एकीकडे आड, दुसरीकडे विहिर!

फोर्थ डायमेन्शन - 18

एकीकडे आड, दुसरीकडे विहिर!
युध्दाच्या धुमश्चक्रीत शत्रुंच्या घरादारावर हल्ला करताना शत्रुच्या बायकोला ठार मारण्याचे ऑर्डर्स हवालदार मानसिंग याला मिळाले होते. हे युध्दही कुठल्याही सबळ कारणासाठी लढला जात नव्हता. शत्रूंचा धर्म वेगळा म्हणून युनिटच्या सर्वांना चेव चढला होता. वरिष्ठांच्या ऑर्डर्सचे पालन न करणाऱ्यास कोर्ट मार्शलचे सोपस्कार न करताच जिवेनिशी मारले जाईल अशी तंबी दिली होती. हवालदार मानसिंगला हे एक भयंकर कृत्य असून ते करणे योग्य वाटत नव्हते. शत्रूची बायको एक निरपराध व्यक्ती होती. केवळ तिचा आणि माझा धर्म वेगवेगळा आहे म्हणून तिला ठार मारणे अन्यायकारक ठरेल असे त्याला वाटत होते. वरिष्ठांची अशा प्रकारची आज्ञा पाळणे हा युध्दगुन्हा आहे अशी त्याची खात्री होती. युध्दगुन्हा ठरविण्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला जिवंत राहून लढा द्यावा लागेल. मात्र हा रक्तपिपासू मेजर त्याला जिवंत ठेवेल याचीच त्याला खात्री नव्हती.
ऑर्डर्स पाळण्याव्यतिरिक्त त्याच्यापुढे दुसरा कुठलाही पर्याय नव्हता. जर त्या स्त्रीला हवालदार मानसिंग यानी न मारता तसेच जिवंत सोडून दिल्यास त्यालाच इतरांनी गोळी घालून ठार मारले असते. कुठल्या कारणासाठी त्याला मारले याचा थांगपत्ताही कुणाला लागला नसता. शिवाय त्याच्या मृत्युपश्चात या बाईचे काय हाल झाले असते - सामूहिक बलात्कार, छळ व शेवटी दुर्मरण - या कल्पनेची पण त्याला शिसारी येत होती. त्यापेक्षा आपणच मन घट्ट करून, धैर्य एकवटून तिला गोळी घालून ठार केल्यास तिची निदान मरणयातनेतून तरी सुटका होईल, हाही विचार त्याच्या मनात घोळत होता.
जरी हा तर्क योग्य वाटत असला तरी त्याच्या मनाला अस्वस्थपणा जाणवत होता. एखाद्याचा जीव घेणे ही कल्पनाच त्या अस्वस्थतेचे मूळ होते. प्राप्त परिस्थितीचा सामना तो कसा काय करणार? त्याचा निर्णय कुठलही असो, तो एकाच वेळी योग्य व अयोग्य असणार हे मात्र नक्की!

------------ ------------ -------

आपण करत असलेल्या दुष्कृत्याचे (लंगडे!) समर्थन करण्यासाठी मी नाही केल्यास दुसरा करेल हा युक्तिवाद नेहमीच केला जातो. खरे पाहता आपल्या कृत्यांना आपणच पूर्णपणे जवाबदार असतो; इतर काय करणार याचा विचार करण्याचीसुध्दा गरज नसते. उघडयावर पडलेला मोबाइल आपण न उचलल्यास इतर कुणीतरी घेऊन जाईल म्हणून मी उचलला असे म्हणत आपण आपल्या मनाचे समाधान करून घेत असल्यास आपण चक्क चोरी करत आहोत हे कसे काय विसरू शकतो?
हवालदार मानसिंगसमोर असलेली समस्या फारच गंभीर स्वरूपाची होती. त्याने तिला ठार न मारल्यास तिची अवस्था फारच कठिण होईल, तिला मरणयातना सहन करत शेवटी मरून जावे लागेल, हालाहाल करून तिला जिवेनिशी मारले जाईल, याची त्याला शंभर टक्के खात्री होती. त्यामुळे प्राप्त परिस्थितीत तिला गोळी घालून मारणे हाच एकमेव पर्याय असून तो अत्यंत योग्यही आहे, असे विचार त्याच्या डोक्यात घोळत होते.
सामान्यपणे दुसऱ्याचे नुकसान न केल्यास किंवा कुठल्याही प्रकारची इजा न करता काम करत असल्यास त्याला नैतिक असे म्हटले जाते. मानसिंगला नीतीने वागावे असे अगदी मनापासून वाटते. शत्रू स्वत:हून हल्ला केल्यामुळे त्याला ठार मारणे हे त्याच्या नैतिकतेत बसते. कारण त्यानी पत्करलेल्या या सैनिकी पेश्यात हेच अपेक्षित आहे. परंतु काही कारण नसताना शत्रुच्या बायका-मुलांना मारणे हे त्याच्या दृष्टीने अनैतिक असते. मात्र स्वत:चा जीव वाचविणे व त्या स्त्रीला जास्त दु:ख न देता ठार मारणे हा एकमेव पर्याय उपलब्ध असला तरी तो नीतीला अनुसरून असणार नाही, यामुळे तो अस्वस्थ आहे. कुणाचा तरी जीव घेणे हा तर्क केव्हाही नैतिक नसणार!
अजून एक पर्याय या चर्चेमधून सुचण्याची शक्यता आहे. तिलाही मारणे व तिला मारल्यानंतर प्रायश्चित्त म्हणून स्वत:लाही मारून घेणे. परंतु चिकित्सक विचार प्रयोगात आपण अशा वेगवेगळया पर्यांयाचा विचार करत नसतो. या प्रयोगात मानसिंगसमोर फक्त दोन पर्याय आहेत: त्यानी तिला गोळी घालून मारून टाकावे किंवा वरिष्ठांचे ऑर्डर्स न पाळता स्वत:च मरणाला सामोरे जावे. आपल्याला आता नैतिकता व अनैतिकता याविषयी निर्णय द्यायचा असून आणखी किती पर्याय असू शकतील, व अशा पर्यायांची साधक-बाधकता काय असेल इत्यादींच्या शोधाच्या फंदात पडायचे नाही.
कित्येकांना काही वेळा योग्य कृती करणे अशक्यातली गोष्ट असेही वाटेल. कृती केली तरी अनीती व न केली तरी अनीती या कात्रीत सापडल्यामुळे परिस्थितीचा सामना कसा करावा हेच उमजत नाही. (टु बी ऑर नॉट टु बी ) अशा प्रसंगी कमीत कमी नुकसान होईल तो पर्याय निवडण्याकडे कल असतो. परंतु हा तर्कसुध्दा आपल्याला गोत्यात आणू शकेल. मानसिंग त्या बाईला गोळी घालून मारण्याचा पर्याय निवडत असल्यास आपण त्याला दोष देऊ शकणार नाही. त्याला कुठलीही शिक्षा सुनावणार नाही. जर तो गोळी मारूनसुध्दा निर्दोष सुटल्यास त्यानी केलेली कृती योग्य व नैतिक होती असेच म्हणावे लागेल. परंतु एखाद्या निरपराध्याची जाणून बुजून हत्या करणे कुठल्या नैतिकतेत बसते, याचे उत्तर देता येईल का?
कदाचित कृती वाईट परंतु हेतू चांगला अशी पळवाट यातून काढता येईल. मानसिंगने केलेली कृती वाईट होती, परंतु त्यात त्याची चूक नव्हती, असेही म्हणता येईल. हा तर्क बरोबर आहे असेही वाटू लागेल. जगाचे व्यवहार किती गुंतागुंतीचे आहेत हेही यावरून कळेल. यावरून आपण जे उघड उघड अन्यायकारक व/वा अनैतिक आहे त्याचेच समर्थन करत आहोत, याचे थोडेसे तरी भान हवे.
हा तिढा सोडवायचेच असे ठरविल्यास साधन व साध्य यांची फारकत करावी लागेल. मानसिंग यानी ऑडर्स पाळण्यास नकार द्यायला हवे होते. त्यासाठी त्याला स्वत:चा बळी द्यायची तयारी ठेवायला हवे. मानसिंग यानी त्या परक्या व अनोळख्या स्त्रीचे पुढे काय होणार याची काळजी करायची गरज नाही. मानसिंग असे करू शकल्यास त्याच्या नीती मूल्याला धक्का लागणार नाही.
परंतु नैतिकतेच्या या लुटुपुटू लढाईत त्या स्त्रीला मरणांतिक वेदना होत मरण पत्करावे लागणार त्याचे काय?

Comments

गृहीतकृत्ये

वरील उदाहरणात मानसिंग सोडून त्याच्या तुकडीतील इतर सर्व सैनिक नराधमच आहेत आणि ते पाशवी कृत्ये करणारच असे गृहीत धरले आहे. फक्त त्याला एकट्यालाच नीतीअनीतीची चाड आहे असे दुसरे गृहीतकृत्य आहे. सैनिकपेशात अशी तफावत असणार नाही असे माझे गृहीतकृत्य आहे. जगाच्या सुदैवाने बर्‍याच प्रमाणात चांगली माणसेसुद्धा असतात आणि त्यांच्या उदाहरणातून कांही प्रमाणात तरी नीतिमत्ता अद्याप मूल्यवान मानली जात आहे. मानसिंगने या उदाहरणात त्या बाईला त्याच्या मनाविरुद्ध गोळी घातली तरी त्याच्या मनात काय आहे हे इतरांना समजणार नाही. त्याने विनाकारण एका बाईची हत्या केली असेच समजले जाईल आणि जर तो एक चांगला माणूस आहे अशी त्याची प्रतिमा असेल तर त्याने योग्य तेच केले असे मानून त्याचे अनुकरणसुद्धा होत राहणे शक्य आहे. त्यामुळे माझ्या मते तरी

मानसिंग यानी ऑडर्स पाळण्यास नकार द्यायला हवे होते. त्यासाठी त्याला स्वत:चा बळी द्यायची तयारी ठेवायला हवे. मानसिंग यानी त्या परक्या व अनोळख्या स्त्रीचे पुढे काय होणार याची काळजी करायची गरज नाही. कदाचित त्याच्या बलिदानामुळे इतरांचे डोळे उघडू शकतात.

