महाभारत-४ एक नकाशा

महाभारत-४
महाभारत वाचतांना निरनिराळ्या राज्यांचा उल्लेख येतो व ती राज्ये नेमकी कोठे होती हे लक्षात
येणे काही वेळा कठीण होते. त्यावेळी निरनिराळ्या प्रदेशांना काय म्हणत याची कल्पना यावी
म्हणून एक नकाशा देत आहे.
P1030048

शरद

लेखनविषय: दुवे:

Comments

आणखी एक

हा थोडा अधिक स्पष्ट आहे. हा नकाशा पाहून असे वाटते की या सुमारास सरस्वती नदी आटली असावी कारण जेथून सरस्वती वाहते तेथे कोणतेही राज्य किंवा शहरे दाखवलेली नाहीत. यावरून महाभारत सिंधूसंस्कृती नंतर घडले असा तर्क करता येईल का?

महाभारत आणि सिंधू-सरस्वती

महाभारत सिंधू संस्कृतीनंतर घडले काय ते माहित नाही. पण सरस्वती नदी आटू लागल्यानंतर / बरीच आटल्यावर घडले असावे असे माझे मत आहे.
हा दुवा लगेच सापडला.
शिवाय पूर्वी चर्चा केल्याप्रमाणे - व्यासांच्याच श्रीमद्भागवतात प्रभास, यदुकुलसंहार, अर्जुनाचे बुडालेल्या द्वारकेस जाणे आणि उरल्यासुरल्या
म्हातार्‍याकोतार्‍या/बायका-मुलांना इंद्रप्रस्थाकडे परत आणण्याचा प्रयत्न, त्यात त्यांची अतोनात हानी या सार्‍यांच्या पार्श्वभूमीला वाळलेले
सरस्वतीचे पात्र आहे. त्या पात्राच्या काठाने त्याचा रथ मार्गक्रमण करतो.

हस्तिनापूर ते अंग

हस्तिनापूर ते अंग हे अंतर बरेच आहे. त्याकाळी तर हे अंतर कापायला खुपच काळ लागत असेल :) असो.
हे दोन्ही नकाशे कशावरुन योग्य आहेत? त्याकाळी संपूर्ण भारताचा नकाशा असे काही अस्तित्वात होते का? मुळात नकाशा ही गोष्ट कधी पासून सुरु झाली? तसेच आपण सरस्वती नदी आटली म्हणतो जी प्रमुख नदी असावी. अशा आणखी काही नद्या होत्या का?


हा नकाशा योग्य असावा

एकंदर वर्णनावरून, गावांच्या आणि राजधान्यांच्या नावांवरून हा नकाशा योग्य आहे असे वाटते.
पण तो 'भारतवर्षाचा महाभारतकालीन नकाशा' नसून 'महाभारतकालीन भारतवर्षाचा अर्वाचिन नकाशा' आहे हे पक्के लक्षात ठेवावे.
त्याकाळी (इ.स.पू.) लोकांची नकाशा बनवण्याची समज/कला आजच्या इतकी प्रगत नसावी. अन्यथा क्लॉदियस टोलेमीयसने असे नकाशे बनवले नसते.

प्रमाणिकरणपद्धति

प्रमाणिकरणपद्धति:

त्याकाळी (इ.स.पू.) लोकांची नकाशा बनवण्याची समज/कला आजच्या इतकी प्रगत नसावी. अन्यथा क्लॉदियस टोलेमीयसने असे नकाशे बनवले नसते.

कोण्या टालेमियस् नामक व्यक्तिने सिद्ध केलेली मानचित्रे अभ्यासून - त्या व्यक्तिचा (विशेषतः) भारतवर्षाशी वरकरणी विशेष असा संबंध दिसत नसतानादेखील - त्याच्या मानचित्रे सिद्ध करण्याच्या कलेच्या प्रगतीशी समस्त जगतातील लोकांच्या तत्कथित कलेच्या प्रगतीशी तुलना करणे ही प्रमाणिकरणपद्धति मानून एकंदर निर्णयाप्रत येऊन पोहोंचणे कितपत योग्य होय?

