अज्ञानाच्या बुरख्या आड!
फोर्थ डायमेन्शन - 20
अज्ञानाच्या बुरख्या आड!
मंगळ ग्रहावर मनुष्य वस्तीला पूरक वातावरण आहे याचा सैध्दांतिकरित्या शोध लागल्यानंतर मंगळ ग्रहावर काही दिवस राहून वातावरणाची चाचणी करण्यासाठी जगभरातून वीस जणांची निवड करण्यात आली. हे सर्व पहिल्यांदाच तेथे जाणार होते. या वीस जणासाठी अन्नसाठा, निवासाची व्यवस्था, मनोरंजनांची साधनं, इत्यादी अनेक गोष्टी मुबलक प्रमाणात पाठवण्याची व्यवस्था केलेली होती. या पहिल्या वहिल्या मानव वस्तीसाठी तेथे काय काय करावे लागेल याची कुणालाही कल्पना नव्हती. वा नेमका अंदाजही नव्हता. काही तज्ञांच्या ढोबळ अंदाजावरून हा प्रकल्प हाती घेण्यात आला होता. कदाचित तेथे बौध्दिक काम जास्त असू शकतील. किंवा शारीरिक कष्टाची कामे जास्त निघतील. वा कौशल्य पणाला लावून धोका पत्करून काही कामं करावे लागतील. या वीस जणापैकी काही जणांकडे बौध्दिक कौशल्य आहे. काहींच्याजवळ शारीरिक श्रम करण्यासाठी लागणारे अफाट बळ आहे. व इतर काही जणांत धोकादायक काम करण्याची कुशलता आहे. जे काही तेथे करावे लागणार आहे ते या वीस जणांनाच करायचे आहे. त्यामुळे मंगळ ग्रहावर प्रयाण करण्यापूर्वीच या सर्व सोई-सुविधांची वाटणी कशी करावी याविषयी भरपूर काथ्याकूट घालण्यात आला. कारण पृथ्वीवर असताना मागणी तसा पुरवठा या तत्त्वानुसार वाटप व्यवस्था होती. काहीना कमी वेतन, व इतर काहीना जास्त वेतन, काही पूरक सुविधा ही पध्दत रूढ होती. वरवरून ही विषमता वाटत असली तरी यालाच समानता म्हणण्याचा प्रघात होता. चर्चेच्या शेवटी सर्वानुमते अगोदर पाठवून दिलेल्या स्रोतांची समविभागणी करून या सोई-सुविधांचा वापर करावा असे ठरले. प्रत्येकाच्या गरजेनुसार व प्रत्येकाच्या कुवतीप्रमाणे ही वाटणी असेल अशी पुस्ती जोडण्यात आली.
परंतु तेथे पोचल्यानंतर एखाद्याने आपल्यावर सोपविलेले काम करण्यास नकार दिल्यास वा काम करताना चुकारपणा करू लागल्यास काय करावे हा प्रश्न अनुत्तरित राहिला. असल्या माणसालासुध्दा इतराप्रमाणे समान वाटप करावे का? त्याच्या आळशीपणाला बक्षीस द्यावे की काय? जास्त मन लावून काम करणाऱ्याला किंवा जास्त कष्ट घेऊन काम करणाऱ्याला प्रोत्साहन नको का? चर्चेच्या वेळच्या सर्व आक्षेपांचा स्वीकार करण्यात आला. भरपूर चर्चा झाली. परंतु त्यातून गुंता सुटला नाही. न्याय वागणूक (fair deal) म्हणजे नेमके काय याचाच उलगडा होवू शकला नाही. न्याय वागणूक म्हणजे सर्वाना समान वाटप असा अर्थ नाही हे मात्र सर्वांना पटले. मात्र न्याय वागणूक म्हणजे नेमके काय? यावर घोडा अडला.