अर्थातच जर त्याला नीतीमत्ता आपल्या प्राणांपेक्षा अधिक मोलाची वाटत असली तर. असे मानणारे महात्मे फारच विरळा सापडतात ही वस्तुस्थिती (किंवा आणखी एक गृहीतकृत्य) आहे.

सहमत

मानसिंग यानी ऑडर्स पाळण्यास नकार द्यायला हवे होते. त्यासाठी त्याला स्वत:चा बळी द्यायची तयारी ठेवायला हवे. मानसिंग यानी त्या परक्या व अनोळख्या स्त्रीचे पुढे काय होणार याची काळजी करायची गरज नाही.

या निष्कर्षाशी तंतोतंत सहमत आहे.

मात्र, 'मानसिंगने या उदाहरणात त्या बाईला त्याच्या मनाविरुद्ध गोळी घातली तरी त्याच्या मनात काय आहे हे इतरांना समजणार नाही. त्याने विनाकारण एका बाईची हत्या केली असेच समजले जाईल' किंवा 'कदाचित त्याच्या बलिदानामुळे इतरांचे डोळे उघडू शकतात' या बाबींना या संदर्भात महत्त्व नाही असे वाटते.

जे कृत्य अनैतिक आहे असे मानसिंगची सदसद्विवेकबुद्धी त्याला सांगते, ते कृत्य न करणे हे त्याचे प्रथम नैतिक कर्तव्य आहे. त्यापुढे मग 'कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन|' (संस्कृत शुद्धलेखनाची चूभूद्याघ्या.)

(हे थोडेसे 'First, Do No Harm.' या प्राथमिक वैद्यकीय तत्त्वाशी समांतर आहे, असे वाटते. पुन्हा चूभूद्याघ्या.)

या चौकटीत राहून याहून अधिक काही करून त्या स्त्रीस (जिवाच्या आणि शीलाच्या हानीपासून) वाचवण्याकरिता काही कृती करणे शक्य आहे का, हा पुढचा प्रश्न. अशी कृती शक्य असल्यास (उदाहरणादाखल, त्या स्त्रीस पलायनास मदत करणे आणि तिने कोठे पलायन केले हे माहीत असल्यास प्रसंगी छळास किंवा मृत्यूस सामोरे जाण्याची तयारी ठेवून जोपर्यंत वरिष्ठ किंवा सहसैनिक तेथे तिला हानी पोहोचवू शकणार नाहीत याची खात्री नाही किमान तोपर्यंत त्या स्थळाचा वरिष्ठांस किंवा सहसैनिकांस थांगपत्ता लागू न देणे.) आणि ती अनुसरणे असल्यास, त्या प्रसंगी अशा अधिकच्या कृतीच्या तपशिलांच्या नैतिकतेचा वेगळा विचार करता येईल. परंतु तो पूर्णपणे वेगळा प्रश्न झाला.

(येथे एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे, या ठिकाणी मानसिंगचे नैतिक कर्तव्य प्राथमिकतः अनैतिक आज्ञांचे पालन न करणे हे आहे; अशी आज्ञा देणार्‍या वरिष्ठांशी त्या आज्ञेच्या नैतिकतेबद्दल चर्चा करणे किंवा वाद किंवा हुज्जत घालणे किंवा त्या वरिष्ठांचे किंवा सहसैनिकांचे मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न करणे हे नव्हे. कोणालाही कळू न देता आज्ञेचे पालन न करता त्या स्त्रीस काही करून वाचवणे यदाकदाचित शक्य असेल, तर तेवढे करणे पुरे आहे.)

मात्र, काही करून त्या स्त्रीस वाचवणे जर शक्य नसेल, तरीही त्या परिस्थितीत 'मी तिला मारले नाही, तर माझे वरिष्ठ किंवा सहसैनिक तिला मारतील, आणि कदाचित अधिक हालहाल करून मारतील, म्हणून मीच तिला मारतो' हा तर्क फोल वाटतो. यावरून एक काहीसा समांतर किस्सा आठवतो. (Well, कदाचित अगदी शंभर टक्के समांतर म्हणता येणार नाही, परंतु या तर्काचा फोलपणा दाखवण्याकरिता पुरेसा समांतर आहे, असे वाटते. चूभूद्याघ्या.)

एकदा एक सांख्यिकीचे प्रोफेसरमहाशय असतात. त्यांना विमानप्रवासाची फार भीती वाटत असते. आपण प्रवास करीत असलेल्या विमानात नेमका कोणीतरी दहशतवादी बाँब घेऊन येईल आणि विमानात स्फोट घडवून आणेल, अशा प्रकारची ती भीती असते. त्यामुळे ते काहीही करून विमानप्रवास टाळत असतात. कधी जर दूरदेशी सांख्यिकीची एखादी महत्त्वपूर्ण परिषद असेल, तरी 'तेथे विमानाने जावे लागेल' या कारणास्तव हजेरी लावण्याचे टाळतात आणि घरी बसून राहतात.

एकदा अशाच एका परिषदेत त्यांना पाहून त्यांचे या क्षेत्रातील मित्र चकित होतात. पैकी एकजण त्यांना मध्यंतरात गाठून त्यांच्या मनपरिवर्तनाचे रहस्य विचारतो.

'त्याचे असे झाले, मी खूप विचार केला, की मला भीती नेमकी कशाची आणि का वाटते. थोडे गणित करून पाहिल्यावर असे लक्षात आले, की मला ज्या विमानातून प्रवास करावा लागणार होता, त्या विमानात कोणी बाँब घेऊन येण्याची शक्यता दहा हजारात एक, म्हणजे ०.०००१ इतकी आहे. आणि ही शक्यता मला खूपच मोठी वाटते, आणि म्हणून मला भीती वाटते.'

'बरे मग?'

'मग मी असा विचार केला, की त्या विमानात कोणी दोघेजण प्रत्येकी एक म्हणजे एकूण दोन बाँब घेऊन येण्याची शक्यता किती आहे. तर लक्षात आले, की ती शक्यता ०.०००१ गुणिले ०.०००१, म्हणजे ०.०००००००१ अर्थात दहा कोटीत एक इतकी आहे. माझ्या लेखी ही शक्यता एवढी मोठी नाही, बर्‍यापैकी नगण्य आहे. तेवढा धोका मी पत्करू शकतो.'

'मग?'

'मग काही नाही. येताना मी माझा बाँब बरोबर घेऊन आलो.'

असो.

(अतिअवांतर: वरील 'समांतर' किश्श्यातील सांख्यिकीच्या दृष्टिकोनातून तार्किक चूक शोधण्याचा प्रयत्न करा.)

अतिअवांतर

ती शक्यता ०.०००१ गुणिले ०.०००१, म्हणजे ०.०००००००१ अर्थात दहा कोटीत एक इतकी आहे.

यावरून दोन भिन्न व्यक्तिंनी बाँब घेऊन येणे या स्वतंत्र घटना आहेत. प्राध्यापक एका (स्वतःने न आणलेल्या) बाँबच्या असण्याला घाबरतात. त्यांनी स्वतः बाँब आणल्याने दुसर्‍या व्यक्तिने बाँब आणण्याच्या शक्यतेवर काहीच परिणाम होत नाही (स्वतंत्रता). थोडक्यात हे प्राध्यापक सांख्यिकी या विषयाचे प्राध्यापक नसून अकाउंटिंग या विषयाचे प्राध्यापक असण्याची शक्यता वाटत आहे.

मी नाही केल्यास दुसरा करेल हा युक्तिवाद नेहमीच केला जातो

मूळ लेखातील शक्यताहीन वास्तवामुळे आणि वरील वाक्य वाचल्याने चूक शोधण्याचा प्रयत्न केला आहे.

तो मुद्दा नसावा / उत्तर / मूळ प्रश्नाचे अधिक विवेचन

प्रोफेसरमहाशयांनी बाँब आणणे आणि दुसर्‍या एखाद्या प्रवाशाने(सुद्धा) बाँब आणणे या दोन स्वतंत्र घटना आहेत, हे मान्य. परंतु प्रस्तुत तर्कातील ही त्रुटी नाही.

किंबहुना, या दोन घटना स्वतंत्र आहेत म्हणूनच त्यांची संयुक्त शक्यता ही दोन्ही घटनांच्या स्वतंत्र शक्यतांच्या गुणाकाराच्या स्वरूपात मांडता यावी. नाहीतर यांपैकी दुसर्‍या घटनेवर अवलंबून नसलेल्या घटनेची स्वतंत्र शक्यता आणि पहिल्या घटनेवर अवलंबून असलेल्या घटनेची सशर्त शक्यता (conditional probability अशा अर्थी; याहून चांगली मराठी संज्ञा सुचली नाही.) यांचा गुणाकार मांडावा लागला असता.

(जर A आणि B या घटना स्वतंत्र नसून A या घटनेच्या निर्णयनिश्चितीने B या घटनेच्या शक्याशक्यतेवर फरक पडत असेल, तर A आणि B यांची संयुक्त शक्यता

P(A,B) = P(A) * P(B|A)

या सूत्राने मिळते. या सूत्रात P(A,B) ही A आणि B या घटनांची संयुक्त शक्यता असून, P(A) आणि P(B) या अनुक्रमे A आणि B या घटनांच्या स्वतंत्र शक्यता आहेत. तसेच, P(B|A) ही संज्ञा A ही घटना निश्चितपणे घडल्याचे माहीत असता B ही घटना घडण्याची सशर्त शक्यता दर्शवते.

मात्र A आणि B या जर दोन स्वतंत्र, परस्परांवर अवलंबून नसलेल्या घटना असतील, तर त्या परिस्थितीत

P(B|A) = P(B)

हेही सत्य असल्याने,

P(A,B) = P(A) * P(B)

या सूत्राने A आणि B या घटनांची संयुक्त शक्यता मिळते.

अधिक माहिती येथे आणि येथे.)

त्यामुळे तर्काचा हा भाग बरोबर आहे.