--
तमिळ्नाट्लेर्न्दु डैर्रक्टा मराट्टिदेडत्तुक्कु वंदु सेट्लान ओरु चिन्नमनिदनिन एळुत्तु यिदु!

हैयो हैयैयो!

अंग वंग

हे दोन्ही नकाशे कशावरुन योग्य आहेत? त्याकाळी संपूर्ण भारताचा नकाशा असे काही अस्तित्वात होते का? मुळात नकाशा ही गोष्ट कधी पासून सुरु झाली?

हे नकाशे योग्य वगैरे असावेत. ;-) म्हणजे व्यासांनी नकाशा काढून महाभारत नक्कीच लिहिले नाही परंतु अर्वाचीन तज्ज्ञांनी अनेक अंदाज बांधून, जसे हस्तिनापूर हे यमुना तीरावर. अयोध्या शरयूच्या तीरावर. अंग-वंग हे मगध किंवा आताच्या बिहार-बंगाल जवळचे प्रदेश अशा अनेक अटकळी बांधून हा नकाशा तयार केला असावा. तो १००% बरोबर असेल असे नाही परंतु त्यातील अनेक अंदाज खरे आहेत.

नकाशे बनवण्याचा माणसाचा उद्योग पुरातन आहे. सध्या फारसा वेळ नसल्याने त्याबद्दल रोचक गोष्टी लिहिता येत नाहीत असे खेदाने म्हणते.

आपण सरस्वती नदी आटली म्हणतो जी प्रमुख नदी असावी. अशा आणखी काही नद्या होत्या का?

असाव्यात परंतु सरस्वती इतक्या मोठ्या आणि महत्त्वपूर्ण नसाव्यात.

आता खालील गोष्ट ह. घ्या.

हस्तिनापूर ते अंग हे अंतर बरेच आहे. त्याकाळी तर हे अंतर कापायला खुपच काळ लागत असेल :)

खरे आहे. :-) बघा दुर्योधन किती धोरणी! त्याने आपल्या मित्राला राज्य देऊन मिंधे केलेच परंतु ही खबरदारी देखील घेतली की कर्ण आपली जन्मभूमी, आप्त, मित्र वगैरेंना सोडून तेथे कधीच स्थायिक होणार नाही. कर्ण अंग देशाचा राजा झाला आणि अधिक काळ हस्तिनापुरातच राहिला.

गंमत

मला गंमत हिच वाटते आहे की महाभारत हे फक्त महाकाव्य, सत्य वगैरे नाही असे म्हणणारे आहेत त्यांना हा नकाशा मान्य आहे का? मुद्दा हाच आहे की जी गोष्ट सत्य नाही त्याचा नकाशा सत्य का मानावा? म्हणजे एकिकडे अभ्यासपुर्ण नकाशा आहे आणि तो रेखाटण्यासाठी ज्याचा आधार आहे ते सत्य नाही असा दावा.


प्रतिवाद

सर्वप्रथम, महाभारत हे सत्य आहे, केवळ महाकाव्य आहे किंवा सत्यावर आधारलेले महाकाव्य आहे यांपैकी कोणताही दावा मी करू इच्छीत नाही, हे नमूद करू इच्छितो. त्या विषयात मला यत्किंचितही गती नाही, त्याविषयी माझा अभ्यास नाही आणि एक अत्यंत वरवरचे प्राथमिक कुतूहल यापलीकडे त्यात मला अधिक सखोल रसही नाही, त्यामुळे त्याविषयी कोणतीही भाकिते माझ्यासारख्याने करणे हे फोल ठरेल, आणि ती मी करू इच्छीतही नाही.