( Source: Theory of Justice: John Rawls)
जॉन रॉल्स या राजकीय तत्त्वज्ञाच्या मते मंगळ ग्रहावर जाणाऱ्यांना न्याय वागणूक म्हणजे नेमके काय याची आज कल्पना नसली तरी fairness चा अचूक शोध घेण्यास तेच योग्य ठरतील. मंगळ ग्रहावर मानवाचे वास्तव्य पहिल्यांदाच होत आहे. तेथे सर्व सोई-सुविधा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. सोई-सुविधांची वाटणी कशी करावी याचा अचूक निर्णय हे वीस जण सहज घेऊ शकतात. कारण त्या ग्रहावर वास्तव्य करताना येणाऱ्या सर्व अडथळयांचा सामना त्यानाच करावा लागणार आहे. उदाहरणार्थ त्या ग्रहावर बुध्दीकौशल्याचा जास्त वापर होणार की शारीरिक श्रमाची, यासंबंधीचा निर्णय घेऊन कुणाला किती वाटा द्यायचे हे कुणालाही न दुखवता त्यांचे त्यानाच ठरवावे लागेल. कदाचित बौध्दिक , शारीरिक व धोकादायक कुशलतेची क्रमवारी ठरवावी लागेल. प्रत्यक्ष कामाच्या स्वरूपावरून अग्रक्रम ठरवावे लागेल. व त्याप्रमाणात वाटप करावे लागेल. शारीरिक श्रमाचा क्रमांक एक असल्यास ते करणाऱ्याला मोठे घर, जास्त चॉकलेट्स, हवेशीर वातावरण अशा सुविधा द्यावे लागतील. व बौध्दिक कुशलतेचा शेवटचा क्रमांक ठरल्यास त्याच्या पसंतीला, इच्छा-आकांक्षांना वेसण घालावे लागेल. या प्रकारच्या वाटणीला कुणाचाही आक्षेप असण्याचे कारण नाही. उलट हीच समवाटणी आहे असेच समजले जाईल.
पृथ्वीवर राहणाऱ्यांना न्याय वागणूक म्हणजे नेमके काय याची कल्पना येण्यासाठी मंगळ ग्रहावरील जीववस्तीची कल्पना करावी लागेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण हुशार की मठ्ठ, उत्साही की आळशी, सुदृढ की रोगग्रस्त, याची पूर्ण कल्पना आपल्याला अजिबात नाही. आपण यासाठी नेहमीच इतरांबरोबर तुलना करत असतो. व आपण स्वत:ला शहाणे वा मूर्ख समजत असतो व त्यानुसार मिळालेल्या वाटपावर खुश असतो. त्यामुळे आपल्या गरजा व आपली क्षमता यांचा कधीच ताळमेळ बसत नाही. म्हणून या गोष्टींचा मंगळ ग्रहावरील कल्पनेतून नीटपणे शोध घेत घेतच पुढील नियोजन करावे लागेल. त्यासाठी काही नियम-धोरण ठरवावे लागतील. यातून कुणाला, किती व केव्हा काय द्यायचे याचे निकष ठरवता येतील. अशा वाटपामध्ये कुठलाही भेदभाव केला जाणार नाही, याची खात्री केली जाईल. काळजी घेतली जाईल. त्यातूनच समतेचा प्रश्न कायमचाच सुटेल.