(डिस्क्लेमर: इतर सर्व विषयांप्रमाणे सांख्यिकीच्या तासालाही वर्गात झोपा काढल्याने - आणि अनेकदा वर्गापर्यंत जाण्याचेही कष्ट न घेता वसतिगृहाच्या खोलीवर झोपा काढल्याने - या प्रतिसादातील बरेचसे मुद्दे हे परीक्षेस्तव नाइलाजाने काठावर पास होण्याइतपत घोटून अर्धवट लक्षात राहिलेल्या अतिप्राथमिक फंड्यांच्या आणि विकिपीडियावर त्यांना शोधशोधून मिळवलेल्या पुष्टीच्या आधारावर फेकत आहे. सांख्यिकी फंड्यांच्या आणि तर्काच्याही प्रचंड आणि मुबलक चुका असू शकतील. त्या सापडल्यास त्यांबद्दल जरूर जाहीर झोडावे; त्याने विचारपद्धतीतील त्रुटी समजतील आणि आयुष्यात उशिरा का होईना, पण फंडे पक्के होण्यास मदत होईल. आभारी आहे.)

(अतिअवांतर: वर्गात -किमानपक्षी मनाने - कधीही उपस्थित न राहिल्याने आमचे प्रोफेसरमहाशय नेमके सांख्यिकी या विषयाचे होते, की अकाउंटिंग या विषयाचे, की अन्य कोणत्या विषयाचे, ते कळू शकले नाही. तसेही अकाउंटिंग या विषयाचे असल्यास त्या विषयाच्या प्राध्यापकांबद्दल विशेष अनादर बाळगण्याचे काही कारण मला तरी दिसले नाही. असो.)

मग आता तर्कात नेमकी चूक कोठे आहे हे शोधण्याचा प्रयत्न करू.

सर्वप्रथम, एक गृहीतक: कोणत्याही एका प्रवाशाने विमानात बाँब आणण्याची शक्यता प्रोफेसरमहाशयांनी ०.०००१ अशी कोणत्या गणिताच्या आधारे ठरवली, याबद्दल आपल्याला कल्पना नाही. ते गणित बरोबर आहे, असे गृहीत धरू.

एकदा हे गृहीतक मानले, की मग कोणत्याही दोन प्रवाशांनी विमानात (प्रत्येकी एक असे) दोन बाँब आणण्याची शक्यता ही ०.०००१ गुणिले ०.०००१, हे तर्कास धरून आहे. यात कोणतीही चूक नाही.

इथवर सर्व ठीक. (So far, so good.)

मात्र, हे सर्व जोपर्यंत कोणत्याही प्रवाशाने बाँब आणलेला असणे अथवा नसणे याबद्दल आपल्याला निश्चित माहिती नाही, आणि माहितीअभावी शक्याशक्यतेच्या भाषेतच आहे, तोपर्यंतच लागू आहे. कोणत्याही एका प्रवाशाने किंवा एकाहून अधिक प्रवाशांनी बाँब आणलेला आहे, अशी माहिती जर उपलब्ध असली, तर सर्व गणित बदलते.

प्रोफेसरमहाशयांनी निश्चितपणे बाँब आणलेला आहे हे एकदा माहीत झाले (आणि प्रोफेसरमहाशयांना हे माहीत आहे!), की किमानपक्षी एका प्रवाशाने बाँब आणण्याची शक्यता ०.०००१ न राहता १ होते. त्यामुळे, त्या परिस्थितीत दोन प्रवाशांनी विमानात बाँब आणण्याची शक्यता ही ०.०००१ गुणिले ०.०००१ न राहता १ गुणिले ०.०००१ होते, अर्थात ०.०००१ होते. (त्याचप्रमाणे, प्रोफेसरमहाशयांनी आणि त्यांच्या त्याच विमानातून प्रवास करणार्‍या सहकार्‍याने संगनमताने ठरवून प्रत्येकी एकएक असे दोन बाँब आणले, तर हे (किमानपक्षी प्रोफेसरमहाशयांना) निश्चितपणे माहिती असल्याकारणाने दोन प्रवाशांनी विमानात बाँब आणण्याची शक्यता ०.०००१ गुणिले ०.०००१ न राहता १ गुणिले १, अर्थात १ म्हणजेच शंभर टक्के होते.)

मानसिंगाच्या वरील उदाहरणाबाबत असेच काहीसे म्हणता येईल. मानसिंगाव्यतिरिक्त इतर सर्व सैनिक हे धर्मांध पापी आहेत, असे मानसिंगास वाटते. म्हणून ते संधी मिळाल्यास (म्हणजेच येथे सशर्त शक्यता आली.) त्या स्त्रीच्या जिवास किंवा शीलास इजा पोहोचवणार नाहीत याची शक्यता अगदी कमी, उदाहरणादाखल ०.०००१ आहे, असे मानू. उलटपक्षी मानसिंग हा त्याच्या स्वतःच्या नजरेत सद्गुणांचा पुतळा असल्याकारणाने तो त्या स्त्रीच्या जिवास किंवा शीलास इजा पोहोचवणार नाही याची शक्यता त्याच्या दृष्टीने १ आहे. त्याने त्या स्त्रीस न मारल्यासच (पक्षी: तिला इजा न पोहोचवल्यासच) इतरांना इजा पोहोचवण्याची संधी मिळणार असल्याने, त्याने इजा न पोहोचवल्यानंतर इतरांनीही इजा न पोहोचवण्याची सशर्त शक्यता ही ०.०००१ आहे, आणि म्हणूनच त्या स्त्रीस कोणाकडूनही इजा न पोहोचण्याची संयुक्त शक्यता ही १ गुणिले ०.०००१ म्हणजे ०.०००१ आहे, आणि ही शक्यता खूपच कमी आहे. इथवर ठीक.

मानसिंग हा ०.०००१चा घटक वाढवून १ बनवण्याचा प्रयत्न करत आहे. अर्थात, इतर सैनिकांनी त्या स्त्रीच्या जिवास किंवा शीलास इजा न पोहोचवण्याची जी ०.०००१ म्हणजे खूपच कमी सशर्त शक्यता आहे, ती वाढवून १ म्हणजे शंभर टक्के करण्याचा त्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी तिला अशी इजा पोहोचवण्याची संधी इतर सैनिकांस मिळू न देणे ही त्याची स्ट्रॅटेजी आहे. मानसिंगाने तिला मारले, तर इतरांस तिला इजा पोहोचवण्याची संधी न मिळाल्याने इतर सैनिक त्या स्त्रीस इजा पोहोचवणार नाहीत याची सशर्त शक्यता (जी पूर्वी ०.०००१ होती) आता १ म्हणजेच शंभर टक्के होते. म्हणून तिला मारावे, असा त्याचा बेत आहे. (शिवाय वरिष्ठांचेही अनायासे आज्ञापालन होते, आणि मानसिंगाचा जीव वाचतो, हा मुद्दा तूर्तास बाजूस ठेवू. मानसिंग हा न्यायाची चाड बाळगणारा असल्याने त्याच्या मनास असा स्वार्थी विचार शिवणारही नाही; या बाबीत केवळ कोणती कृती नीतीस धरून होईल एवढे ठरवून ती कृती अमलात आणण्याइतपत अकॅडेमिक इंटरेस्ट त्यास आहे, कोणताही वैयक्तिक रस नाही, असे मानू.)

मात्र, त्या स्त्रीस इतरांकडून इजा न पोहोचण्याची शक्यता ही १ म्हणजेच शंभर टक्के बनवण्याच्या भानगडीत, मानसिंगाकडून तिच्या जीवास (किंवा शीलास) इजा न पोहोचण्याची शक्यता १ (म्हणजेच शंभर टक्के) न राहता ० (शून्य) बनते, आणि परिणामी त्या स्त्रीस कोणाकडूनही इजा न पोहोचण्याची संयुक्त शक्यता ही ० गुणिले १ म्हणजेच ० (शून्य) बनते, हे तो विसरतो!

ही सर्व तार्किक गडबड या प्रश्नाकडे मानसिंगाच्या (संभ्रमित) दृष्टिकोनातून पाहिल्यामुळे आहे. त्याऐवजी थोडेसे त्या स्त्रीच्या दृष्टिकोनातून पाहिल्यास उलगडा होईल, असे वाटते.

त्या स्त्रीच्या दृष्टिकोनातून, ती मानसिंगाकडून मारली जाणे किंवा इतर सैनिकांकडून मारली जाणे याची निवड फोल ठरेल. जोपर्यंत वाचणे आणि मारले जाणे यांमध्ये निवड नाही, तोपर्यंत उपलब्ध पर्यायांनी तिला फारसा फरक पडू नये. (मानसिंगाने तिला मारल्यास तिच्यावर शारीरिक अत्याचार होणार नाहीत, उलटपक्षी इतरांच्या तावडीत सापडल्यास तिच्यावर मृत्यूबरोबर शारीरिक अत्याचारही ठरलेलेच आहेत किंवा अत्याचारांची शक्यता खूपच अधिक आहे, असे इतर सैनिकांबद्दलच्या वैयक्तिक मतावरून मानसिंगास वाटते; परंतु त्या स्त्रीस हे माहीत नाही. त्यामुळे तिच्या दृष्टिकोनातून तिला कोणीही मारले तरी ते सारखेच वाईट. (मानसिंगही तिच्यावर मारण्यापूर्वी - किंवा मारल्यानंतर - शारीरिक अत्याचार करणार नाही, हे तिने कशाच्या आधारावर समजावे? आणि मेल्यानंतर 'नाही बाबा, त्या मानसिंगाने मारण्यापूर्वी माझे हाल नाही होऊ दिले' असे समाधान तिने मानण्यासाठी भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुतः?) केवळ वाचणे आणि मरणे हे तिच्या लेखी अनुक्रमे चांगले आणि वाईट ठरतील; याव्यतिरिक्त उपलब्ध पर्यायांमधील सर्व फरक तिच्या दृष्टीने फोल ठरतील.)

(दुसरे म्हणजे, इतर सैनिकांच्या तावडीत सापडली असता जमेल तितका प्रतिकार करून अतिप्रसंग टाळण्याचा आणि जीव वाचवण्याचा किमान प्रयत्न ती स्त्री करू शकणार नाही का? असा प्रतिकार कितीही कठीण आणि फोल ठरण्याच्या सीमारेषेवरील असू शकला तरी? मग अशा परिस्थितीत केवळ मानसिंग तिला वाचवण्यास असमर्थ आहे या कारणास्तव तिला अगोदरच मारून टाकून - आणि पर्यायाने प्रतिकाराची शक्यता नाकारून - मानसिंग तिच्यावर नेमका कोणता उपकार करीत आहे? की तिला जर कोणी वाचवू शकत असेल तर तो केवळ मानसिंगच आहे, अन्यथा तिला कोणीही वाचवू शकत नाही, असा काहीसा मानसिंगला - कदाचित काहीसा macho आणि sexist - गंड आहे? एवढेच पर्याय आहेत आणि आपल्या कृतीला पर्याय नाही हे ठरवणारा तो नेमका कोण?)