मात्र,

जी गोष्ट सत्य नाही त्याचा नकाशा सत्य का मानावा? म्हणजे एकिकडे अभ्यासपुर्ण नकाशा आहे आणि तो रेखाटण्यासाठी ज्याचा आधार आहे ते सत्य नाही असा दावा.

या आपल्या मुद्द्याच्या बाबतीत (आणि तेवढ्या मुद्द्यापुरतेच; महाभारताच्या सत्यासत्यतेबद्दलच्या कोणत्याही दाव्याशी याचा संबंध कृपया जोडू नये.) समांतर उदाहरणाच्या आणि कॉमनसेन्सच्या आधारे जे काही लक्षात येते, ते थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न करू इच्छितो.

माझ्या या प्रतिसादात दिलेले (वुडहाउसच्या 'ब्लँडिंग्ज़ कॅसल' मालिकेचे आणि त्यातील 'ब्लँडिंग्ज़ कॅसल' आणि 'मार्केट ब्लँडिंग्ज़' या स्थळांचे) उदाहरण पुन्हा घेऊ. येथे 'ब्लँङिंग्ज़ कॅसल' किंवा त्याच्याजवळील 'मार्केट ब्लॅंडिंग्ज़' हे रेल्वेस्थानकाचे गाव हे काल्पनिक आहे. लॉर्ड एम्ज़वर्थ, लेडी कॉन्स्टन्स, गॅलॅहड, एम्प्रेस ऑफ ब्लँडिंग्ज़ (लॉर्ड एम्ज़वर्थ यांचे जिच्यावर जिवापाड प्रेम असते अशी त्यांनी पाळलेली आणि प्रदर्शनांत पदके मिळवलेली गलेलठ्ठ डुकरीण) वगैरे पात्रे काल्पनिक आहेत. 'ब्लँडिंग्ज़ कॅसल' मालिकेतील कथाही पूर्णपणे काल्पनिक आहेत.

मात्र 'ब्लँङिंग्ज़ कॅसल' किंवा 'मार्केट ब्लॅंडिंग्ज़' हे इंग्लंडात असल्याचे कल्पिलेले आहे. ते वुडहाउसच्या कल्पनेप्रमाणे इंग्लंडात साधारणपणे कोठे असावे याबद्दल तर्कही मांडले गेलेले आहेत. तसेच या मालिकेतील वर्णनांवरून आणि काही घटनानोंदींवरून ही सर्व कथानके साधारणतः कोणत्या काळात घडल्याचे कल्पिलेले आहे याचाही अंदाज बांधता येतो.

आणि इंग्लंड काल्पनिक नाही. तो काळही काल्पनिक नाही; प्रत्यक्षातला आहे. मग भले का या घटना काल्पनिक असोत किंवा 'ब्लँङिंग्ज़ कॅसल' आणि 'मार्केट ब्लॅंडिंग्ज़' ही स्थळेही काल्पनिक असोत.

मग उद्या जर का कोणी 'लॉर्ड एम्ज़वर्थकालीन इंग्लंड'चा नकाशा छापला आणि त्यावर 'मार्केट ब्लँडिंग्ज़'च्या साधारण स्थानाचा काल्पनिक बिंदू मांडून दाखवला, तर तो नकाशा असत्य किंवा काल्पनिक ठरू नये, फार तर त्यावर दाखवलेला 'मार्केट ब्लँडिंग्ज़'चा बिंदू काल्पनिक ठरावा, असे वाटते. (चूभूद्याघ्या.)

थोडक्यात, "'ब्लँडिंग्ज़ कॅसल' मालिकेतील कथा घडल्या, असे जर मानले, तर ते ज्या काळात घडले असे मानावयास जागा आहे, त्या काळातील प्रत्यक्षातील इंग्लंडातील प्रत्यक्षातील जागांच्या संदर्भात, या मालिकेत वर्णिलेली विविध खरी आणि काल्पनिक स्थळे कोठे असू शकतील" असे या नकाशाचे स्वरूप राहू शकते. (पुन्हा चूभूद्याघ्या.)