हेच निकष लावून हीच प्रक्रिया पृथ्वीवर अंमलात आणू शकल्यास तळागाळातील लोकांनासुध्दा सुस्थितीत आणू शकणारी पर्यायी व्यवस्था उभी करता येईल. सामाजिक सुरक्षेचा चुकीचा अर्थ काढल्यामुळे या जगात विषमता वाढत आहे. कारण मुळातच कुठल्या ढिगाऱ्याखाली किती जण आहेत व ही ढिगारे कुठल्या परिस्थितीत कमी जास्त होऊ शकतात याची आपल्याला नीट कल्पना नाही. त्यामुळे उत्पन्नाच्या स्रोतांची वाटणी करत असताना अंदाज चुकत आहेत. जेथे गरज नाही तेथे सुविधांचा भडिमार केला जात आहे. व जेथे नितांत गरज आहे तेथे वेळेवर सुविधा पोचत नाहीत. म्हणून लोकामध्ये अप्पलपोटेपणा, हाव वाढत आहे. लोक लोभी होत आहेत. विनाकारण संग्रह करण्याकडे कल वाढत आहे. त्यातूनच विषमतेला ऊत येत आहे. जर या गोष्टींचा नीटसा अंदाज आल्यास एक नवीन व्यवस्था उभी करणे शक्य होईल. सर्व ढिगाऱ्यांना ती न्याय देणारी असेल. ही नवीन व्यवस्था उदारवादी मताच्या लोकशाहीकडे नेणारी असेल. अशा व्यवस्थेत थोडया फार प्रमाणात संपत्तीच्या वाटपात फेरफारही होतील. परंतु हे पुनर्वाटप गरीबांच्या, तळागाळातल्यांच्या शोषणावर आधारलेली नसेल.
परंतु असे करण्यामध्ये विवेक असेल का?ज्याच्याजवळ क्षमता नाही त्याची हकालपट्टी करण्यात काही गैर नाही, असा आक्षेप घेणाऱ्यांचे समाधान कसे करायचे? स्पर्धेमध्ये जिंकण्याची जिद्द न बाळगता कायमचेच मागे मागे राहणाऱ्यांना या समाजाने का म्हणून पोसत रहायचे? कदाचित केव्हा तरी आपणही कामचुकाऱ्यांच्या पंगतीत बसू म्हणून आताच, क्षमता असतानाच त्याचीसुध्दा सोय करून ठेवण्याच्या नादापायी आपण या बांडगुळांना पोसत असू. परंतु अशी अगावू व आपत्कालीन व्यवस्था इष्ट ठरेल का? जे योग्य आहे व जे तातडीचे आहे तेच करणे शहाणपणाचे की एखाद्या न घडणाऱ्या संभाव्यतेसाठी धडपड करत रहायचे?
आजच्या परिस्थितीत योग्य काय वा अयोग्य काय हेच नेमके माहित नसल्यामुळे अज्ञानाचा बुरखा पांघरून उत्पन्नाचे विषम वाटप करत राहणे हाच यावरील जालिम उपाय असेल असे रॉल्सच्या अभ्यासकांना वाटण्याची शक्यता आहे. त्यामुळे निर्णय घेण्याची सक्ती व जवाबदारी आपल्यावर राहणार नाही. मात्र हा तर्क चिकित्सकांना पटणार नाही. जेव्हा (अज्ञानाच्या) बुरख्याआड लपून राहतो तेव्हा आपण आपल्यातील सर्व गुणदोषासह त्यात लपूनच आपली मतं बनवत असतो. व त्या मतानुसार आपले निर्णय असतात. या स्थितीत निर्णयाचे योग्य मूल्यमापन होत नाही. याच अज्ञानापायी राजकीय मतांना व त्यातील स्वार्थ प्रवृत्तींना आपण खतपाणी घालत असतो, उत्तेजन देत असतो. हे करताना आपण आपली मतं बनवू लागतो. त्यामुळे विषमतेची दरी वाढतच जाते. शेवटी जेव्हा अंगावर शेकते तेव्हा आरडाओरडा करत पश्चातबुध्दीचा शहाणपणा दाखवू लागतो.
एकंदरित या चिकित्सक विचार प्रयोगाचे पुनर्मूल्यांकन केल्यास राजकीय तत्त्वज्ञानाच्या इतिहासातील एक काळे कुट्ट पान म्हणून या गोष्टीकडे पहावे लागेल! कारण कितीही कोलांटी उडी मारली तरी विषमतेच्या समस्येला उत्तर नाही.