त्यामुळे, 'त्या स्त्रीस मारून आपण तिला वाचवले' असा जर मानसिंगाचा समज असेल, तर तो केवळ स्वतःची फसवणूक करत नसून एक गैरकृत्य करून वर त्यासाठी स्वतःलाच एक अत्यंत विकृत (किंवा किमानपक्षी अतिशय अप्रामाणिक) समर्थन देत आहे, असे वाटते. अनैतिक आज्ञेचे पालन करणे किंवा न करणे एवढे दोनच पर्याय त्याला उपलब्ध आहेत. पैकी पहिला पर्याय हा सरळसरळ अनैतिक आहे परंतु त्यात त्याच्या जिवास धोका नाही, तर दुसरा पर्याय हा नैतिकदृष्ट्या रास्त आहे, परंतु त्यात त्याच्या जिवास तो तो पर्याय उघडपणे अमलात आणतो की छुप्या रीतीने यावर अवलंबून कमीअधिक धोका उद्भवू शकतो.

जिवाच्या भीतीने मानसिंगाने यांपैकी पहिला पर्याय स्वीकारल्यास ते पुढे न्यायालयात बचाव म्हणून ग्राह्य होणारही नाही कदाचित, परंतु मानसिकतेच्या दृष्टिकोनातून ते एक वेळ समजून घेता येईल. परंतु त्यावर 'त्यातून आपण तिचा त्रास वाचवून तिला मदत केली' अशी मखलाशी करून स्वतःचीच पाठ थोपटून घेणे ही एक गलिच्छ पळवाट आहे, असे वाटते. (यात त्याचा हेतू चांगला होता असा त्याचा दावा असू शकेल, परंतु जेथे The road to hell is paved with good intentions, तेथे त्याचे काय?)

आणि तसेही, त्या स्त्रीवर 'उपकार करण्याच्या' नैतिक परिस्थितीत मानसिंग आहे का? एक गोष्ट आठवते. बहुधा पंचतंत्रातली किंवा हितोपदेशातली. स्रोत नक्की आठवत नाही.

दोन व्यापारी असतात. एकमेकांचे मित्र असतात. व्यापाराच्या वस्तू आणि धन बरोबर घेऊन एकत्र प्रवासाला निघतात.

वाटेत जंगल लागते. जंगलात दरोडेखोर अडवतात. "Your Money, Or Your Life!" असे त्या काळी जी कोणती भाषा प्रचलित होती, त्या भाषेत म्हणतात.

लगेच एक मित्र दुसर्‍यास म्हणतो, "मागच्या महिन्यात मी तुझ्याकडून दोन हजार रुपये (किंवा त्या काळी जे कोणते चलन वापरात होते ते) उसने घेतले होते, आठवते? हे घे तुझे दोन हजार रुपये परत. आता मी तुला काहीही देणे लागत नाही."

गोष्ट संपली.

हा व्यवहार वैध आहे काय? तर नाही. कारण एकदा दरोडेखोर धन लुटणार (आणि ते वाचवणे शक्य नाही) हे निश्चित झाले, की ते धन त्या व्यापार्‍याच्या ताब्यात राहिले नाही. आणि जे धन त्याच्या ताब्यात नाही आणि ताब्यात येण्याची शक्यता नाही, ते धन 'त्याचे' नाही; त्या धनाच्या आधारे तो कोणताही आर्थिक व्यवहार पूर्ण करू शकत नाही.

मानसिंगाची परिस्थिती काहीशी अशीच आहे. त्या स्त्रीस 'मदत करण्या'करिता किंवा तिच्यावर 'उपकार करण्या'करिता आवश्यक ती मुक्त इच्छाशक्ती (Free Will चे दुबळे भाषांतर) सद्यपरिस्थितीत मानसिंगाजवळ नाही. अनैतिक हुकुमाची अंमलबजावणी करायची की नाही हा त्याच्यासमोरील साधा प्रश्न आहे. त्याचाही निवाडा मुक्तपणे, मुक्त इच्छाशक्तीच्या प्रभावाखाली तो करू शकत नाही; त्याच्यातही त्यास योग्य वाटणारी कृती केल्यास किंवा अयोग्य वाटणारी कृती न केल्यास जीव गमावण्याची भीती आहे, दडपण आहे. अशा परिस्थितीत त्या स्त्रीचा 'भाग्यविधाता' बनू पाहण्याची त्याची जागा नाही, तशी त्याची परिस्थिती नाही, ती luxury त्यास उपलब्ध नाही, त्यासाठी लागणारे आवश्यक ते धन किंवा चलन - मुक्त इच्छाशक्ती - त्याच्या ताब्यात नाही. त्यामुळे तो हा व्यवहार पूर्ण करू शकत नाही; त्या व्यवहारात त्याने पडू नये. त्या व्यवहारात तो पडल्यास असा व्यवहार वैध राहणार नाही. त्यामुळे त्याने या व्यवहारात पडणे हे केवळ फाटे फोडणे, आणि (दडपणापोटी का होईना, पण) स्वतः घेतलेल्या चुकीच्या निर्णयाचे अयोग्य आणि लंगडे समर्थन ठरेल, असे वाटते.

हाही मुद्दा नसावा

प्रोफेसरमहाशयांनी बाँब आणणे आणि दुसर्‍या एखाद्या प्रवाशाने(सुद्धा) बाँब आणणे या दोन स्वतंत्र घटना आहेत, हे मान्य. परंतु प्रस्तुत तर्कातील ही त्रुटी नाही.

ही त्रुटी आहे असे प्रतिसादात लिहिल्याचे दिसत नाही. प्रतिसादातील त्रुटी कमी शब्दात सांगितल्याने आपला गैरसमज झाला असावा. आपण दिलेल्या माहितीवरुन दोन व्यक्तिंनी बाँब घेऊन येणे या स्वतंत्र घटना आहेत असे लक्षात आले. तेव्हा P(AUB) आणि P(AB) या दोन शक्यतांना एकच समजणे ही त्रुटी आहे, असे सांगण्याचा प्रयत्न होता. पण तो प्रयत्न अयशस्वी ठरला असे दिसते. असो. (आपल्या नोटेशन्स मध्ये (A,B) म्हणजे ए इंटरसेक्शन बी आहे का? कारण त्यासाठी (AB) असे लिहिण्याचा प्रघात आहे (पण हा प्रघात फक्त शक्यता लिहितानाच वापरलेला पाहण्यात आहे चूभूदेघे (इंटरसेक्शनचे चिन्ह टंकण्याचा कंटाळा केला तर (असे असले तरीही आपण कुठली चिन्हे वापरावी हे ठरवण्याचा अधिकार आपलाच आहे (फक्त आधी त्यांची व्याख्या दिल्याने वाचकाची सोय होते (पण अशी सोय न करणे हे एकप्रकारे योग्यच नव्हे काय? कारण वाचकास गरज असल्यास तो झकत चिन्हांचा अर्थ लावतोच त्यामुळे आकलन अधिक दृढ होत असावे)))))).

नोटेशनबद्दल / युनियनच्या शक्यतेचा संबंध समजला नाही

(आपल्या नोटेशन्स मध्ये (A,B) म्हणजे ए इंटरसेक्शन बी आहे का? कारण त्यासाठी (AB) असे लिहिण्याचा प्रघात आहे (पण हा प्रघात फक्त शक्यता लिहितानाच वापरलेला पाहण्यात आहे चूभूदेघे (इंटरसेक्शनचे चिन्ह टंकण्याचा कंटाळा केला तर (असे असले तरीही आपण कुठली चिन्हे वापरावी हे ठरवण्याचा अधिकार आपलाच आहे (फक्त आधी त्यांची व्याख्या दिल्याने वाचकाची सोय होते (पण अशी सोय न करणे हे एकप्रकारे योग्यच नव्हे काय? कारण वाचकास गरज असल्यास तो झकत चिन्हांचा अर्थ लावतोच त्यामुळे आकलन अधिक दृढ होत असावे)))))).

इंटरसेक्शनचे चिन्ह टंकण्याचा कंटाळा केला खरा. परंतु त्याऐवजी P(A,B) असे पर्यायी नोटेशन उपरनिर्दिष्ट विकीदुव्यावरच सापडले, ते फारसा विचार न करता जसेच्या तसे वापरले, आणि ते प्रघातास धरून आहे की नाही याबद्दल स्वतंत्र तपास केला नाही, इतकेच.

तेव्हा P(AUB) आणि P(AB) या दोन शक्यतांना एकच समजणे ही त्रुटी आहे, असे सांगण्याचा प्रयत्न होता.

प्रस्तुत उदाहरणाच्या संदर्भात P(AUB)चा संबंध कळला नाही. कोणत्याही एका प्रवाशाने (उदा. प्रोफेसरमहाशयांनी) विमानात बाँब आणणे किंवा कोणत्याही दुसर्‍या एखाद्या प्रवाशाने विमानात बाँब आणणे (यात किंवा दोन्ही ही शक्यता अंतर्भूत आहे. थोडक्यात, इन्क्लूज्झिव ऑर.) या शक्यतेचा संबंध प्रस्तुत उदाहरणात असा नेमका कोठे येतो, की ज्यायोगे तो इंटरसेक्शनच्या शक्यतेसमान (चुकून) मानला जावा?

असो.

पुन्हा एकदा

आपण दिलेले उदाहरण पहिल्यापासून पाहू.

आपण प्रवास करीत असलेल्या विमानात नेमका कोणीतरी दहशतवादी बाँब घेऊन येईल आणि विमानात स्फोट घडवून आणेल, अशा प्रकारची ती भीती असते.

म्हणजे विमानात स्वतः सोडून कमीत कमी एका व्यक्तिने बाँब आणला तर प्रोफेसरसाहेबांना भीती वाटते (एक व्यक्ति एकच बाँब आणू शकते आणि विमानात दोनच लोक बसू शकतात* असे गृहीत धरू).