महाभारत हे फक्त महाकाव्य, सत्य वगैरे नाही असे म्हणणारे

महाभारत हे फक्त महाकाव्य, सत्य वगैरे नाही असे म्हणणारे

असे "फक्त" लोक आहेत ही रम्य कल्पना आहे - पण अतिसुलभ आहे, निष्फळ विवादांचे मूळ दृढ करणारी आहे. तथ्य त्याहून गुंतागुंतीचे आहे.

महाभारतातील श्लोकांच्या संख्येची वृद्धी ही प्राचीन ग्रंथांतच सांगितली आहे. महाभारतातील तपशील वेगवेगळ्या काळातल्या कवींनी रचलेले आहेत. त्यामुळे महाभारतातले कित्येक तपशील वेगवेगळ्या काळातले आहेत, त्यातील कथांमधले स्थलकालवाचक तपशील परस्पर-संदर्भाने सुसंगत असत नाहीत. परंतु असे तपशीलवार सुसंगत नसलेले कथाभागही साहित्य म्हणून उच्च कोटीचे आहेत. म्हणून टाकाऊ नाहीत.

- - - -
(अधिक लांबड)

"महाभारत साहित्य म्हणून एकजिनसी आहे. मात्र इतिहास किंवा भूगोल या शास्त्रांच्या दृष्टीने बघावे, तर वेगवेगळ्या काळातील समजांचे मिश्रण म्हणून एक संदर्भग्रंथ आहे - एकजिनसी नाही." या दोन गुंतागुंतीच्या वाक्यांचे सुलभीकरण म्हणून "महाभारत हे (एकजिनसी) महाकाव्य आहे, पण (एकजिनसी) इतिहास नाही," असे कोणी म्हणत असावे. या वाक्याचा उपयोग साधारणपणे अशा संवादात केला जातो, जेव्हा कोणीतरी कुठलातरी तपशील स्थलकाल-तपशिलासकट तथ्य मानत असतो.

म्हणजे अमुक घटनेची तारीख काय? तमुक सैन्यात किती लोक होते? रामायण हे महाभारतापूर्वीचे की नंतरचे? वगैरे. अशा परिस्थितीत "ते तपशील एकजिनसी इतिहास मानता येत नाही (कारण वेगवेगळ्या काळातल्या कवींनी लिहिले आहे), मात्र एकजिनसी महाकाव्य मानता येते (कारण तशी साहित्यानुभूती होते)" हा अर्थ संदर्भामुळे सुस्पष्ट असतो.

म्हणजे हिडिंबेशी लग्न करणारा महावीर, आणि बक नावाच्या शत्रूशी लढणारा महावीर, आणि लांडग्यासारखी भूक असलेला महावीर, हे सर्व एकच ऐतिहासिक पुरुष होते असे मानण्यास शंका येते, कारण त्या तपशिलांच्या कथा वेगवेगळ्या कवींनी वेगवेगळ्या काळात लिहिल्या असू शकतील. पण कुठल्या हिडीस वाटणार्‍या जमातीतल्या कन्येशी लग्न करणारा कोणी आर्य पुरुष असेल, बक नावाच्या (किंवा बगळ्याचा ध्वज असलेल्या) शत्रूशी लढणारा कोणी आर्य पुरुष असेल, आणि खूप खाणारा बलशाली, अशा माणसाला "लांडगा" म्हणायची पद्धत एका कवीच्या काळात असेल, असे वेगवेगळे तपशील ऐतिहासिक विश्लेषणासाठी वापरणे ठीकच आहे. पण असे सगळे तपशील असलेला एक वीरपुरुष म्हणून भीम हा साहित्याच्या दृष्टीने उत्तम पात्र आहे.