Comments
उत्तर आहे.
समानता व विषमते विषयी पहिल्यांदा काही बाबी स्पष्ट करु. पूढे मी जे काही लिहीतो आहे त्यात सुधारणा करण्यासारखे बरेच काही असू शकेल हे सर्वप्रथम मान्य करतो. समानते विषमतेला शब्दात बसवण्याआधी काही गोष्टी आधी गृहीत धराव्या लागतील त्या म्हणजे.
समाजातले लोक हे स्वतःची योग्यता समजण्याइतपत ज्ञानी आहेत. हे ज्ञान त्यांनी सारासार विचार करून मिळवले आहे. ते कुणाच्या अंधप्रभावाखाली नाहीत. मला माझ्या योग्यतेपेक्षा जास्त मिळवण्याचा अधिकार नाही. जर जास्त मिळवायचे तर माझी योग्यता वाढवणे याशिवाय दूसरा कुठलाही पर्याय नाही हे सर्वांना मान्य आहे. प्रत्येकजण योग्यता वाढवत गेला तरी एकापेक्षा दूसऱ्याचे स्थान हे कायम वेगळे असेल आणि लाभांचे वितरण त्या त्या प्रमाणात होईल.
समानता -– माझे कर्तृत्व किती याची मला पूर्णतः जाणीव आहे आणि माझ्या कर्तृत्वास साजेशी संधी आणि योग्यते इतका मोबदला जो की सभोवतालच्या सामाजिक आर्थिक परिस्थितीत ज्या प्रमाणात मला मिळायला हवा त्या प्रमाणात मला मिळतो आहे असे प्रत्येकाला वाटणे म्हणजे समता असणे.
विषमता -– माझी योग्यता मला पूर्णतः माहित आहे. परंतु माझ्या योग्यतेनुसार मला संधी मिळत नाही. आणि योग्यता नसतांना इतरांना मात्र लायकीपेक्षा जास्त मिळते आहे. अशी भावना काही गटात असणे म्हणजे विषमता.
समानते विषमते विषयी हे लिहितांना त्या आधी कल्पिलेली सामाजिक परिस्थिती ही प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्नरत रहाणे आवश्यक आहे. परंतु पूर्णांशाने असा समाज कधीही अस्तित्वात नव्हता मग यापूढे तो तसा होईल का. याचे उत्तर तो अधिकाधिक तसा असणे हे समाजिक आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक ठरते हे समजून घेण्यात आहे. यात माझ्या मनगटात ताकद आहे, माझ्याकडे सत्ता आहे, माझ्याकडे लोकांना भ्रमित करण्याइतपत चालाखी आहे म्हणून मी जास्त मिळविन असा विचार करणाऱया वृत्ती समाजात कायमस्वरुपी असणार आहेतच किंबहूना याच माझ्या योग्यता मग मला यानुसार जास्त मिळालेच पाहीजे असा अविचारही मांडला जाईल. या विचारांना मर्यादित ठेवणे, त्यांचा इतर समुहावर प्रभाव पडणार नाही याची दक्षता घेणे यासाठी प्रचलित शासनपद्धतीचा आधार घेता येईल.
विषमता हा प्रश्न सुटण्याच्या शक्यतेतला नाहीच असे म्हणून हातपाय गाळून बसणे योग्य ठरणार नाही. या समस्येवर उत्तर आहे. कदाचित मला ते पूर्णांशाने नाही देता आले तरी ते नाहीच असे म्हणून कसे चालेल ?
सिम्प्लिस्टिक
सिम्प्लिस्टिक प्रयोगाने समस्या सोडवता येणार नाही
या विचारप्रयोगात योग्यता जास्त असेल तर त्या प्रमाणात जास्त उत्पन्न हे मान्य आहे असे दिसते. त्याचबरोबर योग्यता जितकी कमी तितके कमी उत्पन हेही मान्य आहे असेही दिसते.