आता दोन बाँबच्या संदर्भात काही घटना ठरवू.
A : विमानातील क्ष व्यक्तिने बाँब आणणे
B : विमानातील य व्यक्तिने बाँब आणणे
येथे क्ष आणि य या भिन्न व्यक्ति आहेत.

P(स्फोट होणे)=P(AUB)=P(A)+P(B)-P(AB)
................
प्रोफेसर महाशय भीती कमी होण्याचे कारण सांगतांना पुढील विचार करतात : "मग मी असा विचार केला, की त्या विमानात कोणी दोघेजण प्रत्येकी एक म्हणजे एकूण दोन बाँब घेऊन येण्याची शक्यता किती आहे"

म्हणजे त्यांच्या मताप्रमाणे
P(स्फोट होणे)=P(AB)

अर्थात मी वर म्हणाल्याप्रमाणे ते "P(AUB) आणि P(AB) या दोन शक्यतांना एकच समजणे" ही चूक करतात.
...............

परंतु त्याऐवजी P(A,B) असे पर्यायी नोटेशन उपरनिर्दिष्ट विकीदुव्यावरच सापडले

मी आधी विकि दुवे पाहीले नव्हते. पण आता मात्र P(A,B) हे बराच शोध घेऊनही सापडले नाही.

*येथे बर्‍याच गोष्टी गृहीत धरल्या आहेत. उदा. दोन प्रवासी आणि पायलट विमानात बसू शकतात किंवा दोन प्रवाशांपैकी एकाला विमान चालवता येते किंवा दोघांनाही विमान चालवता येते. तसेच विमानात बाँब नुसता आणला तरी स्फोट होतो वगैरे.

आले लक्षात! / दुवा

आता दोन बाँबच्या संदर्भात काही घटना ठरवू.
A : विमानातील क्ष व्यक्तिने बाँब आणणे
B : विमानातील य व्यक्तिने बाँब आणणे
येथे क्ष आणि य या भिन्न व्यक्ति आहेत.

P(स्फोट होणे)=P(AUB)=P(A)+P(B)-P(AB)

स्फोट होण्यासाठी कोणत्याही एका प्रवाशाने बाँब आणणे (दोन प्रवाशांच्या बाबतीत AUB, तीन प्रवाशांच्या बाबतीत AUBUC वगैरे) पुरेसे आहे; एका विशिष्ट प्रवाशाने आणण्याची (A specifically किंवा B specifically किंवा तीन प्रवाशांच्या बाबतीत C specificallyसुद्धा वगैरे) आवश्यकता नाही.

ही 'कोणत्याही एका प्रवाशाने बाँब आणण्याची शक्यता' प्रोफेसरमहाशयांच्या गणितानुसार ०.०००१ आहे. मात्र ही शक्यता म्हणजे P(A) किंवा P(B) किंवा तीन प्रवाशांच्या बाबतीत P(C)सुद्धा नसून, P(AUB) - किंवा तीन प्रवाशांच्या बाबतीत P(AUBUC) - आहे.

आणि या 'कोणत्याही एका प्रवाशाने बाँब आणण्याच्या शक्यते'त (P(AUB) किंवा P(AUBUC) वगैरे) 'कोणत्याही एकाहून अधिक प्रवाशांनी बाँब आणण्याच्या विविध शक्यता' (P(AB), P(AC), P(BC), P(ABC) वगैरे) या सर्व अगोदरच अंतर्भूत आहेत. म्हणजेच, 'कोणत्याही दोन प्रवाशांनी बाँब आणण्याच्या सर्व शक्यता' (P(AB), P(AC), P(BC) वगैरे) यासुद्धा यात अगोदरच अंतर्भूत आहेत.

थोडक्यात, आपण म्हणता त्याप्रमाणे "P(AUB) आणि P(AB) या दोन शक्यतांना एकच समजण्या"चा घोळ तर झाला आहेच, शिवाय मुळात घटनांची व्याख्या करताना P(AUB) (किंवा P(AUBUC) वगैरे) या शक्यतेला P(A) (किंवा P(B) किंवा P(C) वगैरे) ही शक्यता मानण्याचीही चूक झालेली आहे. आणि ही दुसरी चूक अधिक गंभीर आहे, कारण या चुकीस पुढे रेटून अशा भ्रामक P(A) आणि P(B)चा - म्हणजे प्रत्यक्षात दोनदा P(AUB) (किंवा P(AUBUC) वगैरे)चा - गुणाकार करणे निव्वळ निरर्थक आहे.

हम्म्म्म्... परत वर्गात जाऊन बसले पाहिजे! (पण आता इतक्या उशिरा घेणार नाहीत बहुतेक!)

विचारांच्या दिशेची (मूलभूत!) चूक दर्शवून देऊन योग्य मार्गी लावण्याबद्दल आभारी आहे.

मी आधी विकि दुवे पाहीले नव्हते. पण आता मात्र P(A,B) हे बराच शोध घेऊनही सापडले नाही.

या दुव्यावरील पहिल्या परिच्छेदातील शेवटची ओळ पहावी.

मात्र, याला अन्यत्र कोठे स्वतंत्र पुष्टी मिळू शकली नाही.

आधार

मानसिंगही तिच्यावर मारण्यापूर्वी - किंवा मारल्यानंतर - शारीरिक अत्याचार करणार नाही, हे तिने कशाच्या आधारावर समजावे?

प्रस्तुत लेखात हा 'one shot' प्रश्न आहे की 'finitely repeated' प्रश्न आहे हे स्पष्ट होत नाही. कारण लेखात 'शत्रुंच्या घरादारावर' आणि 'शत्रुच्या बायकोला' हे दोन्ही शब्दप्रयोग एकाच वाक्यात आहेत. जर एकच शत्रु आणि त्याची बायको असेल तर हा 'one shot' प्रश्न आहे आणि आपले पत्नीविषयीचे विवेचन चालू शकेल. पण हे जर शत्रुपक्षातील अनेक बायकांच्या बाबतीत करायचे असेल तर हा 'finitely repeated' प्रश्न होईल. तसे झाल्यास आपण केलेले विवेचन थोडेफार अप्रस्तुत ठरण्याची शक्यता आहे. कारण नंतरच्या बायकांना मानसिंगाविषयी (आधीच्या मारलेल्या बायकांच्या उदाहरणावरून) थोडीफार कल्पना आलेली असेल.

प्रतिवादासाठी जागा राखून ठेवत आहे

(प्रतिवाद उघड आहे असे वाटते. तूर्तास व्यस्त आहे. लवकरच.)

उसे मै मेरी पत्नी घोषित करता हू!

आधी काहि मजेशीर उपायः (कृपया ह घेणे)
या फिल्मी संभ्रमावर त्याने त्या स्त्रीला आपली पत्नी घोषित करावे.. तिचा धर्मच बदलल्यावर (जर तेच तिला मारण्याचे कारण असेल तर) तिला इतर कपोलकल्पित नराधम सैनिक मारणार नाहित असा एक तद्दन फिल्मी उपाय सुचत आहे.
अधिकच फिल्मी करायचे असेल तर रक्ताने सिंदूरही भरता येईल ;)

मजेचा भाग सोडला तर मला तरी ह्या कल्पित सिच्युएशनला त्या वरिष्ठाला गोळ्या घालून त्याला वीरमरण आल्याचे बोंबलत फिरण्याशिवाय दुसरा उपाय दिसत नाहि.

ऋषिकेश
------------------
समाजातली सामाजिक जाणीवही अगदी नसल्यातच जमा आहे. सुस्त, मद्दड जनता गोळाभर अन्न गिळून, टीव्हीवरच्या मालिका बघून झोपी जात आहे - सन्जोप राव

देशद्रोह

त्या वरिष्ठाला गोळ्या घालून त्याला वीरमरण आल्याचे बोंबलत फिरण्याशिवाय दुसरा उपाय दिसत नाहि.
युद्धकाळात असे करणे हा देशद्रोह ठरेल. शिवाय त्यामुळे शत्रू प्रबळ होऊन ती चकमक जिंकेल आणि त्या सैनिकासकट सर्वांची वाट लावेल अशी शक्यता निर्माण होते. त्यामुळे सैनिकी जीवनाची सुरुवात करतांना घेतलेली एकनिष्ठा पाळण्याची शपथ पाळणे अनिवार्य ठरते. नीतीमत्तेसाठी वरिष्ठांची आज्ञा न पाळणे ही एक गोष्ट झाली. ती आज्ञा मान्य झाली नसेल तर वरिष्ठावरच शस्त्र उगारणे वेगळे. एकादे वेळी वरिष्ठच देशद्रोह करतो आहे असे दिसून आले तर त्याची खबर त्याच्या वरिष्ठांना देणे आवश्यक असते, पण वेळेअभावी ते शक्य नसेल आणि तातडीने कारवाई करणे आवश्यकच असेल तरच त्याच्यावर हल्ला करणे कदाचित क्षम्य ठरेल. असे अनेक पैलू या बाबतीत आहेत.

अटींची चौकट्

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
ही एक काल्पनिक गृहीतसमस्या(हायपोथिटिकल प्रॉब्लेम) आहे. अशा समस्येचे उत्तर दिलेल्या अटींच्या चौकटीत बसणारे हवे.श्री प्रभाकर नानावटी लिहितात;"या प्रयोगात मानसिंगसमोर फक्त दोन पर्याय आहेत: त्यानी तिला गोळी घालून मारून टाकावे किंवा वरिष्ठांचे ऑर्डर्स न पाळता स्वत:च मरणाला सामोरे जावे. आपल्याला आता नैतिकता व अनैतिकता याविषयी निर्णय द्यायचा असून आणखी किती पर्याय असू शकतील, व अशा पर्यायांची साधक-बाधकता काय असेल इत्यादींच्या शोधाच्या फंदात पडायचे नाही." तसेच
"....या बाईचे काय हाल झाले असते - सामूहिक बलात्कार, छळ व शेवटी दुर्मरण - "

**
आता या चौकटीत विचार करू:मानसिंगपुढे दोनच पर्याय आहेत.१ बाईला गोळी न घालणे..२बाईला गोळी न घालणे
* समजा त्याने बाईला ठार मारले नाही. तर त्याचा प्राण जाईल.बाईवर बलात्कार, छळ,दुर्मरण.
* समजा त्याने बाईला मारले .तर तो जिवंत राहील.बाईचे मरण. पण छळ बलात्कार नाही.