बाकी तुम्हाला एकजिनसी इतिहास आहे असे म्हणायचे आहे, की काय हे मला माहीत नाही. वरील प्रकारची वाक्ये "रामेश्वर ते लंका या दरम्यान दिसणारी बेटे ही राम व वानरसेना यांनी शिळा टाकून बनलेली आहेत" वगैरे तपशिलांच्या समर्थन/खंडनात दिसतात.
- - -
एक समांतर उदाहरणः

येथे एक अन्य पण अगदी समांतर उदाहरण देणे अवांतर ठरू नये. रामेश्वर आणि लंकेदरम्यानची ती बेटे आदम नावाच्या आदिमानवाने बनवलेल्या पुलाचा भाग आहेत असे काही लोक म्हणतात. आदमाच्या कथेच्या महाकाव्यात त्याच्या वंशातल्या सुलेमान, दाऊद, वगैरे मिश्र-ऐतिहासिक तपशील येतात. त्यांच्या राजधान्यांचा इतिहास, भूगोल, वगैरे, त्या तपशिलांचे विश्लेषण करून मिळू शकते. सुलेमान नावाचा एक (किंवा अनेक) राजा (राजे) होते. पण शिबा नावाच्या राणीशी त्या एकाने तह केला का? त्या एकाच्या जनान्यात नेमक्या किती बायका होत्या? असा एकजिनसी "इतिहास" त्या बायबलातून घेणे म्हणजे महाकाव्याला इतिहास म्हणण्याची चूक करणे होय. सुलेमानाच्या कथेत काही ऐतिहासिक तपशील पेरले असतील असे मानून विश्लेषण करणेही ठीकच आहे. पण म्हणून ती बेटे आदमाने बांधली हा "इतिहास" मानणे धोक्याचे आहे. तरी कथा म्हणून छानच आहे.

"तशी चूक करू नका" असे कोणी म्हटले की काही ख्रिस्ती/ज्यू/मुसलमान लोक म्हणतात - "पण अमुक शहर उत्खननात सापडले, त्याचे काय?" मग पुढे "बायबल हे केवळ अनैतिहासिक महाकाव्य असणारे लोक" वगैरे संभावना करतात. ही संभावना वर उद्धृत केलेल्या वाक्यापेक्षा वेगळी नाही.

अशाच प्रकारे आधुनिक विश्लेषण करून बायबलकाळचा भूगोल वगैरे नकाशेही प्रसिद्ध होतात (दुवा). त्यामुळे बायबलातले बारीकसारीक तपशीलवार कथा काही "इतिहास" होत नाहीत. काव्यच राहातात.

- - -

तथ्यातथ्याबद्दल मनाची काटेकोर धारणा असली तर तरी असे नकाशे उपयोगी असतात. महाभारताच्या विश्लेषणावरून केलेला हा नकाशा दिल्याबद्दल शरद (आणी प्रियाली) यांचे धन्यवाद.

२२१बी, बेकर स्ट्रीट

मला गंमत हिच वाटते आहे की महाभारत हे फक्त महाकाव्य, सत्य वगैरे नाही असे म्हणणारे आहेत त्यांना हा नकाशा मान्य आहे का?

मला २२१ बी, बेकर स्ट्रीट लंडनला कोठेतरी आहे आणि असायला हवी असे मनापासून वाटते. :-) त्यामुळे मला तरी हा नकाशा मान्य आहे.

मुद्दा हाच आहे की जी गोष्ट सत्य नाही त्याचा नकाशा सत्य का मानावा?

कथेत आणि गोष्टीतही नकाशे असतातच की. ते ते त्या त्या गोष्टींसाठी आणि कथानकासाठी उपयुक्त आणि साजेसे असतात. कथेच्या बाहेर त्या नकाशाला स्वतंत्र अस्तित्व असेलच असे नाही.