परंतु कमी योग्यता असली तरी त्या व्यक्तीला मिळणारे 'कमी' उत्पन्न हे त्याच्या कुटुंबियांना प्रत्येकी २५०० कॅ दिवसाला मिळण्यास, त्याच्या जीवन अधिक आरोग्यविषयक किमान गरजा भागवण्यास आणि कुटुंबातीत पुढील पिढीस योग्यता मिळवण्याच्या प्रयत्नास पुरेसे आहे की नाही
१ याची काळजी समाजातील इतरांनी घ्यायची की कसे?
२ ती समाज घेणार नसेल तर त्याने आणि कुटुंबियांनी काय करावे असे अपेक्षित आहे. अ) त्याला पुन्हा पृथ्वीवर पाठवून द्यायचे ब) त्याला कुटुंबियांसह मरून जाण्यास भाग पाडायचे
सध्याच्या परिस्थितीचा विचार केल्यास पर्याय अ असा काही अस्तित्वात नाही.
पर्याय ब हा (काही देश सोडून) सध्याच्या समाजाने उघडपणे नाही तरी सुप्तपणे मान्य केलेला दिसतो.
योग्यता ही एक फार कॉम्प्लेक्स कल्पना आहे. योग्यतेबरोबरच उपलब्धता हाही सध्याच्या समाजातील एक घटक आहे. त्यामुळे पुरेसे कष्ट करण्याची योग्यता असूनही खूप उपल्ब्धता असल्याने कमी मोबदला मिळण्याची उदाहरणे पुष्कळच सापडतात. एखाद्या शेतकर्यापेक्षा गायकाला आणि कामगारापेक्षा कारकुनाला खूप जास्त मोबदला मिळतो आणि त्यात योग्यतेची कोणती कसोटी लागते हे माहिती नाही.
+१
सहमत. समानता /अविषमता ही योग्यतेवरून नाही तर प्रत्येकाला आपली योग्यता काय वाटते त्यावरून ठरत असावी. एखाद्याची योग्यता स्वतः मोजतो व इतर समाज मोजतो ती वेगळी असते. किंबहूना प्रत्येकाला प्रत्येकाची योग्यता ही वेगळी वाटत असते. अश्यावेळी एखाद्याची 'निरपेक्ष' योग्यता कशी काढावी हा समानता/विषमता ठरवण्याआधीचा गहन प्रश्न सुटणे बाकी आहे.
ऋषिकेश
------------------
समाजातली सामाजिक जाणीवही अगदी नसल्यातच जमा आहे. सुस्त, मद्दड जनता गोळाभर अन्न गिळून, टीव्हीवरच्या मालिका बघून झोपी जात आहे - सन्जोप राव
मुबलक की मर्यादित?
प्रयोग नीट समजला नाही.
मंगळ ग्रहावरच्या छोटेखानी समाजासाठी सोयी-सुविधा "मुबलक" प्रमाणात उपलब्ध आहेत, की "मर्यादित" प्रमाणात. उपभोग्य वस्तू जर "मुबलक" प्रमाणात उपलब्ध असेल, तर "मालकी", "वाटप" वगैरे शब्द नि:संदर्भ आहेत.
(उदाहरण : प्रदूषण बेसुमार वाढण्याच्या पूर्वीच्या काळात "श्वसनासाठी हवा" ही सोय पृथ्वीवर "मुबलक" प्रमाणात उपलब्ध होती. त्यावेळी - म्हणजे अगदी हल्लीहल्लीपर्यंत - हवेची मालकी, आणि हवेचा वाटप, या दोन्ही संकल्पना निरर्थक होत्या.)
म्हणून बहुधा वरील लेखात "मर्यादित" असे म्हणायचे असेल. मग प्रयोगाला काही अर्थ राहातो.