पहिल्या कृतीचे परिणाम दुसर्‍या कृतीच्या परिणामांपेक्षा अधिक वाईट आहेत, हे स्पष्ट आहे.
म्हणून मानसिंगाने वरिष्ठांच्या आ़ज्ञे अनुसार बाईला ठार मारावे.

मानसिंगाने ..

लेख वाचला. अटींमध्ये राहून त्यातल्यात्यात मार्ग काढायचा असेल तर..
मानसिंगाने त्या बाईला ती जबर जखमी होईल परंतू मरणार नाही (कायमचे पंगत्वसुद्धा येणार नाही) अश्या तर्‍हेने गोळी मरावी. जेणेकरुन ती निष्चेष्ट (काय हा शब्द ! याचेच सर्वसामन्यांना वापरता येणारे रूप म्हणजे निपचीत असे असेल बहुधा :) पडेल. युद्धज्वर ओसरला की तिला मानवी भावनेतून वैद्यकीय उपचार मिळतील आणि अश्या तर्‍हेने मरण आणि अत्याचार या दोहोंतून तिची त्या प्रसंगी सुटका झालेली असेल.
(हे सर्व होण्यासाठी सुद्धा अनुकूल परिस्थीती लागेलच. म्हणजे मानसिंगाकडे नेमके तेव्हा अधिकार्‍याचे फारसे लक्ष नसणे किंवा इतर लोक आसपास असूनही त्यांचे ती मेली आहे की नाही याकडे काही काळ लक्ष न जाणे इत्यादी...)
(हा उपाय थोडा स्वप्नील वाटतो आहे पण इतर उपाय नसतील तर मानसिंगाने करुन पाहायला काही हरकत नसावी. :)
वरील प्रतिसाद न वाचता हा प्रतिसाद लिहिला आहे. त्यामुळे मी सुचवलेला उपायाबद्दल वरती कुणी काही लिहिले असेल तर कल्पना नाही.
--लिखाळ.

टोकाच्या परिस्थितीचे मनःप्रायोगिक विश्लेषण

अशा प्रकारचे मानसिक प्रयोग नीतिशास्त्रात पुष्कळदा करतात. पण कित्येकदा त्या प्रयोगांचा उपयोग मला कळत नाही.

याची प्रसिद्ध उदाहरणे साधारण अशा तर्‍हेची असतात : "एका नावेत तीनच लोक राहून नाव तरंगू शकते, पण तीत आता चार लोक आहेत. चार लोकांपैकी कोणाला नावेतून पाण्यात ढकलावे - मनोरुग्ण मुलगी, तिचा भ्रष्टाचारी बाप, तिची व्यभिचारिणी आई, की पिकले-पान सुस्वभावी आजा?"... वगैरे असा काही प्रश्न असतो. या वैचारिक प्रयोगातून "मनःस्वास्थ्य, सदाचार, उर्वरित आयुष्याची कामना यापैकी काय क्रमाने महत्त्वाचे" वगैरे निष्कर्ष काढायची मनीषा असते. वरील उदाहरणात डळमळीत नावेऐवजी डळमळीत युद्धप्रसंग आहे, आणि पाण्यात ढकलून कोणाच्या मरण्याऐवजी बाईचा मृत्यू, बाईचा बलात्कार+मानसिंगाचा मृत्यू, वगैरे असे काही पर्याय आहेत.

हे वैचारिक प्रयोग तसे निरुपयोगी असतात, असे माझे मत आहे.

सैन्यातले "रूल्स ऑफ एंगेजमेंट" ढोबळपणे अशा (पण अधिक शक्य) युद्धपरिस्थितीबद्दल नियम देतात. पण ते काही तर्कशुद्ध नसतात. धुमश्चक्रीत तर्कशुद्ध विवेक करता येईल हे दुरापरस्त वाटते. इतकेच काय फायद्या तोट्यांचे मोजमाप करण्यासाठी पुरेशी माहिती हाताशी नसेल - मग विवेकी शांत चित्त असले तरी काय उपयोग?

यनावाला म्हणतात, की

ही एक काल्पनिक गृहीतसमस्या(हायपोथिटिकल प्रॉब्लेम) आहे. अशा समस्येचे उत्तर दिलेल्या अटींच्या चौकटीत बसणारे हवे.

त्यांचे म्हणणे योग्यच आहे. पण असल्या अटींमध्ये बसणार्‍या समस्येचे उत्तर देणारी नीतिव्यवस्था निश्चित करायची मला काही एक गरज वाटत नाही.

(त्याच प्रमाणे "नावेतल्या चौघांपैकी कोणाला पाण्यात ढकलायचे" याबद्दलही नैतिक तत्त्वे कसाला लावायची माझी काही एक इच्छा नाही.)

- - -
"बलात्कार म्हणजे मृत्यूपेक्षाही वाईट परिस्थिती" असे म्हणण्यात येते. बलात्कार हा भयंकर आहे, खरे. पण बलात्कारानंतर नेटाने पुन्हा आयुष्यात उतरणार्‍या युद्धशोषितांचा मुलाखती मी ऐकल्या आहेत. त्या वीरस्त्रिया आत्महत्येला उत्सूक नसतात. जगायचा हुरूप असलेल्या बायकांच्या मुलाखती मी ऐकल्या आहेत. मग बलात्काराऐवजी कोणी "दया येऊन" कोण्या स्त्रीला मृत्यू द्यावा - हे त्या स्त्रीच्या भविष्यातील चिवट बळाबद्दल आधीच तुच्छता दाखवणे होय.

"बलात्कार आणि मृत्यू यांच्यामध्ये कुठला अधिक वाईट?" हा मुद्दा आरामखुर्चीत बसून चर्चायचा म्हणजे अव्यापारेषु व्यापार होय. आरामखुर्चीत बसून चर्चा करायचीच असेल, तर "दोन्ही गुन्ह्यांचे प्रमाण कमी कसे करावे?" याबद्दल चर्चा करावी. नेमका एक-किंवा-दुसरा असा हायपोथेटिकल पर्याय आयुष्यात कधीच येणार नाही. जो काही प्रसंग प्रत्यक्षात येईल त्यात अनेक-अनेक महत्त्वाचे तपशील असतील, आणि त्या तपशिलांना अनुसरून काहीतरी निर्णय होईल. असे असताना त्या अटींसाठी हायपोथेटिकल नैतिक चौकट निर्माण का म्हणून करा?

थोडक्यात उत्तराचा प्रयत्न

हे वैचारिक प्रयोग तसे निरुपयोगी असतात, असे माझे मत आहे.

निदान प्रस्तुत प्रयोगावरून तरी तितकेसे पटत नाही.

पण कित्येकदा त्या प्रयोगांचा उपयोग मला कळत नाही.

मला कळतो असे वाटते. आणि प्रकार तितकाही हायपोथेटिकल वाटत नाही.

थोडक्यात उत्तराचा प्रयत्न:

- न्यूरेंबर्ग ट्रायल्स.
- स्वतःचे नैतिक फंडे क्लियर करण्यासाठी.
- "गुजरातच्या दंगलींत जे अत्याचार झाले, ते योग्यच होते. मुंबईत हे मुसलमान आपल्या उंचावरच्या वस्त्यांमधून खालच्या हिंदू वस्त्यांवर जाळ फेकतात, माहिती आहे? नरेंद्र मोदीने योग्यच केले; नरेंद्र मोदी आहे, म्हणून आज आपण हिंदू जगू शकत आहोत, त्याबद्दल आपण त्याचे ऋणी राहिले पाहिजे" अशा छापाची आर्ग्युमेंटे भल्याभल्यांकडून (जनसामान्यांपैकी; राजकीय नव्हेत!) ऐकलेली आहेत.

अशा प्रयोगांतून काही नैतिक तत्त्वांचा उहापोह झाला, आणि (किमानपक्षी चर्चेत भाग घेणार्‍या) पब्लिकचे नैतिक फंडे जरी क्लियर झाले, तरी पुष्कळ आहे. नाहीतर वाटेल तसल्या "नैतिक" आर्ग्युमेंटांची जनतेत कमतरता नाही. (माध्यमांतल्या आणि संकेतस्थळांवरच्या चर्चा ओझरत्या पाहिल्या तरी हे सहज लक्षात यावे.)

"बलात्कार म्हणजे मृत्यूपेक्षाही वाईट परिस्थिती" असे म्हणण्यात येते. बलात्कार हा भयंकर आहे, खरे. पण बलात्कारानंतर नेटाने पुन्हा आयुष्यात उतरणार्‍या युद्धशोषितांचा मुलाखती मी ऐकल्या आहेत. त्या वीरस्त्रिया आत्महत्येला उत्सूक नसतात. जगायचा हुरूप असलेल्या बायकांच्या मुलाखती मी ऐकल्या आहेत. मग बलात्काराऐवजी कोणी "दया येऊन" कोण्या स्त्रीला मृत्यू द्यावा - हे त्या स्त्रीच्या भविष्यातील चिवट बळाबद्दल आधीच तुच्छता दाखवणे होय.

अगदी सहमत!

"बलात्कार आणि मृत्यू यांच्यामध्ये कुठला अधिक वाईट?" हा मुद्दा आरामखुर्चीत बसून चर्चायचा म्हणजे अव्यापारेषु व्यापार होय. आरामखुर्चीत बसून चर्चा करायचीच असेल, तर "दोन्ही गुन्ह्यांचे प्रमाण कमी कसे करावे?" याबद्दल चर्चा करावी. नेमका एक-किंवा-दुसरा असा हायपोथेटिकल पर्याय आयुष्यात कधीच येणार नाही. जो काही प्रसंग प्रत्यक्षात येईल त्यात अनेक-अनेक महत्त्वाचे तपशील असतील, आणि त्या तपशिलांना अनुसरून काहीतरी निर्णय होईल. असे असताना त्या अटींसाठी हायपोथेटिकल नैतिक चौकट निर्माण का म्हणून करा?