नकाशाचे महाभारत

चर्चेत अनेक चांगले मुद्दे येत आहेत. माझे म्हणणे एवढेच आहे की हजारो वर्षांचा इतिहास हा इतिहास कि काव्य हा एका अनंत चर्चेचा विषय आहे. हे मान्य कि या महाकाव्यात हजारो वर्षात अनेकांनी भर घातली आहे. पण या सगळ्याचा सोर्स कुठे ना कुठे तरी होता. कदाचित नकाशा मान्य केला तर हे मान्य करावे लागेल. एवढ्या पुरातन इतिहासात आपण जाऊ शकत नाही अथवा भविष्यात डोकावू शकत नाही. इतिहास गरजे नुसार हवा तसा वळवला जातो हे आम्ही वर्तमानात पाहतो आहे. आजवर दादोजी कोंडदेव शिवरायांचे गुरु म्हणून आम्ही मान्य केले. आता ते नामशेष आहेत. असेच अजुन काही शे वर्षांनी गांधी नेहरु घराण्या बद्दलचे इतिहास असेच वळवले जातील. असो. हा झाला बलणार्‍या इतिहासाबद्दलचा मुद्दा. नकाशा बद्दल बोलायचे झाले तर भारताचा आत्ताच नकाशा जो भारत आमचा नकाशा म्हणतो आणि अनेक देश जो त्यापेक्षा वेगळा मानतात/दाखवतात हा मुद्दा आहेच.
तात्पर्य असे की जिथे वर्तमानातल्या कागद-पत्रांमध्ये जे मतांतर आहे ते पाहता ज्या गोष्टीं आपण काही गृहतीके मान्य करुन चर्चा करतो आहोत त्याचाच आधार म्हणावा तेवढा पक्का नाही.

डिस्कव्हरी चॅनेलवर मध्ये एकदा कलर्स ऑफ इंडिया या कार्यक्रमात जो बी बी सी ने तयार केला होता, त्यात गंगा, तिचा उगम, गंगेने व्यावपलेला प्रदेश, गंगेमुळे त्या प्रदेशात झालेले भौगोलिक, सांस्कृतीक, पर्यावरणातले, सजीवांमधले परिणाम या संबंधीत अभ्यास. मग येथे राहणार्‍यांनी हिंदू धर्मीयांनी उपयोगी पडणार्‍या प्राणी पक्षांना देवाचे रुप कसे दिले इत्यादी असे बरेच अभ्यासपुर्ण संदर्भ दाखवले होते. ते किती सत्य/असत्य याची चर्चा होऊ शकते. पण पर्यावरण आणि भारतीय लोकांच्या भावना यांची सांगड कशी आहे हे ज्या प्रकारे दाखवायचा प्रयत्न केला होता तो मला तरी पटण्यासारखा होता. महाभारता बद्दल असेच काहीसे आहे.

आणखीन एक मुद्दा असा आहे की भारतवर्षाचा इतिहास बराच मागे जातो. या काळात झालेले भौगोलिक बदल आणि हे नकाशे ग्राह्य धरायचे?


धरायचे

धनंजय यांनी या विषयावर विस्तृत प्रतिसाद दिल्याने पुन्हा तेच सांगत नाही परंतु,

भारतवर्षाचा इतिहास बराच मागे जातो. या काळात झालेले भौगोलिक बदल आणि हे नकाशे ग्राह्य धरायचे?