मर्यादित प्रमाणात उपलब्ध साधन-संपत्तीच्या वाटपाबाबत साधारणपणे दोन टोकांचे नैतिक हिशोब आपल्याला समाजात आजकाल बघायला मिळतात.
एका टोकाला "गरजा" म्हणतात. एका टोकाला "ऐश-आरामाच्या सुविधा" म्हणतात. या दोन टोकांच्या मध्ये भलतीच सरमिसळ आहे - असणारच.
उदाहरणार्थ जलदुर्भिक्षाच्या प्रसंगात पिण्याचे पाणी ही "गरज" मानली जाते. "गरजे"च्या वस्तू मनुष्यमात्रात समसमान वाटल्या पाहिजेत, अशी काही भावना लोकांत दिसते. "दुर्भिक्ष" शब्दातच असा अर्थ आहे, की वाटप केल्यानंतर प्रत्येकाला मौजमजेत उडवायला पाणी मिळत नाही. या समसमान वाटपात पात्र-अपात्रतेचा फारसा विचार केला जात नाही. केल्यास दुय्यम विचार केला जातो. "लाख मरोत पण लाखांचा पोशिंदा न मरो" अशी म्हण आहे, खरे - जणू काही पात्र-अपात्रतेचा विचार होतो आहे. पण तसे नाही (असल्यास दुय्यम विचार आहे.) "लाख मरोत पण लाखांच्या पोशिंद्याचे कारंजे न सुको" असे कोणी म्हटल्यास आपण सर्वच त्याला विरोध करू.
दुसर्या टोकाला हिरेजडित दागिने, हे "ऐश" मानले जातात. "ऐश" ही बाब समसमान वाटली पाहिजे, असे म्हणणारे फारसे कोणी आपल्याला समाजात सापडत नाही.
जगातील बहुतेक दैनंदिन साधने या दोन टोकांच्या मधल्या मिश्र भागात येतात. रॉल्सच्या वैचारिक प्रयोगातून या गोष्टींबद्दल मला तरी काहीएक मार्गदर्शन मिळत नाही आहे. ज्या लोकांनी "न्याय्य वाटपाबद्दल प्रश्न जटिल आहे" असा विचारच कधी केला नसेल त्यांच्यासाठी ही कथा चांगली असावी. "हा एक कठिण प्रश्न आहे" इतपत त्यांना समजेल.
लेख विचारप्रवर्तक आहे, पण मला कित्येक तर्क नीट समजले नाहीत. उदाहरण :
अधोरेखित शब्दांतून कार्यकारणभाव सांगितल्यासारखा वाटतो. परंतु मला तो कळत नाही. आप्पलपोटेपणा गरज नसलेल्या सुविधांचा भडिमार झाल्यामुळे उत्पन्न होतो? निश्चितच मला तर्क नीट समजलेला नाही.
काळेकुट्ट पान ते कुठले, हे मला नीट समजले नाही.
मात्र एक सहमती स्पष्ट करून माझा किंज्ञातव्यविमूढ प्रतिसाद थांबवतो. एकंदर लेखाचा असा काही रोख दिसतो, की अर्थशास्त्राचा आणि नीतिशास्त्राचा दृढ संबंध आहे. याबाबत मी पूर्णपणे सहमत आहे.
ऐश
>>"ऐश" ही बाब समसमान वाटली पाहिजे, असे म्हणणारे फारसे कोणी आपल्याला समाजात सापडत नाही.
सहमत्. असे म्हणणारे कोणी भेटणार नाहीतच पण एकच गोष्ट काही प्रमाणात गरज असेल आणि त्यापेक्षा जास्त ही ऐश असेल तर सर्वांची पाण्याची 'गरज' भागल्याशिवाय कारंजाला पाणी देऊ नये असे नक्कीच म्हणायला हवे. परंतु हे देखील योग्यतेच्या नावावर समर्थले जाऊ लागले ('काय बिघडले? आहे त्याची कारंजे उडवण्याची योग्यता!!') तर ते निषेधायलाही हवे.