त्या तपशिलांना अनुसरून निर्णय घेण्याची वेळ आली असता त्यामागील नैतिक बैठक (moral grounding) आपल्याच मनात स्पष्ट असावी, याकरिता पूर्वतयारी म्हणून कदाचित? नाहीतर, अशी नैतिक बैठक मनात पक्की असल्याशिवाय, आपल्या "धुमश्चक्रीत तर्कशुद्ध विवेक करता येईल हे दुरापरस्त वाटते" या विधानाप्रमाणेच, वेळप्रसंगी तर्कशुद्ध विवेक करता येणे दुरापास्त वाटते.

प्रयोगाचा नकारात्मक उपयोग

"गुजरातच्या दंगलींत जे अत्याचार झाले, ते योग्यच होते. मुंबईत हे मुसलमान आपल्या उंचावरच्या वस्त्यांमधून खालच्या हिंदू वस्त्यांवर जाळ फेकतात, माहिती आहे? नरेंद्र मोदीने योग्यच केले; नरेंद्र मोदी आहे, म्हणून आज आपण हिंदू जगू शकत आहोत, त्याबद्दल आपण त्याचे ऋणी राहिले पाहिजे" अशा छापाची आर्ग्युमेंटे भल्याभल्यांकडून (जनसामान्यांपैकी; राजकीय नव्हेत!) ऐकलेली आहेत.

या प्रयोगातही मानसिंग आपल्या मनाची खोटी समजूत घालण्यास मोकळा आहे, असे वाटते. उदाहरणार्थ, शत्रुची बायको चरित्रशुन्य होती म्हणून तिला मारणे गरजेचे होते वगैरे.

नेमका मुद्दा!

या प्रयोगातही मानसिंग आपल्या मनाची खोटी समजूत घालण्यास मोकळा आहे, असे वाटते. उदाहरणार्थ, शत्रुची बायको चरित्रशुन्य होती म्हणून तिला मारणे गरजेचे होते वगैरे.

'चारित्र्यशून्य होती' वगैरे फार पुढची गोष्ट झाली.

- तिच्या पोटी आणखी शत्रू निपजले असते.
- शत्रूच्या हातात 'आपल्या' बायका सापडल्या असत्या तर त्यांनी असे सोडले असते काय? 'त्यांच्या'पेक्षा 'आपण' कितीतरी पटीने 'सभ्य' आणि 'considerate' आहोत! (किंवा, शत्रूने 'आपल्या' बायकांना केलेले तेवढे चालते वाटते? मग आम्हीच केले तर ते तेवढे चूक कसे काय? शिवाय, 'Ours' is a just cause, and, in any case, 'We' are being more considerate!)
- "प्रेमात आणि युद्धात 'सर्व काही' क्षम्य असते" असे म्हटलेलेच आहे!
- आणखी काही वाटेल ते.

मनाची खोटी समजूतच घालायची झाली, तर वाटेल तशी घालता येते.

अशा प्रकारची आर्ग्युमेंटे येऊ शकतात, ती येण्याची शक्यता आणि प्रमाण वाटते तितकेही कमी नसावे, सामान्य 'सभ्य' मनुष्याच्या डोक्यातूनही असली आर्ग्युमेंटे सहज उद्भवू शकतात, आणि म्हणूनच किमान ती ऐरणीवर येऊन, त्यांचा उहापोह होऊन, त्यांचा फोलपणा प्रस्थापित होऊन त्याबद्दलचा संदेश पसरणे आणि रुजणे महत्त्वाचे आहे असे वाटते. आणि त्याकरिता अशा प्रकारच्या चर्चा - केवळ माध्यमांत आणि संकेतस्थळांवरच नव्हे, तर सर्वत्र - होणे केवळ उपयुक्तच नव्हे, तर आवश्यक आहे असे वाटते.

तथ्यचर्चेतून होणार नाहीत ते कसले फंडे क्लियर होणार आहेत?

दंगलीतील नरसंहार आणि राज्यशासनाकडून नरसंहार हे मुद्दे स्वतःहून नैतिक चर्चेत घ्यावेत. मानसिंगाच्या उदाहरणाने कुठले नैतिक तत्त्व तथ्यचर्चेपेक्षाही अधिक स्पष्ट होणार आहे, ते मला कळत नाही.

"अरेरे - जीव धोक्यात घालूनही मानसिंगाने काही करायला हवे होते" असे कोणीही म्हणेल. पण प्रत्यक्षात हवे तसे वागायला पुन्हा जो तो मोकळा. कारण नेमकी तशीच सुस्पष्ट शृंगापत्ती कोणापुढे येणार आहे?

सैनिकांशी मी काही खूप गप्पा मारल्या आहेत असे नाही. (पण थोड्या मारल्या आहेत.) जिवाच्या आकांताचा काळ असतो, तेव्हा हे असले नैतिक विचार येत नाहीत. न्युरेंबर्ग खटले टेबलापाशी बसून निर्णय घेणार्‍यांचे आहेत - मानसिंगाचे नाहीत.

माझा एक एनसीसी प्रशिक्षक आयपीकेएफ (श्रीलंकेतील शांतिरक्षक दल) मध्ये होता. अत्यंत शालीन वगैरे. "युद्धात बलात्कार तर होतातच" - म्हणाला. मग स्त्रियांच्या संगनमताने मागे लपून हल्ला करणार्‍या तमिळ टायगरांचे वर्णन. (ते तमिळ आपल्या देशा-गावा-घराच्या रक्षणासाठी अर्थातच सर्व प्रकारे प्रयत्न करणार. "ह्युमन शील्ड्स वापरायच्या नाहीत" हा नियम कधीच "आपल्यासाठी" नसतो. देशाच्या रक्षणासाठी जीव द्यावा, हे बालकांनाही शिकवतात, तशा स्फूर्तीकथा सांगतात - "चिंधड्या उडवीन राइराइ एवढ्या...")

मग पायदळी सैन्य समोरील गावकर्‍यांना अमनुष्य/अमानुष शत्रू म्हणूनच बघतो. बलात्कारित स्त्रीला जनावर म्हणून बघतो. ("चार्लीं"ना आणि "गूकां"ना मारणारे अमेरिकन पायदळी सैनिक काय स्वतः आराम करत होते? नव्हे स्वतःच्या जिवाच्या भीतीने बधीर होते.)

युद्धामधली नैतिकता आधीच घट्ट पाया हरवलेली असते. शत्रुहत्या आणि मित्ररक्षणासाठी तिर्‍हाइताकडे दुर्लक्ष, या दोन्ही गोष्टी ग्राह्य/योग्य ठरवलेल्या असतात. अशा बिना-नैतिक-पायाच्या परिस्थितीत "रूल्स ऑफ एंगेजमेंट" याशिवाय अधिक क्लियर फंडा असू शकत नाही. गढूळ नैतिकतेत काही थोडेफार नाकासमोर दोन इंच दिसेल इतपत मार्गदर्शन - तेवढेच.

नैतिक हिशोब करायचा अवसर मानसिंगापाशी नसतो. मागे असलेल्या कर्नलाने, जनरलाने आणि मंत्र्याने नैतिक हिशोब करायचा असतो. त्यांच्यासाठी न्युरेम्बर्ग. (तेही पराभव झाला तरच. नागासाकीवर बाँब टाकण्याचा निर्णय मात्र अजून "एक नैतिक कोडे"च आहे. कारण तो निर्णय घेणारे विजयी झाले.)

घरी बसून "ज्यू लोक तसे वाईटच असतात" अशी स्वतःची भलावणी करणार्‍या जर्मनांनी नैतिक विचार करायचा असतो, आणि "ऍक्शनला रिऍक्शन होणार" म्हणणार्‍या गुजरातेतील सामान्यजनांनी करायचा असतो. त्या नैतिक शिकवणीसाठी दंगलीतले खरेखुरे उदाहरण, गावे-वस्त्या उठवण्याचे उदाहरण योग्य ठरावे. हे युद्धप्रसंगाचे कल्पनारम्य उदाहरण योग्य नाही. उपयोगी नाही.

सहमत

उत्तम प्रतिसाद. सहमत आहे.

----

उपयोग व्हावा असे वाटते

दंगलीतील नरसंहार आणि राज्यशासनाकडून नरसंहार हे मुद्दे स्वतःहून नैतिक चर्चेत घ्यावेत. मानसिंगाच्या उदाहरणाने कुठले नैतिक तत्त्व तथ्यचर्चेपेक्षाही अधिक स्पष्ट होणार आहे, ते मला कळत नाही.

अशा प्रत्यक्ष चर्चांचा बहुधा फारसा उपयोग नसतो असे वाटते. कारण तेथे मते अगोदरच ठरून गेलेली असतात. मने अगोदरच बंद झालेली असतात. निष्कर्ष (सर्व बाजूंनी) अगोदरच काढले गेलेले असतात. वेगवेगळ्या बाजू बघण्याची - मुख्य म्हणजे victimच्या जागी स्वतःला ठेवून पाहून विचार करण्याची - कोणाचीच तयारी किंवा इच्छा नसते. आणि मग तीचतीच आर्ग्युमेंटे (सर्व बाजूंनी) घोळवली जातात. प्रत्येक बाजू आपल्याच आर्ग्युमेंटाचा आवाज ऐकण्यात मग्न असते, आपल्याच आर्ग्युमेंटाच्या आवाजाच्या प्रेमात पडलेली असते. दुसर्‍याचे आर्ग्युमेंट ऐकून घेणे तर सोडा, कोणी ऐकतसुद्धा नसते. थोडक्यात, अशा चर्चा बहुधा stillborn ठराव्यात, असे वाटते.