होय. गेल्या २-३ हजार वर्षांतील नकाशांत जर तथ्य जाणवत असेल तर ते ग्राह्य मानायला काहीच हरकत नसावी. येथे दिलेला नकाशा हा अभ्यासपूर्ण वाटतो. खाली शरद यांनी म्हटल्याप्रमाणे या काळापर्यंत पृथ्वीची स्थिती बर्‍यापैकी स्थिर आहे. पर्वत आपली जागा बदलत नाहीत. नद्यांची पात्रे बदलली तरी अरबी समुद्राला मिळणारी नदी बंगालच्या उपसागराला जाऊन मिळू लागली इतके घूमजाव होत नाही. नदी सुकू मात्र शकते. समुद्रालगतची शहरे नामशेष होऊ शकतात. भूकंपामुळे हानी पोहोचू शकते परंतु त्यामुळे संपूर्ण भूगोल उलटापालटा होत नाही. त्यामुळे ज्या भौगोलिक जागांचे संदर्भ येतात ते थोड्याफार फरकाने तेथेच आढळतात. महाभारत हे महाकाव्यच आहे म्हणजे त्यातील सर्वच तपशील खरे आहेत किंवा सर्वच तपशील खोटे आहेत असा अर्थ होत नाही. ज्याप्रमाणे एखादे कथानक मुंबईत घडत असल्यास, चर्चगेट हे दादरच्या दक्षिणेसच राहते. कथानक १००% रचलेले आणि कल्पित असले तरी भौगोलिक संदर्भ बदलले जात नाहीत त्याप्रमाणेच.

नकाशा कुठे मिळाला?

मला मी लावलेला नकाशा विकिवर मिळाला. शरद यांनी लावलेला नकाशा आणि विकिवरील नकाशा हे एकच आहेत परंतु शरद यांनी विकिवरील नकाशा प्रिंट करून लावलेला नाही हे त्यावर नसलेला ष्टांप पाहून वाटते.

तेव्हा, हा नकाशा एखाद्या पुस्तकातून घेतला असल्यास ते कोणते हे कृपया सांगावे.

नकाशा

मला असे स्मरते की शाळेत असताना आमच्या इतिहासाच्या पुस्तकात(कोणत्या इयत्तेत ते आता आठवत नाही) श्री. शरद यांनी दिलेला नकाशा बघितला होता. या नकाश्याला तसा फारसा काहीच अर्थ नाही. फक्त प्राथमिक स्वरूपाच्या कल्पना यावरून येतात. (उदा. गांधार हस्तिनापूरच्या वायव्येला असावे) या नकाशात असलेली गावे महाभारतकाली असतीलच असे सांगता येत नाही. नद्यांचे संदर्भ घेउन महाभारतात वर्णन केलेले प्रदेश कुठे असावेत याचा एक अंदाज या नकाशावरून बांधणे फक्त् शक्य होते.
चन्द्रशेखर