मुबलक की मऱ्यादित?
रॉत्सच्या मते न्याय वागणूक म्हणजे नेमके काय हे समजून घेण्यासाठी मंगळावरील विचारप्रयोग योग्य ठरेल. या प्रयोगात मागणी तसा पुरवठा या भांडवलशाही प्रकाराला स्थान नाही. म्हणूनच येथे सोई-सुविधा मुबलक प्रमाणात असतील. परंतु मुबलक प्रमाणात असलेल्या सोई-सुविधांची वाटप करतानासुद्धा काही अग्रक्रम ठरवावे लागतील. चॉकलेट्स मोठ्या प्रमाणात असूनसुद्धा त्यातील एखादा - ज्याच्या कामाची अत्यंत गरज आहे व ते काम अग्रक्रमातील आहे - मलाच प्रथम हवे असा हट्ट केल्यास, इतरांना मागे सारून, त्याचा हट्ट पुरवावा लागेल.
मानवी स्वभावांचे अभ्यास करणाऱ्यांना माणसातील हट्ट, स्वार्थ कशा प्रकारे काम करत असते हे एक गूढ वाटत आले आहे. पिण्याचे पाणी मुबलक प्रमाणात असतानासुद्धा मला, माझ्या सोईप्रमाणे हवे असे सांगणारे नक्कीच भेटतील.
ऐष
या विचारप्रयोगात फक्त गरजेच्या वस्तू व इतर सोई-सोविधांचाच विचार केला आहे. ऐष- आरामी, चैन, च्रंगळवादी, कलात्मक गोष्टी, यांचा विचार केला नाही. मुळात दोन वेळच्या जेवणाची ददात असते त्यांना या कवी-कल्पनेत रमून जाण्याची गरजही नाही व वेळही नाही.
आप्पलपोटेपणा व हाव
युरोपातील अनेक राष्ट्रे व अमेरिका यांची गणना समृद्ध देशात केली जाते. तेथे सर्व सुख-सोई व सुविधा मुबलक प्रमाणात आहेत. वीज, पाणी, रस्ते, अन्न, आरोग्य सुविधा या गरजेच्या गोष्टीसाठी त्यांना विचार करण्याची गरज पडत नाही. खरे पाहता अशा देशातील जनतेला कुठलाही हाव असायला नको. आपल्या येथील नैसर्गिक स्रोताचा व कुशाग्र बुद्धीचा वापर करून पुढील अनेक पिढ्या सुख- समाधानाने ते राहू शकतात. परंतु याच देशातून आर्थिक मंदीच्या लाटेची सुरवात होते. पोलिसिंग करण्याच्या वृत्तीमुळे दहशतवाद बळकावतो. त्यांच्या चंगळवादी जीवनशैलीमुळे पर्यावरणाचा र्हास होतो. या ढिगासाठी भरपूर सुविधा, मात्र इतराकड़े खायच्या अन्नाची ददात अशी स्थिति असताना न्याय वागणुकीची अपेक्षा करणेच चुकीचे वाटू लागते. म्हणूनच या विचार प्रयोगाला काळे कुट्ट पानात गणना करावे लागते .
क्रम लावावा लागणे म्हणजेच मर्यादित
ही एकप्रकारे मागणीच नाही काय? एखाद्याच्या कामाची गरज जास्त असणे कशामुळे ठरते याचा विचार करता त्या कामामुळे होणार्या उत्पादनाला जास्त मागणी असल्याने असे वाटते. असे असतांना हा मंगळावरील समाज 'मागणी व पुरवठा' या तत्त्वांपासून फारकत कशी घेतो असा प्रश्न पडला आहे.