या प्रकारच्या बाबतींत नैतिक विचार हा मनुष्यास सहसा victimच्या जागी स्वतःला ठेवून बघितल्याशिवाय सहज येत नाही, असे वाटते. दुसर्‍याच्या दु:खाचे किंवा दुसर्‍यावर होणार्‍या अन्यायाचे कोणाला सोयरसुतक नसते; स्वतःचे दु:ख किंवा स्वतःवर होणारा अन्याय व्यवस्थित कळतो. आणि म्हणूनच "मुंबईत 'त्यांच्या' काही लोकांनी 'आपल्या' लोकांच्या वस्तीला आग लावली हे गुजरातेतील भलत्याच कोणत्यातरी 'त्यांच्या' लोकांच्या कत्तलीचे (अधिक graphic उदाहरणांचा पुनरुच्चार करू इच्छीत नाही; क्षमस्व!) समर्थन होऊ शकत नाही" हे आर्ग्युमेंट सहसा बहिर्‍या कानांवर पडते. (कारण victims 'ते' असतात. आणि "'They' deserve all that 'they' get" हा 'आपला' निष्कर्ष अगोदरच ठरून गेलेला असतो.) पण त्याऐवजी, उदाहरणादाखल, "मग त्याच न्यायाने, नथुराम गोडसे नावाच्या एका ब्राह्मण व्यक्तीने गांधींची हत्या केली, म्हणून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दिसेल त्या ब्राह्मणाचे घरदार जाळले गेले, त्यात नेमके काय चुकले?" असे विचारले, तर (ऐकणारी व्यक्ती ब्राह्मण असल्यास) संदेश पोहोचण्याची शक्यता किंचित वाढते. (अर्थात, तरीही शाश्वती नसतेच! आणि संदेश कसा घेतला जातो हे संदेश कोण आणि कसा देतो यावरही काही अंशी अवलंबून असते, हा भाग वेगळा.) कारण येथे victimचे जोडे नकळत 'आपल्या' पायावर चढतात.

अशा प्रकारच्या विविध परिस्थितींत, आणि विशेषतः victimच्या जागी, स्वतःस पहावयास कोणाला उद्युक्त करणे हे हायपोथेटिकल चर्चांत अधिक शक्य असावे असे वाटते. कारण प्रत्यक्ष परिस्थितीचा संदर्भ नसल्याने निष्कर्ष अगोदरच ठरून गेलेले नसतात, मन तुलनात्मकदृष्ट्या अधिक open असते. आणि मग चर्चा जसजशी पुढे सरकते तसतशी समांतरे आणून मुद्दे स्पष्ट करता येण्याची शक्यता असते. पण मुळात चर्चा घडण्याची शक्यता वाढते. (इसापनीती, पंचतंत्र वगैरेंमध्ये सरळसरळ नीतीचे पाठ देण्याऐवजी रूपककथा वापरलेल्या आहेत; बायबलमध्येही असेच काहीसे प्रयोग केले गेलेले आहेत असे म्हणतात; या सर्वांमागे असेच काही कारण असू शकेल काय?)

पण प्रत्यक्षात हवे तसे वागायला पुन्हा जो तो मोकळा. कारण नेमकी तशीच सुस्पष्ट शृंगापत्ती कोणापुढे येणार आहे?

प्रत्यक्षात हवे तसे वागायला जो तो मोकळा हे नेहमीच खरे. परंतु अशा अनेक शृंगापत्तींवर आयुष्यात वेगवेगळ्या वेळी जर गंभीर विचार केलेला असेल, तर मोक्याच्या वेळी त्यांपैकी एखादी जशीच्या तशी सुस्पष्ट शृंगापत्ती जरी आली नाही, तरी कोठल्या ना कोठल्या एका किंवा अनेक शृंगापत्तींच्या विविध अंगांशी समांतरे आपोआपच साधली जाऊन त्यांवरच्या विचारांतून आणि निष्कर्षांतून अंगी बाणलेली तत्त्वे आपोआपच कामी येऊन योग्य निर्णय काहीसा प्रतिक्षिप्त क्रियेने घेतला जाण्याची शक्यता वाढते. (अर्थात, शाश्वती नसतेच.) शेवटी माणसाचे विचार हे बरेचसे सवय लावावी तसे येतात; योग्य सवय लागलेली असणे महत्त्वाचे. शेवटी 'नैतिक शिक्षण', 'संस्कार' म्हणजे तरी याहून वेगळे असे काय असते? किंवा, फॉर दॅट मॅटर, कोणतेही शिक्षण, कोणतेही ट्रेनिंग? आयुष्यात कोणती परिस्थिती हुबेहूब शाळेत शिकवल्याबरहुकूम येते? पण म्हणून आपण शिक्षण घेणे बंद करतो काय? वैद्यकीय केसेस मॅन्युअलबरहुकुम असतात काय? मग मेडिकल कॉलेजे बंद करावीत काय? वेगवेगळ्या केसेसमध्ये मेडिकल कॉलेजात - आणि वैद्यकीय अनुभवात - शिकलेली जनरल तत्त्वेच कामी येतात ना?

नैतिक हिशोब करायचा अवसर मानसिंगापाशी नसतो.

तो अवसर मानसिंगाजवळ नसतो, खरे आहे. शिवाय युद्धाच्या heatमध्ये नैतिक तत्त्वेही फार लवकर वितळू शकतात. पण हा अवसर नसतो म्हणूनच योग्य विचार करण्याची सवय, नैतिक बैठक, moral grounding जर मानसिंगाजवळ अगोदरपासूनच - माणूस म्हणून, सैनिक म्हणून नव्हे! - असेल, तर अवसर नसताना विचार न करतासुद्धा तो योग्य निर्णय केवळ अंगवळणाने, mental makeupपायी घेण्याची शक्यता वाढते. आजूबाजूची परिस्थिती कितीही चिघळली, युद्धाच्या heatमध्ये आजूबाजूची नैतिक मूल्ये कितीही वितळून ढासळली, तरी त्याची वैयक्तिक मूल्ये एका हद्दीपलीकडे न ढासळण्याची, त्याही परिस्थितीत तो बर्‍यापैकी खंबीर राहण्याची शक्यता वाढते. किंचितच वाढत असेल कदाचित, पण वाढते निश्चित.

आणि ही योग्य विचार करणाची सवय लागायची कुठून? तर त्यासाठी मार्ग अनेक असू शकतील, पण कोणताही मार्ग अवलंबला, स्रोत कोठलाही असला, तरी त्यातून कोणत्याही परिस्थितीच्या वेगवेगळ्या बाजू बघता येणे महत्त्वाचे. आणि त्या तशा बघता याव्यात म्हणून, सरावासाठी वेगवेगळ्या हायपॉथेटिकल परिस्थिती घेऊन त्यांच्या अंगोपांगांचा विचार करणे हा मार्ग काय वाईट आहे? कोणतीही परिस्थिती आयुष्यात ज्याप्रमाणे जशीच्या तशी येत नाही, त्याप्रमाणे गुजरातची दंगलसुद्धा पुन्हा जशीच्या तशी घडत नाही. गुजरातच्या दंगलीच्या उदाहरणातूनसुद्धा सरतेशेवटी त्याचे मॉडेल बनवून जनरल तत्त्वेच शिकायची असतात, जी इतरत्र कामी येऊ शकतात. मग मॉडेलच बनवायचे, तर गुजरातच्या दंगलीचे बनवले काय किंवा हायपोथेटिकल परिस्थितीचे बनवले काय - हायपोथेटिकल परिस्थितीच्या मॉडेलात निदान परम्यूटेशने-कॉम्बिनेशने कमीजास्त करून वेगवेगळी मॉडेले बनवून वेगवेगळे विचारप्रयोग करता येतात; गुजरातच्या दंगलीची फार तर स्पेसिफिक केस स्टडी बनू शकते.

त्यांच्यासाठी न्युरेम्बर्ग. (तेही पराभव झाला तरच. नागासाकीवर बाँब टाकण्याचा निर्णय मात्र अजून "एक नैतिक कोडे"च आहे. कारण तो निर्णय घेणारे विजयी झाले.)

हो ते आहे. एवढेच नव्हे, तर अणुबाँबचा प्रत्यक्ष वापर करणारे एकमेव राष्ट्र नव्याने केवळ अण्वस्त्रक्षमताचाचणी करणार्‍या राष्ट्रांना सुनावते. तोही भाग आहे. आणि सरकारी पातळीवर ते तूर्तास तरी "नैतिक कोडे"च राहणार. कारण त्यापेक्षा काही वेगळे म्हणण्यास लागणारे धारिष्ट्य आणि त्याचे राजनैतिक परिणाम उचलण्याची तयारी किंवा राजकीय इच्छाशक्ती निर्माण होणे कठीण आहे. पण हे नैतिकतः योग्य नसले तरी याबाबत आपण सामान्य नागरिक फारसे काही करू शकत नाही या दृष्टीने तो एका प्रकारचा नाइलाज आहे. आणि तसेही हे जेव्हा घडले तेव्हा आपला जन्मही झालेला नसल्यामुळे तेव्हाही आपण काहीही करू शकत नव्हतो आणि आताही जे झाले ते नैतिकदृष्ट्या चूक होते हे खाजगीत आणि कदाचित उघडपणेसुद्धा कबूल करण्याव्यतिरिक्त व्यक्तिशः काहीही करू शकत नाही. परंतु लोकमताचा आपणही भाग आहोत हे लक्षात घेता यापुढे अशा प्रकारची अनैतिक कृत्ये सरकारकडून घडणार नाहीत या दृष्टीने लोकमत घडण्यात आपलाही हातभार राहू शकतो हे लक्षात घेण्याजोगे आहे. (शेवटी लोकमतातील पराभव विएतनाममधील माघारीस बर्‍याच अंशी कारणीभूत ठरला हेही आहेच.) मात्र त्यासाठी प्रथम आपले स्वतःचे moral grounding भक्कम पाहिजे.

घरी बसून "ज्यू लोक तसे वाईटच असतात" अशी स्वतःची भलावणी करणार्‍या जर्मनांनी नैतिक विचार करायचा असतो, आणि "ऍक्शनला रिऍक्शन होणार" म्हणणार्‍या गुजरातेतील सामान्यजनांनी करायचा असतो.

हा नैतिक विचार - किंवा मुळात विचार - करायला शिकवावे आणि शिकावे लागते.

त्या नैतिक शिकवणीसाठी दंगलीतले खरेखुरे उदाहरण, गावे-वस्त्या उठवण्याचे उदाहरण योग्य ठरावे. हे युद्धप्रसंगाचे कल्पनारम्य उदाहरण योग्य नाही. उपयोगी नाही.

खर्‍याखुर्‍या उदाहरणांबरोबरच खर्‍याखुर्‍या उदाहरणांत न येणार्‍या विविध पैलूंच्या विचारांसाठी काल्पनिक उदाहरणे, दृष्टान्त कामी येऊ शकतील असे वाटते. (चूभूद्याघ्या.)

 
^ वर