नकाशा

नकाशा

महाभारताबद्दलची माझी सर्व माहिती म्हणजे पहिल्या लेखात लिहल्याप्रमाणे १९०९ साली प्रसिद्ध झालेले भाषांतर व भारताचार्य चिं.वि.वैद्य यांचा उपसंहार. यात मुंबई व निलकंठ प्रतींचा उपयोग केला आहे. त्या काळी अर्थातच भांडारकर संशोधनाचे काम सुरू झाले नव्हते.श्री.वैद्यांनी त्याकाळी मिळालेल्या सर्व साधनांचा उपयोग करून ५९० पानांचा उपसंहार लिहला. माझ्यासारख्या संशोधनात गती नसलेल्यांना व संस्कृतचा तुटपुंजा (म्हणजे नगण्यच!) अभ्यास असणार्‍यांना ही एकमेव गती. नकाशा उपसंहारात दिलेला. हाच पुढे विकीत दिलेलादिसतो.
नकाशा "महाभारतकालीन भारताचा" याचा अर्थ तेंव्हा काढलेला नकाशा असा नव्हे. तुम्ही आम्ही शाळेत बघतो तो विसाव्या शतकातील भुगोलाचा नकाशा.त्यात नद्या व पर्वत आज दिसतात तसे. श्री. वैद्यांनी काय केले ? त्यांनी महाभारतातील पर्वतांचे, नद्यांचे, तीर्थांचे, राज्यांचे, राजधान्यांचे संदर्भ गोळा केले व ते या शालेय नकाशात लिहले.उपसंहारातील बारावे प्रकरण "भूगोलिक माहिती" ६० पानांचे आहे. एक लाख श्लोकांत ही माहिती निरनिराळ्या ठिकाणी विखुरलेली आहे. उदाहरण म्हणून : पांडवांची वनवासात असतांना केलेली
तीर्थयात्रा, बलरामाची सरस्वती-यात्रा, पांडवांचा व कर्णाचा दिग्विजय. अशी निरनिराळी माहिती एकत्र केली व
नकाशात दिली. अर्थात यात तृटी रहाणारच. साधी गोष्ट, पर्वत जागा बदलत नाहीत पण नद्या बदलतात.
त्यामुळे ५००० वर्षांपूर्वी यमुना आज वाहते तशीच वहात होती म्हणणे कदाचित चुकीचे असेल. १९०९ साली श्री. वैद्यांचा तसे धरून चालण्याशिवाय इलाज नव्हता. जा ठिकाणी त्यांना तृटी आढळल्या त्या ठिकाणी त्यांनी तसे प्रांजलपणे कबूलही केले आहे.
दोन गोष्टी प्रथम बघू. श्री. चाणक्य यांना हस्तिनापूर व अंग मधील अंतर जास्त वाटते. आज कोणताही नकाशा, जेथे अंतरे कि.मी.मध्ये दिली आहेत, घेऊन त्या व या नकाशाची तुलना करून, अंदाजाने का होईना, अंतरे मोजता येतील. श्री. चंद्रशेखर यांनी घेतलेली शंका रास्त नाही. नगरे, नद्या, पर्वत इत्यादींची नावे महाभारतातीलच आहेत.
आता त्याकाळी राज्यांची आखणी करून विभाग केलेले नव्हते. त्यामुळे "अंग" याचा अर्थ जिथे तो दाखवलेला आहे त्याच्या आजूबाजूचा प्रदेश असाच घेतला पाहिजे.
असो. सविस्तर माहिती किती देणार? काही विशेष बाबीत कुणाला काही पाहिजे असेल तर प्रयत्न करीन.
शरद

महाभारत

श्री. शरद यांच्यासाठी व इतर कोणास रस असेल तर हा दुवा जरूर बघा. यावरून महाभारताच्या काही जुन्या प्रती किंवा अध्याय डाउनलोड करता येणे शक्य आहे.
चन्द्रशेखर

ऐतिहासिक अणि पौराणिक भारत (जंबुद्वीप)

भारताचा 'इतिहास' गौतम बुद्धापासून सुरू होतो असे म्हटले तर वावगे ठरू नये.
(अर्थातच गौतम बुद्ध हा अवतार ठरवला गेला म्हणून तो पौराणिक होता असे सिद्ध करता येत नाही.)
पुराणे त्याकाळाच्या आगेमागे लिहिली गेली. त्यामुळे पुराणकथांमधील भूगोल ऐतिहासिक भूगोलाशी ताडून पाहणे अवघड नाही.
जय-भारत-महाभारत या चढत्या श्लोकसंख्येप्रमाणे काही ठिकाणे वाढली असतील परंतु त्यांची भौगोलिक स्थाने बदलणे शक्य नाही.
पर्यायाने बौद्धांच्या 'पाली कॅनन'मध्ये येणारे स्थलनिर्देश आणि पौराणिक कथांमध्ये - महाभारतातही - येणारे स्थलनिर्देश यांची
सांगड घातल्यास वर दिलेला नकाशा योग्य आहे असे म्हणता येईल.
श्रावस्तीला (आजचे नेपाळ) जन्मलेल्या तथागताने इंद्रप्रस्थात दोन प्रवचने दिलेली आहेत. त्याचे शिष्य अवंती आणि द्वारका अशा ठिकाणाहून आल्याचे उल्लेख आहेत.

 
^ वर