इच्छांच्या तुलनेत साधने कधीच मुबलक नसतात हा मागणी व पुरवठा या तत्त्वांचा कणा आहे. वरील उदाहरणात 'वाटप करावे लागणे' (वर धनंजय यांनी हा मुद्दा मांडला आहेच) यावरून मुबलकता नसल्याचे लक्षात येत आहे.
उघड
>>"लाख मरोत पण लाखांच्या पोशिंद्याचे कारंजे न सुको"
असे काही वेळा खरोखरच घडते असे दिसते. उदाहरण म्हणून महाराष्ट्रातील आजच्या वीज वाटपाचे घेता येईल.
माझ्या आधीच्या प्रतिसादात एक चूक झाली आहे.
योग्यता कमी असलेल्याला कुटुंबियांसह मरून जाण्यास भाग पाडायचे हा पर्याय सध्याच्या समाजाने उघडपणे नाही तरी सुप्तपणे मान्य केलेला दिसतो.
असे मी लिहिले आहे. पण मूळ लेखातले 'स्पर्धेमध्ये जिंकण्याची जिद्द न बाळगता कायमचेच मागे मागे राहणाऱ्यांना या समाजाने का म्हणून पोसत रहायचे?' हे वाक्य पाहता लेखकाने तरी हा पर्याय उघडपणेच मान्य केलेला दिसतो. (याला क्रौर्य म्हणावे की सहानुभूतीचा अभाव हे मला कळत नाही)
रॉल्स आणि सेन
जॉन रॉल्स यांच्या काही विचारांचा प्रतिवाद करणारे अमर्त्य सेन यांचे 'द आयडिया ऑफ जस्टिस' नावाचे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. त्याचे परिक्षण येथे वाचता येईल. या लेखाच्या अनुषंगाने त्या परिक्षणात आलेल्या वाक्यांचा अनुवाद खाली देत आहे.
नैतिकता व न्याय
नैतिकता व न्याय
"नैतिकता न्यायापेक्षा श्रेष्ठ असते का? प्रचलित न्यायदान व्यवस्थेत 'न्याय याचा अर्थ कायद्याच्या आधारे दिला जाणारा न्याय. मग नैतिकता ही कायद्यापेक्षा वेगळी, वरची म्हणायचं का? न्यायाची कायद्यानुसार ठरणारी व्याख्या आणि नैतिकतेच्या दृष्टीकोनातून ठरणार्या न्यायतत्त्वाचा अर्थ वेगळा ठरतो. नैतिकतेवर आधारित न्याय हां तात्कालीन समाज मूल्यानुसार निश्चित होतो. आपल्या संविधानात सामाजिक, राजकीय, आर्थिक न्यायाची तत्त्व पायाभूत मानली गेली आहेत. शासनाच्या व व्यक्तिच्या कृतीनां ही तत्त्व लागू होतात. त्यामुळेच मानवी व्यवहार विषयक घेतलेल्या प्रत्येक राजकीय, आर्थिक, निर्णयात या मूलभूत तत्त्वाचा आविष्कार होणे अपेक्षित आहे. "
कायदा व नैतिकता
समजा प्रत्येक निर्णयात असा आविष्कार होईल अशा सामाजिक संस्था निर्माण करण्यात आलेल्या आहेत. आणि असे काही असूनही न्याय्य नसलेले मानवी व्यवहार होत आहेत. अशा वेळी पुन्हा नव्या संस्था निर्माण केल्या जाव्यात की उपलब्ध संस्थांचा वापर करून न्याय्य नसलेले व्यवहार कमी व्हावेत म्हणून प्रयत्न केले जावेत? मूळात अशा संस्था (कायदा व नैतिकता यात द्वैत नसलेल्या) निर्माण होणे शक्य आहे काय? तेव्हा असलेली साधने या संस्थांच्या निर्मितीत वापरली जावीत की उपलब्ध संस्थांमध्ये कमी अन्यायकारक व्यवहार होतील अशा प्रकारे त्यांत सुधारणा घडवून आणाव्यात?