्यापाशी सोनेही नसेल तर?!

त्याच प्रमाणे हे तर्काबद्दलचे सगळे शब्द तुम्ही भाषेतून खारीज केलेत तरी लोक कठिण परिस्यातीत निर्णय घ्यायचे थांबणार नाहीत. पण ते समजावून सांगणे कठिण जाईल.

हम्म! धन्या लेका तू तुझ्या चित्रविचित्र, तार्किक, शब्दांच्या कोलांट्या उड्या असलेल्या प्रतिसादांनी समोरच्याची नेहमीच बोलती बंद करतोस!:)

तुझा,
(फ्यॅन) तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

तारतम्य व न्यायबुद्धि हवी

स्टॅलिनच्या रशियामध्ये, माओच्या चीनमध्ये, हिटलरच्या जर्मनीमध्ये, मोदीच्या गुजरातमध्ये शेकडो - हजारो निरपराध्यांना मारण्यातच (इतर!) सर्वांचे हित आहे, असे पटवून दिल्यामुळेच मोठ्या प्रमाणात मानवी हत्या झाली, याला इतिहास साक्षी आहे.

१) मोदींचे उदाहरण यात बसत नाही. त्याला लिखित इतिहासाची साक्ष नसून सध्या हयात असलेल्या व डोळ्यांवर झापडं न लावलेल्या अनेकांची साक्ष आहे. पार्श्वभूमी विचारात न घेता व तारतम्य न वापरता मोदींना स्टॅलीन, माओ आणि हिटलरच्या पंक्तीत बसवले तर त्याचे पर्यवसान स्टॅलीन, माओ आणि हिटलर यांचीही काहीतरी बाजू असली पाहिजे व त्यांच्या क्रौर्याच्या कथा हा त्यांच्या शत्रूंचा प्रचाराचा भाग असावा अशी शंका निर्माण करण्यात होईल.

२) एक गोष्ट नक्की आहे. माणूस स्वार्थासाठी, स्वतःच्या वैयक्तिक फायद्यासाठी फार क्रूरपणे वागू शकत नाही कारण त्याची सदसद्विवेक बुद्धी त्याला टोचण्याची शक्यता असते. पण जर तो दुसर्‍यासाठी काही करीत असेल तर अधिक निर्दयपणे वागण्याची शक्यता असते कारण 'मी माझ्यासाठी थोडंच करतोय?' हे समर्थन त्याच्याकडे असते व त्यामुळे त्याला सर्वसाधारण सदसद्विवेकबुद्धीची टोचणी लागत नाही.

साशंक

एक गोष्ट नक्की आहे. माणूस स्वार्थासाठी, स्वतःच्या वैयक्तिक फायद्यासाठी फार क्रूरपणे वागू शकत नाही कारण त्याची सदसद्विवेक बुद्धी त्याला टोचण्याची शक्यता असते. पण जर तो दुसर्‍यासाठी काही करीत असेल तर अधिक निर्दयपणे वागण्याची शक्यता असते कारण 'मी माझ्यासाठी थोडंच करतोय?' हे समर्थन त्याच्याकडे असते व त्यामुळे त्याला सर्वसाधारण सदसद्विवेकबुद्धीची टोचणी लागत नाही.
याबद्दल साशंक आहे. वैयक्तिक स्वार्थासाठी क्रूरपणे वागणार्‍यांमध्ये इदी अमीनचे नाव घेता येईल.

----
"ज्यूलिया रॉबर्टस की मां स्पिलबर्ग को ऐसे बोल सकती है क्या?"

 
^ वर